Friday, 4 April 2008

वेळ

शब्द म्हणजे निव्वळ चिखल असं वाटण्याची वेळ येतेच,
आजची वेळ त्यातली.

जगातले यच्चयावत हिंदी सिनेमे,
सगळीच्या सगळी आयन रॅण्ड,
पाऊस, संध्याकाळ, भण्ण दुपार.
ही सारी आपल्या रक्तातली निव्वळ बेअक्कल,
असंही वाटण्याची वेळ येतेच.
शब्द म्हणजे निव्वळ चिखल हे कळण्याची वेळ येतेच.

ही विषकन्येसारखी आकर्षक जीवघेणी वेळ.
तिला स्पर्श करण्यासाठीही शब्दांचंच शरीर?
एखाद्या वखवखलेल्या ब्रह्मचारी बैराग्याचं प्राक्तन...
हे देहाला शरण जाण्यातलं वैफल्य?
की शरीराच्या सगळ्या सामर्थ्यांचे उत्सव?

उत्तरं फेकून मारता येतात,
तरी प्रश्न मरत नाहीत.
रस्ते चुकवता येतात,
देणी मात्र चुकत नाहीत...
ही समजूत रक्तात रुजून येण्याची वेळ कधी ना कधी प्रत्येकावर येतेच.
आजची वेळ त्यातली.

शब्द म्हणजे निव्वळ चिखल हे कळण्याची वेळ येतेच.
आजची वेळ त्यातली.

Sunday, 30 March 2008

नाटक

सगळं तसं वाह्यात संतापजनकच.

तुपकट लग्नसमारंभी उत्साह. नाटकाच्या वेळाशी अजिबात देणंघेणं नसल्यासारखी निवांत सरबराई. खाणं-पिणं, साड्यांचे लफ्फेदार पदर, गजरे-अत्तरं आणि भेटीगाठी. आता आलोच आहोत तर बघून टाकू नाटकपण, असा एकंदर नूर आणि आव मात्र संस्कृतीच्या जपणुकीची धुरा वाहायची असल्याचा. साधे मोबाइल्स सायलेण्ट मोडवर टाकण्याचं सौजन्य नाही. मग 'नाटकानंतर भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे', 'मंडळाचे सदस्य श्री. अमुक अमुक यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं' आणि 'आपल्यासोबत राहुल द्रविडचे आई-वडीलही नाटकाचा आस्वाद घ्यायला आलेले आहेत...' हे सगळं नाटकाच्या अनाउन्समेण्टसोबत हातासरशी उरकून घेणं आलंच.

अशा ठिकाणी हे इतपत चालायचंच, असं हजार वेळा स्वतःशी घोकूनही माझा चरफडाट थांबत नव्हता. त्यात पडदा उघडला, तरी चार-दोन चालूच राहिलेल्या दिव्यांची आणि नि:संकोच उघडमीट करणार्‍या दाराची भर.

पडदा उघडल्यावरही ही चिडचिड निवळावी असं काही घडेना. बोट ठेवायला तशी जागा नव्हती. चोख पल्लेदार आवाजातले संवाद. सहज वावर. विषयाला साजेसं नीटनेटकं नेपथ्य. आता प्रेक्षागृहात तशी शांतताही. पण कशात काही जीव म्हणून नव्हता. सगळं लक्ष एकवटून त्यात जीव रमवण्याचा प्रयत्न करूनही काही साधेना. हे सगळं कमी झालं म्हणून मधेच एकदा लाइट गेले. एकदा नटाची मिशी सुटली आणि सरळ माफी मागून तो ती लावायला आत निघून गेला.

मी आशा जवळपास सोडून दिलेली.

त्या प्रयोगाबद्दल खरं तर पुष्कळ वाचलं-ऐकलं होतं. त्याच्या विषयाचा वेगळेपणा. आशयाची ताकद. सापेक्षतावाद आणि जागतिक शांततेसारखे ऑलमोस्ट किचकट आणि गंभीर विषय असूनही एकाच पात्रानं ते पेलण्यातला करिष्मा.

पण सगळं समोर मांडलेलं असूनही कलेवरासारखं निष्प्राण. सोन्यासारखी रविवार सकाळ, ट्रॅफिकमध्ये तपःसाधना करून काढलेला दीड तास, न केलेला नाश्ता आणि काहीही कारणाविना डोळ्यांदेखत खचत गेलेल्या अपेक्षा. पाट मांडून रडावं की कसं, असं वाटायला लागलेलं. इतकी निराशाजनक परिस्थिती बदलू शकते असं मला कुणी म्हणालं असतं, तर मी त्याला सरळ आनंद नाडकर्णींकडे शुभार्थी म्हणून काम करायला रवाना केलं असतं.

नेमकं काय बदललं विचाराल, तर ते नाही सांगता येणार. डोक्यात जाणार्‍या मागच्या बाईच्या कुजबुजीपासून पंख्याच्या कुईकुईपर्यंत सगळं तसंच होतं. पण एकदम हवेनं कात टाकली जणू. नटाचा आवाज नेम धरून मारलेल्या एखाद्या भाल्यासारखा आपला वेध घेणारा. त्याची तगमग त्याच्या बोटांच्या अस्वस्थ हालचालींमधून, त्याच्या ओठांच्या सूक्ष्म कंपामधून, त्याच्या डोळ्यांत तरळलेल्या पाण्यातून एखाद्या एक्स्ट्रीम क्लोज् अपसारखी अंगावर येणारी. त्याच्यावर खिळलेले डोळे इकडेतिकडे जाईनात. त्याच्या स्वरातल्या चढ-उतारासोबत श्वास खालीवर व्हायला लागलेला आपलाही.

आसमंत जणू कसल्याश्या अनामिक ताकदीनं भारलेला. नटाचं शरीर-त्याचा चेहरा-त्याचा आवाज. बस. इतकंच उरलेलं सगळ्या जिवंत जगात. सगळ्या नजरा त्या बिंदूशी कसल्याश्या गूढ ताकदीनं खेचलेल्या. ताणलेल्या. त्याच्या एका इशार्‍यावर जणू हे बांधलेले-ताणलेले नाजूक बंध तुटतील, अशा आवेगानं विस्फारलेल्या.

नट?

तो या खेळातलं बाहुलं असेल निव्वळ?

एखाद्या मांत्रिकानं प्रचंड ताकदीनं विश्वातलं अनामिक काही एखाद्या वर्तुळात बांधावं आणि त्या ताकदीचा ताण त्याच्या रंध्रारंध्रात जाणवावा - समोरची ताकद कधीही स्वैर उधळेल आणि उद्ध्वस्त होईल सगळं. कधीही काहीही होऊ शकतं आहे - हा ताण त्याच्या नसानसांतला. आणि तरीही त्याचा तिच्यावरचा ताबा सुटत नाही. तिच्यावर जणू स्वार झालेला तो. तिला हवी तशी नाचवतो आहे आपल्या तालावर. आपल्या शरीरातल्या कणान् कणाच्या ताकदीवर.

भारलं आहे या झटापटीनं आसमंतातल्या सगळ्या चेतन-अचेतनाला...

तो या अनामिक ताकदीला लीलया खेळवतो.

हसवतो. रडवतो. जीव मुठीत धरायला लावतो. सुटकेचा नि:श्वास सोडायला लावतो...

मंतरलेले आपण जागे होतो, तेव्हा पडदा पडणारा. नि:शब्द शांतता. आणि रक्तातली प्रचंड दमणूक.

प्रेक्षागृहातली ही जादू ओसरून लोक भानावर आलेले. 'हे काय घडून गेलं' या आश्चर्यानं बावचळलेले. खुळचट हसणारे. हळूहळू हालचाल करून आपल्याच हातापायांतली ताकद आजमावणारे. पांगणारे.

नट?

चुपचाप मिशी उतरवत होता. रंग पुसत होता. फुललेला श्वास आवरत होता.

म्हटलं नव्हतं? सगळं तसं वाह्यात संतापजनकच.

Thursday, 13 March 2008

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?

डोक्याच्या तळाशी खळबळणारे काही प्रश्न आणि नुकतीच घडलेली काही निमित्तं. म्हणून हे इथं मांडते आहे. ब्लॉग लिहिण्याचा - खरं तर लिहिण्याचाच - खटाटोप करणार्‍या सगळ्यांनाच उद्देशून आहेत हे प्रश्न. काही अंदाज. काही बिचकते निष्कर्ष. काही निरं कुतुहल.

सहमत व्हा, विरोध नोंदवा, वेगळी मतं मांडा.... हे फक्त विरजणापुरतं -

आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं हा प्रश्न कधी पडलाय तुम्हांला? लिहिणं आणि आपण यांच्यातले हे विचित्र संबंध नक्की काय आहेत, याचा छडा लावण्याचा फॅसिनेटिंग खेळ कधी खेळावासा वाटलाय?

सहसा असं दिसतं, की प्रचंड उंची गाठणार्‍या कलाकारांना निदान सुरुवातीच्या काळात तरी त्यांच्या माध्यमाखेरीज कशातच फारशी गती नसते. म्हणजे, जर कुठे 'अहं' गोंजारला जात असेल, तर तो तिथे. बाकी सगळीकडे नुसतंच हाड्-तुड् करून घेणं. हरणं. माती खाणं. मग आपोआपच माणूस आपल्या माध्यमाचा आसरा घेतो. तिथे अधिकाधिक रमत जातो. अभिव्यक्तीसाठी चॅनेल सापडत नाही, म्हणून ते माध्यमाकडे ओढले जात असतील, की माध्यमावर इतकी पकड आल्यावर काहीतरी ओकून टाकावं असं वाटत असेल? की दोन्हीही? की अजून काहीतरी निराळंच?

आणि इतक्या सरावाचं, सवयीचं, जवळ जवळ गुलामाइतकं पाळीव-इमानदार माध्यमही जेव्हा चॅनेल म्हणून अपयशी-अपुरं ठरत असेल तेव्हा?

तेव्हा स्वतःवरचा विश्वास उडावा इतकी टोकाची निराशा-चीड-हतबलता येत असेल? की त्याही परिस्थितीत कुठे तगून राहता येईल तर ते तिथेच, असं वाटून माध्यमाच्या कोशात दडी मारून राहावंसं वाटत असेल? अजून निराशा.. अजून चीड... अजून तगमग. आणि तरीही काय होतं आहे स्वतःला ते नाहीच धड गवसत. आत काय तडफडतं आहे, ते नाहीच बाहेर येत.

तेव्हा?

माध्यम आणि त्या माध्यमावर इतक्या अपरिहार्यपणे - एखाद्या अपंग मुलासारखे - अवलंबून असणारे आपण या दोघांचाही तीव्र स्फोटक संताप येत असेल? आणि या ठसठसणार्‍या दुखर्‍या ठणक्यातून उसळून येत असेल काही?

की दर वेळी हे इतकं इण्टेन्स, इतकं झांजावणारं काही नसतंच?कधी नुसताच इगो सुखावणं? माध्यमावरची स्वतःची हुकूमत अनुभवणं? 'सराईतपणा' एन्जॉय करणं?

नक्की काय? की सगळंच?

लिहिणं म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय?

माझा खो संवेदला.

***


हा खेळ खेळायला चढत्या क्रमानं मजा येतच गेली, येते आहे. खरं तर खेळ अजून संपला नाही. पण आता साखळी लांबत चाललीय. अजून बरीच मंडळी लिहितील. तोवर साखळी एका ठिकाणी सापडावी, म्हणून थोडा खटाटोप -
"आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?" - संवेद
ठिपक्यांची न बनलेली रेषा... - ट्युलिप
मैंने गीतों को रच कर के भी देख लिया... - राज
I think, therefore... - सेन मॅन
फिर वही रात है... - मॉन्स्यूर के
माझिया मना जरा सांग ना... - विद्या
खो-खो, चिमणी, मंत्रा! - जास्वंदी
मी आणि पिंपळपान - संवादिनी
मी का लिहिते? - यशोधरा
जेव्हां माझ्या ego च्या हातून माझ्या id चं मानगूट सुटतं तेव्हां. - सर्किट

Wednesday, 12 March 2008

ऋतू

इथे सध्या कुठला ऋतू आहे कुणास ठाऊक. पण हवा अगदी नितळ सुरेख आहे. दुपारी अडीचच्या सुमारास घरी परततानाही त्या स्वच्छ सोनेरी हवेची आभा सगळीभर पसरून असते. रस्त्यावर डेरेदार झाडांची कमतरता नाहीच. पण त्यांच्या हिरवेपणात तजेला तरी किती! उन्हानं नुसती झगमगत असतात. त्यांच्या हिरवेपणात ऊन मिसळतं आणि सगळ्याला एक झळझळता अनोखा रंग येतो. अशा कित्तीतरी रेखीव दुपारी काचबंद करून ठेवून द्याव्यात असं वेड्यासारखं वाटून जातं मग. हातातलं पुस्तक, डोक्यातले विचार, बाजूचे लोक... असं सगळं बयाजवार असूनही ती उष्ण सुखद दुपार चढत जाते मला...

दुपारी झाडं मोठी देखणी दिसतात खरी. पण फुलं? ती मात्र उतरत्या दुपारीच भेटावीत. ऐन दुपारी फुलांनी बहरलेल्या एखाद्या वेड्या झाडाला पाहिलं, की त्याच्या सौंदर्याला दाद जाण्याऐवजी त्याची वेड्यासारखी काळजीच वाटते. त्या नाजूक नखर्‍याला सोसवेल का हे लखलखीत धारदार ऊन, असं वाटून डोळे भरून येतात...

याउलट कलत्या दुपारी घराजवळच्या वळणावर ही वेडी फुललेली झाडं नेहमी भेटतात. आणि दर वेळी त्यांना बघून तितकंच मनापासून खूश व्हायला होतं. पानं म्हणशील, तर नाहीतच. नुसतेच गुलाबी पाकळयांचे घोसच्या घोस. रंगही जर्रा म्हणून भडकपणाकडे झुकणारा नव्हे. फिका मऊशार राजस गुलाबी. तुझ्या लाडक्या गावठी गुलाबाची आठवण करून देणारा. ते असं फुलांनी मातलेलं झाड पाहताना आपल्यालाही अगदी वेडं व्हायला होतं.
मनात आपला खुळा गुलमोहोर उभा राहतोच... पण वाटतं, गुलमोहोर एखाद्या भटक्या कलंदर कवीसारखा. त्याच्या केशरी उधळणीत जे बंडखोर उधाण आहे, त्याची सर कशालाच यायची नाही. त्याचे ते लालबुंद तुरे कसे आपल्या नजरेलाही क्षणमात्र का होईना - बंडखोरीची वेडसर स्वप्नं दाखवून जातात. त्या उधाणाला पाहूनच संदीपनं लिहिलं असेल का, 'अस्वस्थ फुलांचे घोस...' असं वाटून जातं...
तसं या गुलाबी नखर्‍याचं नाही. विलक्षण शालीन, शांत-मर्यादशील सौंदर्य नजरही वर न उचलता एखाद्या रेशमी अवगुंठनात उभं असावं तसं याचं रूप. खाली गुलाबी पाकळ्यांचा अक्षरश: सडा. कुणी आपल्याच नादात त्या पाकळ्या तुडवत जातं, तेव्हा त्यातल्या गर्भित श्रीमंतीच्या जाणिवेनं खुळावून जायला होतं...

तसेच ते पिवळ्या फुलांचे घोस.
तशी सोनमोहोराची झाडं आपल्याकडेही असतातच. त्यांच्या हळदी पिवळ्या फुलांचा दिमाख वेगळाच. आधीच उताटल्यासारखी फुलतात ती, आणि त्यात त्यांचा मंद उत्तेजक गंध... पिवळाच असून कॅशिया त्या मानानं किती शालीन. त्याचा सौम्य पिवळसर रंग आणि वार्‍यावर झुलणारे आत्ममग्न घोस.. किती अनाग्रही स्वभाव त्या रंगाचा.
इथल्या पिवळ्या फुलांची जातकुळी या दोघांच्या बरोबर मधली. पातळ नाजूक पाकळ्या आणि तजेलदार सोनपिवळा रंग. अंगातली असेल नसेल तेवढी सगळी ताकद खर्चून मस्ती करणार्‍या वांड पोरासारखी फुललेली फुलंच फुलं. कित्ती बेगुमान स्वभावाची झाली, तरी दिवसभर उन्हाच्या नजरेला बेदरकारपणे नजर देऊन रात्रीला दमत असतील का ही, असं वाटून जातंच.

विलायती शिरिषाचं तसं अप्रूप नव्हेच. एरवी रस्ता पंखाखाली घेतो खरा तो. पण संध्याकाळी त्याच्या मिटलेल्या पानांखालून जाताना उगीच रडायला येईलसं वाटत राहतं. कागदीची गुलबाक्षी रंगाची भरजरी फुलंही आपल्याला तशी सवयीचीच.

माझ्या मुंबईकर नजरेला राहून राहून कौतुकाची वाटतात ती जांभळी किनखापी फुलं. उंचच उंच झाड. फांद्या अगदी संन्यस्त पर्णहीन. आणि त्यावर नाजूक व्हायोलेट रंगाच्या फुलांची पखरण. खाली पाकळ्यांची जांभुळलेली धूळ... त्या निळ्या-जांभळ्या रंगावर विश्वासच बसत नाही एकेकदा. व्यासांच्या त्या निळ्या कमळांचा रंगही असला तर असाच असेल, असं उगाच वाटून जातं...

ऋतू बदलल्यावर काय होईल या सगळ्याचं? बदलत्या ऋतूत निराळी फुलं असतील?

कदाचित फुलं नसतीलही...

खरंच, ऋतू पालटतो, तेव्हा काय होतं?

या उत्सुकतेपोटी तरी जीव रुजावा इथे. कोणास ठाऊक, ऋतू परतेलही...

Sunday, 24 February 2008

जगता जगता...

गर्भाशयातल्या अंधाराची स्पष्ट आठवण नाही उरली जगता जगता.

काही पुसट हृदयखुणा फक्त.
काही अनोख्या शांततेचे निरव प्रदेश.
सगळी दु:खं विसरून विसावावं अशा काही अंधार्‍या ऊबदार जागा.
कसल्याही हक्कांविना पोटाशी घेणारे काही कोवळ्या सावलीचे दगडी पार..

अशा प्रदेशांचे पत्ते नसतात कधीच. चालता चालता अवचित सापडून जाणार्‍या या भाग्यखुणा. पावलांना पुन्हा तहान लागलीच, तरी गवसतीलच याची काहीच शाश्वती न देणार्‍या. गूढ. आकर्षक. आश्वासक...

थेटराच्या अंधारात क्वचित सापडून जातो त्यांचा माग. काळोख उतरतो हलक्या मांजर-पावलांनी. पाहता पाहता क्षुद्र कुजबुजी विरत जातात. उत्सुक गाढ शांतता जन्म घेते आसमंतात. या शांततेला मरणाचा गर्द-भीषण वास नाही. जन्माच्या आतुरतेचा एक कोवळा गंध केवळ. उण्यापुर्‍या काही सेकंदांचं आयुष्य या शांततेचं. भारून टाकणार्‍या दमदार आवाजानं मेंदूचा कब्जा घेण्याआधीचं. या अल्पायुष्यामुळेच असेल तिचं गूढ सौंदर्य कदाचित.. आणि पोटाशी धरणारी जिवंत ऊबही.

कधी गाण्याच्या कोवळ्या सुरात सापडतात अशा प्रदेशांच्या वाटा. गाणी एकेकटी येतात थोडीच? गर्द रानात नेणार्‍या आठवणींच्या गूढ वाटांचं जाळं घेऊन येतात गाणी त्यांच्यासोबत. त्या वाटांवर पाऊल ठेवणं-न ठेवणं हातातलं नव्हेच. केवळ पूर्वसंचिताचं खुणावणारं आव्हान. शब्द, सूर आणि मधले अर्थानं भारलेले मौनाचे तुकडे. एकाच वेळी निवांत आणि कासावीसही करण्याची ताकद असणारे. त्यांच्या आव्हानाला सामोरं जायचं ताठ मानेनं. दोन हात करायचे असेल नसेल ती सगळी ताकद एकवटून आणि मग थकून विसावायचं तिथेच... कुणीच हटकायला नाही येणार तिथं, याचं आश्वासन उशाला घेऊन.

तशा कविता जीवघेण्याच. विषारी संवेदनांची शस्त्रं पोटात बाळगणार्‍या. विषकन्यांसारख्याच विश्वासघातकी आणि आकर्षकही. पण त्यांच्यापाशीही कधी कधी मिळून जातो हा मऊ अंधार. एकेका शब्दाचं बोट धरून हलके हलके उतरत जाव्यात एखाद्या खोल अंधार्‍या विहिरीच्या पायर्‍या, तशा अर्थाच्या तळाशी घेऊन जातात कविता कधी कधी. एखाददा पायाखालचा दगड निसटतोही, नाही असं नाही. मग कपाळमोक्ष चुकत नाही. पण हा धोका पत्करून त्या अंधारात पाऊल ठेवावं अशी लालबुंद रसरशीत स्वप्नं असतात कवितांच्या पोटी दडलेली.. क्वचित कधी बोटांना त्याचा निसटता स्पर्श होतो आणि जन्माला पुरेल अशी धगधगती ऊर्जा पाहता पाहता वस्तीला येते आपल्याआत...

एखाद्या दुर्मीळ भाग्यक्षणी माणसंही घेऊन येतात हे असे प्रदेश त्यांच्या पावलांसोबत. पुरेश्या अंतरावरून माणसं न्याहाळण्याची सुरक्षित सवय स्वतःला लावून घेतलेले आपण बिचकतो मग. काहीश्या अविश्वासानं मागे सरतो. अंग आक्रसून घेतो. पण एका जादूभरल्या क्षणी सगळी अविश्वासाची वर्तुळं विरून जातात आणि कुशीत शिरावं कुणाच्या, तसे नि:संकोचपणे नात्यात शिरतो आपण.

तश्या दुर्मीळच या गोष्टी... पण गर्भाशयाच्या पुसट आठवणी जागवणार्‍या... जगता जगता विसरून गेलेल्या त्या विश्वात परतून नेणार्‍या...

Monday, 11 February 2008

खरंच...

खरंच...
पावलांखालचे प्रदेश बदलत जातात.
सवयींचे संगही अलगद निसटून जातात.
पाहता पाहता आपल्याच स्वप्नांचे रंग बदलत जातात.

खरंच...
नात्यांमध्ये बदल होत जातात.
पण बदलांना वाढ म्हणावं, सूज म्हणावं,
की धीम्या गतीनं मृतावस्थेकडे होणारा अटळ प्रवास,
हे ठरवण्याची ताकद तर असतेच आपल्यात.

खरंच...
तू ही ताकद वापरण्याची हिंमत केली आहेस कधीतरी?
अमानुष ताकदीच्या प्रश्नांची ही भीषण लाट पेलली आहेस तू कधीतरी?
जगता जगता काय होतं इतक्या उत्कट नात्यांचं,
हा जीव शोषून घेणारा प्रश्न पडला आहे तुला एखाद्या बेशरमपणे ठणकणार्‍या संध्याकाळी?

खरंच...
अजून जाणवतात तुला माझे श्वास त्यांच्या धुंदावणार्‍या लयीसकट?
अजून जाणवतो माझा गंध तुझ्या स्वप्नांच्या अगदी निकट?
अजून चढतो माझा रसरशीत रंग तुझ्या अंगावर त्यातल्या सगळ्या सगळ्या छटांसकट?

नाही.
कसल्याच प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असावीत असा हट्ट नाही आता.
इच्छा असतील... पण त्यांच्याही मर्त्यपणाचा स्वीकार आहे आता.
सवयींचे प्रदेश आणि स्वप्नांची माती पाहता पाहता बदलत जाते आपल्याच नकळत हे कळतं आहे आता.

पण खरंच,
सगळ्या विध्वंसासकट
बदलणार्‍या रंगांसकट
जगताना स्वप्नं अपरिहार्यच -

हे शिकलो आहोत का आपण?
खरंच...

Saturday, 9 February 2008

...अफलातूनच!

आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडून हिस्टेरिकली हसायला येणं एकूण अफलातूनच.

उदाहरणार्थ ऑफीसमध्ये एका भिकार डॉक्युमेण्टमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करून मी प्रचंड दमलेली. आत्ता चहासाठी ब्रेक घेतल्यास किंवा निवांतपणे गूगल टॉक उघडल्यास नवा मॅनेजर आपल्यावर कितपत खूश होईल हा विचार चेहर्‍यावर दिसू न देता साळसूदपणे कामात दंग.

एवढ्यात एक आंग्लाळलेली बया एक म्युझिक सिस्टिम घेऊन अवतीर्ण होते. 'इट्स टाइम टू एक्झरसाइज्' असं म्हणते आणि गर्दीनं भरलेला, मरगळलेला प्लॅटफॉर्म दूरवरची लोकल पाहून जसा एकदम सळसळतो, तसं अवघ्या ऑफीसमधे एकदम चैतन्य सळसळतं.

काही लोक उघडपणे दात काढत बाहेर पडतात.
काही लोक 'आपल्याला देणंघेणं नाय' अशा मख्ख आविर्भावात मॉनिटरमधे घुसतात.
काही लोक सूर्यफूलसदृश तत्परतेनं तिच्याकडे तोंडं वळवतात.
काही लोक शीपिशली हातातली कामं टाकून, खुर्च्या बाजूला सारून जागीच उभे राहतात.

आणि भर ऑफीसमधे दोन क्युबिकल्सच्या मधल्या जागेत ती एरोबिक्सचा वॉर्म अप् सुरू करते.

जेन फोंडा माझी आई असल्याच्या थाटात निर्विकारपणे आणि सराईतपणे एरोबिक्स करताना मला वाह्यात हसायला यायला लागतं.

आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडणं एकंदरीत मस्तच.

उदाहरणार्थ एकाच सिग्नलला तीन प्रदक्षिणा घालूनही मला घर सापडतच नाही. पत्ता तोंडपाठ. पण जायचं कसं विचाराल तर आपली बोलती बंद. बरं, मला नाही तर नाही, रिक्षेवाल्याला तरी माहीत असावं? नपेक्षा त्यानं ते कुणाला तरी विचारावं? पण एकतर तो अभिजात मंदबुद्धी तरी असावा किंवा स्वतःच्याच शहरात कुणाला पत्ता विचारण्यानं त्याचा इगो दुखावणार असावा.

परिणामी आम्ही मारतोय आपल्या गरागर चकरा एकाच सिग्नलला.

शेवटी मी बळंच रिक्षा थांबवून त्याला त्याची दक्षिणा देऊन टाकते आणि ट्रॅफिक पोलिसाकडे मोर्चा वळवते. 'कन्नडा बरुन्दिल्ला' हे माझं कन्नडचं ज्ञान, 'व्हेअर गो?' हे पोलिसाचं इंग्लिशचं ज्ञान आणि आजूबाजूच्या तत्पर लोकांचं कामचलाऊ हिंदी यांच्या बळावर माझी वरात स्वगृही पोचते.

आणि पगार ठरवताना कोळणीला लाजवेलशी हुज्जत घालणार्‍या आणि दिवसभर होता होईल तेवढी उद्धट अडवणूक करणार्‍या एचआरवाल्या मॅनेजरचा फोन येतो - डिड यू रीच सेफली? आय वॉज वरिड् यू नो...

मी नीट सुखरूप पोचलेय. आता कॅबचा पिक अप्-ड्रॉप मिळेपर्यंत मी घरी पोचल्यावर एक मिस्ड् कॉल देत जाईन... हे त्याला पटवून देता देता मला परत अनावर हसायला यायला लागतं.

कुठे येऊन कुणासोबत काय चाललंय!

अशीच एक भयानक उदास संध्याकाळ. आपण म्हणजे एक गरीब खाणकामगार असून एकटेच जन्माला आलो आहोत व एकटेच मरणार आहोत, अशा प्रकारचे भीषण विचार डोक्यात चालू. वेळ सरकता सरकतच नसलेला. आपण असेच मरून गेलो तरी कुणाला काही कळणार नाही, असं वाटण्याच्या सुमंगल मुहूर्तावर जुन्या मित्राचा फोन येतो.

माझे बारा वाजलेले त्याला कळू नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न करून मी हसरा आवाज काढण्याच्या प्रयत्नात असतानाच साहेब सेण्टी होतात. 'आता गप्पांचा अड्डा बसत नाही. सगळे एकेकटे आपापला जीव रमवत असतात. मला प्रचंड एकटं वाटतं. तिकडे एखादी नोकरी मिळेल काय..' या त्याच्या एकंदर मूडवर मी उत्तरादाखल भली मोठ्ठी उपदेशाची फैर झाडते.

एकटं असण्याची सवय करून घेतली पाहिजे..
नाही तिथे इमोशनल होऊन कसं चालेल..
सेल्फ पिटी बंद करायला कधी शिकणार..

या वाक्यावर मला इतकं हसायला का येतंय ते बिचार्‍याला कळतच नाही.

काही म्हणा, आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडून हिस्टेरिकली हसायला येणं एकूण अफलातूनच.

Friday, 11 January 2008

विरासत

तशी पूर्ण कोरी पाटी असूच शकत नाही, हे कबूल. पण तरी दर वेळी ’यांनी आमच्यावर अत्याचार केले, आणि आम्ही षंढासारखे त्यांचं वैभव पाहतो आहोत’ हा चरा वागवायलाच हवा का सोबत?

’आमच्यावर’मधल्या धर्माचा संदर्भ देणार्‍या आणि केव्हाच मरून गेलेल्या लोकांशी नातं जोडणार्‍या या धाग्याबद्दल मी पूर्णपणे उदासीन असल्यामुळेही असेल - आवारातली हरणं आणि मोर वाखाणायला मी मोकळी होते. उलटल्या शतकांतल्या हिंदू-बिंदूंवरच्या अत्याचाराचा माफकसुद्धा सूड काढण्याची जबाबदारी माझ्यावर नव्हती. पण मग उलट्या टोकाकडून समाजवादी गळेकाढू कौतुकं होऊ नयेत आपल्याकडून, म्हणून सतर्क राहण्याची, स्वखुशीनं पत्करलेली एक जबाबदारी होतीच.
म्हणजे पूर्ण कोरी पाटी नव्हेच.

उतरत्या उन्हाचा सोनेरी रंग, गार वारा आणि चक्क हलकासा पाऊस. बाहेरून काहीच अंदाज येऊ नये इतकं विस्तीर्ण प्रांगण आत शिरल्यावर एकदम सामोरं येणारं. पुन्हा तोच घाट. आता काहीसा परिचित झालेला... आत मात्र त्या वास्तूच्या पोटात उतरणारा काळोखा अरुंद लांबलचक रस्ता. मनावर कसलंसं दडपण आणणारा. आणि मग एक संपूर्ण मोकळी मोठ्ठी खोली. मधोमध एक साधीशी कबर आणि तिथे घुमणारी कुजबुज.

अकबरानं ही कबर त्याच्या जिवंतपणीच बांधायला घेतली होती हा अनोखा तपशील बाहेर पडताना कळला आणि मग त्या साध्या अनलंकृत कबरीचे नि त्यावरच्या दिमाखदार वास्तूचे सगळे संदर्भ उलटे-पालटे झाले. या वेळी कुणीतरी परत ’थडगं तर आहे’ अशी संभावना केल्यावर अकबराच्या वतीनं मी विनाकारण चिडले आणि ’आळंदीला नाही का थडगं ज्ञानेश्वरांचं? की ती तेवढी हिंदूंची असल्यामुळे पवित्र समाधी?’ असा उद्धट खोचक प्रश्नही विचारला.

पण नावं काहीही द्या. समाधी. कबर. किंवा थडगं. व्हॉटेव्हर...

आणि ताजमहाल?

त्या वास्तूचं सगळं सौंदर्य तिनं साधलेल्या तोलात आहे. दोन्ही बाजूंच्या गुलाबी दगडातल्या चिरेबंदी घुमटांनी तोलून धरलेली ती मधली हिर्‍यासारखी नाजूक, नजर लक्कन कापणारी वास्तू. तिच्या मृदू रूपावर नजर ठरत नाही. तसाच तिच्या आसपासचा आदबशीर शांततेचा पैस. तिन्ही दिशांच्या महाद्वारांतून मुख्य द्वारापाशी आणून सोडलेला गतीचा आवेग तिथे जणू अदबीनं रेंगाळतो. आणि मग चुपचाप, हलक्या पावलांनी काळोखात पाय बुडवून हलकेच महालापुढच्या विस्तीर्ण प्रांगणात येतो. इतका वेळ उजेडाचं रोखून धरलेलं भान अचानक जणू उधळून दिल्यासारखं होतं आणि आपण त्या मर्यादशील काळोख्या घुमटाखालून एकदम प्रकाशात उडी घेतो. तिथे खेळवलेलं पाणी, हिरवीचार झाडं, रंगीत फुलं आणि मधल्या विस्तीर्ण प्रांगणात उधळलेली खूप सारी माणसं. हा सगळा उधळलेला आवेग पुन्हा एकवर एकवटतो - फोकस्ड होतो - तो थेट या वास्तूच्या पायांशी जाऊन थांबल्यावर. अनवाणी पावलांनी तिथले काहीसे अंधारे जिने चढून जाताना परत एक दिमाखी शांतता आपल्यावर राज्य करत जाते. इतका वेळ सैलावलेले-उधळलेले-खिदळणारे आपण त्या चार उंच मिनारांच्या, तिथून निराळ्याच दिसणार्‌या भव्य, जरबदार आणि तरीही आपल्याश्या वाटणार्‌या जादुई रूपाकडे पाहताना गप्पगप्पसे होत जातो. पायांखालची किंचित चरबरीत लाल-पांढरी फरशीही आता मऊ सोनसळी स्पर्शाची, मोतिया रंगाची झालेली. संगमरवरात कोरलेली नाजूक जिवंत कमळं आणि एखाद्या गूढ काव्यमय नक्षीसारख्या उर्दूतून कोरलेले आयते.

आत शिरताना आपण निव्वळ शांत-स्तब्ध झालेले. मृदावून गेलेले. कुणाच्याही समाधीपाशी जाताना व्हावी अशी मनाची गंभीर आबदार अवस्था. आणि हे सारं निव्वळ वास्तूच्या परिणामानं साधलेलं. त्या बापड्या मुमताज वा शाहजहानबद्दल काडीचा आपलेपणा वा ओळख नसतानाही.

दी ताज. तेजोमहल. थडगं. व्हॉटेव्हर...

धर्म, राज्यकर्ते, जुलूम-अत्याचार, कल्याणकारी राजवट, प्रीती, विखार...

काय राहतं मागे? कला? स्फूर्तिस्थान? धर्मप्रेमाचं प्रतीक?

की निव्वळ वारसा? सगळं सामावून घेणारा? शरणागत प्रवाही स्वागतशील संस्कृतीचा? तोच तेवढा खरा फक्त बहुधा..

Thursday, 6 December 2007

शो मस्ट गो ऑन, यू नो!

कविता. युद्ध. शृंगार. लालभडक मत्सर. रक्तपात-दंगली-खून. चळवळी-क्रांत्या आणि पुन्हा पुन्हा जन्म घेणारी कविता. एकाच चिरंतन तत्त्वाचं अव्याहत चक्र जणू...

आपल्या सगळ्यांमधलं हे जे स्पिरिट असतं ना, त्याला संस्कारांनी खूप आकार-उकार देतो आपण. वेळोवेळी काबूत ठेवतो स्वत:चेच सगळे अनावर विकार. तो संयम महत्त्वाचा खराच. पण निरोगी जिवाचं हे तडफडणारं स्पिरिट असतं ना, ते असं शांत नाही बसत. 'माझ्यात काय कमी आहे, म्हणून मी जाऊ देईन ही जगण्याची संधी' असं ज्या त्वेषानं म्हणत असेल एखादा निरोगी, चपळ, सुदृढ, नीती-अनीती न जाणणारा एखादा चित्ता भक्ष्यावर तुटून पडताना; त्याच त्वेषानं जागी होते मनातली ईर्ष्या. नीती-अनीती न जाणताच.

"मला तू हवा आहेस आणि तुलाही मी, मग का मानायचे हे संयमांचे बांध? हा कसला निसर्गाचा अपमान?"

असा रोखठोक प्रश्न यमी यमाला विचारते. ते रक्ताने भाऊ-बहीण असल्यामुळे त्यांना शरीर संबंध शास्त्रानं निषिद्ध सांगितलेला.
हाच प्रश्न विचारते निर्भयपणे लोपामुद्रा अगस्तीला. त्याला संयमानं शरीराची वासना जिंकायची आहे, म्हणून तो तिला शरीरसुख देऊ इच्छित नाही, तो तिचा पती असूनही.
हाच प्रश्न विचारते इंद्राणी इंद्राला. त्याला आता तिच्यात रस नाही उरलेला. एकेकाळी त्यांनी धुंद प्रणय अनुभवलेला असूनही. त्याचं सारं लक्ष जिंकलेलं जग वसवण्यात लागलेलं.
हाच प्रश्न विचारते अंबा भीष्माला. ती स्वत:चं क्रुद्ध तारुण्य घेउन उभी आणि तो मात्र कुरुकुलासाठी सगळ्या कोवळ्या भावना होमून मोकळा झालेला.

पुरुष आणि प्रकृती यांच्यातला हा सनातन वाद. पार वेदकाळापासून चालत आलेला.

आपल्यातला हा वाट्टेल त्या परिस्थितीत जगू पाहणारा लसलसता, फोफावणारा, संस्कृतीला जणू जन्म देणारा कोंब खरा? की संयमाचा-संस्काराचा, संस्कृतीला घडवणारा-आकार देणारा बांध खरा?

कदाचित दोन्हीही. कुणास ठाऊक...

तुला फार आवडणारा कर्ण. त्याचंही तसंच नव्हे का?
तसा कर्ण कुणालाही आवडतोच. कुठल्याही न्यायी, स्वाभिमानी माणसाला आवडावा असाच आहे तो. वाट्याला आलेलं सगळं मुकाट पचवून नशिबालाच मान खाली घालायला लावणारा. अबोलपणे सगळे सगळे मान-अपमान हसत जगून जाणारा.

पण मला कृष्ण जास्त जवळचा वाटत आला आहे नेहमीच.
त्याचं ते सगळं उधळून कुठल्याही गोष्टीत स्वत:ला अर्पून घेणं मोहवतं मला. उतू जाणार्‌य़ा दुधासारखं त्याचं व्यक्तिमत्त्व... अस्सल कलावंतासारखं स्वत:ला जगण्याच्या उल्हासात होमू पाहणारं.. उतू जाणार्‍या दुधासारखं... होमून टाकणारं... किती अर्थपूर्ण शब्द वापरले आहेत दुर्गाबाईंनी... तसाच आहे तो. गोकुळात यशोदेचा आणि राधेचा. मग रुक्मिणी-सत्यभामेचा. मग भीमार्जुनांचा. मग यादवांचा. एकातून दुसरं व्यक्तिमत्त्व जणू उमलत जातं त्याचं. बासरी, रथाचे बंध, तत्त्वज्ञान आणि धनुष्यही. सगळंच कसं उत्कट-संपूर्ण-भरभरून केलेलं. संयम विसरून.

याउलट कर्ण. परिस्थितीनं त्याला धगधगणारा संयमच शिकवला फक्त. सतत स्वत:मधल्या तेजाला आवर घालत जगण्याची मुलखावेगळी सक्ती. जणू सगळा ज्वालामुखी कोंडून धरलेला असावा छातीत असा कोंडून धरलेला अनावर आवेग.

दोन्ही जणू एकाच शक्तीची रूपं. एक उसळणारं. एक बांधलेलं.

हाच का तो बेसिक फरक? द्रविड आणि तेंडुलकरमधला? नसीर आणि अमिताभमधला?

तुझ्या आणि माझ्यामधला?

कोण महत्त्वाचं? कोण बरोबर? कोण खरं?

कदाचित दोन्हीही खरेच. कुणास ठाऊक...

आपण आपापले हट्ट हट्टानं लावून धरायला हवेत मात्र! शो मस्ट गो ऑन, यू नो!

Monday, 3 December 2007

I'm just being foolishly absurd!

अशीही काही युद्धे खेळावी लागतात,
ज्यात निर्णायक पावलांनी आणि निर्विकार चेहर्‌यानं
पराभव एखाद्या डोंबासारखा उभा असतो
पुढच्याच टप्प्यावर.
आपण प्रॅक्टिकल शहाणपणा इत्यादी दाखवून
साळसूद माघार घ्यायची आहे की
पाठ फिरवण्याचा प्रॅक्टिकल निर्णय घेणार्‌या
आपल्याच सूर्याजी पिसाळांची मानवी मजबुरी क्षमाशीलपणे स्वीकारत,
बेमुर्वतपणे रक्तबंबाळ होत
पुढे घुसून ताठ मानेने मरायचे आहे
इतकाच वाव उरतो निवडीला.
युद्ध जिंकणे वा हरणे अशा वेळी अगदीच बिनमहत्त्वाचे झालेले.
डोळ्यांत उतरलेले गरम लालबुंद आवेगी रक्त
आणि डोक्यात उरलेले
'मागे फिरायचे नाही-' इतकेच तुटक वेडसर शब्द.
बाकी सगळे आपल्या जगातले नव्हेच.
अशा वेळी रक्तातला वेडसर मुरारबाजी जिंकतो
की रक्तातच दबा धरून बसलेल्या डार्विनच्या बिलंदर पेशी जिंकतात...
इतकेच पाहायचे खरे तर.
अशा वेळी काय करतात
ते खरे तर मला अजूनही उमगलेले नाही.
जीव वाचवून मुकाट खरीदावेत
शहाण्या रसिकासारखे
पिंजर्‌यातले लव्हबर्डस् इत्यादी
की झाला-न झालेसा
स्वप्नांचा राजवर्खी उदास स्पर्श जपावा
बोटांवरला?
प्रश्न मोठे भाग्याचे...
या असल्या प्रश्नांची उत्तरे देता येणे दूरच राहिले,
असले प्रश्न पाडून घेणेही आचरट आणि आत्मघातकी मानले जाते तुझ्या जगात.
माफ कर मित्रा...
I'm just being foolishly absurd!