Wednesday, 25 May 2022

कायमचे सिनेमे

खूप सिनेमे आवडतात. सिनेमे खूप आवडतात. पण कधीही कुठूनही मधूनच बघायला घेऊन मज्जाच येईल असे सिनेमे मोजकेच. असे सिनेमे आपल्याला कित्तीही जवळचे असले तरी सिनेमे म्हणून लई भारी असतील, असं नाही. पण आपण त्यांच्यासह वाढलेले असतो, लागेबांधे असतात, त्यांतल्या पात्रांशी जुळलेलं असतं काहीतरी. त्यामुळे ते जवळचे. असे दहाच निवडायचे झाले, तर मी कुठले निवडीन?

विचारही न करता पहिला आठवतो, तो 'दामिनी'. त्यांतले संवाद मी उलट सुलट पाठ म्हणू शकते, वाकवू-वापरू शकते. भाबडा न्याय असूनही त्यातल्या कितीतरी प्रसंगी थोडंसं भारी वाटतंच. वस्त्रहरणप्रसंगी सभेतल्या दिग्गजांकडे न्याय मागणाऱ्या कृद्ध द्रौपदीची आठवण करून देणाऱ्या न्यायालयातल्या चित्रचौकटी खिळवून ठेवतात. भाव खाऊन जाणाऱ्या मीनाक्षी-सनी यांच्याइतकाच सूक्ष्म, बोलका, जिवंत अभिनय करणाऱ्या ऋषी कपूरचं, कुलभूषण खरबंदांचं, अंजन श्रीवास्तव-सुलभा आर्य-रोहिणी हट्टंगडी यांचं जाम कौतुक वाटतं. आणि मुख्य म्हणजे ठरावीक काळ हा सिनेमा बघून उलटला, की मला त्याची आतून आठवण व्हायला लागते!

तर हा माझा पहिला सिनेमा. दामिनी.

 


'गोलमाल है भाय सब गोलमाल है, टॅड्यॅव्...' वाजायला लागतं आणि 'हेराफेरी'तल्या त्या सीनमधल्या नटांच्या ॲंटेना आपसूख बाहेर येतात! याला गाण्यानं कमावलेली पुण्याई म्हणतात.अशी पुण्याई कमावून मेटा होण्याचं नशीब फार कमी सिनेमांना लाभतं. 'गोलमाल' त्यांतला एक. त्यातल्या जमून आलेल्या उत्पल दत्त + अमोल पालेकर या अद्वितीय रसायनाबद्दल काहीही नि कितीही म्हटलं तरी म्हणण्यासारखं काहीतरी उरेलच. 'आनेवाला पल'सारखी नितांतसुंदर गाणी, 'लडकी दहीवडा खानेसे इन्कार कर रही है?'सारखे टोटल अर्थहीन संवादही अजरामर करून जाण्याची ताकद असलेली संहिता, पात्रांना शोभून दिसणारं नि दीर्घकाळ लक्ष्यात राहणारं नेपथ्य, दरवाज्यात इकडून तिकडे झुलून मोक्याच्या वेळी दार अडवणाऱ्या नि मुळ्याचे पराठे खायला घालून ठार करू शकणाऱ्या अगडबंब आत्यासारखी पात्रं... काय नाहीय 'गोलमाल'मध्ये? वर लखीच्या शोधात घरभर संतापानं वाघासारखं फिरता-फिरता फुलदाणीतली फुलं उचलून त्यात बघण्याची उत्पल दत्तांची स्फोटक ॲडिशनही आहे! हा सिनेमा पाहिला, नि झोपाळ्याच्या कडेशी कुल्ला वाकडा करून बसायच्या तयारीत राहणारे बिचारे उत्पल दत्त आणि हरामखोर सफाईदारपणे झोपाळा झुईंकन मागे नेणारी दीना पाठक बघून हसता-हसता माझा मूड जादूची कांडी फिरल्यासारखा सुधारला नाही, असं अद्याप एकदाही घडलेलं नाही.

 


सहसा लहानपणी पाहिलेल्या सिनेमांची छाप पुसली जात नाही. पण 'खोसला का घोसला' हा त्याला अपवाद. तो पुष्कळ उशिरा पाहिलेला असूनही पुन्हापुन्हापुन्हापुन्हा बघण्याइतका आवडला, आवडतो. 'नॉट अ पेनी मोअर...'ची सदाबहार गोष्ट. पण काय भारतीयीकरण केलंय! घरातल्या तरण्याताठ्या पोरांच्या अंगाला उलटत्या दिवसांनिशी आक्रसतं होऊ लागलेलं घर. तसाच आईबापाचा धाकही आटू लागलेला. बापाचं सगळ्यांना जागा करून देईलशा मोठ्या घराचं स्वप्न - भारतातल्या यच्चयावत मध्यमवर्गीय बापांनी रिटायरमेंटकरता पाहिलेलं. पण एक एजंट बापाची जन्माची कमाई लुबाडतो आणि पोरं आईबापाच्या पुन्हा जवळ येतात. नाना खटपटी करून टोपी घालणाऱ्यालाच टोपी घालतात! या सगळ्यांत फुकाचा भावुकपणा नाही. लहानशाच पण जोरकस फटकाऱ्यांनिशी रेखाटलेल्या खणखणीत व्यक्तिरेखा. कमालीचं डिटेलिंग. संवादांत जब्बरदस्त पंचेस. लक्ष्मणच्या कॉमन मॅनचं वास्तवचित्र असावं असा अनुपम खेरचा खोसला लक्ष्यात ठेवावा, की दारूच्या नशेत आपल्याच शानदार बंगल्याच्या बागेच्या कडेला जाऊन धार मारणारा बोमन इराणीचा असंस्कृत खलनायक लक्ष्यात ठेवावा? की जन्मभर दारिद्र्यात निष्ठेनं नाटक करणाऱ्या नटाच्या हाती अकल्पितपणे अमाप पैसा आल्यावर त्याला फुटलेला घाम जिवंत करणारा नवीन निश्चल? छे! तारांबळ उडते..

 


जुळ्या भावंडांच्या अदलाबदलीचा क्लासिक ट्रोप. पण काय एकेक ॲड-ऑन्स आहेत त्यात! रजनीकांत-अंजू आणि रजनीकांत-मंजू यांच्यातले यच्चयावत सीन्स छप्परतोड आहेत, मुद्राभिनय आणि टायमिंग या दोन्हींत. नि लेखन. अहाहा! 'मैं मदिरा नही पिती जी' काय, किंवा 'मेरा घर कहाँ है, यहाँ है' काय; वर 'आज संडे है, तो दिन में दारू पीने का डे है' बोनस. 'छोडो ना.. छोडो ना...' म्हणून नौंटकी करून, सनीनं सोडून दिल्यावर वर शहाजोगपणे 'ये क्या? छोड दिया?' असं कंप्लीट हरामखोरपणे सुनावणारी श्रीदेवी. खरोखर श्रीदेवीनंच केलेला धन्य मेकप मिरवणारी हट्टंगडींची द ग्रेट अंबा, अन्नू कपूरचा दीनवाणा नोकर, बत्तिशीवरून जिवणी खेचत बोलणारा अनुपम खेर, नि ऑफकोर्स 'बल्ल्मा'वाला शक्ती कपूर. बाकी कुठल्याही जुळ्यांच्या सिनेमात न आलेली धमाल मला अजुनी 'चालबाज' बघताना येते, त्यात लेखन आणि अभिनेते आहेतच. पण खरी हुकुमाची राणी आहे, ती बदमाशीचे नाना विभ्रम आणि कारुण्याची देहबोली सहजगत्या चितारून जाणारी श्रीदेवी. तिला काढा, गतप्रभ झणी... असो!

 


चाची चारसोबीस. 'वो, जो निली चड्डी लिये खडा है, वो? फिकर मत करो, उसको वो होगी नही', 'ब्लाउज गिरा तो इतनी आवाज?-ब्लाउज में मैं थी ना!', 'यही है ना आप के केहने का 'फुल्ल्ल' मतलब?', 'अनारकली की तऱ्हा अंगडाई क्या लेता है बे?', 'चाची बिक रही है? मुझे किसीने बताया नही?', 'इसमें छेद कर के, नली डाल के पीना', 'चाची सार्वजनिक शौचालयमें स्वयंवर रचा रही थी', 'फॉर्टीएटसी? साइज है या बस का नंबर?'... असले एकाचढ एक, वेळी अश्लीलपणाच्या रेषेवर थबकलेले, गुलजारचे संवाद. द ग्रेट तब्बो. 'एक वो पल भी थे...'सारखं रेखाच्या आवाजातलं खल्लास गाणं. ओमपुरी-अमरीशपुरी-नाझर-जॉनीवॉकर-परेश रावल.... कमलाहसनच त्यांच्यापुढे अंमळ बटबटीत वाटतो. पण पोरीसोबतच्या सीन्समध्ये काय रंग भरलेत त्यानं!

अहाहा. कितीही वेळा बघू शकीन.


'विरासत', 'वेन्स्डे', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'बावर्ची', 'परिचय', 'घायल', 'भेट', 'कमीने', 'हुतुतू', 'हेराफेरी', 'अशी ही बनवाबनवी', 'सवत माझी लाडकी', 'एक डाव धोबीपछाड', 'वास्तुपुरुष', 'प्रिटी वुमन'... अशा कितीक सिनेमांवर लिहायला मजा आलीस्ती. पण साचा व्हायला लागेल की काय, या भीतीनं थांबत्ये. एक साक्षात्कार झाला. प्रेमकथा किंवा विनोद आवडतो, पण त्यांपेक्षाही अन्यायाचं निवारण हे सूत्र असलेले सिनेमे पुन्हा पुन्हा पाहायला फार आवडतात मला. त्याकरताच फक्त अमिताभचा डबल रोल असलेल्या 'आखरी रास्ता'वर टिपण लिहायचा मोह झाला होता. आवरला. 'अंदाज अपना अपना' हा अनेकांचा आवडता सिनेमा मला आवडत नाही, यावर शिक्कामोर्तब झालं. 'जाने भी दो..' आवडतो खरा. पण आपण फक्त दोनदाच पाहिलाय, हेही ध्यानात येऊन अचंबा वाटला. अतिशय अतिशय अतिशय आवडतात, पण पुन्हा पाहायची हिंमत होत नाही, असेही अनेक सिनेमे असल्याचं लक्ष्यात आलं. 'सैराट', 'मसान', 'शिंडलर्स लिस्ट', 'मासूम'... ही काही उदाहरणं...

या खोसाठी विचार करायला मजा आली एकुणात.

 

No comments:

Post a Comment