Tuesday, 25 June 2019

दोन विंगांना जोडणाऱ्या सज्जाच्या कडेवर

दोन विंगांना जोडणाऱ्या सज्जाच्या कडेवरच्या ॲंटेनांच्या कुशीत,
पुन्हापुन्हा
चिवटपणे उगवणाऱ्या पिंपळाच्या लालसर कोवळ्या कोंभासारखीच,
'...बस हाथों में तेरा हाथ हो'ची पुन्हापुन्हा उमलून येणारी आस पुसून टाकता येत नाही काही केल्या,
आणि
ओशटपणे पायात पायात येणारं नि हलकटपणे पायात पाय घालणारं जग लाथेसरशी उडवून नामानिराळं होण्याची उबळही जिरवता येत नाही काही केल्या,
तेव्हा
'सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये मौज आहे..'च्या ओळी,
साधुवाण्याच्या कथेसारख्याच यांत्रिकपणे
आणि
यच्चयावत कर्मठ, चिवट आणि आक्रमक पण तोडू म्हणता तुटणार नाहीत आणि तुटूही नयेतसं वाटायला लावणाऱ्या,
जिवाजवळच्या माणसांवरचा संतापओठ मिटून गिळत,
घोकाव्या लागतात
पुन्हापुन्हा.
तरीही,
कोण जाणे किती युगं
कुठल्या सुपरहीरो कृष्णाचा धावा करत उभे आहोत मूर्खासारखे,
आपली वस्त्रं अखेर आपल्यालाच सावरायची असताना सिनेमाचा क्लायमॅक्स येईस्तोवर थांबून काय होणार त्याला आणखी एक जबरदस्त सुपरडुपरमेगाहिट मिळण्याखेरीज -
पुरे आता -
अशी कडूजहर अश्रद्ध ॲसिडिक लहर दाटून येते गळ्याशी.
नेमकं तेव्हाच वाजतं दिलखेचक बासरीचं बॅक्ग्राउंड म्युझिक.
आणि अवतरतो एखादा श्यामलवर्णी पावेबाज मुरारी.
पण -
तू सुपरहीरो असलास तर तुझ्या घरी,
मीच आहे शेवटी राधा ऑन द डान्स फ्लोअर.
नि
मुख्य म्हणजे नाचणं तर माझं मलाच भाग आहे,
मग फुटेज तुला कशाला,
चल फूट -
म्हणण्याइतकी जान येते जिवात,
तेव्हा
पिंपळाचं बी कुठून येत असेल वाहत हे सनातन नवल वाटेनासं होतं.
तगमग निवते,
ॲंटेना स्थिरावतो,
व्यत्यय संपतो,
प्रक्षेपण सुरू होतं
सुरळीत.

Saturday, 22 June 2019

गणपतीची तसबीर, खोबरेलाची निळी बाटली...

गणपतीची तसबीर,
खोबरेलाची निळी बाटली,
बीन बॅगांची बेढब बोचकी मधेच.
पसरलेल्या गाद्यांची भारतीय बैठक,
चुंबकाला लटकवलेलं कॅलेंडर,
फ्रीजवर देशाविदेशातली मॅग्नेटचित्रं मधेच.
गुळाच्यापोळ्यामेथीचे ठेपले,
लोणचंमुरांबाघरचंतूप,
सुपरमार्केटातली सुबक हातपुसणी मधेच.
इस्त्रीवाल्याकडून आलेल्या कपड्यांचा नीटस ढीग,
दारावर सुकत चाललेलं गोंड्याचं तोरण,
हॉलमध्ये नांदणाऱ्या चड्ड्याबड्ड्या मधेच.
लहानखुरी सोज्ज्वळ तुळस,
ओट्यावर चिकटवलेली लक्ष्मीची पावलं,
फोफावलेलं तकतकीत मनीप्लांट मधेच.
रात्रीबेरात्रीच्या शिफ्ट्स,
तारवटलेल्या दिवसांमधलं वीकेन्डच्या अंतहीन झोपेचं ओॲसिस,
यूट्यूबवरचं 'घाशीराम कोतवाल' मधेच.
गटारी नाल्याच्या कडेनं उगवत जावी सावकाश निश्चितपणे एखादी स्वयंपूर्ण इकोसिस्टिम,
तसे उपऱ्या आयुष्याच्या कडेकडेनं रुजत गेलेले एकांडे, ॲडॅप्टेबल संसार.
मधूनच वस्तीला येऊन प्रवाहाला सराईत वळणं देऊ पाहणारा सुखवस्तू पाचवा वेतन आयोग मधेच.

Wednesday, 19 June 2019

भरभराटीला येतंय शहर

अंधार-उजेडाच्या सीमेवरचा अस्फुट प्रकाश,
नजर वर करायला लावणारं छत,
कवेत न मावणारे विस्तीर्ण खांब,
मनात दचका भरवणारी शांतता,
दाराशी दक्षिणेची पेटी.
तेहेतीस कोटी असतील नसतील,
पण
देवही चिकार.
काही लाल, काही निळे,
काही पांढरे, काही काळे.
लहान, मोठे, काही स्वयंचलित,
काही चकचकीत शानदार.
काही गरीब साधेभोळे.
पालख्या येतात, पालख्या जातात.
लोक अदबीने बाजूला होतात.
पालख्या निघतात
आणि काही काळ टेकतात,
तेव्हा रस्त्यांच्या दुतर्फा साकारतात टेम्परवारी मंदिरं.
भक्तगण आदबीने जागा करून देतात,
रस्ते बदलतात.
टेम्परवारी बडवे उभे राहतात.
दक्षिणेच्या पावत्या फाडतात.
नवनवीन देवांची पडत राहते भर.
नवनवीन मंदिराची पायाभरणी होते.
उंचच उंच कळस उभारले जातात
शानदार.
देवळांची आणि कळसांची,
ट्रस्टांची आणि बडव्यांची,
देवांच्या निर्मिकांची
आणि देवांच्या शासकांची,
उपासकांची आणि भक्तजनांची,
संख्या दिवसेंदिवस वीत जातेय.
या देवाच्या धर्माला आलेत दिवस मोठे बहारदार.
भरभराटीला येतंय शहर...

Friday, 14 June 2019

नाक्यावरच्या छक्क्याच्या

नाक्यावरच्या छक्क्याच्या
हक्कानं पसरलेल्या हातावर
ठेवते मी
दोन्ही हात छातीपाशी पूर्ण जुळवून,
मान लववून केलेला नमस्कार
फक्त.
चकित होतो चेहरा क्षणभर.
पण मग हसू येतं चेहऱ्यावर
डोळ्यांपर्यंत पोचणारं.
दोन्ही हात उंचावले जातात.
माथ्याला हलका स्पर्श.
सिग्नल हिरवा होतो.
रिक्षावाला भरधाव सुटतो.
पुढच्या कोरड्याठाक दिवसभरात
हसू झिरपत राहतं.
कुणाचं कुणास ठाऊक.

Tuesday, 11 June 2019

चालली घोडी दिमाखात


पट्टे आवळा, जिरेटोप बांधा
टाकली टांग, मारली टाच
नवा दिवस, नवी सकाळ
चालली घोडी दिमाखात

याला घाई त्याला घाई
तिला घाई हिला घाई
साईड मुळीच देणार नाही
माझीच सगळ्यांत मोठी आई

सुटेल सिग्नल मिनिटभरात
हाक गड्या, ये पुढ्यात
घुसव चाक, दिसली फट?
सुटला-सुटला, चालव हात

चपळाईने हेर जागा
बघ चौफेर, नजर ठेव
आला आला पार्किँगवाला
सुट्टी नोट तयार ठेव

चल चल पाऊल उचल
दे रेटा मार धक्का
इतकं हळू भागेल कसं?
भीड सोड हो पक्का
पर्स धर पोटापाशी
त्यात तुझे पंचप्राण
लाव जोर, शीर आत
नेम धरून कोपर हाण

एरवी तुलाच बसेल ढुशी
जाईल तोल, पडशील खाली
मिनिटभराची सुकी हळहळ
'आली कुणी चाकाखाली!'

बंद निसटू देऊ नकोस
अडकेल कुठे, फास बसेल
स्वतःसकट चार जणांत
गोंधळ माजेल, गाडी चुकेल

तोल जाऊन देऊ नकोस
हासड शिवी, झिंज्या धर
पायावरती दे पाय
एरवी कशी येशील वर?

ओलीगच्च एक पाठ
तिला चिकटून एक नाक
शिरलं शिरलं ढुंगण फटीत
मागून बसली एक लाथ

जीव झाला लोळागोळा
अर्धा श्वास राहिला वर
थांब थोडा, सुटेल गाडी
मिळेल हवा, धीर धर

बेंबीपासून खेच श्वास
लाव जमेल तितका जोर
आत घूस, पकड जागा
नाहीपेक्षा बरा डोअर

बसला गचका, सुटली गाडी
झाला तह, रेलली पाठ
नवा दिवस, नवी सकाळ
चालली घोडी दिमाखात

Friday, 7 June 2019

काहीही झालं तरी चूक तुमचीच असण्याच्या काळात

काहीही झालं तरी चूक तुमचीच असण्याच्या काळात
जन्माला आलेले असता तुम्ही
तेव्हा सगळे उपरोध आत वळवून घेण्याला पर्याय असत नाहीत.
पेट्रोल जाळलंत तरी तुम्ही पुढच्या पिढ्यांचे गुन्हेगार
लाकूड जाळलंत तरीही तुम्हीच मागच्या पिढ्यांचा वारसा जपायला नालायक ठरलेले
बेजबाबदार.
काहीच न जाळता नुसते निवांत बसतो म्हणालात
निसर्गाबिसर्गाच्या सान्निध्यात,
तरीही थोडेफार थोरोबिरो होऊन गेलेले असतात पूर्वीच.
तुम्ही ओरिजनॅलिटी नसलेले
बिनडोक नकलाकार.
विकास हवा म्हणालात,
तर तुमच्यावर पर्यावरणाच्या निर्घृण खुनाचे आरोप होतात.
विकास नको म्हणालात,
तर कमोडवर बसून साधं निवांत हगण्यालाही हिप्पोक्रसीचे छद्मी रंग येतात.
प्रेमात पडून पटवा प्रियकर.
करा लग्न, आणा मूलबिल,
थाटा संसार.
तुम्ही चाकोरीतून चालणारे
धोपटमार्गी पगारदार.
नको च्यायला लग्नबिग्न.
दुनियेला मारतो म्हणा, फाट्यावर.
जेनेटिकल मैदानात उतरायचा धीरच न झालेले तुम्ही.
दुनिया तुम्हांलाच भेकड म्हणणार.
युद्ध टाळा
काश्मिरात नको म्हणा, हिंसाचार.
संशयाचं गगनचुंबी वारूळ उठलंच समजा
तुमच्या देशभक्तीवर.
म्हणा कधी समजुतीनं,
'नाचू दे की विसर्जनात मनसोक्त
ऊर्मी असतात यार...'  
थोबाडाला काळं फासून कर्मकांडाच्या गाढवावर
तत्काळ तुम्ही उलटे सवार.
दिवस असे अखेरीचे येतात,
की उभं राहावंच लागतं तुम्हांला.
एकीकडून गेल्या शतकांचा राक्षसी ताकदीचा लोंढा
आणि एकीकडून जुलैचा वायझेड वारापाऊस अंगावर घेत,
हातातली कडी आणि फुटबोर्डावरचा पाय निसटू न देण्याची पराकाष्ठा करत.
स्टेशन येईस्तो,

असलीनसली सगळी ताकद एकवटून उभं राहण्याला पर्याय असत नाहीत.
काय करणार?
एका पायावर, तर एका पायावर.

दिवसाची शुभ्र कळी उमलू लागतानाच्या अस्फुट मोतिया प्रहरात

दिवसाची शुभ्र कळी उमलू लागतानाच्या अस्फुट मोतिया प्रहरात
आसमंतात दरवळत असतो
मंद एसी लावल्यासारखा ताजा कुरकुरीत गारवा.
तेव्हा ओट्यापाशी उभी राहून
आंघोळीपूर्वीच्या सोवळ्यात स्वैपाक उरकून घेणारी बाई
करत राहते आटापिटा
कपाळावरचा घामाचा थेंब निसटून
कणकेच्या परातीत पडू नये म्हणून.
शिळ्या घामाची पुटं धुऊन
नवाकोरा ताजा घाम लेऊन
जिना उतरते
आणि नाक्यावरच्या एकमेव रिक्षापर्यंत पोचण्याच्या अलिखित शर्यतीत जिंकून
धावत्या रिक्षात निमिषभर थारावते
तेव्हा गारव्याची हलकी शीळ ऐकू येतेच तिला
रिक्षाच्या फर्र आवाजावर मात करत.
टवटवलेले तुकतुकीत पेन्शनरी घोळके,
आपल्याच लयीत मग्न होऊन रस्ते झाडणारे
आणि लयीचा बळी देण्याचं बाणेदारपणे नाकारून
बसस्टॉपवरच्या इस्त्र्यांवर मिश्कील उर्मटपणे धूळ उडवत जाणारे
मिजासखोर झाडूवाले,
घाईला झुकांडी देत
तळ्यातल्या पाण्यावर जमलेली
संथ मलईदार निवांतता
सगळं बघता बघता विसर्जित होत जातं
भाजीवाल्यांच्या आरोळ्यांत,
हॉर्न्सच्या हाणामार्‍यांत,
ट्रॅफिक हवालदारांच्या शिट्ट्यांत.
करकचून लागलेले ब्रेक्स,
'पोटाला दे गं माय...
पोहे-उपमा-खिच्डी-गरम्म….’
‘…तेज गाडी जानेवाली है...
राइट साइड डोअर कोपरा पकडून,
पर्स शिताफीनं आतल्या विश्वासाच्या हाती सोपवून,
ओढणी अंगासरशी आवरून घेऊन,
बाई गाडीला पाठ टेकते तेव्हा सूर्य वर आलेला असतो दळदार.
मऊ ऊन मनापासून पिऊन घेत
फोनची बोंडं कानात खुपसते,
सैलावते अर्ध्यापाऊण तासापुरती
कपाळ टिपून घेते एकदाच नीट.
इथून पुढच्या घामावर
पहिला हक्क शहराचा असतो...

Wednesday, 5 June 2019

बुडाला यावा फोड असं या विश्वीचं आर्त

बुडाला यावा फोड असं या विश्वीचं आर्त आपल्या बेसूर गळ्यातून काढत,
भजनाचा सूर माइकच्या बोंडकात घुसून पोचलेला पार टिपरीत.
सिऱ्यलीचा आवाज हातपाय झाडत बुडतो त्यात गळ्यापर्यंत.
काकू फणकारतात.
चहू बाजूंनी चालून येणारे आवाज उडवून लावतात मानेच्या एका झटक्यात.
ते हटता हटत नाहीत.
काकू चवताळतात.
रिमोटच्या बटणावर जोर काढतात.
सिऱ्यलीतल्या सात्त्विक सुनेच्या सोशीकपणाचं स्तोत्र.
तिची पार तार लागलेली.
व्हॉल्यूमची रेष जाईल तितकी वर नेतात काकू रिमोटच्या बटणावर चढून.
कुकराच्या शिट्टीची दीर्घ किंचाळी साथ देते दारावरच्या बेलला त्याच जोशात.
भजन अधिक सिऱ्यलस्तोत्र अधिक कुकरशिट्टी अधिक डोअरबेल अशा सगळ्या बेरजेत,
हातचा एक घेतात.
आल्ये, आल्ये, आल्ये - तारस्वरात किंचाळतात.
एकीकडे पाठीची रग दवडतात.
पायाशी दीड तास मोडून मोडलेल्या गवारीची परात.
विसरून ठेचकाळतात, कळवळतात.
दार उघडताना काकांवर करवादतात.
काका सरावानं कानाच्या पापण्या घेतात फाटकन मिटून.
आसमंतातल्या आवाजांच्या वातीवर चपळाईनं चढतात,
वात चवड्याखाली चिरडतात, विझवतात.
दाढेच्या खोपच्यात सारतात तंबाखूची गोळी.
दिवस म्यूट होतो.