Wednesday, 23 December 2020

गाठोडं

धुऊन विटके-मऊ झालेले जुनेपाने कपडे

अनेकदा वाऱ्या करतात.

पुढून मागे.

वरून खाली.

तळ्यात-मळ्यात.

कपाटातून गाठोड्यात.

गाठोड्यात तसेच गप्प पडून राहतात महिनोन् महिने.

मग गाठोडं नजरेआड.

कधीतरी वर्षसहामहिन्यांनी बाहेर येतं ते धुळकटलेलं धूड.

पण पुन्हा उलगडून पाहताना

हाताळून मऊ होताना

आपल्यातलं काही शोषून घेतलेलं ते सूत

नाही हातावेगळं करता येत.

मग टोचरे हुक उचकून, बाह्या उसवून, चुण्या उलगडून,

होता होईतो धडके तुकडे मिळवून

पुन्हा रचायचे नव्यानं

जिवाला गोड लागेस्तो.

आतून एक मऊशी ओढणी.

मधे एखाद्या धडक्या शालीची जोड.

वर फिरून नव्यानं मांडलेला डाव.

पुन्हा नव्या नवलाईच्या भांडणापासून 

भांडणं संपून जाईस्तो.

असं का नाही करता येत आपल्याला कायम?


No comments:

Post a comment

ताजं लिखाण

कुठूनही कुठेही

जाता येतं कुठूनही कुठेही खिशात शंभरेक रुपये असले की. अर्धी चड्डी घालून फिरा वा भरजरी साडी नेसून फोनवर तासंतास बोलत राहा प्रियकराशी ल...