Tuesday, 2 March 2021

कासवकाळ

अधूनमधून माझ्यातलं कासव डोकं वर काढतं. एकदा त्यानं डोकं वर काढलं की मला गुपचूप पाय पोटाशी घेऊन मान आक्रसून घेऊन कुठल्यातरी अंधाऱ्या कोपऱ्यात दडून बसण्याची अनावर हुक्की येते. खूप इंट्रेस्टिंग कामं, माणसं, कार्यक्रम, मजेच्या संधी, आमंत्रणं असतात. पण कासव पुन्हा तळाकडे सूर मारेस्तो मला कशात गम्य नसतं. आहे मनोहर तरी गमतो मज एकांतवास. दिवसचे दिवस पारोसं लोळून पुस्तकं फस्त करणे, देशोदेशींच्या मालिका बिंजणे, घरातले स्वैपाकघरापासून पुस्तककपाटापर्यंतचे कोपरे आवरणे, टीव्हीवर एकसमयावच्छेदेकरून चारेक सिनेमे लीलया पाहणे आणि एकही आवडतं गाणं वा प्रसंग हुकू न देणे, घरातल्यांसह टीव्हीतल्या गदळ वा अ-गदळ कंटेंटवर मनसोक्त कमेंटा करणे, लाख वेळा पिसून कोपरे झिजलेली गाणी ऐकणे, मोबाईलमधून तासंतास एकास एक गप्पांची लड पेटती ठेवणे... अशा अनेक मजेमजेशीर गोष्टी करता येतात. आपण इतक्या वर्षांचे झालो पण आपल्याला काही जमेना, आपल्याला समंजसपणा येईना, आपल्याला स्वतःचा पैसा स्वतःला नीट मॅनेज करता येईना... अशी कसलीही कल्पित वा सत्य दुःखं करून, उदास गाणी लावून, एकंदर स्वतःचा राग करतो आहोतसं दाखवून, प्रत्यक्षात स्वतःचे लाड करण्यासारख्या निराळ्या मजेशीर गोष्टीही करता येतात. पण लोकसंपर्क ही मात्र त्यांपैकी एक नव्हे. कटाक्षाने नव्हे. कुणी मला या दिवसांत फोन करू नये. मी तो उचलणार तर नाहीच, पण त्याबद्दल मला पश्चात्तापही वाटणार नाही. दाताचं काम चालू असेल, तेव्हाच फक्त टेक्स्ट करणाऱ्या मायक्रॉफ्टच्या बरोबर उलटा असा माझा अवतार असतो. सगळं काही टेक्स्टवर. कुणाशी बोलण्याचे श्रम मला कल्पनेतही सहन होत नाहीत. अशा वेळी घरातलं इंटरनेट हरपू नये, बस. बाकी सगळं निवार्य. हां, पाहुणे सोडून. या कासवकाळात दार वाजल्यानंतर दाराला सर्वांत जवळ असलेली व्यक्ती मी नसेन, तर ते उघडण्याचाही मला कंटाळा येतो. अशा वेळी कुणा पाहुण्यानं अजिबात टपकू नये. त्याला मिळणाऱ्या चहाइतका फुळकवणी चहा त्रिखंडात दुसरा असणार नाही. कॉफी मिळण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. 

No comments:

Post a Comment