Thursday, 28 May 2009

मॉर्निंग, वॉक आणि मी

शुक्रवार रात्री नऊसाडेनऊ:

उद्या (तरी) सकाळी उठून फिरायला जायचंच, मी कितव्यांदातरी निग्रहानं स्वत:शी घोकते. नेहमीप्रमाणे साडेपाच वगैरे वाजताचा अघोरी गजर लावते. मग एकदम पापमुक्त झाल्यासारखं वाटून लोळत टीव्ही. मग काही वेळ कादंबरी. झोप येण्यापुरती हातात धरलेलं अभ्यासाचं पुस्तक. व्हिक्स. पाणी. गाणी. झोप.

शनिवार सकाळी नऊसाडेनऊ:

डोळ्यांवर आलेलं ऊन. पंख्याचा घर्र घर्र आवाज. अंगभर आळस. ’माझा गजर कुणी बंद केला?’ माझी जोर नसलेली कुरकुर. उत्तरादाखल काही तुच्छतादर्शक कटाक्ष. मग शनिवार सकाळचा स्वस्तातला मल्टिप्लेक्स सिनेमा गाठायसाठी जोरदार धावाधाव. लायब्ररी. शॉपिंग मॉल. भाजी मार्केट. दुपारची स्वर्गीय झोप. सगळं स्वर्गीय वाटत असतानाच शनिवारची रंगीन रात्र कधी कूस बदलते समजत नाही. शिवाय कितीही अपराधभाव असला, तरी रविवार सकाळसाठी गजर लावायचं महापाप काही कुणी करत नाही.

रविवार संध्याकाळ सात-साडेसात:

काहीही कल्पना नसताना पायाखालची जमीन हिसकावून घ्यावी कुणी आणि आपण एकदम अनाथ एकटे कातरवेळी समुद्रकिनारी - अशा पद्धतीत वीकान्त संपून गेलेला, सोमवार पुढ्यात उभा ठाकलेला. ’उद्यापासून मात्र कुठल्याही परिस्थितीत उठायचंच. काही लाज वाटते का तुला?’ वगैरे सेल्फटॉक. पुन्हा एकदा गजर.

सोमवार सकाळी पावणेसहा:

गजर. स्नूझ. गजर. च्यायला. वाजतोय साला. उठावं का? मरू दे. ऊठ. ऊठ. ऊठ. बाहेर पाखरं किलबिलताहेत, हवा कशी गार आहे. मरू देत ती पाखरं, पांघरुणात छान वाटतेय गार हवा. ऊठ. ऊठ ****. अखेरशेवट मी उठते.
आरोग्यदायी आल्याचा चहा, व्यायामी जामानिमा, लाजेकाजेस्तव वॉर्म-अप करून बाहेर पडेपर्यंत साडेसहा.
बागेत आणि बागेभोवती हीऽऽऽऽ गर्दी. गर्दी बघून मी दचकते. आत्ता काय झालंय काय? इतके सगळे लोक? मग यथावकाश डोळ्यांवरची झोप उडून दोनेक फेर्‍या होईस्तोवर ते सगळे उत्साही आरोग्यवंत लोक असल्याचं मला कळतं.
च्यायला, संध्याकाळी सातसाडेसातनंतर खिडक्यादारं बंद करून खुडूक बसणार्‍या या शहरातले हे मंद लोक, आणि पहाटे आरोग्य सांभाळायची ही अहमहमिका, अं? येडपट साले... माझी उगाच चिडचिड.
सहावी फेरी मारताना शेजारून स्टायलिशपणे पळणारा एक मुलगा हळूच बागेच्या आतल्या बाजूनं पळणार्‍या एकीच्या वेगाचा अंदाज घेत मंदावतो. पण मग माझी नजर जाणवून, गडबडून परत एकदा जोरात पळत सुटतो. मला नकळत हसू फुटतं.

मंगळवार सकाळ सहा:

थोडासा पाऊस शिंतडून गेल्यामुळे नेहमीचे भुरे रस्ते ताजे तुकतुकीत काळेभोर दिसतायत. त्यावर ही जांभळी किनखापी फुलं? च्यायला, एकेका शहराचं नशीब असतं खरंच. माझ्या मुंबईकर मनातला मत्सर पृष्ठभागापाशीच. वर डोकवायला सदैव उत्सुक. त्याला तस्संच दाबून मी बागेकडे वळते.
कालचा तो मुलगा दिसतोच. मला बघून चक्क नजर चोरून पुढे? हा हा हा!
तिसर्‍या फेरीत बागेतल्या कोपर्‍यात एक हसर्‍या आजी-आजोबांचं वर्तुळ. एक टाळी. हा:! दोन टाळ्या. हु:! तीन टाळ्या. हा:हा:हु:हु:! त्यांना तसंच टाकून पुढे जाणं मला चक्क जड जातं. मी ऑलमोस्ट पळत पळत माझी फेरी पुरी करून त्यांच्यापाशी परत येतेय, तोवर त्यांचं शवासन चालू झालेलं. फुस्स.
मग माझं लक्ष बागेसमोरच्या घरांकडे जातं. पांढराशुभ्र रंग आणि बाल्कनीतून लडिवाळपणे खाली येऊ बघणारी गुलबाक्षी रंगाची कागदीची फुलं.
दुसरं घर. व्यक्तिमत्त्वहीन पिस्ता कलर. हे अगदीच काकूबाई घर. नीटनेटकं-स्वच्छ वगैरे आहे, पण स्वभाव एकदम ’सातच्या आत घरात’. हॅ, काय गंमत नाही.
तिसरं घर. वॉव, समोर चक्क दगडी फरसबंदी वगैरे? आणि व्हरांड्यात टांगलेला खानदानी पितळी कंदील? पण या घराच्या समोरचा गुलमोहोर गायब केला, तर हे रुबाबदार घर एकदम बापुडवाणं दिसायला लागेल, माझी खात्रीच पटते. असला परावलंबी रुबाब काय कामाचा? हॅट, नापास.
चौथं घर. रंग पिस्ताच. पण बाळबोध बटबटीत पिस्ता नव्हे. इंग्लिश कलरचा तोरा. शिवाय सगळीकडून घराला पडदानशीन करून टाकणारा अस्ताव्यस्त पसारेदार विलायती गुलमोहोर. मुंबईसारखा पाऊस कोसळला इथे, तर या खिडकीत बसायला काय बहार येईल, माझा फुकाचा कल्पनाविस्तार. तितक्यात मागच्या बाल्कनीत वाळत टाकलेले टॉवेल्स आणि चड्ड्या-बड्ड्या दिसतात आणि मी रागारागानं पुढे जाते.
पाचवं घर. हे नवंच दिसतंय. अजून समोर वाळूचा लहानसा ढीग, थोड्या विटा वगैरे आहेत. पण रंग मात्र सुरेख चकचकीत पांढरा. आणि ’हम दिल दे चुके सनम’च्या सेटची आठवण करून देणार्‍या तीन तीन गच्च्या. त्यावर लालचुटूक कौलं. अरे, पुढचं दार उघडं? हॉलमधून वर जाणारा वळसेदार जिना आणि मागच्या खिडकीतून दिसणारं हिरवंगार परस. काका पेपर वाचतायत की काय? घड्याळपण एकदम जुन्या पद्धतीचं ’टोले’जंगी दिसतंय. बाप रे, साडेसात? पळा...

बुधवार सकाळ सव्वासहा:

हा:हा:हु:हु: गाठायला धावत येऊनही फार काही हाताला लागत नाही. एक सात्विक चेहर्‍याच्या पण तितक्याश्या प्रेमळ न वाटणार्‍या आजी संशयानं तेवढ्या बघतात. मी घाईघाईत पुढे जाते.
’तो’ मुलगा दिसतोच. चक्क एक निसटतं स्माइल. सलग तिसर्‍या दिवशी मला बघून माझ्याबद्दलचा तुच्छत्वाचा भाव त्याला सोडून द्यावा लागला असेल का, असा विचार करून माझ्या नियमितपणाबद्दल मी स्वत:वरच निहायत खूश होते.
एक फेरी. दुसरी. तिसरी. चौथी. पाचवी.
’मग मी म्हटलं वन्संना, इतकं काय मनावर - ’ मी असभ्य वाटेलश्या वेगात खटकन मागे वळून बघते. मराठी? नकळत पाय रेंगाळतात, माझ्या संकुचित प्रादेशिक अस्मितेला माझा नाईलाजच असतो. सलवार-कमीझ, स्पोर्ट्स शूज, घाईघाईत वळलेला अंबाडा, ’अहों’ना गाठायला कशीबशीच मॅनेज केलेली धावरी चाल आणि ’हं हं’ करत आपली आघाडी राखून असलेले अहो. काका-काकू पुढे निघून जातात.
मी मात्र रेंगाळते.
हवेला विलक्षण ताजा वास. पाचव्या घरातल्या काकू न्हाऊन फाटकासमोर रांगोळी काढत असलेल्या. शोएब अख्तर विकेट मिळवल्यावर ज्या विमान-पोझमधे धावतो, त्याच पोझमधे धावणार्‍या एका काकांचं विमान. कशीबशी झोप आवरून, आंघोळ-पावडर-कुंकू-डिओडरण्ट उरकून, हापिसाला निघालेल्या दोन चश्मिष्ट पोरी. त्यांच्या हातातली ताजी टाईम्सची गुंडाळी. नजरेतला ’आरोग्यवंत लोकां’बद्दलचा आदर अधिक मत्सर अधिक चिडचिड माझ्यापर्यंत थेट पोचते.
आपणपण आरोग्यवंत लोकांच्यात जमा? मला एकदम मजाच वाटते.

गुरुवार सकाळ सात:

चहा - वॉर्म-अप - व्यायाम. इमानदारीत ठरलेल्या फेर्‍या मारून मला फारच घाण्याला जुंपलेल्या अळणी बैलासारखं वाटायला लागतं. मग मी सरळ पलीकडच्या इडलीवाल्याकडे मोर्चा वळवते. वाफाळती इडली आणि लाल मिरच्यांचा तवंग मिरवणारं सांबार.
आयुष्य सुंदर आहे...

शुक्रवार सकाळ साडेसहा:

कंटाळा आलाय, पण घरात बसून राहायचाही कंटाळाच आलाय. तीच ती सकाळची टीव्हीवर गळणारी गाणी, शेजार्‍यानं भक्तिभावानं लावलेली ’ओम्‌ श्री नमो नम: - तत्सवितुर्वरेण्यम्‌’ची एकसुरी उंच भुणभुण आणि तासभर नुसतंच लोळत पडल्यावर अंगात साचणारा जड आळस. मी शहारतेच.
बागेपाशी येऊन आरोग्यवंतांच्यात सामील झाल्यावर बरं वाटतं. बरं वाटल्याचा थोडा धक्काही बसतो, पण बरं वाटतंच. विमान काका आज शिक्षा झालेल्या सैनिकासारखे हात वर ठेवून फेर्‍या मारत असतात. मला हसू येतंही आणि नाहीही. मीही मुकाट माझी दौड चालू करते.

शनिवार सकाळी पावणेसहा:

’हे काय? आजपण जाणार फिरायला? बरी आहे ना तब्ब्येत? वीकेण्डलापण?’ असल्या सरबत्तीकडे दुर्लक्ष करून मी बाहेर पडते. हसणारा मुलगा, विमानकाका आणि पाचव्या घराला एक हसरी नजर-सलामी टाकते. पाय वेग घेतात...

Thursday, 21 May 2009

आणखी एक धार्मिक वगैरे वगैरे


संवेदचं हे एकदम विचारप्रवर्तक वगैरे पोस्ट वाचून मी ही कमेण्ट खरडायला घेतली, पण ती इतकी मोठी झाली, की तिच्या आकाराची लाज वाटून शेवटी मी हे पोस्टायचंच ठरवलं.




खूप वायफळ तात्विक चर्चा करायची झाली, तर ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्‍याचदा वापरत असतात.



त्या अर्थानं मी आहे का धार्मिक? बहुतेक नाही.



मला पुराणातल्या बर्‍याचश्या गोष्टी माहीत असतात, देव आणि दैवतांचा इतिहास याबद्दल कुतुहल वाटतं. धर्माचा इतिहास संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबत घेऊन येतो, तो वाचायला मला आवडतं. त्यात लोकांनी आपापल्या फायद्यातोट्यासाठी, कधीकधी नि:स्वार्थीपणे, कधीकधी निव्वळ मूर्खपणानं मारून ठेवलेल्या मेखी (की मेखा?) समजून घ्यायला धमाल येते.




पण देवापुढे - अगदी तिन्हीसांजेलासुद्धा - आपसूक वगैरे माझे हात नाही जोडले जात. खूप उदास असताना, खूप काळजीत असताना, खूप हैराण झालेलं असतानाही, ’आता देवच काय ते बघून घेईल’ असं चुकूनही माझ्या मनाशी येत नाही. देवाची प्रार्थना करावी असं सकाळी - रात्री कधीच वाटत नाही. अंधाराची किती भीती वाटली, तरी रामाबिमाचं नाव माझ्या तोंडात कधीच येत नाही. असली काहीतरी एण्टिटी असेल, इथपासूनच मला टोटल अविश्वास आहे, तर मग ती आपल्याला मदत करेल, असं कसं वाटणार?



म्हणजे मी धार्मिक नसणारच. असं का असेल?



आमचं घर काही तितकं अतिरेकी आधुनिक नव्हे. म्हणजे आमच्या घरी नाही, पण बाबांच्या घरी - गावाला, आणि आजोळीही, गणपती बसतो. आम्ही त्याकरता शक्य असेल तेव्हा गावाला जातो. घरात लहानसा का होईना देव्हारा आहे. नेहमी बाबा, आणि बाबा नसले तर आई देवाची पूजा करते. तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावते. फार गडबडीत नसेल, तर कधीमधी रामरक्षा पुटपुटते. शनिवारी बाबांचा उपास असतो. चतुर्थीला घरात खिचडी होते. पाळी चालू असताना आई बाजूला बसत नाही, पण मुद्दामहून देवाला शिवायलाही जात नाही. घरी कधी हळदीकुंकू वगैरे झाल्याचं आठवत नाही. पण हळदीकुंकू घ्यायला आईची ना नसते. आजी घरात असेल, तेव्हा ती हातात एखादी बांगडी चढवून ठेवते. कुठे फिरायला वगैरे गेलो, तर आम्ही तिथली देवळंही बघतो. हात जोडतो, तीर्थप्रसाद घेतो. माझी आणि माझ्या बहिणीची पत्रिका बनवलेली आहे.




असं सगळं असताना देव किंवा त्याला लागून येणारा धर्म मी इतका बेदखल का केला असेल? याचं कारण शोधताना मला नेहमी एक गंमत आठवते.



आपल्याला मतं फुटायला लागतात त्या काळात कधीतरी, म्हणजे दहावी-अकरावीत असताना असणार, माझा मावसभाऊ घरी आला होता. आडव्या-तिडव्या वाचनामुळे, आणि अंगातल्या उद्धटपणामुळे, माझे ज्वलंत - जहाल - स्त्रीवादी - निधर्मी वगैरे विचार तेव्हा जोरात होते. ते मोठ्यामोठ्यानं मांडायची खुमखुमीही होती. सगळ्यांना त्यांचा मूर्खपणा - अन्यायीपणा दाखवून वगैरे द्यायला पाहिजे, असलं काहीतरी अचाट तेव्हा वाटायचं. असल्याच कसल्यातरी वादात मी मोठ्यामोठ्यानं ’देव नसतोच’च्या बाजूनं आणि माझा भाऊ ’देव असतोच’च्या बाजूनं तारस्वरात भांडत होतो. कुठल्यातरी एका पॉईंटला त्याच्या बाजूनं आर्ग्युमेंट्स संपली. ’तुला इतकं वाटतंय ना, देव नाही असं? मग होऊन जाऊ दे. देव्हार्‍यातला देव घे आणि त्याला पाय लावून दाखव. पाहू तुला जमतं का?’ असं आव्हान त्यानं दिलं. मीही ’हात्तेरेकी, त्यात काय, घे!’ असं म्हणत शिस्तीत जाऊन देव्हार्‍यातली देवीची लहानशी पितळी मूर्ती घेऊन जमिनीवर ठेवली, त्यावर पाय दिला आणि त्याच्याकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. तो अर्थातच निरुत्तर झाला. ’तू आचरट आहेस बाबा खरंच. जरापण भीती नाही...’ असलं कायतरी तो बडबडला आणि तो वाद माझ्यापुरता जिंकून संपला. परत पत्ते सुरू झाले. संपलं.


आई घरातच होती. कशातच मधे न पडता फारसं लक्ष न दिल्यासारखं करत पडल्यापडल्या शांतपणे ऐकत होती. तिनं सगळ्या वादात माझी बाजू घेतली नाही आणि त्याचीही नाही. मला थांबवलंही नाही. नंतर काही प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. कदाचित प्रतिक्रियेच्या या अभावामुळेच, तिला जणू कळलंच नाहीये, मी काय पराक्रम केला ते, अशा थाटात मी तिला मारे सगळी गोष्ट सांगायला गेले. तर ऐकून म्हणाली, पाय ठेवलास म्हणजे काय थोर साहस केलंस? पितळेची वस्तू ती. ती काय खाणारे तुला? तुझा नसेल विश्वास. तुझ्यापुरता. लोकांचा आहे ना. लोक त्या मूर्तीसमोर हात जोडतात. त्यांच्या विश्वासावर पाय ठेवलास. तूच कर विचार, चूक की बरोबर त्याचा.


विषय संपला. तिला काहीच फरक पडला नाही. नेहमीसारखा संध्याकाळचा दिवा लावणं, हात जोडणं यात काही फरक नाही. माझ्यावरही अजिबात राग दर्शवला नाही. तिच्यापुरता खरंच विषय संपला. तिनं मूर्ती साधी धुतलीही नाही लगेच. काय जनरल आठवड्या-पंधरवड्यानं देव्हार्‍याच्या साफसफाईची वेळ आली, तेव्हाच दिव्यासकट सगळ्या मूर्ती स्वच्छ झाल्या, हे मी मुद्दाम लक्ष ठेवून पाहिलं.


परत मी कधी देव आहे की नाही, या गोष्टीवरून तावातावानं वाद घातल्याचं आठवत नाही. पाळी चालू असताना उद्मेखून देवापाशी दिवा लावायला जाणं आणि ’मुद्दामहून अगोचरपणा नकोय’ वगैरे क्षीण विरोध करणार्‍या आईशी वाद घालणं वगैरे आचरट प्रकारही परत करावेसे वाटले नाहीत. मग ’माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं.




म्हणूनच अंनिसच्या कामाबद्दल कधी भारावलेपणा वाटल्याचं आठवत नाही. फारशी खोली नसलेलं, लोकांची पिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न करणारं एक काम, इतपतच महत्त्व त्याला द्यावंसं वाटलं. कायद्यापलीकडे शोषण होत नाही ना, इतकं पाहून लोकांना आपापले विश्वास-श्रद्धा जपायचा हक्क आहे, त्यांना आवश्यक असेल त्या - झेपेल त्या निष्कर्षावर त्यांनी स्वत:च आलं पाहिजे, अशी एक धारणा होऊन बसली. कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली.



हिंदू असल्याचा अभिमान वगैरे तर मला कधी नव्हताच. हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हेच बोंबलायला माहीत नाही, तर अभिमान कसला कपाळाचा? त्यातल्या विशेषत: बायकांकरता खास बनवलेल्या चालींची मात्र शरम वाटायची. पण तसल्या मखलाश्या जगातल्या कुठल्याच धर्मानं करायच्या ठेवलेल्या नाहीत, हे कळलं, त्या कुठल्यातरी टप्प्यावर मी निधर्मी आहे असं स्वत:ला सांगणं मी सोडून दिलं. आकाशातला बाप, प्रेषित किंवा विहीरीत प्रेत टाकून देणं या गोष्टी नाहीतरी मला परक्या वाटतात. तितक्या हिंदू धर्मातल्या संकल्पना मला परक्या वाटत नाहीत म्हणजे हा माझा धर्म. कुठल्याही भोंगळ तत्त्वज्ञानापासून कठोर कर्मकांडापर्यंत आणि चार्वाकापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांनाच आपलं म्हणणारा आणि टिकून राहणारा हा लबाड धर्म आता मला कधी क्रूर, कधी मजेशीर, आणि नेहमीच सर्वायवलचं रहस्य जाणणारा वाटतो. त्यात अभिमान कसला नि लाज कसली? गंमत आहे.



पण म्हणजे मी धार्मिक आहे की काय? काय माहीत.

Tuesday, 19 May 2009

लिहिण्याची सवयच गेलीय

लिहिण्याची सवयच गेलीय.

विश्राम बेडेकरांनी म्हटलं आहे, त्या चालीवर आपण लिहिल्याशिवाय जगू शकतो म्हणजे आपण लेखक नाही. मग हा अट्टाहास कशासाठी?

उगाच खुजली म्हणून.
पांढर्‍यावर आपल्या नावानं काळं झालेलं दिसलं की गारगार, एकदम सत्ताधीश वाटतं म्हणून.
कुणी कुणी 'वा, छान' म्हणतं म्हणून.
कुणी 'कशाला लिहिता ही नष्ट घाण' असं खरोखरीचं चिडून विचारल्यावर अजूनच उचकायला होतं म्हणून.
एरवी काही अंगाला लावून न घेता अल्लाद पार होणार्‍या आपल्या वॉटरप्रूफ कातडीला लिहिता लिहिता कुठेतरी जोडलं गेल्यासारखं वाटतं म्हणून.
कुठल्यातरी आठवणीतल्या किंवा स्वप्नातल्या क्षणाच्या अर्धुकात, लिहिल्यावर एकदम रितं-मोकळं-ओझंहीन वाटल्याचा भास अजून शिल्लक आहे म्हणून.

सगळीच उत्तरं. किंवा कुठलीच नाहीत.

पोटाचा खड्डा भरून बराच रिकामटेकडा वेळ आणि खुमखुमणारी ताकद उरते हेच कदाचित उत्तर.

तरीही लिहिण्याची सवय गेलीय. म्हणजे आपण लिहिण्यावाचण्याला एक निरुपयोगी छंद मानणार्‍या लोकांइतके माजलो की काय? कदाचित तसंच.

हा माज उतरवण्याकरता तरी लिहीत राह्यलं पाहिजे.
लिहिण्याची सवयच गेलीय, तरीही.

Sunday, 8 March 2009

सर्जनाच्या दर्शनाने सर्जनाची वाट व्हावे

कलावंताला लिंग नसतं असं म्हणतात. पण आज जिवाजवळच्या, सोबत करणार्‍या लेखकांची नावं आठवत गेले, त्यात आश्चर्यकारक प्रमाणात बाया निघाल्या. अपवाद होतेच. चांगले सणसणीत अपवाद होते. पण ते अपवादच. नियम अधोरेखित करणारे.

बाई असणं इतकं निराळं करतं माणसाला? लेखकाला? कलावंतालाही? की आस्वाद घेण्यातली ही आपली मर्यादा? की सवयीचं-सरावाचं तेच आपलं मानण्यातला बथ्थड आळस? की खरंच जैविक-सांस्कृतिक बंध? कुणास ठाऊक.

आजच्या महिलादिनाच्या निमित्तानं या काही कविता. सोबत करणार्‍या.

रंगीबेरंगी इच्छांच्या रथात बसून
दूर निघालेल्या एका उत्कट मुलीची गोष्ट
सांगते आहे मी तुम्हांला.
मुलगी, जिला ऐकू येतो प्रेमाचा ओला आवाज
कृष्णमेघात ओथंबलेल्या पावसासारखा
आणि जिचं आख्खं हृदयच सळसळून हिरवं होतं.
जी सहज विश्वास ठेवते मग अनोळखी तरुणावर
अदृष्टातून येणार्‌या त्याच्या पौरुषाच्या गंधावर
आणि दूर सारून स्वत:चं माहेरघर,
झोकून देते स्वत:ला सरळ त्याच्यावर.
ना वाजंत्री, ना तोरणं, ना विरोध, ना रडणं
अडवू शकत नाही तिला काहीच,
एकदा मन मंतरल्यावर.
स्वप्नांचं सार्थक त्याच्या डोळ्यांत
आणि युगांचे संभव त्याच्या स्पर्शांत.

त्याच्या स्मरणानंही करता येतं तिला साहस
प्रियजनांपासून प्रेमाला लपवण्याचं.
परिचिताचा हात सोडण्याचं,
अज्ञाताला मिठी घालण्याचं.
तिला माहीत नसतात दुखरे तपशील
तिच्या पुरुषाच्या भूतकाळातून सरसरत येणारे -
कालियासारखे हिरव्या हृदयाला विळखे घालत दंश करणारे
जगणं मरणापेक्षाही अवघड करणारे.
त्याच्या फूत्कारांनी भरून जाणारं आयुष्य ठाऊक नाही तिला.
आता तुम्ही थांबवू शकाल?
परतवू शकाल?
दुखवू शकाल?
त्या रंगीबेरंगी इच्छांच्या रथातून जाणार्‌या कुंवार मुलीला?

अरुणा ढेरे (बहुधा मौजेच्या दिवाळी अंकातून)
---

नव्या वाताहतीला सामोरं जाताना
मी पुन्हा धरलं कवितेचं बोट
की, बाई... माझ्या धांदोट्या ठेवायला
असून दे थोडी जागा तुझ्या ओळींमधून
तर ती हसली खळखळून मैत्रिणीसारखी.
तिच्या हसण्यानं फडफडली वहीची पानं
आणि जुन्या वाताहती पुन्हा
सहज उघड्या पडल्या.

वाताहतीला वाताहत म्हणतात हे ठाऊक नव्हतं
तेव्हापासूनचा सगळा इतिहास,
नजीकच्या भूतकाळापर्यंतचा...
काही शिकता येत नाही या इतिहासातून,
टाळता येत नाही कुठलीही वाताहत
किंवा रोखताही येत नाही;
नष्ट करणं ही तर खूप दूरची आणि
दुरापास्त गोष्ट.
आता अनुभवामुळे फार तर
तिच्या रूपाबद्दल अंदाज बांधता येतात
आणि निमूट स्वीकारता येते
होत जाणारी पडझड;
मिसळून जा म्हणता येतं तिला
जुन्या वाताहतींच्या घोळक्यात.

खरं तर सगळी कृती मला पाठ झाली आहे:
सगळ्याच संकटांना संधी मानायचं;
पहाटे तुळशीला पाणी घालायचं:
फळ्यावर रोज नवा सुविचार लिहायचा;
हिंसेचे फुटवे खुडून टाकायचे;
आलेला ऋतू आल्हाददायक म्हणायचा;
तू सोबतच आहेस असं समजायचं;
न्हाऊन वाळवायचे ओले केस;
आरश्यात चेहरा पाहायचा ओळख राहावी म्हणून;
अंगभर बचाव गुंडाळायचा
आणि उतरायचं पुन्हा रस्त्यावर
नव्या वाताहतीला सामोरं जाण्यासाठी.

दर वेळेसारखंच असणार मग सगळं...
कोसळायचं, पुन्हा उभं राहायचं, धडपडायचं;
जे शाबूत राहिलंय ते सारं गोळा करायचं;
मातीत तूस मिसळलं की घट्टपणा येतो घड्याला
तसं सार्‌या वाताहती स्वत:त कालवत
मिसळत मळत घडवत न्यायचा नवा आकार
आणि ओलेपणीच नक्षी कोरावी
तशी लिहून ठेवायची पुन्हा एखादी कविता
नव्या वाताहतीला सामोरं जाण्यासाठी.

कविता महाजन (महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकातून)
---

माझ्या पणजीच्या आजीचे नावसुद्धा मला माहीत नाही.
परकराचे ओचे बांधून गाणी गात
ज्याच्या पारंबीला लोंबकाळून ती झुलली
तो वडसुद्धा मला ठाउक नाही.
ज्या दगडांवर धुतले तिने ऋतुस्नात बोळे,
ज्या नदीचे पाणी झाले लाल, जांभळे, काळे
तो दगड, ती नदीसुद्धा मला माहीत नाही.
जेव्हा पहिल्यांदा कण्हली ती संभोगाच्या कभिन्न रात्री
तो स्वर सुखाचा, की सूर दु:खाचा होता
तेसुद्धा मला ज्ञात नाही.
जन्म देतांना तिनं फ़ोडलेला हंबरडा मी ऐकलेला नाही.
तिला वारंवार फ़ुटलेला पान्हासुध्हा मी चाखलेला नाही.
तिनं शेंदलेल्या घागरीही मी वाहिलेल्या नाहीत.
तिला दिसलेल्या खुणादेखील मी पाहिलेल्या नाहीत.
कसा गेला तिचा जीव जाताना, कशात अडकला ठाउक नाही.
कोण रडले तिच्यासाठी, कोण कुढले उरलेल्यांतले माहीत नाही.
कोणी वेचली तिची विरासत, कोणी उष्टावून फ़ेकून दिली याद नाही.
कोणी कुठले वसे घेतले, कोण उतले, कोण मातले, ज्ञात नाही.

मात्र तिच्या तपशीलांची राख उधळणारा वारा अजूनही वाहातो.
भला मोठा श्वास होऊन माझ्या छातीत अडकतो.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश....
त्याच असतात पारंब्या कालातीत अश्वत्थांना
अजूनही लोंबकळून झुलतात मुली ज्यांना...
पणजीची आजी नाही म्हणावी तर तसे नाही.
पण तिचे नाव मात्र आता कुणाला ठाउक नाही!

मेघना पेठे [ऑर्कुटवरून (http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=12387259&tid=5305406129799140274&start=1) साभार]

Sunday, 18 January 2009

नाना परीच्या निकडी । खेळ मांडियेला ॥

ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते?
एक मिनिट. या सगळ्या प्रकारात आत्मसमर्थन का काय ते होणार. पण शक्यतोवर ते टाळून थोडं लांब जाऊन पाहायचा प्रयत्न आहे. शक्य तितका प्रामाणिक.
तर, ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते? आपल्याला हव्या तशा गोष्टी आजूबाजूला नसल्या की चिडचिड होते. हव्या तशा म्हणजे? हव्या तशा गोष्टी म्हणजे स्पेस. म्हणजे काय? आपल्याला एकट्याला निवांत जागा?
नाही, फक्त तितकंच नव्हे. आपल्याला हवं ते, हवं त्याला, हव्या त्या पद्धतीत, हवं तेव्हा बोलण्याचं - जास्त नेमकेपणानं सांगायचं तर, व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे स्पेस. तर ही स्पेस आपल्याला कुणालाच मिळत नाही आहे. आणि हा फक्त जागा - कमी किंवा अधिक जागा - हा प्रश्न नाही. त्याच्यापलीकडचं काहीतरी आहे.
वर्तुळाच्या परीघामधेच दुसर्‍या वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला आणि ते दुसरं वर्तुळ पुरं केलं तर काय होतं? परीघ एकमेकांमधे शिरतात. असं एकदा केलं तर ओव्हरलॅपिंग प्लेन तयार होतं.
पण असंच वारंवार अनेकवार परत परत परत केलं तर? तर केऑस तयार होतो.
सध्या आपण केऑसमधे राहतो आहोत. गोंधळ होणं साहजिक आहे.
कुठलं वर्तुळ आधी काढलेलं, कुठलं नंतर काढलेलं, कुठलं ठळक, कुठलं पुसट, कुठलं मोठं, कुठलं लहान - हे सगळे प्रश्न इथे गैरलागू आहेत. जिवंत गरगरती वर्तुळं आहेत. ओव्हरलॅपिंग आहेत. केऑस आहे. चिडचिड आहे.
या सगळ्याला पर्याय नाही.
तर आपण हे मुकाट स्वीकारू या.
आता हे स्वीकारूया बीकारूया प्रकरण कागदावर ठीक आहे.पण ते जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात नाकापाशी होत असतं, चार-दोन धक्के लागत असतात, पाणी अंगावर उडत असतं - तेव्हा काही झक मारायला स्वीकारूया वगैरे आठवत नाही. देधडक बेधडक पद्धतीनं आपण - म्हणजे मी - तोंड सोडून मोकळे होत असतो. मी तरी असंच डील करत आलेली आहे. कधी मी कुणाच्या अंगावर वसकन ओरडते, कधी समोरचा घुम्म बसून राहतो. चालायचंच. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. एकदा माणूस आपला म्हटला, की असल्या दोन दिल्या-घेतल्याची चिंता करून भागत नाही. त्याच्या - आणि माझ्याही - इमोशनल आउटबर्स्ट्समधे आमची दोघांचीही एनर्जी भरपूर खर्च होत असते. त्यातून डोक्यावर डोकी आपटतात. त्यातून कधीकधी नाही त्या गुंतागुंती होतात, नाही असं नाही. पण एकदम आत्म्याचे दोस्त का काय म्हणतात ते - किंवा दुश्मनही - असल्याच एन्काउण्टर्समधून मिळण्याच्या शक्यतेची शक्यता असते.
ही संधी असते. धोकाही. माणूस कायमचा आपला/परका होत जाण्याची/चा. व्हाइस व्हर्सा.
तर माणसं कितीही बदलली, नवीन असली, तरी या प्रोसेसला काही शॉर्टकट नाही. त्याची काही ग्यारण्टीही नाही. हे असं असं खेळूनच पाहावं लागतं. पाहावंच लागतं. पाहावं लागतंच.
नाहीतर मग बसा मुकाट रिंगणाबाहेर. तर आपण हेही - मुकाट जरी नाही, तरी - स्वीकारू या.
स्वीकारलं की नीट मनापासून खेळता येईल. एकदा खेळच म्हटला, की शांतता कोर्ट चालू आहे स्टाईलमधे आपलं आयुष्य वेगळं आणि खेळ वेगळा या पद्धतीत नीट एन्जॉय करता येईल. स्पेस मिळेल - न मिळेल - पण तिचा आभास तरी निर्माण होईल. कुठलं तरी वर्तुळ पुसता येईल. कुठलं तरी विस्तारता येईल. आपापल्या सिस्टीममधला केऑस नीट मनासारखा एकमेकांच्या अंगावर सोडता येईल. परिणाम काय व्हायचे ते होवोत. काही बंध घट्ट होतील. काही कापले जातील.
आतून दाटलेले आपण रिते - मुक्त होऊ. कदाचित थोडे थोडे एकमेकांना भरूनही देऊ.
तर निकाल काय असायचा तो असो. खेळणं आवश्यक आहे. हे तरी आपण स्वीकारू या. स्वीकारू या?

Tuesday, 13 January 2009

आम्ही लटिके ना बोलू...

एखादा देणेकरी सतत आसपास दिसत राहावा तसंच हे. गप्प, घुमा, निर्विकार चेहर्‍याचा, चिवट देणेकरी. त्याला नजरेसमोरून वारता वारता आपण थकत जातो, पण तो थकत नाही. कुठल्याही जिवंत अनुभवाच्या परीघात हक्कानं येत राहतो तो. निर्लज्जपणाचा आव आणत आपण अधिकाधिक अस्वस्थ.
चंदन-आंघोळीच्या ताज्या गंधापासून ते प्रचंड मानसिक दमणुकीच्या कडेलोट क्षणीही - हे शब्दांत पकडता येईल? वापरता येईल कुठे? - असा धंदेवाईक प्रश्न डोकं वर काढत राहतो आणि आपण आपल्यावरच्याच संतापानं होत राहतो बेभान.
धड भोगता येत नाही, धड मांडता येत नाही अशातली अवस्था. शरम तर वाटतेच आहे. तरीही - एकदाच कोलाजाची एक धेडगुजरी गोधडी विणून नामानिराळं व्हावं का- असा गेंडाकातडी प्रश्न पडतोच. आपण लोचट की हा प्रश्न लोचट - अशी कोडीही नकळत सोडवत बसलेले आपण.
अशाच कितव्यातरी क्षणी हातात येतो एखाद्या अनुभवाचा निसटता तुकडा. आपण धंदेवाईक तानाजी होऊन घोरपडीच्या वरताण नख्या रोवतो. आता शेंडी तुटो वा पारंबी तुटो, वरती पोचायचं आहे बस्स, असं डोळ्यांत उतरलेलं रक्त. तरीही हातात मातीच येते. येऊ शकते.
सर्जनाचे रंग असेही. विटके. मळके. रंगहीन.

Tuesday, 28 October 2008

परत एकदा पहिल्यासारखे, होणे नाही, होणे नाही...

संदर्भहीन आनंदाच्या तहानेत
निष्फळ अंतहीन वणवण
परिचित प्रदेशांच्या चकव्यात
तेच सुतक पुन्हापुन्हा,
पुन्हापुन्हा तेच सण

आपण सध्या जगतोय, ते विकत की फुकट? एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीसाठी सहन करतात माणसं आपला चिडचिडाट आणि व्हायसा व्हर्सा? रोज उठून थोबाडावर प्लॅस्टिकचं स्मायली ताणून बसवतो आपण, ते नक्की कुठल्या अन्ब्रेकेबल रबरबॅण्डनी? असले आचरट प्रश्न पाडून कपाळावर किमान साडेचार आठ्या बसवलेल्या तिच्याकडे, निदान दिवसाच्या अखेरीला तरी कुणी शहाणा माणूस दोन गोड शब्दांच्या अपेक्षेनं यायचा नाही, इतपत व्यवस्था दिवसभरानं करून ठेवलेली. ती नखभर कारटी गात टीव्हीवर जीव तोडून, त्यावरही जळजळीत ऍसिडिक प्रतिक्रियांची आतषबाजी चालू असे तिची. चेहरा अर्थात हसराच. पण ’आयुष्यावर हसणे थुंकून देतो...’मधलं कडूजहर हसणं. काय बिशाद कुणी जवळ येऊ धजेल. अशात त्या दिवशी टीव्हीसमोर लोळून समोर गळणार्‍या कशावर तरी काहीतरी फूत्कारताना, तिच्या रूममेटनं तिच्या कपाळावर तळवा ठेवला फक्त. त्यावर काहीतरी धारदार बोलण्याआधी तिचे डोळे आपसूक मिटले आणि तिसर्‍या सेकंदाच्या आत तिचं विमान उडालं. निळी स्वप्नील झोप.

जिवंत माणसाचा स्पर्श, माणसाला माणूस लागतं, तुसडेपणा जन्माला पुरत नाही... हे क्लिशेड गुळगुळीत सिद्धान्त तर होतेच. पण पाठोपाठ माणसांच्या गुंतागुंतीत जे जे होऊ शकतं, ते ते सगळं कोपर्‍यावर दबा धरून बसलं असणार, याचीही कडवट जाणीव होती. ’नाहीतरी माणूस नको म्हणून निभत नाही, मग होऊन जाऊ द्या सगळंच रामायण’ला मान तुकवत तिनं इतके दिवस गोठवून ठेवलेलं आपलेपण स्वैर उधळून दिलं, ते त्या रात्री स्वप्नातच कधीतरी असणार. मग अनेक वाटांनी उधळत गेला दोस्ताना. शॉपोहोलिक होऊन केलेल्या खरेद्या, कविता, सिनेमे, भक्त प्रल्हाद सिनेमे, खादाडी, रात्र रात्र जागून मारलेल्या गप्पा, एकमेकींची आजारपणं, पार्ट्या, ओल्या पार्ट्या, शेअर केलेल्या दुखर्‍या जागा, बोचरी भांडणं, अबोले, करकरीत शिव्या, रडारड, गप्पा गप्पा गप्पा. तिचा कडवट अनुभवी उपरोध आणि रूममेटचा नवथर कोवळा उत्साह जगण्यातला. दोहोंची धार बोथटत गेली आणि त्यांच्या घराला जरा जरा माणूसपण येत गेलं. परिघात पाऊल न ठेवताही शेजार निभावणं शिकत गेलं घर. पहिल्या पावसाच्या जळजळीत ससंदर्भ गारव्यामधेही त्याची ऊब टिकत गेली.

पहिला पाऊस एकवार,
मग मात्र साठवण-आठवण
परत एकदा पहिल्यासारखे,
होणे नाही, होणे नाही

घरातल्या बोर्डावर कुठलीशी नवी कविता डकवताना आणि त्यावर उत्साहानं उतू जात रसरसून बडबडताना लक्षात आला तिच्या एकाएकी - काहीतरी वेगळं घडतंय घरात. रूममेटचं लक्ष होतं आणि नव्हतंही. रूममेटची नव्यानं राहायला आलेली जुनी मैत्रीण हातातल्या नेलपेण्टच्या नव्या शेडमधे गुंतलेली. तिचा चेहरा काहीच संबंध नसल्यासारखा कोरा करकरीत. रूममेट काहीशी भांबावून दोन टोकांना यथाशक्ती यथोचित प्रतिक्रिया देण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात. म्हटलं तर तिघींच्याही लक्षात आलं आणि म्हटलं तर कुणाच्याच नाही. तिथून पुढे कविता बोर्डावर टाचणं हे नुसतंच हट्टी कर्मकांड होत गेलं घरासाठी. वाढलेल्या मैत्रिणीला सामावून घेत माणसं घड्या बदलत गेली. दिनक्रम ठरीव आणि परीटघडीचे होत गेले. उबेचे परीघ बदलत गेले. आपापल्या किल्ल्या, ठरलेल्या वेळी ठरावीक स्मितहास्य, एकमेकींकरता रांधून ठेवलेलं जेवण, वीकेण्डच्या शॉपिंगला सोबत.

वरवर शांत असल्याचं दाखवणारी ती आतून चवताळत गेली. रूममेटच्या मैत्रिणीचं लहान असणं नोंदलं तिनं. पण लहानपणाच्या हातात हात घालून येणारी असुरक्षितता नोंदूनही तिनं हट्टानं स्वीकारली नाही. तिला दिसला तो फक्त तिनं कमावलेल्या तिच्या स्नेहशील वर्तुळाचा संकोच. अभावितपणे कुणाचातरी पायावर पाय पडावा आणि मागचा-पुढचा विचार करण्याआधी तोंडातून कचकचीत शिवी उमटावी, तसा धुमसत गेला तिचा स्वाभाविक संताप. रात्र रात्र गाणी ऐकत राहणं, नेटवरचं वर्तुळ आणि वेळही अमर्याद आणि अनारोग्यकारकपणे विस्तारत जाणं, घरातली संभाषणं जाणीवपूर्वक अधिकाधिक अनावश्यक आणि त्रोटक करत नेणं, पुन्हा एकदा सूडावून आतल्याआत मिटत जाणं. मोठं होण्याचं नाकारत जाणं. सार्‍याचा परिणाम झाला नाही असं नाही. रूममेटची दोन टोकांमधली फरफट वाढत गेली. दिवसेंदिवस. तिच्या एकलकोंड्या धुमसत्या वावराला उत्तरादाखल म्हणून रूममेटचं मुक्यानं रडणं दृष्टीला पडलं चुकून, तेव्हा भानावर आली ती चरचरून. निखळ मैत्रीच्या प्रदेशातही हे स्वामित्वाचे दावे असे वेठीला धरू शकतात माणसांना? आपल्यालाही? आपला नितळपणा इतका गमावला आहे आपण? कळेना. कळेना तिला. आपलेच डंख पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न तिनं करूनही काही पीळ सुटण्यातले नव्हतेच. घरातली हवा कुंदच होत गेलेली.

पाऊस हवा, ऊन हवं
इंद्रधनुष्य कोरं हवं
पायांखालच्या मातीनंही
रोज नवं जन्मून यावं
आम्ही मात्र तेच जुने
आठवण-पेशी मरत नाही
कोवळेपण जळत जातं,
तरी जगणं सरत नाही

रूममेटच्या मैत्रिणीचं रूममेटवर अनेकार्थांनी अवलंबून असणं दिसत गेलं, तसतसा तिचा समजूतदारपणा काहीसा जून होऊन परतत गेला. रूममेट आणि मैत्रिणीचं नातं, नातं न उरलेलं. दोन वाढती माणसं खूप खूप जवळ येतात आणि त्यांचे विस्ताराचे वेग मात्र स्वाभाविकपणे आपापल्या निरनिराळ्या गती सांभाळून असतात, तेव्हा होते तीच कोंडी. एकाचं विस्तारत जाणं, दुसर्‍याचं आकातांनं तिथंच राहायला पाहणं. पायात पाय रेशीमधागे. ते तुटायला मात्र हवेतच अपरिहार्यपणे. हे लक्षात आलं, तेव्हा ती मुळापासून हादरली. मीच सापडले होते का ऑपरेशन करायला, असा हताश प्रश्न पडला तिला. पण इलाज नव्हताच. मी खलनायिका तर मी खलनायिका, असा कोडगा स्वीकार करत तिनं दोघींच्यात निर्ममपणे पाय घालायला सुरुवात केली.

त्याच काळात कधीतरी पाहिलेली ’सखाराम बाईंडर’ची डीव्हीडी. रविवारची दुपार उलटून गेल्यावर कधीतरी पाहायला सुरुवात केलेली. सुरुवातीला रूममेटची मैत्रीण लक्ष नसल्याचं नाटक करण्यात गुंग. पण तेंडुलकरांनी तिला हाताला धरून मधोमध कधी आणलं, ते तिचं तिलाही कळलं नसणार. सगळा मिळून दीड खोलीचा कारभार आणि घरदार व्यापून उरलेली जगण्याची गरज. लैंगिक इच्छांचे आसूड, संस्कृतीबिंस्कृतीचे कुचकामी लगाम - त्यातून कराकरा दात खात निर्लज्जपणे जगायला उभी ठाकलेली माणसातली पाशवी असुरक्षितता. चंपाला पुरायला मदत करणार्‍या भेसूर लक्ष्मीचं ’रात्र देवाची असते...’ ऐकलं, तेव्हा करकरीत तिन्हीसांजा झालेल्या. घरात काळोख, बाहेर पेटलेली कातरवेळ. ’आपण सगळेच असतो थोडी थोडी लक्ष्मी...’ हे तिच्या तोंडून सुटलेलं वाक्य ऐकून बधिर होऊन बसलेली रूममेटची मैत्रीण आणि कुणाच्या तरी अंत्ययात्रेवरून परतावं, तशी रूममेट घाईघाईनं आंघोळ करायला गेलेली. घर मुकाट.

तिचा परजलेला निर्दय निर्धार. रूममेटची चिंध्या करणारी तडफड. रूममेटच्या मैत्रिणीचा नुसताच जहरी वेडापिसा संताप. सगळंच कडेलोटाच्या टोकावरचं. त्या दिवशी रूममेट मित्रासोबत निघून गेली सिनेमाला, म्हणून भडकलेल्या मैत्रिणीला समजावता समजावता सार्‍याचा कडेलोट झाला. ’मला समजावते आहेस इतक्या मानभावीपणे, का? तू एकटी आहेस म्हणून?’ हा रूममेटच्या मैत्रिणीचा प्रश्न. कोंडीत पकडलेल्या रानमांजरीच्या आवेशातला. तो ऐकला आणि तिचं उरलंसुरलं भान संपलं. उरला तो निव्वळ लालभडक विखार. रूममेटच्या मैत्रिणीनं भानावर येऊन कळवळून अनेकदा मागितलेली माफी, रडणं, पश्चात्ताप, समजावणुकी... काहीच पाझर फोडू शकलं नाही तिला. पाहता पाहता दगड होत गेली ती मैत्रिणीच्या बाबतीत. आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला येण्याचं आमंत्रणही दिलं तिनं, ते फक्त रूममेटला. ’आजारी आहे ग ती. इतका काटेरी राग धरू नकोस...’ची विनवणी तिच्यापर्यंत पोचलीच नाही. तिचा स्वत:चाच इलाज नव्हता जणू.

जिवाच्या तळापासून समजून घेता येतं कुणाला, ते आयुष्यात एकदाच काय? पुढच्या सगळ्या सगळ्या वेळांना माणूस समजूतदार होत जातो की निबर? भोगलेली माणसं हळवी-ओलसर होत जातात की सूडावून अधिकाधिक कठोर? संदर्भ पुसले जातात कधीतरी? पुसता येतात? प्रश्नांना अंत नाहीच.

शब्द पालवत, दु:ख मालवत
रोज रोज तेच मरण
परिचित प्रदेशांच्या चकव्यात
तेच सुतक पुन्हापुन्हा,
रोज रोज तेच सण...

Wednesday, 22 October 2008

एक नवा उपक्रम: रेषेवरची अक्षरे २००८

रेषेवरची अक्षरे २००८

हा दुवा:
http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/?pli=1

वाचा नि तुमचं मत जरूर कळवा.
शुभ दीपावली!

Wednesday, 20 August 2008

आवडलेले थोडे काही

संवेदचा खो घेऊन या कविता पोस्ट करतेय -
हरिलाल
खूप उशिरा ओळख पटत जावी एखाद्याची
तसे जाता जाता
एकमेकांना आवडू लागलेले आपण
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?
एखादा पाहुणा नको-नको म्हणत असताना
कोडग्यासारखा राहायला यावा आपल्या घरात
तसा तू माझ्या वस्तीला आलास
आणि खूप मनस्ताप दिलास
तुझ्या आईबाबांसारखाच मलाही.
माझ्यातल्या सगळ्या सवयी,
सगळ्या व्याधी, सगळ्या वेदना पाहून
तुला ओळखीचं वाटलं असेल
कदाचित माझं शरीर,
कदाचित...
तुला श्रीमंत करायचं असेल मला
मला आणखी दु:ख देऊन.
पण तू येण्याच्या खूप आधीपासून
तुझ्यासारखाच खूप वणवणलोय मी
दु:खाच्या शोधात,
इतका...
की तू जेव्हा शिरलास माझ्यात
तेव्हा तुझं दु:ख आणि माझं दु:ख
मला फरकच करता येईना त्यांच्यात.
म्हणूनच लोक
मला तू समजू लागले
आणि तुझा लौकिक इतका
की हळूहळू लोक मलाही ओळखू लागले.
आणि आता
माझ्या भोवताली ही माणसांची गर्दी
'तू' जमवलेली
उद्या ही मला विचारील
'कसा आहेस तू?'
तेव्हा मी तिला काय उत्तर देऊ?
मला माणसामाणसांनी समृद्ध करून जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?
मी तुला माझ्यातून जायला सांगत नाही
आणि अजून थोडा थांब म्हणून
राह्यलाही सांगत नाही
इतकी मला आता तुझी सवय झालीय...
आता तुझं असणं-नसणं
माझ्यासाठी एकाच प्रकारचा मनस्ताप!
पण तरी
तू का आवरू लागलायस
माझ्यातलं तुझं एकेक सामान?
का गुंडाळू लागलायस
प्रवेशच्या प्रवेश पानांसकट?
का करू लागलायस बांधाबांध
तासागणिक वर्षांची?

उद्या-परवा
तू अखेरचा पडदा पाडशील आपल्या दोघांत
आणि चालू लागशील दूरची पायवाट
तेव्हा
बाहेर जाताना लहान मूल जसं मागे लागतं...
तसा मी तुझ्या मागे लागू?
मी तुझ्याकडे काही मागू?
प्रयोगागणिक मला लहानाचा मोठा करत जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?

उन्हात वणवण फिरताना
मला तुझी आठवण येईलच
आईच्या डोळ्यांत बघताना
माझ्या काळजात धस्स होईलच
तुझा चेहरा विरला तरी
तुझी चाहूल राहीलच...
पण मित्रा, एक सांग...
कुठे जाशील?
काय करशील?
कसा राहशील?
तसा आहेच भणंग मीही
पण जाता-जाता
मला आणखी भणंग करून जाणारा तू...
तूच सांग
मी तुला निरोप कसा देऊ?

('गांधी विरुद्ध गांधी'चे शेवटचे तीन प्रयोग चाल्ले असताना)
सौमित्र
***
कुठून करावी सुरुवात
रोज एक चुटपूट ठेवून देते मी
जिभेखाली विरघळवत तास न् तास.

दिवसभर उन्हातान्हात फिरून शिणलेले शब्द,
थंडीवार्‍यात काकडलेल्या ओळी, पाऊसपाण्यात
चिंब परिच्छेद... एकवटून येतात रात्री
एका पत्रासाठी, जे तुला पाठवण्याची
शक्यता आजमावतेय मी दररोज.

कळत नाही, कुठून करावी सुरुवात
पुन्हा स्वतःला रचायला.
की, काही तरी सलग अर्थाचा शब्द
तुझ्या हातावर ठेवायला हवा...!
कविता महाजन
माझा खो नंदन आणि ए सेन मॅनला.

Friday, 1 August 2008

हू दी हेल केअर्स?

फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त.
त्यातून उद्दाम प्रदीर्घ विस्तारत गेलेली सूर्यफुलांची शेतं.
इतकंच फक्त.
***

हॅरीचा हातात आलेला सातवा भाग. सात हॉरक्रक्सेस.
एक-दोन-तीन-चार-पाच-सहा-सात.
हॅरीच्या डोक्यात अनाहत घुमणारं चक्र. मरायचं किंवा मारायचं या निवडीतली अपरिहार्यता कळल्यावर होणारी तगमग.
ऑफीसमधलं प्र-चं-ड काम. जवळ येणारी डेडलाईन. डोक्यातला कासावीस गदारोळ.
गोष्टीचा शेवट कळला पाहिजे, शेवट कळलाच पाहिजे -
वाचायला सगळी पहाट आणि सकाळ मिळते. गाडीतही वाचता येतंच. पण ऑफीसमधे? तिथे कसं वाचणार? गोष्टीचा शेवट तर लवकरात लवकर कळला पाहिजे.
हॅरीला पूर्ण तयारीनिशी लढायला उतरायचं आहे. लढणं अपरिहार्य आहे, या हतबलतेतून नव्हे. पूर्ण निर्धारानं. सगळे सगळे संदेह - संशय - गंड बाजूला सारून. आपल्या ताकदीवर पुरा विश्वास ठेवून.
मग मरणं की मारणं यांतले हिशेब आपोआप बाजूला राहतील. फक्त निर्णय घेता आला पाहिजे.
हॉलोज की हॉरक्रक्सेस? अमरत्वाचा शाप की मरणाचं वरदान?
अहं, कुठेतरी काहीतरी चुकतं आहे...
काय चुकतं आहे?
हॅरीची ऍन्क्झायटी आणि माझं ऍड्रेनॅलिन एकत्रच वाढत असलेलं. दोन टास्क्सच्या मधे मी स्क्रीनवर चक्क हॅरीची सॉफ्टकॉपी उघडते.
निर्लज्ज? मेबी. हू दी हेल केअर्स?
त्याच्या-माझ्या विश्वांनी परस्परांचा परीघ छेदला आहे.
भासमय विश्व? मेबी. अगेन, हू दी हेल...
जिवानिशी सुटायचं असेल, तर आता आम्हांला आपापली वर्तुळं चालून पुरी करण्यावाचून गत्यंतर नाही.
आता शेवटापर्यंत पोचायचं आहे फक्त.
***

बस्स. बस्स झालं आहे त्याला आता.
ही नाटकी माणसं. त्यांच्या आचरट अपेक्षा. मूर्ख-विकृत साले.
एक त्याची लहानगी बहीण भेटायला हवी आहे आत्ता त्याला...
तिचा मनासारखा निरोप घेतला, की तो पश्चिमेकडे निघून जायला मोकळा.
मग बसा झक मारत. त्याला देणंघेणं नाही. खरंच.
हॉल्डन वेदरफिल्ड त्याचं नाव.
वय? उणंपुरं सोळा वर्षांचं. शरीरातलं गरजांचं उधाण. डोक्यातलं आडव्यातिडव्या विचारांचं. आजूबाजूला पसरलेली तडजोड.
अनाकलनीय आहे हे सगळं त्याला. खोल खोल बुडत चालला आहे तो...
हॉल्डन वेदरफिल्ड मला भेटला, तेव्हा माझं वय त्याच्यापेक्षा बरंच जास्त असलेलं. पण 'तळ्यातली बदकं हिवाळ्यात कुठे जातात?' या त्याच्या प्रश्नानं मला तितक्या सहजासहजी पुढे जाऊन दिलं नाही.
एखाद्या गोडगुलाबी-देवदूती परीकथेतल्या नायकानं झोपण्यापूर्वी निरागसपणे विचारलेला प्रश्न नाही हा. डोण्ट लेट युअरसेल्फ एस्केप फ्रॉम इट.
आत न मावणारा संताप आणि आर्तता त्याच्या प्रश्नात. एक इमर्जन्सी. तिनं मी खिळल्यासारखी झाले.
मी सोईस्कररीत्या विसरून गेले होते, त्या प्रश्नांना त्यानं बिनदिक्कत हात घातलेला.
मला त्याचा इतका भयानक राग का येतो आहे? तो शिवराळ, तो खोटारडा, तो माजोरडा म्हणून?
की थोडा तो माझ्यात आहे, आणि थोडी मी त्याच्यात म्हणून?
आय स्वेअर, असलं काहीतरी बांधलं जातं, तेव्हा सोबत वाट काटण्यावाचून गत्यंतर नसतंच.
होय, मिसरूडही न फुटलेलं कोवळं पोर.
कदाचित खरं - कदाचित खोटं. पण हू दी हेल केअर्स?
शेवटापर्यंत पोचायचं आहे फक्त.
***

बदामच्या राणीला वेड्यात काढणारी ऍलिस.
आपल्या गुलाबकळीला जिवापलीकडे जपणारा लिटिल प्रिन्स.
'थोडासा रुमानी हो जाए'मधला बारिशकर.
वादळात बिनदिक्कत जहाज घालणारा कॅप्टन रॉस.
आवेगानं चक्रधरला बिलगत जगून घेणारी हॅर्टा.
'मी लहान मुलासारखा तुझ्या मागे लागू?' असं काकुळून हरिलालला विचारणारा सौमित्र.
काय खरं? काय खोटं?
प्रेयसीला कान कापून देणारा व्हिन्सेण्ट.
त्याच्या फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त.
त्यातून माझ्याही आयुष्यात उद्दाम प्रदीर्घ बहरत गेलेली सूर्यफुलांची शेतं.

इतकंच खरं फक्त.