राक्षसाचा प्राण जसा एखाद्या पोपटात असतो, तसा सांस्कृतिक दृष्ट्या परिपूर्ण अशा स्त्रीपुरुषांच्या लिंगभावाचा प्राण अनेक बाह्य पोपटांमध्ये विखुरलेला असतो, असं एक निरीक्षण आहे. होरक्रक्सच्या रक्षणार्थ तडफडणार्या व्होल्डरमटप्रमाणे हे स्त्रीपुरुष सदैव या जादुई पोपटांच्या संरक्षणाच्या तजविजीत असतात. त्यांची ही यादी. ती अपुरी आहे, हे सांगणे न लगे. इच्छुकांनी यथाशक्ती भर घालावी.
पुरुष
- कमालीचं जहाल, आतड्यांची जाळी होईल इतक्या प्रमाणात, टाळूला घाम फोडेल असं तिखट खाणे. या खाण्याचा आविष्कार सार्वजनिक ठिकाणी झाला आणि सार्वजनिक ठिकाणी विरुद्धलिंगी व्यक्ती उपस्थित असल्या,तर परिणामकारकता वाढते. पण हा मुद्दा तसा यादीतल्या सगळ्याच गोष्टींना कमीअधिक प्रमाणात लागू आहे.
- टीव्हीवर कोणत्याही प्रकारच्या खेळांचे सामने तन्मयतेनं पाहणे. वेळी त्यासाठी चिडचिड, धुसफुस, कटकारस्थानं, दादागिरी, आडमुठेपणा, टोमणे, चपळ हल्ले… इत्यादी गोष्टींचा वापर करून रीमोट हस्तगत करणे. या सामन्यांपायी टीव्हीवरच्या डेलीसोप्सची गळचेपी होत असल्यास या पोपटाची परिणामकारकता वाढते. पण टीव्हीवरच्या डेलिसोप्समधल्या कुठल्या बाईचं कुठल्या बाप्याशी मागल्या दारानी लेटेस्ट संधान बांधलेलं आहे आणि कुठली नणंद सध्या कोणत्या विषाच्या गोळ्या कुणाला देते आहे याची यच्चयावत आणि अद्ययावत माहिती बाळगून असतानाही आपण त्या गावचेच नाही असं सतत प्राणपणानं सिद्ध करत राहणे हाही पौरुषाविष्काराचा एक पोटभाग असल्यामुळे,तुम्हांला डेलिसोपबद्दल खरा तिरस्कार वाटतो की नाही याच्याशी गळचेपी-आनंदाचा थेट संबंध नाही. एरवी डेलीसोप्स बघता बघता अधिकाधिक कल्पक आणि सर्जनशील शिव्या देऊन विरुद्ध पार्टीला त्यात असलेला रस ही किती भयानक गोष्ट आहे हे सिद्ध करत राहण्याचा एक मार्ग कायम उपलब्ध असतोच. शिव्यांची अभिव्यक्ती हाही पौरुषाविष्काराचा एक पुरातन पोपट आहे हे सांगण्याकरता अनेक जण आसुसले असतील. पण अलीकडे आधुनिकतेवर क्लेम करण्यासाठी या पोपटावर विरुद्धलिंगी पार्टीनंही आक्रमण केलेलं असल्यामुळे तूर्त त्यात न पडणं इष्ट.
- बाहेर जाताना कुठे जातो आहोत, किती वाजता परत येणार आहोत याबद्दल घरात अवाक्षरही न सांगणे. जर सांगून जाण्याची नामुष्की ओढवलीच तर सांगितलेली वेळ न पाळणे. त्याबद्दल फोन वा मेसेज करून न कळवणे.
स्त्रिया
- घर, स्वैपाकघर, न्हाणीघर, टेबलाचा कप्पा इत्यादींपैकी झेपेल त्या टेरिटेरीत आपल्या निकषांवर आधारित स्वच्छता पाळणे आणि मुख्य म्हणजे त्याच निकषांनुसार इतर लोक कसे भयावह अस्वच्छतेत लोळणार्या डुकरासमान आहेत,हे डुक्कर हा शब्द प्रत्यक्ष न वापरता निरनिराळ्या साटल्यपूर्ण प्रकारांनी तपासत, व्यक्त करत, सिद्ध करत राहणे. ‘मला नाही असलं चालत’ हे भरतवाक्य या संदर्भात विशेष परिणामकारक मानलं जातं.
- रंगांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म छटांचं ज्ञान आपल्याला असल्याचं निरनिराळ्या अगम्य नावांचा वापर करून सिद्ध करणे,त्याचप्रमाणे हे ज्ञान विरुद्ध पार्टीला नाही हे विविध प्रसंगी आणि प्रकारे सिद्ध करून फिदिफिदि वा करुणार्द्र हसणे.
- बाहेर जाण्यासाठी तयार होताना ठरलेल्या वेळेपेक्षा किमान अर्धा तास आणि कमाल कितीही उशीर करणे आणि त्याबद्दल विरुद्ध पार्टीकडून ऐकवले जाणारे अत्यंत स्टिरिओटाइप्ड-गुळगुळीत टोमणे धन्यधन्य होऊन ऐकणे. मानेला एक अर्धवट कौतुक अर्धवट तुच्छता दर्शवणारा झटका देता आल्यास परिणामकारकता डबल.
- पाल-झुरळ वा तत्सम प्राण्यांना बघून किळस अधिक भीती अशी एक संमिश्र किंकाळी फोडणे – बादवे, किंकाळी फोडणे आणि चक्कर येणे या गोष्टींचा कमांड परफॉर्मन्स हे अतीव महत्त्वाचे आणि परिणामकारक पोपट आहेत, पण ते इतके सनातन आहेत, की तूर्त त्याबद्दल बोलणं हे थोडं औट ऑफ फ्याशन झालेलं आहे. त्यामुळे ते बाजूला सारण्यात येत आहे – आणि / किंवा नारळ फोडता येत नाही हे कौतुकानं सांगणे आणि / किंवा गॅसचा सिलेंडर बदलण्यासाठी विरुद्ध पार्टीला पाचारण करणे. हे तसे एकाच लेव्हलचे पोपट आहेत. याच्याऐवजी तो, त्याच्याऐवजी हा... असं सहज चालण्यासारखं आहे.
- कुठूनही कुठेही पोचल्यानंतर तत्काळ फोन करून आईला,असल्यास सासूला, असल्यास नवर्याला आपण सुखरूप पोचलो आहोत हे कळवणे. विरुद्ध पार्टीकडूनही हीच अपेक्षा बाळगणे आणि त्यांच्या यादीतल्या पोपटांच्या यादीबरहुकूम ती कधीच पूर्ण होणार नसली तरीही दर वेळी नव्याने संताप, भांडण, तमाशा ही साखळी यथासांग वापरणे.
असो. यादी अपुरी असल्याची नम्र जाणीव आहेच. तरी भर घालण्याचे करावे....