Friday, 30 July 2010

निरर्थक

कधी कधी असं वाटतं, की सगळ्याच गोष्टींची पुनरावृत्ती होते आहे. हातातून वाळू निसटत जावी, तशी आपली माणसं आपल्या आयुष्यातून निसटून जाताहेत. आणि आपण हताशपणे निव्वळ उभे आहोत.


हा असा भूतकाळाशी सतत तुलना करण्याचा चाळा निरर्थक आणि काही अंशी मनोरुग्णतेचं द्योतकच, हे मान्य आहे. तरीही त्याच्या पकडीतून पूर्णपणे सुटता येत नाही. आणि आता तर असं वाटतं, की पूर्णांशानं अशी सुटका करून घेणं कुणालाच कधीच शक्य नाही. स्मृती नावाचं जे टूल माणसाला मिळालेलं आहे, त्याचीच ही अपरिहार्य बाजू आहे. अनुभव आहे, आठवण आहे, आणि अपरिहार्यपणे तुलनाही आहे. कुठलाच अनुभव आता अनाघ्रात, ताजा, अस्पर्श असणार नाही. आपल्या संचिताची छाया त्यावर अनंत काळ असत असणार आहे.

अशा वेळी माणसं नव्यानं कशी जन्मून येत असतील? आज-आत्ताच्या क्षणात कशी जगत असतील? ही साधना त्यांना कशी साधत असेल? काळाचं हे प्रचंड राक्षसी दडपण झुगारायला किती प्रचंड ताकद लागत असेल?

हेही प्रश्न निरर्थकच. माणसं असं करतात किंवा करत नाहीत. परिश्रमांनी साधण्यासारखी ही गोष्टच नव्हे. तुम्ही ती करता किंवा करत नाही. अधेमधे काही संभवत नाही. कसलाही पूल नाही.

आपण अशा माणसांमध्ये मोडत नाही, हे आता स्वीकारलं पाहिजे.

---

हवं तसं वागणारी माणसं स्वीकारताना, तसं न वागणार्‍या माणसांच्या आयुष्यातून तुकडा तोडल्यासारखी बाजूला फेकलं जाताना, अधिकाधिक कडवट - आग्रही होत जाताना -  काही चुकत असेल का? याचा नीट मुळापासूनच विचार केला पाहिजे.

आपण कुठली मूल्यं मानतो?

दुसर्‍या माणसांची आयुष्यं चालवण्याचा - त्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा अधिकार आपल्याला नाहीय.

पण त्याच वेळी, आपल्या जीवनदृष्टीशी समांतर असणारी माणसं निवडून त्यांच्या जवळ जाण्याचा (आणि उलटही, म्हणजे न आवडणार्‍या प्रकारच्या माणसांपासून लांब जाण्याचा) हक्क आहे.

भिन्न जीवनदृष्टी समजून घेण्याचा प्रयास आपण करू शकतो. पण तिच्याशी जुळवून घेऊ शकत नाही. तसं केलं, तर आपलाच रस्ता बदललेला असेल. तसा तो बदलायलाही हरकत नाहीच - जर तसं करण्यानं सुख लागत असेल तर. त्या रस्त्याबद्दल आतून समाधान असेल तर. अन्यथा नाही.

यांत कसलाही भावनिक दबाव असू नये. (किंवा अधिक मानवी बोलायचं झालं, तर तो शक्यतोवर कमीत कमी असावा.) धमक्या असू नयेत.

’आपल्या जातीचा मिळो मज कोणी’ अशा जातीची निवळशंख आस असावी फक्त.

या मूल्यांना अनुसरून आपण वागतो का?

होय.

मग आपली माणसं अशी दूर जातात (किंवा अधिक नेमकं बोलायचं तर आपण त्यांच्यापासून दूर येतो), या वस्तुस्थितीबद्दल आपण काय करू शकत असतो?

कितीही पीळ पडला आतड्यांना, तरीही?

काहीही नाही.

हा दुराग्रह आहे? हट्ट आहे? डॉमिनन्स आहे? उद्मेखून इन्फ्लुएन्शिअल असणं आहे?

कुणास ठाऊक. असेल, किंवा नसेलही.

पण आपण त्याबद्दल काय करू शकत असतो?

10 comments:

  1. प्रश्नाच्या नेमकेकरणासाठी तूर्तास अनेकानेक धन्यवाद. ह्याहून अधिक उत्तरण्यासाठी आत-बाहेर शोध अव्याहत चालू.

    ReplyDelete
  2. दुसर्‍या माणसांची आयुष्यं चालवण्याचा - त्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा अधिकार आपल्याला नाहीय.

    पण त्याच वेळी, आपल्या जीवनदृष्टीशी समांतर असणारी माणसं निवडून त्यांच्या जवळ जाण्याचा (आणि उलटही, म्हणजे न आवडणार्‍या प्रकारच्या माणसांपासून लांब जाण्याचा) हक्क आहे.

    भिन्न जीवनदृष्टी समजून घेण्याचा प्रयास आपण करू शकतो. पण तिच्याशी जुळवून घेऊ शकत नाही. तसं केलं, तर आपलाच रस्ता बदललेला असेल. तसा तो बदलायलाही हरकत नाहीच - जर तसं करण्यानं सुख लागत असेल तर. त्या रस्त्याबद्दल आतून समाधान असेल तर. अन्यथा नाही.

    यांत कसलाही भावनिक दबाव असू नये. (किंवा अधिक मानवी बोलायचं झालं, तर तो शक्यतोवर कमीत कमी असावा.) धमक्या असू नयेत.

    ’आपल्या जातीचा मिळो मज कोणी’ अशा जातीची निवळशंख आस असावी फक्त.

    या मूल्यांना अनुसरून आपण वागतो का?

    होय.

    मग आपली माणसं अशी दूर जातात (किंवा अधिक नेमकं बोलायचं तर आपण त्यांच्यापासून दूर येतो), या वस्तुस्थितीबद्दल आपण काय करू शकत असतो?

    कितीही पीळ पडला आतड्यांना, तरीही?

    काहीही नाही.

    he sagaLa agadi manapasun paTala.

    ReplyDelete
  3. फारच सुंदर. कंसातली वाक्य तर काळजाला भिडली. आपण जे वाचतो ते किती आवडणार हे त्या वेळच्या मनस्थितीवर अवलंबून असतं, आणि तुझं हे लिखाण किती पटलं आहे ते मला शब्दात नाही मांडता येणार.
    It feels like you penned down my thoughts.
    thanks

    ReplyDelete
  4. absolutely nirarthak.
    funDe ganDale ki aayushya ganData.
    funDe kameet kamee aaNi uncompromising Thewale ki waaT saraL disate.
    compromise che lobh, moh maanale naaheet ki funde clear hotaat.
    he sagaLa sant type ch waaTel paN khara aahe.
    tulaa paDalelyaa prashnaatun either waaT saapaDate kiwwaa naahee saapaDat - ugeech shodhaayachaa prayatn karat basaaayach naahee.

    khaao, khujaao battee bujhaao.

    ReplyDelete
  5. बरं चिंतन सुरु आहे. विचार करत राहाणं चांगलं

    ReplyDelete
  6. तू त्याबद्दल काही करावस असं तुला मुळात का वाटतं?
    आपल्या जातीचा मिळो कोणी अशी आस प्रत्येकाला असते, बेशक. (सन्माननीय अपवाद नक्कीच असतात). पण हे इतकं म्युचवल असतं की त्यात हजारो शक्यता असतात. आपल्याला जे जितक्या इंटेन्सिटीने वाटतं ते समोरच्याला वाटेलच असं नाही किंवा Vice a versa.
    पण जी गोष्ट म्हणजे समोरच्याला काय वाटतं, तो दूर का जातो या गोष्टी इतक्या आपल्या कह्याबाहेरच्या असतात की त्यावर आपण विचार करण्यात काय हशील?
    आयुष्य गंडू नये म्हणून फ़ंडे मुळातच कमी ठेवावेत ही उपरती किंवा ज्ञान आहे. आणि यासाठी, ह्या उपरतीकरता तू लिहीलेयेस ते सारं म्हणजे धरणं, सुटणं, शोधणं, हरवणं, दूर जाणं, तुटून पडणं हे होणं आवश्यकच असेल. कारण यातून ’तुला’ काहीतरी कळलेलं असेल. रेडीमेड कोणाकडून मिळत नाही किंवा कितीही भारी, फ़ाडू माणसाने सांगीतलं म्हणून आपल्याला लागू होत नाही.प्रवासाचा एक अटळ टप्पा म्हणून तेच योग्य आहे. काही शिकण्याकरता सर्वच शक्यतांना सामोरं जावंच लागतं. दु:खद, सुखद सगळ्याच.
    दु:ख होणं साहजिक आहे, आपल्याबरोबरच का होतं हे ही वाटलं असणं साहजिक आहे. That's life I guess!

    सगळं जाणीवपूर्वक अनुभवणं महत्वाचं. :))))

    असं अर्थात मला वाटतं आणि जे (निदान) माझ्यापुरता खरंय.

    ReplyDelete
  7. तुम्ही ती करता किंवा करत नाही. अधेमधे काही संभवत नाही. कसलाही पूल नाही.
    >> Perfect! This sums up everything.

    Kshipra.. comment khup avadali.

    ReplyDelete
  8. Tulip, kshipra chya bhalya mothya comment madhale fakt shevatache 5 shabd tiche ahet . baki sagali coment meghna chya post cha copy paste ahe. tula kshipra chya coment madhe kay khup avadala? te 5 shabd?

    ReplyDelete
  9. Came across your blog following links on some blogs.Your writing skills are too good! Do keep witing..

    pan mala ek vatla ya lekhat te he ki :

    "आज-आत्ताच्या क्षणात कशी जगत असतील? ही साधना त्यांना कशी साधत असेल? काळाचं हे प्रचंड राक्षसी दडपण झुगारायला किती प्रचंड ताकद लागत असेल?"
    He prashna nirarthak navhet. yanchi uttara shodhana avaghad asu shakel kadachit, pan te nrarthak nakkich nahit

    ReplyDelete
  10. ही नचिकेतची कमेंट:
    (gnachiket.wordpress.com)

    मेघना,

    पोस्ट सुंदर.

    प्रतिक्रिया देतोय.. जाताजाता आपलीही पिंक टाकल्यासारखा वाटू शकतो माझा विचार पण उगीच एक प्रयत्न करतो.

    तुझे शब्द कोट मध्ये:
    “मग आपली माणसं अशी दूर जातात (किंवा अधिक नेमकं बोलायचं तर आपण त्यांच्यापासून दूर येतो), या वस्तुस्थितीबद्दल आपण काय करू शकत असतो?

    कितीही पीळ पडला आतड्यांना, तरीही?

    काहीही नाही.”


    या उपर एकूणच कशातच आपण काहीही करू शकत नाही. किंवा आपण जे काही करू शकू असं आपल्याला वाटतंय ते अजिबात “फारसं काही नाही” म्हणजे “माझिया जातीचा” कोणी किंवा इतर काही मिळणं, न मिळणं, नकोसंच वाटणं, हवंसंच वाटणं, नको असून मिळणं, हवं असून न मिळणं..किंवा इतर कशाचंही आपण काही करू शकत नाही.

    हे कळत जाणं म्हणजे मोठं होणं..असं मला दिसलं..इतरांचं कळत नाही.

    ReplyDelete