Friday, 14 March 2025

दिसामाजी काहीतरी : अंतर्जनम : देवकी निलयगोडे

‘अंतर्जनम’ हे देवकी निलयमगोडे (उच्चारात चू०भू०दे०घे०) यांचं आत्मचरित्र. नंबुद्री ब्राह्मण घरात १९२८ साली जन्माला आलेल्या या बाई. इंदिरा मेनन आणि राधिका पी. मेनन अशा दोघी जणींनी देवकीबाईंची मल्याळमध्ये लिहिलेली दोन चरित्रात्मक पुस्तकं आणि त्यांचेच काही सुटे लेख यांचं इंग्रजीत भाषांतर करून हे पुस्तक सिद्ध केलं आहे.
नंबुद्री ब्राह्मण चालीरीतींबद्दल मला मोघम माहिती होती. साधारणपणे आठव्या शतकात केरळातल्या राजांनी श्रौत कर्मकांडं करवून धर्माची मान्यता मिळवण्याकरता नंबुद्री ब्राह्मण कुटुंब उत्तरेतून आणवली. ही कर्मकांडं करण्याच्या मोबदल्यात त्यांना जमिनी दिल्या. या ब्राह्मणांनी वेदाध्ययनाची मौखिक परंपरा जपली. मल्याळम भाषेत काव्यरचना केल्या. त्यातून मल्याळम भाषेवर संस्कृतचा अमीट ठसा उमटला. याबद्दल आणि त्यांच्या काही विशिष्ट चालीरीतींबद्दल तेव्हा ऐकण्यात आलेलं असल्यामुळे मला त्याविषयी कुतूहल होतं. त्यामुळे नेटवर रानोमाळ भटकताना वाटेत लागलेलं हे पुस्तक उचललं आणि ते अक्षरशः दोन दिवसांत संपवलं.
वाचताना संताप, शरम, अचंबा, कुतूहल, विषण्णता, कौतुक, अविश्वास…. अशा भावना आलटून पालटून मनात येत राहिल्या.
नंबुद्री ब्राह्मणांना इनाम मिळालेल्या जमिनी कुटुंबातच राहाव्यात आणि त्यांचे तुकडे होऊ नयेत, म्हणून या कुटुंबांमध्ये एक विशिष्ट पद्धत राबवली जात असे. फक्त मोठ्या मुलग्याचं लग्न नंबुद्री ब्राह्मण जातीत करायला परवानगी होती. बाकीच्या मुलग्यांना नायर राजकुळात, वा इतर काही क्षत्रिय जातींमध्ये ‘संबंध’ राखण्याला परवानगी असायची. या संबंधांना ‘संबंधम्’ असंच म्हणत. त्यांच्या स्त्रिया आणि मुलं ही त्यांच्या मातृघरीच राहत. त्यांचे वंशपरंपरागत हक्क, नावं हे सगळंच त्या स्त्रियांच्या माहेरचं असायचं. त्यामुळे नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या जमिनी त्यांच्याकडे सुरक्षित राहत. त्या कुटुंबातल्या मुलींना साहजिकच नवर्या मुलांची चणचण भासायची. हुंडेही जबरदस्त द्यावे लागायचे. त्यामुळे त्यांची लग्नं होणं अतिशय कठीण असे. या मुली वयात आल्यापासून मरेपर्यंत अक्षरशः दिवाभीतासारख्या घरातच डांबल्या जात. एकुणातच नंबुद्री घरांमधल्या सगळ्याच स्त्रियांना परपुरुषाच्या नजरेला पडण्याचीच बंदी होती. त्यामुळे त्यांना ‘अंतर्जनम्’ – म्हणजे अक्षरशः ‘आत राहणारी माणसं’ हेच नाव असे. पुरुषाचा तर सोडाच, परजातीच्या स्त्रीचाही स्पर्श वर्ज्य. तो झालाच तर स्नान केल्याशिवाय अन्नग्रहण-जलग्रहण नाही. पुरुषाची तर नजरही पडणं अशक्यप्राय. तरी घरातल्या विवाहित आणि नवरा जिवंत असलेल्या बाईचं आयुष्य बरं. पण अविवाहित मुली मात्र पाळी सुरू होईपर्यंत घराबाहेरच्या आवारात, देवळापर्यंत, ओसरी-पडवीवर, तळ्यापर्यंत उंडारतील, तितक्याच. पाळी सुरू झाली, की लग्न होईपर्यंत वा मरण येईपर्यंत स्वैपाकघर ते घरातल्या बायकांसाठी राखीव असलेला, परसातला आंघोळीचा हौद कम् तळं. इतकाच त्यांच्या आयुष्याचा परीघ.
वाचताना माझा संताप होत होता. पण मग लागोपाठ चित्पावन ब्राह्मण घरातल्या बायकांची स्थिती आठवे आणि शरमेनं जीव गोळा होई. पण महाराष्ट्रात आधी न्यायमूर्ती रानडे यांनी बालविवाहाच्या विरुद्ध चळवळ आरंभली होती (इ०स० १८६५) तर धोंडो केशव कर्व्यांनी महाराष्ट्रातला पहिला विधवाविवाह १८९८ साली केला होता. त्याही आधी फुले दाम्पत्यानं विधवांच्या मुलांसाठी, स्त्रीशिक्षणासाठी काम सुरू केलं होतं. त्यामुळे तुलनेनं लवकर परिस्थिती बदलली. पण केरळमध्ये मात्र साधारण १९४०-४५पर्यंत नंबुद्री ब्राह्मण स्त्रियांची परिस्थिती कमालीची दयनीय होती. म्हणजे फक्त ८० वर्षांपूर्वीपर्यंत हे असंच सुरू होतं.
राग येत होता, पण एक विचित्र रोगट कुतूहलही वाटत होतं, इतके विलक्षण तपशील.
सांपत्तिक स्थिती बरी असेल, तर या घरांमधून शेकडो माणसं जेवून जात, मदतनीस स्त्रिया, नोकरचाकर, आला-गेला, रोगी, विद्यार्थी... कुणीही विन्मुख जात नसे. पण घरातल्या स्त्रीला मात्र दमडीही उपलब्ध नसायची. ‘तशी पद्धत नव्हती’, इतकंच स्पष्टीकरण. लेखिकेच्या आईला माहेरी जायचं असेल, तर स्वैपाकघरात वापरण्यासाठी जे तांदूळ मॅनेजर द्यायचा, त्यांतले काही तांदूळ महिनोन् महिने थोडथोडे बाजूला करून ठेवावे लागत. मग ते कुणाच्या तरी मेहेरबानीनं विकले गेले की मग हाती आणा लागायचा. असे पैसे जमले की ते मुंडूच्या चुण्यांमध्ये लपवायचे आणि तेव्हा कुठे माहेरी जाता यायचं. अंगावर ल्यायचे कपडेही रंगीत नव्हेत. दोन पांढरी वस्त्रं. बाहेर जाताना अंगाभोवती गुंडाळायला एक मुंडू. एक सोनेरी कडा असलेलं पांढरं वस्त्र. चोळ्या घालायला बंदी. एक लाकडी छत्री. लग्नाच्या वेळी बरोबर आणलेले काही दागिने. एक लाकडी पेटी. इतकीच त्यांची सत्तेची मालमत्ता. बाहेर जाताना अंगाभोवती पायघोळ वस्त्र लपेटायचं, छत्री धरायची – जेणेकरून कुणाच्या दृष्टीला नखही पडू नये, नजर खाली पायाकडे. पुढे मदतनीस नायर स्त्रिया चालत, ‘याS होS’ अशा आरोळ्या देत, म्हणजे ‘शूद्र’ कुणी असेल, तर त्यांनी रस्त्यातून दूर व्हावं. असं देवळापर्यंत जायचं आणि तसंच परत यायचं. मुलींचे कान टोचून त्यात जड पितळी कानातले बाळपणीच घातले जात. कानांच्या पाळ्या लोंबून पार खांद्यापर्यंत याव्यात अशा बेतानं या कानातल्याचं वजन वाढवलं जाई. तसे कान सुंदर मानले जात. ‘मुलींचे कान चांगले लांब होऊ देत’ अशी प्रार्थना बायका करत, म्हणजे मग त्यांची लग्नं नीट होतील आणि त्या कदाचित पोटभर जेवू शकतील, अशी इच्छा त्यामागे असे. नवरा चिडला तर कानांतले खेचून बायकोला सहज यातना देऊ शके. किंवा बसायचं लाकडी आसन पायांवर फेकून मारी, म्हणजे पाय मोडत. बायकांना डॉक्टरनं बघायची पद्धत नव्हतीच. कुणीही आजारी पडलं, तरी आधी आयुर्वेद. तो थकला की मग डॉक्टर. तोही पुरुषांकरता. ‘घरी डॉक्टर आला, तर पेशंट अर्थात ‘पुरुष’ असायचा’ या अर्थाची नोंद वाचून मला चरकायला झालं. बायकांनी अंथरूण धरायचं. जीवानं तग धरला तर ठीक. नाहीतर विधवा, कुमारिका, अविवाहिता मेली काय नि जगली काय. लग्नाची बाईल मेली, तर तिची जागा घ्यायला इतर मुली तत्पर असायच्या. शिक्षण वर्ज्यच. अक्षरओळख करून दिली जायची, पण ती पुराणाचं एक पुस्तक वाचता आलं की तत्काळ बंद. मग पुस्तक वाचण्यावर अर्थातच बंदी. शिक्षणालाही. कारण? परपुरुषाच्या नजरेला पडण्याला बंदी. लग्न झालं तर ठीक, नाहीतर घरात कुजून-राबून मरण. क्वचित या बाया अविवाहित असतानाच मेल्या, तर त्यांची नाममात्र लग्नं करून त्या नवऱ्याकरवी अंत्यसंस्कार केले जात. कारण धर्मानं मुलगी अविवाहित ठेवण्याला मान्यता नव्हती. विधवांचे हाल तर कुत्राही खात नसे. त्यांच्या ‘अशुभ’पणाबद्दल आपण मराठी ब्राह्मणजनांना काही सांगायला नकोच. पण एकंदरीतच शुद्धाशुद्धतेच्या विलक्षण कर्मठ कल्पना. नवरा मेल्यावर स्त्रीनं दागिने उतरवून ओलेतं वस्त्र नेसायचं. नवर्याच्या प्रेतासमोर माथा टेकून त्याची क्षमा मागायची. मग तिनं स्नान करायचं. पण तिला अंग कोरडं करायची परवानगी नसे. दिवसातून तीनदा स्नान करून ओलेतं वस्त्र अंगावरच वाळू द्यायचं. मीठ नसलेलं, न शिजवलेलं असं कदान्न खायचं. एकान्तात, कोंडल्या स्थितीत, काळोखात राहायचं. वैधव्यानंतर पुढे तीन वर्षं हा ‘दीक्षा’ नामक सुतकाचा कार्यक्रम लागू असे. विवाहित बायकाही अक्षरशः जेवणाच्या आशेनं लग्नाबिग्नासारख्या समारंभांतून आशेनं जात. पण त्यांनी जेवायचं ते नवर्याच्या उष्ट्या पानात. ही नंबुद्री ब्राह्मण बायांची स्थिती. इतर - नायरेतर आणि ब्राह्मणेतर - 'शूद्र' स्त्रियांनी तर इतर सगळे जेवल्यावर त्यांच्या उष्ट्या पानांवरच जेवायचं. तेही मालकानं समारंभाच्या ठिकाणच्या ब्राह्मणाला सांगून ओळख पटवून दिली तरच. नंबुद्री कुटुंब कर्जबाजारी झाल्यामुळे जमिनी गेल्या, जप्ती आली, तर पुरुष खुशाल कुठल्यातरी देवळाच्या आसर्याला राहू शकत. स्त्रियांची फिकीर कुणालाच नसे. त्यांचं काही का होईना.
यातला अन्याय अंगावर येतोच. पण त्याचं व्यवस्थेमध्ये केलेलं चिरेबंदी रूपांतर जाणवून थरकून जायला होतं. कुठून आला असेल इतका तीव्र द्वेष आपल्याच बायकांबद्दल आणि मुलींबद्दल? पोटात तुटत नसेल काही? न राहवून मला पेगी मोहन यांच्या पुस्तकाच्या भाषांतरांच्या निमित्तानं वाचलेल्या अनेक गोष्टींची आठवण होत राहिली. भारतात आलेल्या वैदिक आर्यांच्या टोळ्या निदान सुरुवातीच्या काळात तरी पुरुषबहुल होत्या. त्यांनी इथल्या स्त्रिया मिळवल्या. कशा मिळवल्या? त्या स्वेच्छेनं या परकीय पुरुषांशी रत झाल्या असतील, की नाइलाजानं? कुणाला ठाऊक. या स्त्रियांची भाषा संस्कृतेतर. शिवाय त्यांच्यावर संबंध लादलेला असल्यामुळे त्यांच्याबद्दल कमालीचा अविश्वास. त्यामुळे त्यांना संस्कृत शिकायला बंदी असेल? या अविश्वासाची, तिरस्काराची, व्यवस्थाप्रणित छळाची मुळं तिथे असतील का? समजत नाही... अवाक, खिन्न व्हायला होतं खरं.
लेखिकेची भाषा मात्र कमालीची संयत आहे. इतकी, की हा संयतभाव भाषांतरातही आणायचा, पण लेखिका त्या नेमनियमांचं समर्थन करत नाहीय, हेही अधोरेखित करायचं – हे कसं साधायचं असा पेच भाषांतरकारांपुढे उभा राहिल्याचं त्यांनी नोंदलं आहे.
लेखिकेच्या सुरात कडवटपणा नाही. तिला यातला अन्याय दिसत नाही, असं नाही. तिचं लग्न सुधारकी कुटुंबात झालं आणि इंग्लिश शिकता आलं. ‘योग क्षेम सभा’ नामक सुधारकी चळवळीचं काम करता आलं. आयुष्य बदललं. पण ते नंतर. त्यापूर्वीच्या आयुष्याबद्दलच्या तिच्या नोंदी कडवट, संतप्त असत्या तर ते समजण्याजोगं होतं. पण तसं दिसत नाही. तत्कालीन सणसमारंभ आणि चालीरीती, अन्नधान्य साठवण्याच्या पद्धती, जेवणातले पदार्थ, वस्त्रप्रावरणं, निसर्गाशी असलेलं जोडलेपण, वैद्यकीय अज्ञान आणि त्यामुळे धर्मावर असलेलं अवलंबित्व, देवभोळेपण, निरनिराळी फळं-फुलं-पानं यांना जगण्यात असलेलं स्थान... यांबद्दल अतिशय तपशिलात जाऊन, रसाळपणे केलेल्या नोंदी दिसतात. आयुष्य एका प्रकारे अभावाचं खरं, पण ही व्यक्ती त्याही परिस्थितीत किती रसरसून जगली आहे, ते दिसायचं राहत नाही. त्यानं थक्क, नतमस्तक व्हायला होतं.
मला त्यातल्या कितीतरी समारंभांबद्दल वाचताना, केळी-नारळ-सुपार्या-भात-बांबू यांनी घेरलेलं हिरवंगर्द आयुष्य अनुभवताना; कोकणातल्या तत्कालीन मंगळागौरींची, गौरीगणपतीत खेळल्या जाणाऱ्या बायकांच्या खेळांची, तिथल्या निसर्गाची, हिरवेपणाची आठवण होत राहिली. पाठोपाठ अर्थात चित्पावनांच्या केशवपनासारख्या चालीही आठवणं क्रमप्राप्त होतं... पण समाज सुधारू इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी रक्त आटवणार्या काही माणसांचं महत्त्व किती आणि त्यांनी माझं आयुष्य कसं बदललं आहे, हेही पुन्हा पुन्हा जाणवत राहिलं.
नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या दात्री नामक स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप झाला आणि तिच्यावर ‘स्मार्तविचारम’ नावाचा खटला चालवण्यात आला. तिनं एक-दोन नव्हे, तब्बल त्रेसष्ट पुरुषांची नावं घेतली. त्यांच्या शरीरावरच्या अवघड जागच्या खुणा- त्यांची पत्रिका – जन्मवेळ – शरीरसंगाची वेळ-तिथी... इत्यादी पुरावे देऊन तिनं खटला चालवणार्या नायर राजाच्या तोंडाला फेस आणला. त्यानं तिच्यासकट त्या त्रेसष्ट लोकांना जातिबाह्य जाहीर करून खटला गुंडाळला. पुढे तिचं काय झालं त्याच्या काहीही नोंदी सापडत नाहीत. ही घटना १९०५मधली. (अलीकडे मनु पिळलै यानं लिहिलेल्या The Courtesan, the Mahatma & the Italian Brahmin: Tales from Indian History या पुस्तकात त्याबद्दल तपशीलवार वाचता येईल.) या प्रकरणाचे लेखिकेच्या आयुष्यावर पडलेले पडसाद या पुस्तकात दिसत राहतात. दबक्या आवाजात होणार्या चर्चा, दात्रीच्या चारित्र्यावर ओढले जाणारे ताशेरे, आपल्या कुटुंबातल्या कुणा पुरुषाचं नाव त्यात ‘निघालं’ तर काय, ही पोटातली भीती, अविश्वास आणि एक प्रकारचं छुपं कौतुक... अशा गोष्टींच्या नोंदी लेखिकेनं केल्या आहेत. त्या वाचताना लेखिकेच्या संयत, डोळस, विशाल दृष्टीचा प्रत्यय येत राहतो.
नंबुद्री ब्राह्मण जातीतले पुरुषही अखेर या सगळ्या अंधकारमय चालीरीतींचे बळीच होते. त्यांच्यापैकीही काही जणांनी आपापल्या मुलीबाळींसाठी, बहिणीबायकांसाठी सुधारणेचे कडवे प्रयत्न केले. काही जणांमध्ये धैर्य नव्हतं. पण प्रेम होतं. लेखिकेच्या वडलांनी तिच्या बहिणीला संस्कृत शिकायची हौस असल्यामुळे निदान ज्योतिषशास्त्र तरी शिकवण्याचं वचन तिला दिलं. मुलगी एका खोलीत, उंबर्यात वडील, दुसर्या खोलीत शिक्षक – असा शिक्षणाचा खटाटोप काही काळ चालवला, अशी नोंद लेखिकेनं केली आहे. काही नंबुद्री ब्राह्मण पुरुषांनी औषधोपचार न घेता देवासमोर मरायचं ठरवलं. पण स्नानाशिवाय देवासमोर जायचं नाही या नियमासमोर मान तुकवून त्या मरणासन्न अवस्थेत घरच्या तळ्याकाठच्या हौदात बुडी घेऊनच... हे वाचताना पोटात तुटतं. माणसं रूढींसमोर इतकी हतबल का होतात, असा प्रश्न परत एकदा पडला.
जमिनींच्या मालकीपासून या भयानक चक्राला मिळालेली गती अखेर कूळकायद्यात जमिनी गेल्यावर हळूहळू मंदावली. जमिनीच उरल्या नाहीत. जमिनींवर उलटसुलट दावे सांगून तिच्या वाटण्या होऊ नयेत, म्हणून नंबुद्री ब्राह्मण कुटुंबातल्या धाकट्या मुलग्यांनी जातीत लग्न करण्यावर बंदी होती. तीही हळूहळू संपुष्टात आली. वाटण्या झाल्या. विभक्त कुटुंबव्यवस्था आली. स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, चोळ्या घालू लागल्या, कानांच्या फाटक्या पाळ्या शिवून घेऊ लागल्या...
हे पुस्तक इंग्रजीत २०११ साली प्रकाशित झालं. ‘माझ्यानंतर कुणी अशा प्रकारचं आत्मचरित्र लिहू शकणार नाही. जग बदललं आहे.’ अशा आशयाची ओळ त्यातल्या शेवटच्या परिच्छेदात आहे. ती वाचताना हायसं वाटतं.
पण जे. देविका यांनी त्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना विचारात टाकणारी आहे. ‘खरंच दरवाजे उघडले का, किती?’ असा प्रश्न त्या प्रस्तावनेत विचारतात. ते आठवून आणि सध्याचे एकंदर वारे पाहता - थोडं भयभीतही वाटतं.
***

Antharjanam : Memoirs of a Namboodiri woman
Devaki Nilayamgode
Trans. Indira Menon, Radhika P. Menon
Oxford University Press, 2011
***

'फेसबुक'च्या पोस्टखालच्या कमेंट्स बघून काही पुरवण्या जोडाव्याशा वाटतात -
१. केरळ पुढे पुष्कळ प्रागतिक राज्य झाले, तरी नंबुद्री ब्राह्मण समाजांसारख्या काही तथाकथित उच्चवर्णीय जातींमध्ये ही कर्मठ आणि संकुचित मानसिकता पार स्वातंत्र्य मिळेपर्यंत टिकून होती. त्यानंतर त्यात बदल झाला. जाती-जातींमध्ये असा असमतोल आजही दिसतोच - तोही फक्त केरळमध्ये नव्हे, सर्वत्रच.

२. तथाकथित उच्चवर्णीय जातींमध्ये स्त्रियांचे स्थान कायमच दुर्लक्षित, बंदिस्त असे असते असे एक समाजशास्त्रीय निरीक्षण सांगतात. मालमत्ता अधिक, त्यामुळे त्यावर ताबा ठेवण्याची उर्मी अधिक, त्यामुळे योनिशुचितेची चिंता अधिक - असा त्यामागचा तर्क असावा.

३. स्त्रियांना दिली जाणारी वागणूक भयावह असली, तरी त्यात फक्त नंबुद्री ब्राह्मण ही एकच जात दोषी होती असे नाही. महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंबांमध्ये बालविवाहाची चाल होती, तसेच केशवपनासारखी निर्घृण चालही होती. विधवांची स्थिती भयानकच होती. बंगाली ब्राह्मणांमध्ये सती चांगलीच प्रचलित होती. त्याबद्दल काही बोलावे तितके कमीच आहे. तमिळ ब्राह्मणांमध्येही केशवपनाची चाल होती. मराठा जातींतल्या सधन-जमीनदारीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांमध्ये आजही स्त्रियांची स्थिती दयनीय असते. मारवाडी समाजात, तसेच उत्तरेकडच्या उच्चजातीय समाजांमध्येही तीच परिस्थिती असते. मुस्लीम समाजातल्या स्त्रीप्रश्नांवर तर सरकारी प्रचारच चालतो. एकुणात कुणी कुणाला हसण्यासारखी परिस्थिती नाही. काही पुढे, तर काही मागे, काही आधी, तर काही नंतर. पण स्त्रीची दडपणूक या एका बाबतीत सब घोडा बारा टक्का.

४. याविषयी पुष्कळ पुस्तके आहेत. मराठीत ह. ना. आपटे, वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, ज्योतिबा फुले, आगरकर, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, ताराबाई शिंदे, साने गुरुजी, श्री. ज. जोशी अशा कितीतरी नव्या-जुन्या लोकांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल पुष्कळ लिहिले आहे. बंगालीबद्दलही तेच. मल्याळममध्ये ललितांबिका अंतर्जनम यांचे लेखन आहे. त्यावर दोन उत्तम सिनेमेही ऐंशीच्या दशकामध्ये येऊन गेले. मराठी वैचारिक निबंध आणि कादंबर्यांखेरीज, नाटकांमध्येही या विषयाचे उत्तम आणि यथासांग प्रतिबिंब पडलेले दिसते. संदर्भासाठी पाहा : मराठी नाटकाच्या तीस रात्री, खंड पहिला, मकरंद साठे, पॉप्युलर प्रकाशन.

४. वरील परिचयात मी या लेखिकेने केलेल्या निसर्गविषयक, संस्कृतिविषयक निरीक्षणांबद्दल फार लिहिलेले नाही. हे लेखिकेला अन्यायकारक आहे, लिहायला हवे होते. त्यातले अन्नाच्या साठवणुकीचे तपशील, सणांमधून दिसणारे पर्यावरणाचे भान, त्यातला विलक्षण आनंदाचा भाग, नृत्य आणि गाण्यांचे - पुस्तकांतल्या गोष्टींचे आणि पुराणांचे तपशील... हे सगळे अतिशय मनोज्ञ, आनंददायक आहे.

शांत काळोखाचे तुकडे

आमचं घर तेव्हा शहरातल्या टेकडीसदृश भागात होतं. त्यातही चौथा मजला. एका बाजूच्या खिडकीतून उतारावरची एक सरकारी इमारत आणि तिचं प्रशस्त आवार दिसायचं. त्यात झाडं चिकार. जांभळाची, आंब्याची, वडाची, शिरीषाची जुनी-मोठाली-गर्द झाडं. तिथून पोपटांचे थवे उडताना दिसायचे. पूर्वेकडच्या खिडकीतून डोंगर. सूर्योदय तर दिसायचाच. पण त्याहून जास्त अप्रूप वाटायचं ते त्या दिशेनं अपरात्रीच्या वा पहाटेच्या शांततेत ऐकू येणार्‍या ट्रेनच्या भोंग्याचं. गच्चीवरून सगळं शहर दिसायचं. मामा-भाच्याच्या डोंगरापासून ते तेव्हा नव्यानं बांधल्या जाणार्‍या महापालिकेच्या इमारतीपर्यंत आणि त्यालगतच्या शेताडीपर्यंत. वीसहून जास्त मजले असणार्‍या इमारती मोजक्याच. बाकी सगळं शहर आपल्याहून बुटकं. नजरेच्या एका फेरीत न्याहाळता येणारं. उन्हाळ्यातल्या बहुतेकशा रात्री चटया नेऊन गच्चीत पसरायच्या आणि गप्पा ठोकत लोळायचं. हळूहळू उगवत जाणार्‍या चांदण्या. एखादाच मागे राहिलेला चुकार बगळा. मधूनच येणारी वार्‍याची झुळूक. पौर्णिमेला आख्खाच्या आख्खा गरगरीत चंद्र. कोजागिरीला सोसायटीतले लोक जमून भेळ करायचे, मसाला दूध प्यायचे, आणि गाण्यांच्या भेंड्या खेळायचे. शहरात तेव्हा आकाश विझवून टाकणार्‍या प्रकाशाच्या ओकार्‍या टाकलेल्या नसत. उजेड आणि आवाज असायचा, पण सोबत करणारा. 


दिवाळीच्या आसपास हवेत गारवा यायचा आणि होळीपर्यंत टिकायचा, जूनच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात पाऊस कोसळू लागायचा, मे-महिन्यात घामाच्या धारा लागायच्या. पण एसीवाचून जगणं शक्य होतं.


रस्ते डांबरी होते. त्यात सिमेंटचा तोबरा भरायचा अद्याप शिल्लक होता. रस्त्यांच्या कडेनं ऐन शहरातही मधूनच माजलेल्या रानाचे हिरवे तुकडे लागायचे. तिथे चिकनखडे, खाजकुयली, एरंड, आणि कसलीकसली अनाम झाडंझुडपं माजलेली असायची. पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथून हमखास बेडकाचा आवाज यायचा. श्रावणातलं ऊन पडल्यावर अशा रानगट तुकड्यांवर चतुर भिरभिरताना दिसायचे. खूप पाऊस झाला, की चाळींसमोरच्या अंगणांमधून पाणी तुंबायचं आणि मोरीत गांडुळं दिसायला लागायची. लोक खडेमीठ घालून त्यांना तडफडवून मारायला धावायचे.

.

ऑफीस टाईमचे दोन-अडीच तास सोडून प्रवास केला, तर रेल्वे-बसमध्ये बसायला खिडकीची जागाही मिळू शकायची. स्टेशनाबाहेरचं एखाद्या किलोमीटरचं वर्तुळ रिक्षावाल्यांनी गिर्‍हाइकांवर नि गिर्‍हाइकांनी रिक्षांवर झडप घालण्यासाठी राखीव नसे. त्यासाठी रांग लावण्याची बावळट पद्धत होती. लोक गावी जाण्याकरता एसटीची तिकिटं काढायचे. गर्दीच्या दिवसांत त्याकरता एसटीत काम करणार्‍या कुणाचीतरी ओळख काढून ज्यादा गाड्यांची तिकिटं मिळवायचे. अर्थात, गर्दीचे दिवस अशी एक वेगळी कॅटेगरी तेव्हा होती. एसटीचा तेव्हा 'लाल डब्बा' झाला नव्हता, तसंच सर्विस रोड्स आणि बारक्या गल्ल्यांची हक्काची पार्किंगंही झाली नव्हती. तितक्या चारचाक्याच नव्हत्या. त्यामुळे निदान मुंबईतल्या मुंबईत कुठूनही कुठेही तासा-दीड तासात पोचता यायचं. पावसामुळे लोकल ट्रेन्स बंद पडणं आणि अपघातामुळे वा कुणा नेत्याच्या भाषणामुळे रहदारी तुंबणं ह्या तशा क्वचित घडणार्‍या घटना होत्या.  


माघी गणपती आणि नवरात्रातली देवी शहरात तेव्हाही बसत. पण त्यांची ठिकाणं मोजकीच आणि ठरलेली असायची. तिथल्या जत्रा अपूर्वाईच्या वाटायच्या. त्यातल्या कागदी पिपाण्या, पत्र्याच्या बेडक्या, वेताचे उघडमीट करणारे साप आणि धनुष्यबाण, मोठाल्या चक्र्या… हे सगळं वर्षाकाठी एखाद्दुसर्‍या वेळीच दिसायचं. रामनवमीला लोक सुंठवडा खायचे आणि तिन्हीसांजेला देवासमोर दिवा लावताना रामरक्षा पुटपुटायचे. रामाच्या देवळातला राम तेव्हा शालीन आणि सोज्ज्वळ ‘रामराणा’ होता, रामरक्षेची ‘पब्लिक अ‍ॅक्टिविटी’ अद्याप व्हायची होती. 


घरोघरी लॅंडलाईन फोन आले होते. पण  बाहेरगावी फोन करायचा, तर रात्री नऊनंतर सवलतीच्या दरात बोलता यायचं, त्यामुळे तेव्हा बाहेर पडून एसटीडी बूथ गाठला जायचा. परदेशी फोनबिन अपूर्वाईचीच गोष्ट. कुणीकुणी पेजर्स लटकवून शायनिंग मारणारे लोक दिसायचे. मोबाईल फोन येऊ लागले होते, पण सगळी भिस्त मिस्ड कॉल्स आणि एसेमेसवर असायची. 


सिंगल स्क्रीन थिएटर्स जिवंत होती. फटाक्यांची माळ लावल्यावर ती जशी पुढे पेटत-तडतडत आणि मागे विझत-जळलेली दारू सोडत जाते, त्या धर्तीवर वाढत्या शहराच्या वेशीपल्याड उघडणार्‍या आणि मागे ओसाड पडत जाणार्‍या मॉल्सच्या माळेचा जन्म नुकता कुठे होऊ लागला होता. त्यामुळे पॉपकॉर्न्सच्या किमती सिनेमाच्या तिकिटापेक्षा कमी असायच्या.    


ही सगळी मुंबईपासून जेमतेम पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या उपनगरी भागातली गोष्ट. काळाच्या पोटातही फार लांबची नाही बरं का, जेमतेम वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. 


पार 'बटाट्याच्या चाळी'तलं शेवटाकडचं कढकाढू चिंतन वाटतं ना हे? आय नो. मला कल्पना आहे. हे सगळं निव्वळ स्मरणरंजनामुळे छान-छान वाटत असेल अशी एक शक्यता नाकारता येत नाही.


आपल्या भारतीय मनाला गतकातरतेची चूष तशीही असतेच. आपल्याला कायम त्रेतायुगातल्या गोष्टी आदर्श आणि थोर्थोर; तर सध्याचं सगळंच भ्रष्ट भासत असतं. या खास भारतीय घडणीचाही थोडा भाग असेल. शहरी-सवर्ण-सुशिक्षित-कमावत्या अशा माझ्या सांस्कृतिक भांडवलामुळे ‘भरल्या-पोटी माझं सुख दुखतंय' असंही थोडं असू शकेल. सगळंच थोडथोडं शक्य आहे, थोडं खरंही आहे. सगळं नकारात्मकच आहे, असंही नाही. निदान माझ्यासारखं थोडंफार सांस्कृतिक भांडवल असलेल्या लोकांच्या हाती थोडा पैसा खेळू लागला आहे, बरीच वैद्यकीय प्रगती झाली आहे, जनसंपर्काच्या सोयी वेगवान झाल्या आहेत, त्यांनी अंतराच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत, संधींची रेलचेल झालेली आहे, शिक्षणाला अनेकानेकानेक वाटा फुटल्या आहेत, परदेशगमन सोपं झालं आहे, आईबापांना त्यांच्या नोकर्‍यांच्या अखेरच्या काळात मिळणारे पगार पोरांना पहिल्या नोकरीत मिळू लागले आहेत. हे सगळं आहेच. 


असेलही माझी बोच निखळ स्मरणरंजनी. पण सार्वजनिक अवकाशाचं काय? माझ्या आजूबाजूचा, अवघ्या पाव शतकाच्या कालावधीत आमूलाग्र बदलून गेलेला शहरी अवकाश तर खरा आहे? तो मला भेदरवून, घुसमटवून, चिरडून टाकतो आहे. 


मला लक्ष वेधायचं आहे ते भयानक वेगानं काँक्रिटाइज झालेल्या, उजेडानं लखलखलेल्या, आवाजानं दणाणून गेलेल्या, अमानुष गर्दीनं वेढल्या गेलेल्या, रहदारीनं-सांडपाण्यानं तुंबणार्‍या आपल्या सार्वजनिक अवकाशाकडे. मी गावाकडच्या 'निसर्गरम्य' अवकाशाबद्दल बोलत नाहीय. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या शहरांबद्दल बोलतेय. ती आत्ता-आत्तापर्यंत वेगवान, पण सौम्य आणि जैविक होती. ती विषम विकासानं बरबटत, अमानुष, बकाल, कृत्रिम होत गेली आहेत; दिवसेंदिवस अधिकाधिक वेगानं होताहेत. 


गेल्या सहस्रकापर्यंत हडप करायला, विकायला, नफा करून घ्यायला भौतिक आणि मालकी हक्क असलेल्या गोष्टी लागायच्या. भूखंड लाटले जायचे. आता भूखंडच काय, साधी खेळाची मैदानं, बागा, खाड्यांकाठची कांदळवनं, आणि तळ्यांच्या काठी स्वतंत्र जैवसाखळी वागवणार्‍या पाणथळ जागाही हडप करून संपलेल्या आहेत. पिण्याचं पाणी तर कधीच विकायला निघालं. शहरांमध्ये मास्क लावून फिरण्याची सवय कोव्हिडकाळानं लोकांना आयती लावून दिली, त्यामुळे शुद्ध हवा हीदेखील चैनीचीच बाब झाली आहे. मग बळकावायला उरलं काय? 


आता अमूर्त आणि विकत न घेता येण्याजोग्या गोष्टी बळकावल्या जातायत. नाही पटत? विचार करून बघा.


बिनदिक्कत कुठेही आणि कितीही आवाज करा. कुणीही तुम्हांला जाब विचारू शकत नाही. तुमच्या भागातल्या नगरसेवकाचा उजवा हात असलेल्या कुणा अमुकजी तमुकजी साहेबांच्या वाढदिवशी रात्री बारा वाजता फटाके वाजवून शुभेच्छा द्यायच्यात? अवकाश तुमचाच आहे. गणपती, नवरात्र, आणि थर्टीफर्स्ट तर हक्काचेच होते. सव्वीस जानेवारी नि पंधरा ऑगस्टची देशभक्ती लाउडस्पीकरवरून 'ए मेरे वतन के लोगों' आळवल्याशिवाय पूर्वीही साजरी होत नसे. पण आता सार्वजनिक अवकाशात असताना आपला गळता मोबाईल आपल्या कानातल्या बोंड्यांपुरता ठेवावा ही अपेक्षा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांवरचं आक्रमण वाटतं. साधा मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळचा वॉक? इच्छा असो वा असो, ठिकठिकाणी स्पीकर्स लावून फिरता फिरता कानावर गाणी पडतील अशी सोय केलेली असते. तेवढ्यावर थांबायची गरज नाही. घरी हळद आहे? आणवा डॉल्बीची भिंत. गल्लीत सत्यनारायण घालायचाय? बसवा भटजीला पूजा सांगायला माइकच्या बोंडक्यापाशी. सगळ्या गल्लीवर करा पुण्याची बरसात. होऊ द्या खर्च! शांतता आपल्याच तीर्थरूपांची आहे. 


बचाबच उजेड करा. दुकानांसमोर मोठाली झाडं आहेत? सुमडीत रात्रीबेरात्री एखादं इंजेक्षन टोचा. महिन्या-दोन महिन्यात झाड वठून मरतंय. तुम्ही दुकानावर रोषणाई करून गिर्‍हाईक खेचायला मोकळे. ते जमत नसेल, तर झाडावर अंदाधुंद लायटिंग तरी करा. इतकी सोय दिलीय निसर्गानं, ती वापरा. एखादी मोठीशी इमारत पुनर्विकसनासाठी घेतलीय? त्याच्या बाहेरच्या भिंती मोठाल्या चोवीस-तास-चमकत्या जाहिरातींसाठी वापरून टाका. झगमगवून टाका रस्ते अहोरात्र. आयुष्यातला अंधार मिटवून टाका. प्रकाशाकडे चला. महामार्ग आणि उड्डाणपूल तर बोलूनचालून गाड्यांतून जाणार्‍या लोकांना जाहिराती दाखवण्यासाठीच असतात, एरवी इतक्या रहदारीत तुंबलेलं असताना त्यांचा वेळ जायचा कसा? सगळीच्या सगळी दर्शनी जागा जाहिरातींसाठी विका, झगमगवा. उजळून टाका आसमंत. निऑन साइन्स लावा, फ्लड लाइट्स सोडा, लेझर किरण वापरा. चंद्र आणि ताऱ्यांसारख्या मागास गोष्टी इथं कुणाला बघायच्या आहेत? 


लोकांपाशी असलेला स्वस्थ वेळ हीदेखील आता एक हडपण्यायोग्य कमॉडिटी आहे. कसं करायचं हे माहितीय? प्रादेशिक भाषांमधून सिरियली आणवा तिन्हीत्रिकाळ चालणार्‍या. त्याही आपल्या समृद्ध सोनेरी पुराणांवर आधारित असलेल्या वा आध्यात्मिक सत्पुरुषांच्या चमत्कारांचं दर्शन घडवणार्‍या असतील तर सोन्याहून पिवळं. गल्लोगल्ली दिवाळीपहाटसदृश पण शक्य तितक्या फुकट्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी होऊ द्या. तसंही आपल्याला कुठे द्यायचं आहे सभागृहाचं भाडं? रस्त्यावरच तर मांडव ठोकायचा आहे. त्यातूनही वेळ उरला, तर रिअ‍ॅलिटी शोज घडवा, रील्स बनवा, सेल्फी पॉइंट बांधवा. गुडमॉर्निंगयुक्त व्हॉट्सॅप, इंस्टा-ट्विटर, फेसबुक आणि ओटीटी आहेतच. अवघा आनंदकल्लोळ उसळू द्या… 


हे औपरोधिक-अतिरंजित वाटेल. थोडं अंगावर येणारं, थोडं उगाच भीती दाखवणारंही. पण आपल्या आजूबाजूचा भवताल निरखून बघा, नि यांतलं काहीही खोटं असेल तर सांगा. 


इतक्यावर थांबणार नाही हे. असं वाटतं, हळूहळू जिथे काहीही करायचं नाहीय - ऐकाबोलायचं-लिहावाचायचं-बघानाचायचं-खायचंप्यायचं नाहीय - असे शांत काळोखाचे तुकडे विकायला निघतील. किमान काही जणांच्या तरी खिशाला त्यांचं भाडं परवडेलच. अशा परवडणार्‍या लोकांच्यात आपण असू, इतकी खातरजमा करून घेतली की झालं. मग एकविसाव्या शतकात सगळी धमाल आहे. 


अरुण कोलटकरांच्या कवितेतल्याप्रमाणे 'बघता बघता वस्तूंच्या रक्तात साखर होऊन’ जाण्याकडे आपला प्रवास भरधाव सुरू आहे.


(लोकरंंग, लोकसत्ता, जानेवारी २०२५)

Saturday, 28 December 2024

नव्वदीच्या आगेमागे : राहून गेलेले तुकडे ०१

शहरी घरात, चाळीत नि ऑलमोस्ट झोपडपट्टीत वाढले मी. काही वर्षं तर घर बांधकाम चालू असलेल्या इमारतीतच थाटलेलं होतं, कारण बिल्डर पळून जाईल अशी भीती होती. सांगायचा मुद्दा असा की माझं लहानपण काही निसर्गरम्य वगैरे खेड्यात गेलं नाही. नि तरी मला अनेक झाडं नि फुलं ओळखीची होती.
कुंपणापाशी मेंदीची झुडपं होती. ती ओरबाडून पाला पाट्यावर वाटायचा नि हाताला बांधून झोपायचं, असा एक उद्योग असायचा. पुढे गल्लीत वड. त्याच्या फळांचा सडा रस्त्यावर पडून रस्ता लालपिवळा माखलेला असे.
चाळीत राहत असताना शेजारच्या मामीच्या पुढीलदारी जांभळाचं झाड होतं. जांभळीचं लाकूड कुचकं हो, जपून... असे इशारे देत कुणीतरी दर वर्षी तिच्यावर चढायचं, पहिल्या मजल्यावरच्या व्हरांड्यातून लोक काढण्याबिढण्या देऊ करायचे, जांभळं काढून घरोघर वाटली जायची. मामी रोज संध्याकाळी अंगणात पाण्याचा सडा मारायची. तिच्या मागीलदारी केळ नि जास्वंद नि सोनटक्का. तिच्या पलीकडे तगरीचं गचपण. नि तिच्या तळाशी दुर्वा. त्या तगरीची फुलं चाळीतले सगळे जण देवाला घालायला कायम काढत असायचे. तरी तगर कमी पडायची नाही. जांभळीच्या पलीकडच्या कोपऱ्यात कायम चिकनखडे नि खाजकुयली नि एरंड माजलेले असायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात तिथे टाचण्या नि चतुर भिरकटत असायचे कायम. माझी आगाऊ भावंडं चतुर पकडून त्यांना दोरे बांधून उडवायची. मला ते एकाच वेळी जाम शूर नि भयंकर क्रूर वाटायचं. पण माझी धाव मात्र आमच्या दारासमोरच्या बिट्टीची पिवळीधम्मक फुलं वेचून पाची बोटांत घालण्यापुरतीच. बिट्टीच्या फुलाच्या आत एकच नाजूक देखणा पराग असतो, तो काढून त्याची नथनी करायची. बिट्टीची फळंही पडायची. त्याचा गर खोट्या खोट्या कैऱ्यांचा गर म्हणून भातुकलीतलं लोणचं घालण्याकरता. आत बिट्ट्यांच्या बिया. त्या उगाच जमवून ठेवायच्या. तशाच चटक्याच्या बिया असायच्या. बहुधा पांगाऱ्याच्या. त्या फरशीवर जरा घासल्या की तापायच्या. मग त्यांनी चटका द्यायचा, हा खेळ. कारंज्याच्या बियाही मला आठवतात. त्या दाबून एकमेकांवर पिचकाऱ्या उडवण्याचा खेळ. पलीकडच्या वाडीत गणपतीचं देऊळ. मधल्या कुंपणाच्या भिंतीवर शेवाळ धरायचं पावसात. तसंच एक विशिष्ट जातीची शेवाळासारखी वनस्पतीही उगवायची. टाचणीसारखा अगदी नाजूक देठ नि त्याला पुढे घोड्याचं चिमणं तोंड असावं तसं चिमुकलं डोकं. सगळा मिळून टाचणीहून लहान हिरवागार कारभार. असे दोन घोडे दोघांनी घ्यायचे नि त्यांची डोकी एकमेकांच्यात अडकायची. कुशल खेळाडू आपल्या टाचणीनं दुसरीचं मुंडकं उडवायचा. देवळाच्या आवारात देवचाफा उर्फ पांढरा चाफा. त्याच्या फुलांना गोड वास. त्याच्या फुलांच्या अंगठ्या करून बोटांत घालायच्या. पुढच्या वाडीत चिमण्या केशरी फुलांचे गुच्छ येणारं झाड. त्या फुलांच्या देठांत अगदी थेंबभर मध असायचा. त्याचे गुच्छच्या गुच्छ तोडून एकेका फुलातला मध चुंपत बसायचं. तिथेच कोपऱ्यावर मधुमालतीचा माजलेला वेल. वेड लागल्यासारखा फुलांनी लदबदलेला असे तो. त्याच्या फुलांचे देठ लांबसडक नि चिवट. ते एकांत एक गुंफून आई त्याची सुबक वेणी करायची. त्याही फुलांना मंद आणि गोड वास. पुढे हनीसकलचा वास घेतल्यावर - काही साम्य नसूनही मला मधुमालती आठवली होती एकदम. मागीलदारी अनंताचं झाड. लहानसं. पण काय धुंद सुगंध. दर वर्षी एकदा त्याला फुलांचा वेडा बहर यायचा. मग ती फुलं काढून वाडीत सगळ्यांना थोडथोडी वाटायची. पैंच्या दाराशी सदाफुली, अबोली, आणि गुलबक्षी. पांढऱ्या सदाफुलीची पानं पाण्यात उकळून ते पाणी प्यायलं तर मधुमेहावर गुणकारी असतं म्हणे. गुलबक्षीची फुलं बघून मला कितीतरी वर्षं सोनाराकडचा कागद आठवायचा. हे खास माझ्या शहरीपणाचं लक्षण. अबोली बघून आईच्या गजरेप्रिय मनाला मोह, पण मला ती तशी ग्लॅमरहीनच वाटायची.
शाळेत येण्याजाण्याच्या रस्त्यावरही रान माजलेल्या जागा होत्या चक्क. आता आठवून अचंबा वाटतो. त्यातून चिकनखडे काढून ओढण्यांवर फेकून मारण्याचा एक खेळ.
कोकणातल्या आजोळी तर काही विचारू नका. विहिरीवरचा मोगरा, दारात बकुळ. कुंपणावर फड्ये निवडुंग. मागीलदारी जांब आणि चिकू आणि पेरू आणि पपई. पलीकडे काजू. देवळासमोर आंबा. दारातही मोठ्ठा आंबा. कवाडीपाशी फणस... असा सगळा सरंजाम. बाबांच्या माहेरी कवाडीजवळच हेs मोठं बांबूचं गचपण, अलीकडे प्राजक्त. दारचा फणस तोडला तर भाऊआजोबा कोण खवळले होते. पण गावचं वेगळंच. तिकडे अजूनही बरंच कायकाय. त्याचं मोठंसं कौतुकही नाही, तिथल्या कुणाला तर नाहीच. पण सापाकिरडाला, अंधाराला, नि एकूणच गावातल्या हिरव्याकंच वासाला भिऊन असलेल्या शहरी मला तर नाहीच नाही.
मला नवल वाटतं ते माझ्या ठार शहरी आयुष्यातल्या फुलापानांच्या श्रीमंतीचं. वाडीत सुरवंट अंगावर पडायचा कधीतरी कुणाच्या येताजाताना. मग चार तास कंड सुटून पुरेवाट. पावसात मृगाचे लाल रेशमी किडे सापडायचे, मग ते बिचारे मरेस्तो काडेपेट्यांतून कैद व्हायचे. पिवळी नि काळीपांढरी नि शेंदरी फुलपाखरं कायम दिसायची. कण्हेर असायची मागीलदारी. तिच्यावर एखादंच लाल-शेंदरी तकतकीत डौलदार फूल. मामीच्या दारात कृष्णकमळांचा वेल होता. पावसाळ्यात त्यावर फुलं आली की शाळेत जाताना केसांत घालायला म्हणून तिच्याकडून फूल आणायचं. शंभर कौरव, पाच पाण्डव, नि मधला कृष्ण. त्याचा निळाजांभळा रंग नि वास. त्या गोड वेलीवर काडमुंगळे असायचे कायम. बुचाच्या फुलांचा दिमाख मी आत्याच्या गावी बघितला. रस्त्यावर हाs सडा. अगदी माजोरड्यासारखं वाटायचं त्यावरून चालत जाणं. पण गावातल्या गावात मावशीच्या सोसायटीबाहेर हा थोरला नागचाफा. त्याच्या बुंध्यावर कायम फुलं लगडलेली नि गोडसर सुवास. त्याच्या चामड्यासारख्या जाडसर नि तरी मखमली स्पर्शाच्या, गर्दलाल पाकळ्या, आतला पिवळाधमक फणा नि शंकराची पिंड म्हणवला जाणारा परागकंद अतीव दिमाखदार वाटायचा.
आता निदान शहरांतून तरी या सगळ्याचं आयुष्यातून उच्चाटनच झालेलं दिसतं. उदास वाटतं. थोडं भयभीतही.

Friday, 20 December 2024

बुजरी गाणी ११

हे गाणं आपल्या नॉस्टाल्जियाचा भाग असल्यामुळेच आपल्याला आवडत असणार, एरवी यात काय आहे, अशी मी स्वतःची समजूत काढत असे. कारण पडद्यावर चित्ते, वाघ, झेब्रे इत्यादींची आठवण करून देणारी टाइट्समधली शिल्पा शेट्टी आणि केसाळ छाती दाखवणारा अक्षयकुमार. त्यांच्या नाचाच्या मुद्रांचा - खरं तर हातवाऱ्यांचा, let's be realistic! - गाण्याच्या बोलांशी काहीही संबंध नाहीय. पूर्ण गाणंभर ते एकमेकांवर शरीराच्या मांसल भागांनिशी धडका देणे, घासणे, कुरवाळणे, जवळ येणे-लांब जाणे... अशा गोष्टी करतात. 'शरीराचा आवेग नावरे आवरीता' हेच काय ते कोरिओग्राफीमधलं विधान आहे. 

पण तरीही... गाणं नुसतं ऐकलं, तर ते कमालीचं गोड आहे. 

शब्दांत एक प्रकारची चलबिचल, अनिश्चितता आहे. 'या माणसावर जीव जडलाय खरा, पण हा देईल ना साथ, की दुसऱ्या कुणाला जवळ करेल लहर फिरल्यावर?', 'बोलून दाखवू का हिला मनातले मोह? की लाजून दूर करेल?'... अशा शंकाकुशंका बोलून दाखवणारे - न दाखवणारे दोन नवे प्रेमिक. आणि त्या हळुवार संकोचांना आणि आवेगांना साथ दिल्यासारखी गाण्याची सुरावट. 

कडव्याची सुरुवात अगदी खालच्या सुरात, मनातलं गूज बोलून दाखवावं हलकेच, अशी तिच्या आवाजात होते. मग तिथून तिचा हात हातात घेऊन दाणदाण पायऱ्या चढून वर जावं तसा गायक वर जातो आणि खड्या आवाजात तिला उत्तर देतो. तिथून तिनं लाजून त्याला पुन्हा थोडं खाली आडोशाला न्यावं, तशी धीम्या सुरातली कबुली... ध्रुपद... पुन्हा हाच खेळ.  अशी जुगलबंदी या गाण्यात कुमार सानू आणि अलका याज्ञिक मनसोक्त रंगवतात.

पडद्यावर हे हाताळू शकणारा कुणी दिग्दर्शक मिळाला असता, तर हे गाणं कुठच्या कुठे गेलं असतं, अशी चुटपुट वाटल्याशिवाय राहत नाही.

~



चुरा के दिल मेरा गोरिया चली - २

उड़ा के निंदिया कहाँ तू चली 

पागल हुआ दीवाना हुआ 

कैसी ये दिल की लगी 

चुरा के दिल तेरा चली मैं चली 

मुझे क्या पता कहाँ मैं चली 

मंज़िल मेरी बस तू ही तू 

तेरी गली मैं चली... चुरा के दिल मेरा...

अभी तो लगे हैं चाहतों के मेले 

अभी दिल मेरा धड़कनों से खेले 

किसी मोड़ पे मैं तुमको पुकारूं 

बहाना कोई बना तो ना लोगे 

...अगर मैं बता दूं मेरे दिल में क्या है 

...तुम मुझसे निगाहें चुरा तो ना लोगे 

...अगर बढ़ गयी है बेताबियां 

...कहीं मुझसे दामन छुड़ा तो ना लोगे 

कहता है दिल धड़कते हुए 

तुम सनम हमारे हम तुम्हारे हुए 

मंज़िल मेरी बस तू ही तू - २

तेरी गली मैं चली...

चुरा के दिल मेरा गोरिया चली

चुरा के दिल तेरा चली मैं चली...

नही बेवफ़ा तुम ये मुझको खबर है 

बदलती रुतों से मगर मुझको डर है 

नई हसरतों की नई सेज पर तुम 

नया फूल कोई सजा तो ना लोगे 

...वफ़ाएं तो मुझसे बहुत तुमने की है 

...मगर इस जहाँ में हसीं और भी हैं 

...कसम मेरी खा कर इतना बता दो 

...किसी और से दिल लगा तो ना लोगे 

धीरे धीरे चोरी चोरी आके मिल 

टूट ना जाये प्यार भरा दिल 

मंज़िल मेरी बस तू ही तू - २

तेरी गली मैं चली 

चुरा के दिल मेरा गोरिया चली 

~

गाण्याचे बोल इंटरनेटवरून ढापलेले असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे.

Sunday, 20 October 2024

या वाटा वळणावळणांनी

या वाटा वळणावळणांनी घनदाट अरण्यात घेऊन जातात
भर दिवसा किर्र अंधार असतो पायातळी
हिरवेकंच ओलेगर्द उग्रधुंद गंध पानोपानी 
महाकाय वृक्षांच्या फांद्या बघत वर जाणारी नजर घरंगळत जाते भलतीकडे
कुठे पिवळेजर्द नाग, कुठे चमचमते काजवे, कुठे पाखरं निळीभोर, कुठे गुंजांचे विषारी सडे...
घामेजलेला हात तरीही असतो हातात
उरात धसका, जिवात मोह, मनात कांचनमृगाचा ध्यास.
ओलांडल्या जातात लक्ष्मणरेषा,
कधी कुणा मायावी बैराग्याची चाहूल... 
अखेर जमिनीच्या पोटातच असते जागा
माझी आणि तुझीही.
पण म्हणून या वाटा का टाळायच्या आहेत?
या वाटा वळणावळणांनी घनदाट अरण्यात घेऊन जातात.

Sunday, 21 July 2024

थँक्स टू हिंदी सिनेमे ०४

लग्नामधली गाणी हा बॉलिवुडमधला एक हुकमी एक्का. भरपूर गजरे ल्यायलेल्या, दागदागिन्यांनी मढलेल्या, खिदळणार्या, लाजणार्या , हसणार्याहसवणार्या खूप बायका, खूप रंग आणि रोषणाई वापरून केलेल्या सजावटी, आणि सनईचे सूर. रॉकी और रानी की प्रेमकहानीमधल्या तेरी कुडमायी के दिन आ गयेबघताना त्यातलं करणजोहरीय सौंदर्यशास्त्राला अनुसरून असलेलं, काहीसं बटबटीत, पण तरीही निव्वळ वेगळेपणामुळे टवटवीत वाटणारं रोल रिव्हर्सल जाणवलं आणि एकापाठोपाठ एक गाणी आठवत गेली. त्यातलेही निरनिराळे प्रकार दिसत गेले.

एक प्रकार म्हणजे सरळच लग्न ठरलं आहे, वा उद्यावर वा आत्तावर येऊन ठेपलं आहे, डोळ्यांत स्वप्नं आहेत, मनात उत्कंठा आणि आतुरता, आणि आईबापापासून विरहाचं दुःख. पण मजा अशी, की बॉलिवुडचा स्वभाव हिंदी आणि त्यामुळे उत्तर भारताला जवळचा. त्यातलं विरहाचं दुःख बाबुल का अंगनासोडून जाण्याचं. आईला तितकासा भाव गीतकारही देत नाही. बाबुल की गलीयाँ छोड चली’! अर्थात, अगदी माहेराला महत्त्व असलेल्या महाराष्ट्रातही कितीतरी ठिकाणी वधूच्या आईला लग्न बघायचीही परवानगी नसत असे, म्हणताना... ठीकच म्हणायचं! अशा गाण्यांमध्ये विशेषतः नवर्या मुलीवर शुभेच्छांची नुसती खैरात असते. तिला खुशीयाँमिळाव्यात म्हणून दुवाएँ’; तिच्या पदरात चंद्र, तारे; तिचा चेहरा कसा चंद्राच्या तुकड्यासारखा, तिची कांती कशी दुधासारखी, झूमर असं, झुमका तसा, बिंदी अशी, कंगन तसं, हातावर मेंदी कशी, पायातले पैंजण कसे... एक ना दोन. नवर्या मुलीचं काम नुसतं गोरेपान नितळ खांदे आणि कर्दळीसारख्या पोटर्या उघड्या टाकून नाजूक हातांनी हळद-चंदन लावून घेण्याचं नाहीतर पॅसिव्हली साजशृंगार करून घेत, आरशासमोर बसून लाजत, सुंदर दिसत हळूच हसण्याबिसण्याचं. मेंदीला मोठाच भाव. बहनों ने रोशनी कर ली मेहंदी से जला के उंगलीयाँकाय किंवा चक्क मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना’. साजण येईल तेव्हा त्याच्याकरता तय्यार राहायचं, बस. अॅक्टिव्ह रोलची जबाबदारी पियाच्या गळ्यात घालून या नवर्या मस्त मोकळ्या झालेल्या असतात. डोळ्यांत विरहाचं माफक पाणी, पण मुख्यत्वे तिकडची स्वप्नं. मेरे बन्नो की आयेगी बारातपासून बन्नो तेरी अखियाँ सुरमेदानीपर्यंत आणि मेहंदी है रचनेवाली, हाथोंमें गहरी लालीपासून नवराई माझी लाडाची लाडाची गोपर्यंत. छलका छलका रे कलसी का पानीपासून हम तो भये परदेसपर्यंत. इथल्या सख्यांच्या, आईबापाच्या विरहाचं दुःख आहे. पण त्याला तरी काय इलाज! मैं तो भूल चली बाबुल का देस, पिया का घर प्यारा लगे...

राजीतल्या उंगली पकड के तूने चलना सिखाया था नामध्ये याला अपवाद होता. कारण नवरी मुलगी फक्त नवरी मुलगी नव्हती. पण असे अपवाद नियम सिद्ध करण्यापुरतेच. बाकी बहुतेक वेळा साजनजी घर आये दूल्हन क्यों शर्माये’…

यात नवर्या मुलीला शंभरातून पन्नास वेळा तरी ह-म-खा-स बन्नो हे नामाधिधान लावलेलं असतं. मग तिला सल्लेबिल्लेही दिलेले असतात. ते पोक्त आजीबाईछाप सल्ले असतातच. पण फक्त तितकेच असतात असंच काही नाही. देखो बन्नो मान न जाना, मुखडा उनको ना दिखलाना, पहले सौ बातें मनवाना, केहना बोलो, कर के सलामी, बन मैं करूंगा तेरी गुलामी...असाही व्यावहारिक वळसा असतो. वास्तविक नवर्या मुलाला तसं परफॉर्मन्सचं किती प्रेशर असतं. नवर्या मुलीला जाऊन निदान पहिल्या रात्री तरी मेलेल्या माशासारखे भाव सलज्ज डोळ्यात घेऊन पुतळा होऊन बसायचं असतं. करायचं ते नवरा मुलगा करणार असतो. पण ज्याला काही करून मर्दानगी सिद्ध करायची असते, त्याचं काय? त्या बिचार्याला सल्लेबिल्ले देण्याची काही पद्धत बॉलिवुडमध्ये नाही.

नवर्या मुलीच्या मनात नुसतीच प्रियाची ओढ असते असंही नाही. शृंगाराची स्पष्ट आतुरताही असते. जिया जले जान जलेच्या शब्दांत उघडच अंग अंग में जलती हैं, दर्द की चिंगारीयाँ, मसले फूलों की मेहक में तितलीयोँ की क्यारियाँ...असं होतं, ते काय उगाच? ‘रुकमणी रुकमणी, शादी के बाद क्या क्या हुआ...हा त्याचाच एक अवतार. धीरे धीरे खटिया पे खटखट होने लगी...यात कल्पनेला वावबीव तरी कुठे आहे?! थेट मुद्द्याला हात!

अलीकडे लापता लेडीजमध्ये नवर्या मुलीच्या पोटातली अनिश्चिततेची भीतीही सुरेख चितारली होती. आंगन में पेड वहाँ होगा के नही, होगा तो झूला उसपे होगा की नही…’ इथपासून ते नवरा घोरत तर नसेल... इथपर्यंत.

पण कायम सिनेमाची नायिकाच नवरी मुलगी असेल असंही काही नाही. मैत्रिणीच्या नाहीतर बहिणीच्या लग्नात मिरवणारी आगाऊ नायिका आणि हीरोचा तसलाच आगाऊ कारा मित्र हा बॉलिवुडमधल्या प्रेमकथांमधला एक हमखास ट्रोप. हम आप के हैं कौनमधली जूते दे दो पैसे ले लोतशातलंच.

पण हम आप के हैं कौनअसल्या गाण्यांची बॅंकच बाळगून आहे म्हणा. लग्नातल्या गाण्याचा कुठलाही प्रकार सांगा, तो त्यात सापडणारच. आगाऊ बहीण आणि भाऊ यांची चेष्टामस्करी आणि पुढे प्रेमात पडायची तयारी? ‘जूते दे दो पैसे ले लो’. नायिकेचंच लग्न आणि नायक विरहानं व्याकूळ? ‘मुझ से जुदा हो कर’. लग्नासाठी उतावीळ लेक? ‘माईनी माई मुंडेर पे तेरे...लग्नातली नवरा-नवरींची चेष्टामस्करी आणि दुवाएँ? ‘वाह वाह रामजी’. चावट आणि वाह्यात मस्करी? आहे की. दीदी तेरा देवर’. अगदी गलोलीनं नितंबावर फुलं फेकून मारण्यापर्यंत सबकुछ. विहीण आणि व्याह्यांमधली चेष्टा? काळजी सोडा, तेही आहे – ‘आज हमारे दिल में...

तर – ‘हम आप केचं सोडून देऊ!

आपलं स्वतःचं लग्न जमवण्याच्या भानगडीत इतरांची लग्नं मनापासून अटेंड करणारे स्मार्ट लोक बॉलिवुडमध्ये चिकार. हम दिल दे चुके..मधलं आँखों की गुस्ताखीयाँ..’, ‘कभी खुशी कभी गममधलं बन्नो की सहेली रेशम की डोरी’ (पाहा, इथेही बन्नो आहेच!), ‘प्यार तो होनाही थामधलं आज है सगाई’…. अशी कित्तीतरी गाणी मिळतील. या गाण्यांमधला मूड प्रसन्न, उजळ, रंगीत असतो. नायिका आगाऊ असते थोडी, पण नायकानं थोडी मर्दगिरी केल्यावर तिच्या डोळ्यांत एकदम लाज उमटून जाते. नायकनायिकांना इतर लोक सतत कट केल्यागत एकत्र आणत असतात. कधी तिच्या नि त्याच्या ओढण्यांची गाठ, कधी त्याच्या कुर्त्याच्या बटणात तिची ओढणी, कधी दोघांना एका फेट्याच्या कापडात एकत्र आणपूरी कायनात दोनों को... असो!

अजून एक प्रकार म्हणजे असफल प्रेम आणि त्याचं वा तिचं लग्न अटेंड करावं लागणं. या सिच्युएशनमध्ये एकट्या राहिलेल्या इसमाला (वा इसमीला) कम्माल म्हणजे कम्माल अॅटिट्यूड आलेला असतो. एकतर माझं काय व्हायचं ते होवो, तुझं भलं होवोअसा स्वार्थत्यागाचा उमाळा, किंवा मग नुसते अर्थपूर्ण दुःखी टोकदार कटाक्षच कटाक्ष... पॅसिव्ह अग्रेसिव्ह वागण्याची पार हद्द. या प्रकारातलं मूळपुरुष गाणं म्हणजे अजीब दास्ताँ है ये’. आता झालंय ना त्याचं लग्न? मग का उगा त्याच्या हृदयाला डागण्या देतीस बाई? जा ना गप निघून. पण नाही. असं केलं तर ती नायिका कसली! राजा की आयेगी बारात...त्यातलंच. तुमबिन जीवन कैसा जीवनमध्ये बैलगाडीच्या मागून विद्ध-संतप्त चेहर्यानं चालणारा जया भादुरीचा प्रियकर आठवा. किंवा स्वतः मरणार असल्यामुळे प्रेमपात्राला नीटस नवरा गाठून देऊन वर तिला त्याच्या प्रेमात पाडणारा 'माही वे'मधला शारुख. किंवा मग अलीकडच्या सुना है के उन को शिकायत बहुत हैमधली गंगूबाई... काय तो कफन पेहन के कुर्बान होण्याचा भाव... हाय अल्ला!

याचाच एक पोटप्रकार म्हणजे लग्न करायचं, पण मनात मात्र प्रियकर किंवा प्रेयसी. वीर-झारातलं मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ...किंवा देवदासमधलं हमेशा तुमको चाहा’. पण देवदाससगळाच तसा... पुनश्च असो!

अजून एक खास प्रकार म्हणजे निव्वळ चावटपणा. मेरे हाथों में नौ नौ चूडीयाँ हैंमधली कल चोली सिलाई आज तंग हो गईम्हणत धुंद होऊन नाचणारी श्रीदेवी, ‘इश्शकजादेमधल्या मेरा आशिक छल्ला वल्लातला पैजामे से लडते हुए रात बितानेवाला आशिकही काही उदाहरणं. रुकमणी रुकमणीत्यांपैकीच, आणि लग्नातलं नसलं तरी डोहाळे पुरवता न येणार्या बावळट साजणाची चेष्टा करणारं दीदी तेरा देवर दिवानाही त्यांपैकीच. होता होईतो पुरुषांना बघा-ऐकायला मनाई करून खास स्त्रीवर्गाला गोळा करून शृंगारविषयक चावट चेष्टामस्कर्या करणं हा या गाण्यांचा विशेष हेतू.

अशी कितीतरी गाणी निरनिराळ्या कारणांनी लक्षात राहून गेलेली, आवडलेली. पण या ठरीव साच्यांमधली असूनही त्यांना बगल देऊन जाणारी, वेगळेपणानं ठसलेली गाणी अगदी क्वचित.

सत्यातलं सपनों में मिलती हैत्यांपैकी एक. ते गाणं अगदी मुंबई पद्धतीच्या लग्नाचं आहे. नवरा-नवरी समोर स्टेजवर आणि प्रेक्षक खाली खुर्च्यांमध्ये बसलेले. पुरुष एकतर निवांत बसलेले तरी नाहीतर पार कायच्या काय हालचाली करून नाचम्हणायला जड जाईल, असा नाच करणारे. निखळ पुरुषी ऊर्जा. निळाशार सोनेरी बुंदक्यांचा आणि गुलाबी काठाचा शालू नेसलेली शेफाली छाया त्या गाण्यात बघून घ्यावी. काय तिचा चार्म! मागे येणार्या नवर्याला लटक्या रागानं रिकाम्या रिक्षाची उपमा काय देते, मध्येच लाडात येऊन त्याच्या थोबाडीत काय मारते, कमाल लालित्यानिशी ठुमकते काय... ते सगळं गाणं तिच्याभोवती फिरतं. साथीला आशाचा मुरलेला खट्याळ आवाज आणि बॅकग्राउंडमध्ये कुठेतरी स्वप्नदृश्यातली शालीन उर्मिला.

बॉम्बेतलं केहना ही क्यावास्तविक प्रेमात पडू बघणार्या नायक-नायिकांचंच. पण मणिरत्नम आणि रेहमान अशा एक सोडून दोन-दोन परिसांचा स्पर्श त्याला झालेला असल्यामुळे ते कुठल्या कुठे गेलं आहे. भित्र्या हरणीसारखी पण अनुरक्त झालेल्या प्रेमिकेची भिरभिरती-लाजरी नजर... तबल्याचा दिलखेचक ठेका... सोनेरी झालरी लावलेल्या झिरझिरीत ओढण्या ल्यालेल्या बायकापोरीउंचच उंच अवकाश असलेल्या इमारती... आणि स्वप्नील छायाप्रकाशाचा खेळ.

बधाई होमधलं सजन बडे सेंटीअसंच मजेशीर. त्यातल्या लग्नात वावरणारे नीना गुप्ता आणि गजराज राव चाळिशी-पन्नाशीच्या आसपासचे. पण नीना गुप्ता गरोदर असल्यामुळे स्वतःच्या पौरुषाच्या कामगिरीवर निहायत खूश असलेला गजराव राव तिला नव्याच कौतुकानं न्याहाळणारा. कधी गच्चीवरून खालच्या तिच्याकडे प्रेमभरानं बघणारा, तर कधी जिन्यावरून उतरणार्या पत्नीच्या पूर्ण स्त्रीदेहाचा दिमाख विस्फारल्या, चकित नजरेनं बघणारा. कधी हळूचकन तिच्या पोटाची अलाबला घेणारा. कधी आईची करडी नजर जाणवून गोरामोरा होणारा... त्यातला त्या दोघांमधला चोरटा पण लोभस शृंगार बघताना खूप मजा आली होती, किंचित भरूनही आलं होतं.

गँग्स ऑफ वास्सेपूरमधलं तार बिजली से पतले हमारे पियाहे अजून एक रत्न. त्याला लोकसंगीताची डूब आहे आणि लग्नातल्या मेहंदी-संगीत समारंभाचा अस्सल ढोलक ठेका. तशा गाण्याबजावण्यात भांड्यावर चमचा वाजवत ठेका धरतात असं स्नेहा खानविलकरला कुणीतरी म्हटलं म्हणून तिनं गाण्यात टटक टटक टटक टटक...असे शब्दच चपखलपणे वापरले आहेत. विधवा सासू आणि विधवा थोरली जाऊ नव्या सुनेच्या स्वागतासाठी कौतुकानं गाताहेत, हवेत आनंद आहे, शब्दांमुळे आलेली हलकी मस्करी आहे, हसर्या मुद्रा आहेत... पण सासर्याच्या आठवणीनं कातर झालेल्या सासूला बघून चमकलेली नवी सून बघता बघता तिला सावरून घेते. तिची त्या घराचं होऊन जाण्यातली परिपक्वता आणि पाठीमागच्या गाण्यातल्या सुरातली विद्धता... त्या गाण्यातली मूळ मिश्किली ओलांडून ते गाणं कुठल्या कुठे उंचीवर निघून जातं. हुमा कुरेशीचं कौतुक करायचं, की रिचा चढ्ढाचं, की स्नेहा खानविलकरचं, शारदाबाईंचं की अनुराग कश्यपचं... कळेनासं होतं.

मीरा नायरचा मॉन्सून वेडिंगलग्नातच घडणारा. त्यातलं दिल्लीकर श्रीमंती लग्न आणि त्यातले नात्यांचे अस्सल भारतीय गुंते लक्षात राहतातच. पण श्रेयनामावली सुरू असताना वाजणारं कावा कावाबघताना आपण सिनेमातल्या कंत्राटदाराचं आणि मोलकरणीचं झेंडूच्या केशरी रंगांत न्हालेलं लग्नही आठवून खूश होत राहतो, ही त्या सिनेमाची प्रसन्न खासियत.

ही काही समग्र यादी नव्हे. तशी ती बॉलिवुडबाबत शक्यही नाही. अजून तासभर गप्पा ठोकत बसलो तर अजून अशीच पन्नासेक गाणी आपण सहज काढू शकू. तूर्त ही आवडलेल्या चंदेरी लग्नगाण्यांची आठवण नुसती...

अशीच एक आठवण एकदा पार्टीतली गाणी या प्रकाराची काढायची आहे, एकदा वयात आल्या-आल्या तारुण्यानं मुसमुसून गात सुटणार्या नायक-नायिकांच्या गाण्यांची... इरादे काय, चिकार आहेत. फिर कभी.