Wednesday 12 April 2023

इतक्यात वाचलेली पुस्तकं - निर्मला पाटील यांचे आत्मकथन

मराठी – त्यातही लेखिकांच्या कादंबर्यांवर तुच्छतेच्या सुरात एक लेबल लावण्याची प्रथा आहे. ‘नातेसंबंधांवरच्या कादंबर्या’. चौकटीतून सुटू पाहणारी एक स्त्री आणि तिच्या चौकटीतून बाहेर पडण्याच्या प्रवासाची गोष्ट असं त्यांचं स्वरूप असतं. शांताबाईंची नवीन कादंबरी त्याच ट्रोपचा वापर करून बघता बघता त्यापल्याड निसटून जाते, चौकटीला नि लेबलाला खिजवत राहते.
‘निर्मला पाटील यांचे आत्मकथन’ या नावातच तिचा घाट स्पष्ट आहे. महार-कोल्हाटी समाजातली एक मुलगी. धीट. पाऊल पुढे टाकण्याची आस असलेली. वैरागसारख्या खेड्यापासून ते मुंबई व्हाया लंडन इतकाच तिचा प्रवास नाही. कोल्हाटणीची लेक, बाळगी उर्फ गव्हर्नेस, पुस्तकांच्या दुकानातली कारकून, टायपिस्ट आणि इंग्रजीची शिक्षिका असाही आहे. आणि गावातल्या पुरुषांच्या नजरेपासून स्वतःला वाचवण्यासाठी धडपडणारी अनाथ कोल्हाटीण, कुणा कुणब्याच्या मितभाषी पोराशी लैंगिक आकर्षणाच्या काठावरून अलगद नितळ जिवलग मैत्री करणारी मैत्रीण, लग्नाची गरज न पडता सहजीवनाचा आनंद आसुसून अनुभवणारी स्वतंत्र स्त्री, आणि लैंगिकतेमधलं वैविध्य समजून घेऊन त्यापल्याड माणसं जोडणारी वृद्धा असाही आहे. हिंगण्याची कर्व्यांची संस्था आणि विधवाविवाह, नेहरूंनी भारतात आणवलेलं यंत्रयुग, आंबेडकरांनी दिलेला आत्मविश्वास, स्त्रीवादाची चळवळ आणि सौंदर्यस्पर्धा, वंशवाद आणि जातिसंस्था, मार्गारेट थॅचर… असाही आहे; आणि माणसाची नियती आखून-बांधून घालू बघणारी खेडी ते अनेकानेक शक्यतांना जन्म देणारी महाशहरं, असाही.
किती प्रकारचा हा प्रवास... वाटेवरचे ठळक, रंगीत, त्रिमित, जिवंत माणसांचे थांबे. सोबतही. वाट्टेल त्या प्रसंगाला साजेशी कूट आणि तरीही रंजक गोष्ट पोतडीतून काढून देणारी कणखर आजी; जीव लावणारी लहान पोरं; सुधारकी विचारांचं जोशी दाम्पत्य, नातू कुटुंब, गजेंद्रगडकर कुटुंब; सोबतीला आसुसलेल्या सुहासिनी-डॉरिस-केतकीसारख्या नि चित्रासारख्या मैत्रिणी; नवं जग नव्या नजरेनं पाहणारे किसनासारखे, शशीसारखे नि फिलीपसारखे पुरुष… एकेका फटकार्यासरशी जिवंत होणारी अनेक अस्सल पात्रं या गोष्टीत आहेत. कधीकधी तर नावं लक्ष्यात ठेवताना दमून जायला व्हावं नि पान पलटून खातरजमा करून घ्यावी लागावी, इतकी! हाच म्हटला तर किंचित दोष.
पण या कादंबरीची नायिका निर्मला वाटली, तरी एकटी ती नायिका नव्हे. पार दुसर्या महायुद्धाच्या नंतरपासून खुलं होत गेलेलं – विस्तारत गेलेलं जग, त्यात निरनिराळे फटके खात-मोडून पडत-पुन्हा उठून उभी राहत-संधीचा फायदा घेत-स्वतःला नि स्वतःखेरीज इतरांनाही मदतीचा हात देणारी माणसं, त्यांच्या प्रतिसादातून आकाराला येत गेलेल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक व्यवस्था आणि प्रक्रिया... ही गेल्या जवळजवळ शतकभरातली उलथापालथ या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेसं प्रत्ययाला येतं. मग आपण कुठल्याही समाजात, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही ठिपक्यावर, कुठल्याही प्रमाण-अप्रमाण भाषेत, कोणत्याही लिंगासह जन्माला आलो असलो, तरी या धपापत्या-जिवंत विश्वाचा एक अपरिहार्य भाग आहोत; आपण नि हे विश्व दोन्ही एकमेकांना घडवतो आहोत असा आत्मविश्वास वाटू लागतो. निर्मलाची आजी म्हणते, तसं - चांगली माणसं ओळखायला शिकायचं नि त्यांचा हात घट्ट धरून ठेवायचा, बस.
~
निर्मला पाटील यांचे आत्मकथन
शांता गोखले
मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती २०२२
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
~
मुखपृष्ठाबद्दल लिहायची सवय नाही, ती लावून घ्यायला हवी, म्हणून हा ता. क. : आपण म्हणजे फक्त आपण नसतो. आपल्यात आपले आई-बाप, आजी-आजा, पणजी-पणजा, त्यांना घडवणारा समाज... असं सगळंच असतं. हा आशय अचूक जागा करणारं मुखपृष्ठ आहे. देखणं आणि अर्थपूर्ण.
आत्ता गोष्ट मनात घोळत असताना मागाहून लक्ष्यात आलेला तपशील. एका गोष्टीतून गोष्ट, मग तिच्यातून गोष्ट, मग त्या गोष्टीच्या कंसात आणखी एका गोष्टीचा कंस, मग तसेच उलट्या क्रमानं हे गोष्टींचे कंस आतून बाहेर मिटवत येणं... असा या गोष्टीचा घाट आहे. हितोपदेशातल्या गोष्टींसारखा. वा अरेबियन नाइट्ससरखा. त्यालाही हे मुखपृष्ठ किती साजेसं आहे, वा!

No comments:

Post a Comment