Thursday, 25 February 2021

सुरी

'आसमाँनमें... टॅडॅड्यॅंव्.. लाखों तारें...' असं तब्बेतीत गाणाऱ्या नि पोलिसानं शर्टाची इस्त्री घालवली तरी मनावर न घेता दिलखुलासपणे 'क्या साब!' असं विचारणाऱ्या खबऱ्यासारखी स्मार्ट असायची इथली गरिबी.
आता तिच्यात एक कडूपणा आलाय. 
आपण कुठल्या प्रवाहाच्या धारेला लागलो आहोत हेही न कळता चणे नाहीतर कचऱ्याच्या पिशव्या विकू पाहणाऱ्या करकरीत वृद्ध चेहऱ्यांवरचा निष्प्राण भाव झाकोळतो आता अधूनमधून तिच्या चेहऱ्यावर.
गर्दीला त्याची दाद नाही नि आहेही.
पण धावण्याला पर्याय नाही.
'उद्या धावायला बंदी झाली तर?' अशा धास्तीची थंडगार सुरी आहे प्रत्येकाच्या मानेला टेकलेली.

ऐकत राहायला हवं

कुणाचं काही ऐकू नयेसं वाटतं. 
कुणी काही बोलू लागलं तर त्यावर आवाज चढवून आपणच बोलत राहावं वाटतं.
नव्हे, तसं केल्यावाचून राहवतच नाही. 
फक्त आपलाच आवाज ऐकू येत राहतो मोठ्यांदा.
नि तरी समाधान होत नाही,
तहान शमत नाही,
जीव शांतवत नाही.
कशानं हे असं?
कसला राग येतो?
कसले अपमान सलतात?
असतात का ते खरेच अपमान?
आपण स्वतःला मानत असू, तर कोण करू शकतं आपला अपमान?
मग छाताडावर बारामहिनेचोवीसघंटे नाचणारे हे कोणते अपमान?
हे माझ्या मनातच तर जन्माला आलेले नाहीत?
अपमान करणाऱ्यांचा राग?
की या अपमानाच्या भुतांची भीती?
स्वला गाडू पाहणारी?
कसली भीती?
जवळच्यांपासून स्वतःला तोडणारी?
एकटं करणारी?
एकटं राहायला भाग पाडणारी?
कशी करू मात तीवर?
वेळ जाऊ देऊ?
पण धुमसत राहीन मी फक्त.
अधिकाधिक.
राख होऊन उरायचंय का मला?
जगण्याच्या-उरण्याच्या लसलसत्या इच्छेहून का अधिक आहे माझी धुमसण्याची इच्छा?
नाही ना?
मग सोडायला हवी.
भीतीकडे हलकेच मान वर करून बघायला हवं.
जरा थारावला जीव की कशाला भ्यालो आपण, असं हसूही येईल.
मग नाही येणार राग.
मग आजूबाजूचं जग दिसेल.
आपलं.
तोवर मी शांत राहायला हवं. 
कुणाचं काही ऐकू नयेसं वाटलं,
तरी ऐकत राहायला हवं.

Thursday, 4 February 2021

माझ्या स्वैपाकघरात

ओट्यावरचं पाणी निपटून ओटा काळा नितळ करावा.
निवडून, धुऊन, निथळून घेतलेला चवळईचा ताजा पाला सुरीनं बाऽऽरीक चिरावा.
चिरताना कायच्याकाय आठवत राहतं -
इराणी स्वैपाकघरातलं पालेभाज्यांचा भुस्सा करण्याचं ते मजेशीर चक्रीवालं यंत्र,
खारवलेली लिंबं आणि दह्यात मुरवलेल्या मटणाच्या फोडी घालून एकजीव शिजणारी ती रटरटती भाजी,
तिच्यात बुडवून खायला त्या पावासारख्या, पण मर्यादेनंच फुलून आलेल्या गुबगुबीत खमंग खमिरी रोटीचा तुकडा...
आपण कुठे खाल्लीय ती कधी?
कधीतरी एखाद्दा आसुसून बोललो असू त्याबद्दल.
पण तिचा वास येतो मला एकदम...
कधी चहाचं आधण पुरतं उकळण्याआधीच घाईनं त्यात किसलेलं आलं पडतं.
मग उकळी, झाकण, मुरवण...
सगळं बयाजवार करूनही चहाला आल्याचा वास कसा तो नाहीच येत.
'हं. करा घाई.' असं ऐकूच येतं मला तुझ्या आवाजात.
मग चहा होतो तिखट्ट...
कधी मिक्सरचं भांडं धुऊन पुसून आवरताना
बुडाशी ते पुरतं स्वच्छ वाटत नाही.
मग कितीही दमणूक झाली असली तरी त्याच्याच एका पकडीनं ते सगळं प्रकरण सुटं केलं जातं,
खरवडून, घासून, पुसून..
सगळं लख्ख होऊन जागच्या जागी जातं.
आपलं आपल्याला कौतुक वाटत नसतंच काही.
पण मग कौतुकाची निसटती नजर कुणाची ती?
माझी की तुझी?
कधी कोथिंबीर निवडताना हाताची बोटं हुंगली जातात कुणाच्या नकळत.
'मेहके हुए धनिये का ज़िक्र करनेवाली कविता' आपल्या प्रेयसीसाठी लिहू इच्छिणारा पाश आठवतो पाठोपाठ.
आणि मग -
कोथिंबिरीच्या वासासाठी महिनोन् महिने आसुसणं तुझं.
भास, आठवणी, इच्छा, आणि या सगळ्यांचं एखाद्या पिशाच्चासारखं असण्या-नसण्याच्या सीमेवरचं -
चिमटीत न येणारं, निसटत राहणारं, घायाळ करणारं..
अपुरेपण.
सगळं खदखदत राहतं एकजीव होऊन
माझ्या स्वैपाकघरात.