Monday, 4 September 2023

बुजरी गाणी ०९

हे गाणं सगळ्यांत आधी मुंबईतल्या पावसाचं आहे. मग त्यातल्या प्रेमिकांचं.
भेटायचं ठरलंय. सगळीभर उत्कंठा, हुरहुर, अधीरता भरून राहिल्यासारखी. आणि पाऊस. आणि आधी पिवळ्याधम्मक फ्रॉकमधली नि मग जांभळ्या-पांढऱ्या कुर्त्यातली सोनाली बेंद्रे. आणि तसाच लालबुंद शर्टातला अक्षय खन्ना. दोघेही कोवळे, नखशिखान्त भिजलेले-ओले, आतुर.
त्यानं तिला काहीतरी नाजूकशी भेटवस्तू निवडताना मनातल्या तिलाच पसंती विचारावी आणि तिनंही ती नाक उडवत सांगावी. सजून तयार होताना तिच्या मनातल्या त्यानं तिच्या गालांवर हलकेच ओठ टेकावेत...
नि तरी भेट अजून घडायचीच आहे बरं का. वाटेत मुंबईचा पाऊस आडवा आला आहे!
तुंबून पडलेल्या टॅक्स्या, रस्त्यांवरचे खड्डे, रिक्षातून उतरून धक्का मारावा लागणं, बसनं एखाद्या खड्ड्यात चाक घालून अंगावर चिखलाची चिळकांडी उडवणं... असा शहरी पाऊस. चक्क रोडरोलर चालवत-गवळ्याच्या सायकलवरून-कुणाकुणाच्या स्कूटरच्या साइडकारमधून-हातगाडीवरून... कुणाकुणाकडून लिफ्ट्स घेत घेत केलेला प्रवास. मुंबईचा ट्रेडमार्क म्हणता येतील अशा यच्चयावत गोष्टी... मिश्कील हसणाऱ्या कोळणींपासून ते लोकल रेल्वेच्या स्टेशनांपर्यंत, नि मरीन ड्राइव्हवरच्या लाटांपासून ते हातात न ठरणाऱ्या छत्रीपर्यंत. नाही म्हणायला यात क्रिकेट नाही. पण ती उणीव पावसात फुटबॉल खेळणाऱ्या पोरांनी भरून काढलीय.
सगळ्या अडचणींवर मात करत, बंद पडलेल्या शहराला न जुमानता, कधी हट्टानं तर कधी चुचकारत, भिजत-हसत.. दोघं एकमेकांना संकेतस्थळी भेटतात नि आपल्यालाच एकदम भारी वाटून जातं!
२६ जुलै घडण्यापूर्वीच्या काळातलं हे गाणं. 'दर वर्षी एकदा गाड्या बंद पडतातच. उसमें क्या हय!' असं म्हणत पावसाला कोलणाऱ्या मुंबईकरांचं. त्यामुळे आणि त्यातल्या प्रेमिकांच्या कशा-कशानंही न विरजणाऱ्या उत्फुल्ल मूडमुळे हे गाणं टवटवीत - चिरतरुण - हसरं भासतं. हिंदी गाण्यांतल्या पावसाची आठवण निघताक्षणीच तत्काळ दाराशी येऊन 'हॅलो!' करतं.
आता त्याचीही आठवण काढून झाली. आता तरी पाऊस यावा बा.

सावन बरसे, तरसे दिल, क्यों ना निकले घर से दिल
बरखा में भी दिल प्यासा है, ये प्यार नहीं तो क्या है
देखो कैसा बेकरार है भरे बाजार में
यार एक यार के इंतजार में
एक मोहब्बत का दीवाना, ढूंढता सा फिरे
कोई चाहत का नज़राना, दिलरुबा के लिये
छमछम चले पागल पवन,
आये मज़ा भीगे बलम
भीगे बलम, फिसले कदम, बरखा बाहर में
एक हसीना इधर देखो कैसी बेचैन है
रास्तेपर लगे कैसे उस के दो नैन है
सच पूछिये तो मेरे यार,
दोनों के दिल बेइख्तियार
बेइख्तियार, है पहली बार, पहली बहार में
(शब्द इंटरनेटवरून ढापले आहेत, चूकभूलदेणेघेणे.)

बुजरी गाणी ०८

हे गाणं दिसायला चार गाण्यांहून वेगळं नाही. प्रियकर आणि प्रेयसी. फुलं. बागा. आवेग. पडद्यावर न दाखवता सुचवलेली चुंबनं. प्रणयाची पहिली रात्र. इत्यादी. पण तरीही ते डोक्यात रुतून का बसलं आहे, याचा विचार केला तर सगळ्यांत आधी आशाचं नाव समोर आलं. ऐंशी सालातला हा सिनेमा. त्या दशकात तिच्या आवाजाचा पोत कसा आहे, ते तिची त्याच दिवसांमधली एकाचढ एक गाणी पाहिली तरी कळेल. पण या गाण्यात – या गाण्यात तिचा आवाज एखाद्या खळाळत्या झर्यासारखा किलबिलत, खळाळत, मोकळेपणी वाहिला आहे. त्यातल्या ताजेपणानं चकित व्हायला होतं. दुसरं कारण म्हणजे शब्द. चार सरळसोट प्रणयी गाण्यांसारखे हे शब्द नव्हेत. दीवाना, इश्क, जुनून, प्यारमोहोब्बत इत्यादी ठरीव ठोकळ्यांची सवय असलेली आमची पिढी. त्या पार्श्वभूमीवर कानी आलेले या गाण्याचे शब्द त्यांच्या वेगळेपणाची दखल घ्यायला लावतात.
ही सगळी स्वप्नं सत्यात उतरतील, तू फक्त हो म्हण – असे ते शब्द. तेही ठीक. तिचं त्याला दिलेलं उत्तर मात्र निराळं आहे. ‘मोहोब्बतों में दोनों का एकही मतलब’! म्हणजे स्वप्न आणि सत्य यांचा अर्थ एकच आहे? की हो आणि नाही यांचा अर्थ एकच आहे?! दोन्ही अर्थ लागू पडतातच की. असं वाटून आपण चकित होऊन कवी कोण आहे बरं, असा विचार करू लागतो न लागतो, तोच ‘अदा से ना कहो या मुस्कुरा के हाँ कह दो’ असं स्पष्टीकरण येतं. म्हणजे नखरेलपणे दिलेला नकार नि हसून दिलेला होकार एकच, प्रेम असलं पाहिजे फक्त? वा! काय खेळ आहे शब्दांचा! पण - पण - पण हे ‘No is a complete sentence.’ हे पुरुषांना बजावावं लागण्याआधीच्याच काळात परवडू शकलं असणार, असंही वाटतं नि कवीबद्दल आणखीनच उत्सुकता वाटते. शोधल्यावर शब्द इतके का वेधक वाटावेत त्याचं उत्तर स्वयंस्पष्ट असल्यासारखा जबाब – साहिर. आश्चर्य समाप्त!
या शब्दांचं आणखीही एक वैशिष्ट्य आहे. ‘स्त्रीला शृंगारात अॅक्टिव रोल असता कामा नये’ या हिंदी सिनेमाच्या नियमानुसार मधुचंद्राच्या रात्री डोळ्यांत मेलेल्या माशासारखे भाव घेऊन बसलेली निर्विकार पुतळा नायिका गाण्यात हजेरी लावून जाते खरी. पण शब्द मात्र या डरपोकपणाला न जुमानणारे आहेत. ‘तुम्हारे बाहों के झूले में झूलने के लिए, मचल मचल के मेरे अंग गुनगुनाये हैं’, किंवा ‘तुम अपने हाथ से सरकाओगे मेरा आंचल, अजीब आग मेरे तन बदन में देहकेगी’, किंवा 'मैं सुबह तुमको जगाउंगी लब पे लब रख कर'. नक्की काय वाटतंय, वाटेल, याबद्दल कुठलाही संदेह नाही! गाण्यातला फक्त प्रियकरच शृंगारासाठी आतुर झालाय आणि प्रेयसी हिप्पोगिरी करून लाडिक, लटकं नाही म्हणतेय – या सरधोपटपणाशी पूर्णतः फटकून असलेला आतुरतेचा स्पष्ट, थेट उच्चार.
घाई नसलेली, संथ, सुरेल सुरावट आणि दर कडव्यात तिसर्या ओळीला बदलून चकित करणारा टेम्पो. सिनेमा कितीही बटबटीत असला, साथीला महेंद्र कपूरचा आवाज असला, प्रियकराच्या भूमिकेतला नट कितीही साबणवडीसदृश असला – तरीही हे गाणं लक्ष्यात राहतं.



हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे
मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो
मुहबतो में है दोनों का एक ही मतलब
अदा से ना कहो या मुस्कुरा के हाँ कह दो
हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे
हज़ार ख्वाब बहारों के और सितारों के
तुम्हारे साथ मेरी ज़िंदगी में आये है
तुम्हारी बाहों के झूले में झूलने के लिए
मचल मचल के मेरे अंग गुनगुनाये है
ये सारे शौक सारे शौक
ये सारे शौक सदाकतका रूप ले लेंगे
मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो
हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे
भरेगी मांग तुम्हारी वो दिन भी क्या होगा
सजेगी सेज हवाओं की साँस मेहकेगी
तुम अपने हाथ से सरकाओगे मेरा आंचल
अजीब आग मेरे तन बदन में देहकेगी
ये सारे शौक सारे शौक
ये सारे शौक सदाकतका रूप ले लेंगे
मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो
हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे
में अपनी जुल्फों के साये बिछाऊँगी तुमपर
में तुमपे अपनी जवाँ धड़कनें लुटाऊंगा
में सुबह तुमको जगाउंगी लब पे लब रख कर
में तुमको भींचके कुछ और पास लाउंगा
ये सारे शौक सारे शौक
ये सारे शौक सदाकतका रूप ले लेंगे
मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो
हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे
(गाण्याचे शब्द नेटवरून उचललेले आहेत, प्रमाणलेखनाची चूकभूल माफ असावी.)

इतक्यात वाचलेली पुस्तकं : अर्ली इंडियन्स


सुमारे पासष्ट हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून निघालेली काही आदिमाणसं भारतीय उपखंडात आली. काही युरोपात गेली. पण ‘अर्ली इंडियन्स’ हे टोनी जोसेफ लिखित पुस्तक इतरत्र गेलेल्या माणसांकडे फार निरखून बघत नाही. त्याचा रोख आहे तो भारतीय उपखंडातल्या माणसांच्या इतिहासाकडे.
ही आदिमाणसं भारतीय उपखंडात कुठे-कुठे स्थिरावली. पण सुमारे पाचेक हजार वर्षांपूर्वीपर्यंत शेतीचा शोध लागला नव्हता. लोक नुसतेच भटकत, शिकार-सावड करत जगत होते. साहजिक पोटापलीकडचं उत्पन्न नव्हतं आणि त्यामुळे संस्कृतीही नव्हती. पण पाचेक हजार वर्षांपूर्वी इराणमधल्या झाग्रोस नामक डोंगराळ भागातली काही माणसं आपण ज्याला हडप्पा संस्कृती म्हणतो त्या भागापर्यंत आली असावीत. आत्ताच्या भारतातला गुजरात नि आसपासचा भाग, पलीकडचा पार बलुचिस्तानपर्यंतचा भाग, आणि अलीकडे अगदी गंगा-यमुनेच्या संगमापर्यंतचा भाग असा विस्तीर्ण भूभाग हडप्पा संस्कृतीचा मानला जातो. पण हा त्याचा विस्तार पुढच्या दीडेक हजार वर्षांमध्ये झालेला. तर – भारतात राहू लागलेली आफ्रिकी आदिमाणसं नि इराणच्या झाग्रोसमधून आलेले लोक एकत्र राहू लागले असावेत. त्यांच्या वंशजांनी हडप्पा संस्कृती वाढवली. तत्कालीन पृथ्वीवरची ही सगळ्यांत मोठी संस्कृती – भूभागाचा आकार नि लोकसंख्या अशा दोन्ही अर्थांनी. (तरी लोकसंख्या फार तर भारतातल्या आजच्या एखाद्या सेमीशहराएवढी असेल! हे ‘प्रचंड’ लोकसंख्येचा आवाका ध्यानी यावा म्हणून.) शेतीवर आधारित जीवनशैली, मोठाल्या देवळांची अनुपस्थिती, हिंसा वा संघर्ष यांचं चित्रण अजिबात न सापडणं, राजापेक्षाही निवडक उच्चवर्णीयांच्या हाती कारभार असल्यासारखी लक्षणं, पाण्याचं नि सांडपाण्याचं उत्तम नियोजन, नद्यांना बंधारे घालून आणि पूरनियंत्रण करून खेळवलेलं पाणी, रस्ते-स्नानगृहं, इत्यादींमधली शास्त्रशुद्ध गुंतवणूक, शिस्नपूजा, युनिकॉर्नसदृश्य प्राण्याचं पूजन, हंडी उर्फ लोटा या नमुन्याच्या भांड्याची निर्मिती आणि प्रसार, तत्कालीन जागतिक संस्कृतींशी व्यापार, बांगड्या या दागिन्याचं प्राबल्य, घोडा या प्राण्याची अनुपस्थिती तर रेडा-म्हैस या प्राण्याला असलेलं महत्त्व, मातृदेवतांची उपासना… या काही गोष्टी हडप्पा संस्कृतीचे विशेष म्हणून मानल्या जातात. तीनेक हजार वर्षांपूर्वी काही एकापाठोपाठ एक आलेल्या नैसर्गिक आपदांमुळे तिचा र्हास होऊ लागला. वसवलेली नगरं सोडून लोक परागंदा झाले. जगायला इतर भूभागात गेले. त्यांच्यापैकी काही लोक भारताच्या दक्षिणेकडे गेले. दक्षिणेत आधीही स्थलांतरं झाली असणारच. पण हे महत्त्वाचं स्थलांतर असणार. हडप्पा संस्कृतीच्या लिपीचा आजही पूर्ण उलगडा झालेला नसला, तरी दक्षिण भारतातल्या द्रविडभाषांची आदिभाषा आणि हडप्पामधली आदिभाषा यांच्यात म्हणण्याजोगी साम्यं आढळली आहेत.
हडप्पा संस्कृतीचा र्हास अंतिम टप्प्यात असताना कधीतरी स्टेप्समधून – गवताळ कुरणांच्या प्रदेशातून काही टोळ्या या दिशेनं आल्या. त्यांची जीवनशैली भटकी होती. घोडा हा प्राणी त्यांच्याकरता साहजिकच अतिमहत्त्वाचा होता. धातुकाम आणि पर्यायानं शस्त्रास्त्रं याही बाबतीत ते प्रगत असावेत. गुराढोरांना महत्त्व होतं, पण एका जागी स्थिरावून नगरं वसवणारे ते लोक नव्हते. आपण ज्यांना ‘आर्य’ म्हणतो ते हे लोक असावेत. तोवर वेदनिर्मिती झालेली नव्हती, तसंच संस्कृतही पूर्ण विकसित नव्हती. त्या दोन्ही बाबी या प्रदेशात आल्यानंतर घडल्या. पण त्यांच्या संस्कृतीत – बहुधा येताना अफगाणिस्तानात वाटेत आलेल्या हरवैती – सरस्वती? – नदीला महत्त्व होतं. नद्यांना बांध घालणं पाप मानलं जात असावं. शिस्नपूजेबद्दल तिरस्कार होता. आणि मुख्य म्हणजे हे लोक पुरुषबहुल टोळ्यांतून आले.
आधीच र्हासकालात असलेल्या हडप्पा संस्कृतीला हा संघर्ष पेलवला नसावा. आर्य पुरुषांनी इथल्या स्त्रिया मिळवणं, त्यातून वंश वाढवणं, हळूहळू वेदरचना होत जाणं, संस्कृतची प्रगती होत असतानाच स्त्रिया (कारण त्या बहुतांश परक्या वंशातल्या!) आणि शूद्र (हडप्पातले, उर्फ परके) यांच्या संस्कृत बोलण्यावर बंधनं असणं, यज्ञ-बळी-युद्ध इत्यादी संस्कृतीच्या केंद्रस्थानी असणं… हे यथावकाश घडत गेलं. आजच्या भारताच्या वरच्या भागात डावीकडून उजवीकडे एखाद्या उथळ यूसारखा एक रुंद पट्टा ओढला, तर जो आकार मिळेल, साधारण त्या भागात आर्यांची संस्कृती बहरत गेली. त्या-त्या प्रदेशातल्या इंडो-युरोपीय भाषांचा अभ्यास या स्थानाला पुष्टी देतो.
हडप्पा आणि आर्य या दोहोंची वैशिष्ट्यं एकत्र येत राहिली. सुरुवातीला शिस्नपूजेचा तिरस्कार करणार्या आर्यांनी शिवलिंग स्वीकारलं. हडप्पा संस्कृतीमधली हठयोग्याची मुद्रा आणि योग स्वीकारला. आधीच्या हडप्पाजनांची मातृदेवतांची उपासना मागे पडली. त्यांनी यज्ञयाग आपलेसे केले. संस्कृत आणि वेद आपलेसे केले. या सगळ्या काळात भारतीय उपखंडात जगभरातून इतरही स्थलांतरं होतच होती. कुठे-कुठे मूळ आफ्रिकी वंशाचे ‘अर्ली’ भारतीय लोकही होते. या सगळ्यांमध्ये ‘मुक्त संचार नि संकर’ घडत होता. हा ‘भारतीय’ संस्कृतीचा सर्वांत सर्जनशील कालखंड. उपनिषदनिर्मितीचा कालखंड. मुक्तविहाराचा, मिश्रणाचा, विविधतेचा, विपुलतेचा आणि निर्मितीचा कालखंड.
इसवीसनापूर्वी शंभरेक वर्षं कधीतरी वर्णसंकर थांबलेला आढळतो. त्यावर बंदी तरी आली असावी वा वर्णसंकरात काहीतरी चूक आहे अशी समजूत जनमानसात रुजली असावी – रुजवली गेली असावी. मजेशीर बाब अशी की वेदांत आढळणारी चातुर्वण्याची संकल्पना तत्कालीन समाजात अस्तित्वात असूनही त्याआधी वर्णसंकर थांबलेला दिसत नाही. तसे ठोस जनुकीय पुरावे आता मिळाले आहेत. इसवीसनापूर्वी शंभरेक वर्षांपूर्वी तो थांबला. त्या सुमारास जातिव्यवस्थेचा उदय झाला असावा, असं म्हणता येईल.
इतिहासाच्या पटाच्या तुलनेत वर्णसंकर निषिद्ध मानण्याची घटना तशी अलीकडची (!) असल्यामुळे भारतीय लोकांमध्ये जनुकीयदृष्ट्या फरक नाही. थोडं वैविध्य आहे, पण आपण सगळे जण थोडे थोडे सगळ्यांसारखेही आहोत. आफ्रिकी वंशाचे भारतीय, आ०वं०भा० + झाग्रोसमधले शेतकरी = हडप्पा, हडप्पा + आ०वं०भा०= द्रविड उर्फ दक्षिण भारतीय, हडप्पा + आर्य = उत्तर भारतीय, भारताच्या ईशान्येकडून आलेले मंगोल वंशीय आणि त्यांचे इतरांशी झालेले संकर, आणि या सगळ्यांचे आपापसांत झालेले संकर... असा भारतीयांचा जनुकीय आणि पर्यायानं सांस्कृतिक-सामाजिक इतिहास आहे. एका पिझ्झ्याची अतिसुलभीकृत (हा लेखकाचाच शब्द) उपमा देत ही घडण समजावली जाते. खालचं पीठ आ०वं०भा०चं, वरचा सॉस हडप्पाचा, चीज आर्यांचं, तर इतर लोकांचे टॉपिंग्स – असं सगळं मिळून आपण उर्फ आजचा आपला पिझ्झा घडलेला आहे.
हा सगळा पट ‘अर्ली इंडियन्स’च्या पूर्वार्धात उलगडतो. त्याकरता पुरातत्वशास्त्र, मानववंशशास्त्र, जनुकशास्त्र, भाषाशास्त्र, शिलालेखन-ताम्रपट आणि बोलींचा इतिहास, इतर सांस्कृतिक-सामाजिक इतिहासलेखन – या सगळ्यांची मदत घेतली जाते. मात्र गेल्या पाचेक वर्षांपूर्वींपर्यंत या सगळ्या इतिहासात असलेली संदिग्धता संपवून ठोस नेमकेपणा आणि अचूकपणा आणण्याचं काम प्राचीन जनुकीय पुराव्यांनी केलं असल्याची ठाम नोंद होते.
ही गोष्ट अत्यंत दिलखेचक तर आहेच. त्याखेरीज ती आपल्याला विचारात पाडते. हा हजारो वर्षांचा इतिहास ओलांडून बघता बघता आजच्या भारतातल्या उत्तर विरुद्ध दक्षिण अशा संघर्षांपर्यंत येऊन ठेपते. ब्राह्मणवाद आणि बहुजनवाद यांची मुळं दाखवून देते. शाकाहार आणि मांसाहार, दुग्धसेवन आणि मांसाशन यांमागच्या जनुकीय कारणांवर प्रकाश टाकते. गांधी-आंबेडकर वादाची मुळं शोधू पाहते. मगध आणि आर्यवंशीय यांच्यातल्या संघर्षाची कारणं पाहते. बुद्ध नि जैन धर्मांच्या उदयामागची नि प्रसारामागची पार्श्वभूमी दाखवून देते... आणि या सगळ्या द्वैतांच्या पलीकडे जाणारी – या भूमीतल्या वैविध्यात नांदणार्या एकात्मतेचा, मिश्रणाचा, संकराचा, संगमाचा, सहजीवनाचा... आणि त्यातून निर्माण झालेल्या अद्वितीय वारशाचा धागा दाखवते.
वाचताना पुष्कळ काही पूरक आठवत, दिसत राहिलं. त्यानं या गोष्टीला अनेक आधार पुरवले. उदाहरणं दिली. स्पष्टीकरणं दिली. दिलासाही दिला. पुस्तक अतिशय अतिशय आवडलं हे तर सांगायला नकोच. ते सतत निरनिराळ्या कारणांनी डोक्यात पृष्ठभागापाशीच राहील, पुन्हापुन्हा त्याकडे संदर्भाला, तुलनेला परतणं होईल – हे महत्त्वाचं. आणि तसं दुर्मीळ.
बाकी – हा निव्वळ न राहवून करून दिलेला परिचय आहे. तपशिलात काही चूक असेल, तर ती माझी.
~
अर्ली इंडियन्स : द स्टोरी ऑफ अवर अॅन्सेस्टर्स अॅंड व्हेअर वी केम फ्रॉम
टोनी जोसेफ
प्रथमावृत्ती 2018
जगरनॉट पब्लिकेशन

इतक्यात वाचलेली पुस्तकं : एका श्वासाचं अंतर

अंबिका सरकारांबद्दल निरनिराळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. पोटच्या तिन्ही मुलांचा मृत्यू पाहावा लागणं. अर्थशास्त्राचं अध्यापन. सळसळता उत्साह. गौरी देशपांडेशी असलेली मैत्री आणि तिच्या तोंडचं ‘माझी अंबू’ हे संबोधन. ‘द रीडर’चं अंबिकाबाईंनी केलेलं भाषांतर. ते भाषांतर आणि सिनेमा या दोन गोष्टी अजिबात वेगळ्या न काढण्याजोग्या एकमेकींवर सुपर इंपोज झाल्यासारख्या होत्या डोक्यात.
पण या सगळ्या ओळखी ओलांडून त्यांची ओळख माझ्या डोक्यात कायम ‘एका श्वासाचं अंतर’ लिहिणारी लेखिका अशीच राहील.

कथानक अगदी साधं सरळ आहे त्या कादंबरीचं. एक कमावती बाई. एक मुलगा झाल्यानंतर नवर्याच्या नादानपणाला कंटाळून वेळीच घटस्फोट घेते. लोकांची बरीवाईट, शहाणी-कुजकी बोलणी झेलते, पचवते. दुसरं लग्न करते. संसार करते, यथाशक्ती निभावते. मरून जाते. यापल्याड त्या पुस्तकात विशेष सांगण्याजोग्या घटना नाहीत. पुस्तक संपल्यावर हे जाणवतं, तेव्हा चकित व्हायला होतं. कारण या सरळसाध्या आयुष्यात किती काय-काय प्रवास घडतात त्या बाईचे! जराही मेलोड्रामा न वापरता, उत्कटतेचे रंग गडद न करता, माणसांना काळ्या-पांढर्या रंगांमध्ये न रंगवता, स्त्रीवाद या शब्दातला ‘स’ही न उच्चारता, तटस्थतेचा आव न आणता – आयुष्याबद्दलच बोलणारी गोष्ट इतक्या परिणामकारकपणे कशी काय लिहू शकतं कुणी, असं वाटतं.
यातली सगळीच पात्रं हाडामांसाची माणसं आहेत. नायिकेचा दुसरा नवरा – बाप्पा, त्यांचा अश्राप चांगुलपणा आणि तरीही कुणापर्यंतच न पोचता येण्यातला अभागीपणा बघताना पोटात तुटतं. मुलाचं - कार्तिकचं - आईवर उत्कट प्रेम आहे. आणि तरी एक प्रकारचा हट्टी आक्रसलेपणाही आहे. तो त्याला आईपल्याड कुणापर्यंतच धड पोचू देत नाही. त्याच्या बायकोचा - रेखाचा - स्वतःचा असा इतिहास-भूगोल आहे. त्यातून येणार्या तिच्या धारणा आहेत. त्यांची नि तिच्या नवर्याच्या स्वभावाची अशी काही करकचून गाठ बसलेली आहे, की संसार सोन्यासारखा, नातं घट्ट, दोन गोजिरवाणी मुलं, एकमेकांबद्दल प्रेमही आहे - पण कुठेतरी काही विस्कटून बसलेलं...
या सगळ्या गुंत्याकडे नायिका साक्षीभावानं पाहते. तिला त्या-त्या वेळी दुःखं होतात, राग येतो, माया वाटते, काळजी वाटते. पण त्यापल्याड बघणारी नजर तिच्यापाशी आहे. त्यानं सगळ्यांमधली असूनही ती निराळी होते.
तिच्या ऑफिसातल्या एका सहकार्याचं – नवलकरचं - एक पात्र कादंबरीत आहे. मनमोकळेपणी चावट कोट्या करणारा, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, भरभरून जगणारा असा तो माणूस. त्याच्या बोलण्यामुळे त्याच्यापासून फटकून राहिलेल्या नायिकेला एका क्षणी त्याच्या वाह्यात बोलण्यापल्याडची खरीखुरी आस्था, जगण्यावरचं प्रेम जाणवतं. धागा जुळल्यासारखा होतो, काहीतरी चमकून गेल्यासारखं होतं.
तिथेच लेखिका थांबते.
आपण थांबून अर्थ लावू पाहतो, पण गोष्ट पुढचं वळण घेते.
असे अनेक क्षण गोष्टीत येतात. अर्थपूर्णता आणि निरर्थकता यांच्यातला लपंडाव घडत राहावा, माणसांनी सर्वस्व पणाला लावून जगू पाहावं आणि भ्रमनिरास व्हावा, पण काहीतरी सापडल्यासारखंही व्हावं. थबकून काही चिमटीत धरू पाहण्याआधीच आयुष्यानं पुढचं वळण घ्यावं - असे ते क्षण. बघता-बघता निसटून जाणारे, जगण्या-मरण्यातलं अंतर दाखवून देणारे.
हे अनलंकृत, जिवंत, कसलाही आव न आणणारं, शहाणं पुस्तक लिहिणारी लेखिका म्हणून अंबिकाबाईंची जागा कायम मनात राहील. त्यांना आदरांजली.
एका श्वासाचं अंतर
अंबिका सरकार
मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९९०

इतक्यात वाचलेली पुस्तकं

धारपांची इतर काही पुस्तकं मागे वाचली होती. समर्थ आणि आप्पा या जोडीचं मात्र काही वाचलं नव्हतं. रोहन प्रकाशनानं प्रसिद्ध केलेली समर्थ-पुस्तकमालिका वाचली.
एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. धारपांच्या कथांची मुळं भारतीय मातीतली नाहीत, हे मूळ पुस्तकं वाचणार्याला कळतंच. पण मूळ पुस्तकंं ज्यांच्या वाचनात आलेली नाहीत, त्यांनाही हे स्पष्ट जाणवतं की धारपांच्या कथांमधलं जे काही अमानवी आहे, त्याची जातकुळी भारतीय नाही.
मराठी माणसाला भुतांचे अनेक प्रकार ओळखीचे आहेत. जखीण, लावसट, हडळ, मुंज्या, समंध, मूळपुरुष, गिर्होबा, वेताळ... या सगळ्या भुतांच्या जगाचे स्वतःचे असे नियम आहेत. ही भुतं कोणत्या परिस्थितीत जन्माला येतात, त्यांच्यावरचे निर्बंध कोणते, त्यांचा नाश कसा होतो... हे सगळं विवक्षित नियमांनी बांधलेलं आहे. मात्र - त्यांच्यात एक अस्सल देशीपणा आहे. त्याखेरीज, ही भुतंखेतं अमंगळ असली, तरीही त्यांच्यामध्ये काहीएक आपलेपणाचा धागा आहे. जणू ती माणसाला घोळसतील, हवं ते वसूल करून घेतील, पण त्याच वेळी कुण्या परक्या जगातलं अभद्र काही चालून आलं, तर झटदिशी बाजू बदलून ज्याला घोळसलं त्या माणसाच्या बाजूनं उभीही राहतील. असं काहीतरी वाटायला लावणारं बरेवाईटपणाचं मिश्रण त्यांच्यात आहे. हॅरी पॉटर मालिकेमध्ये निअरली हेडलेस निक किंवा मोनिंग म्रिटल यांच्याबद्दल हॉगवर्ट्समधल्या कुणालाही परकेपणा वा भीती वाटत नाही. कारण ती जरी भुतं असली तरी हॉगवर्ट्सच्या विश्वाचा ती अपरिहार्य असा भाग असतात, त्यांच्यातलं काहीतरी हॉगवर्ट्सशी बांधलं गेलेलं असतं. तसंच काहीसं नातं मराठी माणसाचं देशी भुतांशी असतं.
समर्थमालिकेमध्ये येणारं अमानवी विश्व असं नाही. त्यात परकेपणा आहे. त्यातलं अमंगळ या सृष्टीशी उभा दावा मांडणारं आहे. ते दुष्ट आणि समर्थ सुष्ट असा हा उघड, दुभंग संघर्ष आहे. केसाळ काळे गुंतवळसदृश आकार, द्वेष-तिरस्कार-राग यांची आग, भुईच्या पोटातून रोरावत वर येणारे अभद्राचे उद्रेक, ओंगळवाणी पशुवत अस्तित्वंं, झोंबीज्... हे या अमंगळाचं स्वरूप आहे.
धारपांचं कौशल्य असं की या परकीयपणावर ते जवळजवळ बेमालूम असं देशी आवरण पसरून देतात. त्याचा धागा इथल्या मातीतल्या चिरपरिचित सुरासुराच्या झगड्याशी, क्वचित छद्मविज्ञानाशी, मानवी स्वभावाच्या खाचाखोचांशी, जोडतात. हे कौशल्य आहेच. ते त्यांच्या अस्खलित निर्मळ मराठी भाषेचं आणि गोष्ट सांंगण्याचं कसब आहे. पण त्याच वेळी धारपांनी असं विश्व मराठी मातीतल्या भुताखेतांसह विणलं असतं, तर काय बहार आली असती असं वाटल्यावाचून राहत नाही.
विशेषतः त्यांचं व्यक्तिरेखाटनाचं कौशल्य बघून फारच चुटपुट लागते. आप्पा, समर्थ, केशवराव, मार्तंड या व्यक्तिरेखा इतक्या थेटपणे वॉट्सन, होम्स, लेस्ट्राड, मॉरिआर्टी यांकडे बोट दाखवतात, की मजा वाटते. पण त्यांंचं देशीकरण मात्र धारपांना किती अफलातून साधलं असावं! या व्यक्तिरेखा अक्षरशः डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यांच्या रूपात-वागण्यात-भाषेत औषधालाही परकेपण नाही. हेच भुताखेतांचंही करता आलं असतं तर... असो.
ही इतकी हमखास यशस्वी मालिका. पण किती ढिसाळपणे काढली आहे! पहिली आवृत्ती कधीची त्याची नोंद नाही. 'पिशवि'सारख्या र्हस्वदीर्घाघाच्या चुका, एका अक्षराजागी सर्रास दुसरं अक्षर पडणं, पत्रातला मजकूर तिरप्या ठशात आणि पत्राबाहेरचा निवेदकानं सांगितलेला मजकूरही तशाच तिरप्या ठशात पत्राला जोडून दिलेला. वाचकानं काय ते अनमानधपक्यानं समजून घ्यावं. या पुस्तकांच्या बाबतीत तर व्यावसायिक यशाची खातरी असणारच. त्यांची तरी निर्मितिमूल्यं सांभाळावीत... छे, नाव नको. वाईट वाटतं.
समर्थांची ओळख, समर्थांना आव्हान, समर्थांचा विजय
नारायण धारप
रोहन प्रकाशन
रोहन प्रकाशनाने काढलेली पुनर्मुद्रित आवृत्ती २०२२

~


समीना दलवाईचं 'भटकभवानी' हे पुस्तक वाचलं.
अस्सल भारतीय मातीतली आणि ब्राह्मणी-अब्राह्मणी स्त्रीवादात स्पष्ट फरक करणारी मांडणी, विद्वान-सुधारकी-आंतरधर्मीय-शहरी+ग्रामीण अशा बहुरंगी कौटुंंबिक पार्श्वभूमीचं देखणं-सुस्पष्ट प्रतिबिंंब मिरवणारे अनुभव, या पार्श्वभूमीच्या पलीकडे जात केलेली खास स्वतःची अशी निरीक्षणं, वाचकाला त्याच्या पूर्वग्रहांकडे बघायला लावण्याची ताकद... ही सगळी वैशिष्ट्यंं या पुस्तकातल्या लेखांमध्ये आहेत खरी.
पण त्या सगळ्यांहून अधिकचंं, मला जाणवलेलं, वैशिष्ट्य म्हणजे तिची अस्सल मराठी भाषा. ती विद्वज्जड नाही, रसाळ आहे. सुटसुटीत आहे, पण कोरडी वा त्रोटक नाही. चपखल, मिश्कील, नेमकी तर आहेच. शिवाय जाता-जाता सहज 'मौना'ला 'चुप्पी' म्हणणारी आणि '...आम्हांला कोण अभिमान!'सारख्या किंचित जुन्या वळणाच्या रचना सहजी करणारीही आहे. आणि सगळ्या वर्णनांहून महत्त्वाचं म्हणजे अतिशय भेदक-परिणामकारक-वेळी मन हेलावून टाकणारी आहे. अशी भाषा अभ्यासकाला नव्हे, अभ्यास जगणार्याला-पचवणार्याला वश होते.
हिंदू-मुस्लीम दंगली, स्त्रियांवरचा अन्याय, दलितांवरचे अत्याचार... असे अनेक जळजळीत विषय समर्थपणे हाताळतानाही पुस्तकाचा सूर कुठेही कडवट होत नाही. त्यातला खेळकर, हृद्य भाव लोपत नाही. हे श्रेय भाषेला द्यावंं की लेखिकेच्या नजरेला, हे मात्र मला ठरवता येईना.
अक्षरशः बसल्या बैठकीत पूर्ण केलेलं, जरूर-जरूर वाचावं असं पुस्तक.
भटकभवानी
समीना दलवाई
हरिती प्रकाशन
प्रथमावृत्ती २०२२

~

'झुम्कुळा' हा वसीमबार्री मणेरांचा कथासंग्रह.
गरीब माणसांच्या गोष्टी. कुठे एखाद्या टाकलेल्या, कुरूप प्रौढेचं हसर्या चेहर्यानं राब-राब-राबत झुरणं असेल. कुठे कुणा टमटमवाल्याची गाडीला टप करण्याची तगमग. कुठे एखाद्या चिल्ल्या पोराला दिवाळीच्या किल्ल्यावर कारंजं करताना बघायला न मिळाल्यामुळे झालेली हिरमूस. कुठे पावसात भिजणार्या खारीवाल्याची तंंगी बघताना मामासोबत खाल्लेल्या खारीच्या आठवणीनं हळवा-हळवा झालेला एखादा तगडा तरुण. लहान जिवाच्या, नाजूक चणीच्या, धारदार गोष्टी.
त्यांची बोली सातारकडची. त्यात मुस्लीम समाजाच्या हिंदीमिश्रित बोलीचे रंग बेमालूम मिसळून गेलेले.
या कथांचंं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या काळ्याशार-कडूजहर नाहीत. परिस्थिती तशी कायम परीक्षा घेणारी असतेच. पण होणार्या नवरीच्या मोबाईल-मेसेजिंगच्या कौशल्याला टरकून असणारा पैलवान गडी नि दोस्ताची मदत घेऊन तिला गोरंमोरं करून चीत करण्याची त्याची हौस... अशा मिश्कील गोष्टीही भेटतात. म्हातार्या निराधार मैमूनाच्या कष्टाच्या जाणिवेनं तिच्या सासरच्यांवर फणफणणारी पाटलीण भेटते. विद्यार्थ्याला 'नॅशनल'ला खेळवण्यासाठी स्वतःच्या खिशाला खार लावून घेणारे नि त्याची उडी हवी तशी पडल्यावर आनंदानं शिव्या देणारे सातपुते सर भेटतात. नि सोबतच्या दोस्ताची हलाखी बघून घास घशाखाली न लोटू शकणारे कोळेकर वकीलही. त्यांच्यातलं माणूसपण संपून कोरडंठाक झालेलं नाही. अजून थोडा ओलावा शिल्लक आहे...
आणखी एक अतिशय आवडलेली बाब म्हणजे स्थानिक खासियतींचे अन-अपोलोजेटिक, सहज उल्लेख. आंबट चुका घालून केलेला दालचा, मटणपुलावाची कुर्चन, गरम पुरीभाजी सॅम्प्लल... असे अनेक उल्लेख कथांना वास, रंग देऊन जातात.
'झुम्कुळा' म्हणजे सापांच्या जोडीचं जुगणं. नजरबंदी करणारं. विजेसारखं लवलवणारं. नजर ठरू न देणारं.
त्याचं नाव संग्रहाला शोभून दिसतं.
झुम्कुळा
वसीमबार्री मणेर
प्रकाशक : ताहिरनक्काश सलिम मणेर
प्रथमावृत्ती : २०१९

~

स्त्रीवादाशी निगडित काही पुस्तकं काही कारणानं एकापाठोपाठ एक समोर येत राहिली. काही मी उत्सुकतेनं हुडकल्यामुळे, काही कुणी सुचवल्यामुळे, काही निव्वळ गूगलकृपेनं. त्यांपैकी काहींनी अतिशय प्रभावित केलं. मार्च संपेपर्यंतचं वाचन नि टिपणं या पुस्तकांविषयी.
चिमामांडा एंगोझी अदिचे या नायजेरियन लेखिकेचं हे पुस्तक. 'Dear Ijeawele, or A Feminist Manifesto in Fifteen Suggestions' अशा लांबलचक नावाचं असलं तरी अतिशय छोटेखानी, साधंसोपं आणि खणखणीत. आपल्या मुलीला स्त्रीवादाचं बाळकडू कसं द्यावं, असा प्रश्न विचारलेल्या एका मैत्रिणीला लेखिका उत्तरादाखल पंधरा सुचवण्या सांगते आहे, अशी कल्पना करून लिहिलेलं.
आपल्या मुलांना सगळं काही शिकवावं इथपासून ते त्यांना आपलं आपण शिकण्यासाठी रस्ते खुले करून द्यावेत, बाकी काहीही करू नये अशा विचारापर्यंत झोके घेणार्या मला या पुस्तकाचा दृष्टीकोन अतिशय आवडला. आपण व्यक्ती म्हणून संपूर्ण, रसरशीत, न्यायी, करुणामयी असलं पाहिजे, तरच मुलांसमोर हा पर्याय राहील. आणि भाषेपासून ते विचारापर्यंत, कृतीपासून ते संसाधनांपर्यंत... सगळी काळजी घेतली तरीही मुलं आपल्याला चकवून स्वतःला हवी तशीच घडणार आहेत आणि तेच नैसर्गिक-निरोगी आहे - ही समजूत मला या लेखिकेत दिसली.
सौंदर्यविषयक समजुती, शरीराचं निरोगीपण, संंस्कृतीची तपासणी करत राहण्याची गरज, सेक्सविषयक मोकळेपणा, संतपणा सोडून माणूस होण्याची निकड, वैविध्याबद्दलचा आदर, भाषेकडे आणि पुस्तकांकडे जाणीवपूर्वक लक्ष्य पुरवण्याचं महत्त्व, स्वतःच्या आवाजाचं आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचं-ओळखीचं भान... आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 'फेमिनिझम लाइट' उर्फ 'सुलभ स्त्रीवाद' या बुरख्याखाली येऊन पंखाखाली घेऊ पाहणारी पितृसत्ताकता ओळखण्याचं शिक्षण... हे सगळे पैलू इतक्या सोप्या भाषेत आणि सहजी सांगून जाणारं दुसरं पुस्तक मला ठाऊक नाही.
या लेखिकेचं 'We should all be feminists' नावाचं एक भाषणही मिळालं. तिचं मिश्कील हसू अनुभवत ते ऐकण्याजोगं आहे. त्याची लिंक खाली देत आहे.
Dear Ijeawele, or A Feminist Manifesto in Fifteen Suggestions
Chimamanda Ngozi Adichie
Knopf Publishers
2017

~

मला शिरीष कणेकरांचं लिहिणं आवडतं.
त्यात पुष्कळ पुनरावृत्ती असते, घासून गुळगुळीत झालेले विनोद असतात, एक प्रकारचा सेक्सिस्ट आविर्भाव असतो, फार मोठं साहित्यमूल्य नसतं, हे सगळे आरोप मला मान्य आहेत. पण व्यक्तिचित्रं लिहिताना त्यांची लेखणी ओलसर असते. या व्यक्तीला माझ्या तराजूत घालून त्याचं यथेच्छ मूल्यमापन करूनच काढतो, असा अभिनिवेश नसतो. त्यांची आई, आजी, मावशी, वडील, काही मित्र... यांबद्दलचं लेखन आवडतं ते त्यामुळे. त्यातले विसंवाद, कटुता, अभाव, चुटपुट... सगळ्यासकट ते जिवंत वाटतं.
'लता' हे लता मंगेशकरांबद्दलचं पुस्तक त्या पठडीतलं आहे. वर दिलेल्या दोषांपासून ते मुक्त नाही. मात्र, मी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय चित्रपटरसिक श्रोता आहे, माझ्या पदरात आयुष्यानं फार मोठं माप घातलेलं नाही, पण साक्षात 'लता'चा स्नेह देऊन त्याची जणू भरपाई केली आहे... असा भाव त्यात आहे. माझ्यातला सर्वसामान्य वाचक त्यामुळे त्याकडे ओढला गेला. एरवी अप्राप्य भासणारी ही कलावती विनोद करताना, गप्पा मारताना, टोमणे मारताना, खळखळून हसताना, चवीनं जेवताना, आपल्या कलेतून येणारा देखणा तोरा मिरवताना - कशी दिसते, हे मला एरवी कुठून कसं कधी बघायला मिळणार होतं?
अनेकानेक फिल्मी आणि साधेसुधे किस्से सांगताना कणेकर ते दाखवतात. मंगेशकर भावंडांमधले संबंध, अनेक कलावंतांशी उडालेले त्यांचे खटके, काही हृद्य आठवणी, काही अविश्वसनीय भासणाऱ्या प्रतिभावंतांच्या कहाण्या... हे सगळं वाचताना लतामधल्या माणूसपणाचं दर्शन घडतं. मस्त वाटतं.
थोडं नेटकं संपादन करून पुनरावृत्ती टाळली असती, तर.. असो.
लता
शिरीष कणेकर
नवचैतन्य प्रकाशन
प्रथमावृत्ती २०२३

~


'निरंतर वाटेवर' या सानियाच्या नव्या कादंबरीची तुलना नकळत शांताबाई गोखल्यांच्या 'निर्मला पाटील यांचे आत्मकथन'शी झाली, तशीच अंबिकाबाई सरकारांच्या 'एका श्वासाचं अंतर'शीही झाली. 'निर्मला पाटील'मध्ये असलेला समग्र देशकालजातपरिस्थितीचा पट 'निरंतर'मध्ये नाही. 'एका श्वासाचं'मधला सहज, उगवून आल्यासारखा नैसर्गिक भावही नाही. पण तरीही, हे अन्यायकारक आहे हे कळूनही, अशा तुलना मनात आपसुख उमटतात, याचं कारण उघड आहे - या एकाच जातकुळीच्या कादंबऱ्या - की लघुकादंबऱ्या? - आहेत.
आत्मशोधाच्या वाटेवरच्या बायांची गोष्ट सांगणाऱ्या.
'निरंतर'मध्ये तीन मैत्रिणी आहेत. मालविका, रागिणी, चंदा. एक भारताच्या उत्तरेकडची, एक दक्षिणेकडची, आणि एक मधली - महाराष्ट्रातली. तिघींची आयुष्यं निरनिराळे प्रश्न पुढ्यात टाकणारी. तिन्हीत धागा आहे तो बाईपणाचा. त्यांच्या पुढ्यातले प्रश्न आहेत, कारण या समाजानं, या संस्कृतीनं त्यांना बाईचा जन्म दिला आहे, एक विशिष्ट पुरुषप्रधान अशी व्यवस्था घडवली आहे, आणि त्याबरहुकूम काही एक समजुती, अपेक्षा, नियम, चाकोऱ्या या बायांवर लादल्या आहेत. त्या-त्या बायांच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीनुसार त्या किंचित बदलतात. तपशिलात, तीव्रतेत कमीजास्त फरक होतात. पण आकार घडवणारी मूस तीच आहे.
काही अपेक्षित टप्पे लागतात, काही अनपेक्षित. काही भाग जिवंत, रसरशीत, चकित करून जाणारे आहेत. काही अगदीच खेचल्यासारखे, बेतीव, रटाळ, एपिसोडिक. पुरतं समाधान झालं नाही, तरी पुस्तक संपेस्तो हातातून ठेववलंही नाही. तितकी ताकद गोष्टीत आहे.
मला झालेला आणखी एक वैयक्तिक साक्षात्कार म्हणजे - 'बाईला बाईच समजून घेऊ शकते' या काहीशा ठोकळेबाज, सुलभीकृत, जीवशास्त्राधारित, 'लेडीज कम्पार्टमेंट' गृहीतकात आपल्याला बांधून घेण्याची ताकद उरली नाही, हे जाणवलं. त्या गृहीतकाची स्वतःची अशी जागा आहे, भूमिका आहे, मोल आहे... पण आता ते पुरेनासं, पटेनासं झालं आहे, हेही.

निरंतर वाटेवर
सानिया
मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती २०२३

‍~
आज रद्दीवाल्याकडच्या त्रैमासिक चकरीत 'फादर टेरेसा आणि इतर वल्ली' हे डॉ. शंतनू अभ्यंकरांचं पुस्तक दिसलं. डॉक्टरांचं थक्क करणारं कॅन्सरविषयक टिपण इतक्यात वाचलं असल्यामुळे आपसुख उचललं गेलं.
खुमासदार मिश्किली आणि स्वतःचा कमीपणा दाखवायला अजिबात न लाजणारा प्रामाणिकपणा हे लेखकाचे दोन विशेष या सगळ्या व्यक्तिचित्रांतून दिसत राहतात. काही विशेष रंगलेली व्यक्तिचित्रं वाचताना पाणीही येतं डोळ्यांत. पण अखेर वाचून संपल्यावर भाव मनात उरतो तो जगण्याविषयीच्या प्रसन्न प्रामाणिक कुतूहलाचा. अफगाणिस्तानच्या वाताहतीची वेदना जगणारा सय्यद, 'फशिवलं हो मला' म्हणून उदास होणारी मायाळू म्हातारी, खाष्टपणात भूषण मानणारी मेट्र्न फादर टेरेसा, नाटकात रमलेला डीनमास्तर, सर्जनला देवासमान वाटणारे अनेस्थेशिया देणारे तज्ज्ञ, महाडहून आबीकर डाक्तरला भेटायला येणारा रहीम चाफेकर आणि मंडळी ... अशा अनेक व्यक्तिचित्रांमध्ये अधिक मोठ्या लेखनाची आणि कथांची बीजं दिसतात.
या पुस्तकाच्या निमित्तानं डॉ. मिलिंद कुलकर्णींचं, अगदी थेट याच जातकुळीचं 'कोकणचो डॉक्टर' आठवतं. डॉ. रवी बापटांचं 'वॉर्ड नंबर पाच, केईएम', आणि डॉ. नाडकर्णींची 'गद्धेपंचविशी' आणि 'वैद्यकसत्ता', डॉ. अभय बंग यांचं 'माझा साक्षात्कारी हृदयरोग', डॉ. सुलभा ब्रह्मनाळकरांचं 'डॉक्टर म्हणून जग(व)ताना', आणि डॉ. लीला गोखले यांचं 'माझी गोष्ट'देखील. मराठीत सुसंस्कृत सहृदय डॉक्टरांनी लिहिण्याची परंपराच आहे म्हणायची. त्यात डॉ. अभ्यंकर शोभून दिसतात, असं वाटलं.
पण डॉक्टर अभ्यंकरांचं सर्वांत भारी लेखन माझ्या लेखी त्यांचं ते 'आपुले मरण' उघड्या डोळ्यांनी आणि धीट विवेकानं पाहणारं आणि त्यातही आपला मिश्कील सूर न सोडणारं अजरामर टिपणच आहे. त्यात बदल होणे नाही.
फादर टेरेसा आणि इतर वल्ली
डॉ. शंतनू अभ्यंकर
समकालीन प्रकाशन
प्रथमावृत्ती २०१९

Friday, 25 August 2023

प्रार्थना

खूप दिवसांनी इथली दारंखिडक्या उघडल्या. म्हणण्याजोगं, स्वतःचा आकार ल्यालेलं असं काही आज तरी मनात नाही. पण रांगोळी काढावीशी वाटावी वा प्रसन्न फुलं सजवून ठेवावीत, तसं काहीतरी वाटतंय. म्हणून हे. 

~

मी एका हिंदू ब्राह्मण, शहरी, शिक्षित कुटुंबात जन्मलेली व्यक्ती आहे आणि या सवर्णतेमुळे, बहुसंख्याकपणामुळे, शहरीपणामुळे, शिक्षणामुळे माझ्या कुटुंबाला, माझ्या जातीतल्या लोकांना, मला जे काही दृश्यादृश्य फायदे झाले, त्यांचा परिणाम म्हणून मी 'मी' आहे. दोन्हींकडचे आजीआजोबा, पुढे आईवडील शिकलेले होते, शिक्षणाची किंमत जाणत होते, म्हणून मला शिक्षणाकरता काडीमात्र संघर्ष करावा लागला नाही. मी स्त्रीलिंगी व्यक्ती असल्यामुळे शालेय शिक्षण फुकट झालं, तर माझी आई सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती, म्हणून माझं महाविद्यालयीन शिक्षण अत्यंत कमी पैशांत झालं. आज ज्या भाषेला प्रमाणभाषेचा दर्जा मिळाला आहे, ती भाषा कुटुंबात-परिसरात बोलली जात होती, म्हणून प्रमाणभाषेवर प्रभुत्व कमावता आलं. स्वच्छता, साक्षरता, आर्थिक नियोजन, विवेक या सगळ्या मूल्यांकडे लक्ष्य देणं घरादाराला परवडत होतं, त्यामुळे माझ्यावर तसे संस्कार झाले. वाचन या छंदाला समाजात मान होता, म्हणून वेळ घालवण्यासाठी लागलेला माझा छंद मला आपोआप अभ्यासू ठरवून गेला. हे सगळं घडण्यामागे माझ्या कुटुंबीयांची ब्राह्मण ही जात कायम दृश्य वा अदृश्यपणे उपस्थित होती. थेट शोषण नसेल. पण पूर्वीच्या शोषणाच्या पायावरच हे फायदे बांधलेले होते. पांढरपेशेपणाला समाजात असलेला प्रतिष्ठितपणा माझ्या पथ्यावर पडला. सरकारी व्यवस्थेनं देऊ केलेले फायदे मी मनःपूत भोगले. आज त्याचे फायदे उपभोगते. त्यांच्या जिवावर माझा शाणपणा आज चालू शकतो.


मला, माझ्या मायबापांना, माझ्या आजूबाजूच्या माणसांना कुणाकुणाकडून कायकाय मिळालं आहे, त्याची स्वच्छ जाणीव मी मनाशी बाळगावी. मला त्याचा कदापि विसर पडू नये. आरक्षणांना, समाजवादी धोरणांना, स्त्रीसबलीकरणाला विरोध करण्याइतकं मी उतूमातू नये. आजूबाजूच्या विषमतेची जाण मनात कायम वसावी. तिला प्रश्न विचारण्याची हिंमत राहावी. इतकीच आज प्रार्थना.


Wednesday, 12 April 2023

थॅंक्स टू हिंदी सिनेमे २

कोकणातले दशावताराचे खेळ आता पूर्वीसारखे का रंगत नाहीत, याचं एक विलक्षण कारण इंद्रजीत खांबेंकडून ऐकायला मिळालं होतं. पूर्वी कंदील-पेट्रोमॅक्स आणि दिवट्या यांच्या प्रकाशात हे खेळ चालत. त्या दिव्यांचा सोनेरी पिवळसर अर्धधूसर प्रकाश जिथवर पोचेल तितकं त्याचं व्यासपीठ. हलत्या सावल्यांनी जिवंत केलेलं, श्वासोच्छ्वास करणारं, वर्तुळाकार. ते रिंगण विरत जाईल तिथून प्रेक्षक. रिंगणाच्या प्रकाशाच्या काठावर बसलेले. समोर संकासुर आला की दचकून मागे सरणारे, पुन्हा उत्सुकतेने पुढे सरसावणारे.
आता विजेचे झगझगीत दिवे आले, कुठे-कुठे तर कमानी रंगमंच. वर्तुळ गेलं, प्रेक्षक-नट विभागणी करणारी एकच एक दगडी रेषा आली. आता खेळांमधली गंमत कुठून राहणार?
हे ऐकल्यावर प्रकाशाच्या – नेपथ्याच्या सामर्थ्याचं अजब वाटलं होतं. मग हे थबकून टिपून घेणं सुरू झालंच, पण मागे पाहिलं तर अशा कितीतरी नेपथ्यांचे स्क्रीनशॉट्स माझ्या डोक्यात होतेच. त्याविषयी हे टिपण.
हृषीकेश मुखर्जींच्या ‘खूबसूरत’मधलं ते घर तत्काळ आठवलं. मंडळींच्या चोरट्या भेटीगाठी, गुलाबांची देवाणघेवाण, तबला वादन, कथ्थक, आणि नाटकं... इत्यादी सुखेनैव सामावून घेणारी स्वच्छ, प्रशस्त गच्ची त्याला होतीच. पण त्या गच्चीवरच्या पाण्याच्या टाक्या आणि त्या टाकीखाली चटई पसरून घरी पत्र लिहायला खासगी अवकाश शोधणारी रेखा. इतकं मोठ्ठं, देखणं, श्रीमंती घर – अगदी वळणदार भारदस्त जिना असलेलं – पण त्यात नसलेला मोकळाढाकळा दिलखुलास कोपरा त्या पाहुण्या मुलीला गच्चीनं देऊ केला होता. त्या गच्चीनं ते घर खरं घर केलं. अगदी तस्संच ‘गोलमाल’मधलं त्या बहीण-भावंडांचं अटकर घर. ते आधुनिक तर आहेच, पण जणू त्या दोन भावंडांभोवती, त्यांच्यापुरतं, त्यांच्यासाठी रचल्यासारखं लहानसं आहे. त्या घरात बाहेरून आलेल्या माणसासमोर ज्या थापेबाज्या कराव्या लागतात, त्या करताना त्यांची तारांबळ उडते यात काय नवल! नाही म्हणायला दीनाबाई पाठक आपल्या रुंद बुडासकट शिरू शकतील अशी लांबरुंद खिडकी मात्र त्याला आहे. ते एक नशीबच! त्या मानानं ‘बावर्ची’तल्या घराचा कळकट-जुनाटपणा आणि थोडा एकमेकांशी लावून न घेण्याचा भाव उघडच कळतो. त्या घराला चौक आहे खरा. पण राजेश खन्नानं येऊन एकेकाला त्या चौकात गाण्याबजावण्यासाठी पाचारण करेपर्यंत तो उदासवाणाच आहे. मुखर्जींच्या सगळ्या सिनेमांमधल्या घरांच्या खिडक्या होता होईतो बिनगजाच्या, मोठाल्या, मोकळ्या असतात. उजेडही नैसर्गिक आणि लख्ख. ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’मधल्यासारखी कातरवेळ क्वचितच कधीतरी.



हेच गुलजारांच्या सिनेमांतून पाहा! इतका लख्ख, मोकळा प्रकाश चटकन सापडणं कठीण. ‘खाली हाथ शाम आयी है’ वा ‘बिती ना बिताई रैना’मधला प्रकाश तर बोलून-चालून संध्याकाळचा, उदास करणाराच. पण एरवीही छाया-प्रकाशाचे तुकडे एकमेकांशी लपंडाव खेळत असावेत, असा प्रकाश गुलजारच्या सिनेमांमधून भेटतो. ‘छै छप्पा छै’सारख्या गाण्यात घटकेत पावसाळी मोतेरी उजेड, तर पुढच्याच कडव्यात झोपाळ्यात झुलणारी रात्र. गुलजारच्या बाबतीत रात्रच खरी! कधी ती ‘इतना लंबा कश लो यारों, दम निकल जायें...’ म्हणताना दिसते, कधी ‘मेरा कुछ सामान...’ म्हणत हळवी होताना. कधी ‘इस बार अमावस लंबी चली’ म्हणते, तर कधी ‘पानी पानी रे...’ म्हणताना विषण्ण होते. ‘माचिस’मधले तर लख्ख उजेडातले प्रसंगही ‘एक छोटासा लम्हा है, जो खत्म नही होता, मैं लाख जलाता हूं, वो भस्म नहीं होता....’ अशा उदास सुरांनी कळंजून जाताना दिसतात. मग अंधारातले प्रसंग तर...
प्रकाशावर अशीच एखाद्या जादूगारासारखी हुकूमत असलेली जाणवते ती प्रियदर्शन आणि अर्थात मणिरत्नम या दोघांच्याही सिनेमांत.
‘विरासत’मधला तो चौसोपी वाडा, झुलता झोपाळा, वापरून सुळसुळीत झालेल्या वजनदार आरामखुर्च्या नि जिन्या-माड्यांचे कठडे नि दारांच्या चौकटी, बुद्धिबळाच्या पटाची आठवण करून देणार्या देखण्या काळ्या-पांढर्या फरश्या – नि अर्थात त्यावर ‘सही? गलत!’चा खेळ खेळून बिचार्या अनिल कपूरला कासावीस करणार्या त्याच्या पुतण्या. त्या वाड्यात शिरताना तब्बूच्या पात्राला – गेहनाला - किती दडपल्यागत वाटलं असेल, ते मनावर अचूक ठसवतो तो वाडा. तिथल्या ओसरीत ठणठणत गेलेलं पितळी फुलपात्र नि माडीच्या पायरीवरून खाली वाकून बघत नवर्यानं दबक्या आवाजात मारलेली पण दमदार, आवाहक हाक गेहनाचा श्वास फुलवते, यात नवल नाही. तोच त्या नायकाच्या चुलतघराचा वाडा पाहा – चौसोपी नि भव्य तोही आहे. पण तो दाखवताना वापरलेल्या कोनांतून त्याचं हिंपुटेपण प्रियदर्शननं अचूक टिपलं आहे.
मणिरत्नमच्या सिनेमातला प्रकाश म्हणजे... ‘बॉम्बे’मधलं त्या दोघांचं ते पहिलंवहिलं भाड्याचं घर आठवतं? काय प्रकाशाचे विभ्रम आहेत त्यात, माय गॉड! कधीही पूर्ण अंधार न होऊ देणारी, कुठल्या ना कुठल्या प्रकाशाची तिरीप खेळवत ठेवणारी, सततची सोबत देऊ करणारी चाळकरी मुंबई त्यात आहे. त्यात गर्दी आहे, पण घुसमट नाही, सोबत आहे.

संजय लीला भन्साळीच्या सिनेमात एक लटकं, देखावेदार, नाटकी भव्यपण असतं. मग त्या वेश्यांच्या वस्त्या असोत, बंगाली जमीनदाराचा वाडा असो, ख्रिश्चन घर असो, वा मारवाडी पद्धतीचं गच्च्या-पोटगच्च्या असलेलं घर. ‘हे वास्तव नाही, पण मला त्याची फिकीर नाही. हेच माझ्या गोष्टीचं वास्तव आहे, हवं तर घ्या नाहीतर फुटा.’ अशी अदृश्य पाटी लावल्याचा भास त्या नेपथ्यात होतो. ‘हम दिल दे चुके सनम’मधली ती लायब्ररी हे याचं उत्तम उदाहरण. किती त्या लायब्ररीनं उपरं, चिकटवलेलं असावं! त्या लायब्ररीचा काही वापर होत असता, तर एका निसटत्या चुंबनानंतर “कुछ हो गया तो?” असा धास्तावला प्रश्न विचारणारी नायिका त्यात कशाला असती! दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक प्रकाशाचं भन्साळींना असलेलं वावडं. सगळीकडे नाट्यगृहीय प्रकाशाच्या आवृत्त्या. भव्यदिव्य, पण अनेकदा बेगडी.
कृत्रिम प्रकाश आणि इनडोअर जागांमध्ये प्राण फुंकणं बघायचं असेल तर ते दिवाकर बॅनर्जीच्या ‘खोसला का घोसला’त वा शरद कटारियाच्या ‘दम लगा के हैशा’मध्ये बघावं. काय त्या घरांचा जिवंतपणा! प्रॉपर्टीचे बारकावे, प्रकाशाचा अस्सलपणा, घरात साचत गेलेल्या बारीक-बारीक संसारी वस्तूंचे तपशील नि नवेजुनेपणा... अहाहा! तेच ‘
बधाई
हो’मध्येचं. त्या घरातलं नीना गुप्ताचं लहानसं स्वैपाकघर, रेल्वे क्वार्टर्समधल्या घरांची लहानशी बाल्कनी, बसायच्या खोलीत मांडलेली म्हातार्या आईची खाट, त्यातच धाकट्या भावासाठी 'काढलेला' कोपरा… जुना, साचून संपृक्त झालेला, जिवंत, पण म्हातारा संसार. तिथल्या हवेलाही अमृतांजनचा वास येईल, पण पहिला पाऊस पडताक्षणी न मागता आयती भजी आणि चहा हातात मिळेल, असं वाटतं.

‘अंधाधुन’मधलं तब्बूचं श्रीमंती घर तिच्या पात्रासारखंच देखणं, उन्मादक नि सूक्ष्म माजोरडं आहे.
‘गुलाबो सिताबो’मधला वाडा मूर्तिमंत अमिताभच्या पात्रासारखाच. पडझड झालेला, पण निर्लज्जपणे जगत राहण्याची ट्रिक कळलेला.
तेच ‘पिकू’तलं कोलकात्यातलं घर नि दिल्लीतला बंगला – दोन्हींला एक श्रीमंती, क्लासी अकड आहेच, पण घरगुतीपणाही आहे.
या सगळ्याच्या मानानं यश चोप्रांच्या नि करण जोहरच्या सिनेमांमधली घरं - नि प्रकाशही - अगदीच भाड्याचा, उपरा, तकलादू श्रीमंत वाटतो. त्याला खरेपणा कसा तो नसतो. मग ती घरं कितीही निगुतीनं का सजवलेली असेनात. ‘कट्’ म्हणताक्षणी कुणीतरी येऊन भिंती गुंडाळून नेईल असं वाटायला लावणारा बेगडीपणा.
असंच सिनेमात दिसणार्या शहरांचंही कधीतरी करून बघायला पाहिजे. मजेमजेशीर निष्कर्ष हाती येतील.
‘तलाश’मधली रात्रीची, बेगडी, चमकती, बकाल मुंबई आणि ‘इज लव्ह इनफ सर’मधली मुंबई...
‘कहानी’तलं कोलकाता आणि ‘पिकू’तलं कोलकाता…
पिवळ्या दिव्यांनी आणि धुक्यानं माखलेले सेमीशहरांमधले अपरात्रीचे शांत सुनसान रस्ते - 'दम लगा के'मधले निराळे आणि 'अलीगढ'मधले निराळे...
नेपथ्य-प्रकाशाचा खरेपणा, देखणेपणा, जिवंतपणा, भव्यपणा आणि या सगळ्यांची निरनिराळी पर्म्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स निरखताना गोष्टीचा स्वभावही उजळत जाईल.

इतक्यात वाचलेली पुस्तकं - निर्मला पाटील यांचे आत्मकथन

मराठी – त्यातही लेखिकांच्या कादंबर्यांवर तुच्छतेच्या सुरात एक लेबल लावण्याची प्रथा आहे. ‘नातेसंबंधांवरच्या कादंबर्या’. चौकटीतून सुटू पाहणारी एक स्त्री आणि तिच्या चौकटीतून बाहेर पडण्याच्या प्रवासाची गोष्ट असं त्यांचं स्वरूप असतं. शांताबाईंची नवीन कादंबरी त्याच ट्रोपचा वापर करून बघता बघता त्यापल्याड निसटून जाते, चौकटीला नि लेबलाला खिजवत राहते.
‘निर्मला पाटील यांचे आत्मकथन’ या नावातच तिचा घाट स्पष्ट आहे. महार-कोल्हाटी समाजातली एक मुलगी. धीट. पाऊल पुढे टाकण्याची आस असलेली. वैरागसारख्या खेड्यापासून ते मुंबई व्हाया लंडन इतकाच तिचा प्रवास नाही. कोल्हाटणीची लेक, बाळगी उर्फ गव्हर्नेस, पुस्तकांच्या दुकानातली कारकून, टायपिस्ट आणि इंग्रजीची शिक्षिका असाही आहे. आणि गावातल्या पुरुषांच्या नजरेपासून स्वतःला वाचवण्यासाठी धडपडणारी अनाथ कोल्हाटीण, कुणा कुणब्याच्या मितभाषी पोराशी लैंगिक आकर्षणाच्या काठावरून अलगद नितळ जिवलग मैत्री करणारी मैत्रीण, लग्नाची गरज न पडता सहजीवनाचा आनंद आसुसून अनुभवणारी स्वतंत्र स्त्री, आणि लैंगिकतेमधलं वैविध्य समजून घेऊन त्यापल्याड माणसं जोडणारी वृद्धा असाही आहे. हिंगण्याची कर्व्यांची संस्था आणि विधवाविवाह, नेहरूंनी भारतात आणवलेलं यंत्रयुग, आंबेडकरांनी दिलेला आत्मविश्वास, स्त्रीवादाची चळवळ आणि सौंदर्यस्पर्धा, वंशवाद आणि जातिसंस्था, मार्गारेट थॅचर… असाही आहे; आणि माणसाची नियती आखून-बांधून घालू बघणारी खेडी ते अनेकानेक शक्यतांना जन्म देणारी महाशहरं, असाही.
किती प्रकारचा हा प्रवास... वाटेवरचे ठळक, रंगीत, त्रिमित, जिवंत माणसांचे थांबे. सोबतही. वाट्टेल त्या प्रसंगाला साजेशी कूट आणि तरीही रंजक गोष्ट पोतडीतून काढून देणारी कणखर आजी; जीव लावणारी लहान पोरं; सुधारकी विचारांचं जोशी दाम्पत्य, नातू कुटुंब, गजेंद्रगडकर कुटुंब; सोबतीला आसुसलेल्या सुहासिनी-डॉरिस-केतकीसारख्या नि चित्रासारख्या मैत्रिणी; नवं जग नव्या नजरेनं पाहणारे किसनासारखे, शशीसारखे नि फिलीपसारखे पुरुष… एकेका फटकार्यासरशी जिवंत होणारी अनेक अस्सल पात्रं या गोष्टीत आहेत. कधीकधी तर नावं लक्ष्यात ठेवताना दमून जायला व्हावं नि पान पलटून खातरजमा करून घ्यावी लागावी, इतकी! हाच म्हटला तर किंचित दोष.
पण या कादंबरीची नायिका निर्मला वाटली, तरी एकटी ती नायिका नव्हे. पार दुसर्या महायुद्धाच्या नंतरपासून खुलं होत गेलेलं – विस्तारत गेलेलं जग, त्यात निरनिराळे फटके खात-मोडून पडत-पुन्हा उठून उभी राहत-संधीचा फायदा घेत-स्वतःला नि स्वतःखेरीज इतरांनाही मदतीचा हात देणारी माणसं, त्यांच्या प्रतिसादातून आकाराला येत गेलेल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक व्यवस्था आणि प्रक्रिया... ही गेल्या जवळजवळ शतकभरातली उलथापालथ या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेसं प्रत्ययाला येतं. मग आपण कुठल्याही समाजात, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही ठिपक्यावर, कुठल्याही प्रमाण-अप्रमाण भाषेत, कोणत्याही लिंगासह जन्माला आलो असलो, तरी या धपापत्या-जिवंत विश्वाचा एक अपरिहार्य भाग आहोत; आपण नि हे विश्व दोन्ही एकमेकांना घडवतो आहोत असा आत्मविश्वास वाटू लागतो. निर्मलाची आजी म्हणते, तसं - चांगली माणसं ओळखायला शिकायचं नि त्यांचा हात घट्ट धरून ठेवायचा, बस.
~
निर्मला पाटील यांचे आत्मकथन
शांता गोखले
मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती २०२२
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
~
मुखपृष्ठाबद्दल लिहायची सवय नाही, ती लावून घ्यायला हवी, म्हणून हा ता. क. : आपण म्हणजे फक्त आपण नसतो. आपल्यात आपले आई-बाप, आजी-आजा, पणजी-पणजा, त्यांना घडवणारा समाज... असं सगळंच असतं. हा आशय अचूक जागा करणारं मुखपृष्ठ आहे. देखणं आणि अर्थपूर्ण.
आत्ता गोष्ट मनात घोळत असताना मागाहून लक्ष्यात आलेला तपशील. एका गोष्टीतून गोष्ट, मग तिच्यातून गोष्ट, मग त्या गोष्टीच्या कंसात आणखी एका गोष्टीचा कंस, मग तसेच उलट्या क्रमानं हे गोष्टींचे कंस आतून बाहेर मिटवत येणं... असा या गोष्टीचा घाट आहे. हितोपदेशातल्या गोष्टींसारखा. वा अरेबियन नाइट्ससरखा. त्यालाही हे मुखपृष्ठ किती साजेसं आहे, वा!

गोष्ट

रात्रींमागून रात्री नजरेत न उतरणारी,
पायरीवर ओठंगून राहिलेली नीज,
काही केल्या घशाखाली न उतरणारा,
गोड न लागणारा घास,
आणि सगळीभर व्यापून उरलेल्या,
लांबलचक विस्तीर्ण करकरीत तिन्ही सांजा...
सगळ्यावर अक्सीर इलाज असतो
एकाच एक, सुरस आणि चमत्कारिक गोष्टीचा.
जादू असते तिच्यात,
आहे की नाही वाटायला लावणारी,
बघता बघता अत्तरासारखी उडून जाणारी.
गोष्ट ऐकून झाल्यावर,
पोटभर जेवून दोस्तांच्या कोंडाळ्यात एकमेकांच्या अंगावर तंगड्या टाकून बसल्यासारखं उबदार वाटतं,
पोटात भूक असतानाही.
गोष्ट सापडायला हवीय.
बस.

Wednesday, 11 January 2023

निरुपाय

निरुपाय असतो अनेकदा. 
निरुपाय या शब्दामधला किंचित निर्विकार अलिप्तपणा ओलांडून जाणारी हतबलता. 
हताशाही. 
कुणाकुणाला अश्या वेळी परमेश्वराचा दगड लाभतो, 
कुणा भाग्यवंताला अजून काही दिलासे. 
पण
कुणाचाही-कसलाही आधार नाही, 
असू शकत नाही, 
टेकता येत नाही, 
येणं शक्यतेतलंच नाही - 
असं मानणार्‍याला मात्र -
आयुष्याचा आधार वाटतो. 
कसलीही केविलवाणी झटापट न करता
मागचा आणि पुढचा रस्ता अंधाराला गिळू देत, 
एकेका पावलापुरताच प्रकाश स्वीकारत,
एकापुढे एक पाऊल टाकत, 
किडूकमिडूक-घासकुटका-चूकभूल-मूठपसा-अंगणआभाळ...
आपलंसं करत जगलेलं आयुष्य. 
आज ना उद्या ते पोटाशी धरेल, 
धरेलच, 
अशा विश्वासाला पाणी घालत 
वाट चालत राहतात लोक. 
विश्वास वाढत राहतो त्याच्या-त्याच्या नशिबानं, 
त्याच्या-त्याच्या गतीनं.
निरुपायच असतो अनेकदा.