Thursday, 30 September 2010

सांजावून आलेले..

सांजावून आलेले.
भीती काजळी धरून येते.
करकरीत तिन्हीसांजा.
ठोका चुकतो काळजाचा.
पाऊल पुढे टाकवत नाही.

अंधुकलेल्या उजेडात-
धुसर वाट लांबवर.
चालल्याशिवाय इलाज नाही हे ठाम माहीत असलेले.
थांबून जिवाला गोड लागण्याइतके नशीब नाही आपले.
चहूबाजूंनी अंधारून येते आहे-
कुणी अंगावर चाल करून यावे तसे.
आतड्याची माणसेही लांबवर
निवार्‍याला.
आपापल्या उद्योगात.
गाढ बुडून.
ती त्यांची वाट असेल...
आपली आपल्यापाशी.
सोडता येत नाही.
पाऊल पुढे टाकवत नाही.

या पावलापुढे पसरून आहे
जन्मजन्मांतरीचे भय.
अशुभाच्या एकवटून आलेल्या चाहुली.
निर्धाराला कळंजून टाकणारी दु:स्वप्ने.
कसे टाकावे पाऊल?
टाकवत नाही.

या पावलाला जिंकले पाहिजे.
असलेनसलेले बळ एकवटून एकदाच.
मग कभिन्न रात्र येईल.
उत्तररात्रही.
आणि मग हळूहळू उजाडेल.

Wednesday, 22 September 2010

भय इथले संपत नाही...

चौकटीचा मोह कुणाला कधी सुटलाय? आणि चौकट मोडण्याचं अनिवार आकर्षणही?

कुणीसं म्हटलंय, तसा हा न संपणारा खेळ. हिवाळ्यातल्या साळिंदरांच्या खेळासारखा.

एकमेकांच्या उबेसाठी अधिकाधिक प्रेमानं एकमेकांच्या जवळ सरकत राहायचं आणि मग काटे टोचायला लागले की पुन्हा एकदा फणकारून लांब.

लांब-जवळ-लांब-जवळ-लांब....

अंतहीन.

***

कुटुंब। [कुटुऽम्ब] (बा-, बे, बां-) नपुं. सा. ना. - १. विवाहित (पाहा: विवाह) जोडपे, त्या जोडप्याची मुले व जोडप्याशी बहुतकरून रक्ताचे नाते असलेली कमीअधिक वयाची माणसे यांनी बनलेले, एका किंवा अनेक घरांत (पाहा: घर) पसरलेले, परस्परावलंबी आणि परस्परपूरक सदस्य असलेले, दुर्भेद्य सामाजिक एकक. २. पत्नी (लाक्ष.) - आपट्यांचे कुटुंब माहेरी गेलेले दिसते. कौटुंबिक वि. - कुटुंबाशी संबंधित (बाब); सर्व कुटुंबाला एकत्रितपणे उपभोग घेता येण्याजोगा (चित्रपट, नाटक); कुटुंबवत्सल (गृहस्थ) समा.परिवार;


।-कबिला - कुटुंब, बहुतकरून दूरचे नातेवाईक आणि इतर आनुषंगिक गोष्टी (कुटुंबसदस्य मानले जाणारे पाळीव प्राणी, कौटुंबिक जबाबदार्यात इ.) यांचा एकत्रित समुच्चय.


।संस्था - कुटुंब या एककाच्या माध्यमातून सर्वस्पर्शी सामाजिक व्यवस्था निर्माण करणारी संस्था.

***

आपल्याला लग्न नावाचा प्रकार हवाय की नकोय?

हवा असेल तर कशासाठी कुठल्या-कुठल्या किंमती भरून? चूक-बरोबरचे तर्क निर्धारानं बाजूला ठेवले काही काळ, तरी कुणालातरी दाखवण्यासाठी म्हणून आपला फोटो काढणं आपल्याला जमेल का?

न आवडलेल्या ’स्थळा’ला नकार देताना पत्रिका ढालीसारखी वापरतात, हे कितीही तार्किक पद्धतीनं पटवून घेतलं, तरी कुणी जोडीदार सापडण्याच्या आशाळ-चिकट मोहापायी आपली पत्रिका+फोटो+अमुक इतका पगार+जात+आवडता लेखक/दिग्दर्शक+ आवडता रंग या छापाची माहिती कुणाला पाठवणं आपल्याला जमेल का?

ज्या भावंडांसोबत वाढून आपण इतके विचारी-बिचारी होऊन बसलो, तीच भावंडं आपापली लग्नं जमवताना ’अरे, नवीन पंच्याऐशीची मॉडेल्स आलीयेत म्हणे बाजारात’ अशी मस्करी स्वत:शीही करू शकतात आणि त्यांच्या-त्यांच्या घरातली वडीलधारी माणसं या विनोदांवर माफक का होईना हसू शकतात; तर त्यांनाच समकालीन असलेल्या आपल्याला -

संस्कृतीच्या माजघरी-सुखद काळोखातून, स्त्रीमुक्ती आणि मग स्त्रीवादाचे वळसे बळंच पचवत, समलिंगी संबंध हाही नॉर्मल आयुष्याचा एक भाग असू शकतो या जाणीवेच्या कड्यावर बळंच आणून लोटलेल्या आणि तरीही डोळ्यांवरची पट्टी सोडायला हट्टीपणानं नकार देणार्याय एका समाजात जन्मलेल्या-वाढलेल्या आपल्याला-

कॉलेज आणि तत्सम पौगंडाळू वयातून पुढे आलेल्या, प्रगल्भ आणि नकारात्मक- डोळस आणि कडवट-शहाण्या आणि निबर असलेल्या आपल्याला-

जवळच्या मित्रमैत्रिणींना लग्नाच्या चौकटीत जाऊन निराळंच कुणी होताना पाहणार्‍या आणि आपल्याच निनावी पझेसिव्ह नात्यांचे काच न बोलता चुपचाप साहणार्‍या पिढीतल्या आपल्याला-

जोडीदार या गोष्टीबद्दल कितपत स्वप्नाळू राहणं परवडू शकतं?

तटबंदीबाहेरचे रोकडे प्रश्न. म्हटलं, तर आपण त्या गावचेच नाही असं दाखवत - तिर्‍हाईत खुनशी नजरेनं परतवून लावता येणारे.

तटबंदीच्या आत?

गळ्याला मिठी घालणारं कोवळं भाचरू. नातेवाइकांनी घरात हक्कानं घेतलेला पाहुणचार. निभावलेली परस्परांची दुखणी-बाणी. खिदळत जागवलेल्या मंगळागौरी. पहिल्यावहिल्या पगाराचे पैसे घरी आणल्यावर घरातल्या वडीलधार्‍या माणसानं काढलेली दृष्ट. दबक्या पण उत्साही-खवचट आवाजात केलेली गॉसिप्स...

जी कधीच कसलेच प्रश्न विचारत नाही, जिच्यात सहेतुक निवडीतल्या स्वातंत्र्याचा आणि जबाबदार्‍यांचा लवलेशही नसतो, जी एकत्र राहिल्यावर कुत्र्या-मांजरांबद्दल आणि कुत्र्या-मांजरांनाही चुकत नाही, जिच्यात वाहत्या आयुष्याचा अटळ-हताश-प्रवाही स्वीकार असतो-

अशी ओढाळ-चिकट-निर्बुद्ध माया...

***

विवाह। [विवाऽह] (हा-, ह, हां-) पुं. सा. ना. - स्त्री व पुरुष (पाहा: वधू-वर) यांनी परस्परांशी केलेला; कुटुंबसंस्थेला (पाहा: कुटुंब) जन्म, अधिष्ठान आणि संरक्षण पुरवणारा; आजीव सहजीवनाचा आणि एकनिष्ठेचा सामाजिक करार. (या करारानंतर वधू-वर / स्त्री-पुरुष हे पती-पत्नी होतात आणि एकत्रित सहजीवनाला (पाहा: संसार) सुरुवात करतात. घटस्फोट या आधुनिक विधीने हा करार रद्द करता येतो (पाहा: घटस्फोट)). अनुलोम-, प्रतिलोम-, गांधर्व- इ. (जातींच्या उतरंडी व धार्मिक मान्यता यांच्या प्रतवार्यांलवर आधारित विवाहाचे निरनिराळे प्रकार) समा.लग्न, शरीरसंबंध (कालबाह्य), पाट(लावणे) (धार्मिकदृष्ट्या विवाहाइतकी राजमान्यता नसलेला, पण लोकमान्यता देणारा, उच्चवर्णीयांमध्ये प्रतिष्ठा नसलेला प्रकार, निकाह (मुस्लिम* धर्मातील विवाह);


।बाह्य (संबंध) - लग्नाच्या जोडीदाराखेरीज तिसर्यात व्यक्तीशी ठेवलेले (शारीरिक / मानसिक / आत्मिक संबंध) (पाहा: व्यभिचार);


।विधी - वधू-वरांच्या कराराला पूर्णत्व देणारा धार्मिक संस्कार. (आधुनिक समाजात धार्मिक विधीचे महत्त्व कमी झालेले नाही. मात्र या विधीशिवाय कराराला वैधता देणारा कायदेशीर विवाहविधीदेखील अलीकडे लोकसंमत होऊ लागला आहे. धार्मिक विधीमध्ये ’देव, ब्राह्मण आणि वयोवृद्ध’ या साक्षीदारांना परंपरा महत्त्व देते, तर कायदेशीर विवाहविधीमध्ये सज्ञान वधूवर आणि दोन सज्ञान साक्षीदार विधीची पूर्तता करू शकतात.);


।संस्था - विवाह या धार्मिक-सामाजिक विधीच्या माध्यमातून साधनसंपत्ती, सत्ताकारण आणि समाजकारण यांवर नियंत्रण ठेवू पाहणारी; सामाजिक दबावाचा प्रभावी वापर करणारी; काही विशिष्ट अटींच्या पूर्ततेच्या बदल्यात व्यक्तीला समाजगटाचा भक्कम आधार पुरवणारी लोकप्रिय आणि यशस्वी संस्था;


।सोहळा - आप्त-मित्रांचा गोतावळा आमंत्रित करून त्यांच्या मान्यतेसह जाहीरपणे केला जाणारा विवाहविधी व त्यासह सामाजिक दबाव व रूढीपोटी अपरिहार्य होणारे बहुतांशी खर्चीक स्नेहभोजन.

***

घर [घऽर] (रा-, रे, रां-)* नपुं. सा. ना. - १. सुरक्षित निवार्‍याला उपयुक्त असे, मालकीचे किंवा भाड्याचे, लहान किंवा मोठे, ठिकाण २. कुटुंबातील (पाहा: कुटुंब, विवाह) सदस्यांमधील चिवट नातेसंबंधांतून जन्म घेणारे जिव्हाळ्याचे वातावरण जेथे आहे, असे वास्तव्याचे ठिकाण; (एखाद्याशी) घरोबा करणे - (एखाद्याशी) विवाह करणे; घर थाटणे - अ] विवाह करून संसाराला सुरुवात करणे आ] नवीन घरात राहायला सुरुवात करणे; (एखाद्याच्या) मनात घर करणे (लाक्ष.) - एखाद्याच्या मनात जिव्हाळ्याची जागा मिळवणे गुलाबी ओढणी घेणार्‍या मुलीने चंदूच्या मनात घर केले, एखादी कल्पना मनात पक्की रुजणे चित्रपटात काम मिळवण्याच्या कल्पनेने तिच्या मनात घर केले समा.आलय, गृह, घरकुल, निवास, सदन;


-काम - घरातील स्वयंपाक, साफसफाई, बाजारहाट इ. काम;


-जावई - विवाहानंतर पत्नीने पतीच्या घरी राहायला जायचे या रूढीसंमत प्रकाराने न वागता पत्नीच्या मातुलगृही वास्तव्याला येणारा पुरुष;


।-दार - कुटुंबसंस्थेचा आधार, तसेच त्यातून व्यक्तीला जन्माने प्राप्त होणारी किंवा घर थाटून (आ]) थाटून मिळवता येणारी मालमत्ता.

***

मला ते घर अनेकदा दिसतं स्वप्नात.

तसं ते देखणं.

काहीसं काळोखलेलं. पण देखणंच.

पुढ्यातली बाग, मग अंगणातला मांडव, पडवी, ओटी, माजघर. ओटीवरून माजघरात जाताना लागणारं, एकात एक गेलेल्या अनेक काळ्या-कुळकुळीत नक्षीदार चौकटींचं, भलं-मोठ्ठं दार आणि त्यातून आत गेलं की लगेच उजव्या हाताला माडीचं दार. लाकडी जिन्यावरून वर माडीत गेलं, की मागे विहिरीकडे डोकावून पाहणारी घरगुती स्वभावाची, काहीशी जुनाट भासणारी माडी, मागचं तुळशीवृंदावन आणि पलीकडचं हिरवं परस. पुढे बागेकडे पाहणारी परीटघडीची, शिष्ट पण टुमदार माडी.

माजघरातून आत जाताना प्रशस्त देवघर आणि तिथला तो रोखून पाहणारा गणपती. आत गेलं की चूल-वैलासकटचं, सारवलेलं, कौलाच्या जागी घातलेल्या काचेतून येणारा कवडसा मिरवणारं, अंधारा-उजेडाच्या कोलाजानं न्हालेलं स्वैपाकघर. मागे न्हाणी आणि विहिरीकडे उतरणारी पडवी.

देवघराच्या मागे स्वैपाकघर आणि माजघराला जोडणारी अंधारी बोळकांड. ती थेट बाळंतिणीच्या खोलीच्या दाराच्या पुढ्यात बाहेर पडते...

लालचुटूक कौलं. पाणपट्ट्या. तेलपाणी केलेले पडवीचे एकसारखे लाकडी गज. खिर्र-कट्ट वाजणारा पितळी कड्यांचा झोपाळा.

ओटी आणि पडवीला वेगळं करणार्‍या तीनच दगडी पायर्‍या. मग काळाकभिन्न खांब. खांबापासून ओटीच्या भिंतीपर्यंत एखाद्या सदरेवर असावा तसा डौलदार लाकडी कठडा. त्याला काटकोनात असलेल्या भिंतीवर उघडणारी नक्षीदार जाळीची खिडकी. तिच्यातून डोकावून पाहिलं, तर बाळंतिणीच्या खोलीतल्या खोल अंधाराखेरीज काहीच दिसत नाही...

झोपेतून जाग येते, तेव्हा त्यातल्या देखणेपणापेक्षाही तिथे गोठून राहिलेल्या काळाचं एक चमत्कारिक दडपण जाणवतं. दिवसभर जाणवत राहतं.

एखाद्या करड्या नजरेच्या गूढ पुराणपुरुषासारखं त्या घराचं असणं. आपली जिवंत मुळं जमिनीच्या पोटात खोलखोल विस्तारत गेलेलं, वठल्याश्या भासणार्‍या विस्तीर्ण-करड्या खोडासारखं आणि तरीही ओलसर पालवल्यागत नव्हाळ-पोपटी भासणारं. त्याचं अतीव आकर्षण आणि पराकोटीचा तिरस्कार - एकाच वेळी. त्याच्या काळोख्या थंडगार पोटात खोल दडून काळाचं भान गमावून बसावं असा पावलांना खेचणारा जीवघेणा-रसरशीत-काळाशार मोह, आणि त्याच वेळी आपल्या पाखंडी-बंडखोर-बेताल वागण्यानं त्याची मुळं निर्दयपणे उचकटत जावं-आतल्या बुरसटलेल्या काळोख्या कोनाड्यांना दिवसाच्या निर्लज्ज उन्हात उघडंवाघडं करत जावं असा आतून उसळणारा धगधगता विखार...

या परस्परविरोधी ताकदींचं का हे दडपण? कुणास ठाऊक.

स्वप्न पडायचं थांबत मात्र नाही...

Friday, 30 July 2010

निरर्थक

कधी कधी असं वाटतं, की सगळ्याच गोष्टींची पुनरावृत्ती होते आहे. हातातून वाळू निसटत जावी, तशी आपली माणसं आपल्या आयुष्यातून निसटून जाताहेत. आणि आपण हताशपणे निव्वळ उभे आहोत.


हा असा भूतकाळाशी सतत तुलना करण्याचा चाळा निरर्थक आणि काही अंशी मनोरुग्णतेचं द्योतकच, हे मान्य आहे. तरीही त्याच्या पकडीतून पूर्णपणे सुटता येत नाही. आणि आता तर असं वाटतं, की पूर्णांशानं अशी सुटका करून घेणं कुणालाच कधीच शक्य नाही. स्मृती नावाचं जे टूल माणसाला मिळालेलं आहे, त्याचीच ही अपरिहार्य बाजू आहे. अनुभव आहे, आठवण आहे, आणि अपरिहार्यपणे तुलनाही आहे. कुठलाच अनुभव आता अनाघ्रात, ताजा, अस्पर्श असणार नाही. आपल्या संचिताची छाया त्यावर अनंत काळ असत असणार आहे.

अशा वेळी माणसं नव्यानं कशी जन्मून येत असतील? आज-आत्ताच्या क्षणात कशी जगत असतील? ही साधना त्यांना कशी साधत असेल? काळाचं हे प्रचंड राक्षसी दडपण झुगारायला किती प्रचंड ताकद लागत असेल?

हेही प्रश्न निरर्थकच. माणसं असं करतात किंवा करत नाहीत. परिश्रमांनी साधण्यासारखी ही गोष्टच नव्हे. तुम्ही ती करता किंवा करत नाही. अधेमधे काही संभवत नाही. कसलाही पूल नाही.

आपण अशा माणसांमध्ये मोडत नाही, हे आता स्वीकारलं पाहिजे.

---

हवं तसं वागणारी माणसं स्वीकारताना, तसं न वागणार्‍या माणसांच्या आयुष्यातून तुकडा तोडल्यासारखी बाजूला फेकलं जाताना, अधिकाधिक कडवट - आग्रही होत जाताना -  काही चुकत असेल का? याचा नीट मुळापासूनच विचार केला पाहिजे.

आपण कुठली मूल्यं मानतो?

दुसर्‍या माणसांची आयुष्यं चालवण्याचा - त्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा अधिकार आपल्याला नाहीय.

पण त्याच वेळी, आपल्या जीवनदृष्टीशी समांतर असणारी माणसं निवडून त्यांच्या जवळ जाण्याचा (आणि उलटही, म्हणजे न आवडणार्‍या प्रकारच्या माणसांपासून लांब जाण्याचा) हक्क आहे.

भिन्न जीवनदृष्टी समजून घेण्याचा प्रयास आपण करू शकतो. पण तिच्याशी जुळवून घेऊ शकत नाही. तसं केलं, तर आपलाच रस्ता बदललेला असेल. तसा तो बदलायलाही हरकत नाहीच - जर तसं करण्यानं सुख लागत असेल तर. त्या रस्त्याबद्दल आतून समाधान असेल तर. अन्यथा नाही.

यांत कसलाही भावनिक दबाव असू नये. (किंवा अधिक मानवी बोलायचं झालं, तर तो शक्यतोवर कमीत कमी असावा.) धमक्या असू नयेत.

’आपल्या जातीचा मिळो मज कोणी’ अशा जातीची निवळशंख आस असावी फक्त.

या मूल्यांना अनुसरून आपण वागतो का?

होय.

मग आपली माणसं अशी दूर जातात (किंवा अधिक नेमकं बोलायचं तर आपण त्यांच्यापासून दूर येतो), या वस्तुस्थितीबद्दल आपण काय करू शकत असतो?

कितीही पीळ पडला आतड्यांना, तरीही?

काहीही नाही.

हा दुराग्रह आहे? हट्ट आहे? डॉमिनन्स आहे? उद्मेखून इन्फ्लुएन्शिअल असणं आहे?

कुणास ठाऊक. असेल, किंवा नसेलही.

पण आपण त्याबद्दल काय करू शकत असतो?

Thursday, 22 July 2010

मावशीबोलीतल्या कविता

संवेदच्या ’खो’ला दिलेलं हे क्षीण उत्तर.

ही कविता कुणाची ते मला ठाऊक नाही. कुठल्याश्या युगोस्लाव्हियन कवीच्या या कवितेचा कुणीसा हिंदीत केलेला अनुवाद मी विजय पाडळकरांच्या एका लेखात वाचला होता. व्हॅन गॉगनं त्याच्या भावाला लिहिलेल्या पत्रांच्या संदर्भात तिचा उल्लेख झाला होता.

कविता डोक्यात घट्ट जाऊन बसली.

अनुवादाचा प्रयत्न केला खरा. पण ‘अनुवाद काही खरा नव्हे गड्या, निदान आपलं काम तरी नक्की नव्हे’ असं आत्मज्ञान देऊनच तो झाला. असो.

ही मूळ कविता -

ऐसा होता है कभी कभी
शरद की रात्री में
जब एशफॉल्ट पर चेस्टनट गिरते है
और दूरकी घाटियोंसे
कुत्तों का भोंकना सुनाई देता है
तब जन्म लेती है
इतने अकथनीय रूपसे लालसा किसी की
जो अच्छा हो, आत्मीय हो
अंतरंग हो, साथी हो
जिसे लिख दे सबकुछ जो हमारे अंतर में है
खत हम जरूर लिखते
लेकिन
वह, जो नही है.

अनुवाद -

कधीकधी होतं असं पानगळीच्या दिवसांत,
रात्रीची नीरव शांतता,
टिपूर चांदणं
आणि दूरवर कुठेतरी भुंकणारी कुत्री...
अशा वेळी एक अनामिक तहान लागते जीव शोषून घेणारी
कुणीतरी असावं –
कुणीतरी जिवाजवळचं,
आपलं म्हणावं असं,
आतड्याचं –
मनात उसळणारं सारं सारं ओतावं ज्याच्या पुढ्यात
असं कुणीतरी.
लिहिलंही असतं म्हणा.
पण –
असं कुणीच तर नाही.

माझा खो गायत्री, श्रद्धा आणि यॉनिंग डॉगला.

Sunday, 9 May 2010

...

दर दिवशी नवी निवड. नवीन पर्याय. नवीन प्रश्न. त्यांतून रोज नवे होत गेलेले आपण. आणि रोज बदलत जाणार्‍या आपल्या नोंदी ठेवणारेही आपण.
काय दिसतं त्यातून? वर-खाली, मागे-पुढे, ठळक-पुसट, नव्या-जुन्या, जोरकस-नाजूक रेषांच्या खुणा. दर दिवशी नवीन चित्र? आणि मग? बदलत गेलेले आणि तरीही पुन्हा पुन्हा नव्यानं जन्मत राहिलेले आवर्तातले आपण?
वर्तुळ?
हम्म.
वर्तुळ.
पाळी येते. दर अठ्ठावीस दिवसांनी. शरीरात रक्त फेर धरतं. कुणी नाही आलं, तर समंजस निमूटपणे आपलं घर मोडून वाहून जातं. दर महिन्याला तोच खेळ. न कंटाळता.
तसंच हे? आपल्यातल्या बदलांनी पुन्हा पुन्हा आपलं बदललेलं तरीही तेच चित्र काढत राहायचं? कशासाठी? कधीतरी बीज पडावं म्हणून?
कधी पडतं बीज? आपल्याला कधीही खरी न होणारी आणि तरीही खरं होण्याची स्वप्नं दाखवणारी स्वप्नं पडतात तेव्हा?
खरं होण्याचं आणि न होण्याचं तरी काय? त्या त्या स्वप्नांपुरते तर खरेच असतो की आपण. नाहीतरी स्वप्न आणि सत्य यांतलं नक्की कुठलं खरं, हे कोडं तरी कुठे सुटलं आहे कुणाला अजून?
स्वप्नं हवीत.
आपल्या ऋतुचक्राची समंजस जाणीव घेऊन दर साल पाऊस येतो.
तसा पाऊस हवा.
स्वप्नं हवीत.
काही रुजावं वा न रुजावं.
मातीनं तयार असायला हवं.

Tuesday, 9 March 2010

हॅपी विमन्स डे, बाय दी वे!

अभिजीतने न दिलेला खो मी घेतला नि हे खरडलं.

बायका फक्त बायका आहेत म्हणून त्या करतील ते ते आपोआपच महान / प्रगतिशील / पुरोगामी ठरतं; या गृहितकाची जिम्मा मी तरी अल्पसंख्याकांचं नेहमीच बरोबर आणि ते कायमच सहानुभूतीस लायक, दलित साहित्य चाकोरीबाहेरचं / गावकुसाबाहेरचं असल्यामुळे थोर, योनी या निषिद्ध शब्दाभोवती आणि अवयवाभोवती फिरणारं नाटक केलं म्हणून ते आपोआपच चांगलं - या आणि असल्या समीकरणांमधेच करते. मग महिलादिनाचं आणि ’त्या होत्या म्हणून आम्ही आहोत’चं प्रयोजन काय?

लेट मी क्लिअर - माझेही या प्रश्नाबाबत मेजर घोळ आहेत. तेच सोडवायचा प्रयत्न चाललाय.

इतिहासात शिरायचं की कसं? मरो, होऊन जाऊ दे. अजूनही बायका स्वेच्छेनं मंगळसूत्रं, मुलंबाळं, घर-संसार, धुणी-भांडी, लिंगभेद आणि बरंच काय काय करतात किंवा करत नाहीत, हे मान्यच. तसंच अजूनही काही ब्राह्मणेतर जातीतल्या पोरानं ब्राह्मण (’ब्राह्मण’च्या जागी कुठलाही उच्चवर्णीय समाज घातला तरी चालेल) पोरगी गटवली, की त्याचा / त्याच्या आप्तांचा इगो कुठेतरी सुखावतोच. मग जातिभेद महान (किंवा गेला बाजार अपरिवर्तनीय वगैरे तरी) आहेत आणि त्यांच्या उच्चाटनाची /  किमान त्यांतून होणार्‍या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शोषणाच्या उच्चाटनाची गरज / शक्यता नाही असं म्हणायचं का?

कुठल्याही समाजात आपलं होणारं शोषण / आपल्यावर होणारा अन्याय या बाबींचा साक्षात्कार सगळ्याच्या सगळ्या शोषितांना एकसमयावच्छेदेकरून झाला, असं कधीच होत नाही. काही लोकांच्या लक्षात आधी येतं, काहींच्या नंतर. काहींच्या शतकानुशतकांनंतरही - किंवा खरं तर, कधीच - लक्षात येत नाही, तर काही जण सुधारकी रेट्याची वाट पाहण्यात वा समकालीन समाजाच्या वेगाशी सामोपचारानं जुळवून घेण्यात अजिबात वेळ दवडत नाहीत. स्वत:च्या आयुष्यातला अन्याय दूर करून मोकळे होतात. हे जे बाकीच्या समाजानं बदलण्याची वाट बघण्याचं नाकारणारे लोक असतात, त्यांचं उदाहरण पाहून बर्‍याच - सगळ्या नाही, बर्‍याच - परप्रकाशित लोकांनाही परिस्थितीचा साक्षात्कार होतो. हे परप्रकाशित लोक संख्येनं पुष्कळ असतात आणि त्यामुळे त्यांच्या बदलण्याचा परिणाम दृश्यस्वरूपात जाणवतो. त्यांच्या बदलातले फायदे-तोटे अधिक स्पष्ट होऊन दिसतात. तेव्हाच त्यांपैकी एखादा फायदेशीर बदल लोकमान्य होतो. ही लोकमान्यताही पहिल्याच टप्प्यात मिळत नाही. निरनिराळी घनता आणि शोषणक्षमता असलेल्या विस्तीर्ण प्रदेशात एखादा द्रवपदार्थ सावकाश झिरपत जावा, त्याची मातीत मुरण्याची तीव्रता, प्रमाण, वेग सगळंच मातीनुसार सापेक्ष असावं, तशी ही प्रक्रिया असते. एकाच वेळी निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या टप्प्यांवर असणारी.

हे साखळीच्या बाहेरचं एकांडा शिलेदार असणं ते साखळीतलाच एक महत्त्वाचा दुवा म्हणून स्वीकारलं जाणं - या प्रवासाला प्रदीर्घ कालावधी लागतो. आणि तरीही प्रक्रियेचा अंतिम बिंदू म्हणून काळाच्या कुठल्याही तुकड्यावर बोट ठेवता येणं अशक्य असतं.

आता अशा प्रकारे बदलाच्या एका टप्प्यावर असताना, बदल आपल्याला फायदेशीर ठरत असताना बदल सुरू करून देणार्‍या काही स्वयंप्रकाशी लोकांबद्दल कृतज्ञता वाटावी आणि ती व्यक्त करावी; यात राग येण्यासारखं काय आहे? हां, आता त्या कृतज्ञतेला किती वेटेज द्यायचं, आपल्या वाटचालींचे टप्पे यशस्वी मानून धन्य व्हायचं की नाही, आपलं आणि समकालीनांचं एकूणच यशापयश त्यांच्या मापानं तोलायचं की त्याला वर्तमानाचे अधिक कठीण निकष लावायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या त्या व्यक्तीच्या तारतम्यानुसार सापेक्ष आहेत.

अंधश्रद्धानिर्मूलनाची चळवळ आवश्यकच. पण एकंदर धर्मसंकल्पनेच्या आवाक्यामध्ये तिचं स्थान किती लहान-किती मोठं हे प्रत्येकाला दिसणार्‍या चित्राच्या समग्रतेवरच अवलंबून नाही का?

हॅपी विमन्स डे, बाय दी वे!

Saturday, 17 October 2009

सुशीलाकाकू आणि तत्सम

यंदाच्या ’मायबोली’च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली ही कथा.
------------------------------------------------------------------

सुशीलाकाकू आणि तत्सम पंचेचाळिशी-आसपास सुखवस्तू-संवेदनशील बायकांबद्दल तिला एक विचित्र, हिंस्र राग होता.

म्हणजे तिच्याखेरीज दुसर्‍या कुणाला ते कळलं नसतंच. उलट तिचं या सगळ्या बायकांशी असलेलं गूळपीठ तसं प्रसिद्धच. त्यांच्याबद्दल कोणी काही बोललं, की ती कड घ्यायला धावलीच. पण तरी आत राग होताच. नेमका कसला राग, असा प्रश्न स्वत:लाच अनेकवार विचारूनही उत्तरावर बोट ठेवता येत नसे; आणि राग अजून अजून धुमसतच जाई.

'इतक्या कसल्या गं गप्पा मारायच्या असतात तुम्हांला तासन् तास?' किंवा 'तुझ्याएवढी असताना मी नोकरी सांभाळून आदित्याच्या वेळच्या बाळंतपणात होते, आता बघ की एखादा मुलगा. की मी बघू?' हे आणि असले प्रश्न त्या मानानं निरुपद्रवी. स्नेकच्या गेममध्ये गुंग झाल्याचं दाखवत असतानाच कानावरून वाहून जाऊ शकणारे. पण त्यांचं ते नेमानं दर श्रावणात सगळ्या रामरगाड्यासकट सत्यनारायण घालणं, इमेल करायला शिकणं आणि एखाद्या अवघड सोशिअल प्रसंगी 'ह्यांना म्हणजे काऽऽऽही कळत नाही' असा कळे न कळेसा तुच्छतादर्शक कटाक्ष टाकून, काहीतरी समयोचित धूर्त बोलून बघता बघता प्रसंग आपल्याला हवा तसा वळवणं - या सगळ्यांमधली विसंगती तिला झेपेनाशीच होई.

आपण त्यांचा लसावि न काढता आल्यामुळे उखडतो की अनिश्चिततेच्या टप्प्यावरच्या आपल्याला त्यांच्या लवचिक आत्मविश्वासाचा मत्सर वाटतो, ते न उलगडता आल्यामुळे तिनं ते भिजत घोंगडं डोक्याच्या मागे टाकून द्यायला सोईस्कर सुरुवात केली होतीच. तरी एखाद्-दुसर्‍या अवघड वेळेला मध्ये उभा राहणारा हा पेच वारून आपल्याच जिवाजवळच्या या बायकांशी दुहेरी वागता वागता तिचा जीव कासावीस होऊन जाई.

एकीकडे त्या हळव्याहून हळव्या भासत. अरुणा ढेर्‍यांची 'रंगीबेरंगी इच्छांच्या रथात बसून निघालेल्या उत्कट मुलीची गोष्ट' वाचून जिव्हारी लागल्यासारखी ओली नजर लपवणारी सुशीलाकाकू अजून आठवते की तिला. पण एकीकडे त्या तितक्याच क्रूर, निर्घृण भासत. 'अहो, असे काय पेंगताय भर बैठकीत वेंधळ्यासारखे? नीट झोपा की आत जाऊन. नैतर तोंड धुऊन या - जा...' असं वसकन् खेकसणारी प्रमिलामामी आणि खडबडून जागा होत शीपिशली हसणारा मामा बघताना घशाशी आवंढा आला होता, तो काय फक्त ती 'आपल्या' मामाला बोलली म्हणून? व्हीआरेस घेतलेल्या या कंटाळवाण्या आणि काहीशा केविलवाण्या, उतारवयातल्या माणसाशी काहीच बंध जुळले नसतील तिचे? आपल्याला त्याच्या वयाकडे बघून जे वाटतं, पोटात कालवून येतं, ते त्याच्यासोबत आयुष्य काढलेल्या आणि गाताना विलक्षण कोवळा सूर लावू शकणार्‍या या बाईला जाणवतच नसेल?- की त्याच्याबरोबर आयुष्य काढूनच ती अशी झाली असेल? - असे प्रश्नांचे लाख तुकडे एका क्षणात नव्हते आठवून गेले तिला?

नेहमी टाकत असे, तसंच आताही तिनं हे स्वत:लाच न कळणारं प्रश्नोपनिषद मागं टाकून दिलं असतं. पण "अगं, आपणच ढकलावं लागतं मुलांना, त्यांना काय कळतंय?" असं हलक्या आवाजात धूर्त शहाजोगपणे म्हणणार्‍या सुशीलाकाकूचा सूर बघता बघता तिच्या डोक्यातच गेला. "मी म्हटलं तिला - बघ बाई, हा मुलगा मी गेलं वर्षभर तुझ्याबरोबर बघते आहे. महत्त्वाकांक्षी आहे नि साधाही आहे अगदी. 'तसलं' काही वाटत नाही असं स्पष्ट म्हणालीस, तरी त्याच्या वागण्यात तसूभर फरक नाही की शिष्टपणा नाही. मग तुझं 'तसलं' वाटणं म्हंजे तरी काय? मित्र म्हणून आवडतो नं तो तुला? नवरा मित्रासारखा असण्यापेक्षा अजून मनासारखं काय असणारेय? विचार कर. मजेत जगाल आयुष्य दोघंही. प्रेम वाटायला लागतं आपोआप... मला काही बोलली नाही. पण त्याच्याशी बोलली मग ती परवा स्वत:हूनच. म्हंजे - तीच सांगत होती गं. जवळ जवळ ठरवल्यातच जमा म्हणायचं..." असं म्हणताना तिच्या स्वरातला न लपलेला यशाचा आनंद. 'अनुभवी' आनंद.

तोंडभर हसून तिला तिच्या आनंदात कंपनी देताना आतून तडकत - धुमसत गेली ती. आपल्याच निष्ठांशी अशी बेईमानी? आपल्याच पोराच्या कोवळ्या निराकार भावना मॅनिप्युलेट करून त्याचं चौकटीतलं भलं करायला बघावं? असं कसं करू शकतं कुणी? 'आपलं' कुणी?

तेव्हा तिच्या रागाचे सगळे लखलखते कंगोरे सर्रदिशी तिच्या पुढ्यात उभे ठाकले. डोक्यातला कोवळा तुकडा तिनं तिच्यापुरता जाळून-विस्कटून टाकला. स्वत:शीच चालवलेली लढाईही. आणि मग मोबाइल वापरताना त्यांची तिरपीट होई, त्यावर तिच्या वयाचे लोक खिंकाळून-टाळ्या देऊन देऊन हसत, त्यात आपलाही उंच निरपराध स्वर तिनं अलगद मिसळून दिला.

***

'वक्त जाता सुनाई' द्यायला ती काही गुलजार नव्हती.

आपल्या सोकॉल्ड संवेदनशीलतेचं धारदार पातं दुधारी असतं आणि ते बेईमान होऊन आपल्यावरच उलटतं, तेव्हा मुकाट रक्ताळत जाण्याखेरीज दुसरे काही पर्यायच असत नाहीत हे कळायलाही.

तरीही वक्त उलटलाच. जिवाजवळच्या मित्राचं मोडकळीला आलेलं अफेअर त्याच्यासोबतीनं भोगताना आपल्याच संवेदनांचे शापही तिनं भरभरून भोगले. चिंतनबैठका, तारस्वरातली भांडणं, रात्री-बेरात्री फोनवर बोलत काढणं, काही दिवस सगळं काही गोडगुलाबी होणं. पुन्हा एकदा आकांतानं आतून आतून रडणं. आपल्याच नात्यांचे काच आपल्याला सोसेनासे होतात तेव्हा ते झुगारून द्यायला बघणं. आणि सवयीचे झालेले बंध कापले जाण्याच्या कल्पनेनं अनाथ - निराधार वाटून, शहारून पुन्हा पुन्हा नात्याच्या आसर्‍याला परतणं. यांत सुरुवातीचे कोवळे दिवस कसे बघता बघता निबर - राठ होत जातात ते पाहताना बुद्धासारखी आतून विटत विटत गेली ती.

पण बोधिवृक्षाखालचा क्षण मात्र तिनं सुशीलाकाकूच्या नावे लिहून दिला.

प्रेमात न पडण्याच्या कन्फर्म्ड वयातला तिचा एक गृहस्थ-मित्र. अवकाश आणि काल आणि नियती अशी जुळून आली - बघता बघता शहाणा गृहस्थ तिच्या प्रेमात पडला. त्याची घालमेल - ओढाताण - कासाविशी - म्हटलं तर तिला कळली आणि कळली नाहीही. तळ्या-मळ्याच्या काठावरून तिनं हे सगळं पुन्हा नव्यानं अनुभवलं. समोरच्या माणसाला आपल्याबद्दल हे असं मरणप्राय उत्कट काहीतरी वाटतं आहे आणि आपण मात्र त्याची सगळी घालमेल एखाद्या गणितज्ञासारखी निर्विकारपणे निरखतो आहोत, सिनेमातल्या एखाद्या व्यक्तिरेखेसाठी 'बाहेरून' आणि 'असहाय'पणे व्हावं तसे दु:खी होतो आहोत - आपल्याला या जीवघेण्या वादळाचा परीघ मोजता येतो आहे, पण केंद्रबिंदू बघणारी नजर मात्र आपण गमावली आहे...

हे सगळे सगळे साक्षात्कार तिला झाले ते तेव्हाच.

पण स्वत:साठी टिपं गाळत न बसता - तिच्या मते - मोठ्या कौशल्यानं तिनं त्याला प्रेम आणि इतर तत्सम भावनांमधला फोलपणा विशद करून सांगितला. उलटतं वय, शरीरातली आणि मनातली बदलत जाणारी रसायनं आणि निव्वळ निव्वळ निव्वळ योगायोग - यांचा परिपाक म्हणून हे असं काहीतरी वाटत असल्याचं तिनं मित्राला यशस्वीपणे - तिच्या मते - पटवून दिलं. शी ऑल्मोस्ट टॉक्ड हिम आउट ऑफ इट - अर्थात तिच्या मते. त्यालाही हे असं स्वत:ला पटवून घेण्याची निकड भासली असेलच कदाचित. वादळं झेलण्यात भव्य-दिव्य दिमाख असतो, पण ते तितकंसं सुखकारक प्रकरण नसतं, हे समजण्याइतका - जाणिवेच्या वा नेणिवेच्या पातळीवर - मित्र परिपक्व इत्यादि होताच. त्याची समजूत पटली. नंतर कधीतरी पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून गेल्यावर, शिळोप्याच्या गप्पा छाटताना 'किती मॅच्युअर्ड आहेस गं. तेव्हा मी कुठल्याकुठे वाहवत जाऊ शकलो असतो...' हे त्याचं वाक्य ऐकलं आणि त्या बेसावध क्षणी तिला आपल्यातली सुशीलाकाकू अशी वेगळी होऊन लख्ख दिसली.

आताही तिचा त्या पंचेचाळिशी-आसपास बायकांवरचा राग मावळलेला नाहीच. पण आता तिला आपल्या रागाला टोक काढून तो कुणाच्याही अंगावर नेम धरून सोडता येणं जमेनासं झालं आहे. सुशीलाकाकू तिला हल्ली 'मोठी झाली हो लेक आमची - ' असं जनरल वडीलधार्‍या प्रेमानं म्हणते. त्यात पंखांखाली घेणारी निखळ जवळीक असते की चुकल्या फकिराला मशिदीत घेणारी कावेबाज माया असते, ते तिला अजूनही ठरवता येत नाहीच.

राग - कंटिन्यूड.

------------------------------------------------------

शेवटच्या शब्दामुळे फसू नका. कथा इथेच संपली आहे. 
हे सांगायला लागावं यात सगळं आलं. :(

शुभ दीपावली

रेषेवरची अक्षरे २००९’ प्रसिद्ध झाला आहे. वाचून नक्की अभिप्राय द्या.

सुचवण्या, तक्रारी, दाद - सगळ्यांचं मनापासून स्वागत.

शुभ दीपावली!

Monday, 10 August 2009

माझ्या प्रियकराची प्रेयसी...

ती होय, ती माझ्या प्रियकराची प्रेयसी.
होय होय, प्रेयसीच.
तिच्याच नसण्याचा गंध आमच्या रोमॅण्टिक रात्रीला.
तिच्याच हसण्याचे बंध आमच्यातल्या मॅच्युअर्ड मैत्रीला.
छे! जेलसी? काहीही काय!
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
ती माझ्या प्रियकराची प्रेयसी!
बस.

---

तो कविता लिहून वहीचं पान उलटून टाकतो. पण कविता अजून संपलेली नाही, हे त्याला पक्कं ठाऊक आहे. तसा तो शब्दाचा पक्का. म्हणजे वचन पाळणारा वगैरे भंपक अर्थानं नव्हे. शब्दाचा पक्का, म्हणजे पक्का लेखक. कविता लिहिणं थांबलं, म्हणजे कविता संपत नाही. ती आपल्यापासून पुरती तुटावी लागते, हे त्याला पक्कं ठाऊक. तर अजून कविता संपलेली नाही. संपेपर्यंत चिंता नाही. संपेपर्यंत सुटका नाही. ओव्हर ऍण्ड आउट. बॅक टू आयुष्य.

तर तशा त्याला बघून काकू नेहमी खुशालतात. ’तुझी मैत्रीण गेलीय बाहेर, पण माझ्याशी मार की गप्पा,’ असं म्हणून नव्या पुस्तकांवर वगैरे त्याला यथास्थित पकवतात. पण परवा ’काकू, पोरीचं शिक्षण झालं आणि ती ऑलरेडी वयात आलीय म्हटल्यावर लग्न करून द्यायलाच हवं का लगेच,’ असं त्यानं काहीश्या बेसावधपणे विचारलं, तेव्हा ’हो. हवंच’ हे त्यांचं उत्तर आणि ’हवंच’नंतरचा ठळक टायपातला पण अदृश्य पूर्णविराम त्यानं ऐकला आणि त्याच्या डोक्यात सर्रकन काहीतरी हललं. तसं कळेल त्याला उपरोधिक आणि नाही त्याला निर्मळ वाटेलसं आपलं हातखंडा हसू हसत त्यानं तो क्षण सहज खिशात घातला खरा. पण ’घशात काहीतरी टोचल्यासारखं वाटतंय’ची नोंद त्याला तेव्हा घ्यावी लागलीच आहे.

मैत्रीण त्याची प्रेयसी नव्हे. तोही मैत्रिणीचा प्रियकर वगैरे नव्हे. ते तसले ’प्यार - मोहोब्बत - दोस्ती’वाले करण जोहरी फण्डे त्यानं आणि मैत्रिणीनं कटाक्षानं लांब ठेवलेले. त्याचं लेखक असणं; ती तिच्या बॉयफ्रेंडशी भांडून, वैतागून पार रडकुंडीला आली की तिला बाईकवरून सुसाट घुमवणं; तिला अजून नीट पेटवता येत नाही, पण मनापासून आवडते म्हणून खास प्रसंगी हातात बापानं चॉकलेट ठेवावं तशी तिच्या हातात सिगरेट पेटवून देणं; व्यासापासून तुकारामपर्यंतचा तिचा इतिहास वेळोवेळी घोटवून घोटवून, दर भांडणात कोट्स, कथा आणि किस्से तोंडावर फेकून पक्का करून घेणं; स्वत:चा काही कारणानं भडका उडाला की तिला फोन करून सुमारे तीन मिनिटं अवाक्षरही न बोलता फक्त आपला श्वास काबूत आणत राहणं... हे सगळं आणि असलं बरंच त्यांच्यामधलं शेअरिंग. बरंच बोलून, बरंच न बोलता. पण त्यांच्या इतर माणसांशी असलेल्या नात्यांवर छाया पडत राहावी इतकं आणि असं अथांग. हे सगळं वजा करून ती तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडशी काय आणि कसं बोलत असेल, हा चिवट प्रश्न या आठवड्यात त्याला कितव्यांदातरी पडतो. या वेळच्या तिच्या बॉयफ्रेंडबद्दल त्यांच्यात तसं विशेष बोलणं झालेलं नाही. म्हणजे नेहमीसारखी चर्चा इत्यादी घडलेली नाही. पण चर्चा न घडताही, नेहमीचंच बोलत असल्याच्या आविर्भावात कळत नकळत मैत्रीण त्याच्याबद्दल पुरेसं बोललेली आहे. आपली भिवई नकळत उंचावते आहे हे त्याला जाणवून, किंचित आश्चर्यानं पण सफाईदारपणे, त्यानं विषय बदलूनही. हे निराळं आहे याचीही नोंद त्याला तेव्हा घ्यावी लागलीच आहे.

तो अस्वस्थ होऊन खांदे उडवतो आणि मनात उगवलेले शब्द कागदावर रुजवत जातो. त्याला इतकंच करणं शक्य आहे. बस.

---

ती चांगले मुलींसारखे ठसठशीत झुमके घालणारी,
थोडी लाडीक, थोडी निर्बुद्ध, बरीच भित्री.
पण विलक्षण उत्कट. विलक्षण नशीबवान. विलक्षण ’बाई’.
तिच्या ’बाई’पणातच माझ्या प्रियकराच्या पौरुषाच्या पहिल्यावहिल्या पाऊलखुणा.
त्याच्या काहीश्या परिपक्व शहाण्या आणि पुष्कळदा सेक्सी टकलावर तिच्यासोबतच्या प्रेमभंगाच्या खुणा.
तिला कशी स्वीकारू?
आणि तिला कशी नाकारू?
ती माझ्या प्रियकराची पहिली प्रेयसी.

---

कविता संपत नाही. एरवी यावरून फ्रस्टेट होऊन त्यानं मैत्रिणीशी हमखास वादळी भांडण उकरून काढलं असतं. पण या वेळी नाही. स्वत:तून जणू निराळा होऊन, एखाद्या अनुभवी सुईणीसारखा एकाच वेळी सराईतपणे नाजूक आणि कुशलपणे निर्दय होत तो कविता वेगळी होताना निरखतो आहे.

आज मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला भेटायचं आहे. वर वर बिनधास्त असल्याचं दर्शवत खिदळणारी मैत्रीण त्याच्या प्रत्येक प्रतिक्रियेकडे घारीच्या नजरेनं पाहत असणार हे त्याला ठाऊक आहे. सगळे प्रश्नं, सगळी गुपितं, सगळे पराकोटीचे वैताग, सगळ्या नव्हाळीच्या कविता निरागसपणे त्याच्या पुढ्यात आणून टाकणारी मैत्रीण. त्याच्या निष्प्राण सराईत शब्दांना एका नापसंतीच्या कटाक्षासरशी मोडीत काढून त्याला चकित करणारी त्याची धिटुकली जाणकार मैत्रीण. तिच्या सगळ्या प्रतिक्रिया आता म्हटलं तर त्याच्या नजरेतल्या पसंतीदर्शक छटेवर अवलंबून आहेत.

इथे त्याला जबाबदारीच्या जाणिवेनं पोटात एकदम खड्डा पडल्यासारखं होतं.

पण म्हटलं तर बॉयफ्रेंडला त्याला भेटण्यासाठी आणते आहे म्हणतानाच तिनं पसंती-नापसंतीचे सगळे पूल एकटीनंच पार केले असल्याचंही उघड आहे.

इथे त्याला एकदम आउट होऊन मैदानाच्या बाहेर बसल्यासारखं हेल्पलेस वाटतं.

असले जीवघेणे झोके घेत तो त्या दोघांना भेटतो. सराईतपणे बेअरिंग सांभाळून असला, तरी त्याला तारेवरून चालणारी डोंबारीण असल्याचा फील येतो आहे, हे मैत्रिणीपासून लपत नाहीच. पण त्याला चकित करण्याची आपली नेहमीची लकब वापरून ती नेत्रपल्लवीतून सहजपणे उलटा त्यालाच धीर देते. बघता बघता बॉयफ्रेंडशी हॉवर्ड रोआर्कबद्दल जिव्हाळ्यानं बोलण्याइतकी कम्फर्ट लेव्हल त्यांच्यात येते, ती नक्की कुणामुळे -त्याच्यामुळे, तिच्यामुळे की बॉयफ्रेंडमुळे - ते त्याला कळेनासं होतं.

---

काही भांडणं. हे मैत्रिणीचं नेहमीचंच. काही वादळी जीवघेणी भांडणं. हेही नेहमीचंच. पण त्याच्यापासून अलगद वेगळ्या, निर्लेप होत गेलेल्या काही भेटी. कधी तिचं कासावीस होऊन त्याच्याकडे येणं, पण अवाक्षराचेही तपशील न देणं. काही असंबद्ध प्रश्न विचारणं. कधी चक्क मुलींसारखं लाजणं. हे मात्र नेहमीसारखं नाही. नाहीच. ’ये की एकदा. बर्‍याच दिवसांत आला नाहीस,’ काकूंचा आग्रहाचा फोन. घरदार लग्नाच्या आणि बोलणी करण्याच्या आणि तारखा-मेन्यू ठरवण्याच्या कल्लोळात दंग. स्वत:च्याच इच्छेविरुद्ध त्याला वाटलेलं परकेपण आणि ते नीटच समजून सगळ्या भाऊगर्दीतही त्याला अजिबात एकटं न सोडणारे मैत्रीण आणि बॉयफ्रेंड.

ती परकी इत्यादी होत गेलेली नाही हे स्वत:लाच पटवून देताना त्याला भयानकच कष्ट पडतात. त्या परवा आलेल्या बॉयफ्रेंडला आपण इतक्या चटकन आपल्यात स्वीकारलं की काय, या प्रश्नाला उत्तर देतानाही तितकेच कष्ट पडतात. पण त्याला आरपार वाचणारी तिची धारदार नजर पाहिल्यावर, ती तितकी लांब गेलेली नाही, हे त्याला मान्य करावंच लागतं. चिडचिडीचा / आत्मपीडनाचा / आत्मकरुणेचा एक रस्ता बंद. रस्ते बंद होऊन कोंडीत सापडलं की त्याला नेहमी येतं, तसं अनावर हसू येऊ लागलेलं. कविता संपत आली आहे की काय? कुणास ठाऊक. तो खुशालतो आणि धुमसतोही.

ओव्हर ऍण्ड आउट. बॅक टू कविता.

---

कधीकधी हिरवाचार संताप उभा राहतोही माझ्या डोळ्यांत, नाही असं नाही.
सगळीभर असलेले तिच्या बोटांचे ठसे पाहून मला असुरक्षित वाटतं, अजूनही वाटतं काहीबाही.
कन्फेस करण्यासारखं काही, काही मी स्वत:पाशीही कबूल करणार नाही...
पण
ती काही त्याच्यापासून निराळी नाही.
त्याच्या आजच्या असण्यात तिच्या ’काल’ची माती मिसळलेली आहे, हे मला विसरून चालणार नाही.
जेलसी?
छे हो, अजिबात नाही.
ती माझ्या प्रियकराची माजी प्रेयसी, बाकी काही नाही!

Monday, 3 August 2009

नात्याला मरण असे यावे

पाड्यावरच्या प्रत्येकाने
बेभान होऊन दातओठ खात दगड हाणून रक्त काढावे एखाद्या चेटकिणीचे,
आणि मग वाद्यांच्या चढत्या कल्लोळानिशी एका मंतरल्या क्षणी तिच्या डोसक्यात दगड घालून संपवावा सगळा खेळ पिसाटपणे;
तिच्या याराने डोळ्यांत उतरलेल्या रक्तासकट, शरीराच्या कणानकणाला आग लावून टक्क नजरेने केवळ पाहात राहावे तिचा मृत्यू अगतिकपणे,
आणि मग भण्ण शांतता पसरून राहावी आसमंतात.
तसेही यावे मरण नात्याला.
वाजतगाजत.
समारंभाने.
निर्विवाद - निर्णायक - वजनदार डोंबपावले टाकत.

पण,
जगण्याच्या धुगधुगीचे कसलेही संदेह,
आतड्याला कोडगेपणाने फसवत खेळलेले वाट पाहण्याचे खेळ,
वा मरणाच्या कल्पनेनं निष्प्राण झालेल्या पावलांना फरफटवत चालवलेल्या भेसूर वाटा -
यांपैकी काहीही न जागवता.
अंधाराचा पोलादी पडदा टाकत.
एखाद्या कसबी नटासारखे, तेजस्वी प्रकाशझोतात, रोखलेल्या श्वासांत, अगदी अगदी खरे.

नात्याला मरण असे यावे.