Monday, 3 August 2009

नात्याला मरण असे यावे

पाड्यावरच्या प्रत्येकाने
बेभान होऊन दातओठ खात दगड हाणून रक्त काढावे एखाद्या चेटकिणीचे,
आणि मग वाद्यांच्या चढत्या कल्लोळानिशी एका मंतरल्या क्षणी तिच्या डोसक्यात दगड घालून संपवावा सगळा खेळ पिसाटपणे;
तिच्या याराने डोळ्यांत उतरलेल्या रक्तासकट, शरीराच्या कणानकणाला आग लावून टक्क नजरेने केवळ पाहात राहावे तिचा मृत्यू अगतिकपणे,
आणि मग भण्ण शांतता पसरून राहावी आसमंतात.
तसेही यावे मरण नात्याला.
वाजतगाजत.
समारंभाने.
निर्विवाद - निर्णायक - वजनदार डोंबपावले टाकत.

पण,
जगण्याच्या धुगधुगीचे कसलेही संदेह,
आतड्याला कोडगेपणाने फसवत खेळलेले वाट पाहण्याचे खेळ,
वा मरणाच्या कल्पनेनं निष्प्राण झालेल्या पावलांना फरफटवत चालवलेल्या भेसूर वाटा -
यांपैकी काहीही न जागवता.
अंधाराचा पोलादी पडदा टाकत.
एखाद्या कसबी नटासारखे, तेजस्वी प्रकाशझोतात, रोखलेल्या श्वासांत, अगदी अगदी खरे.

नात्याला मरण असे यावे.

5 comments:

  1. आवडलं.

    'एखाद्या कसबी नटासारखे' च्यानंतरचे 'अगदी अगदी खरे' हे शब्द किती असहाय्य आणि तरीही जास्त निर्णायक वाटताहेत. त्या पहिल्या समारंभाने मारुन टाकलेल्या नात्यापेक्षाही जास्त.

    ReplyDelete
  2. कविता आवडली.
    मागचे धागे न लोंबता काहीही संपविता येणे ही जवळजवळ दुष्प्राप्य गोष्ट असे मला वाटते. मागच्या गोष्टींबद्दल कटुता, हुरहूर, दु:ख, पश्चात्ताप वगैरे काहीही न वाटणे म्हणजे एकूण माणूसपणाला तिलांजलीच की. बाकी एखाद्या रिचुअल प्रमाणे आदिम समारंभाच्या "बिग बँग"प्रमाणे एखादा संबंध संपविणे ही संकल्पना आकर्षक आहे - आणि अर्थातच स्वप्नरंजनात्मक. सगळे स्लो बर्निंग प्रमाणे , गंजत , सुकत गेल्याप्रमाणे असते असा अनुभव.

    ReplyDelete
  3. "पण,..
    पासून पुढे लिहिलेय तेच, वरच्या शब्दांत उतरतेय.. काय्य, लिहले आहे....!

    ReplyDelete