सध्या मी रोज एक नवे झाड लावून संध्याकाळी ते मुळापासून तोडण्याचा खेळ खेळते.
कसे आहे,
भवतालात झाडे असण्याची आपली खोड जुनी.
आपले म्हणावे - निदान म्हणावे - असे एक तरी झाड परसात असावे लागते.
पण
आपल्या दारात वाढून शेजारी फुले ढाळत,
आपल्याला बिनदिक्कत हिरमुसले करण्याची झाडांची खोडही जुनीच.
तेही ठीक.
दिवसातले काही प्रहर तरी, सावली तरी आपली म्हणावी...
बाकी फुलांची आणि पावसाची शाश्वती कुणी कुणाला द्यावी?
पण आपल्यासाठी बहरून आलेले एखादे झाड
हे असे पाहता पाहता वठत जाते आपल्यासाठी
नि आरडून वा मुकाट -
पाहत जाण्याखेरीज हाती काही उरत नाही
अशाही वेळा येतात.
तेव्हा खरे खरे आणि कायमचे दुखते.
झाड लावून आपण पाठ फिरवून हसत निघून जावे, इतकीही उमेद उरत नाही मग.
रोज नवे झाड लावून संध्याकाळी वैराण होण्यातला सुटवंगपणाच बरा वाटू लागतो.
अर्थात
झाडांच्या मर्जीचे काय -
असा अवसानघातकी विचार बाजूला सारण्याइतके बेगुमान व्हावे लागते.
पण ते एकदा जमले की,
विश्वास ठेवा अगर ठेवू नका, त्यासारखी दुसरी मजा नाही!
हां, पहाटे अगदी उजाड उजाड वाटते.
आणि संध्याकाळ ओलांडून रात्रीच्या प्रहरात पाऊल टाकताना पाऽर पोरके.
पण तितके तर...
तितके चालायचेच, नाही का!
झाडांनाही पोरके वाटते, खरे.
पण झाडांना निर्दयही होता येते,
हेही एकदाच समजून घ्यावे,
कारण आपल्यालाही कुणाकुणासाठी झाड व्हावे लागते!
तर -
हल्ली मी रोज एक नवे झाड लावून संध्याकाळी ते मुळापासून तोडण्याचा खेळ खेळते!
चांगलं लिहीलं होतस की..उगाच लपवलंस
ReplyDeleteवैराग्याचा झटका रे!
ReplyDeleteरोज नवे झाड लावून संध्याकाळी वैराण होण्यातला सुटवंगपणाच बरा वाटू लागतो.
ReplyDeleteकधी आपलेच झाड होऊन जाते... आणि मग ते संधीवैराग्य हवेसे वाटू लागते.
रुचलं.. !