Sunday, 14 May 2017

इतक्यात वाचलेली पुस्तकं आणि काही अनुत्तरित प्रश्न

नीतिन रिंढे यांचं 'लीळा पुस्तकांच्या' (लोकवाङ्मय गृह प्रकाशन) आणि निरंजन घाटे यांचं 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' (समकालीन प्रकाशन) ही दोन पुस्तकं इतक्यात वाचली. दोन्हीच्या केंद्रस्थानी पुस्तकवेड आहे.

'लीळा..' हे मुख्यत्वेकरून इंग्रजी पुस्तकविश्वातल्या पुस्तकवेड्यांनी लिहिलेल्या आणि जमवलेल्या पुस्तकांबद्दल बोलतं. त्या अनुषंगानं मराठी पुस्तकविश्वातली उदासीनता, त्यामागची संभाव्य कारणं, अशा पुस्तकवेड्यांनी संस्कृतीमध्ये घातलेली भर... इत्यादी विषयांना रिंढे स्पर्श करत जातात. 'वाचत सुटलो....' हे घाट्यांच्या स्वतःच्या वाचनप्रवासाविषयी आहे. त्या-त्या काळात त्यांना झपाटून सोडणारे विषय, इंटरनेटशून्य दिवसांत त्या विषयांवरची ऐकिवात आलेली पुस्तकं मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यातून हाती लागत गेलेली दुर्मीळ आणि अनवट पुस्तकं, त्यातून काही विषयांची ओढ ओसरत जाणं, नवीन विषय सापडणं.... असं ते पुस्तक जातं. पुस्तकवेड हा केंद्रस्थानी असलेला विषय आणि त्याबद्दलच्या अनेकानेक सुरस आणि चमत्कारिक कथांची विपुलता हे दोन मुद्दे सोडले; तर या दोन्ही पुस्तकांची जातकुळी पूर्ण निराळी आहे. 'लीळा...' 'बुक्स ऑन बुक्स' या विशिष्ट संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवतं. अशी पुस्तकं एखाद्या समाजात असण्या-नसण्याचे अर्थ काय असतात, त्या समाजाचं त्यातून कोणतं नुकसान वा फायदा होत असतो, त्यातून निर्माण होणार्‍या वल्ली आणि त्यांचा वेध घेणार्‍या माणसांकडून पुन्हा नव्यानं जन्माला येणारी आणखी काही पुस्तकं असं अव्याहत चक्र रिंढे उलगडून दाखवतात. 'वाचत सुटलो...' अशा प्रकारची कोणतीही निरीक्षणं नोंदवत नाही. ते अगदी साधं, गप्पा मारल्यागत आपल्या वाचनवेडाबद्दल सांगणारं, सामाजिक-साहित्यिक निरीक्षणांच्या आणि निष्कर्षांच्या वाटेला न जाणारं आहे. सुमार मानल्या जाणार्‍या रहस्यकथा, 'तसली' पुस्तकं, गूढकथा, भविष्य-तंत्रमंत्रविद्या-अतींद्रिय अनुभव यांबद्दलचं साहित्य, विज्ञानविषयक नियतकालिकं-मासिकं-पुस्तकं, निरनिराळ्या परदेशी वाचनालयांनी-प्रकाशकांनी-विद्यापीठांनी काढून टाकलेली आणि प्रवास करत भारतीय किनार्‍यापर्यंत येऊन पोचलेली पुस्तकं, त्याबद्दल लिहिताना भेटलेले वाचक आणि प्रकाशक हे घाट्यांच्या पुस्तकातले विषय आहेत.
मला दोन्ही पुस्तकं वाचताना तितकीच मजा आली. अनेक ठिकाणी मी लेखकांच्या सुरात सूर मिसळत सहमतिदर्शक माना डोलावल्या. अनेक नवनवीन पुस्तकांची नावं कळली. ती मिळवून वाचण्याच्या कल्पनेनं मी झपाटले गेले.
पण मग माझ्या लक्ष्यात आलं, या पुस्तकांपैकी निदान इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत तरी इंटरनेट हा भलताच महत्त्वाचा घटक आहे. पुस्तकाचं नाव नीट माहीत असेल, तर अनेक पुस्तकांची इप्रत मिळवणं हा डाव्या हातचा मळ आहे. त्यातून मला मोठाच प्रश्न पडला. अशा प्रकारे पुस्तकं सहजासहजी उपलब्ध होणं चांगलं की वाईट? कागदी प्रतीऐवजी इप्रत वाचल्यामुळे माझ्या पुस्तकानंदात काही उणीव येते का? माझ्या डोक्यात उमटणारी त्या-त्या पुस्तकाची प्रतिमा, त्यातून दीर्घकाळ आठवत राहणार्‍या व्यक्तिरेखा, त्यांच्या लकबी, पुस्तकातले प्रसंग यांची स्पष्टता वा रेखीवपणा इप्रतीत उणावतो का? पुस्तकाच्या कागदाचा रंग, त्याचा गंध, टंकाचा कमीअधिक नेटकेपणा, मजकुराची पानावरची मांडणी, ते पुस्तक हाताळताना मला होणारा आनंद... या गोष्टी नक्की किती महत्त्वाच्या असतात माझ्या पुस्तकप्रेमात? 'वाचत सुटलो....'मध्ये घाटे स्पष्ट कबुलीच देतात, की मला इप्रती मिळवण्यात रस नाही. पुस्तक मिळवण्यासाठी त्याच्या मागावर राहणं, ते मिळाल्यावर आपल्याला परवडेलशा किंमतीत मिळावं म्हणून प्रयत्न करणं, ते आपल्याआधी इतर कुणी नेऊ नये म्हणून खटपटी-लटपटी करणं, घासाघीस आणि सौदे करणं हा त्यांच्या आनंदाचा महत्त्वाचाच भाग आहे. तो वगळून आयती मिळू शकणारी इपुस्तकं त्यांना नकोत.

एरवी लेखकाशी अनेकानेक बाबतींत सहमत असणार्‍या मला याबाबत मात्र निर्णय घेता येईना. पुस्तकं हाताळताना मिळणारा आनंद मी नाकारत नाही. पण पुस्तक अजिबातच न मिळण्यापेक्षा वा ते भरमसाठ पैसे देऊन नंतर त्यासाठी लागणार्‍या जागेची विवंचना करत बसण्यापेक्षा - मला पुस्तकाची इप्रत मिळवणं चालेल. ती तडजोड आहे, यात सवालच नाही. पण माझ्या दृष्टीनं ती अगदी रास्त आणि क्षुल्लक त्याग मानणारी असेल. दुसर्‍या जगात नेऊन सोडण्याची पुस्तकाची क्षमता जोवर हरवून जात नाही, तोवर ते कोणत्या का फॉर्ममध्ये असेना, मी त्यासोबत जमवून घेईनच. मग बदलत्या तंत्रज्ञानाच्या दिवसांत पुस्तकांचं हे रोमॅन्टिक अपील किती काळ टिकेल?

मला माहीत नाही.

दुसरा महत्त्वाचा प्रश्नही याच जातीचा. पुस्तकाला एखाद्या वस्तूसारखं मानणार्‍या आणि त्याबरहुकूम पुस्तकं जमवणार्‍या, त्यापायी भिकेकंगाल होणार्‍या अनेक वल्लींच्या कथा रिंढ्यांनी सांगितल्या आहेत. त्यांच्याबद्दल वाचताना माझी प्रतिक्रिया काहीशी नकारात्मक होती. दुर्मीळ तिकिटं, बाहुल्या, गाड्यांच्या चिमुकल्या प्रतिकृती, नाणी आणि तत्सम वस्तू जमवणार्‍या लोकांच्या छंदात आणि माझ्या पुस्तकछंदात माझ्याकडून नकळत तुलना होत असते. या तुलनेत मी स्वतःला काहीशा वरचढ जागी कल्पून इतरांकडे छुप्या तुच्छतेनं पाहत असते. वस्तू आणि पुस्तक यांत पुस्तकच तोलामोलाचं, हे माझ्या मनानं मानलं आहे. असं असताना पुस्तकं मिळवण्यासाठी आणि ती राखण्यासाठी अक्षरशः आयुष्य उधळून देणारे पण ती जवळजवळ कधीही न वाचणारे हे लोक मी कशा प्रकारे समजून घ्यायचे? त्यांच्या वेडाचं मूल्यमापन करणं रास्त आहे का? असेल तर कोणत्या आधारे? प्लॅटोनिक प्रेम समजून घेत असतानाच प्रेमाची शारीर - भौतिक बाजू मी उद्मेखून अधोरेखित केली आहे, तिचं महत्त्व-अपरिहार्यता-मनाशी असलेलं तिचं अभिन्नत्व ठासून सांगितलं आहे. असं असताना, पुस्तकाच्या बाबतीत मात्र हे प्लॅटोनिक प्रेम तेवढं श्रेष्ठ आणि ती हाताळण्याचा, मिळवण्याचा 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज'मधल्या गोलमच्या पातळीवर जाणारा ध्यास कमअस्सल हे मी कोणत्या अधिकारात ठरवायचं?

'आपल्या पुस्तकांशिवाय परक्या शहरात राहताना, पुस्तकं उसनी आणून वाचताना 'आपल्या' पुस्तकातलं एखादं पान - त्यांतली एखादी ओळ संदर्भहीन वा ससंदर्भ डोळ्यांसमोर येते, तेव्हा काय करायचं?' असा प्रश्न एका टप्प्यावर मीच मला विचारला नव्हता का?

मला या दोन्ही प्रश्नांची धड उत्तरं सापडलेली नाहीत. मी गोंधळलेली आहे.

1 comment:

  1. मी पण ही दोन्ही पुस्तके वाचली आहेत.
    तुझे चिंतन विचारप्रवर्तक.

    ReplyDelete