Tuesday, 21 January 2020

व्हाया कागदपेन्सिलीशाईपेनं

शाळेत असताना माझ्याकडे लाकडी चौकटीची दगडी पाटी होती. डब्बल. जाम जड व्हायचं दप्तर तिच्यामुळे. पण डब्बल दगडी पाटी ही अप्रूपाची गोष्ट असल्यामुळे मी ती प्रेमानं तश्शी वागवत असे. तिच्यावर रुळानी लिहिताना टकटक-टकाक-टक असा मस्त आवाज यायचा. बर्‍यापैकी लांबीची पेन्सिल एका विशिष्ट कोनात धरून खाली ओढली की ती ठरावीक अंतरानं उड्या मारत यायची आणि ठिपक्याठिपक्यांची रेष मिळायची. तसल्या रेषांनी चितारलेला नारळ बाबांनाच काढता येई. फार मस्का न लावायला लावता ते काढूनही देत. तशीच त्यांची चित्रातल्यासारखी सरस्वती. माझ्या पाटीवर कधीच एकाच्या आकड्यांनी रेखलेलं सरस्वतीयंत्र नसायचं. बाबा वीणेसकट चिकनाट सरस्वती चितारून द्यायचे. त्या पाटीवर लिहायला यायची तशी मजा प्लॅस्टिकच्या पाटीवर आली नाही, हा माझ्यातला लहानपणापासूनच सुप्तावस्थेत असलेला नॉस्टाल्जियाचाच फणा असणार. हळूहळू पाट्यांची सद्दी संपलीच. मग कितीतरी काळ वह्या आणि पेन्सिली असायच्या. फ्लोराच्या पांढर्‍यावर गुलाबी फुलं नि हिरवी पानं असलेल्या पेन्सिली, गडद मोरपिशी रंगाच्या – षटकोनी आकारामुळे घरंगळताना डौलदार शांतपणे आणि एक विशिष्ट आवाज करत जाणार्‍या कॅम्लिनच्या पेन्सिली, लाल-काळ्या उभ्या रेषांच्या साध्यासुध्या नटराजच्या पेन्सिली… सगळ्यांकडे याच पेन्सिली कशा काय असायच्या कुणाला ठाऊक. टोकयंत्राला तेव्हा आम्ही कटर म्हणायचो. कुणी ‘शार्पनर्’ असं म्हटलं, की ‘काय बाई फ्याशनेबल असतात लोक...’छापाचा, मराठी शाळेचा खास शिक्का असलेला कुचकट कटाक्ष टाकायचो. तसली कटरंपण लोकांकडे एकदम यंग्राट असायची. विशेषतः ज्यांचे नातेवाईक परदेशी असत, अशांकडे तर भलभलत्या आकाराचे खोडरबर, ट्रकापासून मिकीमाऊसपर्यंत वाट्टेल त्या आकाराची कटरं, कधीकधी हे दोन्ही एकत्र, आणि कधीकधी तर या दोघांसकट एक दाढी करायला असतो तशातला ब्रश असं एकत्रही असे. तो ब्रश कशाला, तर म्हणे खोडल्यावर वा टोक काढल्यावर होणारा कचरा झाडायला. हे मला तेव्हाही अत्यंत बावळट वाटायचं, हाही माझ्यातला लहानपणापासून सुप्तावस्थेत असलेला मध्यमवर्गीय नैतिक उच्चभ्रूपणा असणार! तर – कटरं. मला या कटरांनी पेन्सिलीला टोक काढायला अजिबात आवडत नसे. काही कलात्मक मुलं त्या टोक काढण्याच्या प्रक्रियेतून निघणार्‍या झालरी मोडू न देता हळुवार हातांनी मिळवून त्यांची फुलं चिकटवून ग्रीटिंगंही करत. माझ्यात तो टाकाऊतून टिकाऊपणा नव्हता. मला कटरपेक्षाही आवडायचं, ते बोटभर लांबीचं, पत्र्याचं, मिटून ठेवता येणारं पातं. दाढीची ब्लेडं सगळ्यांकडे असायची. पण या पात्यात जो गुंडपणाचा मिनिएचर आभास होता, तो काहीच्याकाहीच होता. त्या पात्यानं किंवा मग चक्क आईच्या सुरीनी पेन्सिलीला टोक काढून घ्यायला मला आवडे. एकतर खचाखच पेन्सिलीची टवके उडवण्यात आकर्षक हिंस्रपणा होता. शिवाय पात्यानं टोक केल्यावर प्रत्यक्ष शिसाचं टोक लहानसं ठेवून पेन्सिल ‘मोडप्रूफ’ करता येत असे. मग काही काळ ‘पॉइंट फायचं लीड’ (हे सगळं एकत्र आणि असंच म्हणायचं असे) असलेल्या नाजूकनार पेन्सिली असत. त्यांच्या शिसांची पातळशी डबी असे. ती शिसं न मोडता पेन्सिलीत घालणं हा एक इंजेक्शन देण्याइतका कौशल्याचा कार्यक्रम असायचा. मग का कुणाला ठाऊक, त्या पेन्सिली मागे पडल्या आणि पुन्हा साध्यासरळ पेन्सिली असायला लागल्या. शाळेत बॉलपेनांचे आणि शाईपेनांचे दिवस सुरू होऊन वर्षानुवर्षं लोटल्यावरही मी खासगीत खरडायला कितीतरी काळ पेन्सिल वापरली. बिनओळीच्या कागदांच्या पिवळसर पातळ कागदांच्या नि लाल बांधणीतल्या चोपड्या आणि पेन्सिली. पेन्सिलीनं लिहिण्यात एक अजब सहजता आणि अनाग्रहीपणा असे. आता लिहिली ती काळ्या दगडावरची रेघ, खबरदार जर मागे फिराल तर, असा, गळ्यापाशी सुरी ठेवणारा धाक त्या लिहिण्यात नसे. बॉलपेनं तर चक्क सोयच. अजूनही रेनॉल्डची पेनं बघून क्षणभर त्यांच्या पारदर्शक अंतरंगाचा, पांढर्‍याशुभ्र अंगाचा नि परीटघडीच्या कपड्यांवर टाय लावून भांग पाडून एखाद्या गुडबॉय मुलानं बाहेर पडावं तसं दिसणार्‍या त्यांच्या तरतरीत टोपणांचा मोह होतो. पण त्यात शाईपेनांचा रोमान्स नाही. शाईपेनांची कथाच वेगळी. लिहून लिहून चांगल्या लागलेल्या शाईपेनानं लिहिताना, मान कलती करून त्या अक्षरांकडे पाहत राहिलं की उमटत जाणार्‍या अक्षरांच्या ओल्या शाईची चमक क्षणभर दिसून बघता बघता डोळ्यासमोर दिसेनाशी होते. पुढची ताजी अक्षरं चमकू लागतात. मावळतात. आपल्याच हातून उमटलेल्या अक्षरांतून जणू एखादी चमकती लहर दौडत जावी, तसा काहीसा भास होतो आणि थरारायला होतं. ही मजा मी फार काळ फार लुटली. अजूनही काळ्या-करड्या अंगांची नि सोनेरी टोपणांची चायनापेनं आणि काळ्या-निळ्या शाईच्या बाटल्या जमवून ठेवलेल्या असतात, त्या या कधीकाळी अनुभवलेल्या जादूच्या आठवणींपोटीच. एकसारखी दिसणारी, टपोरी, चमकदार, रामदासांनी वर्णन केलेल्या काळ्या तेजाळ मोत्यांसारखी अक्षरं लिहायची आणि चूष म्हणून त्यांना शीर्षरेषेची टोपी न घालता तस्सं बोडकंच ठेवायचं ही माझी लाडकी खोड. काही औपचारिक लिहिताना, किंवा उत्तरपत्रिका लिहिताना शब्दांना शीर्षरेषा देण्याला पर्याय नसे. पण त्यामुळे त्या लिहिण्याला दामटून ओळीत उभं केल्याचा आणि कवायत करायला लावल्याचा भास होई. त्याविरुद्धचं माफक बंड म्हणून माझ्या पत्रा-डायर्‍यांतून कायम शीर्षरेषेशिवायचं लिहिणं असे. आता लिहायला कागदपेनं नि पेन्सिली-खोडरबर वापरायची सवय सुटली. शीर्षरेषेशिवायचं लिहिणंही सुटलंच. कुणीतरी शीर्षरेषेशिवायचा एखादा टंक घडवला, तर ते टंकायला मजा येते का हे पडताळून पाहायला मजा येईल. पण तीही नॉस्टाल्जिकच. आता काहीतरी लिहायचं असतं, तेव्हा बोटं शिवशिवायला लागतात. कळपाट हवा होतो. कागद असलाच जवळ, तरी समाधान होत नाही. वरून पाणी प्यायल्यासारखं, तहानलेलंच राहायला होतं. ही कळपाट आपलासा केल्याची खूणच म्हणायची. अजून तरी फोनवर इतकालं टंकायच्या कल्पनेनी दडपायला होतं, समोर मोठा कळपाट हवा वाटतो. म्हणजे अजून पुढचं माध्यमांतर घडायचंय. इथे थोडं स्थिरावल्याचा भास असताना आधीच्या माध्यमाकडे नॉस्टाल्जिक होऊन बघण्यातली गंमत अजून पुसटशी शिल्लक आहे. या टप्प्यावर मला एक मजेशीर अनुभव आठवतो.

आमच्या भाषावर्गात हस्ताक्षराचा हौशी अभ्यास करणारी एक मुलगी होती. तिला सराव म्हणून आम्ही तिला आळीपाळीनी मजकूर खरडून देत असू. ती अमराठी असल्यामुळे आपोआप रोमन मजकूरच दिला जाई. एकदा तिनं मला मराठीतून खरडताना पाहिलं, नि माझ्या मागे लागून 'मी दोन्ही शिकते' असं म्हणत मराठी मजकूर घेतला. दुसऱ्या दिवशी मला बघितल्यावर भूत पाहिल्यासारखं म्हणे - तू टोटली वेगळीच मुलगी आहेस मराठीत! आधी मी हसण्यावारी नेलं. पण तिनं मागूनमागून दोन्ही मजकूर परत-परत नेले. मग एकदा आपलं आश्चर्य उलगडून सांगितलं. एका लिपीत मी रोखठोक होते, एकात अबोल. एकात बिनधास्त, एकात सावध, इत्यादी. हस्तसामुद्रिकशास्त्राइतपत मिठाची चिमटी याही अभ्यासात गृहीत धरली, तरी मला तो फरक झटकून टाकता आला नाही पार. आपल्या अवघ्या विचारविश्वावर लिपीसकट भाषेचा किती प्रचंड प्रभाव असतो, हे जाणवून थबकायला झालं.

दगडी पाटी ते कळपाट व्हाया कागदपेन्सिलीशाईपेनं. अजूनही लिपी मात्र तीच आहे. भाषाही. इतका दिलासा पुरेसा नाही?

No comments:

Post a Comment