(भाग ०२)
०३
तिला शिक्षणाची फार हौस. मुलाबाळांना आणि मग नातवंडांना चांगल्या शाळांतून शिकता यावं म्हणून तिनं पुढे नाना खटपटी केल्या. पण तिला स्वतःला मात्र चौथीपेक्षा जास्त शिकायला मिळालं नाही. घरातली सगळी कामं करून, आजीच्या सगळ्या अटी पुरतावून मगच शाळेत जाता यायचं. पण चौथी पास झाली आणि गावातली शाळाच संपली. मग वडलांना शेतात मदत करणं, गुरांमागे जाणं, घरकाम करणं, भावंडांना सांभाळणं.. तिचा तिच्या वडलांवर फार जीव होता. वडील गुरांमागे रानात गेले की काळजीनं तिचा जीव राहत नसे. तीही त्यांच्यामागून रानात जायची! घरी आजी म्हातारी आणि भावंडं लहान, आई नाही. करायला कोण, म्हणून मग तिनं तिचं लग्नही त्या काळाच्या हिशेबात जमेल तितकं लांबवलं आणि एकोणिसाव्या वर्षी बोहल्यावर चढली.
तिला लग्नात मुलाकडच्यांनी दागिन्यांनी मढवलं होतं, शालूही नेसवला होता. पण नंतर कळलं, की मुलाकडे स्वतःचं सत्तेचं काहीच नाही. शालू थोरल्या नणंदेचा, तसे दागिनेही तिचेच. “लग्नात काय घातलंत मला? दोन पातळं नि कुडं!” असं ती आजोबांना मधूनमधून चिडवायची!
लग्न होऊन आल्यावर तिनं आजोबांच्या संसाराला आकार-उकार आणला.
सात-आठ बाळंतपणं आणि पाच मुलं. स्वैपाकपाणी. सोवळंओवळं. सणवार. व्रतवैकल्यं. पैपाहुणा-आला-गेला. गडीमाणसं. दुकानची उस्तवार आणि हिशेबठिशेब.
तिच्या स्वैपाकाला मोलकरणीनं भरलेलं पाणी चालायचं नाही. त्यामुळे ते सोवळ्यात स्वतः भरायचं. आणि मग स्वैपाक. गावात गिरणी पुष्कळ नंतर आली. तोवर जात्यावर दळलेल्या पिठाच्या भाकर्या – तांदूळ, ज्वारी, नाहीतर नाचणी. कोकणातल्या आडगावी तेव्हा सगळ्या भाज्याबिज्या सहजी मिळत नसत. परसदारी घोळ, अळू, चाकवत, पोकळा असायचा. भेंडी, काकडी, पडवळ, घोसाळी, कारली या पावसाळी भाज्या. तोंडलीचा मांडव बारा महिन्यांचा. कधी कोबी स्वस्त मिळाला तर तो पातळ चिरून वाळवून ठेवायचा, कधी चाकवत वाळवून ठेवायचा. वर्षभराची कडधान्यं तीनतीन उन्हं देऊन, कडू तेलाचा हात देऊन साठवून ठेवायची. घरी कांडपीण बोलावून डाळी घरी सडून घ्यायच्या, तसेच पोहेही घरी कांडलेले. फणसाच्या आठिळा माती लावून, वाळवून ठेवायच्या. वर्षभराची लोणची आणि मिरच्या. पापड. चिकवड्या. फेण्या.
तिला देवाधर्माचीही चिकार हौस होती. चतुर्मासात लक्ष वाहण्याचे तिचे नेम असायचे आणि चार महिने ठरलेला प्रसाद. बकुळीचा, प्राजक्तीचा, तुळशीचा.. असे लक्ष आणि प्रसादाला स्वतः काढलेल्या गव्हल्यांची खीर. सोळा सोमवारासारखी व्रतं. तिनं एकूण तीनदा सोळा सोमवार केले. या सगळ्याची उद्यापनं आणि स्तोत्रं. हौस मोठी, पण कर्मठपणा मात्र नाही. देवासमोर बसलेली असताना पारोसं नातवंड जाऊन गळ्यात पडलं तर तिला विटाळ होत नसे!
घरी कायम पै-पाहुणा असायचा. दुकानात पहिली काही वर्षं सोळा गावचं रेशनिंग असे. त्यामुळे दुकानात सततची वर्दळ असायची. गावात कामासाठी येणारे कार्या माणसांना जेवायला गावात हॉटेलबिटेल नव्हतं. मग सरकारी नोकर, डॉक्टर, तलाठी, मास्तर... यांपैकी कुणी ना कुणी जेवायला असायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत कायम खेडच्या नणंदांची नातवंडं, तिच्या बहिणी-भावांची मुलं... असं करत वीसेक मुलंबाळं असायची. तिच्या भावांच्या संसारावर तिचं लक्ष असे. टीबी झाला आणि रोज इंजेक्षन लागतं म्हणून भाचीलाच दोन महिने ठेवून घे, कधी भावजयींचं बाळतंपण कर. कधी म्हातार्या वडलांचं माहेरी म्हणावं तसं आस्थेनं-जपणुकीनं होत नाही म्हणून त्यांना विश्रांतीला दोन-दोन महिने आण. कधी थोरल्या बहिणीला थोडा श्वास टाकता यावा म्हणून तिची गतिमंद तरुण मुलगी सांभाळायला महिनाभर ठेव. असं कायम चालायचं. गावातल्या गरीब घरांत कुणी आजारी पडलं, तर मामींकडे ‘बामनाकडचं’ वाढून घ्यायला कुणीतरी येत असे. मग त्याला केळीच्या पानात मऊभात, लोणचं आणि लोट्यात ताक वाढून द्यायचं. दुकानात येणारे आडगावचे लोक अनेकदा वस्तीला राहायचे नि पहाटे उठून पुढे चालू लागायचे. त्यांनी भाकर बांधून आणलेली असायची, पण त्यांना कांदा-लोणचं वाढून द्यायचं. घरच्यासारखी दुकानच्या मालाचीही उन्हाळी वाळवणं असायची. गडीमाणसं असली, तरी देखरेख असेच. शंभरेक पत्र्याचे डबे कस्तर करून – म्हणजे सीलबंद करून – माडीवर ठेवलेले असायचे. त्याकरता घरी आलेला कल्हईवाला आठेक दिवस राहायचा. तो दुकानचं काम करी. त्याच्या बरोबरीनं काम करून, कल्हई करायला शिकून घेऊन, थोरल्या लेकीला हाताशी घेऊन घरातल्या भांड्यांना स्वतःच कल्हई करणं. चिवडे, लाडू, पेढे, लसणाची चटणी... असं करून दुकानात विकायला ठेवणं... एक ना दोन.
हळूहळू पै-पैसा गाठीशी बांधत तिनं सोनं घेतलं. कमी सोन्यात होतात म्हणून तिनं जाळीच्या पाटल्या केल्या होत्या, म्हणे. नि इतकी हौस असून, शिवणयंत्र घ्यायला पैसे कमी पडतात, म्हणून तिनं बांगड्या विकून टाकल्या. ‘पफ’ कंपनीचं शिवणयंत्र घेतलं.
मला तिच्या या निर्णयाचं फारच नवल वाटतं. ही ५७ सालची कोकणातल्या एका डोंगरी खेड्यातली गोष्ट. निर्णय घेणारी बाई चौथी पास. नवरा सातवी पास. पण दागिने महत्त्वाचे नाहीत, शिवणयंत्र ही गुंतवणूक जास्त महत्त्वाची, दीर्घकालीन फायद्याची आहे, हे तिला कसं सुचलं असेल? यंत्र चालवायला जमलं नाही नि ते तसंच पडून राहिलं तर, अशी भीती वाटली नसेल का? आजोबांनी आढेवेढे घेतले नसतील? तिनं ते त्यांच्या गळी कसं उतरवलं असेल? समजत नाही...
पण तिनं शिवणयंत्र घेतलं आणि चोळ्या–पोलकी, झबली-टोपडी, आणि कोपर्या असं शिवणाचं कामही ती घ्यायला लागली. वेळेला ती दिवसात चौदा-चौदा चोळ्या शिवत असे. घरातलं काम उरकून.
इतकं पुरलं नाही, म्हणून ही चौथी पास बाई तिच्या पाचही मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवून असायची. थोरल्या मुलाला गणितात फार गम्य नव्हतं, तर पार मॅट्रिकपर्यंत त्याच्या यत्तेचं अंकगणित स्वतः त्याला शिकवायची. तिची मुलं शिकली ते कुठे रत्नागिरीच्या आत्याकडे दोन वर्षं राहा, कुठे भांडूपच्या मावशीकडे दोन वर्षं राहा... असं करून.
थोरल्या लेकीला अठराव्या वर्षी मुंबईत नोकरी मिळताक्षणी तिनं पाच मुलांना ठाण्यात स्वतंत्र बिर्हाड थाटून दिलं. धाकटी लेक शिवणाच्या वर्गाला जायला लागली, थोरला लेक रिक्षा चालवू लागला, तर खालची दोघं ठाण्याच्या शाळेत शिकायला लागली. पाचच जण राहायचे, सगळ्यांत मोठी मुलगी एकोणीस वर्षांची, अविवाहित. हाही त्या काळातला तसा धाडसीच निर्णय. पण तो तिनं घेतला. जागा बर्या वस्तीत, सोयीच्या ठिकाणी, स्वच्छ असायला हवी, तर पागडी मोजावी लागणार होती.
त्याकरता स्वतःच्या बांगड्या तिनं दुसर्यांदा विकल्या.
क्रमशः
No comments:
Post a Comment