Tuesday, 1 May 2012

समोर हिरवंगार जंगल


कोण चूक कोण बरोबर काय न्याय काय अन्याय कसले हिशेब कसले जाब कसले जबाब -
दे सगळे हलकेच सोडून
नि पाहा समोर पसरलाय अथांग वैराण प्रदेश दगडधोंड्यांचा नि उन्हातान्हाचा नि सपाट उजाड माळरानांचा नि लालबुंद सोनेरी सूर्यास्तांचा आपल्यासाठी - एकेकट्या असलेल्या आपल्यासाठी.
छातीत दाटून गच्च झालेला तो भीतीचा नि दुःखाचा हुंदका हळूहळू अगदी हळूहळू सैल करत ने,
पाहा, माझ्या स्पर्शातून कळेल तुझ्या आतल्या सगळ्या सगळ्या भित्यांना आणि शंकांना आणि प्रश्नांना की त्यांना एकटं वाटायची गरज नाहीय आता,
अजून एका जिवालाही हे सगळं प्राणांतिक वाटतंय.
त्या सगळ्या प्रश्नांना सापडू देत अजून काही प्रश्न, मग निघून जातील ते एकमेकांच्या सोबतीनं इथेच कुठेतरी.
मग आपण उरू
आणि हे सारं उरेलच तरीही.
एकटे असू आपण दुकटे असूनही.
पण आता संध्याकाळीतली हुरहूर जाईल निवून.
हातात एक घामेजलेला हात असेल
आणि समोर हिरवंगार जंगल.

Wednesday, 25 April 2012

नाटक - २


नाटकाला जाताना माझं जे काही होतं, त्याच्याकडे न पाहिल्याचा आव आणून, पण अनिमिष नजरेनं तू पाहत राहतेस माझ्याकडे, तेव्हा तुझ्यासारखंच चेहर्‍याआड दडून तुझ्याकडे बघायला बेहद्द आवडतं मला.

तयारीपासूनच सुरुवात होते आपल्या खेळाला. नाटकाला जाणं हा कार्यक्रम असतो माझ्याकरता. मग ते ’साठेचं काय करायचं?’ असो, वा ’सही रे सही’. त्या कार्यक्रमाचं ’नाटक’पण हाच मुळी एक साजरा करण्याचा सोहळा असतो, या माझ्या ठाशीव मताला किती वेळा छेडलं आहेस तू, गमतीगमतीत. मला ठाऊक नसतं असं थोडंच आहे? पण संध्याकाळी नाटकाला जायचंय म्हणताना आपण आपापल्या भूमिकांचं बेअरिंग घेऊन तय्यार असतो.

चापून-चोपून नेसलेली कलकत्ता साडी, अत्तर, नि अर्थात मोगर्‍याचा गजरा.
वा मऊ सुताचा विटकासा भासेलसा - पण अतीव सुखद स्मार्ट कुर्ता नि किमान चार लोकांची तरी नजर वळेलशी वारली पेंटिंग केलेली दिमाखदार शबनम.
वा माझा आवडता हिरवाशार कुर्ता नि त्यावर लाल-केशरी उधळण करणारी कलमकारी वर्कची ओढणी.

आपण कशात सुरेख दिसतो नि मजेत असतो, हे ठाऊक असतं नाही आपल्याला?

मला कुठल्याही परिस्थितीत वेळेआधी पोचायचं असतं नाटकासाठी. मग तू दुपारची झोप अंगावर आलीशी दाखवत मारे आल्याबिल्याचा चहा-बिहा करत काढलेला वेळ, उग्गाच ’अंघोळ करू का, फ्रेश वाटतं ब्वॉ’ची केलेली सराईत बतावणी, आरशासमोर फेर्‍या घालण्याचा आव आणत तीनतीनदा कपडे बदलणं - जसा काही तुला कपड्यांच्यात इंटरेस्टच असतो, नि मग अगदी निघता निघता दाराशी जाऊन ’अर्रे, अत्तर राहिलं बघ’ म्हणत कुलूप हातात घेऊन चपलांसकट घरभर फिरत अत्तर फवारून येणं... सगळं काही आपल्याला ठाऊक असलेलं. पण आपण दर वेळी नव्यानं रंग भरत, नव्या नव्या जागा नि बारकावे शोधत राहतोच.

तुला माहितीय, माझी भिवई पुरेशी वर चढली की डोळ्याच्या कोपर्‍यातून माझ्याकडे पाहत गुणगुणत तू जिना उतरायला घेतेस, तेव्हा तुझे डोळे चक्क लकाकत असतात.

एकदा खाली उतरलं, की मात्र तुझी स्ट्रॅटेजी बदलते. मग लगबगीनं रिक्षा वगैरे शोधून रंगायतनात पोचेपर्यंत आपण आपला आपल्यापाशी थोडा श्वास टाकतो.

तिथल्या आवारातल्या लफ्फेदार रंगीत गर्दीत मिसळत जाताना मात्र तिकिटं काढल्यापासून आपल्यात नि नाटकात जुळलेलं ’खास काहीतरी’ निमूटपणे जपानी पंख्यासारखं मिटून पर्समधे टाकावं लागतं नि आपण तथाकथित रसिकांच्या गर्दीचा केवळ एक अंश होऊन जातो, तेव्हा दर वेळी मी नव्यानं खट्टू होतेच. ते दडवायसाठी कित्ती सराईतपणाचा आव आणून आटोकाट प्रफुल्लित दिसत राहिले, तरी ते तुझ्या नजरेतून सुटत नाही नि गालातल्या गालात हसत चेव आल्यासारखी गर्दीतल्या ओळखीच्या मंडळींना शोधत हाय-हेल्लोचे संतापजनक सोपस्कार करतच राहतेस, तेव्हा मला आपल्यातल्या खेळाचा विसर पडल्यासारखा होतो नि माझं सामाजिक हसणं अधिकाधिक कृत्रिम-नाटकी होत जातं.

हा जणू क्यू असावा, तशी पहिली घंटा होते नि आत शिरायसाठी लोक मारे शिस्तीनं रांग-बिंग लावतात.

आता इतक्या सार्‍या प्रयोगांनंतर तरी या प्रसंगातली रंगत ओसरावी ना? पण नाही, आपल्यातलं नाटक अजून चांगलंच जिवंत आहे याचा पुरावा दिल्यासारखा तुझा रांग-बिंग लावायला ठाम, मूक आणि सातत्यपूर्ण नकार. मला कित्ती वाटलं तरी मी एकटीच काही मी रांगेत उभी राहायला जाणार नाही, हे तुला नीटच माहीत असतं. आजूबाजूची बेशिस्त गर्दी ओसरत, रांग हळूहळू मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाते, नि माझे तुझ्याकडे टाकलेले कटाक्ष अधिकाधिक तीव्र होत जातात. नाटक चालू होण्याआधी तिथल्या लालसर-सोनसळी प्रकाशात, जिवंत भासणार्‍या शांततेत, रंगायतनातल्या अद्वितीय पडद्याला ’य’व्यांदा प्रेमभरानं न्याहाळत स्वतःपाशी पोचायला तुलाही आवडतंच की. पण माझ्या चेहर्‍यावरची घायकुती पाहायसाठी तू तेही हसत हसत अव्हरतेस, तेव्हा आपल्यातलं हे नाटक तुझ्यासाठी किती नि कसं कसं जिवाजवळचं आहे ते जाणवण्याचा नि त्यामुळे माझ्या चेहर्‍यावरचा रागाचा मुखवटा सरकण्याचा धोका असतो, तो हाच क्षण.

तेवढा निसरडा क्षण पार करून आपण अखेर आत शिरतो, तेव्हा आजूबाजूचं नेपथ्य एकदम फिरत्या रंगमंचासारखं जादुईपणे बदलतं नि आपण अंधाराच्या प्रदेशात प्रवेश करतो. इथून पुढे आपल्यातल्या या खेळाची तंत्रं आणि तीव्रताही बदलणार - उंचावणार आहेत, अनिश्चित - धोकादायक असू शकणार आहेत याचा जणू गर्भित इशारा मिळतो नि आपण एक दीर्घ श्वास घेतो, तो काही फक्त एसीचा नि अत्तरांचा चिरपरिचित संमिश्र वास आल्यामुळे नव्हे.

इथून पुढे आपण आपापले असतो आणि नसतोही.
हळुवार मावळत जाणारा प्रकाश, जिवंत अंधार नि निवेदकाचे मंतरलेले शब्द. पडदा उघडताना आपण कुणाचे कुणी नसलेले.
आपल्यातल्या नाटकाची सूत्रं समोरच्या अदृश्य सूत्रधाराकडे देऊन जणू विंगेतून नाटकातलं नाटक पाहायला लागलेले...

मी तुझ्याआधीच पाहिलेलं नि मला आवडलेलं इत्यादी नाटक असेल, तर या सगळ्याला एक भीषण कडा असते. समोरच्या खेळाचा मालकीहक्क नि जबाबदारीही जणू माझ्याकडे असल्यासारखी असते. नटानं फम्बल केलं, आवाज लागावा तसा लागला नाही, प्रयोग म्हणावा तसा रंगला नाही... माझीच चारचौघांत फजिती होणार असल्यासारखा माझा जीव गोळा होतो नि तुझ्या चेहर्‍यावरच्या प्रशस्तिपत्रकाकडे न राहवून माझं वारंवार लक्ष जात असतं. हे तुला कळल्यापासून होता होईतो तुझी पसंती वा नापसंती तू बेशरमपणे स्वतःपाशीच राखून ठेवतेस, हे माझ्या अलीकडेच लक्षात आलं आहे...

पण प्रयोग देखणा, श्रीमंत आणि तालेवार निघाला की आपण नकळत सैलावतोच.

त्याच नशेत बाहेर पडताना कुणी गाठून एकदम नाटकाशी संबंध नसलेल्या हवापाण्याच्या अश्लील गप्पा मारायला लागू नयेत, म्हणून मी हट्टानं मागे रेंगाळते, तोवर आपल्यातल्या नाटकाच्या शेवटाचे वेध तुला लागलेले असतात नि सगळ्या मिश्किलीचे रंग नकळत उतरून तुझा खरा - विनामुखवट्याचा ओलसर चेहरा डोकावायला लागलेला असतो. पण मग पडदा पडेस्तोवर नाटक चालू ठेवायचंच अशा ईर्ष्येनं, अंधारातून उजेडात येताना मी तुझ्या खांद्याला हलकेच स्पर्श करते नि ’आवडलं?’ असा प्रश्न अल्लाद तुझ्या पुढ्यात टाकते.

आता निर्णय तुझा असतो...

आपल्या भूमिका पाहता पाहता बदललेल्या असतात.

Tuesday, 10 April 2012

बरबाद करे अल्फ़ाज़ मेरे...


मला बीबीसीच्या शेरलॉकबद्दल लिहायची भीती वाटतेय. त्यातलं सगळंच मला इतकं जास्त आवडलंय, की माझे शब्द त्याच्यावर उडवून त्या सगळ्याची मी वाट लावीन अशी भीती.

राधिकाचा हा लेख वाचूनसुद्धा या मालिकेकडून माझी फार काही अपेक्षा नव्हती. रहस्यकथेकडून, गुप्तहेरकथेकडून आपण काय अपेक्षा करतो? काय घडलं त्याबद्दल आमच्या डोक्यात पुरेशी उत्सुकता निर्माण करा. मग आम्हांला बिनडोक न समजता आम्हांला पडलेल्या प्रश्नांचं चलाखपणे निरसन करा. घरी जाऊन शांतपणे झोपा. संपलं.

बीबीसीचा शेरलॉक हे सगळं करतो, अगदी झोकात आणि जगावेगळ्या हुशारीनं करतो, पण त्यात त्याचं काही कौतुक नाही. त्याच्या बापानं - आर्थर कॉनन डॉयलनं - ते त्याच्या घटनेत बांधून ठेवलंच आहे. पण त्यातली नाती? इतकी खोल आणि इतकी सूक्ष्म? ती कुठे होती डॉयलच्या पुस्तकात? ती कुठून शोधली या बीबीसीवाल्यांनी? त्यांचं म्हणणं म्हणे असं की ही बेहद्द जवळची मैत्री डॉयलच्या पुस्तकातपण होतीच. आहेच.

बरं, असेल.

पण शेरलॉकच्या अथांग काटेकोर बुद्धीमागे दडलेलं त्याच्यातलं निरागस मूल? आपल्याच भावाच्या छायेत गुदमरलेलं लहानपण सोडवून घेताना त्याच्यातल्या बंडखोरानं काढलेला फणा आणि त्यातून आलेली त्या दोघांमधली ती शाळकरी खुन्नस? तो मुखवटा कधी कधी, टोकाच्या काळजीच्या क्षणी गळून पडतो तेव्हा एकमेकांबद्दल वाटणारी कोरडी-खिन्न तरी अपरिहार्य काळजी? शेरलॉकला कधीच न उमजलेले - न भेटलेले लैंगिक आकर्षणांचे अज्ञात प्रदेश? त्यातून स्त्री या प्राण्याशी वागताना त्याच्यात येणारं ते आक्रमक - अलिप्त चिलखत? आणि तरीही मिसेस हडसनवर भाडोत्री गुंडांनी हल्ला केल्यावर पेटलेली त्याची नजर? एकाच वेळी माणसांना आरपार वाचायची क्षमता असणं आणि तरीही भावनांच्या ओशट लिप्ताळ्यापासून फारकत घेण्याचा त्याचा, कोण जाणे कशातून आलेला, पण पुन्हा पुन्हा कसाला लागणारा निर्णय?

भावनांपासून घटस्फोट घेण्याची भाषा करणारा हा चक्रम माणूस. पण त्याच्यातल्या सगळ्या विरोधाभासांवर प्रेम करणारी माणसं त्याच्याभोवती कशी अचूक जमतात. त्याच्यातल्या उद्धट टीनेजरला प्रसंगी झापतात, त्याच्या विक्षिप्तपणावर वैतागतात, प्रसंगी त्याला हक्कानं पेचात पकडून त्याची मजा पाहतात, त्याच्या नित्य नव्या साहसांमागे नाईलाजानं-आनंदानं-आवडीनं फरफटली जातात, त्याच्या तर्कशक्तीच्या ताकदीनं रोज नव्यानं चकित होतात. पण त्यानं केलेले अपमान, त्याचे टोमणे, त्याचं गृहित धरणं, समजुतीनं स्वीकारत त्याच्याभोवती जणू कडं करून असतात.

घरमालकीणबाई मिसेस हडसन, लॅब असिस्टंट मॉली, डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर लेस्ट्राड, शेरलॉकचा भाऊ मायक्रॉफ्ट...

आणि अर्थात जॉन. जॉन हॅमिश वॉटसन.

ही सगळी मंडळी त्याच्यातलं मूल प्रेमानं, लटक्या रागानं, प्रसंगी अचंब्यानं, न्याहाळत - जपत असतात.

मग बीबीसीचा नि मॉफ्टिसचा शेरलॉक त्याच्या बापाच्या रहस्यकथांच्या मूळ सपाट चौकटीतून बाहेर येतो जणू. जिवंत होतो. तुमच्या-आमच्यासारख्या एकविसाव्या शतकात वावरतो. ड्रग्स आणि सिगारेट्स या दोहोंवरही बंदी आणणार्‍या आजच्या लंडनमधे प्रसंगी एका वेळी तीन-तीन निकोटीन पॅचेस वापरतो आणि होम्सच्या लौकिकाला साजेसं अद्ययावत तंत्रज्ञान वापरत आजच्या पोलिसांहूनही मैलभर पुढेच असतो. त्याला अपरिचित असणारे भावनिक गुंते अंगावर घेताना त्याची तिरपीट उडते, तेव्हा त्याच्या कासाविशीच्या कल्पनेनं गुदमरायला होतं, आणि तरी हा तालेवार बुद्धीचा माणूस या गुंत्याला कसा सामोरा जाईल, ते पाहायला सरसावून बसावं लागतंच!

पण तो इथेच थांबत नाही. वाढतो. स्त्री-पुरुषांमधले अगम्य आकर्षणांचे पेच, त्यानं कधीही स्वतःबद्दल न अनुभवलेली साशंकता - बिचकता आत्मविश्वास - चक्क भीतीही... या सार्‍याला सामोरा जातो. आणि सरतेशेवटी आपलं माणूसघाणेपणाचा मुखवटा निदान स्वतःपाशी तरी उतरवून ठेवण्यापर्यंत पोचतो...

हे सगळं कुठे होतं डॉयलच्या पुस्तकात?

अस्सल ब्रिटीश माणसाचं त्याच्या भाषेवरचं प्रेम, ब्रिटीश परंपरांना हट्टानं जपणं, राणीवर आणि लंडन शहरावर घरातल्या एखाद्या वडीलधार्‍या माणसासारखं प्रेम करणं, सतत कुरकुर कुरकुर करणं, त्याच परंपरेला फाटा देत, काळाचं पाऊल ओळखत, समलैंगिकतेला बिचकत का होईना, पण रोजच्या आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारणं - अगदी त्यांच्या लाडक्या होम्स आणि वॉटसनबद्दल वात्रटपणे भिवया उंचावल्या गेल्या, तरीही तो विनोद सहज एन्जॉय करण्याइतपत... हे सगळं तरी कुठे होतं?

हे सगळं शब्दांच्या निसरड्या आधाराशिवाय म्हणतं कुणी, तेव्हा त्या नि:शब्द सौंदर्याच्या ओझ्याखाली दबून जायला होतं. वाटतं, खरंच का हे सगळं आपल्याला दिसलं, की आपण फक्त कल्पना रचल्या, आरसा पाहण्याच्या तीव्र इच्छेपोटी? त्या आरशातल्या प्रतिबिंबाला बोट लावताना भीती वाटते. डहुळून - निसटून गेलं म्हणजे?

तो इर्शाद कामिल म्हणून गेला आहे ना - जो भी मैं कहना चाहूँ, बरबाद करे अल्फ़ाज़ मेरे.... त्यातली गत.

***

एखाद्या खुळचट टीनएजर पोरीसारखं मला शेरलॉकचं आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक लहान-सहान गोष्टीचं वेड लागलं होतं. रेषेवरची अक्षरेवरच्या या खोमुळे त्याला वाट मिळाली. त्या खोवरचे ए सेन मॅनचेच शब्द इथे देतेय -

तुम्हांलाही कधी भेटले असतीलच की कुठलेतरी साहित्यिक, कलाकार, साहित्यकृती, कलाकृती... त्याबद्दल लिहा ना. त्यांच्याबद्दल, त्यांच्या भेटण्याबद्दल. कसं नि काय लिहायचं ते तुम्हीच ठरवा. वानगीदाखल गायत्रीचं हे ‘कॅराव्हॅजिओ’ या शीर्षकाचं जुनं पोस्ट पाहा. चित्रभाषा या विषयावरची शर्मिलाची ही सुंदर मालिका पाहा, केवळ चित्रभाषा समजून घेण्यासाठी नव्हे, तर अशा कलाभाषांविषयीच्या एका डोळस दृष्टिकोणासाठीही. ही केवळ उदाहारणं. कलाकार / साहित्यिक / कलाकृती / साहित्यकृती जगप्रसिद्धच हवी; अनुभव चाकोरीबाहेरचाच असावा, असे काही आग्रह नाहीत. चटका बसल्यावर बहिणाबाई आठवल्या असतील तरी, आणि जाता जाता कुठल्या मासिकात / ब्लॉगवर वाचलेलं असं भेटलं असलं तरी चालेलच की. लिहिलंत की दुवा प्रतिक्रियेत द्या, म्हणजे ते एकत्रित राहील.

***

माझा खो प्रथमेश, गौरी आणि आतिवास यांना.

Sunday, 18 March 2012

वाटा आणि मुक्काम


जे जे म्हणायसाठी तगमग होते जिवाची
ते ते सारं निरर्थक आहे हे कळून घेताना
एकाच वेळी आतून भरून येणारे आपण
क्षितिजापर्यंत रिते होत जाताना
आत शिरलेल्या वाळूच्या कणाभोवती
मुकेपणानं मोती विणत जाताना
आधी कधीच न दिसलेल्या रिकाम्या जागा
अर्थपूर्ण मौनांनी भरल्या जाताना
कुठे चाललेले असतो आपण?
वाटा आणि मुक्काम
सारंच तर एकमेकांत मिसळत गेलेलं...

Wednesday, 22 February 2012

पांढर्‍यावर काळं


या नोंदीला तसा काही अर्थ नाही. पण अगदीच निर्मनुष्य शांततेला छेद द्यायचं ठरवलंय मी - कसल्याही स्पष्टीकरणाशिवाय. म्हणून हे पांढर्‍यावर काळं. आपापल्या जबाबदारीवर... इत्यादी.
---
वेगवान, सनसनाटी, धरून ठेवणार्‍या - पण परभाषक - पुस्तकात बुडून गेले असताना एकदम साक्षात्कार झाला: आपण ज्या भाषेत वाचत असतो, त्याच भाषेत डोक्यातला विचारही चालतो. शिरूभाऊ वाचताना आपोआप 'हात् भोसडीच्या!' किंवा कुरुंदकर वाचताना '...आपण हे काळजीपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे' किंवा कोसला वाचताना 'उदाहरणार्थ' ... हे असे फटाफट डोक्यात उगवत असतात - फक्त पुस्तकाच्याच नव्हे, इतर कोणत्याही संदर्भात. म्हणून मग इंग्रजी वाचताना डोक्यातला विचारही इंग्रजी होतो आणि त्या विचाराला पुरेलशी भाषेची तयारी नसेल, तर अर्धवट धेडगुजरी वाक्यसमूह वेळ मारून नेतात.

म्हणजे सकस लिहून व्हायचं असेल, तर त्या भाषेतलं सकस-श्रीमंत वाचणंही अपरिहार्यच.
आणि तरी प्रभाव इत्यादी न पडू देण्याची कसरत.
आणि श्रेष्ठ वाचूनही स्वतःला न्यूनगंड येऊ नये, म्हणून लेखकू 'अहं'ला एक जास्तीचं टोक काढून ठेवायचं.

इज इट वर्थ इट? की हे आपल्याच धोतरात पाय अडकून पडणं फक्त?

नाही, पण हा वाद मी गुंडाळून ठेवलाय, जेव्हा हे पांढर्‍यावर काळं करायला घेतलं तेव्हाच. आता रडीचा डाव नाही.

Wednesday, 26 October 2011

रेषेवरची अक्षरे २०११

मंडळी,

सलग चौथ्या वर्षी ’रेषेवरची अक्षरे’च्या अंकासह तुमच्या भेटीला येताना आनंद तर वाटतो आहेच, खेरीज थोडा अभिमान आणि जबाबदारीही.

इथे ’रेषेवरची अक्षरे २०११’चा अंक ब्लॉगवर आणि पीडीएफमध्येही उपलब्ध आहे.

दर वर्षीपेक्षा तिपटीनं ब्लॉग वाचूनही संकलित साहित्याचा भाग मात्र संख्येनं आणि दर्जानंही आहे तिथेच आहे, याची खंत आहेच. पण ब्लॉगरांकडून नवं काही लिहून घेण्याचा प्रयोग यंदा यशस्वी झाला आणि ’लैंगिकता आणि मी’ यासारख्या अनवट विषयावरचं साहित्य अंकात सामील करता आलं, त्याचा आनंदही आहे. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत.

अंक वाचा, आपल्या सुहृदांना पाठवा, तुमच्या प्रतिक्रिया, तक्रारी, सूचना, सुधारणा कळवा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत.

तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरपूर सकस साहित्याची जावो...

ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद

संपादक

रेषेवरची अक्षरे

२०११

Friday, 7 January 2011

गालिब, तू कुठे आहेस?

कुणी आत्महत्या करायचं नक्की कधी नक्की करतं?
असतो असा - एकच एक क्षण?
एखादी फिल्मी शाम-ए-गम?
एखादी लांबलचक काळीकुट्ट रात्र?
एखादी भण्ण उदासलेली दुपार?
असतो असा - एकच एक क्षण - नक्की बोट ठेवता येणारा?

एखाद्या बोगद्यातून जात जात जात जात जात जात जात राहावं-
अंतरं कापण्याचं त्राण तर दूरच -
दूरवरचा उजेडाचा ठिपकाही भासमान वाटत जावा.
अशा
ना दिवस ना रात्र
ना आत ना बाहेर
ना जागृत ना निद्रिस्त -
अशा उंबर्‍यावरच्या संदिग्ध ठिकाणी स्वत्त्वाचं भान हरपलेलं असताना कधीतरी -

तुटून जात असेल दोरी.

मग काही अस्पष्ट स्मृती गेल्या जन्मातल्या उत्कट दुःखांच्या
पाऽर मागल्या बाकावरून मान उंचावून उंचावून पाहाव्यातश्या
झगमगत्या
चुटपुटत्या
पाहता पाहता निसटून जाणार्‍या.

मग एक निर्वात पोकळीतलं बधीर आयुष्य.
अंगावर ओरखडाही न उठू देणार्‍या गेंडाकातडीतलं.
लांबलचक, सुखासीन.

त्यात नेमका क्षण कसा शोधणार?

असतो का खरंच असा एकच एक क्षण, नक्की बोट ठेवता येणारा?

Monday, 29 November 2010

कशासाठी? पोटासाठी

जादूचा दिवा हरवून किंवा झिजून गेल्यानंतरच्या सर्वसामान्य अल्लाउद्दिनची गोष्ट ऐकलीय कुणी कधी?

किंवा

वंडरलॅंडचा पत्ता विसरून गेलेल्या; पोरंबाळं आणि त्यांचे होमवर्क्स, विजबिलं-किराणा, क्रेडिड-कार्डाची बिलं या लबेद्यात गुरफटलेल्या ऍलिसची?

किंवा

मगलवर्ल्डमधे अडकून पडलेल्या आणि सकाळ-संध्याकाळ इमाने इतबारे लॉग-इन-लॉगाउट करणार्‍या आणि महिनाअखेरीस टाइमशिट भरणार्‍या हॅरीची?

आय वण्डर. कसं असेल त्यांचं आयुष्य?

किंवा खरं तर -

आय डोण्ट वण्डर.

Thursday, 4 November 2010

रेषेवरची अक्षरे २०१०

‘रेषेवरची अक्षरे’चा तिसरा अंक प्रकाशित करत आहोत.

इथे जाऊन (किंवा इथे) आवर्जून पाहा नि कसा वाटतोय जरूर कळवा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! :)

Thursday, 30 September 2010

सांजावून आलेले..

सांजावून आलेले.
भीती काजळी धरून येते.
करकरीत तिन्हीसांजा.
ठोका चुकतो काळजाचा.
पाऊल पुढे टाकवत नाही.

अंधुकलेल्या उजेडात-
धुसर वाट लांबवर.
चालल्याशिवाय इलाज नाही हे ठाम माहीत असलेले.
थांबून जिवाला गोड लागण्याइतके नशीब नाही आपले.
चहूबाजूंनी अंधारून येते आहे-
कुणी अंगावर चाल करून यावे तसे.
आतड्याची माणसेही लांबवर
निवार्‍याला.
आपापल्या उद्योगात.
गाढ बुडून.
ती त्यांची वाट असेल...
आपली आपल्यापाशी.
सोडता येत नाही.
पाऊल पुढे टाकवत नाही.

या पावलापुढे पसरून आहे
जन्मजन्मांतरीचे भय.
अशुभाच्या एकवटून आलेल्या चाहुली.
निर्धाराला कळंजून टाकणारी दु:स्वप्ने.
कसे टाकावे पाऊल?
टाकवत नाही.

या पावलाला जिंकले पाहिजे.
असलेनसलेले बळ एकवटून एकदाच.
मग कभिन्न रात्र येईल.
उत्तररात्रही.
आणि मग हळूहळू उजाडेल.