Sunday, 21 May 2017

बाई

भल्या भल्या देखण्या अप्सरा
नवल करत बसतात,
त्यांना काही केल्या उमगत नाही,
माझ्या देखणेपणाचं गुपित कशात?
मी काही चिकणीचुपडी गोडगुलाबी नार नाही
बांधाही माझा छत्तीस-चोवीस-छत्तीसच्या मापात नाही.
पण त्यांचा विश्वास बसत नाही.
मला खोट्यात पाडतात.
मी आपली सांगू जाते,
बघा,
माझे भरदार ताशीव हात
माझ्या पुठ्ठ्याची घडीव गोलाई
माझ्या पावलातला नाचरा ताल
माझ्या ओठांची मुरड
बाई आहे मी.
नखशिखांत बाई.
चारचौघींसारखी नव्हे,
आगळीवेगळी भन्नाट बाई.
मी येते,
एखाद्या डौलदार झुळकीसारखी सहज तोर्‍यात
जमलेले बाप्ये आ वासतात
खडबडून उभे राहतात,
नाहीतर मग गुडघे टेकतात
फुलाभोवती फिरतात भुंगे
तसे माझ्याभोवती रुंजी घालतात
मी म्हणते,
जाळ आहे माझ्या नजरेत
माझं हसूही लख्ख चमचमतं
कंबरेला हा अस्सा एक झोका -
बघ - पावलागणिक हसू उधळतं
बाई आहे मी.
नखशिखांत बाई.
पण चारचौघींसारखी नव्हे,
आगळीवेगळी बाई.
बाप्यांनाही नाही उमजत
काय आहे तरी काय हिच्यात?
मारे करतात प्रयत्न,
पण त्यांनाही नाही कळत माझ्या देखणेपणामागचं गुपित
मी आपली सांगू-समजावू बघते -
तर्री नाही दिसत.
मी आपली सांगते,
बघा माझा कुर्रेबाज कणा
माझ्या हसण्यातल्या उन्हाचा झळझळीतपणा
माझ्या वक्षांचा डौलदार उभार
चाल कशी ऐटबाज तेजतर्रार
बाई आहे मी.
नखशिखांत बाई.
पण चारचौघींसारखी नव्हे,
आगळीवेगळी बाई.
नीट बघा,
मग कळेल तुम्हांला -
माझी मान कधी झुकत नाही.
उगाच तारस्वरात किंचाळणं तर सोडाच,
साधा आवाजही कधी चढत नाही.
पण मी नुसती समोरून गेले जरी -
तरी अभिमानानं छाती रुंदावते तुमचीही.
सांगते ना,
माझ्या टाचा कशा टेचात वाजतात
केसांच्या बटा अश्शा तोर्‍यात डुलतात
तरी हात कसे तत्पर
भणाणवार्‍यात दिव्याला आडोसा द्यायला -
त्यांनाही ठाऊक असतं,
त्यांच्यावाचून निभणारच नाही.
कारण?
बाई आहे मी.
नखशिखांत बाई.
चारचौघींसारखी नव्हे,
माझ्यासारखी मीच -
आगळीवेगळी बाई.

मूळ कविता : माया अ‍ॅंजेलौ

***
मुग्धा कर्णिकांनी केलेल्या अनुवादामुळे माया अँजेलौ यांची Phenomenal woman ही कविता माझ्या वाचनात आली. अतिशय आवडली. पण मग तिथल्या काही प्रतिक्रियांमुळे असं लक्ष्यात आलं, की त्यातले शारीर उल्लेख अजूनही अनेकांना खटकतात. असं का व्हावं मला कळेना.

कविता एका स्त्रीच्या आत्मभानात दडलेल्या तिच्या सौंदर्याबद्दल बोलणारी. त्यात डौलदार वक्ष येतात. भरदार बाहू येतात. कंबरेचा घाट येतो. काळजी घ्यायला सज्ज असलेले तळवे येतात. लख्ख स्मिताची चमक येते... अनेक शारीर वैशिष्ट्यांची वर्णनं येतात. पण त्यातून कविता शरीरापल्याडचं काहीतरी सांगू बघत असते.

असं कितींदा तरी होतं, की काही माणसांच्या सहवासात आपल्याला अतिशय प्रसन्न-जिवंत-संपूर्ण वाटतं. त्या माणसांबद्दल आपल्याला लैंगिक आकर्षण वाटत असतं, असं नव्हे. किंबहुना ते वाटत असतं की नाही, हा मुद्दाच तिथे बिनमहत्त्वाचा, गैरलागू असतो. त्यांच्या देहबोलीतून प्रतीत होणार्‍या शांत, संवादी, सहज स्वीकाराला उत्सुक असलेल्या आत्मविश्वासानं आपण त्यांच्याकडे खेचले जातो. त्या वलयात आपणही सामील व्हावं, त्यांच्यापाशी असलेल्या झळझळीत उन्हाचा स्पर्श व्हावा, इतकाच हेतू असतो. हे उघडपणे बोलून दाखवलं जातं असंही नाही. नकळत, अभावितपणे, सहज होणारी मानवी प्रतिक्रिया. उदाहरण देऊ? गुलजारच्या अनेक चित्रपटांमधल्या नायकाची प्रतिमा ही त्याचं स्वतःचंच रूप असल्यासारखी असते. त्या प्रतिमेकडे पाहताना मला अनेकदा हे अनुभवाला येतं. ते पुरुष पुरुष म्हणून रूढार्थानं, सर्वार्थानं आकर्षक असतात की नाही, हे तितकंसं महत्त्वाचं उरत नाही. त्यांच्यातला सहजस्वीकार, शांत आत्मविश्वास, रुंद खांद्यांनी आणि जाड काड्यांच्या चश्म्यानं पेलून धरलेला चिंतनाचा भाव, विनोदाचं वावडं नसलेली हसरी मिश्कील जिवणी, मिशांनी आलेला धीरगंभीरपणा... अशा अनेक शारीर वैशिष्ट्यांनिशी हे नायक सिद्ध होत असतात. पण त्या शरीरबोलीतून दिसत मात्र पलीकडचं काहीतरी असतं. मला आपलंसं करत असतं. त्या पुरुषांशी मैत्री करावी, त्यांच्याशी गप्पा माराव्या, जागरणं करकरून - नशाही करकरून त्यांच्यासमोर मन मोकळं करावं, त्यांच्यावर विसंबून बिनदिक्कत झोपून जावं... असं वाटायला लावणारे हे पुरुष.

त्यांच्याबद्दल बोलताना त्यांची शारीर वैशिष्ट्यं कशी टाळायची? नि का? त्याबद्दल बोललं म्हणजे मला पुरुषदेहावाचून दुसरं काही सुचत नाही असा संकुचित अर्थ होतो का?

मला अगदी उलट वाटतं. आपल्या देहाचा संकोच नसलेलं कुणीही - मग स्त्री, पुरुष, वा मेघना पेठेचे शब्द उसने घ्यायचे तर, हिजड्याचं पिल्लू - कुणीही असो - स्वतःसोबत शांत, सुलझलेलं असेल; तर ते सर्वार्थानं सुंदरच दिसतं. लोभस वाटतं. खेचून घेतं.

हाच भाव व्यक्त करणारी ही कविता. ज्यांना ती समजते, भोगता येते, पचवता येते, त्यांच्याकरता साभार -

Phenomenal woman

Maya Angelou

Pretty women wonder where my secret lies.
I’m not cute or built to suit a fashion model’s size   
But when I start to tell them,
They think I’m telling lies.
I say,
It’s in the reach of my arms,
The span of my hips,   
The stride of my step,   
The curl of my lips.   
I’m a woman
Phenomenally.
Phenomenal woman,   
That’s me.

I walk into a room
Just as cool as you please,   
And to a man,
The fellows stand or
Fall down on their knees.   
Then they swarm around me,
A hive of honey bees.   
I say,
It’s the fire in my eyes,   
And the flash of my teeth,   
The swing in my waist,   
And the joy in my feet.   
I’m a woman
Phenomenally.

Phenomenal woman,
That’s me.

Men themselves have wondered   
What they see in me.
They try so much
But they can’t touch
My inner mystery.
When I try to show them,   
They say they still can’t see.   
I say,
It’s in the arch of my back,   
The sun of my smile,
The ride of my breasts,
The grace of my style.
I’m a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That’s me.

Now you understand
Just why my head’s not bowed.   
I don’t shout or jump about
Or have to talk real loud.   
When you see me passing,
It ought to make you proud.
I say,
It’s in the click of my heels,   
The bend of my hair,   
the palm of my hand,   
The need for my care.   
’Cause I’m a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That’s me.

***

या कवितेचे अनेक अनुवाद अनेकांनी केले. मागे ब्लॉगवरच खेळलेल्या खोखोची आठवण व्हावी, असे भरभरून केले. त्यांपैकी सगळ्यांत जास्त आवडला, तो आशुतोष दिवाण यांनी केलेला हा अनुवाद. हा अनुवाद वाचल्यावर मला माझी अनुवादाची धडपड केविलवाणी आणि फोल वाटायला लागली. शब्दशः भाषांतर न करता मूळ कवितेतल्या भावाला सर्वाधिक नेमकेपणानं पकडणारे, अस्सल म्हराटी शब्द त्यांना साधले आहेत -

संपूर्ण

सटव्या
बघतच राहतात माझ्याकडे
ना धड सुबक ठेंगणी
नार शेलाटी
"खोटारडी मेली!"
नितळ दंड
लुसलुशीत ढुंगण
एक नुस्ती मुरड ओठांची
खुळावते तरण्याना
मी हायेच बाय तसली
कंबर लचकावत
डोळा घातला
खोलीत शिरताना
की म्हातारे ताठत्यात
अन् तरणे गोंडा घोळत्यात
जिमीनीवर सरपटत
हायच बाय मी तसली
खुळ्यांना कळतच नाय
की हायच काय मुळी हित्तं
त्येना काय नुस्तं वरचंच दिस्तंय
खरं आतली धगच करतीया
कनाट्याच्या मण्याला
थानांच्या हलकाव्याला
धरु धरु
कसंबी करून
सगळ्याच बाप्यांना
हायच बाय मी तसली
लघी धावत्यात
खुळ्याकावय्रासारखं
क्येस धराया
हात पकडाया
गोंजाराया
कसंबी करून
घाबरं घबरं.
खरं मला काय पडलीय
गरज
कांगावा करायची
मान खाली घालायची
लाजखोरी लागट.
माझ्या गाठी माझ्यापाशी.
मी हायच बाय तस्ली.
जनीपास्नं.

***

मुग्धा कर्णिकांनी केलेला हा अनुवाद. त्यानं माझ्यापर्यंत कविता पोचवली. त्याचं महत्त्व आगळं.

मी एक आगळीच जबरदस्त स्त्री

सुंदर स्त्रियांना नवल वाटतं- काय असेल माझं गुपित
मी नाही गोडगोड किंवा बांधाही नाही फॅशन मॉडेलच्या मापात
पण मी सांगू लागते त्यांना, तेव्हा खोटंच वाटतं त्यांना.
मी सांगते,
माझ्या बाहूच्या आवाक्यात सारं येतं.
माझ्या पुठ्ठ्याच्या रुंदाव्यात,
माझ्या पावलाच्या झेपेत,
माझ्या मुडपलेल्या ओठातही.
मी आहे स्त्री
अपवादात्मक.
जबरदस्त आगळी स्त्री
मीच ती.
मी शिरते एखाद्या दालनात
फारच अनोख्याबिनोख्या उंची...
आणि जाते तिथल्या एखाद्या पुरुषाजवळ
ते सारे पुरुष उभेच रहातात
पण जणू गुडघे टेकलेलेच असतात.
गोळा होतात सारे भोवती
जणू मधाचं मोहोळ उठतं.
मी सांगते,
माझ्या डोळ्यात असते ठिणगी,
आणि लखलखतात माझे दात.
माझ्या कंबरेत असतो हेलकावा
आणि पावलांतून उमडतो हर्ष.
मी आहे स्त्री
अपवादात्मक.
आगळी जबरदस्त स्त्री
मीच ती.
पुरुषही नवल करतात,
काय पाहातो आपण हिच्यात...
प्रयत्न करतात सारे
पण नाहीच हाती लागत त्यांच्या
माझ्या अंतरीचं गुपित.
मी त्यांना दाखवून देऊ पाहाते.
पण ते म्हणतात नाहीच कळत त्यांना काही.
मी सांगते,
ते गुपित आहे माझ्या वळणदार कण्यात,
माझ्या स्मितातून सांडणाऱ्या उन्हात
माझ्या वक्षाच्या डौलात
माझ्या ऐटबाज रुबाबात.
मी आहे स्त्री
अपवादात्मक
आगळी जबरदस्त
मीच ती.
कळतंय ना आता,
माझं मस्तक नसतं कधीच झुकलेलं.
मी नाही किंचाळत किंवा उड्या मारत
मला फारसं मोठ्याने बोलायची गरजच नसते.
तुम्ही मला शेजारून जाताना पाहिलंत
तर तुम्हालाही अभिमान स्पर्शून जाईल.
मी सांगते,
माझ्या चपलांच्या टाचा टेचात वाजतात,
माझे केस लहरतात,
माझ्या खोलसरगोलसर हाताच्या तळव्यात,
गरज असते मी काळजी वाहण्याची.
कारण मी आहे स्त्री
अपवादात्मक
आगळी जबरदस्त स्त्री
मीच आहे ती.

***

विजयानं केलेला हा अनुवाद -

अप्सरा माझ्या सौंदर्याचं नवल करतात
त्यांच्या शरीराची ठाशीव मापं माझ्यापुढे उणी ठरतात
माझ्या स्पष्टीकरणाला त्या नाक मुरडतात
मी खोटंच बोलतेय यावर ठाम असतात
मी सांगत जाते,
ते आहे माझ्या हातभर अंतरावर
माझ्या डेरेदार नितंबांच्या घेरावर
आणि पावलांचा तालावर
मी आहे स्त्री
अशी अजबच
कारण मी आहे मी
मी प्रवेशते
एखाद्या भव्य ठिकाणी
तिथल्या प्रत्येक पुरुषाला वाटतं
मी प्रवेशतेय त्यांच्या हृदयात
ते उभे राहतात
किंवा
बसतातही गुढग्यांवर
मात्र माझ्याच सभोवती जमतात
अगदी मधमाश्यांचं मोहोळच उठवतात
मी सांगत राहते,
ते माझ्या डोळ्यांच्या दीप्तीत चमकतंय
माझ्या दातांच्या हिरकणीत हसतंय
कंबरेच्या लयीत झुलतंय
पावलांच्या आनंदी तालावर नाचतंय.
मी आहेच स्त्री
आगळी.
अजब स्त्री,
कारण मी आहे मी
पुरुषांनाही नवल वाटत राहतं
माझ्यात नक्की काय पाहत रहावं वाटतं?
प्रयत्नांची सीमा गाठतात
पण तरी नाहीच मिळत त्यांना
माझ्या अंतराची एक झलक
मी करते खुली गुपितं
जी त्यांनी तरीही नाहीच दिसत
मी सांगतच जाते
माझ्या पाठीच्या कण्यात ते उभारलंय
माझ्या हास्याच्या उन्हात झळकतंय
माझ्या गिर्रेबाज वक्षात दडलंय
आणि संपूर्ण डौलात सामावलंय
मी आहे स्त्री
आगळी,
अजब स्त्री.
कारण मी आहे मी.
थोडं थोडं येतंय तुमच्या लक्षात
का नाही माझी मान कधी झुकत
मी ना कधी किंचाळत ना तडतडत
अगदी बोलतही नाही जोरजोरात
शेजारून जाताना
माझं असणंच तुम्हांला स्पर्श करतं
मी सांगते,
ते इथेच तर आहे
माझ्या टाचांच्या टेचात
केसांच्या महिरपीत
हाताच्या तळव्यावर
आणि माझ्या हळुवार स्वभावात
कारण मी स्त्री आहे आगळीच
अजब स्त्री,
कारण मी आहे मी.

***
इतकं रामायण लिहूनही अनेक जण या कवितेतल्या पुरुषांसारखेच पालथे घडे राहिले. त्या बाईचं शारीरिक सौंदर्य इतकं महत्त्वाचंय का, का आहे, हा इतर अनेक सामान्य रूपाच्या कर्तृत्ववान बायांचा अपमान नाही का, ही कविता बाईच्या लैंगिक आकर्षणाबद्दल नि सामर्थ्याबद्दल बोलते, ते कसं सवंग आहे... एक ना दोन.

त्यांना सांगण्यासारखं माझ्यापाशी काही नाही. आत्मभानानं झळाळून उठलेल्या माणसाचं सौंदर्य रूढ कल्पना आणि चाकोर्‍या आणि चौकटी ओलांडून कसं फुसांडत बाहेर पडतं आणि त्यासाठी त्याला शरीराचंच माध्यम कसं अपरिहार्य ठरतं - ही अनुभवण्याचीच चीज आहे.

इत्यलम.

8 comments:

  1. मेधना सुंदरच झालाय अनुवाद. फार छान.

    मात्र अशुतोष दिवाणांचा अनुवाद नाही पटला. त्यांनी कवितेचा आत्माच बदललाय. त्यांची स्त्री थेट शारिर भाषाच बोलते (ग्राम्य शब्द त्याला हातभार लावतात). कवितेचा ’सटव्या’ ही सुरुवातेल कवितेला पार कोलमडून टाकते. नितळ दंड, तरण्यांना खुळावणं या प्रतिमा त्यात भर घालतात. "मी हायच बाय तसली" मध्ये "हो मी बोलते शरीराने. काय म्हणणय तुमचं?" हा अर्थ दिसतो.
    "मी नसेन सुंदर प्ण माझंही शरीर पुरुषांना खुळावू शकतं" असं ही कविता म्हणते तर
    "मी सुंदर नाही हे मला माहिती आहे पण त्याचं वैषम्य,लाज वाटण्याएवढं महत्व मी शरीराच्या आकाराउकारांना देत नाही. माझ्यातला आत्मविश्वास, स्त्रीस्वभाव हेच माझं शक्तीस्थान आहे. पण या पुरुषी जगातले स्त्रीपुरुष माझ्या आत्मविश्वासाचं रहस्य माझ्या शारिरिक भाषेत शोधू पहातात पण त्याने मी दचकत नाही कारण अभिमानाने डवरलेल्या माझं शरीरही सुंदरच असणार आहे हे मला माहिती आहे." हे कवितेचं म्हणणय.
    वेगळी कविता म्हणून ठिकाय पण स्त्रीवादी माया अँजेलोची कविता ही नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. अनुवाद नक्की कशाला म्हणायचं याबद्दल निरनिराळ्या अर्थछटांची उत्तरं संभवतात. आपण बहुतकरून निरनिराळ्या रंगपटातून बोलत असल्यामुळे त्याबद्दल मतभेद होतात. मूळ कवितेत अनेक गोष्टी असतात. शब्दांभोवती संदर्भांचं आणि अर्थाचं मोहोळ असतं. त्या शब्दाचा आणि सभोवतालच्या शब्दांचा असा मिळून एक नाद असतो. त्यातून निरनिराळे छंद साधत असतात. भाषेला लगडून येणार्‍या संस्कृतीनं दिलेला एक विशिष्ट अर्थ असतो. आणि याखेरीज कवितेचा आत्मा असा एक यासगळ्यापल्याडचा शब्दातीत अर्थ असतो. हे सगळंच्या सगळं अनुवादात एकसमयावच्छेदेकरून उतरवणं अशक्य असं मला वाटतं. सगळेच चांगले अनुवाद यांतलं काही ना काही - होता होईतो साधू पाहतात.
      ज्या भाषेत अनुवाद करायचा त्या भाषेतले सांस्कृतिक संदर्भ सहीसही साधणारा अनुवाद मला स्वतःला सर्वाधिक आवडतो. मग सगळेच्या सगळे आणि जसेच्या तसे शब्द न आले, तरी माझ्या दृष्टीनं फारसं बिघडत नाही. म्हणूनच 'मुन्नाबाई एमबीबीएस' मला 'पॅच अ‍ॅडम्स'पेक्षाही आवडतो. याच कारणानं मला दिवाणांचा अनुवाद खूप आवडला. त्यात 'मी शरीराच्या आकारांना महत्त्व देत नाही' हा उद्गार जरी उघड उघड आला नसला, तरी कवितेतला शेवटचा शब्द ते सगळं कमालीच्या अबोलपणानं साधून जातो. जनाईच्या संदर्भाहून अधिक बोलकं आणि नेमकं काय असेल? तुला जी भाषा ग्राम्य आणि म्हणून अशिष्ट वाटली, ती जनीच्या संदर्भात तर मला अधिकच साजून दिसणारी वाटली...
      असो. इतपत मतभेद हवेतच, नाही का?!
      बादवे, तू आत्ता 'डवरणे' हा जो शब्द वापरला आहेस, त्याकरता तुझा हेवा हेवा वाटला. मला का नाही सुचला हा भाषांतर करताना?!

      Delete
  2. मेघना तुझा अनुवाद आवडला. दिवाण यांचा अगदी नावडला. मूळ कवितेचा पोत बदलून गेलाय. तसली बाई हे यात बसतो नाही. पण मी विषय काढला नि तू पुढे नेलास हे फारच मस्त झालं!

    ReplyDelete
  3. मजेशीरच प्रकार आहे असा वेगवेगळ्या लोकांनी अनुवाद करणं. माया आंजलोची ओरिजिनल कविता त्यानिमित्ताने वाचायला मिळाली.
    छान वाटलं खूप दिवसांनी तुझ्या ब्लॉगवर रमताना.

    ReplyDelete
    Replies
    1. बाई, तुझी कमेंट पब्लिश करण्यापूर्वी मी चार ठिकाणी जाऊन बोंब ठोकून आले! कुठे परागंदा झाल्येस? किती आठवणी काढायच्या तुझ्या? बरं न्हाई ये वागनं...

      Delete
    2. Mazi hi akadam ladaki Kavita ahe.ani mazya dolyasamor hi Kavita vachatana ak mast African American thasthashit baai ubhi rahate. Tuza anuvad mala sagalyat avadala.

      Delete
  4. Thanks for sharing the poem.
    तुझे विवेचनही आशयगर्भ.

    ReplyDelete