Friday, 3 January 2020

इतक्यात वाचलेली पुस्तकं

श्री. बा. जोशींच्या 'उत्तम मध्यम'ला विषय असा नाही. कधी कुणा गुजराती संताचा परिचय करून देतील, कधी बिहारात आपलं मराठीपण खडीसाखरेसारखं विरघळवून टाकणाऱ्या कुणा उपेक्षित विद्वानाबद्दल सांगतील. कधी टागोरांनी गौरवलेल्या मराठी शिल्पकाराच्या शिल्पाचं कौतुक रचतील; कधी लंडन लायब्ररीसारख्या आगळ्यावेगळ्या संस्थेची महती सांगतील. वरकरणी अस्ताव्यस्त भासणाऱ्या या सगळ्या पसाऱ्यामागचं सूत्र हळूहळू जाणवत जातं. ते आहे शब्दांवर, भाषांवर, शब्दकोशांवर, ग्रंथांवर आणि या साऱ्यावर मनोमन जीव जडवणाऱ्या रसिक विद्वानांवर असलेल्या प्रेमाचं.
तळवलकरांच्या काळातल्या 'मटा'मधून प्रसिद्ध होणाऱ्या श्रीबांच्या सदराचं संकलन म्हणजे हे पुस्तक.
त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची शब्दकळा. जेठा, पालाण, नेमानेम, वावदूक, खर्ची, वेसणबंद, गळाठा, ताजवा, कीर्दखतावणी, वानोळा, घेलाशेटी... अशा, जुन्या मराठीतल्या शेलक्या शब्दांची जागोजाग नि नेमकी पखरण त्यांच्या लिखाणात आढळते. तसेच अतिशय लक्ष्यवेधी पद्धतीनं वापरलेले आणि थबकून दाद द्यायला लावणारे कंटकशल्य, व्यतिक्रम, तिष्ठन्ती, अश्रुतपूर्व, अवसरविनोदन, वाणिग्वृत्ती.. असे गीर्वाणभाषेतले भरजरी साज. हे कमी म्हणून की काय, जागोजागी येणाऱ्या उद्धृतांची अस्सल मराठी वळणाची आणि अचूक भाषांतरं तर पुरवलेली; शिवाय मेट्रोग्राफी (नगरसंशोधन), ॲकेडमिक  (विद्यायतनिक), टॉटेम्स (कुलचिन्ह)... अशी बहुधा स्वरचित आणि चपखल पारिभाषिक भाषांतरं. कुठे कुणा लेखकानं गच्ची या शब्दाकरता योजलेल्या 'चंद्रशाळा' या शब्दाला दाद देणं, कुठे थोरामोठ्यांच्या घसरणीसाठी, 'इंद्रपतन' अशी सांस्कृतिक संभार लेऊन आलेली दिमाखदार शब्दयोजना. कोशांची आणो कोशकारांची नाना वैशिष्ट्यं दाखवत, कौतुकानं त्यांचे किस्से सांगत करून दिलेली ओळख. उपेक्षित विद्वानांना कृतज्ञभावानं दिलेली दाद. नाना भाषांमधल्या सांस्कृतिक वैभवाबद्दलची जाण, त्याबद्दलचा आणि त्याकरता आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींबद्दलचा अपरंपार आदर, आणि या साऱ्याची निदान ओळख तरी मराठी जनांना व्हावी, अशी आस. सगळंच या लिखाणात शिगोशीग भरलेलं आहे. संदर्भग्रंथांची अप्रूपानं केलेली शिफारस, निव्वळ शैलीचा साज, तोंडात ठेवून चघळावेतसे शेलके शब्द... कशाहीकरता वाचावं असं पुस्तक. मजा आली.

~
उत्तम मध्यम
श्री. बा. जोशी
पद्मगंधा प्रकाशन
२०१०

No comments:

Post a Comment