फूटपाथ नसलेल्या रस्त्यावरून ऑल मोस्ट अंगावर येणारी जगड्व्याळ बस
वटारल्या गेलेल्या डोळ्यानी जोखून बघत कुंपणभिंतीला घसपटत चालताना
हातातली छत्री उलटी होऊ नये म्हणून मुठीकडून जोर लावावा,
अंगावर चिखलाचा सपकारा बसू नये म्हणून भिंतीत जिरावं होता होईतो,
की पुढ्यातल्या भोकाची खोली आणि झाकणाची जाडी
मापून घ्यावी नजरेनीच जमेल तितकी
पाऊल पुढे टाकण्यापूर्वी,
हे ठरवावं लागेल आता रोज.
स्टेशनातल्या ब्रिजवर पुरेसा हवेशीर कोपरा हेरून पाण्याची भडास थांबेतो थबकणं,
फ्लायओव्हरच्या कोपर्याखाली आसरा घेणं,
की ऑफीसची सॅक भिजली तर भिजली गेली भोकात जान सलामत तो लॅपटॉप पचास म्हणत थेट सूर मारणं,
यांतलं काय कमी प्राणघातक ठरेल,
हेही.
कधीतरी तर पोचूच ही बेगुमान खातरी मनाशी धरून आडमुठेपणी उभ्या राहिलेल्या बयेच्या गर्दीत घुसावं
आणि पोटातला चहा मुक्कामी पोचेस्तो बाईच्या जातीसारखा समजूतदार दम धरेलशी आशा करावी,
मागचापुढचा विचार न करता पाणी ढोसण्याची चैन करण्याबद्दल स्वतःला बोल लावावा,
की शरणागती पत्करून कुणाच्यातरी चुलतचुलत सोबतीला लटकत गाठावी एखादी मर्यादशील मोरी,
हेही.
पहाटे उठून प्रलयाचा आवाज ऐकताना ‘वर्किंग फ्रॉम होम’चं ड्राफ्टिंग करावं मनातल्या मनात,
लाईट गेले की नेटचं कनेक्शन ढपणार म्हणून आधीच हेरून ठेवावा एखादा भरोशाचा शेजारी,
की भिजलो तर भिजलो च्यायला मिठाचे बनलोय का आपण न्यूज च्यानेलवाले डोक्यावर पडलेत साले म्हणत घ्यावं आलं किसायला,
हेही.
असू दे आत्ता दर शुक्रवारी कपात.
असू दे विहिरींच्या तळांच्या नि टॅंकरच्या फोटोंची लयलूट पेपरात.
असू देत नाक्यावरच्या वस्तीत रोज नवे भिकारी ओतले जात.
हवा उन्हानं खरपूस तापत चार्ज होत चाललीय दिवसेंदिवस.
तिचा करंट खाऊन मरायचं
की तिच्यावर स्वार होत घ्यायचा शहराच्या जळजळीत स्पिरिटचा घोट,
हे ठरवावं लागेल आता.
रोज.
No comments:
Post a Comment