Wednesday, 8 February 2017

मला प्रवास आवडत नाहीत... कंटिन्यूड.


एका प्रकल्पासाठी काही ‍अ‍ॅडिशनल तुकडे खरडले होते. पण प्रकल्प लांबला म्हणताना प्रकाशित करते आहे. मूळची पोस्ट इथे सापडेल. हे त्याचं निव्वळ वाढीव शेपूट आहे.
***

काही जोडमित्रांबरोबरचा एक प्रवास.

जिज्ञासूंसाठी, जोडमित्र म्हणजे - ज्या जोडीतल्या दोन्ही व्यक्ती आपले पहिल्या धारेचे मित्रच असतात. मित्राची बायको किंवा मैत्रिणीचा नवरा (किंवा अजून काही 'नॉन-स्ट्रेट' कॉम्बिनेशन्स) असला अवघड जागचा प्रकार नसतो. अशा प्रवासांत जोडप्याला आपल्या संसाराचं सुखचित्र सदासर्वदा सांभाळत बसायला लागत नाहीत आणि परिणामी बोलण्यातला करकरीतपणा पुष्कळ कमी असतो.

तर अशा दुर्मीळ प्रवासांपैकी एक प्रवास.

एका ठिकाणी एका मित्राकडे पुख्खा झोडणे, मग तिथून दुसर्‍या ठिकाणी तिसर्‍या मित्राला गाठणे, मग सगळे मिळून अजून कुठेतरी घरंगळायला जाणे, असा वायझेड भरगच्च कार्यक्रम होता. पण दोन मित्रजोड्यांच्या हाती स्वतःचे रथ असल्यामुळे प्रकरण साग्रसंगीत चालू असलेलं. काही कारणानं या रथातली काही मंडळी त्या रथात, पुढच्या संकेतस्थळी भेटायच्या आणाभाका असं काहीतरी नेहमीप्रमाणे कडबोळं झालं. त्यात झालं असं, की जोडमित्रांपैकी एका जोडीतली पत्नी-मैत्रीण आणि दुसर्‍या जोडीतला पती-मित्र असं रसायन आमच्या रथात आलं. सारथी पती-मित्र गाडीतला एकुलता एक पुरुष.

वाटेत लागली एक नर्सरी.

'बायकांना अमुक आवडतं' आणि 'पुरुष मेले हे अस्सेच'छापाच्या सेक्सिष्ट कमेंटांना आमच्यात अस्पृश्य मानतात हे जरी खरं असलं, तरी काही ठिकाणी मी मनातल्या मनात शरमिंदी होऊन स्टिरिओटायपांना शरण जात असते हे कबूल केलं पाहिजे. मातीची भांडी आणि बहरलेली झाडं एकत्र विकणारी हमरस्त्याच्या काठची तंबूसदृश दुकानं हे अशांपैकीच एक ठिकाण. वास्तविक तिकडून आणलेली एकूण एक गुलजार झाडं माझ्या आळसापोटी पाण्याविना तडफडवून मी यथावकाश निजधामाला धाडली आहेत (होय, निवडुंगसुद्धा. असो. असो.) आणि तिथून 'अस्सं रंगवू' नि 'ढमकं करू, मग भार्री दिसेल' असले बेत करत आणलेली सगळी किडूकमिडूक कुटिरोद्योगी भांडी काही महिने धूळ खाऊन माळ्याची वाट चालू लागली आहेत, हेही कबूल केलं पाहिजे.

पण तरीही - तरीही - त्या त्या क्षणांचा मोह असतोच.

अशाच सामुदायिक मोहापुढे सारथी पती-मित्रानं गुडघे टेकले आणि गाडी थांबवली. एकदा गाडी थांबवल्यावर मग काही झाडं, काही कुंड्या, काही चित्रविचित्र आकारांच्या घागरी, काही मातीचे दिवे… अशी भरगच्च खरेदी झाली. 'याला द्यायला हुईल..', 'ते तुझ्या नव्या घराला हुईल..', 'हे बाहेर टांगून काय दिसेल नई?' असं चीत्कारत, घासाघीस करत, वर्तमानपत्री प्याकिंगं करत - निघेनिघेस्तोवर तासभर सहज उडाला.

पुढच्या संकेतस्थळी पत्नी-मैत्रिणीचा जोडीदार खोळंबलेला. त्याचे साडेतीन फोन तरी येऊन गेलेले आणि दुर्लक्ष्यून मारलेले. गाडीत बसता बसता मी थोडं अपराधीपणे आणि थोडं मित्राच्या काळजीपोटी धास्तावत तिला विचारलं, "फार वैतागला असेल का गं तुझा नवरा?"

त्यावर एरवी सर्वगुणसंपन्न, मनमिळाऊ आणि आदर्श वर्तन करून मला शरमायला लावणारी आणि नुकतीच हजारेक रुपयांची अक्षरशः माती केलेलीे माझी शालीन सखी उत्स्फूर्तपणे उद्गारली, "नवरा गेला खड्‍ड्यात!"

गाडीत सेकंदभराची टाचणीस्फोट शांतता आणि मग हसण्याचा स्फोट.

चिकार हसलो. तरी पुढे काही समरप्रसंग उद्भवतो का, अशी हलकी धास्ती माझ्या मनात. पण उद्गारकथन होऊनही, तो उद्भवला नाही, तेव्हा मी दोघांनाही मनातल्या मनात बढती देऊन टाकली.

अर्थात. 'नवरा / बायको गेला / गेली खड्ड्यात' असं म्हणून आला क्षण मनसोक्त साजरा करणारे किती जोडमित्र भेटतात आपल्याला एका आयुष्यात?

***

आणि एक परदेशवारी. नवर्‍याच्या एका प्रोजेक्टानिमित्त मैत्रीण तिकडे वर्षभरासाठी गेलेली आणि आम्ही तिच्या शेपटाला धरून मुक्कामाचे पैसे वाचवून भटकंती करायला तत्पर. तिच्या नवर्‍याशी तशी पूर्वमैत्री नव्हती. पण गडी भलता सालस आणि उत्साही निघाला. आम्हांला आडवाटेच्याही गोष्टीही पाहता याव्यात म्हणून पदरचे पैसे आणि वेळ खर्चून धडपडणारा.

मजेचा, अपूर्वाईचा असला; तरी तो प्रचंड दमवणारा प्रवास होता. सकाळी कसंबसं आवरून आठाला बाहेर पडत असू ते रात्री साडेअकरा-बारा वाजता कधीतरी घरंगळत-कुडकुडत घरी पोहोचत असू.

त्या प्रवासातला शेवटचाच टप्पा. आम्ही सगळेच सैलावलेले, दमलेले, पण आनंदलेले. उद्या कुठेही न भटकता गावातल्या गावात चक्कर मारू, गप्पा ठोकू, लोळू आणि सामान आवरू, असा साधासरळ बेत. त्या दिवशी सकाळपासून आमच्या सालस साल्याला कुणाची तरी नजर लागली. 'येताना पुरणपोळ्या का आणल्या नाहीत?' या प्रश्नाच्या निदान तीसेक हजार आवृत्त्या त्यानं निरनिराळ्या प्रकारे आणि निरनिराळ्या सुरात आम्हांला ऐकवल्या. होमसिकनेस असेल; आम्ही जाणार आणि मग पुढे रिकामा, परदेशातला, थंडीतला वीकान्त पुढे ठाकणार म्हणून आलेलं धास्तावलेपण असेल; आठेक दिवसांत झालेल्या मैत्रीतून आलेला मोकळेपणा असेल…. पण ऐकेचना. मला एकीकडून त्याचा डिफेन्स मेकॅनिझम कळत होता. पण मीही प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यात. डोकं चढायला लागलं.

याचा एकच धोशा - 'ये० पु० पो० का आ० ना०?'

मैत्रीण बिचारी कानकोंडी झालेली.

शेवटी काय किडा चावला मला कुणास ठाऊक. दुसर्‍या दिवशी रामप्रहरी जनता साखरझोपेतून उठायच्या आत गरम कपडे चढवून कोपर्‍यावरचा अफगाणी वाणी गाठला. चण्याची डाळ, गूळ, थोडी वेलची, कढीपत्ता आणि मैदा पैदा केला. त्या साहेबी स्वैपाकघरात पुरण शिजवण्यासाठी पुरेशी मोठी भांडी मिळवणं आणि मग ते प्रकरण वाटणं हे करताना मी मराठी खाद्यसंस्कृतीच्या नावे भ-राग आळवला. पण दोनेक तासांच्या खटपटीनंतर रीजनेबली खाणेबल अशा पुरणाच्या पोळ्या आणि बटाट्याची भाजी उत्पन्न केली.

साल्याचा चेहरा बघून सगळ्या खरकट्या उपद्व्यापाचं सार्थक झालं. बाई आणि स्वैपाक आणि सुगरणपणा आणि स्त्रीवाद यांच्याशी संबंधित सगळे स्टिरिओटाइप्स पुरून स्वतःच्या हातचं कौशल्य जोपासल्याचंही.

आता बहुतेक तो आणि मी मिळून एखादं पोळी-भाजी केंद्र सुरू करू. देशात की परदेशात, ते अजून ठरायचंय!

5 comments:

  1. हसलो वाचताना.
    "छान आहे" .. वगैरे मापं काढणाऱ्या प्रतिक्रिया नाही बुआ देता येत आपल्याला.

    Sincere thanks for sharing.

    Vishal.

    ReplyDelete
    Replies
    1. Welcome! प्रतिक्रिया पोचली. :)

      Delete
  2. Mast! Liked your motivation for Making Puranpolis......!!
    "Khain tar Tupashi" Blog band padala kay?


    :-)

    Ashwini

    ReplyDelete
    Replies
    1. नाही हो, पण सुगरण शांत आहे सध्या! ;-)

      Delete