Friday, 7 June 2019

दिवसाची शुभ्र कळी उमलू लागतानाच्या अस्फुट मोतिया प्रहरात

दिवसाची शुभ्र कळी उमलू लागतानाच्या अस्फुट मोतिया प्रहरात
आसमंतात दरवळत असतो
मंद एसी लावल्यासारखा ताजा कुरकुरीत गारवा.
तेव्हा ओट्यापाशी उभी राहून
आंघोळीपूर्वीच्या सोवळ्यात स्वैपाक उरकून घेणारी बाई
करत राहते आटापिटा
कपाळावरचा घामाचा थेंब निसटून
कणकेच्या परातीत पडू नये म्हणून.
शिळ्या घामाची पुटं धुऊन
नवाकोरा ताजा घाम लेऊन
जिना उतरते
आणि नाक्यावरच्या एकमेव रिक्षापर्यंत पोचण्याच्या अलिखित शर्यतीत जिंकून
धावत्या रिक्षात निमिषभर थारावते
तेव्हा गारव्याची हलकी शीळ ऐकू येतेच तिला
रिक्षाच्या फर्र आवाजावर मात करत.
टवटवलेले तुकतुकीत पेन्शनरी घोळके,
आपल्याच लयीत मग्न होऊन रस्ते झाडणारे
आणि लयीचा बळी देण्याचं बाणेदारपणे नाकारून
बसस्टॉपवरच्या इस्त्र्यांवर मिश्कील उर्मटपणे धूळ उडवत जाणारे
मिजासखोर झाडूवाले,
घाईला झुकांडी देत
तळ्यातल्या पाण्यावर जमलेली
संथ मलईदार निवांतता
सगळं बघता बघता विसर्जित होत जातं
भाजीवाल्यांच्या आरोळ्यांत,
हॉर्न्सच्या हाणामार्‍यांत,
ट्रॅफिक हवालदारांच्या शिट्ट्यांत.
करकचून लागलेले ब्रेक्स,
'पोटाला दे गं माय...
पोहे-उपमा-खिच्डी-गरम्म….’
‘…तेज गाडी जानेवाली है...
राइट साइड डोअर कोपरा पकडून,
पर्स शिताफीनं आतल्या विश्वासाच्या हाती सोपवून,
ओढणी अंगासरशी आवरून घेऊन,
बाई गाडीला पाठ टेकते तेव्हा सूर्य वर आलेला असतो दळदार.
मऊ ऊन मनापासून पिऊन घेत
फोनची बोंडं कानात खुपसते,
सैलावते अर्ध्यापाऊण तासापुरती
कपाळ टिपून घेते एकदाच नीट.
इथून पुढच्या घामावर
पहिला हक्क शहराचा असतो...

No comments:

Post a Comment