Wednesday 8 June 2022

होय, मी हे अजून बघितलं नव्हतं - २

अमोल उदगीरकरच्या 'न-नायक'चा एक निराळा परिणामही झाला. मधल्या काळात प्रियकर, प्रेमभंग, मैत्र, मैत्रभंग या सगळ्या हार्मोनल भानगडींमध्ये मेनस्ट्रीम हिंदी सिनेमे बघणं या आपल्या अवतारकार्यावरून आपलं लक्ष्य भलतंच विचलित झालं असल्याचा साक्षात्कार झाला, अपराधीपण आलं. परिणामी 'न-नायक' एखाद्या संदर्भग्रंथासारखं हाताशी घेऊन मी राहिलेले सिनेमे बघायला घेतले. या मालिकेतली टिपणं अशी जुन्या, राहून गेलेल्या सिनेमा-मालिकांविषयीची असतील.

| २
~

न्यूटनमला आवडला की नाही? मला सांगता येत नाही.


त्याचा पोत आणि पट कादंबरीसारखा सर्वसमावेशक नि विस्तीर्ण नाही. ना तो काळाच्या भल्या मोठ्या पटावर वसलेला आहे
, ना तो व्यवस्थेच्या यशापयशाची कारणं खोलात जाऊन तपासत. तो एखाद्या लहानश्या पण भेदक कथेसारखा आहे.

नक्षलग्रस्त भागातल्या एका मतदानाच्या दिवसाची गोष्ट. त्या दिवसाच्या रंगमंचावर येतात ती पात्रं, एखाद—दुसर्‍या जोरकस संवादाच्या फटकार्‍यानिशी दिसतील तितके त्यांचे इतिहास-भूगोल, त्यांच्यासमोर आणि भोवताली असलेली परिस्थिती, आणि त्या परिस्थितीला प्रतिक्रिया देताना त्यांनी घेतलेले निर्णय. पार्श्वभूमीला भारतीय लोकशाही नावाचा भला मोठा निष्प्राण, सुस्त भासणारा पट. या कथेदरम्यान पात्रांच्या आयुष्यात जे काही घडतं त्याला त्याचे संदर्भ आहेत. पण ही एकतर्फी वाट नाही. ही पात्रंही त्या पटाला नवनवे अर्थ प्रदान करतात. व्यवस्थेत काम करणारी माणसं आणि व्यवस्था यांच्यातल्या देवाणघेवाणीची ही गोष्ट.

आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागांतल्या मतदानामागे अनेक प्रवाह सळसळत असतात. जंगलाखालच्या जमिनीतल्या खनिजांची समृद्धी, सैन्यानं गावकर्‍यांशी वागताना अवलंबलेले भलेबुरे मार्ग, लोकनेत्यांचा या सगळ्याशी जराही संबंध नसणं, नक्षलवाद्यांची अदृश्य पण सततची दहशत, सगळं काही कागदोपत्री धड होण्यातच रस असलेली एखाद्या अजगरासारखी व्यवस्था, पैशाखेरीज निरनिराळ्या प्रकारचे भ्रष्टाचार, आणि जनतेला काय हवं आहे, या प्रश्नाचा विचार करता या सगळ्या गुंत्याचं आ वासून उभं ठाकणारं निरर्थकपण. हे सगळं न्यूटनअचूक पकडतो.

तसं करताना काही ठसठशीत आणि मानवी पात्रं रेखाटतो. रात्रीच्या अंधारात वापरण्याचे गॉगल्स मिळत नाहीत म्हणून भडकलेला, आपल्या टीममधल्या पोरांच्या जिवाच्या काळजीनं सगळं लवकरात लवकर गुंडाळू बघणरा संरक्षण अधिकारी – पंकज त्रिपाठीनं हे काम केलंय. तर बदल घडवून आणण्याच्यापुस्तकी, भाबड्या आदर्शवादी कल्पना उराशी घेऊन असलेला सणकी निवडणूक अधिकारी न्यूटन कुमार – राजकुमार राव. दोघंही आपापल्या जागी बरोबरच आहेत. त्यांना रागलोभ, हताशा, खवचटपणा, विनोदबुद्धी, सदसद्विवेकबुद्धी... असं सगळंच आहे. त्यांच्यामधली रस्सीखेच हा कथेतला मुख्य संघर्ष. पण रघुवीर यादवांनी रंगवलेला, किंचित-लेखकपण बाळगून असलेला सिनिकल सरकारी कारकून आणि अंजली पाटीलनं रंगवलेली आदिवासी समाजातली तरुणी ही पात्रंही महत्त्वाची आहेत.

कुठल्याश्या जुनाट मासिकातली कथा वाचून एकमेकांचा जीव रिझवणारे सैनिक, सामोपचारानं भांडण सोडवू बघणारा आदिवासी मुखिया. आणि काही प्रसंगांपुरताच भेटून जाणारा, संजय मिश्रानं रंगवलेला निवडणूक प्रशिक्षण अधिकारी. तुम्हारी प्रॉब्लेम क्या है पता है? तुम्हे अपनी इमानदारी का घमंड है.असं न्यूटन कुमारला - त्यानं सुनावलेलं वाक्य सिनेमाच्या शेवटी, न्यूटनकुमारला वक्तशीरपणाबद्दल मिळालेलं प्रमाणपत्र बघताना पुन्हा आठवतं. वर्तुळ पूर्ण होतं.

ही पात्रं लक्ष्यात राहतात. ते त्याचं बलस्थान आहेच. पण या जगड्व्याळ व्यवस्थेची, तिच्या प्रश्नांची, ताकदीची, अपयशाची... काही मोजकी क्षणचित्रं दिसून लुप्त होतात, बस. एक पार्श्वभूमी यापल्याड त्यांना काहीही भवितव्य नाही.

हाच न्यूटनमधला कमकुवत दुवा.

1 comment:

  1. तुम्हे अपने इमानदारी का घमंड है, हे मला परफेक्ट पोचलं होतं. आणि राजकुमार राव ते व्यवस्थित उतरवतो

    ReplyDelete