नव्यानं सुरू झालेल्या दिवसांच्या छाताडावर गुडघे रोवून.
नव्या आयुष्याच्या झिंज्या मुठीत पकडून.
ओळीत लावलेल्या दिनक्रमाची रासवटपणे कॉलर पकडून.
अनोळखी आविर्भावाला एक खणखणीत मुस्काटात खेचून.
फिरवलेल्या पाठीला एक आईवरची शिवी बिनदिक्कत हासडून.
सगळ्या सगळ्या बेईमानीवर थुंकून,
तुझ्या पौरुषावर उमटलेली माझी लाखबंद मोहर तुझ्याकडे परत मागितली -
तर तू कसा दिवाळखोरपणे रस्त्यावर येशील नाही?
जखमी झालेल्या तुला कुशीत घेऊन तुझ्या ओठांवर ओठ टेकू शकेन मी फक्त.
मग तरी उतरेल तुझ्या ओठांवर माझी ओळख?
सांग ना, मित्रा.
***
मातीत बी रुजतं तेव्हा माती असते का सजग?
की सर्जनाच्या आनंदात भिजत असते ती देहामनाच्या पार?
म्हणूनच,
म्हणूनच बीज असं रुजतं तिच्या गर्भात?
अशाच कुठल्यातरी पावसात.
मीही होते देहामनासकटच्या आनंदात अपरंपार.
तेव्हाच रुजत गेलास तू माझ्यात.
असण्या-नसण्याचं भान आलं, तोवर ओटीपोट टपोरलं होतं माझं.
पाहता पाहता आकारत गेलास माझं सर्वस्व व्यापत
आणि मग ते भीषण द्वंद्वही गेलं माझ्यात साकारत.
रुजलेल्या बीजानं अंकुरणं हा त्याचा देहधर्मच.
पण आपण मिळून ठेचून काढायचा ठरवला हा अंकुर.
तेव्हाच लिहिलं गेलं असेल आपलंही भवितव्य त्यासोबत?
ठरवून आयुष्याकडं निकरानं पाठ फिरवावी
तसे माघारी वळलो आपण.
आणि जगण्याची ही लसलसती इच्छा
थोपवून धरली आतल्याआत.
सोपं नाही,
नव्हतंच.
जगण्याचे अंकुर इतक्या सहजासहजी मरत नसतात,
कळायचं होतं आपल्याला.
आपल्याच असण्याच्या भिंतींना वेढत चिरफाळत आत वळलेला तो अंकुर.
आता गर्भपातही संभवत नाही मित्रा.
आणि जन्मही.
***
किती कविता तुझ्या हातात अल्लाद ठेवत गेले
हात पोळले तरी -
आता समजत नाही.
तू कधी स्पर्श तरी केलास का रे त्यांना?
की ती नुसतीच एखादी फॉरवर्डेड मेल होती तुझ्यालेखी?
कुणीतरी कुठेतरी लिहिलेली एक कविता.
त्यात रुजलेले माझे श्वास.
माझे स्पर्श.
दुसर्या कुणाची कविता आपल्या आत अशी हिरवाळते,
तेव्हा आपली होते ना ती?
तीच तर तुला पाठवली अनेक वार.
कधी संपृक्त बी.
कधी एखाद्या सुगंधी खोडाचा तुकडा.
कधी नव्हाळलेली ओलसर पानं.
कधी फुटावलेलं एखादं वयोवृद्ध मूळ.
फळांचा ऋतू आपल्यात कधी आलाच नाही,
एकदम मान्य.
पण,
फुलांचा तरी आला का रे?
आता माझी बोटं हिरवी नाहीत.
फक्त पोळल्याच्या काही खुणा.
आणि आपल्या कविता उगवल्यात का कुठेतरी,
की निर्वंश झाला आहे आपल्या जातीचा,
आणि एखाच्या नामशेष होणार्या प्रजातीच्या शेवटच्या स्पेसिमेनसारखे
नाहीसे व्हायचे आहे इथून निमूट?
असल्या प्रश्नांनी चिन्हांकित नजर.
तुझ्या बागेत कुठली कुठली झाडं आहेत, बाय दी वे?
***
Full of shame, since I was not writing anything, I even didn't bother to check what others are writing. It's so criminal...
ReplyDeleteFirst one is ekdum "thor"
तुझ्या पौरुषावर उमटलेली माझी लाखबंद मोहर तुझ्याकडे परत मागितली -तर तू कसा दिवाळखोरपणे रस्त्यावर येशील नाही?
its like a circular reference...growing inside..growing outside
Didn't like second piece though.
From third one , especially last two lines are...aaha!
आता माझी बोटं हिरवी नाहीत.
फक्त पोळल्याच्या काही खुणा.
आणि आपल्या कविता उगवल्यात का कुठेतरी,
की निर्वंश झाला आहे आपल्या जातीचा
Believe me, this form is much better for many expressions!!!!
हम्म. फॉर्मचे प्रयोग अगदीच निरुपयोगी नव्हेत तर. जुन्या घरीच जास्त सुखात राहता येतं आहे, इतकं तरी कळतंच. ;-)
ReplyDelete