ना अंधार ना उजेड
ना आभाळ ना झाड
ना शहर ना रान
अशा वेशीवरच्या हिरव्या तुकड्याच्या टोकावर राखाडी प्रकाशात
पोपट जीवघेणा कलकलाट करतात,
तेव्हा त्यांचा पोपटी रंगही विरून गेलेला असतो,
कशाबशा उटारेटी काढलेल्या जडशीळ दिवसाच्या दिवसपणासारखा.
मान ताणताणून
नजर फाडफाडून
हेकेखोर निग्रहानं
कितीही वेळ बघत राहिलं तरी आसमंतातला प्रकाश पावलापावलानं विझत जाण्याखेरीज,
घडत नाही काहीच उत्साहवर्धक.
पडत नाही दृष्टीस एकही पोपटी पीस.
एकेक पाखरू मुकं होत जातं.
दिवसाचे हातपाय अंधारात बुडतात.
थोड्या गाड्या जातात.
थोड्या गाड्या येतात.
सोडियम व्हेपरची पिवळी ज्योत उदासवाणेपण शिलगावत जाते वक्तशीर.
दिवेलागण होते
फायनली.
No comments:
Post a Comment