Wednesday, 5 January 2022

दिसामाजी काहीतरी

वाचनात आलेल्या पुस्तकांविषयीची ही टिपणं. फेसबुकावर विखरून जातात. म्हणून इथे एकत्रित टाचून ठेवत आहे. 

पिवळा पिवळा पाचोळा


शहरी वाचकाला पूर्णतः अनभिज्ञ असलेलं, तसंच ग्रामीण साहित्याच्या घासून गुळगुळीत झालेल्या साच्यांपासून फटकून असलेलं हे जग.
ठसठशीत रंगांनी रेखलेल्या त्यातल्या प्रतिमा मनावर स्पष्टपणे उमटून राहतात. पांढर्या छपराचे पंख मिटून बसलेलं पाखरासारखं घर, काळ्या सूर्यफूलबियांनी भरून गेलेले पांढरेशुभ्र दात, मिरची-भाकरीचं लालभडक फडकं, मधाची पिवळी धार, मासे धुऊन सोनेरी खवल्यांनी भरून गेलेला आणि विहिरीच्या काठावर पहुडलेल्या प्रचंड देवमाशासारखा दिसणारा खडक, मोठमोठ्या नांग्यांचे काळेभोर मुंगळे, मोठ्याआईचा हात फिरल्यासारख्या - ओल्या हळदीनं माखलेल्या आंब्यांच्या खापा, रक्तानं भरलेल्या शेळीच्या मांड्या, शेणानं सारवलेलं हिरवंगार खळं, काळ्या करवंदासारखं तोंड असलेला मछ्या, बाभळीच्या फांदीवर छाती फुगवून घुमणारा तांबडा होला... डोळ्यांसमोरच्या प्रतिमांचे अर्थ लागत नसतानाही निव्वळ त्यांतल्या रंगांच्या ताजव्यानं बघणार्याला बांधून घालावं, तसं अनेक शब्दांचे अर्थ अचूक न कळूनही निव्वळ संदर्भानं हे अर्थ लावून घेत आपण प्रतिमा पीत राहतो.
एका किशोरवयीन नायकाच्या नजरेतून दिसणारं हे विश्व आहे. त्यात इतका अफाट, सहज, आणि निष्पाप क्रूरपणा आहे, की त्यानं दचकायला होतं. शहरी जपणुकीला पूर्णतः परग्रहीय वाटेल अशा सहजतेनं या कथांमधली मुलं निसर्गाशी झट्या घेताना दिसतात. त्यात अकल्पनीय दारिद्र्य आणि सरकारी अनास्थेचा वाटा आहे, तसाच निसर्गाशी एकरूप झालेल्या आणि तसं होण्यावाचून दुसरा पर्यायही नसलेल्या आदिवासी आयुष्याचाही आहे. जखमा, पडझड, दंश, त्यातून झालेली विषबाधा, जमतील ते प्राणी पोटाकरता आणि मजेकरता मारणं, त्याची भीती, आणि भीती विसरून पुन्हा पुन्हा या अनुभवांना अपरिहार्यतेनं भिडणं येतं. भूक आणि त्या भुकेवर मात करण्यासाठी शोधलेली उत्तरं तशीच. घोरपडीच्या मटणानं घरभर येणारा वईस वास आणि त्या मटणाच्या अनोख्या चवीच्या आशेनं घोरपड मारण्यासाठी केलेला खटाटोप, मधात मेलेली माशी दाताखाली आल्यावर तोंडभर पसरलेली विचित्र चव, शेळीच्या दुधात केलेला भाकरीचा काला, शेराचा चीक डोळ्यांत गेल्यावर त्यावर औषध म्हणून डोळ्यांत पिळलेली शेळीच्या आचळाची कोमट धार, दातात अडकलेल्या आंब्याच्या दशा, बाभळीच्या फांदीनं झोडपलेली निवडुंगाची लालभडक बोंडं आणि त्यांतल्या कुसळांनी माखलेली लाल जीभ, भाकरीसारखी खाल्लेली मोहोळाची सोनेरी पोळी... असं चिकार कायकाय. क्वचित एखाद्दुसरा प्रसंग सोडला, तर किशोरवयीन नायकाचं मन या सगळ्यातल्या अन्यायाकडे उघडपणे लक्ष्य वेधत नाही. तो निर्विकार सहजतेनं त्याच्या नजरेतून दिसणारं जग चितारत जातो. अनुभव टिपणं आणि त्यांतून अर्थ काढणं वाचकाच्या अंगावर सोडून देऊन.
ही निर्विकार सहजता भल्याभल्यांना साधत नाही. तिचं फार अप्रूप वाटलं. नकळत ‘बनगरवाडी’वाले माडगूळकर मनाशी येत राहिले. हा लेखक आणिक काय लिहील, अशी फार फार उत्सुकता वाटली.
दर कथेपूर्वी जाडसर रंगीत खरखरीत कागदावर येणारी रेखाटनं, पानांचा पिवळसर रंग, मजकुराची मांडणी, मुखपृष्ठ... हे सगळंच मजकुराच्या ऐवजाला साजेसं आहे. पण कुठेकुठे एखाददुसरी चूक सापडते. ‘पपायरस’च्या पुस्तकात अशी चूक शोभत नाही, असं मनाशी येतं हे जेमतेम तिसरं पुस्तक प्रकाशित करणार्या ‘पपायरस’चं कौतुकच म्हणायला हवं.
पिवळा पिवळा पाचोळा
अनिल साबळे
पपायरस प्रकाशन
प्रथमावृत्ती २०२१

~

डाकीण



एखाद्या सामाजिक प्रश्नाबद्दलच्या पुस्तकात असून असून असं काय असणार, अशा आशयाची बनचुकी तुच्छता सुरुवात करताना माझ्या नजरेत या पुस्तकाविषयी होती. पण महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजांमधल्या, स्त्रीला डाकीण ठरवून मारण्याच्या क्रूर प्रथेमागे कोणकोणते प्राचीन आणि अर्वाचीन व्यूह खेळते-नांदते असतात, त्याचं खोलवरचं दर्शन घडवणाऱ्या या पुस्तकानं माझं व्यवस्थित गर्वहरण केलं.
सुरुवात अर्थात आदिवासी समाजांमधल्या प्रश्नानं होते. केसस्टडीज् भेटतात. क्रौर्याचं आणि शोषणाचं आणि अज्ञानाचं दर्शन घडतं. हळूहळू लेखिका आपल्याला परीघावरून खेचून आत-आत नेऊ लागते. मातृसत्ता; तिच्याशी स्त्रीच्या जननक्षम शरीराचा असलेला निकटचा संबंध; शेती आणि भूमी या दोहोंशी असलेलं स्त्रियांचं आदिम नातं; मातृसत्ताक समाजांमधलं वृद्ध पुजारिणींचं स्थान; त्याविरोधात उभं ठाकून जगभरच्या पुरुषांनी सत्ता संपादनासाठी खेळलेला अघोरी खेळ; लज्जागौरी विस्मृतीत जाणं; गणमाता ते गणिका हा प्रवास होणं; स्त्रियांच्या मुक्त लैंगिकतेबद्दल आणि नग्नतेबद्दल भय-घृणा उत्पन्न होणं; सामाजिकराजकीयधार्मिक सत्ता तर सोडाच, पण स्त्रियांच्या शरीरावरचाही त्यांचा हक्क टप्प्याटप्प्यानं आणि संस्कारांच्या मार्फतच हिरावला जाणं; स्त्रियांना 'विच्' ठरवून जिवे मारण्याच्या घटनांचा वा पतीविहीन स्त्रियांना जिवंत जाळून मारण्याच्या प्रथांचा, एक कालखंडच्या कालखंड सुखेनैव नांदणं... आणि आजच्या विज्ञानवर्चस्वाच्या वर्तमानातही या क्रूर इतिहासाच्या पाऊलखुणांचा वापर आपसूख आर्थिक शोषणासाठी करून घेतला जाणं... किती गोष्टींना कवेत घेणारं, स्तिमित करणारं, केंद्रस्थानी असलेला स्त्रीपुरुषांमधला सनातन संघर्ष दाखवणारं हे वर्तुळ...
आणि कसल्याही उपदेशाचा आव न आणता, एकेक पदर हलके हलके, रोखठोक भाषेत उलगडून दाखवत, संस्कृतीच्या उगमापाशी वाचकाला घेऊन जात, या पुस्तकानं घडवलेला हा प्रवास.
वाटेत अनेक चमकदार वळणं लागतात. नक्की किती बळी मिळाले की व्यवस्थेला हा प्रश्न महत्त्वाचा वाटेल ते एकदा नक्की ठरवूनच टाकावं, अशा आशयाचा कडवट उपरोध वाचून थबकायला होतं. स्त्रीच्या संतप्त रूपाविषयीची भीती आजही फेमिनिस्ट स्त्रियांना कर्कशा आणि / वा लेस्बियन आणि / वा वेश्या ठरवण्यातून कशी व्यक्त होते, ते दिसू लागतं. स्त्रीसमूहांवर बंधनं घालणं वा स्त्रीसमूहांच्या कृतींना 'बायकी आणि निर्बुद्ध' ठरवून मोडीत काढणं, त्यांची कुचेष्टा करणं हे नक्की कशातून येतं ते कळतं. स्त्रीविषयीच्या भीतीचं आणि आकर्षणाचं रूप उलगडून दाखवताना नेमाड्यांसारख्या लेखकांमधलं स्त्रीच्या मातृरूपाबद्दलचं अनिवार आकर्षण आणि त्याच वेळी असलेला कडवा स्त्रीद्वेष, तसंच त्याला मिळणारी लोकप्रियता यांमागचं कोडं हलके हलके उलगडू लागतं...
अजून एक द्वंद्व सतत सामोरं येत राहतं हल्ली. जैववैविध्याच्या दृष्टीने देवराई हे एक चपखल उत्तर, पण त्याकडे आधुनिक दृष्टीनं पाहिल्यावर त्यातल्या अंधश्रद्धा खुपू लागतात. स्त्रीसबलीकरणाकडे फूड-इंडस्ट्री एक आयतं सावज म्हणून बघते आणि आधुनिक विश्वातही पुरुषाला स्वयंपाकघराच्या बाहेरच ठेवते, हेही खुपतं. थोडक्यात जुनं आणि नवं यांच्यामधला एकच एक मार्ग निवडता येत नाही, दोन्हींत काहीतरी हानिकारक असतं, हे जाणवतं... या पुस्तकात स्त्रीपुरुष संघर्षाचं, भीतीचं आणि आदराचं, क्रौर्याचं आणि आकर्षणाचं हे दुधारी रूप नेमकेपणानं व्यक्त झालं आहे.
संदर्भांनी संपृक्त असलेलं आणि संस्कृतीचे व्यामिश्र टप्पे उलगडून दाखवत एका शोषणप्रथेविषयी बोलणारं हे पुस्तक दिसतं त्याहून बरंच काही आहे. डाकीणप्रथेसारखंच.

डाकीण - एक अमानवी प्रथा : शोध आणि अन्वयार्थ
संध्या नरे-पवार
लोकवाङ्मयगृह प्रकाशन
प्रथमावृत्ती २०१२

~

क्षितिजापारच्या संस्कृती



मिलिंद बोकिलांबद्दल माझ्या मनात एखाद्या जुन्या ओळखीच्या, पण अलीकडे संपर्क तुटलेल्या माणसाबद्दल असतो तसा भाव आहे. त्यांचे अगदी पहिले दोन कथासंग्रह - 'झेन गार्डन' आणि 'उदकाचिया आर्ती' - मला आवडले होते. तोवर मराठी कथांमध्ये नवा असलेला अवकाश कोणत्याही अभिनिवेशाखेरीज बघून हरखून जायला झालं होतं. पण हळूहळू त्यात एक 'छापाचा गणपती'सदृश प्रकार येत गेला. अतिपरिचयानं नकोशी वाटेलशी शैली तयार झाली, शेवटांचा अचूक आणि तत्काळ अंदाज करता यायला लागला, आणि हा कथाकार दुरावला. पुढे 'शाळा' आणि 'गवत्या' या दोन्ही कादंबऱ्या फारश्या आवडल्या नाहीत. त्यामुळे त्यांचं 'क्षितिजापारच्या संस्कृती' हे प्रवास वर्णनात्मक पुस्तक उचलताना मन कोरं नव्हतं. 'बघू बरं..' असा एक नाकउडवा दृष्टिक्षेप होता.
या पुस्तकात रूढ प्रवासवर्णनं नाहीत. कोणत्या ना कोणत्या अभ्यासाकरता वा चळवळीकरता केलेले बहुतांश प्रवास आहेत. तसेच ते नेहमीपेक्षा थोड्या निराळ्या ठिकाणांचेही आहेत. ऑस्ट्रेलियाचा आदिवासी अंतर्भाग, शांग्री-ला हे तिबेटमधलं साहित्यानं अजरामर करून ठेवलेलं स्थान, कंबोडियामधली हिरवाईनं गिळूनही उरलेली अजस्र मंदिरं, तुर्कस्तानमधली ट्रॉयनगरी, मेक्सिकोमधल्या माया संस्कृतीचे अवशेष, आर्मेनियात केलेली पदयात्रा, आणि तालिबान्यांनी पुन्हा ताब्यात घेण्यापूर्वीचा अफगाणिस्तान. हे नुसतेच प्रवास नाहीत. बहुतांश ठिकाणच्या लयाला गेलेल्या संस्कृतींचे अवशेष निरखणं आहे. आर्मेनियन शेतकरी जोडप्यानं आयत्या वेळी उत्स्फूर्तपणे पदयात्रिकांच्या केलेल्या पाहुणचारामधला हृद्य गोडवा, ऑस्ट्रेलियन आदिवासींमधला तुटक राग आणि त्यामागची राजकीय कारणं, ब्रह्मदेशी दिव्यांच्या उत्सवामधलं दारूकाम आणि आकंठ दारूकाम नि तरीही पूर्णतः सुसंस्कृतपणे ते वागवणारे लोक, अफगाणी पोरींचं इंग्रजी शिकण्याकरता राबणं... असे अनेक चाकोरीपल्याडचे प्रवासी क्षण त्यात सापडतात.
पण दुर्दैवानं या सगळा प्रवासवर्णनांचं एक टेम्प्लेट झालेलं कळतं. जाताना अनामिक हुरहुर वा ओढ वा ध्यास वा शिरशिरी, मग भव्य भग्नावशेष बघणं, त्यामागचा इतिहास उजळून बघणं, तिथल्या माणसांबद्दलच्या कल्पना करणं, त्यांची भारतीय संस्कृतीशी तुलना करणं, सरतेशेवटी अंतर्मुख होणं, काहीतरी 'कळल्यासारखं' होणं... असा सरधोपट साचा गिरवत आपण तीच ती वळणं घेत राहतो.
कंटाळतच पुस्तक संपवलं. एकुणात बोकील अपेक्षाभंग करत नाहीत.
क्षितिजापारच्या संस्कृती
मिलिंद बोकील
समकालीन प्रकाशन
प्रथमावृत्ती : २०२१

~

घाचर घोचर



पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय लक्ष्यवेधक आहे. एखाद्या भिंगातून बघितल्यावर दिसाव्यात तशा, आपल्याला सवयीच्या असलेल्या आकाराहून कित्येक पटींनी मोठ्या दिसणार्या, काळ्या मुंग्या बघून एकदम नकोसेपणाची, भीतीची, किळसेची भावना दाटून येते. त्या मुंग्यांचे पाय पार्श्वभूमीवर अशा प्रकारे चितारलेले आहेत, की त्या आपल्या अंगावर चढल्या असाव्यात आणि त्यामुळे केस हुळहुळत असावेत, असा भास होतो. सतीश भावसारांचं हे मुखपृष्ठ कादंबरीला अतिशय अतिशय चपखल बसतं.
कनिष्ठ मध्यमवर्गीय असं एक पंचकोनी, एकमेकांशी पक्कं बांधलेलं, साधंसुधं, पापभीरू कुटुंब नाइलाजानंच व्यवसायात शिरलेलं. कनिष्ठ मध्यमवर्गातून हळूहळू ते श्रीमंतीत जातं. पण या बदलाच्या काळात त्यांच्यातले संबंध पुरते बदलून जातात. हा बदल एकाएकी मिळू लागलेल्या पैशामुळे नि तो ज्या वाटेनं येतो त्या वाटेमुळे झालेला आहे, असं भाबडेपणानं मानायचं असतं; तर ही ‘धडधाकट गरिबी, लुळीपांगळी श्रीमंती’-छापाची एक निरुपद्रवी बोधकथा ठरली असती. पण शानभाग तशी मुभा देत नाहीत.
काटकसरीकडून सैल झालेल्या हातखर्चाच्या सवयींकडे, घरात हळूहळू येत जाणार्या वस्तूंच्या नवलाईकडे, कुटुंबातल्या मंडळींच्या स्वभावांमधून अभावितपणे उत्पन्न होणार्या स्निग्ध विनोदांकडे आपण काहीश्या बेसावधपणे, मजेनं, प्रेमानं बघत असतो. साधारण त्याच टप्प्यावर शानभाग या कुटुंबाच्या मनामध्ये नांदणारं घरातल्या मुंग्यांविषयी विलक्षण क्रौर्य आपल्याला तपशिलात जाऊन सांगू लागतात. त्या तपशिलांचं हसू येतं. पण किंचित अस्वस्थही व्हायला होतं. जुन्या घरामध्ये, म्हणजे काटकसरीत राहत असतानाच, हे क्रौर्य अतिशय सहज प्रकारे या मंडळींच्या रोजच्या वागण्याचा भाग झालेलं आहे. इतकं, की आपण असं काही जगावेगळं क्रूर वागतो आहोत हे त्यांच्या गावीही नसतं. कारण मुंग्या हा कःपदार्थ, क्षुद्र, कस्पटासमान कीटक - प्राणीही नव्हे. तो उलटून जाब विचारू शकत नाही. माणसं त्वेषानं मुंग्या मारत राहतात. मग पुढे पैसे घरात येतात, घर बदलतं, मुंग्या अंतर्धान पावतात, पण माणसं तीच राहतात. त्यांच्या या 'जमेल तशा', सोयीस्कर क्रौर्याची जाणीव नायकाच्या नवपरीणित पत्नीला मधुचंद्राच्या वेळी त्याचं त्वेषानं मुंगीला हुसकावणं बघून होते आणि तिच्या नजरेतून मग नायकाला होते. ही शानभागांच्या रचनाकौशल्याची कमाल आहे. कुणाच्या नजरेतून काय, कधी, किती नि कसं दाखवायचं यावर पक्की मांड असलेल्या एखाद्या दिग्दर्शकासारखे ते आपल्याला या कुटुंबाची गोष्ट सांगत जातात. त्यांनी केलेल्या अनेक वर्णनांशी, अनेक स्टिरिओटिपिकल मानवी नमुन्यांशी भारतीय मध्यमवर्गीय म्हणून आपण इतके जवळून परिचित असतो, की आपल्याला आपलं प्रतिबिंब पाहिल्यावर यावं तसं अवघडलेलं, पण मनापासून हसू येत राहतं. हसता हसता अस्वस्थ व्हायला लागतो आपण, तेव्हा या लेखकाची ताकद नि पकड लक्ष्यात येते.
नवश्रीमंती आणि मूल्यहीनता यांच्यातल्या एरवी सरधोपट-सरळसोट वाटणार्या नात्याचा शानभाग मुळापासून विचार करायला लावतात. बघता बघता आपली बोटं आपल्या स्वतःकडे रोखली जाणार आहेत, हे कळायच्या आत.
मूळच्या कन्नड कादंबरीचा हा अनुवाद आहे याचा सुगावाही लागू नये असं हे भाषांतर अपर्णा नायगांवकर यांनी केलं आहे आणि ते प्रकाशित करून आपल्या इतर अनेक खंग्री अनुवादांचं पाप ‘मेहता प्रकाशना’नं काही अंशी धुऊन काढलं आहे!

घाचर घोचर
विवेक शानभाग
अनु. अपर्णा नायगांवकर
मूळ कादंबरीचे प्रकाशक : अक्षरा प्रकाशन, प्रथमावृत्ती : २०१५
मराठी अनुवादाचे प्रकाशक : मेहता प्रकाशन, प्रथमावृत्ती : २०१८

‍~

मेळघाटावरील मोहर


सेवाकार्याकरता आयुष्य वेचणार्या, तसं करताना अनेक मूलभूत सामाजिक प्रश्नांना भिडणार्या, आणि त्या-त्या भागात सकारात्मक बदल घडवून आणणार्या लोकांची महाराष्ट्रात परंपरा आहे. या परंपरेत अनेक डॉक्टर्सही आहेत. डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे हे त्या परंपरेतले. मेळघाटातल्या बैराघाट या दुर्गम गावामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. आता त्याला जवळजवळ चाळीस वर्षं झाली. या काळात वैद्यकीय सेवा पुरवणं, बालकुपोषणाचा प्रश्न जगासमोर आणणं, प्रायोगिक शेती करून उदाहरण घालून देणं, स्वस्त धान्याचं दुकान चालवणं ही महत्त्वाची कामं तर त्यांनी कोणत्याही आर्थिक लाभाचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर न ठेवता केलीच. पण त्याबरोबरीनं अक्षरशः वाटेत आडव्या येईल त्या सामाजिक प्रश्नाला गांधीवादी विचारसरणीनिशी भिडले, धर्मांतरासारख्या अवघड जागच्या दुखण्याला हात घालताना प्रतिमेचा विचार केला नाही, राजकारण या बदनाम गोष्टींत शिरले, निव्वळ लोकसेवेच्या दृष्टीनं वीटभट्टीसारख्या उद्योगात शिरायचा प्रयत्न करून पदरचे लाखभर रुपये सरळच खाक केले. त्याशिवाय जिवावरच्या हाणामार्या, सापविंचूबिबट्यांसारख्या प्राण्यांसोबतच आयुष्य, यंत्रणेमधल्या अप्रामाणिक लोकांनी आणि समाजातल्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी डूख धरून केलेले फौजदारी आणि दिवाणी हल्ले, चराच्या संडासात शी करण्यापासून ते ऐन पावसात कोसळणार्या छपरापर्यंत नि शेतात राबण्यापासून ते दारोदार हिंडून भाजी-दूध विकण्यापर्यंतचे सगळे काबाडकाष्ट... असं सगळंच हसतमुखानं आयुष्याचा भाग समजून निभावलं. संस्था न स्थापता, ‘फंड’ गोळा करण्याचं टाळून, मुलाबाळांसह सर्वस्व वोपून केलेल्या त्यांच्या कामाबद्दलचं हे पुस्तक.
माझ्या हातात आलेली आवृत्ती ही पुस्तकाची दहावी आवृत्ती आहे. तीही २०१८ साली आलेली. म्हणजे एव्हाना अजून तीनेक आवृत्त्या सहज निघाल्या असतील.
निव्वळ अनुभवाचा ऐवजच इतका रोमहर्षक आहे, की त्याची काहीही मांडणी-जुळणी न केली तरी मजकूर वाचनीयच व्हावा. दोरीला बांधून चालवलेलं अजगर काय, किंवा नवर्यावर हल्ला करणार्या शेजार्यांची गचांडी धरून, पाच अक्षरी शिव्या देत त्यांना पिटाळून लावणार्या डॉ. स्मिता काय. पण मांडणी ढिसाळ नाही, मुदलात काहीएक मांडणी आहे हे जाणवतं, बरं वाटतं. पण त्याचबरोबर सुरुवातीला आखीव-रेखीव-कातीव असणारा मजकूर हळूहळू काहीसा पसरट मात्र होत जातो. हे लेखनात अधिकाधिक किस्सेवजा मजकूर आल्यामुळे झालं असावं, की मुळातच काम जटील आणि गुंतागुंतीचं, तसंच बहुआयामी होत गेल्यामुळे झालं असावं, हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे.
लेखनातल्या काही गोष्टी खटकतात. कोल्हे दाम्पत्याला त्रास देणार्या माणसाला कुठल्या ना कुठल्या अवकृपेला सामोरं जावं लागणं आणि त्यानंतर त्याबद्दलही त्या दोघांना वाईट वाटणं हा क्रम पुन्हा-पुन्हा आलेला दिसतो. सामाजिक कामासाठी सर्वस्व वोपणार्या माणसांना ‘कुणी एक शक्ती आपल्या भल्यासाठी आपल्या पाठीशी उभी आहे’ असा भाबडा विचार करावा वाटत असेल का, असं हे वाचून वाटतं. मरू घातलेलं मूल गायीच्या पायावर घातल्यानंतर पुढे ते वाचणं आणि मग काही दिवसांतच गाय मरणं हा असाच एक अनुभव. एकुणातच अशा, स्पष्टीकरणापल्याडच्या अनुभवांची रेलचेल लेखनात आहे. त्यानं थोडं बिचकायला होतं.
काही तात्त्विक विसंगतींबद्दलही हेच. आपल्याला कोणत्याही तडजोडी करायच्या नाहीत, याबद्दल विशेषतः डॉ. रवींद्र कोल्हे सातत्यानं बोलताना दिसतात. पण अशा प्रकारच्या तडजोडी करून, वनखात्याचे नियम अक्षरशः धाब्यावर बसवून, रस्ते करवून घेण्याच्या नितीन गडकरींच्या वर्तनाचं मात्र कौतुक दिसतं. यात काही विसंगती नाही का, असा प्रश्न मनाशी येत राहतो. काही प्रश्न इतके गुंतागुंतीचे, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे इतके जीवनावश्यक असतील, की पर्यावरणासारख्या तातडीनं गळ्याशी सुरी न लावणार्या बाबी मागे पडत असतील, हे कळतं. पण एकाच वेळी वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये म्हणून धडपडणं आणि गडकरींनी वनखात्याच्या माणसांना गोळ्या घालण्याची धमकी देऊन रस्त्याचं काम करवून घेतल्याचं कौतुक यात विरोधाभास जाणवतो. हे शब्दांकनातून आलेलं, की मूळ जीवनानुभवातलं, हे ताडणं कठीण आहे.
भारतासारख्या, एकाच वेळी अनेक शतकांत वावरणार्या, कमालीच्या आर्थिक विषमतेच्या, धार्मिक-सामाजिक वैविध्याच्या, प्राचीन देशांत सामाजिक प्रश्न हे कायम गुंतागुंतीचे, सोप्या-कर्मठ-एकरेषीय तत्त्वनिष्ठेनं न सुटणारे, सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या वैयक्तिक नात्यांचा कस पाहणारेच असणार, हे मात्र पुस्तकातून लख्ख कळतं.

मेळघाटावरील मोहर - डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे
शब्दांकन: मृणालिनी चितळे
राजहंस प्रकाशन
प्रथमावृत्ती : २०१४

~

सुरुवातीचे दिवस



उत्कट प्रेम, सर्वस्व विसरायला लावणारे ध्यास, धगधगत्या महत्त्वाकांक्षा, सफलतेची शिखरं... यांपैकी काहीही सानियाच्या नव्या कथासंग्रहात नाही. सुरुवातीच्या दिवसांतल्या चढणी जणू संपल्या आहेत आणि या कथांमधली पात्रं एका सपाट पठारावर येऊन पोचली आहेत. पुढ्यात विस्तीर्ण, पण रखरखीत, वैराण प्रदेश आहे. चढउतार नाहीत. दऱ्याखोऱ्या नाहीत, शिखरं नाहीत. सकाळच्या उन्हाची झिलई विनटून गेल्यानंतरचे रणरणते रंग असलेलं एकसुरी आभाळ आहे आणि आयुष्याबद्दलचं काहीएक आकलन झालेली पात्रं आहेत. हे आकलनही आयुष्य उलटंपालटं करून टाकणारं, वादळी-आवेगी, उद्वेगी नाही. त्यात किंचित कुरकुर, विषाद आहे; पण समजूत आणि स्वीकारही आहे, आणि त्यातून आलेलं कणखरपण आहे. मुख्य पात्रं बहुतकरून बाया आहेत. बाईपणातून येणारा अन्याय, भोगवटे, दुःख आहेत. पण त्याविरुद्धच्या बंडाच्या निशाणात फडकता आवेग नाही. ते बंडही नीट न्याहाळून बघणं, त्यातलं वैय्यर्थ ओळखणं, ते स्वीकारणं आहे.
'सुरुवातीचे दिवस' हे कथासंग्रहाचं नाव.
भेटताक्षणी फार छाप पाडून न जाणाऱ्या पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा निमित्ताविना डोक्यात घोळत राहणाऱ्या, चिवटपणानं चकित करणाऱ्या माणसांसारख्या त्यातल्या कथा.
पुरुष पात्र केंद्रस्थानी असलेली एकमात्र कथा आहे आणि ते पात्र लेखक आहे! ती कथा वाचताना मला अचूक अशाच, नारगोळच्या समुद्राकाठी येऊन लिहू पाहणाऱ्या लेखकाबद्दलची, पद्मजा फाटकची गोष्ट आठवली. गिरीश जोशीच्या 'फायनल ड्राफ्ट'मधला धंदेवाईक होत गेलेला असफल लेखक आणि त्याला खाडकन जाग आणणारी, होतकरू लेखक असलेली, त्याची विद्यार्थिनी आठवली. किरण गुरवांच्या एका कथेमधलं सराईतपणे आणि साळसूदपणे चाकोरीतून यशस्वी होणाऱ्या प्राध्यापकाचं कडूझार पात्र आठवलं.
सुरुवातीच्या दिवसांमधल्या सानियापासून 'सुरुवातीचे दिवस'मधली सानिया पुष्कळ पुढे आली आहे, हे जाणवलं. पण अजून तिच्यापाशी नवं, सांगण्याजोगं, बरंच काही आहे, हेही.

सुरुवातीचे दिवस
सानिया
मौज प्रकाशन
प्रथमावृती २०२१

~

टु किल अ मॉकिंग बर्ड



पुढे काय झालं ही उत्कंठा ताणून धरणं; थक्क करून टाकणार्या, जीवनमूल्य हा भारदस्त शब्द वापरणं भाग पडावं अशा, काही सत्यांकडे लक्ष्य वेधणं; आणि पुन्हा-पुन्हा परतून गोष्ट वाचावीशी वाटेल असा हृद्य-लडिवाळ-कम्फर्टफूडसदृश भाव लिखाणात आणणं – या तिन्ही गोष्टी असतील अशी पुस्तकं क्वचित मिळतात. ती कोणत्याही भाषेत मिळाली, तरी मुदलात ती ज्या भाषेत आहेत ती भाषा आपल्याला येते याबद्दलच कृतज्ञ राहायचं असतं. पण ती पुस्तकं भाषांतरित होऊन मराठीत मिळाली आणि भाषांतरानं आपली चिडचिड झाली नाही – याला मात्र ‘योग’ म्हणतात. ‘टु किल अ मॉकिंगबर्ड’च्या भाषांतरानं हा योग जमवून आणला.
सहा वर्षांच्या पोरीच्या – स्काउटच्या - नजरेतून दिसणारं एक अमेरिकी गाव. पोरीचा बाप पारंपरिक नव्हे. ‘फुरोगामी’च! त्यात विधुर आणि म्हातारा. दोन वाढत्या वयातली पोरं सांभाळताना आपण घेतलेल्या चाकोरीबाह्य निर्णयांची त्याला जाणीव आहे, त्या निर्णयांमुळे सगळ्यांनाच सोसाव्या लागणार्या त्रासांचीही, आणि तरीही पोरांना खर्या अर्थानं सदसद्विवेकानं वाढवताना हेच निर्णय कसे अपरिहार्य आहेत याचीही. एका निरपराध काळ्या माणसाचं वकीलपत्र त्याने स्वीकारल्यावर त्या गावात आणि पर्यायानं नायिकेच्या भावविश्वात जे काही घडतं, त्याची ही गोष्ट.
मूळ इंग्रजी पुस्तकात वाचली असती, तरीही गोष्ट थोरच असती. भाषांतरानं तिला कुठेही उणेपणा येत नाही. खेरीज माझ्या डोक्यात आता ती गोष्ट अधिक सुस्पष्ट, उठावदार, खरी आणि जिवंत आहे, त्याचं श्रेय या भाषांतराला आहे.
कादंबरी वाचताना मला ‘माय फ्रेंड तोतोरो’ या मियाझाकीकृत अॅनिमेशनपटामधल्या बाप-लेकींमधलं नातं सतत आठवत राहिलं. तसंच ‘लिटिल विमिन’च्या ‘चौघीजणी’ या भाषांतरातून माझ्यापर्यंत पोचलेलं, मिसेस मार्च आणि तिच्या लेकींमधलं नातंही, आणि ‘द इयरलिंग’च्या ‘पाडस’ नामक भाषांतरातून मिळालेलं ज्योडी आणि पेनी यांच्यातलं नातंही. सजग – शहाणे पालक मूल वाढवताना जे जे काही निर्णय घेतात, ते बघणं आनंदाचं-सुखाचं वाटतं, कायम सोबत राहतं, हा माझ्या व्यक्तिगत आवडीनिवडीचा भाग. पण चटकन साहित्यातलं असं नातं आठवायला बसलं, तर सगळी भाषांतरित नावंच आठवावीत, याचं कारण काय असेल?

टु किल अ मॉकिंगबर्ड
हार्पर ली
अनुवाद : विद्यागौरी खरे
मनोविकास प्रकाशन
प्रथमावृत्ती : २०२१

~

रात्रंदिन आम्हां



मला विलास चाफेकर या नावाबद्दल काहीच ठाऊक नव्हतं. ही मिरवण्याची गोष्ट नव्हे. वेश्यांचं आरोग्य, त्यांच्या मुलांचा सांभाळ आणि शिक्षण, आदिवासी मुलींचं शिक्षण, ग्रामीण भागातल्या परित्यक्तांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यात मदत, अनौपचारिक शिक्षणातले प्रयोग, पथनाट्यं, फेरीवाल्यांचे प्रश्न… त्यांच्या कामांचा आवाका आणि त्यामागचं निःस्वार्थी आयुष्य थक्क करून टाकणारं आहे. त्यातल्या अडचणी आणि यशापयश, त्यातले चमत्कारिक आणि भारून टाकणारे अनुभव, मूल्यनिष्ठा आणि तडजोडी यांचे प्रसंग... हे सगळं माझ्याकरता नव्याच जगाची खिडकी उघडणारं होतं. त्या अर्थानं ‘रात्रंदिन आम्हां’ या त्यांच्या पुस्तकाचं मोल अपार आहे.
पण या पुस्तकाच्या निमित्तानं मला मराठीतल्या आत्मकथनांबद्दल काही प्रश्न पडले. अशा प्रकारची आत्मकथनं अतिशय महत्त्वाची असतात. ज्या वर्गासाठी सामाजिक काम केलं जातं– मग ते कोणत्याही प्रकारचं असो – तो वर्ग आणि काम करणारा व्यवस्थेमधला वा समांतर व्यवस्थेमधला वर्ग या दोन समुदायांच्या पलीकडच्या बर्याच मोठ्या जनसमुदायापर्यंत हे काम पोचवण्याची संधी अशी आत्मकथनं देत असतात. शिकायला मिळालेले धडे, तसंच कामामध्ये भासणार्या त्रुटी आणि मदतीची गरज नोंदवणं हेही वाचनीय अनुभवकथनाइतकंच महत्त्वाचं असतं. या महत्त्वाचं भान मराठीतल्या - याच असं नव्हे, बहुतांश - असाहित्यिक आत्मकथनांना नाही असं वाटतं. सांगणार्या माणसाचं कार्यक्षेत्र साहित्य नसतं, कबूल आहे. पण संपादकांचं तर असतं ना? त्यांनी काहीच करू नये?
या पुस्तकात हे विशेषत्वानं जाणवलं. पुस्तकाच्या सुरुवातीलाच शीर्षकाच्याही आधी अभिप्रायांची पानं. मग शीर्षकासह मुख्य पुस्तक. पुस्तक संपल्यावर शेवटी लेखकाचं आत्मनिवेदन. आणि त्यानंतर परिशिष्ट या नावाखाली एक अनुभव कोंबलेला. का? साधा क्रम पाळणं इतकं कठीण आहे का? की या मोडतोड केलेल्या क्रमानं काही साधतं आहे? मग का? ही साधी अपेक्षा जिथे पुरी होईना, तिथे लेखकाच्या कथनाची मांडणी, त्यातून महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित होतीलसं पाहणं, लेखनात एकसंधता येईल असं पाहणं... हे फारच म्हणायला हवं.
हा एक उतारा पाहण्याजोगा आहे :
"...म्हणूनच २०११-१२चा राज्य सरकारचा मुली व स्त्रियांमधील कामाबद्दल अतिशय प्रतिष्ठेचा असलेला अहिल्याबाई होळकर पुरस्कार संस्थेला मिळाला असावा. २०१४ला नीहारला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. इतका नाजूक प्रकल्प सलग पंचवीस वर्षे चालवणे ही सोपी गोष्ट नाही. सुनीता संस्थेची संचालकही आहे व नीहारची प्रमुखदेखील आहे. नीहार शो पीस होणार नाही याची खूप काळजी आम्ही घेतली. नीहारला अक्षरशः असंख्य माणसं भेट देत असतात. त्यातून काही समस्याही निर्माण होतात. पण त्या समस्यांचं आव्हान स्वीकारलंच पाहिजे. त्यांना घाबरून कसं चालेल? के.एस.बी. कंपनीने माझ्या कल्पनेतलं ओपन एअर थिएटर बांधून दिलं आहे. त्याचं उद्घाटन डिसेंबर २०१४ मध्ये रौप्यमहोत्सवात झालं.
एक नीहार वेश्यांच्या सर्व मुलांसाठी पुरं पडणारं नाही..."
यातल्या शेवटून दुसर्या दोन वाक्यांचा एकूण कथनाशी काही जोड आहे का? असं पुस्तकात वारंवार झालेलं दिसतं. ही संपादनाच्या संपूर्ण अभावाची खूण आहे.
चाफेकरांनी काही अतिशय मोलाची निरीक्षणं नोंदली आहेत. सेवाभावी प्रकल्पांवर पैसे कमावण्याचं ओझं लादलं जाऊ नये, कारण सामाजिक काम आणि नफाकमाई या दोहोंकरता पूर्णतः निरनिराळी कौशल्यं लागतात. हे भान नसेल, तर सगळ्या कामाचं नुकसान होण्याची शक्यता खूप. एकच एक सामाजिक प्रश्न निवडून, त्याकडे संपूर्ण लक्ष्य केंद्रित करून, इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष्य करण्याची, ओव्हरस्पेशलायझेशनची, चूक सगळ्या समाजाला भोवते, असंही त्यांचं एक निरीक्षण आहे. या दोन्ही निरीक्षणांकडे नीट लक्ष्य पुरवून ती अधोरेखित केली जावीत, इतकं त्यांचं महत्त्व आहे. पण पुस्तकात ती कशीतरी-कुठेतरी-जमतील तिथे येतात. सामाजिक कार्यकर्ते तयार करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव लेखकाकडे आहे. पण काही मासलेवाईक अनुभव सांगणं वगळता त्याकडे पुस्तक फार लक्ष्य देत नाही. या प्रशिक्षणासाठी वापरलेली पद्धत, त्यात घडलेल्या चुका, शिकलेले धडे, त्यातल्या व्यावहारिक अडचणी, त्यावर मात करण्याचं तंत्र हे एक स्वतंत्र प्रकरणच होऊ शकलं असतं. पण एक सरळसोट मजकूर छापून, जमतील तिथे परिच्छेद करून प्रकाशक मोकळे झालेले दिसतात.
चाफेकरांच्या बालपणाबद्दल मुद्दाम नोंद करायला हवी. आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतलं, मानसिकदृष्ट्या अतिशय कठोर उपेक्षा सोसणारं, आणि शारीरिकदृष्ट्या विलक्षण कष्टाचं बालपण लेखकाच्या वाट्याला आलं. त्यातून कसल्याही प्रकारचा कडवटपणा न येता लेखक पुढे इतकं मोलाचं काम कसं करू शकला, याचं अतीव आश्चर्य वाटतं. ब्राह्मण घरातला जन्म असल्यामुळे सामाजिक काम करू पाहणार्याच्या वाटेला येणारी जातिभेदाची परीक्षा त्यांच्याही वाट्याला अनेकदा आली. त्याबद्दलचे अनुभव आणि त्या अनुभवांना त्यांनी दिलेलं चोख-कणखर उत्तर त्यांची समतेच्या विचारावरची निष्ठा दाखवणारं आहे. अगदी सुरुवातीच्या काळातलं, आपली विचारधारा नक्की कोणती हे स्पष्ट होईपर्यंत, संघालाही अस्पृश्य न मानणं आणि एकदा वैचारिक कल स्पष्ट झाल्यावर सडेतोडपणे ते सांगणं आणि त्यात तडजोड न करणं हेही चकित करणारं, पण मार्गदर्शक असं. तसंच, आपल्या सामाजिक कामाचे तपशील सांगताना 'सगळे कार्यकर्ते अशीच कामं करतात' हे एकाहून अधिक वेळा आवर्जून नोंदणं फार लोभस.
मोलाचा ऐवज असलेलं हे पुस्तक. त्याची दुसरी आवृत्ती निघते, पण मांडणीतल्या साध्यासाध्या गोष्टींच्या चुका दुरुस्त होत नाहीत, हे खटकतं.
रात्रंदिन आम्हां...
विलास चाफेकर
उन्मेष प्रकाशन
प्रथमावृत्ती : २०१६
~

‘श्यामची आई’, आचार्य अत्रे आणि मी



माधव वझे हे नाव मला परिचित होतं, ते ‘साप्ताहिक सकाळ’मधल्या, नाटकांच्या धारदार आणि विचक्षण परीक्षणांसाठी. ‘सा.स.’च्या दिवाळी अंकांमधून त्यांनी घेतलेल्या अनेकानेक थोर नटांच्या प्रदीर्घ आणि सखोल मुलाखतींमुळे ती ओळख अधिकच ठसली. ‘श्यामची आई’मध्ये श्यामची भूमिका करणारे हेच ते माधव वझे हे मला पुष्कळ नंतर कधीतरी कळलं आणि अचंबा वाटला. पण या दोन्ही ओळखी माझ्या डोक्यात मिसळून गेल्या नाहीत. माझ्यासाठी वझ्यांची प्रतिमा प्रायोगिक मराठी रंगभूमीवरचे दिग्दर्शक आणि भारदस्त भाषेत धारदार लिहिणारे नाट्यसमीक्षक अशीच राहिली.
त्यामुळे ‘’श्यामची आई’, आचार्य अत्रे आणि मी’ या त्यांच्या पुस्तकानं सुखद धक्का दिला.
आपल्या अंगावर पुढे चढलेल्या अनेक भूमिका उतरवून ठेवून आठनऊ वर्षांच्या मुलाच्या भूमिकेतून ते या पुस्तकात वावरतात. चित्रपटात काम करताना जवळून ओळखीच्या झालेल्या अनेक चित्रपटीय तंत्रांची ओळख आपल्याला करून देतात. मध्यमवर्गीय मराठी समाजाला अप्रूपाच्या असलेल्या अनेक थोर व्यक्तिमत्त्वांच्या सहवास त्यांना त्या वेळी लाभला. त्यांच्याकडे पाहणारी लेखकाची नजर लहान मुलाचीच आहे - निरागस, संस्कारक्षम, पण अतिशय संवेदनशील. त्यामुळे अत्रे, वनमालाबाई, प्रबोधनकार ठाकरे, वसंत बापट, चित्रपटातले इतर कलावंत, छायाचित्रकार रेळे यांची अतिशय प्रभावी अशी ओळख होत जाते.
दिग्दर्शक आणि एकुणात कलावंत म्हणूनच अत्रे किती मोठे होते, ते पुन्हापुन्हा जाणवत राहतं. प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी घडलेल्या गफलती वा असलेल्या उणिवा यांचा वापर करून घेऊन ते चित्रपटाच्या सौंदर्यात अर्थपूर्ण भर कशी घालत ते बघून थक्क व्हायला होतं. चित्रीकरणाच्या वेळी एकदा चुकून वात नसलेला कंदील आणवण्यात आला. सावकार साने गुरुजींच्या घरातल्या सामानावर जप्ती आणतो आहे, असा प्रसंग. त्या प्रसंगात ‘एक कंदील – कंदिलाला वात नाही...’ अशी भर कारकुनाच्या तोंडच्या संवादात घालून अत्र्यांनी कारकुनाचा दुष्ट, काटेकोर हिशेबीपणाही दृश्यात आणवला आणि निर्मात्याची धावपळही वाचवली. निसर्गसौंदर्य मनासारखं चित्रित करता येत नाही, कारण फिल्मची चणचण, त्यात सिनेमा कर्जबाजारी होऊन काढलेला... म्हणून डोळ्यात पाणी आलेले अत्रे या पुस्तकात भेटतात; तसेच ‘श्यामची आई’वरच्या चित्रपटात पुराणिकबुवांची चेष्टा करणार्या श्यामच्या तोंडी बाईविषयक वाक्य नको, हे जाणवून स्वतःचं विडंबनसामर्थ्य म्यान करणारे अत्रेही दिसतात. चित्रपट बघून झाल्यावर महामहोपाध्याय पोतदारांना अश्रू आवरेनात, म्हणून स्वतः रडणारे अत्रे त्यांना ‘तुम्ही का रडता?’ असं विचारतात आणि पोतदार ‘तुम्ही का रडता ते सांगा, मग मी सांगतो!’ असं म्हणल्यावर आजूबाजूचे हसत सुटलेले लोकही दिसतात. सुवर्णपदक मिळाल्यावर भाषण करताना ‘निवडसमितीत एकही मराठी माणूस नव्हता, म्हणून मला हे मिळू शकलं’ अशी मिश्कील पण भेदक टिप्पणी करणारे अत्रे दिसतात, तसेच चित्रपटाची भव्यदिव्य जाहिरात करण्याकरता माधवची मिरवणूक हत्तीवरून काढणारे व त्याचे जाहीर सत्कार घडवून आणणारे चतुर जाहिरातदार अत्रेही. वनमालाबाईंशी असलेले अत्र्यांचे नाजूक संबंध आणि त्यादरम्यान वनमालाबाईंच्या मनाची झालेली अवस्था तर वझ्यांनी अतिशय साटल्यपूर्ण पद्धतीनं टिपली आहेच. पण बाईंच्या अभिनयाबद्दलही फार नेमकी निरीक्षणं नोंदवली आहेत.
‘शृंगारिक नात्यांमधल्या सहवासाकडे ज्या स्वप्नील नजरेनं बघितलं जातं, अचूक त्याच नजरेनं साने गुरुजी अशृंगारिक नात्यांमधल्या सहवासाकडे बघताना दिसतात’ अशा अर्थाचं निरीक्षण चैत्रा रेडकरांच्या ‘साने गुरुजी व्यक्ती आणि विचार’ या पुस्तकात वाचलं होतं. लाडघरला जाताना श्याम आणि आईनं एकत्रितपणे केलेल्या बैलगाडी-प्रवासाच्या प्रसंगामधल्या संवादांची पार्श्वभूमी या टिप्पणीला होती. अचूक त्याच प्रसंगाच्या चित्रीकरणादरम्यान वनमालाबाईंविषयीच्या आपल्या भावना निर्मळ नाहीत की काय असं वाटून भयंकर अपराधीपणा वाटल्याचं वझ्यांनी नोंदलं आहे. या योगायोगानं मला अक्षरशः थरारायला झालं. नि हा योगायोग म्हणावा, की ही अत्र्यांना साने गुरुजींच्या श्यामचा आत्मा गवसल्याची खूण म्हणावी, असंही वाटून गेलं.
श्यामच्या भूमिकेनं वझ्यांना पुढे जन्मभर साथ केली. त्या भूमिकेनं त्यांच्याकरता परवलीच्या शब्दासारखे अनेक दरवाजे उघडले. त्याबद्दल कृतज्ञ आणि चकित अशा दोन्ही भावनांमधून लिहिलेले अनुभव अतिशय सुरस असे आहेत. त्यांचा सूरही आपण कुणी मोठे दुढ्ढाचार्य अभिनयसम्राट असल्याचा नाही. नशिबानं ती भूमिका मिळाली आणि आपण ती चोख केली, त्यात जे मिळालं त्या सगळ्याचं मोठेपण पुढे कळत गेलं, असं त्यांनी प्रांजळपणे नोंदलं आहे.
‘श्यामची आई’ या पुस्तकाचा मराठी मध्यमवर्गावर पगडाच आहे. पण बहुतांश लोक ‘मुलांसाठीचं पुस्तक’ असा शिक्का मारून त्यातून सुटू पाहतात, हे वझ्यांनी केलेलं अचूक आणि निराळं निरीक्षण. तसंच ‘लहानपणी मला हे पुस्तक कंटाळवाणं वाटलं होतं, पण आता मोठेपणी मात्र ते आवडतं’ हे मोकळेपणी सांगितलं आहे.
फार फार आवडलं हे प्रांजळ, तरल अनुभवकथन.
‘श्यामची आई’, आचार्य अत्रे आणि मी
माधव वझे
राजहंस प्रकाशन
प्रथमावृत्ती : २०१७

‍~

बगळा


मी पहिल्या बाकावरची म्हणतात तशी मुलगी होते शाळेत. धूर्त चोंबडेपणा, पुस्तकी हुशारी, चश्मिष्टपणा, पहिल्या तिनात नंबर. सगळं पुरेपूर. पण त्याच्याखेरीजपण काहीतरी होतं. रेषेत चालण्याला न जुमानणारं. त्याला वाटा फुटल्या शाळेनंतर कधीतरी. त्यामुळे 'बगळा'तल्या चिंतूशी लगोलग जुळलं, नि त्याच्या गोरटेल्या बहिणीशी - 'माधुरी सरदेशमुख'शीही. खूप आवडलं मला हे पुस्तक.
'बगळा'ची गोष्ट एखाद्या इराणी सिनेमानं ढापावी अशी आहे. अकरा रुपयांचा चेंडू भरून देण्याची आपत्ती ओढवलेला नि त्याकरता बगळे पकडायच्या नादाला लागलेल्या शाळकरी नायकाची - डोक्यात सत्तत प्रश्नपत्रिका घेऊन असलेल्या चिंतामण सरदेशमुखची. पण ती त्याची एकट्याची नाही. बॉलपायी चिंत्याला बुकलायला टपलेल्या संत्याची आहे, चिंतूला ग्यान देणाऱ्या बोबड्याची आहे, चिंतूच्या पहिल्या बेंचवरच्या भोचक बहिणीची आहे, सरकारी नोकरी सोडून वकिली करणाऱ्या त्याच्या तिरक्या डोक्याच्या तीर्थरूपांची आहे, पानावर बसून शिवी देणाऱ्या बापाला खडसावण्यासाठी दुर्गावतार घेणाऱ्या चिंतूच्या आईची आहे, तळ्यावर बसून लोकांची टमरेलं कलंडवणाऱ्या नि चिंत्याला पवणी शिकवणाऱ्या केश्याची आहे, पाठीला कुबड घेऊन नोकरी शोधणाऱ्या चिंतूच्या मनस्वी काकाची आहे, आणि आपल्या शाळेतल्या पोरांना दुसऱ्या मास्तरानं 'कार्टी' म्हणल्यावर मनोमन उचकणाऱ्या करडखेलकर गुर्जींचीही आहे...
लहान पोरांचे इराणी सिनेमे जगात भारी असतात, पण हे सगळ्यांचंच असणं - त्यांनापण क्वचितच कधीतरी साधतं. ते 'बगळा'ला लीलया साधलंय. दुसरी भन्नाट बाब म्हणजे भाषा. उद्गीरकडची बोली. बगलालतास, बुडवूनी, थुडीफार... ते टेंगशन, इंट्रोल, क्लासमिंट... व्हाया घुरदाळा, हेबळट, पोराडगी. म्हटलं तर ही भाषा सहज गप्पा मारल्यासारखी, अभिनिवेशरहित म्हणतात तशी, निवेदकाच्या भाषेतून वाहत येते; नि म्हटलं तर तिच्या अनोख्या जिवंत ताजगीचं स्पष्ट भान लेखकाला आहे. कारण लेखकाच्या लेखणीतून जन्मलेले चिंतूचे तीर्थरूप ''पोहायला'पेक्षा 'पवणी'च कानाला गोड लागतोय' असं नोंदतात.
करडखेलकरगुर्जी असलेल्या शाळेत असायला मला आवडलं असतं. पण मला तेव्हा दिसले नसले, तरी असणारच ते आमच्यापण शाळेत, होतेच. आता दिसतात. त्याकरता कुमठेकरांना थ्यांक्यू म्हणायला पाहिजे.

बगळा
प्रसाद कुमठेकर
पार पब्लिकेशन्स

~~~

No comments:

Post a Comment