Friday, 10 June 2022

होय, मी हे अजून बघितलं नव्हतं - ३

अमोल उदगीरकरच्या 'न-नायक'चा एक निराळा परिणामही झाला. मधल्या काळात प्रियकर, प्रेमभंग, मैत्र, मैत्रभंग या सगळ्या हार्मोनल भानगडींमध्ये मेनस्ट्रीम हिंदी सिनेमे बघणं या आपल्या अवतारकार्यावरून आपलं लक्ष्य भलतंच विचलित झालं असल्याचा साक्षात्कार झाला, अपराधीपण आलं. परिणामी 'न-नायक' एखाद्या संदर्भग्रंथासारखं हाताशी घेऊन मी राहिलेले सिनेमे बघायला घेतले. या मालिकेतली टिपणं अशी जुन्या, राहून गेलेल्या सिनेमा-मालिकांविषयीची असतील.

। ३

~

रणविजय सिंग हे इरफान खाननं रंगवलेलं 'हासिल'मधलं पात्र. मागासवर्गीय समाजातून आलेला कायद्याचं शिक्षण घेणारा रणविजय 'हासिल'चा हीरो आहे. पण अशा मागास जातीतल्या, डोळ्यांना पोटं असलेल्या कुरूप, दळिद्री पुरुषाला ...भलेही तो शिक्षण का घेत असेना, जिगरबाज का असेना, प्रेमासाठी मरायला तयार का असेना... त्याच्या प्रेमात कोण पडणार? त्यानं मेलंच पाहिजे. आणि तो मरतो. 'सीना तान के'मरतो. तिथेच 'हासिल' संपतो खरा म्हणजे. पण नंतर जे काही होतं पडद्यावर, ते बघताना अधिकच अस्वस्थ व्हायला होतं.

'हासिल'मध्ये महाविद्यालयीन राजकारण आहे हे फारच मोठं अंडरस्टेटमेंट होईल.

शिक्षक आणि शिक्षण नामक निरुपयोगी गोष्टींची तिथे होणारी अ‍ॅबसर्ड कुचेष्टा, राजकारण्यांनी त्याला आणलेलं आखाड्याचं स्वरूप, ओतलेला पैसा, चालवलेला हिंसाचार आणि उपटलेले फायदे... हे सगळं गेली काही वर्षं सिनेमा चित्रित करतो आहे. 'युवा', 'गुलालयांसारख्या सिनेमांच्या केंद्रस्थानी, तर 'सैराट'सारख्या सिनेमाच्या पार्श्वभूमीला हे सातत्यानं दिसत राहतं. तिथल्या हिंसाचाराइतकंच अस्वस्थ करतं, ते त्याही परिस्थितीत जमेल ते तूप आपल्या पानावर ओढून घेण्याचा प्रयत्न करत, मान तुकवत, घाबरत तिथे शिक्षणाचं नाटक मन लावून करणारे सर्वसामान्य विद्यार्थी आणि शिक्षक. 'हासिलअशा सिनेमांपैकी एक.

रणविजय, अनिरुद्ध, निहारिका हा 'हासिल'मधला प्रेमाचा त्रिकोण. पण वरकरणी दिसतो, तसा तो एकाच स्त्रीच्या प्रेमात पडलेले दोन पुरुष असा सर्वसाधारण त्रिकोण नाही. अनिरुद्ध सर्वसामान्य तिकीट तपासनिसाचा कनिष्ठमध्यमवर्गीय मुलगा. अभ्यास, नाटकात अभिनय, चिकणा-गोरापान चेहरा, हळुवार प्रेम वगैरे करणारा. निहारिका ठाकूर घराण्यातली, श्रीमंत घरातली मुलगी. सुंदर, कोवळी, बापाविरुद्ध किंचित बंड करणारी. रणविजय सगळ्या अर्थांनी त्यांच्याहून निराळा. तो मागासवर्गीय आहे, महाविद्यालयीन राजकारणातल्या गुंडगिरीच्या 'अरे'ला 'कारेकरण्याची नुसती हिंमतच नव्हे, तर पलट वार करण्याची खुजलीही त्याच्यात आहे. तो घरातल्या लोकांच्या खुनाचा बदला घेताना जराही डगमगत नाही. त्याला डोकं तर आहेच, पण वाचनानं नवं जगही दिसू लागलं आहे. अनिरुद्ध आणि निहारिका यांच्या सुबक-नेटक्या-रोमॅंटिक जगात जगण्याची, त्याच्यासारख्या माणसाचा बळी घेऊ शकणारी, जीवघेणी आस त्याला आहे. वासनेची जी ठिणगी त्याच्या मनात निहारिकासाठी फुलते आहे, तीच ठिणगी त्याला अनिरुद्धमधल्या 'कलाकारा'कडे आकर्षित करते. त्याला भाई, मुन्ना म्हणून पंखाखाली घ्यायला लावते.

दुसर्‍या बाजूनंं, अन्याय न साहणार्‍या कलावंंत मनाला मळल्या वाटेपल्याड जाणार्‍याबद्दल वाटणारं आकर्षण, अनिरुद्धला रणविजयबद्दल आहे. 

त्या अर्थानं हा त्रिकोण लोकविलक्षण आहे... 

या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक उच्चवर्णीयांचे राजकीय लागेबांधे, रणविजयच्या महत्त्वाकांक्षा आणि वासना, आणि निहारिका-अनिरुद्धचं प्रेम या सगळ्यात जे काही घडतं, तो 'हासिल'.

त्यातल्या रणविजयच्या पात्राबद्दल पोटात कालवून येतं. पोरींनी धुतकारल्यावर "अब का करे हमरी ऑंखे ऐसी हैं तो...म्हणून कासावीस होणारा, हाणामार्‍या करतानाही पोरीच्या सुंदर केसातली रिबिन खेचून तिला अदबीनं जाऊ देणारा, पोरीचा कपटानं कब्जा घेण्यासाठी तिच्याशी गोड बोलतानाही तोंडात वेलची ठेवण्याची तमीज आणि न्यूनगंड असणारा रणविजय. आपल्यापायी मेलेल्या साथीदारांसाठी रडणारा आणि घरच्यांना रातोरात गौरीशंकरनं ठार केल्यावर गुरासारखा ओरडणारा रणविजय. तसंच त्याला मोह घालणारं अनिरुद्धचं गोरंगोमटं, पुस्तकी, नेमस्त कलाकारपण. त्याच्याबद्दल नि तो जिच्या प्रेमात आहे त्या निहारिकाबद्दलही वाटणारी असूया. त्याचं संरक्षण करावं, त्याला मदत करावी... अशी उफाळून येणारी इच्छा. सरतेशेवटी अनिरुद्धहून सरस-बुलंद पुरुष आपण आहोत, या खातरीपायी तो अनिरुद्धसमोर खुल्लमखुल्ला उभा ठाकतो, तेव्हा त्याच्यातलं कोवळेपण गळून पडतं. तो धुतल्या तांदळासारखा नाहीच. उलट डावपेच ओळखून एक पाऊल पुढे चालणारा आणि त्यात कसलाही विधिनिषेध न बाळगणारा आहे. पण त्याच्यात काहीतरी कोवळं, समाजानं दाबून ठेवलेल्या पायरीवरून कसोशीनं वर येऊ बघणारं, नाजूक आहे. "गाना गा रहे थे, इसलिये नही मारा तुमको!" किंवा "गुरिला वॉर पता हैं, पढते वढते हो की नही सालों?" असं सहजी म्हणून जातो तो. त्याच्यासाठी जीव तुटतो.

आणि त्या पार्श्वभूमीवर नाकासमोर चालणारे, रणविजयची सोईस्कर मदत घेणारे, एरवी हिंसाचारापासून दूर राहू इच्छिणारे अनिरुद्ध नि निहारिका – साली काय नावं निवडलीत! वा! – हळूहळू खलनायकी भासू लागतात... भाबडे खरे, पण रणविजयइतकेच स्वार्थी. फक्त त्याच्याहून देखणे, त्याच्याहून 'वरच्या जातीत' जन्माला आलेले.

पडद्यावरच्या हिंसाचारानंच सगळं बिनसतं असं मानून तो बघणं टाळणारे आपण, अनिरुद्ध आणि निहारिकाच असतो, असं तर तिग्मांशू धुलियाला सुचवायचं नसेल? काय की. सांगता येत नाही.

~

इरफान गेल्यावर बघितलेला त्याचा हा पहिलाच सिनेमा. हे भलतंच मेलोड्रामाटिक वाटेल, आहेचपण माझी हिंमत नव्हती होत त्याला पडद्यावर बघायची. अखेर बघितला तो 'हासिल'. आता कार्य पार पडलं म्हणायचं.

No comments:

Post a Comment