Friday, 15 February 2013

ऋणांचे हिशेब


फैज अहमद फैज हा कवी मित्रकृपेनं भेटला. पुरते शब्दार्थ न कळताही भाषेच्या लयीची भूल पडते नि मागून दमदार अर्थ आकर्षण अधिक सखोल करत नेतात, तसं झालं. कवी असण्यातली सगळी वेडं जगून घेणारा हा कवी. बंडखोर, स्वप्नाळू, धुंद प्रेम करणारा, प्रेम पचवून शहाणपणाचं खंतावलेलं पाऊल टाकणारा. तो गायलाही गेला खूप. वेड लागल्यासारखी मी वाचत, ऐकत, समजून घेत सुटले. १३ फेब्रुवारीला या कवीचा जन्मदिन. त्या निमित्तानं हे साहस. 

खरं तर काही ऋणनिर्देश करायला हवेत. पण काही ऋणांतून कधीच मुक्त न होण्यात... वगैरे वगैरे!

हे शब्दश: / अर्थश: भाषांतर नाही. कवितेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ चिमटीत धरायचा; की कवितेचं कवितापण, तिच्यातला मूड असा प्रश्न अनेकवार पडला. नि फैजच्या शब्दांना हात घालायचं पाप करतोच आहोत, तर न भिता-न कचरता-मनापासून करू, असं म्हणत मी दुसरा पर्याय स्वीकारला. गायत्री नातूनं मागे केलेली चार भाषांतरं आठवून मी खचणारा धीर सावरला. तिचे आभार मानायला हवेत. वाद होऊ शकतो अनेक गाळलेल्या नि घातलेल्या शब्दांवरून. क्रमावरून. प्रतीत होणार्‍या अर्थावरून. कुठे भाषांच्या मर्यादा आहेत, कुठे नादाच्या. मला मर्यादा मान्य आहेत. 'हे सापेक्ष आहे' ही इथे पळवाट म्हणून वापरत नाही, मला खरंच असंच म्हणायचं आहे, की हा कवितेनं 'मला' दिलेला अर्थ आहे नि तो प्रत्येकासाठी निराळा असेल.

असो. पुरे. एकदाच माफी मागते.

ही फैज यांची मूळ कविता:

तुम मेरे पास रहो

तुम मेरे पास रहो
मेरे क़ातिल मेरे दिलदार, मेरे पास रहो
जिस घड़ी रात चले,
आसमानों का लहू पी के सियाह रात चले
मर्हमे-मुश्क लिये नश्तरे-अल्मास लिये
बैन करती हुई, हंसती हुई, गाती निकले
दर्द की कासनी पाजेब बजाती निकले
जिस घड़ी सीनों मे डूबे हुए दिल
आस्तीनों मे निहां हाथों की राह तकने लगे
आस लिये
और बच्चों के बिलखने कि तरह क़ुलकुले-मै
बहरे-नासूदगी मचले तो मनाये न मने
जब कोई बात बनाए न बने
जब न कोई बात चले
जिस घड़ी रात चले
जिस घड़ी मातमी सुनसान, सियाह रात चले
पास रहो
मेरे क़ातिल, मेरे दिलदार, मेरे पास रहो

(इथे नायरा नूरच्या आवाजात नि इथे विद्या शाहच्या आवाजात ती ऐकताही येईल. मला विद्या शाहची आवृत्ती अधिक आवडली.)

थांब इथे.
माझ्यापाशी.

आभाळाच्या रक्तावर पोसलेली धुंद रात्र
काळोखाची लयबद्ध पावलं टाकत येते,
तेव्हा सार्‍या व्यथांवर क्षणमात्र फुंकर पडल्यासारखी होते.
पण तिच्या पायी कसलेले असतात दुःखांचे खळाळणारे चाळ 
आणि हातच्या नक्षत्रांना लक्कन कापून जाणारी हिर्‍याची धार असते.

तेव्हा,
थांब इथे माझ्यापाशी.

एरवी छातीच्या तटबंदीआड मुकाट राहणार्‍या काळजांचा सुटू पाहतो ठाव
लागते कुण्या आश्वासक हातांची ओढ,
स्पर्शांची स्वप्नं पडू लागतात...
तिन्हीसांजेला कळवळून रडणार्‍या पोरासारखा भेसूर सूर असतो ओतल्या जाणार्‍या मद्यालाही,
अवघ्या अर्थाला निरर्थकाचे वेढे पडतात.
काहीच मनासारखं होत नाही
काही केल्या.
दूरवर कुठेच कुणीच काही बोलत नाही.
स्मशानशांतता पेरत रात्रीची काळीशार दमदार पावलं पडू लागतात.

तेव्हा जिवलगा,
थांब इथे.
माझ्यापाशी.

श्रद्धा, याच कवितेचं भाषांतर करायचा खो घेणार का?

Wednesday, 13 February 2013

गोल सेटिंग आणि अप्रेझल वगैरे...

डिस्क्लेमरः
अ) कोणत्याही अर्थाने ही साहित्यकृती नाही. डोक्यातला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न आहे. लिहिताना गोष्टी अधिक स्पष्ट दिसतात, एका विशिष्ट क्रमानी-काही कप्पे करून मांडता येतात, त्यातून काहीएक उत्तर मिळण्याची आशा निर्माण होते, म्हणून. आपापल्या जबाबदारीवर वाचणे.
आ) 'आयुष्याचा अर्थ काय?' असा प्रश्न चारचौघांत विचारला तर लोक चमत्कारिक + हेटाळणीच्या नजरेनी पाहतात. प्रश्नाला उत्तर मिळणं तर दूरच, आपल्याला लोक गंभीरपणे घेण्याची शक्यताही कमी होते,  त्यामुळे ही शब्दरचना टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. पण प्रश्न साधारण त्याच प्रकारचे आहेत.

दोष
१. आळस / कंटाळा / थोड्या वेळानी करू: समोर करण्याजोगं, ठरवलेलं, मिळवलेलं काम असतानाही रिकाम्या वेळात भलतंच काहीतरी अनुत्पादक करून वेळ संपवला जातो.
२. तेच ते आणि तेच ते: आपल्याला जे बरं जमतं, ते नि त्याच्या कुरणातल्या गोष्टींकडेच लक्ष पुरवलं जातं. नवीन, वेगळ्या - उद्या कदाचित रोचक वाटूही शकतील अशा गोष्टी करून पाहण्याची तीव्र अनिच्छा.
३. व्यापक चित्राचा लोभ आणि धरसोडः आपल्याला अनेक गोष्टींत रस वाटतो, पण कुठलीच एक गोष्ट जीव जाईस्तोवर कष्ट करून तडीस नेता येत नाही. सुरुवात करताना कुठूनतरी करावीच लागणार नि ती भव्यदिव्यव्यापक नसणार हे कागदावर कळतं. पण अशी सुरुवात मात्र अपुरी, टुकार, अनाकर्षक, कंटाळवाणी वाटते.

गुणः
१. अनेक बाजू दिसतातः कुठल्याही गोष्टीच्या अनेक बाजू दिसतात. एकांगी, सोपी भूमिका सहजी घेतली जात नाही.
२. जगण्याचा लोभः निराशेचे कितीही कढ काढले, आता नको-पुरे-मरून जाऊ असे गळे काढले, तरी अजून जगायला अधूनमधून पण सातत्याने मज्जा येते. 'जगायला' हाही बदनाम शब्द. जगायला - पक्षी: भांडायला, हसायला, रडायला, खायला, प्यायला, झोपायला, जागायला, वाचायला, लिहायला, पाहायला, दाखवायला इत्यादी. त्यामुळे दर थोड्या दिवसांनी 'नवीन काहीतरी करून पाहू'चा किडा सुचत राहतो. (हे नवीन आपल्या राखीव कुरणाशी संबंधितच काहीतरी असतं म्हणा. (नवीन पीक माणसाळवण्याऐवजी त्याच पिकाची अजून एक प्रजाती घडवण्याशी याची तुलना व्हावी.) पण ठीक.)
३. मर्यादांची जाणीवः आपण थोर-बीर नाही हे एक नीट पक्कं ठाऊक असतं. त्यामुळे उगा स्वत:बद्दल अनाठायी गोग्गोड कल्पना नाहीत. हे जमतं, हे जमत नाही, अशी ठोक विधानं. (हां, त्यांचेही तोटे असतात. कुरणं वगैरे. प. ठी.)

(इतकं भारूड जमवल्यावर आता तरी मुख्य प्रश्नाला हात घालावा.) काय केलं म्हणजे मजा येईल, येत राहील - त्याचं उत्तर मिळत नाही, म्हणून हे भारूड.
जेवणखाण, निरनिराळ्या चवी, स्वैपाक, खरेद्या, गाणी-सिनेमे-पुस्तकं... यांनी तात्पुरती मजा येते. पण ही मजा दीर्घजीवी असत नाही. उलट एका मर्यादेनंतर आपण मुख्य प्रश्नांकडे डोळेझाक करून नाही त्या अश्लील गोष्टीत शहामृगी पद्धतीत डोकं खुपसून बसलो आहोत अशी जाणीव अजून अजून टोकदार होत जाते आणि गंमत संपत जाते. हेच नातेसंबंध या बहुचर्चित गोष्टीलाही लागू करता येईल अशा टप्प्यावर मी आत्ता आहे. उत्स्फूर्तता, उत्कटता, माणसांमधे बुडी मारण्याची वृत्ती... यांतून हाताला जे लागायचं ते लागलं आहे. आता हा रस्ता पुढे कुठेच जात नाही याचं नकोसं भान आल्यामुळे अस्वस्थता अधिक. माइंड यू, मी आयुष्यातल्या भोगवस्तू वा माणसं नाकारण्याबद्दल बोलत नाहीय. तर त्या भोगण्याच्या पद्धतीबद्दल बोलतेय.

हातून म्हणण्यासारखं काहीही होत नाही. कुणी म्हणण्यासारखं, लोक कोण काही म्हणणारे, लोक गेले फुल्याफुल्यांत... हे मीच मला विचारून-म्हणून झालं आहे. त्यावर टीपी नको. कुणी म्हणण्यासारखं? तर मीच म्हणण्यासारखं. मला माझ्या कामाबद्दल (काम किंवा काहीही. शब्द महत्त्वाचा नाही) भारी वाटेल, काळाच्या छोट्याश्या तुकड्यावर तरी ते उठून दिसत राहील अशी आशा वाटेल - असं काहीतरी - काहीही.

असं काहीतरी करावंसं वाटणं हेही आउटडेटेड-आउटॉफ्फ्याशन आहे, मला कल्पना आहे. पण आता आपल्याला आवडतो सचिन तेंडुलकर तर आवडतो. असेल आउटॉफ्फ्याशन. आपण काय करू शकतो?

कृतिकार्यक्रमः
१. निदान ३ तरी नवीन गोष्टी चालू करून वर्ष संपेपर्यंत सातत्यानी रेटायच्या. त्यातली एखादी तरली तरी चांगभलं.
२. निदान ३ तरी कुरणाबाहेरच्या गोष्टी करून पाहायच्या. वर्षाखेरपर्यंत नाही रेटणार कदाचित. पण करून बघायच्याच.
(तिसरं काही सुचत नाहीये, पण ३ आकडा मस्त वाटतो. बरंच काही करून पाहतोय असं वाटतं. आठवा च्यायला. हां, हे बरंय, स्टॅण्डर्ड.)
३. वजन कमी करणे.

इत्यलम.

Monday, 28 January 2013

टोक काढल्या जाणार्‍या पेन्सिलीसारखे...


टोक काढल्या जाणार्‍या पेन्सिलीसारखे स्वतःला तासत
आपण येऊन पोचतो एका टोकावर.

कंटाळा,
चाकोरीबद्ध कामांचे ढीग,
एकाच वेळी निर्बुद्ध नि क्रूर असू शकणार्‍या लोकांचे जथ्थे...
सगळी फोलपटं सोलत
एकमात्र बिंदूवर रोखले गेलेले आपण.
शरीर, मन, आत्माबित्मा बकवास मुकाट बोथटत गेलेली,
नि तरी या तिन्हीसकट निराळे आपण टोक काढून तय्यार.

फार काही नको,
दोन बिंदू नि त्यांना जोडणारी एक रेघ काढता यावी,
पेन्सिल संपून जाण्याअगोदर.


Thursday, 10 January 2013

साहित्यसंमेलन आणि मी

साहित्य संमेलन ही गोष्ट माझ्यासाठी थेट महत्त्वाची नाही. त्यात चालणारे सगळे थेर मला साहित्य या माझ्या आवडत्या गोष्टीबद्दलही उद्वेग आणणारेच असतात. त्यामुळी मी त्यापासून अंतर राखून असते. पण - माझी भाषा, त्यातलं साहित्य आणि त्या साहित्याचा एक लोकमान्य - परंपरागत उत्सव या तीनही गोष्टींबद्दल मत नोंदवण्याचं अगत्य, अधिकार आणि कर्तव्य मी राखून ठेवू इच्छिते, कारण साहित्यातली प्रतीकं माझ्या आयुष्यावर दूरगामी परिणाम घडवून आणू शकतात - आणतात असं मी मानते. म्हणून हे मतप्रदर्शन.

१. साहित्यिक, रसिक आणि त्या दोहोंमधले दुवे (संपादक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, वाचनालयं, समीक्षक, माध्यमांचे प्रतिनिधी) यांखेरीज इतर कशालाही आणि कुणालाही साहित्य संमेलनात स्थान असू नये. राजकारणी आणि प्रायोजक यांना होता होईतो दूर ठेवलं जावं. हे प्रत्यक्षात अशक्य दिसतं. पण निदान त्यांचा चेहरा तरी साहित्यप्रेमीच असला पाहिजे आणि या चेहर्‍याशी विसंगत अशी कोणतीही कृती करण्यापासून (आपला साहित्यबाह्य कार्यक्रम राबवण्यापासून) त्यांना इतर घटकांनी रोखलं पाहिजे. स्थानिक वैशिष्ट्यांना संमेलनात स्थान देतानाही वरची चौकट मानणं बंधनकारक असलं पाहिजे.

२. साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक असणं लोकशाही प्रक्रियेला धरून आहे. फक्त या प्रक्रियेत मतदानाचा अधिकार आहे त्याहून व्यापक समूहाला असला, तरच ती प्रक्रिया अर्थपूर्ण ठरेल. (सध्याच्या प्रक्रियेत नक्की कोण नि केव्हा मतदान करतं हे मला तरी ठाऊक नाही. त्यात सहभागी होण्याची इच्छा असल्यास, त्याची प्रक्रिया काय, हेही गुलदस्त्यात. जाणकारांनी प्रकाश टाकल्यास मी ऋणी असेन.)

३. तरीही हे संमेलन मुख्य धारेतलं असल्यामुळे त्याविरोधात आवाज उठतील. विद्रोही, दलित, स्त्रीवादी, उपेक्षित, असे आणि वेळोवेळी इतरही असंतोष व्यक्त होतील. ते अपरिहार्य आणि आवश्यक आहे. मात्र या असंतोषाला हिंसक परिमाण मिळता नये, ही शासनाची आणि आपलीही जबाबदारी आहे. (पुष्पाबाईंना जिल्ह्यात प्रवेशबंदी आणि त्याविरोधात संरक्षण द्यायला पोलिसांनी दर्शवलेली असमर्थता हे आपल्याला लाजिरवाणं आहे.)

या मतांच्या पार्श्वभूमीवर -

साहित्यिक आणि समाजसुधारक हमीद दलवाईंच्या घरून निघणार्‍या साहित्य दिंडीला विरोध करणारे स्थानिक मुस्लिम गट आणि संभाजी ब्रिगेडसारख्या अविचारी संघटना;

परशुरामासारख्या जातीय, हिंसक आणि पुरुषप्रधान प्रतीकांचा उद्घोष करणारे संकुचित आयोजक;

साहित्यिकांना बैल संबोधणार्‍या बाळ ठाकरेंचं नाव एका सभागृहाला देण्याला पाठिंबा देणारे राजकीय नेते;

इतर अत्यावश्यक कामांसाठी असलेला राखीव निधी 'लोकप्रतिनिधींचे सांस्कृतिक शिक्षण' या गोंडस नावाखाली राजरोसपणे साहित्य संमेलनाकडे वळवणारी राजकारणी आणि आयोजकांची अभद्र युती -
या सार्‍याचा मी एक मराठी साहित्यरसिक म्हणून निषेध करते.

(तपशिलात काही  चुका असल्यास निदर्शनास आणून देणार्‍यांचं आणि मतभेदांचंही स्वागतच आहे.)

Saturday, 29 December 2012

टू मिसेस वाल्या कोळी


सगळ्यांच्या पोटी
एकटं असायची भीती. 
नातेवाईक धरून ठेवणं. 
माणसं-बिणसं जोडणं-बिडणं. 
लोकांना रुचेल तसं(च) वागणं. 
सदसद्विवेकाला न रुचेल असं काही घडलं, 
तरी सोबतीच्या धाकानं काणाडोळा करणं.
गोतावळ्यात रुतून बसणं.
वेगळं होता येत नाही म्हटल्यावर,
गोतावळा करेल त्याचं समर्थन करणं.

नाहीतर काय?
आपल्याच नाकात आपलेच पाय.
अपराधभावातून सुटका नाही.
समर्थन करताना 
दुसरा काय नि स्वत: काय,
समजुतीला पारावार नाही. 
जोरदार आणि समजूतदार समर्थन. 
'सारं काही सापेक्ष' असल्याचं स्पष्टीकरण. 
सगळंच सगळ्यांना रुचतं.
स्वत:सकट सार्‍यांना 
जेवणबिवण छान पचतं.

हे असं आहे खरं.
'असं का आहे?' विरून जातं. 
'असंच असतं'ची आळवणी,
मागून 'असंच चालणार' येतं.
विरोध संपला. 
ठिणगी संपली. 
संघर्ष संपला. 
चेतना संपली. 
सारं कसं शांत शांत.
टोटल बोअरिंग. 
एकदम निवांत.
कुणी कुणावर हल्लाबिल्ला केला
तर थोडी सनसनाटी.
स्वसंरक्षणासाठी
एखादी काठी.
सगळ्यांच्याच हाती.
एकटं पडायची भीती,
सगळ्यांच्याच पोटी.

यावर उपाय काय करावा?
एकान्ताचा वसा मनी धरावा.
खुशाल उतावे, खुशाल मातावे
तत्त्वाबित्त्वासाठी खुश्शाल भांडावे.
काही तोडून-मोडून घ्यावे,
काही सोबत जोडून घ्यावे.
काही वेचून फेकून द्यावे.
बरेच काही पोटी धरावे.
माणसे येतील, माणसे जातील,
आपण सुखें एकटे उरावे.
मिळतील थोडे सखे-सोयरे.
भांडा-तंटायला 
एकटे असायला,
न भिणारे.

जुन्या कविता



नव्यानं सुरू झालेल्या दिवसांच्या छाताडावर गुडघे रोवून.
नव्या आयुष्याच्या झिंज्या मुठीत पकडून.
ओळीत लावलेल्या दिनक्रमाची रासवटपणे कॉलर पकडून.
अनोळखी आविर्भावाला एक खणखणीत मुस्काटात खेचून.
फिरवलेल्या पाठीला एक आईवरची शिवी बिनदिक्कत हासडून.
सगळ्या सगळ्या बेईमानीवर थुंकून,
तुझ्या पौरुषावर उमटलेली माझी लाखबंद मोहर तुझ्याकडे परत मागितली -
तर तू कसा दिवाळखोरपणे रस्त्यावर येशील नाही?
जखमी झालेल्या तुला कुशीत घेऊन तुझ्या ओठांवर ओठ टेकू शकेन मी फक्त.
मग तरी उतरेल तुझ्या ओठांवर माझी ओळख?
सांग ना, मित्रा.

***

मातीत बी रुजतं तेव्हा माती असते का सजग?
की सर्जनाच्या आनंदात भिजत असते ती देहामनाच्या पार?
म्हणूनच,
म्हणूनच बीज असं रुजतं तिच्या गर्भात?
अशाच कुठल्यातरी पावसात.
मीही होते देहामनासकटच्या आनंदात अपरंपार.
तेव्हाच रुजत गेलास तू माझ्यात.
असण्या-नसण्याचं भान आलं, तोवर ओटीपोट टपोरलं होतं माझं.
पाहता पाहता आकारत गेलास माझं सर्वस्व व्यापत
आणि मग ते भीषण द्वंद्वही गेलं माझ्यात साकारत.

रुजलेल्या बीजानं अंकुरणं हा त्याचा देहधर्मच.
पण आपण मिळून ठेचून काढायचा ठरवला हा अंकुर.
तेव्हाच लिहिलं गेलं असेल आपलंही भवितव्य त्यासोबत?
ठरवून आयुष्याकडं निकरानं पाठ फिरवावी
तसे माघारी वळलो आपण.
आणि जगण्याची ही लसलसती इच्छा
थोपवून धरली आतल्याआत.
सोपं नाही,
नव्हतंच.
जगण्याचे अंकुर इतक्या सहजासहजी मरत नसतात,
कळायचं होतं आपल्याला.

आपल्याच असण्याच्या भिंतींना वेढत चिरफाळत आत वळलेला तो अंकुर.
आता गर्भपातही संभवत नाही मित्रा.
आणि जन्मही.

***

किती कविता तुझ्या हातात अल्लाद ठेवत गेले
हात पोळले तरी -
आता समजत नाही.
तू कधी स्पर्श तरी केलास का रे त्यांना?
की ती नुसतीच एखादी फॉरवर्डेड मेल होती तुझ्यालेखी?

कुणीतरी कुठेतरी लिहिलेली एक कविता.
त्यात रुजलेले माझे श्वास.
माझे स्पर्श.
दुसर्‍या कुणाची कविता आपल्या आत अशी हिरवाळते,
तेव्हा आपली होते ना ती?

तीच तर तुला पाठवली अनेक वार.
कधी संपृक्त बी.
कधी एखाद्या सुगंधी खोडाचा तुकडा.
कधी नव्हाळलेली ओलसर पानं.
कधी फुटावलेलं एखादं वयोवृद्ध मूळ.
फळांचा ऋतू आपल्यात कधी आलाच नाही,
एकदम मान्य.
पण,
फुलांचा तरी आला का रे?

आता माझी बोटं हिरवी नाहीत.
फक्त पोळल्याच्या काही खुणा.
आणि आपल्या कविता उगवल्यात का कुठेतरी,
की निर्वंश झाला आहे आपल्या जातीचा,
आणि एखाच्या नामशेष होणार्‍या प्रजातीच्या शेवटच्या स्पेसिमेनसारखे
नाहीसे व्हायचे आहे इथून निमूट?
असल्या प्रश्नांनी चिन्हांकित नजर.

तुझ्या बागेत कुठली कुठली झाडं आहेत, बाय दी वे?

***

Thursday, 8 November 2012

रेषेवरची अक्षरे २०१२

नमस्कार!

’रेषेवरची अक्षरे’चा पाचवा अंक सादर करताना फार आनंद होतो आहे.

मराठीतल्या निवडक ब्लॉगनोंदी प्रकाशित करण्याचा हा उपक्रम राबवताना आम्ही बेहद्द मजा केली. एकमेकांना नवनवीन ब्लॉगांबद्दल सांगितलं. नोंदी निवडताना हमरीतुमरीवर येऊन भांडलो. कंटाळा येईस्तोवर चर्चिलपणा केला. नवनवीन प्रयोग करून पाहिले. काही जमले, काही फसले. पण सगळ्यांत जास्त महत्त्वाचं काय असेल, तर या माध्यमातून लिहिलं जाणार ललित आणि तरुण मराठी मनापासून एन्जॉय केलं. यंदाच्या अंकावर काम करताना इथे साचत गेलेला निरुत्साह आम्हांलाही स्पर्शून गेला, ’या माध्यमाचं काय होणार’ असे तद्दन संमेलनीय गळे आम्हीही काढले नि तरी ’आपण अंक काढायचा, काय व्हायचं ते होवो’ या निष्कर्षावर येऊन आपल्या असुधारणीयपणाबद्दल एकमेकांना टाळ्याही दिल्या. तरीही मजा आलीच! अंक वाचताना मराठी ब्लॉगांच्या भवितव्याची ही चिंता तुम्हांलाही थोडी सतावो आणि तरी तुम्हांला अंक वाचताना भरपूर मजा येवो, हीच शुभेच्छा!

काहीही चुका मिळाल्या, सुधारणा सुचवाव्याश्या वाटल्या, शिव्या-ओव्या द्याव्या-गाव्याश्या वाटल्या, तरी निःसंकोच कळवा!

दिवाळी तुम्हां सर्वांना आनंदाची आणि नेहमीप्रमाणेच सकस साहित्याची जावो. भेटत राहू. :)

Friday, 19 October 2012

खेळ


सध्या मी रोज एक नवे झाड लावून संध्याकाळी ते मुळापासून तोडण्याचा खेळ खेळते.

कसे आहे,
भवतालात झाडे असण्याची आपली खोड जुनी.
आपले म्हणावे - निदान म्हणावे - असे एक तरी झाड परसात असावे लागते.

पण
आपल्या दारात वाढून शेजारी फुले ढाळत,
 आपल्याला बिनदिक्कत हिरमुसले करण्याची झाडांची खोडही जुनीच.
तेही ठीक.
दिवसातले काही प्रहर तरीसावली तरी आपली म्हणावी...
बाकी फुलांची आणि पावसाची शाश्वती कुणी कुणाला द्यावी?

पण आपल्यासाठी बहरून आलेले एखादे झाड 
हे असे पाहता पाहता वठत जाते आपल्यासाठी
नि आरडून वा मुकाट - 
पाहत जाण्याखेरीज हाती काही उरत नाही
अशाही वेळा येतात.

तेव्हा खरे खरे आणि कायमचे दुखते.

झाड लावून आपण पाठ फिरवून हसत निघून जावेइतकीही उमेद उरत नाही मग.
रोज नवे झाड लावून संध्याकाळी वैराण होण्यातला सुटवंगपणाच बरा वाटू लागतो.

अर्थात
झाडांच्या मर्जीचे काय -
असा अवसानघातकी विचार बाजूला सारण्याइतके बेगुमान व्हावे लागते.
पण ते एकदा जमले की,
विश्वास ठेवा अगर ठेवू नकात्यासारखी दुसरी मजा नाही!

हांपहाटे अगदी उजाड उजाड वाटते.
आणि संध्याकाळ ओलांडून रात्रीच्या प्रहरात पाऊल टाकताना पाऽर पोरके.
पण तितके तर...
तितके चालायचेचनाही का!

झाडांनाही पोरके वाटतेखरे.
पण झाडांना निर्दयही होता येते,
हेही एकदाच समजून घ्यावे,
कारण आपल्यालाही कुणाकुणासाठी झाड व्हावे लागते!

तर -
हल्ली मी रोज एक नवे झाड लावून संध्याकाळी ते मुळापासून तोडण्याचा खेळ खेळते!

Sunday, 24 June 2012

खपाऊ पण पकाऊ पुस्तकं


संवेदचा खो बघून खरंच त्यानं म्हटल्यासारखी वॉशिंग्टनची कुर्‍हाड हाती आल्यासारखे हात शिवशिवायला लागले. कुणाला झोडू नि कुणाला नको, असं होऊन गेलं.

मग लक्षात आलं, एखाद्या लेखकाला अशा प्रकारे लक्ष्य करणं सोपं आहे. एका बाजूला ग्रेस, जी. ए. वा तेंडुलकर. एका बाजूला व.पु., संदीप खरे, मीना प्रभू, प्रवीण दवणे, हल्ली अनिल अवचट आणि चक्क पु.ल.सुद्धा. या लेखकांची वेगवेगळ्या कारणांनी वारंवार रेवडी उडवली जाते. कधी दुर्बोधपणाच्या आरोपाखाली. कधी तथाकथित ’बोल्ड’ वा ’अश्लील’ असण्याबद्दल. कधी साहित्यबाह्य कारणं असतात म्हणून, कधी तसं करणं उच्चभ्रू असतं म्हणून, कधी त्यांची लोकप्रियता आणि लिहिण्याचा दर्जा (अर्थात सापेक्ष) यांचं प्रमाण व्यस्त असतं म्हणून, कधी निव्वळ तशी फॅशन असते म्हणून. पण या सगळ्या लेखकांनी कधी ना कधीतरी गाजण्याइतकं चांगलं, दखल घेण्याजोगं लिहिलं आहे. एका पुस्तकाच्या गाजण्यावर नंतर सगळी कारकीर्द उभारली असेलही कुणी कुणी, पण त्यांच्या त्यांच्या काळाच्या चौकटीत त्यांच्या पुस्तकांच्या गाजण्याला सबळ कारणं आहेत. ती दुर्लक्षून पुस्तकांबद्दल न बोलता लेखकांच्या शैलीवर, विषयांवर, लोकप्रियतेवर टीकेची झोड उठवणं, कसलीच जबाबदारी न घेता - विखारी टवाळकीचा / सर्वसामान्य वाचकाच्या बाळबोध अभिरुचीचा / सिनिक जाणकारीचा आसरा घेत बोलणं सोपं आहे.

पण इथे संवेदनं तसला सोपा रस्ता ठेवलेला नाही. अमुक एक पुस्तक, ते का गाजलं नि त्याची तितकी लायकी नव्हती असं मला का वाटतंय असं रोखठोक बोलावं लागेल हे लक्षात आलं, तेव्हा कुर्‍हाडीची धार गेल्यासारखी वाटली. पुस्तक निवडताना तर फारच पंचाईत. इतक्यात गाजलेलं, पण गाजण्याची लायकी नसलेलं पुस्तक कुठलं तेच मुळी मला ठरवता येईना. भाषेच्या नावानं दरसाल गळे काढणारे आपण लोक, आपल्या भाषेत पुरेशी पुस्तकं गाजतात तरी का, असा प्रश्न पडला. ’हिंदू, हिंदू... हिंदू’ अशी आसमंतातली कुजबुज ऐकली मी, नाही असं नाही. पण निदान तुकड्या-तुकड्यांत तरी मला ’हिंदू’ आवडली होती. तसंच ’नातिचरामि’चं. शिवाय ’हिंदू’ आणि ’नातिचरामि’ला झोडण्याची सध्या फॅशन असली, तरी काही वर्षांचा काळ मधे गेल्यानंतरच त्यांचं मूल्यमापन करता येईल असंही मला वाटतं.

अलिप्त अंतर बहाल करण्याइतकं जुनं, खूप गाजलेलं नि मला तितकंसं न आवडणारं - अशा पुस्तकाचा शोध घेताना ’मृत्युंजय’ आठवलं. सुरुवातीलाच कबूल करते - मी लहानपणापासून ’मृत्युंजय’ अतिशय प्रेमानं, अनेक पारायणं करत वाचलं आहे. निदान काही वर्षं तरी त्या पुस्तकाची शिडी करून इतर पुस्तकांपर्यंत - लेखकांपर्यंत पोचले आहे. त्याबद्दल या खोमध्ये लिहिणं काहीसं कृतघ्नपणाचं ठरेल, हेही मला कळतं आहे. पण आता ते इतकं गाजण्याइतकं थोर वाटत नाही हेही खरंच आहे.

का बरं?

माझी चांगल्या गोष्टीची व्याख्या ही अशी - ज्यात गोष्टीचा तंबू एकखांबी नसतो. एकापेक्षा जास्त पात्रांनी मिळून बनलेली ती गोष्ट असते. पात्रं हाडामांसाची, चुका करणारी-शिकणारी, वाढणारी, घडणारी-मोडणारी असतात. काळी किंवा पांढरी नसून राखाडी असतात. गोष्टीला खिळवून ठेवणारे चढ-उतार असतात. नि मुख्य म्हणजे वाढणार्‍या आपल्यासोबत गोष्ट कालबाह्य होत जात नाही. तिचं अपील आपल्याकरता टिकून राहतं.

या व्याख्येत ’मृत्युंजय’ बसते का? नाही बसत.

एक तर ती पुरी गोष्ट नाही. कुणीतरी आधीच सांगितलेल्या गोष्टीचा आपल्या सोयीनं निवडून घेतलेला नि आपल्या सोयीनं भर घालून वा कातरी लावून मांडलेला एक तुकडा आहे. अशी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन सांगितलेल्या गोष्टी मुळातूनच दुय्यम असतात (आणि त्यांना संदर्भमूल्य नसतं) हे आपण मान्य केलं पाहिजे. तेही एक वेळ ठीक. त्यातून काही नवे अन्वयार्थ लागत असतील तर. इथे महाभारताचा कोणता नवीन पैलू सामोरा येतो? कुठलाच नाही. फक्त त्यातल्या एका पात्राला कुठल्याही तोलाचं भान न बाळगता एखाद्या सुपरहीरोसारखं अपरिमित मोठं केलं जातं. त्यासाठी सावंत वरवर अतीव आकर्षक भासेलशी संस्कृतप्रचुर विशेषणांनी लगडलेली भरजरी, अलंकृत भाषा वापरतात. कर्णाच्या आजूबाजूची पात्रं फिक्या-मचूळ रंगांत रंगवतात. इतकी, की कादंबरी वाचल्यावर त्यातलं फक्त कर्णाचं पात्र तेवढं आपल्या डोक्यात स्पष्ट ठसा उमटवून उरतं. थोडा-फार कृष्ण. बस. बाकी काहीही छाप पाडून जात नाही. ही काही चांगल्या कादंबरीची खूण नव्हे. याला फार तर एखादं गोडगोड चरित्र किंवा गौरवग्रंथ म्हणता येईल.

कदाचित मी फारच जास्त कडक निकष लावून पाहते आहे. एक ’एकदा वाचनीय पुस्तक’ या निकषावर आजही ’मृत्युंजय’ पास होईल. पण मग तिला मिळालेला ’मूर्तिदेवी पुरस्कार’? भारतातल्या नि भारताबाहेरच्याही भाषांमध्ये तिची झालेली भाषांतरं? तिच्या दोन आकडी आवृत्त्या? कुणीही मराठी कादंबर्‍यांचा विषय काढला की अपरिहार्यपणे तिचं घेतलं जाणारं नाव? ती वाचलेली नसली तर अपुरं समजलं जाणारं तुमचं वाचन? हे सगळं मिळण्याइतकी तोलामोलाची आहे ती?

सावंत, माफ करा, पण ’मॄत्युंजय’ इतकी मोठी नाही. तरी तिला मिळालेल्या इतक्या अफाट लोकप्रियतेमुळे तिच्यानंतर अशा प्रकारच्या चरित्रात्मक कादंबर्‍यांचं पेवच मराठीत फुटलं. इतिहासाला वा पुराणातली कोणतीही एक व्यक्तिरेखा उचलावी, तिला अपरिमित मोठं-भव्य-दिव्य-लार्जर दॅन लाईफ रंगवावं, तिच्या आजूबाजूला यथाशक्ती प्रेमकथा / युद्धकथा / राजनीतीकथा रचावी आणि एक सो-कॉल्ड यशस्वी कादंबरी छापावी, असं एक समीकरणच होऊन बसलं, हे ’मृत्युंजय’नं केलेलं आपलं नुकसान. तशा पुस्तकांची यादी करायला बसलं, तर मराठी वाचकांची कितीतरी ’लाडकी’ नावं बाहेर येतील...

पण आपला खो एकाच पुस्तकापुरता मर्यादित आहे. ’मृत्युंजय’वर माझ्यापुरता खिळा ठोकून नि कुर्‍हाड मिंट,  राज, गायत्री, दुरित आणि एन्काउंटर्स विथ रिऍलिटी यांच्याकडे सोपवत तो पुरा करतेय. संवेदचा खो तर घ्याच, शिवाय माझी ही खालची पुरवणीही जरूर घ्या.

माझी पुरवणी:

’खपाऊ पण पकाऊ पुस्तकं’ हा संवेदचा विषय वाचताक्षणी माझ्या डोक्यात ताबडतोब त्याला जुळा असलेला विषय आला होता. ’उत्तम पण उपेक्षित पुस्तकं’.

काही पुस्तकांना ती तितकी तालेवार असूनही मिळायचं तितकं श्रेय कधीच मिळत नाही. ती कायम उपेक्षित राहतात. नंदा खरे यांचं ’अंताजीची बखर’ हे ऐतिहासिक कादंबरीचा घाट असलेलं पुस्तक मी या खणात टाकीन. मराठी ऐतिहासिक कादंबरीतली कायमची-भव्य-दिव्य-जिरेटोपी व्यक्तिमत्त्व बाजूला सारून एका क्षुल्लक मराठी हेराच्या नजरेतून ही कादंबरी मराठी रियासतीतल्या एका मोठ्या कालखंडाकडे डोळसपणे (आणि तिरकसपणे) बघते. ती शब्दबंबाळ नाही. तिला उपरोधाचं नि पक्षी विनोदाचंही अजिबात वावडं नाही. त्यातली अस्सल रांगडी नि मिश्कील मराठी भाषा आवर्जून वाचावी अशीच आहे.

पण तिची म्हणावी तशी दखल घेतलेली ऐकिवात नाही. बर्‍यापैकी जुनी असूनही ती मी अगदी अलीकडे वाचली आणि हरखून गेले.

बहुतेक मराठी वाचकाला भव्य नसलेल्या इतिहासाचं वावडं असावं!

Friday, 22 June 2012

गोष्ट


एखादी गोष्ट आपल्याआत रुजवत जाताना कसं वाटतं ठाऊक आहे तुला?

मोठ्या काव्यमय कल्पना असतात लोकांच्या गोष्टीच्या जन्माबद्दल.
राजकन्या-गुलबकावली-परी-राक्षस-हिमगौरी-बुटके-उडते गालिचे... आणि तत्सम.
पण गोष्ट दिसते तशी असत नाही.

अरब आणि उंटाची गोष्ट माहीत आहे तुला?
त्या गोष्टीतल्या उंटासारखीच असते गोष्ट.
निर्दयपणे हात-पाय पसरत आपल्याला धीम्या-ठाम वेगानं बेघर करत जाणारी.
किंवा निर्लज्जपणे सूर्यासोबत पाठ फिरवत बेगुमानपणे जगत जाणार्‍या सूर्यफुलासारखी.

आजूबाजूला असणारा जिवंतपणाचा कण न् कण शोषून घेत रसरसून वाढत राहते ती आपल्या आत.
आपल्या शांततेवर पोसत आपलाच प्रकाश झाकोळून टाकत राहते,
जोवर आपल्या खिडकीत हिरव्यागर्द-काळोख्या-कातर फांद्यांच्या गच्च पसार्‍याखेरीज दुसरं काहीच उरत नाही.

तिला सोबत घेऊन फिरताना क्षणाक्षणाला कसोटी लागत राहते आपली.
आपल्या समजुती, दिलासे आणि हुंकार नक्की कुणाकरता आहेत?
बाहेरच्या या अफाट भीषण सुंदर जगात शूरपणानं वावरणार्‍या आपल्यासाठी,
की अंतरंग व्यापत जाणार्‍या या तितक्याच सुंदर भीषण निर्दय अस्तित्वासाठी?

या युद्धाच्या जखमा वरकरणी सहजपणे वागवत, दर क्षणाला अधिकाधिक मोडत
जगत राहतो आपण गोष्टीनं बाहेर येण्याचं ठरवेपर्यंत.
एखाद्या भुकेल्या अनुभवी श्वापदासारखे, वाट पाहत.

ती बाहेर येते.
आणि आपण अंतर्बाह्य रिकामे.
त्या क्षणी नेमकं काय वाटतं ते कळून घेण्याचंही भान उरत नाही.
नुसता रिकामा आर्त शिणवटा.

ठाऊक आहे तुला, गोष्ट आपल्या आत रुजवत जाताना कसं वाटतं ते?