Friday, 17 January 2014

पुन्हा या रस्त्यांवरून


शरीराच्या शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
तात्पुरत्या आणि आजन्म,
उष्ण आणि जिवंत गरजांनी भारलेल्या,
विलक्षण खर्‍या,
आज-आत्ताच्या क्षणात पाय घट्ट रुतवून धरणार्‍या,
उद्यामध्ये पूर्ण बहरण्याच्या अनंत शक्यतांची बीजं पोटी घेऊन असणार्‍या.
मान्य.
पण त्यातच आहेत आपल्या बहुमितीय प्रसरणशील होऊ शकणार्‍या नात्याला चौकटींचे क्रूर संदर्भ देण्याच्या शक्यताही.
उद्या,
शरीरानं शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
टळणार नाहीत.
ही अपरिहार्यता
आणि आश्वासनही.
तोवर जगून घेऊ देत मला
आपल्यामधले अशारीर, निवळशंख क्षण.
कसल्याही सस्पर्श देवाणघेवाणी शक्य नसताना
एकमेकांना उद्देशून हवेवर लिहिल्या गेलेल्या कवितांच्या ओळी.
प्रिय व्यक्तींनी दिलेले सल मिटवून टाकता येतील आपल्या कोवळ्या सुरांनी
अशा भाबड्या आशा बाळगत तळ्याच्या काठावरून सोडून दिलेल्या लकेरी.
टक्क जाग्या रात्री एकमेकांना सोबत करत, लखलखत्या आभाळाकडे पाहत
एकमेकांना सांगितलेल्या सुरस आणि चमत्कारिक, पर्युत्सुक सिनेमास्कोपिक गोष्टी.
शब्दांची, अर्थांची आणि मौनांचीही भाषांतरं.
स्पर्शांच्या तहानेइतकं हे सारंही माझ्या आतड्याचं आहे,
हे तुलाही ठाऊक असेलच
असा अनाकलनीय विश्वास...
जगून घेऊ देत.
पुन्हा या रस्त्यांवरून
आपण चालू न चालू...


Friday, 3 January 2014

वाटेवरल्या मुशाफिरास


ही फार आवडलेली एक कविता -

To a Stranger..

PASSING stranger! you do not know how longingly I look upon you,
You must be he I was seeking, or she I was seeking, (it comes to me, as of a dream,)
I have somewhere surely lived a life of joy with you,
All is recall’d as we flit by each other, fluid, affectionate, chaste, matured,
You grew up with me, were a boy with me, or a girl with me,
I ate with you, and slept with you—your body has become not yours only, nor left my body mine only,
You give me the pleasure of your eyes, face, flesh, as we pass—you take of my beard, breast, hands, in return,
I am not to speak to you—I am to think of you when I sit alone, or wake at night alone,
I am to wait—I do not doubt I am to meet you again,
I am to see to it that I do not lose you.

- Walt Whitman

आणि हा तिच्या भाषांतराचा प्रयत्न -

वाटेवरल्या मुशाफिरास -

१.

परिचयाची खूण नाही, नाही वा लवलेशही
स्पंदनांचा मात्र तुझिया भास हो मज प्रत्यही
आसावल्या स्वप्नांतही तू स्वप्न होऊन राहसी
कोण जाणे कोणत्या जन्मातुनी ये ओढ ही?
आज या पिकल्या क्षणी वाटांस वाटा भेटता
गाठ नाही, भेटही पण, स्पर्श होई निसटता
या क्षणातून वाहिले, जे जे उधळले, जे राखले
कोण जाणे कोणत्या जन्मात येईल सांगता?
हेच होते हेच सारे, होय, हे मज लाभलेले
हातांत हातां मन गुंफुनी एकमेकां वाहिलेले
स्तन्य माझे, वीर्य माझे - ओठांतुनी ओठांतही
कोण जाणे कोणत्या जन्मात आपण प्राशिले?
मात्र आता एकट्याने, चालायचे, चालायचे
कातरी वेळांत दचकून तुज पुन्हा आठवायचे
पडतील फिरुनी गाठी अपुल्या, नक्की, मला ही खातरी
निर्धार आता हाच तोवर ना तुला हरवायचे

२.

तुझ्यावर खिळलेल्या माझ्या नजरेतली ही ओढ तुला पुरती ठाऊक नाही.
तुझेच स्पप्न पडत आले आहे मला वारंवार, तुला खरेच ठाऊक नाही.
कुठल्यातरी एका जन्मात नक्की खिदळलो आहो आपण एकमेकांसोबत
आपल्या ओझरत्या स्पर्शाच्या या निसटत्या क्षणातून,
वाहत निघाले आहे आपल्यामधून बरेच काही...
कुठल्यातरी एका जन्मी
ऐकले आहेत आपण एकमेकांच्या नाडीचे ठोके कान लावून
दिले-घेतले आहेत काही चिमणीचे घास, काही ऊबदार श्वास -
इतके की - आता आपल्या शरीरांतही केवळ आपले असे,
फार काही उरले नाही...
वाटेवरच्या या निसटत्या क्षणीही अचूक माझ्यापाशी पोचते आहे तुझी नजर
तुझ्या अंगाचा गंधही पोहोचतो आहे थेट इथवर
तसे तुझे तरी हात मोकळे कुठे आहेत?
माझ्या अंगांगांचे सारे वळसे वेढून बसले आहेतच की तुलाही...
इथून पुढली वाट मात्र एकट्यानेच काटायची आहे.
माझ्या ओठांवर असणार आहे लाखबंद मोहोर,
नि रात्रीलाही तुझ्या आठवणीचाच काय तो आधार आहे.
पण मला ठाऊक आहे -
अमावास्या जरी झाली, तरी उजाडायचे काही राहत नाही
फक्त तोवर हरपू द्यायचे नाही तुला क्षितिजापार...
मग गाठ पडायची काही राहत नाही!


Tuesday, 31 December 2013

पाणी

उसळता एकान्त येथे |
निरवतेचा बोल आहे |
आज इथले खोल पाणी |
वाट फोडत वाहताहे ||

रम्य तारे रम्य वारे |
पाखरे दवी न्हायलेली |
मात्र पाणी साहताहे |
रात्र काळी रात्र ओली ||

उजळलेले काठ काही |
नांदते घर वाट पाही |
चंद्र पोटी पोसणार्या |
पाण्यास त्याचा ठाव नाही ||


Sunday, 22 December 2013

बोंबील आणि बॅरल


पुनरुत्पादनाच्या प्रेरणेनं पुरुष आणि स्त्रिया सर्वसाधारणतः एकमेकांकडे आकर्षित होतात हे खरं. पण पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. त्या क्रियेतून मिळणारा आनंद ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्त्रीच्या योनीत पुरुषाचं लिंग या संभोगप्रकाराखेरीज इतर सर्व मैथुनप्रकार, गर्भनिरोधक साधनं, कायदेशीर गर्भपात, प्राणिसृष्टीतही आढळणारे समलिंगी संबंध या सार्‍यांच्या अस्तित्वातून हेच सिद्ध होतं की पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. असं असताना अमुक एका प्रकारचे संबंध / आकर्षण नैसर्गिक आणि बाकी अनैसर्गिक, असं कसं ठरवणार? असं ठरवण्याला कुठलाही ठोस आधार देता येत नाही. एकदा माणूस नैसर्गिक म्हटला की तो जे जे करेल, ते सगळं नैसर्गिकच. अर्थात कोणत्याही नैसर्गिक गोष्टींवर बंधनं नसावीतच असं म्हणणंही धोक्याचं आहे (हिंसेची प्रेरणा नैसर्गिकच आहे). पण एखादी कृती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हा त्या गोष्टीची योग्यायोग्यता ठरवण्याचा आधारच नव्हे. ती कृती करण्यामुळे इतर व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा संकोच होत नाही ना, त्यांच्यावर अन्याय होत नाही ना याची खातरजमा करणं महत्त्वाचं आहे.
समलिंगी संबंधांना दोन व्यक्तींची परस्परसंमती असेल, तर त्यामुळे इतरांवर काय अन्याय संभवतो? कोणताच नाही.
मग त्याला विरोध करण्याला आधार काय?
माणसाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणत, समलिंगी संबंध बेकायदेशीर ठरवणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी निषेध करते.

***

मराठीत फॅनफिक्शन तर नाहीच, दर्जेदार इरॉटिकाही नाही. ’शेरलॉक’ ही ’बीबीसी’ची मालिका आणि मुख्यत्वेकरून तिच्यावर लिहिली जाणारी फॅनफिक्शन यांनी मला फॅनफिक्शन, इरॉटिका या प्रकारांची रसभरित ओळख तर करून दिलीच - पण लैंगिकतेचं विविधांगी भान आणून देण्याला त्यांनी बराच हातभार लावला. त्यातल्या एका शृंगारिकेचं भाषांतर करून हे ऋण थोडंसं फेडायचा मानस बरेच दिवस होता. पण काही केल्या झेपत नव्हतं. मातृभाषेत इरॉटिका, नि चांगली इरॉटिका लिहिणं किती अवघड ते लक्षात येऊन अनेकवार हतबल तेवढं व्हायला होत होतं. ते भाषांतर पुरं व्हायला निमित्त झालं, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं.
त्याबद्दल भूमिका घेताना काहीतरी सकारात्मक कृतीची जोड त्याला असली पाहिजे असा माझा आग्रह होता. त्यासाठी हे भाषांतर पुरं केलं. दमछाक झाली, पण मजाही आली.
हे थोर भाषांतर नाही, मान्य आहे. पण कुठूनतरी सुरुवात करावी लागतेच.

इथे हे भाषांतर उपलब्ध आहे.

शीर्षकाचा संदर्भ: विलास सारंग यांची ’मुक्त शब्द’च्या २०११ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा.

Sunday, 15 December 2013

टीव्ही: नॉस्टाल्जिया, नौटंकी आणि निरीक्षणं


मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे. दूरदर्शनचं ते ’टॅऽऽणॅणॅणॅ-टॅणॅणॅऽऽणॅणॅऽऽ’, माना वेळावून मानेचे व्यायाम दाखवणारा दाढीवाला सरदारजी, मूकबधिरांसाठीच्या बातम्या, ’एक चिडिया... अनेक चिडिया’वालं ऍनिमेशन, ’मिले सूर मेरा तुम्हारा’... असं करत करत नाना रस्ते घेता येतील नि शेवटी आपण ’काय साला दर्जा असायचा त्या काळात टीव्हीचा! नाहीतर हल्ली...’पर्यंत एकमुखानं येऊन पोहोचू.

पण ते कढ पुढे कधीतरी काढू. तूर्तास तरी हे पोस्ट माझ्या ब्लॉगवरचं नि त्यामुळे माझ्याबद्दलचं आहे.

तर - मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे. इतका की, एकदा वर्षाअखेर दाखवला जाणारा निवडक गाण्यांचा ’सुपरहिट मुकाबला’ काही कारणानं हुकला, तर मी हमसून हमसून रडले होते. माझ्या टीव्ही बघण्यावर आईबापाचा प्रचंड अन्यायकारक आक्षेप असे नि त्या काळात आमच्यातले मेजर खटके (उर्फ एकाधिकारशाहीविरुद्धची बंडं उर्फ तमाशे) टीव्ही या एकमात्र कारणावरून उडत. तेव्हा आमच्याकडे खटके पाडून च्यानेलं बदलणारा (सगळी मिळून दोन. नॅशनल नि मेट्रो. अजून एक च्यानेल कधीतरी सरकारकृपेनं दिसत असे. त्यावर रात्री अकरा वाजता चार्ली चॅप्लिन, गुरुदत्त या मंडळींचे काही सिनेमे पाहिल्याचे आठवतात. त्यातही ’कशी मी जागून, क्लॅरिटी नसलेल्या च्यानेलावर दर्जेदार सिनेमाचा अभ्यास कम रसग्रहण करू पाहतेय, पण आईबापाला किंमत नाही’ हा एकूण नूर. (असो. या पोस्टाचा बराचसा भाग अनुक्रमे नॉस्टेल्जिया वारण्यात नि त्याला शरण जाण्यात खर्ची पडणार आहे.) तर, असो.), शटर सरकावून पडदा बंद करणारा ब्लॅकऍण्डव्हाइट टीव्ही होता. ’केबल असली की अभ्यास होत नाही’ या तेव्हाच्या पालकप्रिय समजुतीप्रमाणे केबल फक्त मे महिन्याच्या सुटीत जोडण्याचा प्रघात होता. (हल्ली मुलांचे अभ्यास कसे होतात कुणास ठाऊक. बहुदा ही समजूत मोबाईलमार्गे इंटरनेटकडे सरकली असणार. तत्कालीन माध्यमांतलं सगळ्यांत प्रगत नि सगळ्यांत रोचक असं जे काही प्रकरण असतं, त्याच्यामुळे अभ्यास होत नाही असं हे समीकरण दिसतं.) परिणामी मला मेट्रोशिवाय तरणोपाय नसे. पण म्हणून काही अडलं असं नाही. मैदानी खेळांचं नि माझं सख्य तसंही कधीच नव्हतं. घनिष्ट मैत्रीही शाळेतच. त्यामुळे दिवसातला शाळेचा आणि झोपेचा वेळ वगळता बहुतांश वेळ मी टीव्हीला वाहिलेली असे. चष्म्याचा नंबर वाढणं आणि सामाजिक कौशल्यं जेमतेम पासापुरती असणं या दोन गोष्टी सोडल्या तर टीव्हीनं माझ्यासाठी पुस्तकांच्या खालोखाल महत्त्वाची भूमिका बजावली. सिनेमा या माझ्या प्रचंड आवडत्या विषयाशी ओळख करून दिली ती टीव्हीनंच. अधलामधला संतापजनक जाहिरातींचा व्यत्यय सहन करून मी इतके सिनेमे कसे काय पाहिले हे आजच्या मला अगम्य वाटतं. पण तेव्हा त्या जाहिरातींचं, ’फक्त सुटीत केबल मिळेल’ या दंडेलीचं, अशक्य वाईट दर्जाच्या थेटरप्रिंट्सचं इतकं काही वाटत नसे हे खरंच. सुटीच्या काळात तर मी दिवसाला पाचपाच सिनेमेही पाहिल्याचं आठवतं. (आईबाप बोलून थकले. चष्म्याच्या अधिकाधिक स्मार्ट फ्रेम्स येत गेल्या. अभ्यास आणि व्यायाम या गोष्टींची एकूण आयुष्यातली नगण्य पण अपरिहार्य जागा मी स्वीकारली. पण त्या काळात टीव्हीचं प्रमाण मात्र अटळ राहिलं.) परिणामी मी हिंदी सिनेमा (नट, दिग्दर्शक, त्यांची खाजगी आयुष्यं, एकुणात अभिरुचीबद्दलचं झेपेल तितपत आकलन, समांतर आणि मुख्यधारेतला सिनेमा इत्यादी सवतेसुभे, विशिष्ट वर्षांत गाजलेले, पडलेले, चाललेले, चांगलेवाईट सिनेमे, त्यांतली गाणी नि ड्वायलॉक) या विषयात पुरेशी अधिकारवाणी आणि बरंच बरंवाईट पाहून झाल्यावर येणारी जाणकार उदासीनता कमावली. (हीच उदासीनता प्रमाणाबाहेर वाढली की ती आपल्याला ’बनचुके’ हे लेबल बहाल करते हे ज्ञानही यथावकाश झालं, पण त्याकरता एका प्रेमभंगाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून जावं लागलं. असो. असो.) कुठल्याही एका विषयात आवडीनं नि झपाटून अशी - आपल्यापुरती का होईना - अधिकारवाणी कमावताना किती विषयांमधे रानोमाळ हिंडून होतं, किती गोष्टी काठाकाठानं आपोआप समजत जातात ते आता लक्षात येतं.

त्यामुळे आता टीव्ही आणि मी (आणि टीव्ही आणि पालक, पालक आणि मी) यांच्यातलं नातं पार उलटंपालटं झालेलं असलं, तरी टीव्हीबद्दलच्या नॉस्टाल्जियाला मी थोडी तरी विकली जातेच.

***

टीव्हीमुळे घरकोंबडे असलेले माझे समवयस्क संध्याकाळी बाहेर पडू लागायला बहरता राममारुती रोड हे एक कारण होतं, तसं डेली सोप्स हेही एक महत्त्वाचं कारण होतं. निदान माझ्यासाठी तरी होतंच होतं. (एकदा संध्याकाळी बाहेर पडायला लागल्यावर त्यातले अनेक रंगीबेरंगी फायदे मला यथावकाश कळत गेले ते निराळं. पण निमित्त मात्र टीव्ही असह्य होण्याचंच होतं.)

त्याच काळात मराठी वाहिन्या एकाएकी विऊन बसल्या. काही लायकीचे कार्यक्रम झाले, नाही असं नाही; (आता आठवून लैच धमाल येते, पण तेव्हा लोक ’नक्षत्रांचे देणे’चं तिकीट मिळवायला धडपडत नि ते मिळाल्यास प्रेक्षकांत झळकून आप्तमित्रांत त्याचा पुरावा देऊन यथाशक्ती मिरवत.) पण त्यांच्याही कॉप्या निघाल्या. पॉप्युलर पुस्तकांवर मालिका निघून संपल्या. नि मग टीव्हीत काही बरं करावं, त्याकरता कष्ट घ्यावेत, कौटुंबिक घमणसा सोडून इतर काही लिहावं... याचा टीव्हीतल्या लोकांना एकदम सामूहिक कंटाळाच आला. गणपती आला, की हर एक मालिकेत लोक नटूनसजून गणपती आणून बसवत. सगळीकडे नुसत्या सुबक-सुरेल-सजावटी आरत्याच. दिवाळी आली, की सगळ्या मालिकांत दिवाळीच. यच्चयावत मालिकांतल्या बायका नटूनसजून ठुमकत ठुमकत व्हरांड्यात येणार, पणती ठेवणार नि कुर्त्यातले पुरुष त्यांच्याशी माफक रोमॅण्टिक चेष्टामस्करी करणार. सण साजरे करायची कोण अहमहमिका. (तोवर सण साजरे करणं म्हणजे आपली संस्कृती जपणं असा आचरट फण्डा रूढ व्हायचा होता. तो व्हायला तिथूनच सुरुवात झाली असणार. लोक आधी या फण्ड्याला बळी पडले की टीव्हीनं आधी त्याची टूम काढली याचं उत्तर नेहमीप्रमाणे वादग्रस्तच, त्यामुळे ते मरो. पण स्वत:च्या लग्नात नऊवारी साड्या नि धोतरं नेसून संस्कृती जपणं (जशी काही होललॉट महाराष्ट्राची संस्कृती ब्राह्मणी लुगड्यात नि नथीत गहाण पडली होती), दसर्‍याच्या आदल्या रात्री सामूहिक दीपोत्सव नि चैत्रपाडव्याला शोभायात्रा साजर्‍या करणं, मराठी भावगीतं हा संस्कृतीचा अत्युच्च मानबिंदू असल्याच्या थाटात ’दिवाळी पहाट’ ष्टाईलचे कार्यक्रम करणं नि ऐकणं... हे सगळं त्याच काळात उपटलं.) अशा निरनिराळ्या लाटा येत राहिल्या. (’आजतक’ हा एक बातम्यांचा चांगला कार्यक्रम होता. तो हिंदी न्यूजच्यानेलांमधला ’पुण्यनगरी’ होण्यापर्यंतचा प्रवासही याच दिवसांतला. (पण न्यूज च्यानेलांच्या वाट्याला नको जाऊ या. ते एक स्वतंत्र प्रकरणच आहे.) हिंदी सिनेमे, सिनेमातली गाणी आणि टेस्ट क्रिकेटही हे सगळंही गप ब्याकफूटला गेलं. गाणी जाऊन सिनेमांचे प्रोमोज दिसायला लागले.) चराचर व्यापून फक्त मालिकाच काय त्या उरल्या.

सण झाल्यावर काही काळ लफडी करणार्‍या स्त्रीपुरुषांचा जोर होता. मग कपाळावर नागकुंकू काढणार्‍या मॉडर्न खलनायिका आणि त्यांच्याशी तुलनेला साटोपचंद्रिका तुपाळ आदर्श नायिका असा एक जमाना होता. मग बराच काळ खलनायिकांनी निरनिराळी कारस्थानं करायची, सज्जन नायकांनी त्या कारस्थानांतून साटोपचंद्रिकांना वाचवायचं आणि आपली सॅडिस्टिक कल्पनाशक्ती पणाला लावलावून खलनायिकांना शिक्षा करायच्या असा एक प्रकार होता. (चांगल्या पन्नाशीतल्या कर्त्यासवरत्या बायकांना अंगठे धरून उभे करणे, तोंडाला काळे फासून घरभर फिरवणे, उठाबशा काढायला लावणे वगैरे शिक्षा बघून मी आणि मैत्रिणीनं फेटिश या अद्भुत प्रकारावर चर्चा केलेली आठवते. असो.) सध्या लग्न या गोष्टीची चलती आहे. लग्नाळलेले, लग्नाला बिचकलेले, लग्न करून मग प्रेमात पडलेले, एकत्र कुटुंबामुळे लग्न नको / हवं असलेले... असे नाना प्रकार. लग्नाची पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट... फ्याक्टरी चालू.

माझ्या हातातला रिमोट पालकांच्या हातात जाणे आणि टीव्हीची आयुष्यातली जागा कमी होत जाणे हे महत्त्वाचं स्थित्यंतर याच काळात झालं.

***

टीव्हीची बाजू घेऊन माझ्याशी भांडायची वेळ कुणावर येणार नाही. कारण मी माझ्या ष्टाईलनं त्या माध्यमाचा पुरेपूर फायदा घेऊन बसले आहे. पण आता मला काही प्रश्नही पडले आहेत. टीव्ही अजून तगून आहे खरा. पण आघाडीचं माध्यम म्हणून त्याची जागा अजून शाबूत आहे का? की इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगनं ती जागा घेतली आहे? हल्ली लोक टीव्हीवर आवर्जून काय पाहतात? (कृपा करा आणि त्या ’आई, शू करायला जाऊ का?’ असं विचारणार्‍या चाळिशीतल्या मद्दड बायका असलेल्या सिर्यलचं नाव सांगू नका. राडा होईल. असो.) टीव्हीवर आवर्जून पाहण्यासारखं काही उरावं, असं काही बलस्थान त्या माध्यमापाशी अजुनी आहे का?

मला या प्रश्नांच्या उत्तरांत मनापासून रस आहे, कारण लोकांना मी घरकोंबडी-चष्मिष्ट-मद्दड वाटत असू शकत असेन अशा काळात मी टीव्हीपासून खूप काही मिळवलं आहे. खरोखर मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे...

Sunday, 10 November 2013

हे श्रेय न माझे...


कवितांनी भरून येण्याचे दिवस.
असतात.
’काय लिहावं’पासून ’लिहावं का’पर्यंत
’वाचणं, लिहिणं आणि करणं’ यांच्या भाजणीचे.
चर्चांच्या निष्क्रिय निवांत बुडबुड्यांचेही...
जातात.
  अजून कविता मात्र ’होते’.
  अंगासरशी बसणारा,
  वापरून विटका, मऊ झालेला
  जुना कुर्ता ’होतो’, तशीच.
जुन्या कविता
  जाऊन बसतात कपाटांतून.
  नव्या हाताशी पुस्तकांतून.
  काही डायरीच्या पानांवर, काही सवयीनं ओठांवर.
  काही अजुनी आठवतात, म्हणून थोडं शरमल्यासारखं होतं चारचौघांत.
तरी कविता
  नाकारत नाहीत आपल्याला.
  अर्थांच्या पाकळ्या उमलत राहतातच त्यांतून.
  कवेत घेत राहतात त्या आपलं बदलतं जग.
  चकित करत राहतात.
  चक्राकार वाटांचं भान पुरवत राहतात.
पुन्हा पुन्हा
  कवितांपाशी नेऊन सोडत राहतात,
   जिवंत असतो आपण तोवर.
  जिवंत राहण्याचं पक्कं ठरवून घेतो,
   तिथवर
कवितांनी भरून येण्याचे दिवस.
राहतात.

Monday, 4 November 2013

खेळघर

आज ’खेळघर’ (रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) वाचलं. आधीच कबूल करते, माझी प्रतिक्रिया थोडी गोंधळलेली आहे.


मी एका सवर्ण कुटुंबातली, मार्कबिर्कं मिळवणारी, वाचणारी-बिचणारी, मुंबईत राहणारी व्यक्ती. आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचं अमुक इतपत भान नसलं, तर व्यक्तिमत्त्वात फाउल धरतात; त्यामुळे वर्तमानपत्रं नि आता इंटरनेटच्या माध्यमातून अद्ययावत इत्यादी राहायला धडपडणारी. मला आमटे कुटुंबीय ठाऊक असतात. उत्तरोत्तर त्यांना मध्यमवर्गात मिळत गेलेली प्रतिष्ठा आणि त्यांचं बालाजीसदृश पापमुक्ती देणारं स्टेटसही. अवचटांचं मुक्तांगण आणि त्यांची दिवाळी अंकातली प्रथितयश होत गेलेली कचकड्याची साहित्यिकी ठाऊक असते. मला बंगांचं ’सर्च’ही ठाऊक असतं आणि बालमृत्यूंवरच्या संशोधनापेक्षा फेमस झालेलं ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’सुद्धा. मला समाजवादी पार्श्वभूमी असलेले मित्र असतात. त्यांच्या कुटुंबातला वेगळेपणा आणि माझी सर्वसामान्य नेमस्त हिंदूबिंदू पार्श्वभूमी जमेस धरूनही आमचे प्रश्न आणि आमचं गोंधळलेपण बरंचंसं सारखंच, एकाच टप्प्यावरचं.

अशात गोष्टीबिष्टीत म्हणून तरी एखाद्या माणसाला असली यशस्वी सामाजिक प्रयोगाची परीकथा लिहावीशी वाटते, याचं अप्रूप वाटलं. मजा वाटली. जवळीक वाटली. पण मला तिनं भारून नाही टाकलं.

या लिहिण्यातल्या रचनेत, तिच्या भाषेत किती तुटलेपणा असावा? ती भाषा कुठलीच नाहीय. ना शहराची, ना गावाची. ना बाईची, ना बुवाची. ना पुण्याची, ना मुंबईची. ना ती पात्रानुसार बदलते, ना नेपथ्यानुसार. ती फक्त लेखक नामक प्राण्याची भाषा आहे, इतकंच सारखं कळत राहतं. आयन रॅण्ड जर अमुक एका वयाच्या नंतर वाचली, तर तिच्या गोष्टीतली तीच एकसारखी दिसत राहते नि वैताग-वैताग होतो तसं काहीतरी ही गोष्ट वाचताना होत राहतं. लेखकाची स्वप्नंबिप्नं ठीक आहेत. पण म्हणून ही अशी प्लॅस्टीकची भाषा नि कटाउट्ससारखी माणसं कशी बरं माफ करावीत? केवळ तेवढ्याकरता पुस्तकावर फुली मारावी, असं हे पाप. दुसरं म्हणजे यातल्या कित्तीतरी पात्रांच्या वास्तवातल्या ओरिजिनल स्रोतांची कल्पना सहज करता येते. नि गोष्टीतली पात्रं इतकी कचकड्याची-द्विमित उरतात की डोक्यातला ’हे पात्र कुणावरून रंगवलं असेल बरं’चा चाळा शेवटापर्यंत संपतच नाही. तिसरं आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे तिच्यातला आशावाद. हा आशावाद कमालीचा भोळाभाबडा आणि कृतक आहे. इतका की, "सामाजिक कामामधले हे अमुक चार प्रयोग आणा, त्यात अमुक अमुक दोष होते हे नोंदा, त्याला तेव्हाच्या सामाजिक घडामोडींची एक जनरल बॅकग्राउण्ड द्या, थोडी मार्क्सवाद-लोहिया-डावा विचार-आणीबाणी इत्यादी चवीपुरती चर्चा, आणि मग सरतेशेवटी जनरल शांतिनिकेतन टाईप फुलंबिलं-सर्जनाचा सोहळा-नातेसंबंध हेच प्रगतीचा पाया.. डन! एक मस्त पॉझिटिव्ह गोष्ट तयार आहे बघा..." अशी मुलाखतच जणू लेखक देतो आहे असं चित्रही माझ्या मनानं तत्परतेनं रंगवलं.

तरी मी पुस्तक वाचलं. त्यात रचनेचं नावीन्य आहे. मुलाखती, डायरी, प्रथमपुरुषी निवेदन, तृतीयपुरुषी निवेदन, भाषणं... असे नाना फॉर्म्स आहेत. पण हे काही मला धरून ठेवणारं कारण नाही. मी पुस्तक वाचलं, कारण मलाही गोड शेवट असणारे हिंदी सिनेमे आवडतात. अजून काय इतकं काही संपलेलं नाही, अजून काहीतरी करण्याजोगं मस्त सापडेल, आपली निष्क्रियता आपण संपवू शकू, आपल्याला मजाही येईल, असं मला अजूनही अधूनमधून वाटत असतं. चांगले भारीपैकी धक्के खाऊनही मी अजूनही आवडलेल्या माणसांच्या प्रेमात वेडगळासारखी पडतच असते.

असल्याच वेडगळ प्रयोगाची गोष्ट सांगणारं (की सांगू पाहणारं?) पुस्तक, म्हणून बहुतेक मी ’खेळघर’ वाचलं असणार. म्हटलं ना, मी गोंधळलेय!

Tuesday, 29 October 2013

माझ्या मनातला का...

आज फारा दिसांनी प्रसन्न दिवस सुरू झाला. खिडकीपासची भरार वार्‍याची जागा, कोवळं ऊन आणि ताजातवाना पोपटी मूड. हातात मस्त कोरंकरकरीत पुस्तक.

शुभांगी गोखलेचं ’रावा’ नावाचं पुस्तक. फार काही जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे. आहे आपलं साधंसंच. पण फार फार जवळचं, आत्मीय वाटलं.



मराठी वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमधे अभिनेत्रींनी संवेदनशीलपणे इत्यादि लिहायची आपली समृद्धबिमृद्ध परंपरा आहेच खरी म्हणजे. पण ’कित्ती साधेपणी’ लिहिलं नि जपलेले संस्कार + तरल सर्जनक्षमता दाखवली, तरी त्या लिखाणातली अभिनेत्री काही केल्या लपत नाही असा अनुभव. लिखाण वाईट असतं असं नव्हे, पण ’कित्ती झालं तरी मी पडले नटीऽऽ’चा सूर पार्श्वभूमीला असतोच. या बाईच्या लिहिण्यात मात्र तिचं अभिनेत्री असणं गायबच आहे. खरं तर या लेखांमधले सगळे अनुभव तिच्या दैनंदिन आयुष्यातल्या कामाच्या काठाकाठानं जाणारे. कधी शूटिंगच्या धावपळीत मनसोक्त / आवर्जून / सोसासोसानं / हौसेनं / चोखंदळपणे केल्या जाणार्‍या खरेदीबद्दल नि वस्तुसंग्रहाबद्दल लिहील. कधी शूटिंगच्या धावपळीत सहकलाकारांच्या नि निर्मात्यांनी खिलवलेल्या तृप्त करणार्‍या भोजनाबद्दल ऐकवेल. कधी शूटिंगच्या धावपळीत आपल्या घरापाशी थांबून राहिलेल्या, गळक्या भिंती-आवरायचा माळा-धुवायच्या चादरी वागवत समजूतदारपणे आपली वाट पाहणार्‍या आपल्या घराबद्दल सांगेल. कधी शूटिंगच्या धावपळीत मनापासून काम करताना, एखाद्या सिरियलमधल्या जिवाजवळच्या होऊन गेलेल्या एखाद्या भूमिकेबद्दल हळवी होईल. कधी शूटिंगच्या धावपळीत....

पाहिलंत?! शूटिंग हे तिचं आयुष्य आहे. तुमचं-आमचं ऑफीस असतं, शाळा असते किंवा घरकाम असतं, अगदी तस्संच. त्यातल्या शोकेसी झगमगाटाचा पदर तिनं मुळी पांघरलेलाच नाही. सांप्रतच्या धावपळीच्या, रोज नवे मोह पाडणार्‍या, स्पर्धेच्या मायाजालात आपलं निखळ-नितळ असणं जपू पाहणारी ती एक बाई आहे, बास.

तिची संवेदनशीलता (आयला, या शब्दाच्या तर...!) पुरेपूर महानगरी आहे. म्हणजे सोईस्कर, घडी घालून ठेवता येणारी, थोडीश्शी बेगडी? अहं. महानगरी संवेदनशीलता म्हणजे अनावर आणि अनावश्यक कढ न काढता, भावुकतेच्या उंबर्‍याच्या अलीकडे थांबणारी. पुरेशी कॉस्मोपॉलिटन होत गेलेली, समजूतदार, स्मार्ट, ग्लोबल.

तिचं ललित गद्य वाचताना मी नव्यानं ताजी होत गेले. नसेल तिच्या विस्कळीत ललित लेखनात गोष्टीच्या रचनेचं कौशल्य. पण म्हणून काय झालं? कशी मस्त प्रसन्नता, गाढ समजूत, ताजी कोवळीक आहे... याबद्दल तिचे आभार कसे मानणार? नाटकाच्या रंगपटात जाऊन, आपल्याच अनाकलनीय संकोचांच्या निर्‍या आवरत ’तुमचं लिखाण फार आवडतं बरं का मला’ असं अवघडत म्हणून टाकणं माझ्याच्यानं काही व्हायचं नाही. तिच्यातल्या दिलखुलास लेखिकेलाही ते अन्यायाचंच. म्हणून माझं खुशीपत्र हे इथंच.

मज्जा आली. लिहीत र्‍हावा. 

Thursday, 10 October 2013

सूरजको मैं निगल गया....

खालच्या या जुन्या पोस्टनंतरही बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे. पण कृतज्ञता आहे तशीच. तुझ्यासोबत एक आख्खं युग बघायला मिळाल्याबद्दल.
बाकी प्रश्नोत्तरं होत राहतील. शंकाकुशंका, आरोपप्रत्यारोप, आकडेवारी आणि भूमिकांचं विच्छेदन... होवो.

तूर्तास फक्त एक कृतज्ञ सलाम. मजा आणलीस यार, भरभरून!

सांग ना, काय वाटतं आहे तुला आत्ता?

***

ही कदाचित हे सगळं बोलण्याची योग्य वेळ नाहीय. कुठल्याही बाजूनं बोललं तरी त्याला एक विशिष्ट रंग येण्याचे हे दिवस.

बॅडपॅचचे दिवस. ’सो कॉल्ड’ उतरणीला लागण्याचे दिवस...
वेल... लेट्स नॉट गो इनटु दॅट. ऍट्लीस्ट आत्ता नको. मग ते सगळं आहेच...

एक्झॅक्टली काय वाटतं आहे तुला आत्ता?
येस. ’अभी वहाँ का माहौल कैसा हैं?’ या आचरट प्रश्नाइतकाच हाही एक क्वालिफाईड बिनडोक प्रश्न आहे. मान्य. पण तरी तो पडला आहे मला निरागसपणॆ.

त्या कुठल्याश्या इंग्लंडातल्या पोरीनं तुझ्या जिगरबाज खेळावर फिदा होऊन तुझी ’पापी’ घेतली होती तेव्हा काय वाटलं होतं असेल तुला एक्झॅक्टली, हाही प्रश्न पडतोच की मला. किंवा बाबांना अग्नी देऊन पुढच्या विमानाने परत खेळायला जाणं जरा अमानवीच नसेल वाटलं का तुला, हाही प्रश्न पडतोच मला.
मला हक्क आहे तुला हे आणि असले कितीही बिनडोक प्रश्न विचारण्याचा.

कारण?

कारण अजुनी कोणाला काय आणि किती आचरट वाटेल याचा विचार न करता - किंबहुना तो केला तरी ’काय वाटायचं ते वाटू दे, गेले खड्ड्यात...’ असं म्हणून - तुझ्यावरची निष्ठा स्वत:लाच सिद्ध करून दाखवायला म्हणतेच की मी - "सचिनची शप्पथ - "
किंवा
जुनी मॅच तर सोडाच; पण बिस्किटं किंवा बाईक किंवा अंडी किंवा कसल्याही जाहिरातीत जरी तू दिसलास की रिमोटवरचा हात थांबतोच.
किंवा
’जिनियस काय चाटायचंय?’, ’जिंकून दिलंय का त्याने कधी इंडियाला?’, ’सगळा पैसा हो हा..’ यांपैकी कुठलीही कमेण्ट कितव्यांदाही ऐकल्यावर अजूनसुद्धा अकरावीतल्या भाबड्या पोरासारखी मुद्देसूदपणे भांडायला मी तोंड उघडतेच.
किंवा...
जाऊ दे. मुद्दा काय, तर मला हक्क आहे. माझा मीच तो स्वत:ला देऊन घेतलाय.

तर... काय वाटतं आहे तुला आत्ता?

’अरे जा रे... काय वाट्टेल ते तोंडसुख घ्या आणि वाट्टेल तेवढे जळा. पण त्याला टीमच्या बाहेर बसवायची कुणाच्या बापाची टाप नाही...’ हा माझा कॉन्फिडन्स फोल ठरल्यावर मलाच इतकं भ्रमनिरास झाल्यासारखं, आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतंय -
तुला काय वाटतं आहे आत्त्ता?

की तुला काहीच फारसं वाटत नाहीय या सगळ्याचं? फक्त एक बॅडपॅच आणि पुन्हा सारं होणार आहे तसंच पहिल्यासारखं एकसंध?

आय डाउट...

स्वत:ला बदलताना आरशात दिसत नसलात, तरी रोज थोडे थोडे - रेषेरेषेनं बदलत असताच की तुम्ही . तूही बदलत गेला आहेस तसाच.


परत एकदा कर्णधारपद घेतलंस तेव्हा.

परत एकदा नाईलाजानं ते उतरवून ठेवलंस तेव्हा.

एखाद्या कारकुनासारखं तोंड वेंगाडून भूखंड मागितलास तेव्हा.
लोकांची मुक्ताफळं तोंड मिटून सहन करत बॅटनं बोलायचं अजून घट्ट ठरवत गेलास तेव्हा.

आणि चिखलफेक सहन न होऊन अखेर तोंड उघडलंस तेव्हाही.

तुझ्यापासून तू पुष्कळ पुढे आला आहेस आता. नाही?

’सूरजको निगलनेवाले सभी’ पुढे येताना अशीच आग ठिणगी-ठिणगीनं हरवत येतात का रे? की उरतो तरीही त्यांच्यात एखादा धपापता जिगरबाज स्फुल्लिंग?

तुझ्यातही आहे? आहे का रे?

सांग ना - काय वाटतं आहे तुला आत्ता?

Friday, 22 February 2013

आत - बाहेर


ही तटबंदी अजिंक्य नाही
मला ठाऊक आहे.
अजाणता किती वेळा आत पाऊल टाकता टाकता राहिला आहात की...
पण म्हणून राजरोस महाद्वार उघडीन तुमच्यासाठी,
असं मात्र नाही.
नाहीच.

तटबंदी आकर्षक खरी.
बुलंद, काळीकभिन्न,
अंगाखांद्यावर अवकाळी पावसाचे अवशेष खेळवत,
दाटून येत
पिंपळपानांचे अंकुर नांदवणारी

तरी -
आत पडझड बरीच.
ती पाहून उठली तुमच्या कपाळावर एक आठी जरी,
वा डोळ्यांत उमटली नापसंतीची दिसे न दिसेशी लकेर -
मग आपल्याला एकमेकांबद्दल आदर उरायचा नाही.
नि एवढा धोका पत्करावा,
इतकी श्रीमंती माझ्या गाठीला नाही.

हां,
बाहेर
मांजरपावलांनी पुढे सरकणारी
किर्र-दमट जंगलं वा उष्ण-रुक्ष वाळवंटं नाहीत,
विस्मृत नगरांचे अवशेष आहेत काही,
बाहेरही.
नि समुद्र आहे...
बाहेर यावा की,
असं म्हणत असलात,
तर गोष्ट वेगळी.

मग तटबंदीला तसाही फारसा अर्थ उरत नाही.
नाही?