तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूंच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...
***
अगदी सुरुवातीच्या काळातली कधीतरीची ही गोष्ट. ’नऊ तासांपलीकडे मी तुमचं काहीही देणं लागत नाही’ अशा बाणेदार आणि शुगर कोटेड् तुसडेपणातून जमतील तेवढ्याच गप्पा मारणं सोडून मी जरा जरा माणसांत यायला लागले होते तेव्हाची. घरी परत जाताना गाडीत कुठल्याश्या देव-आनंद-कालीन गाण्यावर खूश होऊन मी मारे आवाज वगैरे वाढवला. त्यावर स्पष्ट नाराजी नोंदवणारं तुझं ’च्च्’ ऐकून, मागे वळून भिवया उंचावल्या असाव्यात मी. तेव्हा म्हणाला होतास, "हे बरंय... नाही आवडत एखादी गोष्ट असं म्हणायचीपण चोरी! थेट माझ्या अभिरुचीवरच उठणार म्हण की..."
तुझी मळल्या वाटेबद्दलची बेफिकिरी तेव्हाच नोंदली मी.
मग कधीतरी संदीपच्या 'पाडू' कवितांबद्दल त्याला शिव्या घालत होते मी, तेव्हा बोलता बोलता सहज बोलल्यासारखा, "'पाडू' तर 'पाडू', पण आपल्यात आहे का कवितांचा जाहीर कार्यक्रम करण्याची हिंमत? आपण फक्त पगाराचे आकडे फुगवण्यात काय ती खर्डेघाशी दाखवणार. कविता करायला आणि त्यावर जगायला जिगर लागते...बसून शिव्या देणं सोपं असतं," असा शांतपणे टाकलेला बॉम्ब.
मी भिवया उंचावायलाही विसरून गेले असणार...
***
हे नेमकं कधीचं ते मला आठवत नाही. ’बोलायला नको होतं ते बोलून तर बसलो आहोत, आता या टोपीतून कोणकोणते ससे बाहेर येतात ते पाहायचं’ असा हताश मूड सोडून आपण जरा गप्पा-टप्पा करायला परत सुरुवात केली होती त्या काळात असावं. मी ते सगळं ’सिगारेट’ प्रकरण तुझ्या पुढ्यात आणून टाकलं होतं, म्हटलं तर निरागसपणे, म्हटलं तर थोडा अंदाज घेण्याच्या पवित्र्यात. काय तरी प्रेक्षणीय गोची होती खरंच! एकीकडून तू हा सगळ्या आचरट प्रकारातली गंमत समंजस मित्रासारखी समजून पोटात घालावीस ही अपेक्षा आणि दुसरीकडून तुला भडकवण्याच्या माझ्या क्षमतेचा झालेला मनस्वी विकृत आनंद... तुझंही तेच! माझं हे असले आचरट प्रकार करून पाहणं आवडतं आहे, समजतं आहे कुठेतरी आणि तरी पोटातून वाटलेली काळजी दडवता येत नाहीय...
खरं तर निघायची वेळ ऑलमोस्ट उलटून गेलेली, पण जाणार कशी मी? मी विचारलेल्या एका बिनतोड सवालाचं उत्तर दिलं नव्हतंस तू! ’लिही ना उत्तर, थांबलेय मी’ असं म्हणून मी तुझ्या मागे उभी राहिले, तेव्हा अजूनच कोंडीत पकडल्यासारखी अवस्था तुझी. ’तू जा इकडून, मी लिहितो’ असं म्हणून मला हाकललंस आणि ते वाक्य उच्चारलंस स्वत:शीच हताश होऊन पुटपुटल्यासारखं -
"कधीतरी विचार करावा माणसानं थोडा..."
पुढच्या सार्या पडझडीची स्वच्छ जाणीव व्हावी अशा सुरात, स्वत:च्या वाहवत जाण्याला आणि त्यातल्या अपरिहार्यतेला उद्देशून उच्चारलेलं ते वाक्य. कुणी पाहू-ऐकून विटाळू नये असं आणि इतकं खाजगी.
ते ऐकलं आणि डोक्यातली सगळी अटीतटी, राग, तडफड संपून फक्त एक उदास आनंद तेवढा उरला मनात...
***
’मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा...’ अशातली गत असतानाही हट्टानं दिवसचे दिवस भिजून लुटलेला पाऊस. यशराज फिल्म्सची हिरॉईन असल्याच्या थाटात चंद्राकडे दिमाखानं पाहत रचलेल्या कविता. सिनेमे पाहण्यात बुडवून टाकलेल्या संध्याकाळी. पुस्तकं, नाटकं, मित्रमंडळी...
आणि तरीही ग्रेस म्हणतो तसा ’बुबुळांच्या शुभ्रतेत रुतलेला चंद्र’ आपला अभंगच...
***
’पळून जायचं नाही’ या तुझ्या वेडगळ आव्हानासमोर मूर्खासारखी मान तुकवून आपण आयुष्य परत चालू केलेलं. ’जमतंय की आपल्याला’ अशा आश्चर्यात मी दंग असताना तू चक्क म्हणावंस, "मी जातो दुसरीकडे कुठेतरी..."? ठिकाय, आपली त्यालाही ना नाही! पण ’मला इथे काहीच मिळत नाहीय माझ्या मनासारखं, मी जातो...’ या तुझ्या कांगावखोर प्रस्तावावर बॉसनं तुला काय म्हणावं?
’प्रूव्ह युअरसेल्फ ऍण्ड देन गो. पळून जाण्यात काय गंमत आहे?’
हा हा हा!!!
तू अर्थातच थोबाडीत मारल्यासारखा गप्प! तुझा चुपचाप थांबण्याचा निर्णय ऐकून त्या बॉसला बिचार्याला वाटलं असेल, काय भन्नाट तत्त्वज्ञान ऐकवलं आपण...त्याला काय ठाऊक ही कहाणीमागची कहाणी?
हे रामायण ऐकून हसावं की रडावं ते मला कळेना. स्वत:शी नसती युद्धं खेळण्यातून सुटका होता होता राहिली म्हणून नाराज व्हावं की तुझी पुरती जिरवणार्या या काव्यात्म न्यायावर खूश व्हावं असला भन्नाट प्रश्न माझ्यासमोर.
पण तुझा "सही जिरली ना माझी?" असा प्रश्न घेऊन असलेला गंमतीदार चेहरा बघून मग जे हसायला यायला लागलं, ते आवरेचना...
***
अलीकडे तसे आपण एकमेकांना आणि एकमेकांपासून जपून असतो. तशी भंकस, मस्करी, गप्पा-टप्पा, मस्ती आणि हमरीतुमरीवर येऊन केलेली भांडणं अजूनही चालतात आपली. समोरच्या माणसाला नेमका कसला राग येईल हे उमजून मुद्दामहून त्याचा अदमास घेत काडी टाकणं, तो अपेक्षेप्रमाणे भडकला की मनमुराद हसणं, चिडणं, चिडवणं...
पण एक आवर्तन पुरं झालं आहे आता.
आता प्रदेश पावलांना पूर्वीइतके अपरिचित नाही राहिलेले.
बरेच ऊष्ण गतिमान प्रवाह आता वरच्या संथ-शांत प्रवाहाखाली.
पोटातून अपार माया. भावी विध्वंसाची बीजं पाहताना दाटून येणारी काळजी. एकमेकांचं पोरपण जपण्यासाठी केलेली धडपड. न दिसणार्या शेवटाची भीती आणि अनामिक आकर्षणही...
’मी दोन ओळींच्या मधे कधीच काहीच पेरत नाही’ असं कितीही ठामपणे म्हणालास तू, तरी -
मधल्या काळात बरेच काही उगवून आलेले...