Sunday, 11 February 2018

गौरी : धाडसी प्रतिमानाच्या पलीकडे

स्त्रीवादाच्या वाटेवरून जाणार्‍या कोणत्याही आधुनिक, मराठी साहित्यप्रेमी माणसाला गौरी देशपांडे हे नाव टाळून पुढे जाता येत नाही. तो एक अपरिहार्य टप्पा असतो, असंच तिचं लेखनकर्तृत्व आहे. कादंबरी, कथा, भाषांतरं, कविता, ललितलेखन अशा अनेक माध्यमांतून केलेला मुक्तसंचार; रचनेचे अनोखे प्रयोग; विलक्षण मोहक भाषा; आणि लेखणीचा 'धीट'पणा अशा अनेक रास्त कारणांमुळे तर ती गाजलीच. दुसरीकडे तिच्या सुधारकी कुटुंबाचा वारसा; तिचे ढगळ कुडते आणि आखूड केस; बिनधास्त वावर; आणि तिची सर्वसाधारण मराठी बायकांपेक्षा थोडी जास्त असलेली उंची अशा अनेक साहित्यबाह्य कारणांमुळेही मराठी जनांना ती ठाऊक असते. 

माझीही ती अत्यंत आवडती लेखिका. 

पण तिच्या बाबतीत माझी गोचीच होत असे. तिचे चाहते पुष्कळ दिसत. पण त्यांच्या गौरीप्रेमाचे उमाळे आणि कढ आणि कारणं बघून 'ई! मी नाहीय हां तुमच्यात.' असा फणा माझ्याकडून नकळत निघे. 'हस्तिदंती मनोर्‍यातल्या बेडरूमबद्दल तर लिहायची ती! त्याचं किती कौतुक करायचं?’ असा निषेध करणारेही असत. त्यांच्यासमोर माझा 'मोडेन पण वाकणार नाही' असा बाणा. त्यामुळे हे इतकं सोपं, एकरेषीय नव्हतं. मला या लेखिकेबद्दल नक्की काय वाटतं हे तपासून बघायला मध्ये थोडा काळ जाऊ द्यावा लागला. कुणाला तिची ओळख करून द्यायची झाली तर मी काय सांगीन तिच्याबद्दल, या प्रश्नानं मला विचार करायला भाग पाडलं. तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित होऊन तब्बल अडतीस वर्षं उलटून गेल्यानंतर सांप्रतकालातही ती तितकीच महत्त्वाची वाटत राहते ती कशामुळे - हा माझ्या मते कळीचा प्रश्न होता. त्या प्रश्नाच्या काठाकाठानं जात राहिले.

मी तिचं 'एकेक पान गळावया' वाचलं, तेव्हा मी जेमतेम कॉलेजच्या वयात होते. मला घंटा काही कळलं नव्हतं. पण हे जे काही आपण वाचतो आहोत त्यात काहीतरी जबरदस्त वेगळेपण आहे, इतकं मात्र जाणवलं होतं. ते असंच टिकमार्कून बाजूला पडलं. मग 'थांग'मधल्या दिमित्री या नायकाचा थांबा लागला. यच्चयावत मराठी मध्यमवर्गीय नवतरुणांना आणि पुढेही नवतरुणच राहिलेल्या अनेकांना पडते, तशी दिमित्री-कालिंदीच्या प्रेमाची भूल मलाही पडली हे इथे निमूटपणे नमूद केलं पाहिजे. साक्षात कृष्ण फिका पडेल असा तो नायक होता! सगळं काही न बोलताच समजून नेमकं, चतुर नि जागं करणारं बोलणारा; देखणा, तरुण, परदेशी. शिवाय विवाहित आणि विवाहबाह्य संबंधांचा मोह जाणणारा. आणि वर अप्राप्य! त्या दिवसांत माझ्या बरोबरीच्या पण साहित्यिक भानगडींपासून लांब असणार्‍या मैत्रिणी प्रेमात पडल्या, पण मी काही प्रेमाबिमात पडले नाही - यातलं इंगित माझ्या आता लक्ष्यात येतं. दिमित्रीच्या पासंगाला तरी कुणी पुरणार होतं का! ही भूल पुष्कळ टिकली. गौरीच्या भारून टाकणार्‍या, लखलखीत मराठी भाषेतली, इंग्रजी वळणाचा बांधाच तेवढा नेमका उचलून मिरवणारी एकेक पल्लेदार वाक्यं तेवढी आठवत राहिली. त्या दिवसांतल्या माझ्या गौरीप्रेमामुळे आता मलाच थोडं शरमायला होतं. त्यातल्याच 'दुस्तर हा घाट'मधली नमू ज्याला प्रेम समजते, पण प्रत्यक्षात जी 'विषयपिपासा किंवा मदनविव्हलता' असते, तशातलंच ते माझं गौरीप्रेम. अल्पवयीन आणि अल्पकालीन अफेअरसारखं. 

पुलाखालून थोडं पाणी वाहून गेल्यावर काही कारणानं पुन्हा 'एकेक पान गळावया' हाती आलं. तेव्हा मात्र तिच्या नायिका बघून मी चमकले. त्यातल्या तिन्ही कादंबरिकांची नावंही विलक्षण आहेत. 'कारावासातून पत्रे', 'मध्य लटपटीत' आणि 'एकेक पान गळावया'. स्त्रीच्या वाढीचे एकापुढचे एक तीन टप्पेच असावेत अशा, म्हटलं तर स्वतंत्र आणि म्हटलं तर एकसंध चित्राचा भाग असलेल्या गोष्टी. निरनिराळ्या टप्प्यांवर चाकोरीतून सुटवंग होत जाणार्‍या बायांच्या. उत्कट प्रेमातून पाय मोकळा करून घेणारी प्रेयसी, लग्नामधली एकनिष्ठा म्हणजे काय नि तिचा प्रेमाशी काय संबंध असतो हे तपासून पाहणारी पुरम्ध्री, आणि अपत्यप्रेमाची आखीव रेष ओलांडून जाणारी प्रौढा. मग मला वाटणारं दिमित्रीचं अप्रूप हळूहळू ओसरत गेलं. त्याच्यातल्या पालकभाव असलेल्या पुरुषाबद्दल कपाळी पहिली आठी पडली!

नंतर 'दुस्तर हा घाट'मधली नमू दिसली. तीही अत्यंत मोहकपणे बंडखोर आहे. तरी तिला देखणे, परदेशी, आणि कृष्णासारखे कैवारी मित्रही आहेत. नि तीही येऊन अडखळते त्याच त्या पुरातन निष्ठांपाशी! तिच्या नवर्‍याचं तिच्यावर निरतिशय प्रेम आहे. मात्र तो तिच्याशी एकनिष्ठ नाही. त्याला इतर मैत्रिणीही आहेत नि त्यानं हे लपवलेलं नाही. हे स्वीकारायचं की नाकारायचं हा नमूचा झगडा आहे. हे मला गंमतीशीर वाटलं. जर चौकटी मोडायच्याच असतील, तर त्याचे व्यत्यासही असणार आहेत आणि ते आपल्याला दुःखाचे ठरणार असले तरीही भोगावे लागणार आहेत याचं भान आलं. 

मग 'मुक्काम', 'तेरुओ आणि काहिं दूरपर्यंत', 'निरगाठी आणि चंद्रिके गं सारिके गं', 'गोफ' यांचा टप्पा. त्या-त्या वेळी त्या कादंबर्‍या मी हरखून जाऊन वाचल्या. त्यांत तिनं शारीर प्रेमाचे आविष्कार मोकळेपणी रंगवले होते. डोळे विस्फारून ते नजरेसमोर आणले. जसपाल, वनमाळी, अ‍ॅलिस्टर, दिमित्री, शारूख, जसोदा, इयन, वसुमती, दुनिया, दयाळ, भन्ते, बेन... अशा हटकून परप्रांतीय आणि चित्रविचित्र नावांमुळे भिवया उंचावल्या. तिच्या कथानकांमध्ये हमखास दिसणार्‍या परदेशी आणि कैवारी पुरुष-मित्रांना उद्देशून नाक मुरडायला शिकले!  

आणि तरीही या सगळ्याशिवाय त्यातल्या कशानंतरी मला घट्ट बांधून घेतलं होतं. ते काय याचा उलगडा करायला हटून बसल्यावर ध्यानात आलं, त्यात नुसता भाषिक लखलखाट वा वेगळेपणाची चूष वा धीट संभोगचित्रण इतकंच नव्हतं. स्त्रीकडून असलेल्या तिच्या स्वतःच्या आणि समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक अपेक्षा या कथांच्या माध्यमातून गौरीनं सतत निरनिराळ्या प्रकारे धुडकावून, ढकलून, ओलांडून, मोडून, बदलून पाहिल्या होत्या. एकनिष्ठतेबद्दल, प्रेमाबद्दल, मुलाबाळांशी वागण्याच्या नि त्यांना वाढवण्याच्या तरीक्यांबद्दल, मुलाबाळांकडून होणार्‍या निराशांबद्दल, प्रियकरांबद्दल, शारीरिक प्रेमाबद्दल, फसवणुकींबद्दल, सासू-सुनेच्या नात्याबद्दल, नवराबायकोच्या एकसुरी नात्याबद्दल, व्यसनाधीन पतीच्या बायकोबद्दल.... स्त्रीवादाबद्दलही. 

'गोफ' मला या संदर्भात विशेष वाटली. त्यातली वसुमती ही स्वतंत्र बाण्याची तडफदार नायिका आहे. तिची सासू पारंपरिक स्त्री. घुंगटही पाळून राहिलेली. जगण्याच्या-टिकण्याच्या गरजेतून कर्तबगार झालेली, पण परंपरेला कधीही धुडकावून न लावणारी. एका टप्प्यावर त्या दोघीही एकाच नशिबाला सामोर्‍या जातात. व्यसनाधीन नवरा आणि त्याच्या मृत्यूनंतर धीरानं, एकटीनं मुलाला मोठं करण्याचं आव्हान. त्यात कोळपत गेलेलं तारुण्य. या दोघींना समोरासमोर उभं करून त्यांच्या दुर्दैवांमधली आणि लढ्यांमधली साम्यं अधोरेखित करणं... स्त्रीच्या स्वातंत्र्याची - म्हणजे एका परीनं आपल्या स्वतःच्या भूमिकेची - इतकी रोखठोक तपासणी करायला किती जबरदस्त डेअरिंग आणि बांधिलकी लागत असेल! 

तिच्या सगळ्या कथांमधूनही असे प्रयोग दिसत राहतात. सहजीवनापासून ते दत्तक मुलापर्यंत आणि अविवाहितेपासून ते प्रौढ प्रेमिकेपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या एका खास मूर्तिभंजक प्रयोगशील पद्धतीनं चितारून पाहणं. पुढे दिवाळी अंकांमधून तिनं लिहिलेल्या काही छोटेखानी 'लोक'कथाही याच मासल्याच्या आहेत. नवर्‍यानं टाकलेल्या स्त्रीनं हातात पोळपाट-लाटणं घेणं हा ट्रोप वास्तविक किती घासून गुळगुळीत झालेला! पण तिच्या हातात आल्यावर त्या गोष्टीनं वेगळंच रुपडं धारण केलं. त्यातली मूळची सवर्णेतर सून ब्राह्मण नवर्‍याच्या मर्जीखातर महाकर्मठ कटकट्या सासूच्या हाताखाली ब्राह्मणी स्वयंपाकात पारंगत झालेली. पण नवर्‍यानं टाकल्यावर ती त्याच साजूक सुगरणपणाचा वापर करून पैसे कमावू लागते, स्वतःच्या पायावर उभी राहते. सासूला मात्र पोराच्या मर्जीतलं पारतंत्र्य नकोनकोसं होऊन सुनेच्या हातच्या 'सूंसूं करायला लावणार्‍या लालभडक्क कालवणाची' आठवण येत राहते. पारंपरिक कथेला दिलेला हा खास गौरी-टच होता. 

तिच्या श्रीमंत, सुखवस्तू, उच्चमध्यमवर्गीय भावविश्वाबद्दल अनेकांनी तिच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्याला जणू उत्तर दिल्याप्रमाणे तिच्या नंतरच्या कादंबर्‍यांतून तळागाळातल्या, शोषित-वंचित आयुष्यांचे संदर्भ येतात. मला ते कधीही आवडले नाहीत. उपरे, चिकटवलेले वाटले. स्त्रीविषयक सामाजिक धारणांना आपल्या कथाविश्वातून आव्हान देऊन पाहणं, त्यांची विधायक - प्रयोगशील मोडतोड करणं हेच तिचं अस्सल काम होतं. आणि तिनं ते चोख केलं. ते करताना शरीरसंबंध चितारायला अजिबात न भिणं आणि आपल्या भाषेनं डोळे दिपवून टाकणं हा निव्वळ आनुषंगिक भाग. त्यासाठी तिला महर्षी कर्वे ते इरावती कर्वे व्हाया रधों असा खंदा वारसा होताच. असला धीटपणा तिनं नाही दाखवायचा, तर कुणी! 

काही वर्षांपूर्वीचा लेखक आज-आत्ताही तितकाच महत्त्वाचा ठरतो का, हे तपासून बघण्याची माझी चाचणी काहीशी कडक आहे. 'ती कोणत्या काळात लिहीत होती ते बघा. तेव्हा असलं लिहिणं म्हणजे....' असे उद्गार काढणं मला ग्रेस मार्कं देऊन विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात ढकलल्यागत अपमानास्पद वाटतं. तसलं काहीतरी म्हणून गौरीच्या तथाकथित 'धीट' लेखनाचं कौतुक करायचं असल्यास मी साफ नकार देईन. तसं न म्हणताही गौरी आज मला महत्त्वाची वाटते का? 

तर निःसंशय वाटते. 

ज्या स्त्रीवादाचा तिनं अंगीकार केला, ज्याचा वारसा मिरवला, ज्याचा जन्मभर पुरस्कार केला; त्याचे निरनिराळ्या कोनांतून दिसणारे अनेकानेक पैलू ती सातत्यानं तपासत राहिली. तपासताना हाती येणारे निष्कर्ष आपल्या भूमिकेला आणि प्रतिमेला सोयीचे आहेत की गैरसोयीचे आहेत याचा हिशेबी विचार न करता, स्त्रीवाद या शब्दासह येणारे अनेक क्लिशेड साचे बिनदिक्कत झुगारून देत, वेळी हस्तिदंती मनोर्‍यातून लिहिण्याचा आरोप पत्करून, मनाला पटेल तेच करून पाहत, बनचुकेपणा कटाक्षाने टाळत अज्ञातातल्या आडवाटांवर न कचरता चालत राहिली. 

हे मला कायच्या काय प्रामाणिक, थोर आणि दुर्मीळ वाटतं. 

(BBC Marathiवर पूर्वप्रकाशित)

Tuesday, 6 February 2018

पुस्तकी टिपणे : ०१

पुस्तके विकत घेऊन वाचण्याला एक अंगचेच मूल्य अलीकडे चिकटवले जाते आहे. मी त्याच्याशी अजिबात म्हणजे अजिबात सहमत नाही. थोडे मऊपणाने बोलायचे, तर तो उधळेपणा आणि थोडे कठोरपणे बोलायचे तर पैसे फेकून साहित्यप्रेम विकत घेण्याचा प्रकार वाटतो.

मी स्वतः खूप पुस्तके विकत घेतली, अजूनही घेते. पण 'स्वतःच्या मालकीच्याच' पुस्तकाने भान हरपायला लावले, असा काही अनुभव नाही. कितीतरी वेळा खूप आवडलेले पुस्तक लायब्रीतून तीन-तीन चार-चार वेळाही आणून वाचल्याची आठवण आहे. त्याची हाताळलेली बांधणी, कुणीकुणी केलेल्या खुणा या गोष्टी तर मनोरम असतातच. पण वाचकापासची मर्यादित जागा आणि पैसे नि पुस्तकांचा अमर्यादित पैस यांचे भान त्यात राखलेले असे. कितीतरी पुस्तके मित्रमैत्रिणींची असत, असतात. त्यांच्याकडे असली काय आणि आपल्याकडे असली काय, एकच की - असे म्हणून आपले स्वतःचे पुस्तक विकत घेणे उद्धटपणाचे आणि परके करणारे वाटून शरमून हात माग घेतल्याचीही मला आठवण आहे. लोकांना पुस्तके उधार देण्याच्या बाबतीतल्या खडूसपणाचे किस्से सांगण्याची एक टूम आपल्याकडे आहे. मीही तिच्या लाटेवर वाहवून माझ्या खडूसपणाला खतपाणी घालून घेतले आहेच, खोटे का बोला. पण माणसे आपलीशी झाली की आपल्याला आवडणाऱ्या पुस्तकांच्या शिफारशी त्यांना करणे, त्यांच्या मागे ती वाचण्यासाठी लकडे लावणे, त्यांची आवडती पुस्तके त्यांचेकडून उसनी आणणे, ती महिनोन् महिने ठेवून घेत वाचणे आणि त्या माणसांच्या आवडीनिवडींचा अंदाज करत बसणे, पुस्तके जोवर उभयपक्षी चिंध्या होत नाहीत वा गायब होत नाहीत तोवर सहनशीलपणा दाखवणे आणि दाखवायला भाग पाडणे, क्वचित कधी पुस्तक गेले तरी माणूस आहे की या दिलाशाने शांत राहणे... अशा अनेक लिळा कालपरत्वे अंगवळणी पडत गेल्या आहेत. विद्यार्थिदशेत तर पुस्तके इतक्या सहजी विकत घेणे शक्यच नसे. तो एक साजरा करण्याचा विशेष प्रसंगच. तेव्हाही पुस्तक आपल्या मालकीचे आहे की कसे, याला फार मूल्य नसून वाचनाच्या आवडीला आणि सवयीला ते होते. तेही मूल्य कितपत ग्राह्य मानावयाचे याबद्दल विचारविनिमय संभवतोच, पण काही हजार वर्षांच्या अनुभवाने फायदेशीर ठरलेली आणि कमालीची रंजक असलेली सवय इतक्या सहजी सोडणेही जडच जाईल.

पण विकतच घ्या? का बुवा? त्यातून बाजारालाच खतपाणी घालावयाचे ना? लेखक-प्रकाशकांनी जगावे कसे, असा गळा कृपया काढू नका. असली चिकटमूल्ये येण्यापूर्वीही लेखक-प्रकाशक-संपादक सगळे सुखनैव जगत होते, पेनेबिने न मोडता-लेखकीय आत्महत्या न करता-बैलबिल म्हणवून न घेता जगत होते, स्वाक्षऱ्या देत होते. त्यांनी लेखन हाच आपल्या उपजीविकेचा प्रथमपर्याय करावा आणि आपण तो पुस्तके विकत घेऊघेऊ चालवावा इतकाच पर्याय आहे काय? अशा कितीशा लेखकांना आपण वाचक म्हणून जगवू शकू अशी आपली समाज म्हणून वाचनभूक नि क्रयशक्ती आहे आणि अशा प्रकारच्या अवलंबित्वातून येणारा वाचकानुनयाचा धोका ओलांडूनही लेखक म्हणून आपले सत्त्व टिकवून ठेवण्याची किती लेखकांची क्षमता आहे? त्याहून महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत असेच घडावे ही काय जबरदस्ती आहे? 

माझा पुस्तके विकत घेण्याला विरोध नसून पुस्तके विकत घेण्याच्या तद्दन भौतिक कृतीला चिकटवलेल्या मूल्याला विरोध आहे हे चाणाक्ष वाचकांच्या तरी ध्यानात आले असेलच अशी आशा मनी धरून थांबते.

Friday, 5 January 2018

काही नाही

यंदा
सोसासोसानं काही नवं विकत घेणार नाही.
इक्कत, कलमकारी, बाटिक, डबल ढाबू, जयपुरी सूत, ठशाचं सूत, बांधणी... काही नाही.

वाकवलेल्या तारांचे, पांढऱ्या धातूचे, वाळवलेल्या नि भाजलेल्या मातीचे, लाकडी कोरीवकामाचे, रंगीत लाकडांचे, चमकदार दगडांचे, हत्तींचे नि घुबडांचे, हरणांचे नि सशांचे, मांजरांचे नि पाखरांचे...
कसले म्हणून नवे कानातले नाही.

नव्या नव्या च्यानेलांच्या मेंबरशिपा घेणार नाही.
जिमच्या पायी पैसे वाहणार नाही.

नवीन पुस्तकांचे ढीग उशापायथ्याशी लावणार नाही.
काही म्हंजे काही नवं शिकायची आस धरणार नाही.
नवनवीन प्रवासांची हावरी स्वप्नं रंगवणार नाही.
हावरेपणानं नव्यानव्या माणसांच्या गोतावळ्यात शिरणार नाही.

आहे तोच
कपडालत्ता, डागदागिना, पुस्तकंमासिकं, भरलेल्या हार्डडिस्का भोगणार आहे मनःपूत.
आहेत त्याच घरांच्या खिडक्याबाल्कन्या न्याहाळणार आहे उन्हापावसात.
जुन्याच सवयीच्या रस्त्यांवरून नि जन्मापासूनच्या शहरांतून हिंडणार आहे पाय दुखेस्तो.

जिवाजवळची माणसं अजून जवळ ओढून घेणार आहे जमतील तितकी.
जुनी जुनी होत जाणार आहे विटक्या, मऊ कुडत्यासारखी होता होईतो.

Saturday, 23 December 2017

नकोच

काय हवं?

नावगाव?
घरदार?
मूलबाळ?
शेजसंग?
डागदागिना?
प्यारमोहोबत?
कस्मेवादे?
नको.
नकोच.

एखादा शहाणा शब्द.
थट्टामस्करी मूठभर.
वादवादंग पसाभर.
असण्याची आस.
सोबतीनं वाढणं.
शिळोप्याच्या गप्पा.
ठेचांची कबुली कधी.
धीर मागणं हक्कानं.
देणं सठीसामाशी.
मागता,
- न मागताही.

पुरे झालं.
भरून पावलं.
पाणी पाण्याला मिळालं.

मिळालं?

Monday, 11 December 2017

स्त्रीवाद वगैरे...

वादात पडणं तसं फार शहाणपणाचं नव्हे. पण कधीकधी आजूबाजूला उठलेला मतामतांचा गल्बला इतका तीव्र असतो आणि तरीही आपल्याला जे म्हणायचं आहे, नेमकं तेच सोडून, इतक्या भलभलत्या गोष्टींवर लोक भलभलतं व्यक्त होत असतात, की आपण तोंड उघडणं ही आपली निकड होऊन बसते. पण संदिग्धपणे हवेत तीर मारून मग ते योग्य ठिकाणी जावेत म्हणून प्रार्थना करत बसणं फारच वेळखाऊ नि बचावात्मकही वाटतं. त्यामुळे थेटच मुद्द्यावर येते. सचिन कुंडलकर यांनी त्यांच्या स्तंभलेखनातून स्त्रीवादाबद्दल व्यक्त केलेली मतं, त्याला सुनील सुकथनकरांनी दिलेलं उत्तर आणि या सगळ्यावर उडालेला धुरळा यांमुळे हात शिवशिवताहेत.

गेली अनेक वर्षं मीही स्त्रीवादाबद्दल संमिश्र भावना मनात वागवल्या आहेत.

मी अशा वर्गात वाढले आणि अजूनही वावरते, जिथे मूलभूत संघर्ष करण्याची वेळ फारशी येत नाही. माझ्यावर बाई म्हणून कोणतेही थेट अन्याय झाले नाहीत. मला माझ्या कुटुंबात वा समाजात कोणतीही थेट बंड करावी लागलेली नाहीत. स्वातंत्र्य या गोष्टीसाठी मला कधीही झगडावं लागलेलं नाही. मला अनेकच गोष्टी आयत्या आणि सहज मिळाल्या. मला शिक्षणासाठी झगडावं लागलेलं नाही. माझ्यावर लग्नाची वा इतर जबरदस्ती झालेली नाही. रस्त्यातून जाताना कुणीसं गलिच्छ नजरेनं पाहण्याचा वा हात लावण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे माझ्यावर लैंगिक अत्याचार झालेला नाही.

या पार्श्वभूमीमुळे वरवर पाहता स्त्रीच्या दडपणुकीबद्दल मी काही बोलणं खरंतर फारसं सुसंगत असणार नाही.

पण वरवर दिसतं आहे, तितकं हे सहजसोपं नाही. मी आणि माझ्यासारख्या अनेक जणी या परिस्थितीपर्यंत येऊन पोचल्या आहेत, त्यामागे कुणीतरी कधीतरी केलेलं बंड आहे. शिक्षण, मतदान, मनासारखा वेश, आपल्या जीवनाबद्दलचे-शरीराबद्दलचे मूलभूत अधिकार... या --ळ्या गोष्टींसाठी कुणी ना कुणी, कधी ना कधी केलेलं बंड आहे. आज ज्याला लोक आक्रस्ताळेपणा म्हणतात, तशा आक्रस्ताळेपणानं आणि कोण काय म्हणेल याची बूज राखता त्याचा उघडपणे केलेला उच्चार आहे. त्याचे तत्कालीन समाजात जे पडसाद उमटले, ते त्या माणसांनी सोसले आहेत वा परतवले आहेत वा त्यातून मार्ग काढत त्यातून एक नवी पायरी गाठली आहे. मला असाही प्रश्न पडलाच एका टप्प्यावर, की मी हे सगळं रोज का स्मरायचं? 'गायमाउली क्षीरमाउली देते, तिला वंदन करून क्षीरमाउलीचं प्राशन करू या'छाप कृतज्ञतेची टिंगल उडवण्यात मीही अहमहमिकेनं सहभागी झाले आहे. मग या कृतज्ञतेचं महत्त्व काय?

तर - एक म्हणजे मी आणि माझ्यासारखे काही जण-जणी इथवर येऊन पोचले, म्हणजे सगळा समाज इथे येऊन पोचला असा त्याचा अर्थ होत नाही. दोन प्रकारे आपण अजूनही मागे आहोत. एक तर सवर्णेतर आणिकिंवा ग्रामीण आणि / किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय ते अतिगरीब समाजांमध्ये माझ्याइतकी सोयीस्कर आणि सुखवस्तू जागा बाईला आजही लाभत नाही. तिथले लढे अजूनही पुष्कळ प्राथमिक पातळीवरचे, धारदार, मानेवर सुरी ठेवणारे आहेत. गरीब ग्रामीण दलित मुलीला आणि गरीब ग्रामीण दलित मुलाला शिक्षण घ्यायचं असेल, तर ते कुणाला कमी कष्टांत मिळेल हे अजूनही स्वयंस्पष्टच आहे. दुसरं म्हणजे - जरी माझ्यासारख्या लोकांनी भौतिक पातळीवर समानतेची एक दृश्य पातळी गाठलेली असली, तरीही हे चित्र वरवरचं आहे. सांस्कृतिक संदर्भ तपासले असता; थोडं खोलात जाऊन, थोडं कडेला जाऊन तपासलं असता; ढोबळ उदाहरणं घेता जरा आडबाजूचे आणि 'ट्रिकी' प्रश्न तपासले असता - माझ्याही सामाजिक स्तरात संपूर्ण समता आल्याचं दिसत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आधुनिकता आल्यावर मी सहजी सिगारेट ओढू शकते. सहजी अर्ध्या चड्डीत फिरू शकते. पण लग्न करता मला एक मूल दत्तक घ्यायचं झालं, तर मला हे सहजासहजी करता येतं का? कागदोपत्री मला मार्ग सहजसाध्य असला, तरी कायदा चालवणारी वा वापरणारी जी हाडामांसाची माणसं असतात, ती मला पदोपदी अडथळे आणतात. त्याहून कमी धीट आणि साधं उदाहरण द्यायचं झालं, तर पुरणपोळी करता येणं हे बाई म्हणून माझ्यावर असलेलं सांस्कृतिक दडपण आहे असं मी म्हटलं, तर मला भलेभले लोक अजूनही तर्कहीन पद्धतीनं, आपल्या विचारातल्या विसंगतीचा विचारही करता फांदाडतात. मी व्यक्ती म्हणून जरी एकविसाव्या शतकात वावरत असले, तरीही माझ्यासोबतचे अनेक लोक - पर्यायानं माझं अंशतः भवताल मधून मधून अठराव्या वा एकोणिसाव्या शतकात पाय ठेवून असतं आणि याची निराळी दडपणं असतात. सूक्ष्म असतात. प्राणघातक नसतात. पण --ता-. त्यांचा बाऊ मी किती करायचा, हा व्यक्ती म्हणून माझ्या शहाणपणाचा भाग आहे आणि तो व्यक्तीपरत्वे अर्थातच बदलेल. पण परिस्थिती संपूर्णतः समतेची आहे काय? तर ती असावी की नसावी, असणं स्वप्नवत आहे की वास्तववादी हे प्रश्न बाजूला ठेवून आपण इतकं मान्य करू; की स्त्रीपुरुषसमता अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत निरनिराळ्या पेचप्रसंगी मला ऐतिहासिक परिस्थितीशी आणि तत्कालीन निर्णयांशी तुलना करून पाहणं क्रमप्राप्त असतं. ती करण्याचे रस्ते मला कृतज्ञतेतून - किंवा कमी भावुक-कमी भाविक शब्द वापरायचा झाला, तर इतिहासाच्या स्मरणातून - मिळतात. त्यामुळे मला ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले, आगरकर, कर्वे इत्यादी लोकांचं स्मरण पुसलं जाणं महत्त्वाचं वाटतं.

आता सगळे जण काही माझ्याइतके शहाणे नि प्रांजळ नसणार. (होय, हसलात तरी चालेल. हा एक सेमी-विनोद होता!) त्यामुळे काही जण या भेदांचा बाऊ करणारे असणार. काही जण या भेदांचं भांडवल करणारे असणार. काही जण त्यातून मिळणार्या सहानुभूतीचा गैरफायदा घेणारे असणार. काही जण ठामपणाला वळसा घालून नुसताच आक्रस्ताळेपणा करणारे असणार. काही जण विचाराचा गाभा समजून घेता निव्वळ शब्दावर बोट ठेवून वाद घालणारे असणार... हे सगळं असणारच. पण मुद्दा असा आहे, की हे फक्त स्त्रीवादी चळवळीतच नव्हे, तर जगातल्या प्रत्येक बदलाच्या चळवळीच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर असणारच! आरक्षणाचा गैरफायदा घेणारे लोक असणार. हुंडाविरोधी कायद्याचा गैरफायदा घेऊन पुरुषांना लुबाडणारे लोक असणार. मानवी स्वभावाचा तो विशेषच आहे. पण त्याचं प्रमाण असं कितीसं आहे? किती सीमित भागात आणि समाजांत आहे? त्यापलीकडे काय दिसतं? खरवडलं असता काय दिसतं? या प्रश्नांचा विचार करता  त्यावर बोट ठेवून आपण नक्की काय सिद्ध आणि साध्य करू पाहतो आहोत?

अर्थातच - प्रश्न विचारण्याला ना नाहीच. तो कोणत्याही माणसाचा अधिकारच आहे. मीही प्रश्न विचारतेच, की लग्न आणि मूल ही जोखडं आहेत, ही भाषा स्त्रीवादानं आता का सोडू नये? पुनरुत्पादन करू पाहणारा एक सजीव म्हणून या गोष्टी मला कराव्याश्या वाटतात, हे स्त्रीवाद्यांनी मान्य करायला काय हरकत आहे? पुरुष या प्राण्याला निव्वळ खलनायक ठरवून आपण निव्वळ भूमिकांमध्ये अदलाबदल करण्यापेक्षा सहजीवनाचा विचार करणारे, वा निदान प्रणयाराधनाबाहेर तरी लिंगनिरपेक्ष होऊ पाहणारे, जीव होण्याकडे आपली वाटचाल असायला नको का? पुरुषाची प्रणयप्रेरणा ही जोवर व्यक्ती म्हणून असलेल्या माझ्या भौतिक वर्तुळावर आक्रमण करत नाही, तोवर मी त्या प्रेरणेला शोषण का म्हणावं? पुरुषाला शारीर इच्छा आहेत आणि त्यानं त्या व्यक्त करणं म्हणजे थेट माझ्यावर बलात्कारच करणं आहे, अशी बोंब ठोकणं मी बंद का करू नये? स्वावलंबन आणि अर्थार्जन हे मी सबलीकरण म्हणून का वापरू नयेत? गेल्या आणि गेल्याच्या गेल्या पिढीत बायांनी केलेला त्याग वा त्यांच्यावर झालेला अन्याय गहाण टाकून मी कुठवर माझं तथाकथित सबलीकरण साधणार आहे? बाजार बाई म्हणून माझ्यावर अन्याय करत असेल, तर माझ्या मित्रावरही तो निराळ्या प्रकारे करतोच आहे हे मी कधी ओळखणार आहे?

हे सगळे प्रश्न मीही विचारतेच आहे. आणि ते कोणत्याही 'वादी' लोकांनी स्वतःला आणि आपापल्या वादाला विचारावेतच. तिथे देव्हारे माजवता उपयोग नाही.


पण कृपा करून काही नमुनेदार लोकांची टर उडवण्याचं निमित्त करून पूर्ण चळवळीलाच मोडीत काढू नये. थोडी जबाबदारी बाळगून लिहावं. सरसकटीकरणाच्या मोहातून अर्कचित्र काढत सुटणं हे लेखक म्हणून किती सवंग आणि आत्मघातकी आहे, हे तर झालंच. पण माणूस म्हणून हे आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेणारं आहे, याबद्दल तरी शंका नसावी

Saturday, 21 October 2017

कुठून?

कुठून सरसरत उगवून येतो माझ्यात
एखाद्यावरचा असा काळ्या कभिन्न कातळासारखा ठाम विश्वास,
एखाद्याच्यात डोकावून पाहण्याची नवथर, तांबूस-कोवळी, लवलवती उत्सुकता,
एखाद्याच्या अंगाला पाठ देत निःशंक रेलण्यातलं अपरंपार निळंशार सुळकेदार धाडस,
काळजीपूर्वक, श्वास रोखून आपण भरत जावेत चित्रात रंग,
नि बघता बघता आपलं बोट सोडून,
स्वतःच्याच लयीत नादावत बेभानपणी रंग अवतरत जावेत कागदावर;
तसे उजळत, पेटत, चमचमत, विझत, मावळत-उगवत, स्थिरावत गेलेले
वाद-संवाद, चर्चा-परिसंवाद, उपदेश-सल्ले, भांडणं-फणकारे आणि मिश्कील मायेचं हसू?
माझी माती सुपीक आहेच.
पण हे बी?
हे तुझंच तर नव्हे?

Thursday, 12 October 2017

फारतर

इच्छांच्या लाटांवर लाटा धडकत राहतात
तिथे खाऱ्या पाण्याचे सपकारे झेलत,
भिजत-थरथरत,
पाय रोवून मी बेमुर्वतखोर उभी राहते
मौनाच्या उंचच उंच काळ्याकभिन्न निर्दय भिंतीसारखे
उभे असते आपल्यातले अवकाश,
त्याच्या पायथ्याशी धापावत
निकराने धडका देत राहते
जळत्या उन्हात, घाम घाम घाम होत,
अंगातली आग भिजल्या कपाळावरून निपटत,
ठिणगी ठिणगी जपत-फुलवत राहते...
पण
लाटा ओसरतात,
उन्हे विझत येतात,
मऊ अंधाराच्या लाटा भिंतींना गिळत जातात...
सगळीभर काळीनिळी भूल पडते
वाऱ्यावरून कुणाच्याश्या मुक्या कण्हण्याची चाहूल लागते -
तेव्हा,
तेव्हा मात्र
एखाद्या तेजतर्रार मांजराला कुशीत घेऊन त्याच्या मानेखाली अलगद खाजवल्यावर,
ते जसे आपल्या अंगात अंग मिसळून देते
तशी अंधाराला पाठ देत मी सैलावत जाते.
अशा वेळी
मला फारतर एखादी कविता लिहिता येते.
बस.

Monday, 25 September 2017

स्वातंत्र्य की सुरक्षितता?

गोंडस आणि वरकरणी तर्कशुद्ध, निष्पक्षपाती वाटणाऱ्या भूमिका पुन्हापुन्हा वाचनात येतात. त्याला असलेली लोकप्रियता दिसते आणि आपलं मत ठासून मांडतच राहणं किती महत्त्वाचं आहे, ते जाणवत राहतं.
आपल्या आजूबाजूचा समाज स्त्रीस्वातंत्र्याच्या बाबतीत संवेदनशील नाही. वैयक्तिक, सामूहिक, सामाजिक आणि अनेकदा संस्थात्मक पातळीवरही हा संवेदनशून्यपणा पुन्हापुन्हा अनुभवाला येतो आहे. सध्या जरा अधिक कर्कशपणे येतो आहे, पण हे आजचंच आहे असं मानण्याचं मात्र कारण नाही.
स्वातंत्र्य हवं की सुरक्षितता हवी हे निर्णय व्यक्तीचे असतात आणि जोवर दुसऱ्या व्यक्तीच्या हक्कांवर अतिक्रमण होत नाही तोवर ते व्यक्तीनं घेण्याला आपण हरकत घेऊ शकत नाही; हा अनेक आधुनिक विचारांचा पायाच आहे. ज्याची फळं तुम्हीआम्ही सगळेच उपभोगतो आहोत. काही जण या स्वातंत्र्याचा गळा स्वतःच्या सोयीसाठी घोटू पाहताहेत. हे फक्त स्त्रियाच अनुभवत नाहीयेत. माहिती अधिकार कार्यकर्ते, काही निर्भीड पत्रकार, विद्यार्थी आंदोलक आणि अशा लढायांच्या वेळी कायमच सर्वप्रथम बळी पडणाऱ्या स्त्रिया - हे सगळेच जण यातली दाहक असुरक्षितता अनुभवताहेत. आज हे लोक जात्यात आहेत, उद्या कोण असेल ठाऊक नाही. अशा वेळी - स्वातंत्र्याहून सुरक्षितताच महत्त्वाची असते, क्रूर श्वापदांच्या जगात तत्त्वनिष्ठ-तर्कशुद्ध मागण्या लावून धरता येत नाहीत, आपण आपल्या भवतालाचं भान बाळगून आपली पावलं जोखली पाहिजेत... अशा प्रकारची मतं मला उघड-उघड प्रतिगामी मतांपेक्षाही जास्त कावेबाज किंवा जास्त मूर्ख यांपैकी एक वाटत राहतात. आणि दोन्हीपैकी कोणत्याही पारड्यात असली, तरीही ती धोकादायकच असतात यात शंका नाही. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा असा संकोच होत असताना तिच्या पाठीशी आपलं बळ ठामपणे उभं करण्याऐवजी असे अत्याचार ही जणू नैसर्गिक परिस्थितिकीच आहे आणि तिला होता होईतो धक्का न लावता आपण मार्गक्रमण करणंच योग्य आहे असं आपण सुचवतो आहोत, हे यांना कळत नसेल काय? त्यांनाच ठाऊक. हे फक्त व्यक्तींच्या बाबतीत नाही, तर संस्थात्मक पातळीवरूनही होतं आहे. विद्यार्थिनींना मुक्त सुरक्षित अवकाश देण्यासाठी धडपडण्याऐवजी त्यांना वेळांचे निर्बंध घालून चार भिंतींत कोंडू बघणाऱ्या आणि त्याविरुद्ध आवाज उठवल्यावर उलट त्यांचीच मुस्कटदाबी करणाऱ्या शैक्षणिक संस्था, विवाहसंस्था ही जणू एखाद्या शिखरावर तेवत असलेली आणि प्रसंगी काही क्षुद्र व्यक्तींच्या हिताचा बळीही देऊन युगानुयुगे राखायची पवित्र ज्योत असावी अशा आविर्भावात वैवाहिक बलात्काराबद्दल मूग गिळून बसणारी न्यायसंस्था, पुरुषी नजरेच्या अधिक्षेपी नजरेला अटकाव करण्याऐवजी बुरखा वा घूंगट (आणि हो, भोवतालाच्या 'भाना'ची शपथ!) घालून सुरक्षितता संस्थात्मक करू पाहणाऱ्या धर्मसंस्था - हे सगळेच तितकेच दोषी आहेत.
मी अशांच्या मताशी कदापि सहमती व्यक्त करू शकणार नाही. कारण मला माझं निवडीचं स्वातंत्र्य प्यारं आहे. स्वातंत्र्य की सुरक्षितता यांत निवड करण्याचंही.

Thursday, 21 September 2017

पर्याय

माझ्यापाशी पर्याय असत नाहीत.
पहाट विझत येतानाच्या धुवट उजेडात स्वैपाकघराच्या ओट्यापाशी उभी राहून,
मी बाहेरची अर्धवट झोपेतली झाडं न्याहाळत असते अर्धवट जागी होऊन,
लालचुट्टूक बुडाची, निळ्याकबऱ्या मानेची नाचरी पाखरं न्याहाळत,
मला कधी ठाऊकच नसलेली त्यांची नावं बिनदिक्कत भुर्र उडवून लावते,
तेव्हा.
पिटुकल्या निरुपद्रवी भासणाऱ्या वा अक्कडबाज मिशा पिळत धाक दाखवणाऱ्या धिप्पाड शब्दांच्या पोटात शिरत,
धुकं पेलत-वारत-चाखतमाखत,
हिंमत होईल तितकं आत-आत उतरत,
अर्थाच्या तळाशी जाण्याची धडपड करते,
तेव्हा.
ध्यानीमनी नसताना कुणी कमालीच्या धीरानं सत्याच्या डोळ्याला डोळा भिडवतं,
नि ते बघायची थरकाप उडवणारी वेळ येते,
तेव्हाही.
मागे वळून पाहिलं तर भेट होईल आपली, हे ठाऊक असतं मला.
पण तेव्हाही माझ्यापाशी पर्याय असत नाहीत.

Sunday, 3 September 2017

कामं संपली की...

कामं संपली सगळी,
की मी मस्त दहा वाजेपर्यंत झोपणार आहे काही दिवस.
काही म्हणजे काही न करता नुसती लोळत, सिनेमे बघत, पुस्तकं चाळत पडून राहणार आहे दिवसचे दिवस.
मनात आलं, तर उठून आफ्रिकेतही जाईन फिरायला.
पण आखणार नाही काहीसुद्धा.
काही बेत नाहीय... असं म्हणत राहायची चैन करणार आहे मी काही दिवस...
काही दिवस जातील असे.
जातात.
काही न करत.
मग हळूहळू
त्यात सगळं निरुपयोगी, कंटाळवाणं, थंड, रूटीन् वाटायला लागतं.
आपण टाइमशीट भरणारे क्षुद्र कारकुंडे जगाच्या भाराखाली पिचून कणाकणानं रोज मरतो आहोत आणि तरी आपल्या कामानं कुणाला काही घंटासुद्धा फरक पडत नाहीसं.
असे दिवसावर दिवस साचत जातात.
मग हळूच एक दिवस थोडा तिरपागडा, हट्टी, शनिवार उगवतो.
मुहूर्तच असा असतो, की उगाच उसळती मजा येत राहते काहीसुद्धा न करता.
काहीतरी किडा करावा असं वाटायला लागतं.
मग काहीतरी मजेशीर किडा उकरून काढते मी.
त्यासाठी, त्यानिमित्तानं जमवलेली थोडी माणसं.
थोडी ठेवणीतली - हक्काची माणसं घासूनपुसून पुन्हा वापरायला.
सगळं मिळून नीट बयाजवार भातुकली मांडते मी, लगीनही आखते भावलीचं.
मग ही... गडबड.
किती कामं...
जेवणखाण, खरेदी, कापडचोपड, मानपान, पत्रिका, पाठवण्या...
ह्यांव नि त्यांव.
किती कामं...
हा... नुसता कुटाणा.
मजा येते विजेसारखं लवलवायला.
झिंग असते वेगाची, कर्तेपणाची, निर्मितीची, कृतकृत्यतेची...
ती भोगताना खुणावत असतात न घेतलेल्या सुट्ट्या, न काढलेल्या झोपा, न वाचलेली पुस्तकं आणि न पाहिलेले सिनेमे.
मग म्हणते मी परत,
कामं संपली की...