Thursday, 30 September 2010

सांजावून आलेले..

सांजावून आलेले.
भीती काजळी धरून येते.
करकरीत तिन्हीसांजा.
ठोका चुकतो काळजाचा.
पाऊल पुढे टाकवत नाही.

अंधुकलेल्या उजेडात-
धुसर वाट लांबवर.
चालल्याशिवाय इलाज नाही हे ठाम माहीत असलेले.
थांबून जिवाला गोड लागण्याइतके नशीब नाही आपले.
चहूबाजूंनी अंधारून येते आहे-
कुणी अंगावर चाल करून यावे तसे.
आतड्याची माणसेही लांबवर
निवार्‍याला.
आपापल्या उद्योगात.
गाढ बुडून.
ती त्यांची वाट असेल...
आपली आपल्यापाशी.
सोडता येत नाही.
पाऊल पुढे टाकवत नाही.

या पावलापुढे पसरून आहे
जन्मजन्मांतरीचे भय.
अशुभाच्या एकवटून आलेल्या चाहुली.
निर्धाराला कळंजून टाकणारी दु:स्वप्ने.
कसे टाकावे पाऊल?
टाकवत नाही.

या पावलाला जिंकले पाहिजे.
असलेनसलेले बळ एकवटून एकदाच.
मग कभिन्न रात्र येईल.
उत्तररात्रही.
आणि मग हळूहळू उजाडेल.

3 comments:

  1. फारच छान ..
    आवडली कविता

    ReplyDelete
  2. ही कविता आधी आवडली/कळली नव्हती. आज उमजून आवडली. म्हणून.

    ReplyDelete
  3. अर्थातच, आभार!

    ReplyDelete