Friday, 14 June 2019

नाक्यावरच्या छक्क्याच्या

नाक्यावरच्या छक्क्याच्या
हक्कानं पसरलेल्या हातावर
ठेवते मी
दोन्ही हात छातीपाशी पूर्ण जुळवून,
मान लववून केलेला नमस्कार
फक्त.
चकित होतो चेहरा क्षणभर.
पण मग हसू येतं चेहऱ्यावर
डोळ्यांपर्यंत पोचणारं.
दोन्ही हात उंचावले जातात.
माथ्याला हलका स्पर्श.
सिग्नल हिरवा होतो.
रिक्षावाला भरधाव सुटतो.
पुढच्या कोरड्याठाक दिवसभरात
हसू झिरपत राहतं.
कुणाचं कुणास ठाऊक.

Tuesday, 11 June 2019

चालली घोडी दिमाखात


पट्टे आवळा, जिरेटोप बांधा
टाकली टांग, मारली टाच
नवा दिवस, नवी सकाळ
चालली घोडी दिमाखात

याला घाई त्याला घाई
तिला घाई हिला घाई
साईड मुळीच देणार नाही
माझीच सगळ्यांत मोठी आई

सुटेल सिग्नल मिनिटभरात
हाक गड्या, ये पुढ्यात
घुसव चाक, दिसली फट?
सुटला-सुटला, चालव हात

चपळाईने हेर जागा
बघ चौफेर, नजर ठेव
आला आला पार्किँगवाला
सुट्टी नोट तयार ठेव

चल चल पाऊल उचल
दे रेटा मार धक्का
इतकं हळू भागेल कसं?
भीड सोड हो पक्का
पर्स धर पोटापाशी
त्यात तुझे पंचप्राण
लाव जोर, शीर आत
नेम धरून कोपर हाण

एरवी तुलाच बसेल ढुशी
जाईल तोल, पडशील खाली
मिनिटभराची सुकी हळहळ
'आली कुणी चाकाखाली!'

बंद निसटू देऊ नकोस
अडकेल कुठे, फास बसेल
स्वतःसकट चार जणांत
गोंधळ माजेल, गाडी चुकेल

तोल जाऊन देऊ नकोस
हासड शिवी, झिंज्या धर
पायावरती दे पाय
एरवी कशी येशील वर?

ओलीगच्च एक पाठ
तिला चिकटून एक नाक
शिरलं शिरलं ढुंगण फटीत
मागून बसली एक लाथ

जीव झाला लोळागोळा
अर्धा श्वास राहिला वर
थांब थोडा, सुटेल गाडी
मिळेल हवा, धीर धर

बेंबीपासून खेच श्वास
लाव जमेल तितका जोर
आत घूस, पकड जागा
नाहीपेक्षा बरा डोअर

बसला गचका, सुटली गाडी
झाला तह, रेलली पाठ
नवा दिवस, नवी सकाळ
चालली घोडी दिमाखात

Friday, 7 June 2019

काहीही झालं तरी चूक तुमचीच असण्याच्या काळात

काहीही झालं तरी चूक तुमचीच असण्याच्या काळात
जन्माला आलेले असता तुम्ही
तेव्हा सगळे उपरोध आत वळवून घेण्याला पर्याय असत नाहीत.
पेट्रोल जाळलंत तरी तुम्ही पुढच्या पिढ्यांचे गुन्हेगार
लाकूड जाळलंत तरीही तुम्हीच मागच्या पिढ्यांचा वारसा जपायला नालायक ठरलेले
बेजबाबदार.
काहीच न जाळता नुसते निवांत बसतो म्हणालात
निसर्गाबिसर्गाच्या सान्निध्यात,
तरीही थोडेफार थोरोबिरो होऊन गेलेले असतात पूर्वीच.
तुम्ही ओरिजनॅलिटी नसलेले
बिनडोक नकलाकार.
विकास हवा म्हणालात,
तर तुमच्यावर पर्यावरणाच्या निर्घृण खुनाचे आरोप होतात.
विकास नको म्हणालात,
तर कमोडवर बसून साधं निवांत हगण्यालाही हिप्पोक्रसीचे छद्मी रंग येतात.
प्रेमात पडून पटवा प्रियकर.
करा लग्न, आणा मूलबिल,
थाटा संसार.
तुम्ही चाकोरीतून चालणारे
धोपटमार्गी पगारदार.
नको च्यायला लग्नबिग्न.
दुनियेला मारतो म्हणा, फाट्यावर.
जेनेटिकल मैदानात उतरायचा धीरच न झालेले तुम्ही.
दुनिया तुम्हांलाच भेकड म्हणणार.
युद्ध टाळा
काश्मिरात नको म्हणा, हिंसाचार.
संशयाचं गगनचुंबी वारूळ उठलंच समजा
तुमच्या देशभक्तीवर.
म्हणा कधी समजुतीनं,
'नाचू दे की विसर्जनात मनसोक्त
ऊर्मी असतात यार...'  
थोबाडाला काळं फासून कर्मकांडाच्या गाढवावर
तत्काळ तुम्ही उलटे सवार.
दिवस असे अखेरीचे येतात,
की उभं राहावंच लागतं तुम्हांला.
एकीकडून गेल्या शतकांचा राक्षसी ताकदीचा लोंढा
आणि एकीकडून जुलैचा वायझेड वारापाऊस अंगावर घेत,
हातातली कडी आणि फुटबोर्डावरचा पाय निसटू न देण्याची पराकाष्ठा करत.
स्टेशन येईस्तो,

असलीनसली सगळी ताकद एकवटून उभं राहण्याला पर्याय असत नाहीत.
काय करणार?
एका पायावर, तर एका पायावर.

दिवसाची शुभ्र कळी उमलू लागतानाच्या अस्फुट मोतिया प्रहरात

दिवसाची शुभ्र कळी उमलू लागतानाच्या अस्फुट मोतिया प्रहरात
आसमंतात दरवळत असतो
मंद एसी लावल्यासारखा ताजा कुरकुरीत गारवा.
तेव्हा ओट्यापाशी उभी राहून
आंघोळीपूर्वीच्या सोवळ्यात स्वैपाक उरकून घेणारी बाई
करत राहते आटापिटा
कपाळावरचा घामाचा थेंब निसटून
कणकेच्या परातीत पडू नये म्हणून.
शिळ्या घामाची पुटं धुऊन
नवाकोरा ताजा घाम लेऊन
जिना उतरते
आणि नाक्यावरच्या एकमेव रिक्षापर्यंत पोचण्याच्या अलिखित शर्यतीत जिंकून
धावत्या रिक्षात निमिषभर थारावते
तेव्हा गारव्याची हलकी शीळ ऐकू येतेच तिला
रिक्षाच्या फर्र आवाजावर मात करत.
टवटवलेले तुकतुकीत पेन्शनरी घोळके,
आपल्याच लयीत मग्न होऊन रस्ते झाडणारे
आणि लयीचा बळी देण्याचं बाणेदारपणे नाकारून
बसस्टॉपवरच्या इस्त्र्यांवर मिश्कील उर्मटपणे धूळ उडवत जाणारे
मिजासखोर झाडूवाले,
घाईला झुकांडी देत
तळ्यातल्या पाण्यावर जमलेली
संथ मलईदार निवांतता
सगळं बघता बघता विसर्जित होत जातं
भाजीवाल्यांच्या आरोळ्यांत,
हॉर्न्सच्या हाणामार्‍यांत,
ट्रॅफिक हवालदारांच्या शिट्ट्यांत.
करकचून लागलेले ब्रेक्स,
'पोटाला दे गं माय...
पोहे-उपमा-खिच्डी-गरम्म….’
‘…तेज गाडी जानेवाली है...
राइट साइड डोअर कोपरा पकडून,
पर्स शिताफीनं आतल्या विश्वासाच्या हाती सोपवून,
ओढणी अंगासरशी आवरून घेऊन,
बाई गाडीला पाठ टेकते तेव्हा सूर्य वर आलेला असतो दळदार.
मऊ ऊन मनापासून पिऊन घेत
फोनची बोंडं कानात खुपसते,
सैलावते अर्ध्यापाऊण तासापुरती
कपाळ टिपून घेते एकदाच नीट.
इथून पुढच्या घामावर
पहिला हक्क शहराचा असतो...

Wednesday, 5 June 2019

बुडाला यावा फोड असं या विश्वीचं आर्त

बुडाला यावा फोड असं या विश्वीचं आर्त आपल्या बेसूर गळ्यातून काढत,
भजनाचा सूर माइकच्या बोंडकात घुसून पोचलेला पार टिपरीत.
सिऱ्यलीचा आवाज हातपाय झाडत बुडतो त्यात गळ्यापर्यंत.
काकू फणकारतात.
चहू बाजूंनी चालून येणारे आवाज उडवून लावतात मानेच्या एका झटक्यात.
ते हटता हटत नाहीत.
काकू चवताळतात.
रिमोटच्या बटणावर जोर काढतात.
सिऱ्यलीतल्या सात्त्विक सुनेच्या सोशीकपणाचं स्तोत्र.
तिची पार तार लागलेली.
व्हॉल्यूमची रेष जाईल तितकी वर नेतात काकू रिमोटच्या बटणावर चढून.
कुकराच्या शिट्टीची दीर्घ किंचाळी साथ देते दारावरच्या बेलला त्याच जोशात.
भजन अधिक सिऱ्यलस्तोत्र अधिक कुकरशिट्टी अधिक डोअरबेल अशा सगळ्या बेरजेत,
हातचा एक घेतात.
आल्ये, आल्ये, आल्ये - तारस्वरात किंचाळतात.
एकीकडे पाठीची रग दवडतात.
पायाशी दीड तास मोडून मोडलेल्या गवारीची परात.
विसरून ठेचकाळतात, कळवळतात.
दार उघडताना काकांवर करवादतात.
काका सरावानं कानाच्या पापण्या घेतात फाटकन मिटून.
आसमंतातल्या आवाजांच्या वातीवर चपळाईनं चढतात,
वात चवड्याखाली चिरडतात, विझवतात.
दाढेच्या खोपच्यात सारतात तंबाखूची गोळी.
दिवस म्यूट होतो.

Sunday, 26 May 2019

कानातले विकणाऱ्या पोरींच्या डोळ्यांत उडतात फुलपाखरं

कानातले विकणाऱ्या पोरींच्या डोळ्यांत उडतात फुलपाखरं.
पण तीक्ष्ण ससाणेदार नख्या वागवत अणकुचीदार,
सफाईदारपणे वाट काढतात ऐन साडेनवाच्या फास्टमधल्या गर्दीतून
काखोटीत दागिन्यांचं झुंबर लखलखवत.
शिव्या देतात हसतहसत
धारदार घासाघीस करतात.
उतरत्या दुपारी विझत
गेलेल्या फलाटावर कोंडाळं करून
एखाद्दुसऱ्या टपोऱ्या टग्याची मनमुराद मस्करी करत,
भजी-चपाती चाबलतात खिदळत कागदातून
कानातले विकणाऱ्या पोरी.
सावळ्या तरतरीत नाकातल्या मोरणीचा एकच खडा
कापत जावा एका विशिष्ट कोनातून
आसपासच्या नजरा लक्ककन आरपार,
तसा पोरींचा विजेसारखा वावर.
नव्यानं चाकरीला निघालेल्या पोरसवदा बायांच्या नजरेत पैदा करतो किंचित असूया, तुडुंब आदर.
ऋतूंमागून ऋतू.
उन्हाळे पिकत जातात.
आटत्या दिवसांचे हिवाळे नांदतात.
अंगापिंडानं भरतात.
पावसाळ्यामागून पावसाळे,
कोवळ्या कोंबांना खरबरीत पोताच्या सालींचे ताठर चिवट वेढे पडतात.
कानातले विकणाऱ्या पोरींच्या डोळ्यांतली फुलपाखरं
अल्पजीवी निसर्गचक्रासमोर मुकाट तुकवतात माना.
मावळत जातात.
पोरसवदा बायांच्या चाकऱ्या बर्करार.
तिथे फोफावत जातो कोरडाठाक काटेरी आत्मविश्वास दाणेदार.
कानातल्यांची फॅशन बदलते.
कानातले विकणाऱ्या कोवळ्या पोरींच्या डोळ्यात फडफडतात नवी फुलपाखरं.
नख्या अधिक अणकुचीदार.
गर्दी पाऊलभर अधिक क्रूर.
अळीच्या पोटात फुलपाखरांच्या पिढ्यांमागून पिढ्या रिचत जातात.
उमलत राहतात.

Friday, 24 May 2019

फूटपाथ नसलेल्या रस्त्यावरून

फूटपाथ नसलेल्या रस्त्यावरून ऑलमोस्ट अंगावर येणारी जगड्व्याळ बस
वटारल्या गेलेल्या डोळ्यानी जोखून बघत कुंपणभिंतीला घसपटत चालताना
हातातली छत्री उलटी होऊ नये म्हणून मुठीकडून जोर लावावा,
अंगावर चिखलाचा सपकारा बसू नये म्हणून भिंतीत जिरावं होता होईतो,
की पुढ्यातल्या भोकाची खोली आणि झाकणाची जाडी
मापून घ्यावी नजरेनीच जमेल तितकी
पाऊल पुढे टाकण्यापूर्वी,
हे ठरवावं लागेल आता रोज.
स्टेशनातल्या ब्रिजवर पुरेसा हवेशीर कोपरा हेरून पाण्याची भडास थांबेतो थबकणं,
फ्लायओव्हरच्या कोपर्‍याखाली आसरा घेणं,
की ऑफीसची सॅक भिजली तर भिजली गेली भोकात जान सलामत तो लॅपटॉप पचास म्हणत थेट सूर मारणं,
यांतलं काय कमी प्राणघातक ठरेल,
हेही.
कधीतरी तर पोचूच ही बेगुमान खातरी मनाशी धरून आडमुठेपणी उभ्या राहिलेल्या बयेच्या गर्दीत घुसावं
आणि पोटातला चहा मुक्कामी पोचेस्तो बाईच्या जातीसारखा समजूतदार दम धरेलशी आशा करावी,
मागचापुढचा विचार न करता पाणी ढोसण्याची चैन करण्याबद्दल स्वतःला बोल लावावा,
की शरणागती पत्करून कुणाच्यातरी चुलतचुलत सोबतीला लटकत गाठावी एखादी मर्यादशील मोरी,
हेही.
पहाटे उठून प्रलयाचा आवाज ऐकताना वर्किंग फ्रॉम होमचं ड्राफ्टिंग करावं मनातल्या मनात,
लाईट गेले की नेटचं कनेक्शन ढपणार म्हणून आधीच हेरून ठेवावा एखादा भरोशाचा शेजारी,
की भिजलो तर भिजलो च्यायला मिठाचे बनलोय का आपण न्यूज च्यानेलवाले डोक्यावर पडलेत साले म्हणत घ्यावं आलं किसायला,
हेही.
असू दे आत्ता दर शुक्रवारी कपात.
असू दे विहिरींच्या तळांच्या नि टॅंकरच्या फोटोंची लयलूट पेपरात.
असू देत नाक्यावरच्या वस्तीत रोज नवे भिकारी ओतले जात.
हवा उन्हानं खरपूस तापत चार्ज होत चाललीय दिवसेंदिवस.
तिचा करंट खाऊन मरायचं
की तिच्यावर स्वार होत  घ्यायचा शहराच्या जळजळीत स्पिरिटचा घोट,
हे ठरवावं लागेल आता. 
रोज.