हा समीक्षालेख नाही. समीक्षा करायला काहीएक तटस्थता कमवावी लागते, ती निदान या बाबतीत तरी माझ्यापाशी नाही. किंबहुना ती गमावण्याच्या प्रक्रियेबद्दल आभार मानण्यासाठीच हे टिपण आहे.
एखाद्या गोष्टीला पूर्ण - कधीकधी अगदी पक्षपाती होऊन! - न्याय देऊन हवा असेल, तर मी त्या गोष्टीत भावनिकरीत्या गुंतणं आवश्यक असतं. गोष्टीत घटना काही का घडेनात - त्यातली माणसं जिवंत, हाडामांसाची, आपलं स्वयंभू भावविश्व असलेली, लेखकाला आणि वाचका-प्रेक्षकाला बिलकूल न जुमानणारी भासावी लागतात. त्यांच्या आनंदादुःखाच्या कल्पनांनी मलाही सुखदुःख व्हावं लागतं. थोडी मी त्यांच्यात, थोडी ती माझ्यात येऊन रुजायला लागतात. असं झालं, की मग गोष्ट माझी होते. मी त्यांची भाषा शिकते. त्यांच्या जगातल्या बारीकसारीक तपशिलांकडे निरखून-पारखून-पुन्हापुन्हा वळून-वाकून पाहते. त्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या निर्णयांचे आणि अनिर्णयांचे अन्वयार्थ लावून पाहते. त्यामागच्या गुंतागुंती समजून घेऊ पाहते. कुणाची बाजू घेते मनातल्या मनात, कुणावर चिडते. कुणाचा लटका राग येतो, कुणाला पाहून पाठीतून भीतीची थंड शिरशिरी दौडत जाते.
सगळं खोटं, कबूलाय. पण खोटं आणि खरं, या तशाही अतिशय सापेक्ष संज्ञा नव्हेत का?
हे सगळं अर्थातच 'शरलॉक'च्या बाबतीत झालं. माझ्या डोक्यात आहेत याची कल्पनाही न देता दडून असलेले अनेक प्रश्न मला त्या गोष्टीनं अलगद दाखवले. काही सोडवून दिले, काही सोडवायला पुरेशी गुंतागुंत असलेला पैस तयार करून दिला, काहींसाठी पैस आखायला लागणारी आयुधं आणि ताकद आणि हिंमत दिली. काही सैल, ढोबळ चुकाही केल्या. पण त्या होईस्तोवर मी गोष्टीत पुरती गुरफटले होते. गोष्टीमागची गोष्ट रचू पाहायला पुष्कळ माया सोडून तिनं मला थोडी माफी दिली होती, मीही तिला सहज माफ केलं. भलेही ती रहस्यंं सोडवणारी आणि सनसनाटी पोलीस-टाइम्सी प्रकारातली का असेना, बघणार्याची नजर जर सूक्ष्म असेल; तर तिला गोष्टीमागची माणसं नीट दिसतात. कॅमेर्याच्या डोळ्याचा सर्वस्पर्शी वापर करून घेत, शब्दबंबाळपणा टाळत, पात्रांच्या इतिहासभूगोलाच्या खुणा गोष्टीतून बघता बघता अवतरायला लागतात. त्यांचा गोष्टीवर आणि गोष्टीचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. एक जिवंत धपापणारं जग श्वास घ्यायला लागतं...
हे सगळं होताना मी अनुभवलं.
पात्रांच्या मोडण्या-वाढण्या-घडण्यासोबत मीही पावलं टाकली. एखाद्या दीर्घ ऐसपैस ग्रंथाच्या काठाकाठानं रानोमाळ भटकावं; पायवाटा-घळी-डोह समजून घ्यावेत; खुद्द ग्रंथाच्या कथानकाइतकंच आजूबाजूचं विस्तीर्ण, आडवंंतिडवं रान निरखावं-पचवावं; थोडी डायवर्जनं घ्यावीत; आत फेरफटका मारून पुन्हा धारेला लागावं... असं मी अनेक वार, अनेक बाबतींत केलं. इंग्रजी समाजाच्या चालीरीती आणि त्यांच्या आधुनिक पॉपकल्चरची चव, पुस्तकांमधून न भेटणार्या भाषेमधल्या नजाकती, अभिनयामधले बारकावे, हीच पात्रं यापूर्वी रंगवणारे अभिनेते आणि त्यांच्या आवृत्त्यांमधली खुमारी, छायांकनाच्या जगातली निरनिराळी तंत्रं, फॅनफिक्शनसारख्या अनवट गोष्टींशी झालेला परिचय, त्यानिमित्ताने सामोरं आलेलं संपूर्ण निराळं जग, त्याचा मराठी साहित्याशी घातलेला ताळमेळ, संगीताचा निराळा पोत, टम्ब्लरसारख्या ठिकाणी नांदणारी फॅनडम्स आणि त्यांची पॉडकास्ट्स, त्यातल्या गप्पांचा पोत आणि तीव्रता, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे विषय आणि त्यांची भाषिक - सामाजिक -राजकीय -लिंगभावविषयक सजगता, या सगळ्यांंशी आपल्या अनुभवविश्वाशी सांगड घालताना मनात येणार्या तुलना, गंड, त्यांवर मात करायला केलेले युक्तिवाद आणि बदल आणि प्रयत्न.... आणि पुन्हा-पुन्हा-पुन्हा-पुन्हा कथानकाच्या धारेला लागत आशा-निराशा अनुभवत अशी वळणं-वाकणं घेत राहणं.
हा एक समृद्ध करणारा अनुभव होता. अर्थात, माझ्या कल्पनारम्य जिवंत मेंदूच्या अस्तित्वाशिवाय हे शक्यच नव्हतं. पण - हे असं एखाद्या टीव्ही मालिकेच्या बाबतीतही होऊ शकतं, हे मी अलीकडे विसरलेच होते. 'शरलॉक'नं तो एक जुनाच पायंडा नव्यानं पाडून दिला. यापुढच्या अशा सगळ्याच चांगल्या गोष्टींमध्ये मी इतकी गुंतीनच असं नाही. उपलब्ध वेळाची आणि आपल्या मूड्सची आणि आपल्या रसविषयांची कुंपणं मला पडणार आहेतच. आणि तरीही, माझ्याच जिवंतपणाचा पुरावा मला नव्यानं मिळून, मी थोडी अधिक माणसाळले मात्र आहेच.
आपल्याला अशा प्रकारे माणसाळवणार्या कोणत्याही गोष्टीचे, गाण्याचे, माणसाचे, वस्तूचे, चित्राचे, जागेचे, भाषेचे वा संकल्पनेचे आभार मानायचे असतात.
त्याला स्मरून - थँक्स शरलॉक, गुड बाय!
तू किती गुंतली होतीस हे प्रत्येक वाक्यातून समजतय! "समीक्षा करायला काहीएक तटस्थता कमवावी लागते, ती निदान या बाबतीत तरी माझ्यापाशी नाही. किंबहुना ती गमावण्याच्या प्रक्रियेबद्दल आभार मानण्यासाठीच हे टिपण आहे" हे एक्दम तोडू आहे!!!
ReplyDeleteमाझ्या डोक्यात आहेत याची कल्पनाही न देता दडून असलेले अनेक प्रश्न मला त्या गोष्टीनं अलगद दाखवले. --> याचं टीपण विस्तृत आलं असतं तर मजा आली असती.
बाकी, तुझी कमावलेली भाषा लई दिसांनी झरली....(ठोको ताली)
आत्ता आली. :)
ReplyDelete