Wednesday, 28 November 2018

या भवनातील गीत पुराणे...

पुलंसंबंधी काही नकारात्मक म्हणणं मोठं कर्मकठीण आहे.

एकतर माणूस अतिशय म्हणजे अतिशयच चांगला कलावंत - किंवा स्वतः पुलंच्या शब्दांत म्हणायचं तर खेळिया. अनेक क्षेत्रांत केलेला संचार. भाषेवरची जबरदस्त हुकूमत. लोकांना मोहवून टाकणारं बहुविध साहित्य. मी स्वतःच पुलंच्या साहित्याची इतकी पारायणं केलेली आहेत, की आता नव्यानं वाचायला घेतलं इतक्या वर्षांनी, तर पुढची ओळ आपसूख आठवते. बरं, माणूस नुसताच कलावंत म्हणून चांगला नाही, तर माणूस म्हणूनही जिंदादिल आणि उमदा. दातृत्व? पुष्कळ. उत्तम वेव्हारे जोडून उदास विचारे वेचलेलं धन. सरकारी ठोकशाहीविरुद्ध उभं ठाकण्याचं कर्तृत्व? दोनदा दाखवलेलं. एकदा अणीबाणीच्या कालखंडात प्रचारसभांमध्ये भाग घेऊन. एकदा 'लोकशाही हवी आहे, ठोकशाही नको' असं महाराष्ट्रभूषण या सरकारी पुरस्काराचा स्वीकार करताना सरकारला खडसावून. माणसांत मिसळून माणसांवर प्रेम करण्याची अफाट ताकद. पत्नीनं मतभेद आणि नाराजी व्यक्त केली, उमदेपणानं नम्र स्वीकार. मुख्य धारेतली लोकप्रियता लाभली. तिचा वापर करून दलित साहित्याचं जाहीर कौतुक. कोणत्या आधारावर या माणसाचं उणं काढणार? जागाच नाही. त्यांच्या जन्मशताब्दीवर्षात - त्यांना जाऊन जवळजवळ वीस वर्षं उलटून गेली, मधल्या वर्षांत काळानं कूस पालटली, जग कधी नव्हे इतकं जवळ आलं नि आमूलाग्र बदललं, तरीही या माणसाची लोकप्रियता अबाधित. पुस्तकं आपली खपतातच आहेत.

सगळं दृष्ट लागावं असंच तर आहे.

तरीही अलीकडेच एका गोतावळ्यात वय वर्षं वीसहून लहान असलेल्या एका मुलाकडून पुलंच्या साहित्यातली उद्धृतं सतत ऐकण्याचा योग आला आणि चक्रावायला झालं. पुलंच्या मृत्युवर्षाच्या आसपास जन्माला आलेला हा मुलगा. त्याची भाषा मराठी आहे खरी. पण त्याखेरीज पुलंच्यात आणि त्याच्यात कोणताही समान दुवा नाही. थिसियसच्या जहाजाचं उदाहरण खरं मानायचं, तर मधल्या काळात भाषेच्याही पेशी आमूलाग्र बदलून गेलेल्या. जरी भाषेचं नाव मराठी असंच असलं, तरीही तिची चौकट, ठेवण, वापर सगळंच आरपार बदललेलं. पुलंनी ज्या मध्यमवर्गीय माणसाचं आत्मचरित्र निरनिराळ्या प्रकारे हयातभर रेखाटलं, त्याच्या आयुष्याशी या मुलाच्या आयुष्याचा काय संबंध आहे? चाळ, कचेर्‍या, गजरा-नाटक-शालू-शेले-व्याख्यानं या सांस्कृतिक बाबींशी असलेले लागेबांधे, पोस्ट आणि तत्सम संस्था... सगळं अंतर्धान पावलं आहे वा हळूहळू अंतर्धान पावत चाललं आहे.

मग हा मुलगा पुलंचे त्याच्या आयुष्याशी असंबद्ध असलेले उतारे हे असे वेळोवेळी फेकतो आहे, आळवतो आहे, त्यांचा आनंद लुटतो आहे - ते नक्की कशातून? आणि ते इतकं अस्थानी-कुरूप आणि कोड्यात टाकणारं का वाटतं आहे मला?

या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुन्हा पुल वाचायला घेतले. आश्चर्य म्हणजे, त्यांचं काहीच मनास येईना. ते कमालीचे कालबाह्य वाटायला लागले. त्यांच्या साहित्याचा सांधा 'आज'शी जुळतोसं वाटेना. लिंगभावाबद्दल कमालीचा असंवेदनशील, असंतुलित असलेला त्यांचा विनोद खुपायला लागला. लोकांना काय वाटतं आहे याचा कानोसा घेण्यासाठी तसं म्हणायचा प्रयत्न केला मात्र - लोक अंगावर धावून यायला लागले आणि मी हबकले. पुलंवर प्रेम तर मीही भरभरून केलं आहे, करते. तरीही त्यांच्या साहित्याची अशी चिकित्सा करणं म्हणजे घरावर दगड मारून घ्यायला आमंत्रण देण्यापैकीच असणार आहे, हे नीटच लक्ष्यात आलं. मुळात पुलंच्या साहित्याबद्दल प्रश्नचिन्हासकट काहीतरी म्हणायला लागलात, की लगेच तुमच्या हेतूबद्दल शंका घेतली जाणार अशा प्रकारची आणि अशा प्रमाणातली पुलंची लोकप्रियता - किंवा खरंतर त्यांच्याबद्दलची भक्ती - दिसायला लागली.

मग ही चिकित्सा करून बघणं जास्त-जास्तच महत्त्वाचं वाटायला लागलं.

~~~

पुलंनी कुणाबद्दल लिहिलं?

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातला मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुष पुलंच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होता. 'असा मी असामी' किंवा 'बटाट्याची चाळ' या कथनात्मक काल्पनिक लेखनात तर तो उघडपणे आहेच. पण वेळोवेळी लिहिल्या गेलेल्या त्यांच्या इतर लेखांमध्ये, व्यक्तिचित्रांमागच्या लेखकाच्या आवाजामध्ये, प्रवासवर्णनांमधला 'मी' म्हणून शहरी मध्यमवर्गीय पुरुषाचा स्वर ऐकू येतो. मी अंतर्बाह्य शहरी प्राणी आहेहे खुद्द पुलंचंच विधान आहे. ज्या मंडळींची मतं मराठी साहित्यात अनुकरणीय गणली जातात, पीअर प्रेशरसारखं काम करतात, अशी मंडळीही कायम बहुतकरून शहरी आणि उच्चवर्णीय होती; त्यामुळे पुलंच्या लोकप्रियतेचं अनुकरण पुढे निमशहरांतून आणि गावांतून झालेलं असणं शक्य आहे. मात्र पुलंचं साहित्यविश्व शहरी लोकांपुरतं मर्यादित होतं, इतकं तरी म्हणणं भाग आहे.

सहस्रकानं कूस बदलण्याच्या सुमारास या शहरी मध्यमवर्गीय जगाचं चित्र बदलायला लागलं. चाळी जाऊन हाउसिंग सोसायट्या अवतरल्या. कोकण रेल्वेनं लाल डब्याला स्पर्धेतून भिरकावून दिलं. चारचाकी गाडी, फोन आणि एसी या एके काळी अप्रूपाच्या आणि अपूर्वाईच्या असलेल्या, श्रीमंती समजल्या जाणार्‍या वस्तू सहजी कुणापाशीही दिसू लागली. कारकुनांनी कात टाकली. सरकारी कचेर्‍यांमधला मराठी मध्यमवर्ग वेगानं आयटीत मजुरी करण्याकडे सरकू लागला. परदेशवार्‍या सहजसाध्य झाल्या. स्मार्टफोन्स आणि इंटरनेट रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले. मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुषाचं सगळं भवताल आणि परिणामतः तो स्वतःही आधीचा उरला नाही.

भवतालातल्या या बदलांमुळे मला पुलंचं साहित्य कालबाह्य वाटू लागलं का?

मनाशी आलं खरं. पण हे उत्तर फारच ढोबळ ठरलं असतं. साहित्यिक आपल्या साहित्यातून कोणता काळ रंगवतो, या गोष्टीनुसार त्याचं कालसुसंगत असणं का ठरावं? पेशवेकालीन व्यक्तिरेखांवर आज 'श्रीमंत गोपिकाबाईची बखर' लिहिणारे आनंद विनायक जातेगांवकर म्हणा, किंवा भविष्यकालीन समाजाचं काल्पनिक चित्र 'उद्या'तून रेखाटणारे नंदा खरे म्हणा - एक जण वरकरणी भूतकाळाबद्दल लिहितो आहे, या कारणामुळे तो कालबाह्य ठरणार नाही आणि एक जण वरकरणी भविष्यकाळाबद्दल लिहितो आहे, या कारणामुळे तो भविष्यवेधी नव्हे. त्यांच्या कालसुसंगत असण्याची वा नसण्याची कारणं निराळी असतील. फक्त मजकुरातला काळ न पाहता, त्या काळाबद्दल, त्या काळाच्या वर्तमानाशी असलेल्या नात्याबद्दल, कारण-परिणामांबद्दल लेखक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काय म्हणतो आहे, त्यावरून तो कालसुसंगत आहे की नाही हे ठरेल. थोडक्यात, लेखकाला त्याला हवा तो लेखनकाळ निवडण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य असतं. तो काही त्याच्या कालसुसंगत असण्याचा निकष नव्हे.

या निकषाचा आधार घेता पुलंचं साहित्य कालबाह्य नव्हे, असंबद्ध तर नव्हेच नव्हे.

पण पुलंच्या साहित्याचा भाग असलेल्या अनेक गोष्टी आजच्या वाचकांनी पाहिलेल्या-अनुभवलेल्या नाहीत, हे तरीही उरतंच. 'बटाट्याच्या चाळी'तला रामा गडी, 'व्यक्ती आणि वल्ली'मधल्या नंदा प्रधानच्या इंदूचा थेरडा, परदेशी जाण्यासाठी करण्याचा बोटीतला प्रवास... अशी अनेक उदाहरणं देता येतील. फार लांब कशाला जा, गेल्या पंधराएक वर्षांत लाल डब्ब्याला पाय न लावलेली कितीक तरुण शहरी माणसं सापडतील. तरी, ज्यांनी आयुष्यात एकदा तरी एस.टी.चा प्रवास केला आहे, त्यांना 'म्हैस'मधला विनोद कळेल. पण ज्यांनी एस. टी.ला कधी पायच लावलेला नाही, त्यांच्याकरता 'म्हैस'मधले कितीतरी संदर्भ अनाकलनीय ठरतील. त्या अर्थी पुलंच्या साहित्याच्या कालबाह्यतेला हळूहळू का होईना, सुरुवात झाली आहे. 'माझे पौष्टिक जीवन'मधला 'कि-हिं-क-ह-व-ह-डि-ही' असं ठणकावणारा बावज्या बोहोरीकर मी कधीही पाहिलेला नाही. तसाच 'जलशृंखला योग' हे नाव कुठून आलं आहे, हे जाणण्यासाठी सामायिक संडास, त्यांच्या दुरुस्तीची घरमालकावर असलेली जबाबदारी आणि त्यातून तयार होणारी विवक्षित परिस्थिती हे सगळं चाळीत राहून अनुभवलेलं नाही. घरमालकांस पत्रमधला विनोद माझ्यापर्यंत पोचणं कठीणच आहे. माझ्या आकलनात काहीतरी कमतरता राहून जाणार. मानवी प्रवृत्ती अमर असल्यामुळे, कल्पनेचं आयुध वापरून आणि पुलंच्या चित्रदर्शी-जिवंत भाषेचा आधार घेत मी अनेक गोष्टींचा आनंद तरीही लुटू शकले. इक्ष्वाकू कुळातल्या राजकुमारांची वर्णनं काय, किंवा निमकराच्या खानावळीतील डुकराची भजीही निर्बुद्ध भाषांतराची उडवलेली रेवडी काय, पुलंचं काही लेखन अजुनी सदाबहार आहे. पण तरीही - सत्तर सालात पुलंच्या लेखनाला वाचकानं दिलेली दाद आणि आज मी देत असलेली दाद, यात फरक पडला आहे, हे मान्य करावंच लागेल.

साहित्याच्या आस्वादाकरता प्रत्यक्ष अनुभवाची काय गरज, असं एक प्रतिपादन केलं जातं. उदाहरणार्थ, काही प्रकारच्या साहित्यात काल्पनिक विश्व चितारलेलं असतं. जे. के. रोलिंगचं हॅरी पॉटरविश्व हे याचं अत्यंत चपखल उदाहरण. जादू, जादूच्या छड्या, मंत्र, चेटक्यांची शाळा... हे सगळे कल्पनेतले घटक हॅरी पॉटरच्या जगाचा अविभाज्य आणि अनिवार्य भाग आहेत, पण ते वास्तवात अस्तित्वात नाहीत. तरीही सर्व वयाच्या, अनेक भाषांच्या, अनेक देशांमधल्या वाचकांना हॅरी पॉटरची ओढ वाटते. 'हॅरी पॉटर' हे अभिजात साहित्यात मोडत नसेल, तर ऑन्त्वान् द सान्तेक्झ्युपेरीच्या 'द लिटिल प्रिन्स'चं उदाहरण देता येईल. तीन ज्वालामुखी असलेला लिटिल प्रिन्सचा छोटुकला ग्रह वास्तवात अस्तित्वात नाही. तरीही लिटिल प्रिन्स कित्येक वर्षं जगभरातल्या वाचकांना भुरळ घालतोच आहे. ही सरळ सरळ फॅन्टसीची उदाहरणं. त्याहून थोडं वेगळं उदाहरण घ्यायचं, तर श्री. ना. पेंडशांच्या 'तुंबाडचे खोत'चं. त्यामधलं तुंबाड कल्पनेतलं आहे. ते पेंडशांच्या अंतःचक्षूंखेरीज इतर कुणीही पाहिलेलं असणं शक्य नाही. तरीही वाचकाच्या नजरेला ते कल्पनेनं पाहता येतंच. जयंत पवारांच्या 'वरणभात लोन्चा कोन नाय कोनचा' या कथासंग्रहातल्या सगळ्याच कथांमध्ये अद्भुत अतिवास्तवाचा एक धागा आहे. त्यामुळे त्या कथा कमी परिणामकारक ठरतात का? तर नाहीच. हे प्रतिपादन मान्यच आहे.

इथे आपल्याला पुलंची लेखक म्हणून असलेली जातकुळी नीट तपासून पाहण्याची गरज आहे.

लेखक नक्की काय आणि कसं सांगू पाहतो आहे, याचा विचार करून त्यांची ढोबळ वर्गवारी करू गेलं असता त्यांचे तीन प्रकार दिसतात. काल्पनिक गोष्ट सांगणारे अर्थात फिक्शन लिहिणारे लेखक. एखाद्या बाबीचा चहूअंगांनी विचार करून तिची खोलवर छाननी करणारे लेखक. सद्यकालीन परिस्थितीचं वर्णन करून त्यावर आपली मल्लिनाथी उर्फ शेरा नोंदवणारे लेखक. तिन्ही भाग तसे पाणबंद नव्हेत हे उघडच आहे. पण पुल यांपैकी कोणत्या भागात बसतात ते आपण ढोबळ मानानं बघू.

पुल काही गोष्ट सांगणारे साहित्यिक नव्हेत. त्यांनी थेट कथा वा कादंबर्‍या लिहिलेल्या नाहीत. त्यांची नाटकंही बहुतांश वेळा कोणत्या ना कोणत्या परकीय नाटकाचं रूपांतर अशाच स्वरूपाची आहेत हे लक्ष्यात घेण्यासारखं आहे. मुख्य आहेत ती प्रवासवर्णनं, वास्तव आयुष्यातली वा काल्पनिक व्यक्तिचित्रं, निरनिराळ्या लेखांतून मध्यमवर्गीय आयुष्याचं नाना प्रकारे केलेलं वर्णन, त्याबद्दलचे खास त्यांचे असे शेरे. या सगळ्या साहित्यात स्वतंत्रपणे गोष्ट रचण्याची ऊर्मी दिसत नाही. दिसते ती एक प्रकारची कॉमेंटरी. समालोचन. लालित्यपूर्ण आणि रंजक, पण समालोचन. त्या समालोचनात लेखकाला दिसणार्‍या चित्राचं हुबेहूब वर्णन आहे आणि समालोचकाचा विशिष्ट नजरियाही आहे. तो विलक्षण लोभस आहे यात वादच नाही. पण ती काही रचलेली कथा नव्हे. लेखक आणि वाचक ज्या एका सामाजिक परिस्थितीचा भाग आहेत, त्या परिस्थितीतल्या एका विवक्षित जागेवरून दिसणार्‍या एका मर्यादित तुकड्याचं रंजक, लालित्यपूर्ण वर्णन आणि त्याबद्दलचे शेरे आहेत. ते समालोचन आहे, त्यामुळे लेखक आणि वाचक दोघेही एकाच काळात वावरत आहेत हे गृहीतकही आहे.

पुल विचारवंत-लेखकही नव्हेत. त्यांच्या काही पुस्तकांतून काही विशिष्ट विधानं केली जात असतात. विषयाच्या अनुषंगानं काही विचार मांडले जात असतात. ते विचार काही प्रमाणात कालातीतही असतात. त्यात अनेकदा चिंतनशील भाग येतो. पण नरहर कुरुंदकरांसारख्या लेखकाशी पुलंशी तुलना केली, की पुलंची निराळी जातकुळी लख्ख दिसायला लागते. एखादा प्रश्न वा एखादी साहित्यकृती वा एखादी परिस्थिती समग्रपणे न्याहाळून तिच्या निरनिराळ्या बाजूंची छाननी करणं, प्रश्न विचारणं, काही एका निष्कर्षावर पोचणं, निष्कर्षाचं समर्थन करणं वा तो विश्लेषणासकट खोडून काढणं आणि पर्यायी उत्तर मांडणं... असं पुलंनी कधीही केलेलं दिसत नाही, तो त्यांचा पिंडच नाही. त्यांना बहुतेकदा आपल्या नायकाची - पक्षी : स्वतःची आजूबाजूच्या परिस्थितीनं उडवलेली त्रेधातिरपीट दाखवून मनसोक्त हसायचं असतं. ललित समालोचन असं याचं वर्णन करता येईल. स्टॅंडप कॉमेडी करणारे अनेक लोक या प्रकाराचा आणि अशाच विषयांचा अवलंब करताना दिसतात. पुलही त्यांच्या मंत्रमुग्ध करणार्‍या आणि वैविध्यपूर्ण एकपात्री प्रयोगांसाठी प्रसिद्ध होते, हा काही योगायोग नाही. आजही 'त्यांचं लिखाण वाचायला कंटाळा येतो, पण ऐकायला मजा येते' अशी कबुली देणारे अनेक जण सापडतात. पुल स्वतःला लेखक म्हणवत नसत. परफॉर्मर उर्फ खेळिया म्हणवत असत, याची नोंद करून आपण पुढे जाऊ.

तर - अशा लालित्यपूर्ण रंजनात्मक वर्णन करणार्‍या समालोचक लेखकाचं समकालीन असणं कळीचं नसतं का?

माझ्या मते, असतं. तो त्याच्या लेखनाच्या परिणामकारकतेचा एक महत्त्वाचा भाग असतो.

थोडा विचार करून पाहा, आज पुलंच्या किती व्यक्तिरेखा आपल्याला येता-जाता भेटतात? 'मॅन / वुमन नेक्स्ट डोअर' म्हणाव्यात अशा असतात? आयटीत काम करणार्‍या कॉर्पोरेट मजुराचं आणि पुलंच्या कोचरेकर मास्तरांचं विश्व किती वेगळं आहे! घरा-कुटुंबाबाबतची कर्तव्यं, करियरमध्ये यशस्वी होण्याची निकड आणि मुक्त स्त्री असण्याचं पिअर प्रेशर ही सगळी दडपणं वागवणार्‍या आजच्या बाईचं आणि त्या चौकोनी कुटुंबातल्या गृहिणीचं काय नातं आहे?

'असा मी असामी'तले धोंडोपंत जोशी चाळीतून ब्लॉकमध्ये गेले आणि त्यांच्या ठरीव आयुष्यात एकाएकी नवनवीन पर्यायांची गर्दी उडाली. हीच पर्यायांची भाऊगर्दी धोंडोपंतांच्या उत्तरायुष्याहून आज कितीतरी पटींनी वाढलेली आहे. धोंडोपंत चाळीतून ब्लॉकमध्ये गेल्यानंच काहीसे भांबावलेले होते. आज धोंडोंपंतांचा नातू आपल्याला भेटला, तर तो बहुतेक मुंबईत राहत नसेलच. तो अमेरिकेत असेल, गेला बाजार बंगळुरात तरी नक्कीच. त्याच्या समोर बहुधा ऐन तिशीतच मिडलाईफ क्रायसिस आ वासून उभा असेल. धोंडोपंतांचं तर सोडाच, धोंडोपंतांची विकेट उडवणारा शंकर्‍याही त्याच्यासमोर हतबुद्ध होत असेल. निव्वळ ब्लॉकच्या जागी अमेरिका, हिंदी सिनेमाच्या जागी इंग्रजी सिनेमा, कॅक्टसच्या जागी शेअर्ड गार्डनिंग, सरोज खरेच्या जागी आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक... इतकं एकास एक असलेलं हे रूपांतर नाही. भौमितिक वेगानं वाढत गेलेल्या ओळखी आणि निवडीचे पर्याय. मुलांच्या शिक्षणाचं माध्यम, शालेय शिक्षणापासून ते त्यांच्या संभाव्य करियरनिवडीपर्यंत करण्याच्या आर्थिक तरतुदी, लैंगिक कल ठरवण्याचे अनंत आणि सक्तीचे पर्याय, आपल्या मुलांच्या लैंगिक कलांविषयीचे सावध आणि खुले पवित्रे, धार्मिक आणि जातीय ओळखींशी जुळवून घेण्याचे वांशिक आणि राष्ट्रीय ओळखींचे सांधे...  या सगळ्या पर्यायांशी आट्यापाट्या खेळताना शंकर्‍याच्या मुलाचीच विकेट उडत असणार, असं मानायला जागा आहे. तो आणि धोंडोपंतांना जन्माला घालणारे पुलं यांच्यामधलं नातं आज किती जवळचं - किती दूरचं आहे?

त्या दोघांच्यात कमालीचं अंतर पडलं आहे इतकं तरी आपल्याला कबूल करावंच लागेल.

~~~

पुलंबद्दलच्या प्रेमादरातून बाहेर पडल्यानंतर मला खुपायला लागलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पुलंच्या साहित्यातलं बायांचं चित्रण. पुलंचा नायक का-य-म एक मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुष असतो. नुसतं तितकंच नव्हे. 'बटाट्याच्या चाळी'त - किंवा खरंतर पुलंच्या कोणत्याही ओरिजनल साहित्यात - भेटणार्‍या स्त्रिया मुद्दामहून निरखण्यासारख्या आहेत. अनेकदा त्यांचा आवाज थेट ऐकू न येता मुख्य कथानकाच्या पार्श्वभूमीला येत असतो. जर कधी आवाज मोठ्यांदा आलाच, तर तो विनोदाचा विषय असतो. त्यांच्या अनेक लेखांमध्ये येणारं धर्मपत्नीचं पात्र हे नवर्‍याला गप्प करणारं, व्यावहारिक शहाणपणाची मात्रा अधिक असणारं, आपलं ते खरं करणारं असं किंवा मग चक्क बावळट, चेष्टेचा विषय असणारं असतं आणि पुलंचा नायक हे सोशीकपणे, काहीशा विनोदी धाटणीनं स्वीकारून पुढे जात असतो. 'अतिविशाल महिला मंडळा'बद्दलच्या त्यांच्या विनोदावर टीका झालेली मी ऐकली होती. पण कधी इतकी मनावर घेतली नव्हती. पुढे सुनीताबाईंचा थांबा लागला. पुलंच्या साहित्यानं भारून जाण्याचा काळ उलटून गेला. अघळपघळमधली अभया थोपटे वाचताना माझ्या भिवया वर गेल्या. अभयाच्या भाषेला पुरुषी घाट आहेपासून ते बाई मर्द आहेपर्यंत सगळेच शेरे मला लाल रंगात दिसायला लागले. तरुण मुलींना साहित्या-अभ्यासात-राजकारणात मत असलं, तर त्या पुरुषी असतात नाहीतर मग नुसत्याच सुंदर नि माठ तरी असतात, या स्टिरिओटाईपनं लक्ष्य वेधून घेतलं. पुलंच्या लेखनातल्या यच्चयावत मध्यमवयीन स्त्रियाही स्वैपाकघराची वेस न ओलांडणार्‍या नि ओलांडल्यास विनोदाचं कारण ठरणार्‍या तरी होत्या, नाहीतर बेगडी समाजकार्य करणार्‍या आणि आकारानं विशाल असलेल्या तरी. मुख्याध्यापिका म्हणून सरोज खरे आली खरी, पण ती लिपस्टिक सांभाळण्यासाठी ओठाला ओठ न लावता बोलणारी. पुलंचं हे पुरुषप्रधान समाजाचा प्रतिनिधी असल्यासारखं, त्या व्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा प्रश्न न करता, कधी बोलून, तर कधी न बोलता खतपाणी घालत लिहीत जाणं मला नंतरनंतर अधिकाधिक खटकत गेलं. त्याबद्दल निषेधाचा शब्द उच्चारणं तर सोडाच, पण असल्या विनोदाला न हसल्यामुळेही बाई स्त्रीवादी दिसतेयहे कुत्सितपणे उच्चारलेलं वा अनुच्चारित वाक्य ऐकावं लागतं असा माझा आज-आत्ताचाही अनुभव आहे. खुद्द पुलंच्या काळात अशा प्रकारचा निषेध झाला नाही, याचं आश्चर्य वाटत नाही ते म्हणूनच. असले विनोद हा संस्कृतीनं स्वीकारून टाकलेला भागच असावा. पुलंनी त्याविरुद्ध कधीही शब्द तर उच्चारला नाहीच. पण आपल्या लेखनातून असा विनोद अगदी सहजमान्य असल्यागत वापरला, त्याचं उदात्तीकरणही केलं, असं आता लक्ष्यात येतं.

'व्यक्ती आणि वल्ली'मध्ये एकही स्त्री नाही. लेखकाला आपल्या एका आयुष्यात सगळंच्या सगळं जग कवेत घेता येणं अशक्य आहे, हे मान्य केलं, तरीही 'व्यक्ती आणि वल्ली'चा स्त्रीपात्रविरहितपणा चकित करतो. माणसांना निरखण्यात आनंद मानणार्‍या पुलंना बाई असलेली एकही वल्ली भेटू नये हा पुलंच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या मुशीत घडलेल्या नजरेचा दोष, की वल्लीपणाची मिजास आणि बाईपण एकत्र नांदूच न देणार्‍या संस्कृतीचा, हे कळेनासं होतं.

हे वास्तविक आपल्याला शिंग फुटल्यावर आपल्याच एखाद्या प्रेमळ आजोबांवर चिडण्यासारखं आहे, कबूल आहे. तरीही माझं वैतागणं रास्त नाही, असं मात्र मला म्हणवत नाही.

असो. तर - माझ्यासारख्या आणि माझ्याहून वयानं लहान असलेल्या अनेक जणांमध्ये अजूनही पुलंची लोकप्रियता इतकी अफाट आणि इतकी तीव्र कशी?

~~~

या प्रश्नाला दोन बाजू आहेत.

एक तर पुलंचा समर्थ उत्तराधिकारी ठरेल असा लेखक आपल्याकडे नाही. बहुतांश लेखकांचे कुणी ना कुणी वारसदार असतात. लोकप्रियतेत, भूमिकांत, भाषाप्रभुत्वात थोडाफार फरक अर्थातच असतो; पण परंपरेच्या साखळीमधला हा पुढचा दुवा, असं म्हणण्याइतकं साम्यही असतं. विभावरी शिरूरकर-गौरी देशपांडे-मेघना पेठे-कविता महाजन अशी एक ढोबळ साखळी दिसते. थोड्याफार मतभेदांसकट मान्यही असते. त्या प्रकारे पुलंनंतर कोण या प्रश्नाचं काही उत्तर मिळत नाही. त्यांच्या शैलीची छाप अनेकांवर पडलेली दिसते. पण ते काही पुलंचे वारसदार नव्हेत. पुलंचा वारसा पेलणं अतिशय कठीण आहे. संगीतापासून नाटकापर्यंत आणि चित्रपटांपासून टीव्हीपर्यंत चौफेर आणि लीलया संचार असणा‍र्‍या या लेखकाचा वारसदार होण्याची जबाबदारी प्रचंड मोठी आणि क्षमता नसलेल्या लोकांना दडपवून टाकणारी आहे. त्यामुळेच निरागस, सुलभीकरण करणारं, शहरी, उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याचं दर्जेदार आणि लोभस चित्रण हवं असल्यास, पुलंना पर्याय नाही.

इथे दोन नावांची आठवण निघणं अपरिहार्य आहे. आचार्य अत्रे हे त्यांतलं पहिलं नाव. अत्र्यांनाही महाराष्ट्रात कमालीची लोकप्रियता लाभली. त्यांच्या सर्वार्थानं प्रचंड असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणी अजूनही काढल्या जातात. पण विनोदाचा आणि विविधक्षेत्रसंचाराचा समान धागा असला, तरी अत्रे आणि पुलं यांच्यात जातकुळीचा मोठाच फरक होता. पत्रकारिता आणि राजकारण यांच्या मुशीतला अत्र्यांचा विनोद अनेकदा बीभत्स पातळी गाठत असे. आपल्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर त्यांनी ते लांछन लीलया पेलून नेलं असावं. पुल त्या बाबतीत अत्यंत सोज्ज्वळ, घरगुती ऊबदारपणा जपून असलेले, मध्यमवर्गीय पापभीरूपणाला जवळचे वाटणारे. दुसरं नाव चिं. वि. जोशी यांचं. त्यांच्या चिमणराव आणि गुंड्याभाऊवर मराठी माणसांनी अतिशय प्रेम केलं. या प्रेमाला खरा बहर आला, तो चिंविंच्या लेखनकाळात नव्हे, तर दूरदर्शनवरची चिमणराव-गुंड्याभाऊ मालिका प्रदर्शित झाल्यानंतर. चिंविंना त्यांच्या हयातीत पुलंसारखी भरभरून लोकप्रियता लाभली नाही. खरंतर त्यांचा विनोद अधिक रेखीव आणि जिवंत व्यक्तिरेखाटन करणारा, संवादी, पुलंच्या शब्दप्रधान विनोदाहून अगदी वेगळी अशी घटनाप्रधान नि काहीशी फार्सिकल शैली असलेला, कथनात्मक होता. चिंविंची चिमणराव-मालिका जणू टीव्हीसाठी लिहिल्यासारखीच होती आणि दिलीप प्रभावळकरांच्या चिमणरावानं तिला पुरेपूर न्यायही दिला. पुलंच्या निबंधवजा घाटात लिहिलेल्या वल्लींवर वा 'बटाट्याच्या चाळी'वर कथाप्रधान टीव्ही मालिका झाली नाही. पुलंच्या स्वतःच्या जबरदस्त सादरीकरणाच्या छायेतून त्या कलाकृती कधीही बाहेर पडल्या नाहीत, हे जसं त्याचं कारण आहे; तसाच त्या कलाकृतींचा ललितनिबंधवजा घाटही त्याला कारणीभूत आहे. चिंविंचं लेखन मात्र दृश्यमाध्यमाला पूरक असं होतं. पण एकूण साक्षरतेचं वाढत जाणारं प्रमाण, मध्यमवर्गाच्या नि टीव्हीच्या उदयाचा-बहराचा काळ आणि चिंविंचा लेखनकाळ यांची वेळ जुळून आली नाही, हे खरं. 

ही दोन्ही नावं पुलंच्या पूर्वसुरींची. पुलंच्या नंतरचं, ही चौकट व्यापणारं आणि चौकट अद्ययावत करत जाणारं, एकही मोठं, लक्षणीय नाव आठवत नाही. पण त्यामागच्या कारणांत शिरायचं झालं तर नव्या लेखाची सुरुवात करावी लागेल.

कारणं काही का असेनात; सोपं, आकर्षक आणि मध्यमवर्गीयांना चुचकारणारं लेखन करणारे पुल हाच एक पर्याय वाचकांपाशी उरल्याचा भास तयार झाला खरा.

दुसरी बाजू बघायची, तर थोडं खोलात शिरावं लागतं. कालचा मध्यमवर्ग आज खरं तर मध्यमवर्ग उरलेलाच नाही. क्रयशक्तीचे निकष लावायचे झाले, तर त्याला उच्चमध्यमवर्गीय असं म्हणणं हेसुद्धा मध्यमवर्गीय या संज्ञेची कमालीची ओढाताण करण्यासारखं आहे. मध्यमवर्ग या संज्ञेत बसणार्‍या समाजाचाही पोत बदललेला आहे. त्यातली निमशहरी लोकांची संख्या वाढत गेली आहे. जातीय टक्केवारी बदलली आहे. खेरीज आपण वर म्हटल्याप्रमाणे या नवमध्यमवर्गापुढची निर्णयांची आणि प्रलोभनांची निव्वळ संख्या, त्यातून उद्भवत गेलेली ओढाताण नि व्याकूळता, आणि जगण्यातला एकूणच गोंधळ... हे सगळं कित्येक पटींनी वाढलेलं आहे. अशा वेळी एक मनोरंजक, आकलनाला सोपा आणि अनेकांच्या आवडीनिवडींचा लसावि असू शकेल असा लेखक म्हणून पुलं हा जणू आदर्श साचाच आहे. 'तुका म्हणे त्यातल्या त्यात'प्रकारे भाषेमुळे जवळचं आणि आकर्षक वाटणारं, गोंजारणारं, हसवणारं पुलंच लेखन आवडणं-ऐकणं-वाचणं-त्याबद्दल बोलणं प्रतिष्ठेचं आहे. त्यात सवयीतून आलेला सोपेपणा आहे, परंपरांचा सुखासीन पिंजरा न सोडता मिळणारी करमणूक आहे, आणि त्याखेरीज आयता मिळणारा सुसंस्कृतपणाचा शिक्का आहे. कोणत्याही प्रकारचे कष्ट नाहीत, प्रश्न नाहीत, पेच नाहीत.

पुलं कधीच अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणारे लेखक नव्हते. 'बटाट्याची चाळ', 'हसवणूक', 'व्यक्ती आणि वल्ली' ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय पुस्तकं पाहिली, तर स्मरणरंजन आणि एका विशिष्ट प्रकारच्या समाजघडीबद्दलचा जिव्हाळा त्यात उघड उघड दिसतो. त्यांतला विनोद अतिशय सूक्ष्म निरीक्षण मांडणारा, मार्मिक आणि रंजक आहे यात प्रश्नच नाही. पण ही पुस्तकं वाचकाला अस्वस्थ करण्यापेक्षाही स्वस्थ करण्याकडेच अधिक लक्ष्य देतात. पुढे-पुढे पुलंनी लिहिलेल्या 'वंगचित्रे'सारख्या पुस्तकांतून त्यांचा सूर प्रगल्भ होत गेलेला जाणवतो. निरीक्षणातून विनोदनिर्मिती न होता प्रश्न पडताना दिसतात. भाषा विनोदाचं शस्त्र न घेता चिंतनशीलता लेऊन येते आणि तरीही आपलं जिवंत प्रवाहीपण कदापि सोडत नाही. पण 'वंगचित्रे' हे काही पुलंच्या लेखक म्हणून ऐन बहराच्या काळातलं पुस्तक नाही. तसंच 'हसवणूक'कार पुलंवर लोकांनी जितकं प्रेम केलं, तितकं प्रेम 'वंगचित्रे'कार पुलंवर केलं नाही. ऐन बहरातल्या पुलंमधल्या लेखकानं अतिशय लोभसवाण्या प्रकारे मध्यमवर्गीय माणसाचा अपराधभाव दूर केला, त्याच्या गोंधळाला हतबलतेतून येणार्‍या विनोदाची ढाल पुरवली. नंतरच्या लेखनातलं त्यांचं चिंतन मात्र लोकांपर्यंत तितकंसं पोचलंच नाही. 

त्यांच्या सगळ्या कारकिर्दीत हा विरोधाभास दिसतो. आपल्या निर्मितीतून मिळवलेली श्रीमंती समाजाला परत देऊन टाकणं (बाबा आमट्यांच्या आनंदवनाशी असलेले ऋणानुबंध), दलित साहित्याचं भरभरून जाहीर कौतुक करणं ('बलुतं'चं केलेलं कौतुक), पत्नीच्या जाहीर नाराजीचा अतिशय उमदेपणानं स्वीकार करणं (आहे मनोहर तरीबद्दलची संयत, उमदी प्रतिक्रिया), साहित्यातल्या नव्या प्रवाहांचं मनापासून स्वागत आणि प्रसार करणं (बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांवरचा कार्यक्रम) हे एका बाजूला. तर दुसर्‍या बाजूला उच्चवर्णीय, शहरी, मध्यमवर्गीय, पुरुषी मानसिकता बाळगणार्‍या संस्कृतीचे साचे कदापि न सोडणं (त्यांच्या लिहिण्यातून कायम दिसणारं स्मरणरंजन आणि परंपरेबद्दलचं प्रेम), नवचित्रकला-नवनाट्य यांसारख्या गोष्टींची यथेच्छ टर उडवणं ('असा मी असामी'तला नानू सरंजामे किंवा 'खुरच्या'), राजकारणासारख्या तथाकथित गलिच्छ स्पर्धेपासून कटाक्षानं दूर राहणं (अणीबाणीनंतरच्या निवडणुकीत प्रचाराला उतरून नंतर मात्र राजकारणातून माघार घेणं). या दोन्ही बाजूंमध्ये एक मूलभूत विसंगती होती. पण यांपैकी दुसरी बाजूच प्रचंड लोकप्रिय ठरली. तिची छाया पुलंच्या प्रतिमेवरून कधीही दूर झाली नाही. ही पुलंची मर्यादा आहे की लोकांचा दोष? की दोन्हीचं दुर्दैवी रसायन?

आज जगण्यातले गोंधळ वाढलेले असतानाही लोकांना पुलंच्या चाळकरी विनोदाचा तोच जुना, आयता साचा विरंगुळ्यासाठी हवाहवासा वाटतो. तसं नसतं, तर पुलंना आपल्या जातकुळीचा वाटणारा पी. जी. वुडहाउस त्याच्या स्वतःच्या मायदेशात केव्हाच जुना आणि वंदनीय होऊन बसलेला  असताना, आपल्याकडे पुलंचं इतकं कौतुक अजूनही का असावं? नि त्याचा दोष पुलंना देणं कितपत बरोबर? निरनिराळ्या प्रकारच्या अस्मितांचे गोंधळ माजलेले असताना आणि नव्या नीतिमूल्यांच्या निकषांवर जुने नायक अपुरे-बुटके ठरत असतानाही बहुतांश लोकांना वाचा-बघायला मात्र रमा-माधवांचं प्रेम, सतीचं उदात्तीकरण, राजपूत स्त्रियांचा जोहार... हेच आवडतं. त्याचाच हाही एक भाग नव्हे का?

पण म्हणून लेखकाच्या या रूपाबद्दल, त्याच्या लेखनातल्या या विधानाबद्दल चर्चा करायचीच नाही? अशी चिकित्सा करू पाहणं हा वाचक म्हणून थेट आपला कृतघ्नपणा किंवा अकलेची दिवाळखोरीच?

कठीण आहे...

काहीही असलं, तरी पुलंबद्दलच्या या अतिरेकी कौतुकामुळे सर्वसामान्य मराठी वाचकाचं नुकसानच झालं. मी आणि माझा शत्रुपक्षमध्ये नायकाच्या खांद्यावर पडलेल्या शिमिटाच्या गिलाव्याच्या लपक्याला नवचित्रकलाअसं संबोधणाऱ्या पुलंचा आदर्श मानून आजही अनेक जण ते ॲबस्ट्रॅक्ट वगैरे आपल्याला नाही बा कळतअसं आनंदानं आणि अभिमानानं सांगतात. हे स्वतःलाच एका विशिष्ट प्रकारच्या अभिरुचीच्या कुंपणात बंदिस्त करून घेणंच होतं. पुलंच्या राक्षसी लोकप्रियतेनं त्याला प्रतिष्ठाही बहाल केली. पुलंपेक्षा निराळ्या जातकुळीचा, धारदार आणि वाचकाकडे डोकं चालवण्याची मागणी करणारा विनोद इथे कधी रुजला नाही. स्मरणरंजनात्मक उमाळे काढणार्‍यांची आणि पुलंच्या शैलीच्या बर्‍यावाईट नकला करणार्‍यांची संख्या तेवढी फोफावून बसली. 'पुलं म्हंजे काय, प्रश्नच नाही!' किंवा 'आम्हांला तुमच्यासारखे नाही ते प्रश्न पडत नाहीत. आमच्या देवानं लिहून ठेवलंय, ते आम्ही वाचतो, सुखानं झोपतो.' किंवा 'पुलंना प्रश्न विचारता? तुमची काय लिहायची लायकी आहे हो?' असे प्रश्न विचारत आणि वर्षांमागून वर्षं त्याच त्या पिढीजाद विनोदांवर इमाने-इतबारे हसत लोक महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची कौतुकं करत राहिले.

पुल असताना हे होणं एक वेळ समजण्यासारखं आहे. पण आता पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलेलं असताना पुलंचीच वाक्यं सटासट फेकणार्‍या त्या मुलाला 'तू ही जुनी-अपुरी पासोडी घेऊन किती काळ बसणार आहेस बाबा!', असा प्रश्न मी विचारायला हवा होता का? की काळच ते काम करेल?

पूर्वप्रकाशन : मुक्त शब्द, दिवाळी २०१८

संदर्भ आणि टिपा:
१. मूळ चर्चेचा दुवा. इथल्या अनेक मतांचा हा लेख लिहिताना अतिशय उपयोग झाला आहे.
२. मूळ प्रकाशित लेखात इथे काही बारीक दुरुस्त्या केल्या आहेत.
३. वुडहाउसबद्दलच्या लेखाचा दुवा. 

Thursday, 15 November 2018

समस्यापूर्ती

पाळी येण्यापूर्वीच्या आठवड्यात कितींदा
संतप्त अनावर रडून लिहिल्या आहेत कविता
कुणीतरी हिशेब केला पाहिजे कधीतरी एकदा
कितीतरी भ्रम मग खळखळा फुटतील
प्रेमाचे-वात्सल्याचे-मैत्र्यांचे नि मत्सरांचे
फक्त रक्तामधल्या रसायनांचे प्रवाह उरतील
मोकळेपणानं भिडता येईल शरीराच्या मनाला
शरीराला शरीराची ऋतुसापेक्ष ओढ लागेल
बेघर पारवे असे बेधडक सामोरे जातील सूर्याला.
***

शेवटच्या दोन ओळी मेघना पेठे यांच्या 'छाया... माया... काया...' या कथेतल्या आहेत.
... शरीराला शरीराची ऋतुसापेक्ष ओढ लागते
आणि बेघर पारवे असे बेधडक सूर्याला सामोरे जातात...
त्या कथेतल्या एका पात्रानं लिहिलेल्या कवितेच्या या ओळी. ती कविता कथेत अपुरीच. पुष्कळ वर्षं त्या ओळी डोक्यात घोळत होत्या. समस्यापूर्तीसाठी श्लोक रचत लोक पूर्वी, तसा त्या ओळी उसन्या घेऊन केलेला हा प्रयोग. मूळ ओळींचं श्रेय अर्थात मेघना पेठे यांचं. 




Wednesday, 24 October 2018

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट


अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट
आनंद विंगकर, लोकवाङ्मय गृह प्रकाशन
या गोष्टीची कोरड्या सुरात समीक्षकी चीरफाड करायला मला लगेच जमणार नाही. घुटक्याघुटक्यात, कोरडेपणी, एका हातानं व्हॉट्सअ‍ॅप वा फेसबुक चाळत करण्याच्या, चैनीच्या वाचनाला विटून तिला हात घातला होता. तिनं पुरेपूर दान पदरात घातलं. कादंबरी पुरी होईस्तोवर ती मला बाजूला ठेवता आली नाही. रडं आवरता आलं नाही. हसू फुटायचं राहिलं नाही. रात्रभर रडून, पहाट होताना शिणून, शांत होऊन आभाळ बघावं, तसा - एकाच वेळी जड आणि हलकं, पारोसं आणि तरी डोक्यावरून आंघोळ केल्यासारखं लख्ख वाटायला लावणारा - भाव गोष्ट संपताना मला व्यापून राहिला. अशा प्रकारच्या उत्स्फूर्त भावनिक प्रतिसादाला शरमण्याची एक सर्वमान्य प्रथा आहे. पण ती बाजूला सारून मला हे बोलायचं आहे. या गोष्टीतल्या जिवंत माणसांनी, प्राण्यापक्ष्यांनी, झाडांनी आणि मातीनं मला त्यांच्याशी बांधून घेतलं, जिवाजवळचं काही उलगडून दाखवलं. माझा परकेपणा, उपरेपणा, खडूसपणा, कडवटपणा…. थोडा का होईना, विझवून टाकला. ही एक फार तालेवार आणि जिवंत गोष्ट आहे, इतकं तरी मी तत्काळ म्हणणं लागतेच.
**
यापूर्वीच्या पुस्तकाबद्दलच्या चर्चेमध्ये मी असं म्हटलं होतं, की मला ग्रामीण साहित्य वाचायचा कंटाळा येतो. खरंच येतो. त्याचा एक ठरून गेलेला साचा आहे. मान्सूनवर अवलंबून असलेली शेती. सरकारी यंत्रणांची मदत संपूर्णतः गायब. जातिव्यवस्थेसारखे, पुरुषप्रधान समाजाला पुजलेले शतकानुशतकांपासूनचे प्रश्न. त्याला जागतिकीकरणानं दिलेला एक अधिकचा वेढा. भ्रष्टाचार आणि मानवी हलकटपणाच्या नाना परी. या सगळ्यातून पिचत गेलेली एखादी व्यक्ती, एखादं कुटुंब, एखादं गाव. याच गोष्टीच्या नाना आवृत्त्या वाचनात आल्या आणि वैतागायला झालं. अफगाणी बायकांची दुःखंही खरीच असतात. पण अफगाणी बायका, इराणी निरागस मुलं, हलाखीतलं बालपण सांगणारी शोषितांची आत्मवृत्तं यांच्या साचेबद्धपणाचा वीट येतोच. तशातलंच माझं वैतागणं. पण या पुस्तकानं साचा मोडला.
फक्त कर्जबाजारी शेतकरी जोडप्यानं केलेली आत्महत्या आणि एक काळाकुट्ट दुष्ट सावकार, इतकंच नाही गोष्टीत. सरंजामी व्यवस्था अंगात भिनलेली आणि तरी माणूसपणा शाबूत असलेली माणसं आहेत. स्थलांतरित, परभाषक माणसं आहेत. आता बौद्ध झालेली महार माणसं आहेत. अपंग माणसं आहेत आणि धडकी माणसं आहेत. शहरी माणसं आहेत. सगळीच स्खलनशील आहेत. माणसात-प्राण्यात-मातीत जीव गुंतवण्याइतकी जिवंत आहेत. काही भाग काळा-करडा असेल त्यांच्यातला. तरी काही हिरवाही आहे. प्राणी आणि पक्षी आहेत. शरीर आणि शरीराच्या मागण्या असलेले. त्यापल्याडची अनाम, मुकी जाण असलेले. आणि त्यापलीकडचा निसर्ग आहे. आपसांत बांधलं जातं त्यांच्यात काही. काही तुटतं. जगण्याच्या प्रवाहात सामावून जात पुन्हा ईर्ष्येनं वाहतं होऊ पाहतं. होतंही.
निवेदक एकाच एका सुरात, एकाच एका भाषेत बोलत नाही. कधी वर्तमानपत्रातली बातमी देतो. कधी पुस्तकी प्रमाण भाषेत बोलत त्रयस्थ निरीक्षणं नोंदतो. कधी पात्रांच्या मनात शिरून क्लोजप्स टिपत राहतो. निवेदनाच्या ओघात अप्रमाण, स्थानिक शब्द वापरतो आणि चित्रदर्शी संदर्भ पुरवून त्यांचे अर्थही डोक्यात रुजवून टाकतो. कधी तो कसलाही आव न आणता गोष्ट सांगतो सरळ. कधी गोष्टीतून बाहेर येतो आणि चौथ्या भिंतीवर उभा ठाकून आपल्याशी गोष्टीच्या शेवटाबद्दल चर्चा करतो. चार भिंतींच्या स्टुडिओत चालणारं क्लोजपीय शूटिंग थांबवून कॅमेर्‍यानं आपलं कॅमेरापण ओळखून बाहेर झेपावावं आणि लाँग शॉट्स टिपावेत, तसे लाँगशॉट्स टिपतो कधी. गावकीचे. भावकीचे. त्यांना आतूनबाहेरून वेढून घेत घोळसणार्‍या निसर्ग नामक व्यवस्थेचे. कधी सदसद्विवेकी आवाज होऊन, काय होऊन हवं आहे त्याला गोष्टीत, ते सांगतो. ते न होण्याची अपरिहार्यता कळल्यावर हताश होतो. तरीही आपल्या पात्रांमधला चिवट जिवटपणा हेरतो, वापरतो, कामाला लावतो, गोष्ट घडवतो आणि तरीही गोष्टीला ताशीव-घडीवपण येऊ न देता वाहतेपण राखतो.
गोष्टीत पारंपरिक संकेत आहेत अनेक. अनिष्टाची चाहूल लागते काही घटनांतून . पिंडाला कावळे शिवतात वा शिवत नाहीत. कुत्री भेसूर रडतात गळे काढून. अवकाळी पाऊस येतो. पुरुषाचं आणि स्त्रीचं मीलन होतं वा अभद्रपणे अर्ध्यावर विझून जातं. एखाद्या काळरात्री अगम्य-अनाकलनीय शहाणपण ल्यालेले अद्भुताच्या सीमीवरचे अतिवृद्ध येऊन डोक्यावर हात फिरवून जातात. बदल घडवू पाहणारे काही उत्प्रेरक घटक असतात. प्रियकर आणि प्रेयसीची कहाणी सुफळ-संपूर्ण होणार की अधुरी राहणार अशी हुरहुर दाटते. या सगळ्या बाबी कमालीच्या प्रेडिक्टेबल असूनही – एक फार उत्कंठावर्धक, जिवंत आणि शहाणी गोष्ट घडवतात.
हे फार विलक्षण आहे.
**
शेत किंवा पीक या गोष्टींशी वृत्तपत्राखेरीज कधीही काहीही संबंध न आलेली मी एक सुखवस्तू शहरी व्यक्ती. ‘मला ग्रामीण साहित्य नाही बॉ आवडत’ असं नाक मुरडून म्हणण्याची सवलत मला आयुष्यानं दिली आहे. आजच्या भयावह विस्तारलेल्या आणि धावपळीला बांधलेल्या माझ्या जगात, माझ्या ताटात येणार्‍या अन्नाचे स्रोत असलेल्या या माणसांशी मला जोडून घेणारं दुसरं काय शिल्लक आहे?
कदाचित फक्त गोष्टच आहे.
गोष्टीची ही ताकद अभंग राहो. आपल्याला अशा गोष्टी सांगणारे अनेक आवाज चिरंतन राहोत.

21 Lessons for the 21st Century

21 Lessons for the 21st Century
- Yuval Noah Harari


हे या पुस्तकाचं परीक्षण नाही, परिचयही नाहीच. पुस्तक वाचताना-वाचून डोक्यात आलेल्या गोष्टी एका ठिकाणी नोंदवणं आहे फक्त. मुळात पुस्तकाचा विषयच इतका डेंजर असताना, आपण त्याबद्दल काय बरंवाईट बोलणार, असा एक किंचिद्गंड मला आहेच. पण हरारी म्हणतो आहे ते खरं असेल – आणि नसेल तरीही – हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. एकसिवाव्या शतकातल्या,बदलत्या पर्यावरणाच्या, अणुस्फोटांच्या उंबर्‍यावरच्या आणि अल्गोरिदम्सनी आपलं आयुष्य काबीज करण्याच्या अलीकडच्या काळात आपण नक्की काय करायचंय, हा आपल्या सगळ्यांपुढचाच प्रश्न आहे. काही जणांना असा प्रश्न आहे हे स्वीकारणंच नकोसं वाटत असेल, शक्य आहे. पण म्हणून प्रश्न नाहीसा होत नाही,सगळ्यांसाठी तर नाहीच नाही. त्यामुळे हरारीइतक्या आत्मविश्वासानं आणि अकलेनं जरी नाही, तरी त्याच्या काही शतांश टक्क्यांनी तरी या प्रश्नावर माझाही हक्क आहेच, असं स्वतःला ठणकावून सांगून मी हे ’21 अपेक्षित’ वाचायला घेतलं.

**

अशा प्रकारच्या पुस्तकांबद्दल सहसा अभ्यासकांचं मत काहीसं तुच्छतेचं असतं. अशा प्रकारची पुस्तकं म्हणजे मोठे प्रश्न सोपे करून मांडणारी पुस्तकं. पण याच पुस्तकात एके ठिकाणी लेखक स्वतःच असं म्हणतो, की (माझ्या शब्दांत) ‘विज्ञान करणं महत्त्वाचं आहेच. पण ते सगळ्या माणसांपर्यंत पोचणंही महत्त्वाचं आहे. विज्ञानकथेच्या माध्यमातून? हो, जरूर. का नाही? जबाबदार विज्ञानकथा लिहिणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण विज्ञान आपल्या आयुष्य कधी नव्हे इतकं बदलून टाकणार आहे आणि त्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहीत असायला हवं’. हे इतकं खरं आणि बरोबर आहे, की आपण अभ्यासकांच्या हस्तिदंती तुच्छतेचा मुद्दा निकाली काढू. म्हणजे विदा आणि पुरावे हवेतच. त्यावाचून कुणी काही बोलू नये, हे मान्य आहेच. (या पुस्तकाचा एक पंचमांश भाग संदर्भ देण्यात खर्ची पडतो हे इथे नोंदायला हवं.) पण ते दिल्यावरही सोप्या भाषेत काही लिहिण्याकडे कुणी तुच्छतेनं पाहत असेल, तर धन्यवाद मंडळी, तुमचा गणपती पुढे जाऊ द्या.

**

हरारीबुवा नक्की काय म्हणतात, त्याचा मला समजलेला सारांश.

माणसासमोर तीन मोठी आव्हानं आहेत. अल्गोरिदम्सच्या अचूकपणावर आणि सर्वव्यापी ताकदीवर भिस्त ठेवून आपलं जग चालवायला त्यांच्या हातात दिलं जाईल आणि आयुष्यभर रोज नव्या गोष्टी शिकण्यासाठी मानसिक-शारीरिक दृष्ट्या तयार नसलेली आपण माणसं बहुतांश निरुपयोगी-बिनमहत्त्वाची-बिनकामाची उरू हे पहिलं तंत्रज्ञानविषयक आव्हान. निरनिराळ्या इझमांच्या गोष्टी स्वतःला सांगत एकमेकांशी लढणारे आपण एखादं अणुयुद्ध करू आणि निसर्गाचं सोडा एक वेळ, पण निदान मानवजातीचा तरी अंत घडवून आणू हे दुसरं राजकीय आव्हान. आणि या दोन आव्हानांना सामोरा जायला वेळही मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित करणारं, प्रदूषणातून पर्यावरणातल्या मोठ्या बदलांना आमंत्रण देणारं आणि त्यायोगे अनेक ज्ञाताज्ञात धोक्यांच्या शक्यता पोटी घेऊन असणारं पर्यावरणविषयक आव्हान.

या तिन्ही आव्हानांचं काय करायचं हे आपल्यापैकी कुणालाच धड कळत नाहीय. मुळात आव्हानांचं स्वरूप जागतिक आहे. पण जागतिक दृष्ट्या काहीएक धोरण ठरवू शकेल अशी एकही ताकदवान संस्था आपल्याकडे आज नाही. आपण राष्ट्र नामक तुकडे आहोत. धर्म, पंथ,तत्त्वज्ञानं, वाद उर्फ इझम्स या गोष्टी किती बेगडी आणि अपुर्‍या आहेत, यावर आपलं एकमत होईलही एक वेळ. पण आज जगभर लोक ज्याच्या आसर्‍याला जाताना दिसताहेत तो बेताल राष्ट्रवादही अपुरा आहे आणि उदारमतवाद या ज्या विचारप्रणालीनं आजवर अजिंक्य राहून निरनिराळ्या शाह्या, वाद, धर्म आणि तत्त्वज्ञानांचा पराभव केला, ती उदारमतवादी भांडवलशाहीचा बुरखा ल्यालेली लोकशाहीही अपुरी आहे.

आपला आतला आवाज ओळखा आणि त्याचा कौल घेऊन काय करायचं ते ठरवा, हे मार्गदर्शक सूत्र आजवर कामी येत राहिलं आहे वेळोवेळी. पण ‘आपण’ असं आपण ज्याला संबोधतो, त्या 'आपलं' कौल देणारं मनही स्वतंत्र नाहीच मुळात, असं जर लक्ष्यात आलं, तर काय करणार?

लक्ष्यात घ्या, मन ही एक जैवरासायनिक यंत्रणा आहे. तिच्यावर आपला ताबा नाही. ताबाच काय, आपल्याला अजून तिचं अस्तित्वही धड शोधता आलेलं नाही. या जैवरासायनिक यंत्रणेवर नाना संस्कार घडले आहेत उत्क्रांतिकाळात. निरनिराळ्या आदिम भावना खोलवर रुजल्या आहेत, आत्मसंरक्षणाच्या जय्यत तयारीत राहताना. त्याखेरीज अनेक कृत्रिम संकल्पनांची पुटं चढली आहेत. आपल्याला हव्या आहेतशा वाटणार्‍या अनेक गोष्टी आपल्याला हव्या वाटायला 'हव्यात' – अशा कृत्रिम संस्काराचा राप चढला आहे मनावर.

आता अल्गोरिदम्सच्या सर्वव्यापी आव्हानासमोर उभं ठाकताना कसं ओळखणार आपण आपल्याला काय हवं आहे ते आणि काय आपल्याला हवं आहे असं आपल्याला 'भासवलं' जात आहे ते?

पोस्ट-ट्रूथचा जमानाय हा.

इथे हरारीबुवा एक क्लासिक वळसा देतात. की –

भिऊ नका गडे हो. पोस्ट-ट्रूथचा जमाना नव्हता कधी? तर कायमच होताच. कायमच राज्यकर्त्यांनी खोटेपणाचा सहारा घेतलाच आहे. त्यात नवं काही नाही.

याच्याशी लढायचं की नाही, हा तुमचा प्रश्न आहे. अल्गोरिदम्सच्या हाती सगळं देऊन टाकून तुम्हांला ‘तुम्ही खूशच आहात’ असं त्यांच्याकडून ‘वाटवून’ही घ्यायचं आहे? ओके. तुमचा प्रश्न. नका लढू. पण लढायचं असेलच आपल्या मनावर, इच्छांवर आणि पर्यायानं आपल्या आयुष्यावर ताबा राहावा म्हणून, तर? कसं?

इथे हरारी चक्क विपस्सनेकडे वळतो. आपण स्वतःच्या जाणिवेला ओळखणं किती महत्त्वाचं आहे हे त्यानं इथवर सांगितलेलंच असतं. आता विपस्सनेमधला धर्माचा आणि अध्यात्माचा भाग वगळून, निव्वळ तंत्र म्हणून, त्याकडे कसं बघता येईल नि त्यातून काय साधता येईल, त्याबद्दल तो बोलतो. स्वानुभवाच्या आधारे.

**

Was Vipassana an anti-climax for me? To be honest, yes, for some time. पण ते फार काळ टिकलं नाही. हा माणूस अतिशय प्रामाणिकपणे, अनेक संदर्भ पुरवत, आपल्याकडे आणि आपल्या समूहाकडेही अतिशय नर्मविनोदी परीक्षणात्मक नजरेनं पाहत बोलतो आहे. जगभरातल्या राजकारणाचे, इतिहासाचे, धर्मशास्त्रांचे, पुराणांचे आणि अद्ययावत सामाजिक-आर्थिक-राजकीय-शास्त्रीय मतमतांतरांचे पुरावे नोंदत बोलतो आहे. गोष्टी तपासून पाहण्याचं आवाहन करतो आहे. तपास करायचा झालाच, तर त्यासाठीचं साधन देऊ करतो आहे. हे छान आहे.

वाचनीय तर आहेच, चिंतनीयही आहे. अस्वस्थ आणि आश्वस्त दोन्ही करणारं आहे.

**

अलीकडे वाचनात, बघण्यात आणि ऐकण्यात येत असलेल्या अनेक पुस्तकांचे, विचारांचे आणि गोष्टींचे संदर्भ येऊन या पुस्तकाच्या धारेला लागत होते. The Three Body Problem (Liu Cixin) ही चिनी विज्ञानकथा, मकरंद साठ्यांचं अस्मिताविषयक विवेचन, www.zenhabits.net हा Lio Babauta चा ब्लॉग, Tristan Harrisचं Time Well Spent हे तंत्रज्ञानविषयक म्हणणं, Michael Pollanचं अन्नविषयक विवेचन.... हे सगळंच या पुस्तकाला समांतर असं काही म्हणतं. जिज्ञासूंनी हे जरूर गुगलून पाहावं.

Wednesday, 26 September 2018

पुस्तक एक, पुस्तकं अनेक

कोणतंही पुस्तक वाचताना आपण फक्त तेवढं एकच पुस्तक वाचत नसतो. त्या-त्या जातकुळीची आणि पूर्णतः निराळी, वाचलेली आणि न वाचलेली पुस्तकं आणि लेख आणि स्फुटं आणि चर्चाधागे आठवत राहतात. त्या सगळ्यांनी मिळून आपल्या डोक्यात तयार केलेल्या जाळ्यात हेही पुस्तक जाऊन बसतं. क्वचित काही न वाचलेल्या-न पाहिलेल्या गोष्टींची नावं पुरवतं.  आपलं आकलन आणि आकलनाची असोशीही अधिक दाट, गहिरी करतं.

***

पशुवैद्य विनया जंगलेंचं 'मुक्या वेदना, बोलक्या संवेदना' वाचत होते. प्राण्यांवर उपचार करताना लेखिकेला आलेले अनेक सुरस आणि चमत्कारिक अनुभव त्यात आहेत. लेखिकेचं सुसंस्कृत, जिद्दी आणि प्राण्यांवर अतूट माया करणारं व्यक्तिमत्त्व या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतं. प्राण्यांबद्दलच्या कोणत्याही पुस्तकात असतं, तसं माणसाच्या अंदाधुंद विकासाबद्दलचं आणि त्यासमोर असहायपणे आटत चाललेल्या प्राणिविश्वाबद्दलचं चिंतेचं अस्तर याही पुस्तकाला आहे.


पुस्तक वाचनीय आहेच.

ते वाचताना सर्कशीतले रिंगमास्टर दामू धोत्रे यांनी लिहिलेलं 'वाघसिंह - माझे सखेसोबती' हे अद्भुत आत्मचरित्र आठवत होतं. त्या पुस्तकातला एक प्रसंग शाळेत तिसरीत मराठीच्या पुस्तकात होता. सर्कशीचा खेळ चालू असताना, प्राण्यांच्या पिंजऱ्यात लेखक उभा असताना दिवे गेले आणि अंधार पसरला. लेखकानं प्रसंगावधान राखून 'प्रकाश... प्रकाश' एवढी एकच विनवणी खड्या आवाजात केली. बॅटऱ्या आणि टॉर्च सर्वदूर पसरण्यापूर्वीचे दिवस. मोबाईल नि जनरेटर्स तर दूरच.  क्षणार्धात कुण्या प्रसंगावधानी प्रेक्षकानं खिशातली माचीस काढून काडी शिलगावली. ते पाहून असंख्य विडीकाडीप्रेमी लोकांनी त्याचं अनुकरण केलं. लुकलुकत्या, विझत्या-पेटत्या शेकडो ज्योती. त्या प्रकाशात लेखक शांतपणे पिंजऱ्यातून बाहेर पडला. तो प्रसंग आणि कुण्या चित्रकारानं काढलेलं अंधारात लुकलुकणाऱ्या शेकडो काड्यांचं चित्र मला अजुनी लख्ख आठवतं. असे अनेक प्रसंग असले ते पुस्तक.

त्या मानानं विलास मनोहर यांचं 'नेगल' पुष्कळ लोकप्रिय. मीही त्याची असंख्य पारायणं केली आहेत. पुढे हेमलकसाला जाऊन आमट्यांचा प्रकल्प पाहिला तोही आमट्यांच्या कामानं प्रभावित होऊन नव्हे, तर नेगलच्या प्रेमापोटीच. आदिवासींसाठी काम करत असताना, आदिवासींनी भुकेपोटी शिकार करून मारलेल्या प्राण्यांची पिल्लं सांभाळण्यातून या प्रकल्पाला सुरुवात झाली. अर्थातच ते काम दुय्यम महत्त्वाचं होतं. पण पूर्वायुष्यात चक्क शिकारी असलेल्या लेखकाचं प्राणिप्रेमी व्यक्तीत झालेलं परिवर्तन 'नेगल'मध्ये आहे. त्यातली कितीतरी प्राण्यांची शब्दचित्रं इतकी जिवंत, अस्सल उतरली आहेत, की पुस्तकांमधल्या जिवाभावाच्या पात्रांची यादी करायची झाली, तर मी नेगल-नेगली, राणी अस्वल, पिलू माकड या मंडळींचा एखाद्दा विचार नक्की करीन.

डॉ. पूर्णपात्रे यांचं त्यांच्या लाडक्या सिंहिणीवरचं 'सोनाली' हे पुस्तकही लहानपणी वाचलेलं. पण त्याचा माझ्यावर खास ठसा नाही.

अलीकडे वाचलेलं रमेश देसाईंचं 'वाघ आणि माणूस' हे पुस्तकही रसाळ. वाघ आणि सिंह या प्राण्यांबद्दलची काहीशी विकीपिडीय पण गप्पिष्ट माहिती आणि काही प्राणिप्रेमी मंडळींच्या चटका लावून जाणाऱ्या प्रकल्पांच्या गोष्टी, असं काहीसं हे पुस्तक.

व्यंकटेश माडगूळकरांचं 'सत्तांतर' या सगळ्या माहितीवजा-किस्सेवजा पुस्तकांपेक्षा कितीतरी उंच गेलेलं. साहित्यकृती झालेलं. एका वानरटोळीचं शब्दचित्र इतकं त्याचं वर्णन पुरेसं नव्हे. त्यात एक पूर्ण जीवनचक्र आहे. 'बनगरवाडी'च्या तोडीचं.

'ऐसी अक्षरे' या संस्थळावर गवि या सदस्यानं उघडलेला एक जबरी धागाही कायमचा लक्ष्यात राहीलसा. या गृहस्थाच्या एसीच्या सज्जावर दुर्मीळ जातीच्या गव्हाणी घुबडाईनं अंडी घातली. या इसमानं त्या घुबडांना हुसकावून तर लावलं नाहीच. उलट सेन्सर्स बसवलेला एक कॅमेरा लावून ठेवून पिल्लांच्या वाढीचं अलगद चित्रण केलं. धागा अपडेट करत, चित्रण डकवत, पिल्लांच्या वाढीची बित्तंबातमी वाचकांना पुरवली आणि ही लाडाची घुबडाई घरटं सोडून जाईस्तो कितीतरी वाचकांचा जीव गुंतवून ठेवला.

'साकार' नामक ब्लॉग चालवणाऱ्या अर्निका परांजपेनं हत्तींच्या शुश्रूषा केंद्राला भेट देऊन लिहिलेला अनुभवही मी कदापि विसरू शकत नाही. आपल्याच वयाची मुलगी निव्वळ पुस्तकं वाचण्यापुरतं प्राणिप्रेम न दाखवता अशा एखाद्या प्रकल्पात जाऊम हत्तींशी मैत्री करते आहे, हे वाचणं चकित करणारं होतं माझ्यासाठी.

त्यावरून 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हे कृष्णमेघ कुंटेचं पुस्तक आठवलं. कर्नाटकच्या जंगलात जाऊन राहणाऱ्या एका कलंदर जंगल अभ्यासक मुलाचं हे पुस्तक. पुढे त्याच्या वडलांची नर्मदा परिक्रमेवरची पुस्तकं हाती आली, ती कृष्णमेघच्या अस्सल अनुभवापुढे निव्वळ भरताड वाटली हा माझ्या नास्तिक नजरेचा दोष की त्या अनुभवाच्या जिवंतपणाचा? कुणास ठाऊक.

'देर्सू उझाला' हे जयंत कुलकर्णींनी भाषांतरित केलेलं पुस्तक रूढार्थानं प्राण्यांबद्दलचं नव्हे. पण निसर्गाशी एकरूप पावलेल्या - इतक्या, की शहरातलं वास्तव्य न सोसून जंगलात जाऊन प्राण सोडणाऱ्या - देर्सू या मानवप्राण्याबद्दलचं ते पुस्तक. त्यातली रौद्र निसर्गवर्णनं आणि त्या पार्श्वभूमीवरचा ओबडधोबड, निर्मळ देर्सू.

त्यावरून गो. नी. दांडेकरांचं 'माचीवरला बुधा' आठवणं क्रमप्राप्त होतं. पण आता मी भरकटतेय!

विनया जंगलेंच्या पुस्तकानं संतोष शिंत्रेंच्या 'गुलाबी सिर - दी पिंक हेडेड् डक' या कथेची आठवण करून दिलीच. शिवाय इंग्रजीतल्या अशा कितीतरी पुस्तकांचे संदर्भ आणून वाटेत टाकले. अजून जेन गुडालबद्दल वाचायचं राहिलंच आहे. तसंच उंटांचा सांभाळ करणाऱ्या रायला जमातीसाठी काम करणाऱ्या इल्सेबद्दलही.

पुस्तक एक, पुस्तकं अनेक. 

Saturday, 18 August 2018

ये कधीही

एखादा लहानसा डुगडुगणारा शब्द
हलक्या हातांनी काढून
त्या जागी चपखल बसणारी
चपटीशी ठिकरी घट्ट बसवून देतोस
आणि स्वतःशीच समाधानानं इवलं हसतोस
तेव्हा तुझ्यासाठीही बांधत असतोस एक कोपरा
माझ्या कवितेत.
तसं बेघर होऊ नये कुणीच कधीच.
पण एखाद्या काळ्यानिळ्या, ठसठसत्या संध्याकाळी
आभाळ घेरून आलेलं असताना
रात्री पथारी पसरायपुरती ओसरी
ऊन-ऊन चंद्राचे चौथ-दोन चौथ
केशरी निखाऱ्याचा मूठभर शेक
आहे तुझाही.
मी तुला आसरा देऊ केला
असं म्हणायला नको.
तुझ्याही हक्काचीच आहे कविता.
ये कधीही.

Wednesday, 18 July 2018

टू देनिस विथ लव्ह...

मला अमुक फार आवडते आणि मला तमुक अजिबात आवडत नाही... असारीतसर देनिसच्या टेम्प्लेटात लिहिण्याचा एक लेख बरीच वर्षे माझ्या शॉपिंग कार्टच्या आतबाहेर करतो आहे. चैनच ती. पण मनुष्याने मोहाला नेहमी शरण जावे या कुणाच्याशा मोहक सुविचाराला शरण जाऊन मी तो अखेर लिहिते आहे.

***

लागलेली शाईपेने आणि त्यांची झळझळीत निळी शाई; पिवळसर रंगाच्याजाडसर कागदांच्याबिनओळीच्या आणि लालबुंद पुठ्ठा-बांधणीतल्या अटकर बांध्याच्या वह्यामऊ लुसलुशीत सुताच्या आणि डोळे विस्फारायला लावणारी ठसठशीत वाहती चित्रे असणार्‍या कलमकारी नक्षीच्या साड्या; संध्याकाळचे कलते मऊ ऊन धसमुसळेपणाने सांडणारी आणि झाडांच्या पोपटी शेंड्यांकडे थोड्या शिष्टपणे पण न राहवून डोकावून पाहणारी रुंद काळ्याशार कडाप्प्याची एखादी खिडकी... हे सगळेच मला फार फार आवडते. पण त्यात सांगण्यासारखे मोठे काय आहेसुखासीन माणसाला हे सारे आवडायचेच.

खरे महत्त्वाचे आहेते मला काय आवडत नाही हे बिनविषारी ठामपणाने सांगता येणे. ठामपणा सोपा आहेबिनविषारीपणा मात्र... असो.

तर लग्ना-मुंजीला जाणे मला अजिबात आवडत नाही. तिथे पंगतीत बसून जेवायला मिळणार असेलतर थोडीतरी माफी मिळेल. पण रांगेत उभे राहून स्वतःच्या हाताने स्वतःच वाढून घेण्याचे जेवण असेलतर त्यात दिलनवाजखुशबहार आणि तत्सम नावाच्या भाज्या आणि जेवणाशी सुतराम संबंध नसलेली व तिथे त्या अवस्थेत खायलाही पूर्णतः गैरसोयीची असणारी पाणीपुरीसारखी एखादी अजागळपणे खोचून ठेवलेली डिश असणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असते आणि माझा इलाज चालणार असेलतर अशा ठिकाणी जाणे मला अजिबात आवडत नाही. त्याहून घरातल्या पितळी पातेल्यात उरलेला थोडा भात लाल तिखटाची भुकटी आणि गोडेतेल घालून, हाताने कालवून पातेल्यातूनच खाणे मला मानवेल.

नीट शिस्तीने लावलेलीधुळीचा कणही नसलेलीपुस्तकांचे कणे सैनिकी शिस्तीने नांदवणारी इतरांच्या पुस्तकांची कपाटेही मला आवडत नाहीत. ती पाहून मनात उगीचच्या उगीच अपराधीपणाचे झरे वाहू लागतात आणि सोन्यासारखा रिकामा असलेला येता शनिवार खर्चून पुस्तके आवरावीत की कायअशा प्रकारचा विचार डोके कुरतडू लागतो.

आपण जेवता-जेवता उठूनखरकटा हात लांब ठेवण्याची कसरत करत दुसर्‍या कुणाला वाढणेही मला आवडत नाहीतसेच मी शांतपणाने जेवत असता सत्राशेसाठ वेळा हे देऊते वाढूकसं झालंयखा की आणिक...’ अशी आग्रहाच्या नि अगत्याच्या रकान्यात लपून घुसडलेली कटकटही मला आवडत नाही. मी मला हवे असेल ते आणि तेवढे न लाजताइतरत्र कुठेही उष्टे-खरकटे हात न लावता वाढून घेईन आणि मनापासून जेवीन याची खातरी बाळगावी.

मजकुरात उगीचच्या उगीच दिलेली एकाहून अधिकची उद्गारचिन्हे आणि टिंबे मला आवडत नाहीत. बरेच वय झालेले असूनही जेवताना सगळे ताट सारवल्याप्रमाणे बरबटवून ठेवणार्‍या माणसांच्या ताटासारखाच तो मजकूर भासतो. त्याहून शुद्धलेखनातल्या ठोक ढळढळीत चुका मला मानवतातत्यांत निदान काहीतरी अस्फुट-उमलते-हळवे-हुरहुरते सांगण्याचा आव तरी असत नाही.

नाटका-सिनेमाला आत जाण्यासाठी आपली वाट पाहत कुणीतरी खोळंबले आहे याची यत्किंचितही पर्वा न करता हटकून उशिरा येणारी आणि आल्यावर माझ्या व्याकुळतेला हसत हसतजणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात आत घुसणारी माणसे मला अजिबात आवडत नाहीततशीच एकट्याने सिनेमानाटकाला जाणे हा गुन्हा असून सोबत कुणा मनुष्यप्राण्याला नेलेच पाहिजे अशी समजूत असणारी व त्यापायी आपल्याला सोबत ओढून नेऊ पाहणारी माणसेही मला आवडत नाहीत. त्यांच्याशी मध्यांतरात कराव्या लागणार असलेल्या आडनिड्या आणि अवघडलेल्या संभाषणाचा मला भयंकर धसका आहे. अशा ठिकाणी लहान मुलांना गप्प न करणारी आणि आपल्या मोबाईलवर निर्लज्जपणे मोठ्यांदा संभाषणे ठोकणारी माणसे तर सगळ्यांच्याच तिरस्काराची धनी असतात. पण फोनवर वत्साप वा तत्सम टंकनचाळे करत आपला मोबाईल मागच्या यच्चयावत रांगांच्या डोळ्यांवर प्रोजेक्ट करणारे प्रेक्षक मला सहन होत नाहीत. परिणामी सभागृहात आपलाही मोबाईल एका हाताने झाकून, मान तिरकी करूनहळूचकन मजकूर वाचण्याची सवय मला लागली आहे आणि असे करताना मी ढढ्ढमगोळा दिसत असणार ते सोडा.

असल्या बिनविषारी नावडींची आणि सुखलोलुप आवडींची माळ लावतफाटकेतुटके गाउन नेसून वा गळपट्टी चावत बसण्याच्या सवयीमुळे ताणून आकार बदललेले जीर्णशीर्ण टीशर्ट अडकवून,भिंतीला तंगड्या लावून लोळत गप्पा मारत बसायला मात्र मला फार फार फार आवडते. जी माणसे अगदी शनिवारच्या सोन्यासारख्या सकाळी येऊन माझा वेळ खात बसलीतरी मला जराही वैताग येत नाहीअशा काही मोजक्या माणसांसोबत तर फारच.

फक्त अशी माणसे भयंकर बिझ्झी आणि भावखाऊपणे दुर्मीळ असतातहे मात्र चांगला लालभडक गरमागरम राग येण्याइतके.... असो.

Sunday, 8 July 2018

रस्ते

रस्ते लक्ष्यात राहणे, रस्ते नीट कळणे आणि ते दुसर्‍याला समजावून सांगता येणे या सगळ्या प्रकाराबद्दलच मला एक जबरदस्त भयगंड आहे.

माझ्या स्वतःच्या जन्मापासूनच्या गावात रस्त्यावरून अत्यंत निवांतपणे कुठूनतरी कुठेतरी जात असताना बहुधा माझ्या सहज आत्मविश्वासामुळे चकून एका निरागस बाईने मला तलावपाळीला कसं जायचं ते विचारलं. मी स्वतः तिथून मिनिमम रिक्षाभाड्याइतक्या - खरं तर त्याहूनही कमी, पण रिक्षावाले तितके पैसे घेतातच. त्यामुळे असो. तर - अंतरावर होते. पण मला रस्ता काही केल्या सांगता येईना. बरं, मला ठाऊक नाही, हे सांगण्याची लाज वाटली. वास्तविक त्या बाईला काय माझ्या तोंडाकडे बघून माझं जन्मस्थळ कळण्याची आणि ती त्यावरून मला फिदिफिदि हसण्याची शक्यता नव्हती. पण गंड हा गंड असतो. त्यामुळे मी घाईघाईनं माझा जन्माचा साथी असलेला मोबाईल काढून एकदम त्यात कुणीतरी पेटलेलं असल्यासारख्या हालचाली केल्या आणि 'सॉरी हं, जरा घाईत ए' असं पुटपुटून चक्क पळ काढला.

अजुनी रस्त्यावर समोरून कुणी पत्ता हुडकणार्‍या भिरभिर्‍या नजरेचं येताना दिसलं की मला एकदम दचकायला होतं.

असेच मुंबईहून पुण्याला जाताना - किंवा खरंतर कुठूनही कुठेही बाय रोड जाताना. पण पुण्याचं नाव घेतलं की अ‍ॅडेड अ‍ॅडव्हांटेज मिळतो. शिव्यांना एक प्रकारचं मुळातून बळ मिळतं. त्यामुळे पुणं. तर ते असो. तर - मुंबईहून पुण्याला जाताना पलीकडून फोन करून 'तू आत्ता कुठे पोचल्येस' हे विचारणारे लोक आणि त्याहून म्हणजे, या आचरट प्रश्नाला छातीठोक आणि अचूक उत्तर देणारे लोक. हे लोक निव्वळ थोर असतात. एकतर वाहन हलायला लागलं, खिडकीतून वाराबिरा लागायला लागला, कानात गाणी खुपसली... की मला लग्गेच पेंग यायला लागते. एरवी दोन-दोन तास बिछान्यात आराधना करावे लागणारे कमनिशिबी प्राणी आम्ही, पण चालत्या वाहनात खिडकी मिळाली रे मिळाली, की निद्रादेवी की कोण ती बाई डायरेक्ट मांडीवर येऊन बसते. परिणामी असल्या प्रवासात पनवेल पार होण्यापूर्वीच मी ढगात असते. फोनमुळे जागं होऊन, बाहेर पाहून, आसमंताचा क्षणार्धात अंदाज घेऊन आपले अचूक अक्षांश-रेखांश मला नाही बा कळत. एकदा तर असली पृच्छा करणार्‍या एका मित्राला मी 'वाकडच्या जवळ आल्येशी वाटत्ये' असं मोघम उत्तर देऊन मोकळी झाले. तो बिचारा वेळेचा अंदाज घेऊन आणायला येऊन थांबला असणार. कारण तासाभरात त्याचा हैराणावस्थेत परत फोन. 'कुठे आहेस???' मी आजूबाजूला बघत्ये, तर लोक फूडमॉलला उतरण्याच्या तयारीत.

आमची मैत्री अजून आहे. पण त्याचं श्रेय मित्राच्या सहनशक्तीला आहे, असंच म्हणावं लागेल.

आपल्या गावातले नसलेले लोक आपल्या चारचाकी गाड्या घेऊन आपल्या गावात येतात आणि आपल्याला गाडीत घालून कुठे कुठे जाऊ बघतात, हाही मला असाच भयंकर घाबरवणारा प्रसंग असतो. मला एकटीला माझ्या अकरा नंबरच्या बसनं न चुकता कुठेही जाऊन पोचण्याचा आत्मविश्वास येण्यासाठी मला त्या ठिकाणी किमान साडेचार वेळा कुणाच्याही मदतीविना जाण्याचा सराव लागतो. त्यात लोकांना आत्मविश्वासानं रस्ते सांगण्यासाठी लागणारा धीर मिळवा. त्याला चारचाकीसाठीच्या रस्तानियमांनी - वन वे वगैरे भानगडी - गुणा. वर थोडं फुटकळ 'तिथे पार्किंगला जागा मिळते का?' या प्रश्नाच्या उत्तरासाठी लागणारं अवधान. हे सगळं नसेल, तर ते असण्याचं उसनं अवसान. नि मग होणार्‍या चुका निस्तरण्यासाठी लागणारा शिवसैनिकी उसना - त्यामुळे अधिकचा नि केविलवाणा - उर्मटपणा.

काय अवस्था होत असेल माझी? ती भोगण्याहून 'मला गाडी लागते' हे उत्तर तोंडावर फेकून देणं सोपं असतं.

फारच लहानपणापासून लोकल ट्रेन्समध्ये वावरण्याची सवय असल्यामुळे स्टेशनावरून फिरताना मी अगदीच पंढरपुरावरून आत्ताच आल्यासारखे गबाळे भाव चेहर्‍यावर घेऊन फिरत नाही इतकंच. आपला बावळटपणा झाकण्यासाठीचा आत्मविश्वास मला आईबापाकडून मिळाला आहे. पण दादर स्टेशनला सोमवारी सकाळी दहा वाजता मला जर कुणी गाठलं, नि कबूतरखाना कुठे असं विचारलं, तर मी मोबाईल-पेटलेलं काहीतरी-हालचाली करण्याचीच शक्यता जास्त आहे. बाकी दादर स्टेशन हा खरा म्हणजे एका संपूर्ण नव्या लेखाचाच विषय आहे. त्यामुळे आपण घाईघाईनं तो बदलू. पण मुद्दा असा आहे, की स्टेशनात नुकत्याच आलेल्या रिकाम्या चालत्या ट्रेनमध्ये उडी मारून घुसणं आणि खिडकीची जागा धरणं मला जमेल. फक्त ती खिडकी बरोबर उलट्या दिशेची निघणार नाही, याची मात्र खातरी नाही, इतकं माझं दिशाज्ञान थोर आहे. व्हीटीच्या दिशेनं तोंड करून उभं राहिल्यावर उजव्या हाताचे प्लॅटफॉर्म्स हे बहुधा क्रमांक एकचे असतात हे घोकून आणि मग शक्यतोवर मूकाभिनय न करता वेळच्या वेळी आठवून वापरण्यातच माझं बहुतांश दिशाज्ञान खर्ची पडलेलं आहे.

त्याहून रिक्षानं फिरण्याचा पर्याय मला मानवतो.

एकतर रिक्षात बसल्यावर आपल्याला रस्ते कळले काय, न कळले काय, परिस्थितीत काही फरक पडण्याचा संभाव असत नाही. रिक्षावाला हाच सर्वज्ञ आणि सर्वाधिकारी असतो. काही लोक रिक्षा 'कुठून कुठे कशी घ्या' हे रिक्षावाल्याला सांगतात, त्याचा अहंकार दुखावला गेल्यावर त्याच्याशी एक परिसंवादवजा भांडण रंगवतात आणि पत्त्यापाशी पोचताना अचूक समेवर भांडण गुंडाळून लिलया उतरून जातात. माझा तयांना नमस्कार आहे. मी असलं काहीही करण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण बहुतेकदा मला आपण जिकडे जाणार आहोत, त्या वाटेवर कोणते भाग लागणार आहेत, हेही धड ठाऊक असत नाही. अशा वेळी उगाच रिक्षावाल्याला आव्हान कशाला द्या? निवांत बसून वारा खावा, पाणी प्यावं, रिक्षा थांबली की उतरून जावं. ते आपला विश्वासघात करत नाहीत.

विश्वासघातावरून आठवलं, अजून एक जमात असते. आपल्याला रिक्षावाला लांबच्या रस्त्याने नेऊन दोन-पाच रुपये अधिक उकळणार आहे, हा दृढ विश्वास असलेल्या लोकांची. त्यांना रिक्षात बसल्या बसल्या स्वस्थता म्हणून नसते. ते सतत संशयीपणे बाहेर डोकावून बघत असतात. आता रस्ता ठाऊक असताना तरी हे ठीक आहे. पण नवीन गावात गेल्यावर, रस्त्याची घंटा माहिती नसताना? कशाच्या जोरावर? त्या दोन-पाच रुपयांनी रिक्षावाला मलबार हिलला बंगला का उठवणार असतो? पण नाही. हे सीटच्या कडेवर कसेबसे बूड टेकलेले. नजर बाहेर. मनात संशय.

माझी याच्या बरोब्बर उलट अवस्था असते. अनेकदा तर नवीन गावातला पत्ता समजून घेण्याचे निष्फळ कष्ट सांडण्यापेक्षाही 'रिक्षावाल्याला काय सांगायचं?' एवढा एकच कळीचा प्रश्न विचारून घेतला, तरी आपल्या सर्व समस्या सुटतात, असं माझ्या लक्ष्यात आल्यामुळे रिक्षावाला माझा गुरू आहे, इतकं मी निश्चित केलेलं आहे.

काही लोकांना गावातल्या गावात गाडीतून हिंडताना आपण कुठे आहोत, आत्ता या क्षणी दंगल झाली आणि चालकाला कुणी भोसकला तर आपण आपल्या घरी कसे पोचणार, गाड्याच नसतील तर पायदळ वापरून जवळात जवळ रस्ता कोणता... याची गणितं मनातल्या मनात करण्याची सवय असते. असो बापडी. पण हे लोक आपले सहप्रवासी असायला लागले की पंचाईत येते. माझ्या एका ऑफीस कॅबमधला सहप्रवासी अशांपैकी होता. मी पिकप झाल्या झाल्या अत्यानंदानं हातातली कादंबरी उघडून त्यात गडप होण्यास आतुर असे, तर हा सत्तत मला 'बाहेर बघ. आपण कुठे आहोत, लक्ष्यात येतंय का?' असे आचरट प्रश्न विचारण्यात मग्न. माझा भयंकर चरफडाट होई. 'मला नाही रे बाबा ठाऊक. अमृतसरला नाहीयोत ना आपण? बास मग. पोचीन मी वेळ आली तर धड घरी.' अशी दुरुत्तरं देऊनही काही उपयोग होत नव्हता. शेवटी एकदा चालकाला फितूर करवून घेतला आणि त्याला घुमव घुमव घुमवला. चालकालाही रस्ता ठाऊक नसल्याची बतावणी, माझी नैसर्गिक माठावस्था आणि या इसमाचा उडालेला गोंधळ - यांमुळे त्याचा होता - नव्हता तो आत्मविश्वास गाळात गेला आणि त्यानं कॅब बदलून घेतली.

अलीकडे जीपीएस नावाची मजेशीर गोष्ट आलेली असल्यामुळे असल्या लोकांच्या माथेफिरूपणात भरच पडलेली आहे. 'वेळ पडली तर बघता येईल की नकाशा', असा दिलासा असल्यामुळे मी मात्र माझं दिशाअज्ञान आणि भयगंड झाकण्यासाठीचा उर्मटपणा साग्रसंगीत जपून आहे. माझ्या वाटेला जाऊ नका...  ;-)