Saturday, 27 April 2019

विणीचा काळ विसरून

विणीचा काळ विसरून बारा महिने तेरा काळ घुमत बसणाऱ्या पक्ष्यांनी
उच्छाद मांडलाय सगळीभर.
झाडंबिडं लागत नाहीत त्यांना.
बिल्डिंगांच्या वळचणी, ओस पडलेले उंच भगभगीत चौक, घरांच्या दुर्लक्षित बाल्कन्या...
सिमेंटी स्वभावाचे कसलेही झरोके
चालतात.
थवेच्या थवे
वाण्यांच्या तूरडाळयुक्त भूतदयेचे सडे वेचतात.
खातात, वितात.
उडतात, फडफडतात.
काड्यांची अस्ताव्यस्त जुडीवजा घरटी, अंडी,
करुण आवाजात घूंघूं करत खुरडत फिरणारी सततची भुकेली पिल्लं,
शीट,
तिनंच सांधली जाणारी घरटी...
घडतात, मोडतात.
प्रहरांमागून प्रहर, बहरांमागून बहर
एक बॅच उडाली, दुसरी हजर.
भेदरलेल्या झुंडीच्या अगतिक अस्थिर उग्रतेचा लालबुंद डोळा वटारून पाहणारे पक्षी सगळीभर.
हार्डवायर्ड प्रेरणेनं जागा मिळेल तिथे घुसतात, एकमेकांवर चढतात.
फडफडतात.
जाळ्या ठोकून बंद केलेल्या निर्मम व्हरांड्यांवर
अभिमन्यूचा बिनडोक आवेश घेऊन पुन्हापुन्हा चढाया करतात.
घुसतात, फसतात.
उपाशी तडफडतात.
मरतात.
नव्या दिवशी नव्या जोमानं ट्रेन्स भरून टाकणाऱ्या,
स्मृतीच्या पेशी नसलेल्या प्रवाशांप्रमाणे
नव्या दिवशी पुन्हा नव्याने त्याच जागी चोचीत चोच घालून घुमतात.
दाणे टिपतात, अस्ताव्यस्त पोसतात.
जुगतात, वितात.
खातात, हगतात.
टूथपेस्ट थुंकून ठेवल्यासारखं दिसणारं पांढरंफेक शहर.
पक्ष्यांनी व्यापून टाकलं आहे होतंनव्हतं शहर.

Thursday, 25 April 2019

बसमधला मागच्या खिडकीत बसलेला मुलगा

बसमधला मागच्या खिडकीत बसलेला मुलगा
बोलत असतो फोनवर
रात्रभर.
खुन्नसचं टोक हातात गच्च धरून खिडकीची काच मागेपुढे-मागेपुढे
करत राहताना,
जागेझोपेच्या सीमेवर,
कानांना घासून जात राहतात त्याच्या गुलुगुलु संभाषणाचे ओलसर काठ.
कलत्या सूर्याच्या साक्षीनं हक्काच्या मानेच्या पोकळीत डोकं खुपसून
आवेगानं शब्द आणि स्पर्श लुटू पाहणाऱ्या जोडप्यांच्या सोहळ्यांत
आरोग्यपूर्ण सुखवस्तू नजरांनी कालवलेले
जहरी सांस्कृतिक विटाळ
धुतले जातात हळूहळू.
तळ्यात उतरलेल्या झोपडपट्टीच्या काठावर
घोडे पार्क केल्याच्या थाटात बाइक्स बांधून
रुबाबात
ख्वाजा मेरे ख्वाजा ऐकणाऱ्या
पोरसवदा डोळ्यांच्या गढूळ कोंडाळ्यात बेगुमानपणे उमलत जाणारी आर्त शांतता
रुजत जाते ऐकणाऱ्याच्या मनातही.
पहाटेच्या गार वाऱ्यात
हळूच माघार घेते मागची खिडकी,
तेव्हा वळून एखादं दाणेदार हसू हातावर ठेवायचा मोह होत राहतो,
पण पेंगुळलेले डोळे मिटत असणार नुकते कुठे
दिवसाला भिडण्यापूर्वीच्या
तासाभरात.
अपरंपार अनाकलनीय मायेची एक विराट लाट भिजवून टाकते सगळी पहाट.
दिवस दौडू लागतो.

Wednesday, 24 April 2019

हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं

हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं बोलतो आम्ही आता
फुशारक्या मारतोवाद घालतोभांडतो
शिव्याशाप देतो तळतळून.
कितीही दूरवर पोचणार्‍या गप्पा मारतो दिवसरात्रीच्या कोणत्याही प्रहरी
प्रेमही करतो मनापासून.
एकच लहानशी अट
पलीकडच्या प्राण्यालाही असावं लागतं आमच्याच उत्क्रांतीच्या पायरीवर.
त्यालाही फुटलेला असला पाहिजे हा अवयव.
बस.
यंत्राला ऊर्जा लागतेतसं खावंप्यावंही लागतंच म्हणा.
संडासबिंडासलाही जावं लागतं
धुवायलाओतायला पाणी लागतं.
पण ते सगळं असायचंच.
त्यात फार गुंतू नयेसब मोहमाया है...
अर्थात
काही बग्स आहेतच....
अजूनही क्वचित
दिवस सैल पडतो आणि तरीही पीळ जात नाही कपाळावरच्या आठ्यांतून.
थकवा अंगभरडोळे तारवटून.
गादीवर टेकते पाठपण विसावत नाही सैलावून.
अंथरूण-पांघरूण
गादीउशी.
व्हिक्सची बाटली
पंखाएसी.
स्क्रीन्स चमकदार,
मेसेंजरव्हॉट्सअ‍ॅपफेसबुक बर्करार.
मिटतातही डोळे.
पण सुखाचा अस्फुट हुंकार उमटत नाही अंगांगातून.
कूस वळवतघाम टिपत,
पंखा भर्र फिरवत...
काही केल्या नीज उतरत नाही पापण्यांआडून.
अशा वेळी पुन्हा नवा अवयव हातात घेतो आता
हाताला फुटलेल्या एका नव्या अवयवानं बोलतो आम्ही आता.

Tuesday, 16 April 2019

चोख शांततेचा एक नखभर तुकडा

चोख शांततेचा एक नखभर तुकडाही सापडत नाही आसमंतात
दिवसाच्या कुठल्याही प्रहरी.
एफेम जॉकीची अर्थहीन धेडगुजरी बकबक,
चिरडीला आलेल्या गाड्यांचे हॉर्न्स,
बसच्या पत्र्यावर जिवाच्या आकांताने थपडा मारत प्रवासी गोळा करणारा क्लीनर,
छातीचा ठोका चुकवणारी दीडदोन पुरुष उंचीची स्पीकर्सची भिंत,
‘अगला स्टेशन मुलुंड...’
‘रांडांना दारात हुबं र्‍हाऊन हवा खायाला पायजे...’
ढोलताशेलेझीम.

उरलंच थोडं अवकाश काही तुरळक सांदीफटींतून
आवाजानं न बरबटलेलं
चुकूनमाकून,
तर कुणीतरी घाईघाईनं हवेत सोडून दिलेली फिल्मी संगीताची एखादी सुरेल अश्लील पिचकारी.
जणू शिवीच देतो आहे कुणी अंगावर चालून येणार्‍या या भयाकारी राक्षसाला
अगतिकपणे
आईवरून.

निरवतेची तहान लागलीच कधी कुणाला,
तर उन्हाळ्यातल्या रात्री उत्तम.
दिवे जातात आणि उकाडा असह्य होऊन लोक एमेसीबीला फोन करत सुटतात,
त्याआधीची काही मिनिटं सर्वदूर शांतता असते आसमंतात.
सगळं काही आलबेल असल्याचं भासवणारे
पंख्यांचे भर्र आवाज
एसीच्या यंत्राचा गुरगुराट
फ्रीजचे अव्याहत हुंकार
टीव्हीच्या असंख्य च्यानेलांच्या व्हाईट नॉइजचं गिरमीट
कोमात गेलेलं असतं सगळं.
त्या वेळी छाती भरून मारता येतो एक दम.

फेफडों की बीमारी गेली खड्ड्यात.
पावसाच्या आवाजालाही जिथे असते
‘पूरा शहर पानी में’ची अव्याहत पार्श्वभूमी,
तिथे ओठाशी जळणार्‍या निखार्‍याचा अस्फुट चरचरीत आवाजच फक्त
निरवतेची लालकेशरी मुद्रा उमटवू शकतो मनावर,
हे कळत जातंच इथल्या प्रत्येकाला
कळत नकळत.

Wednesday, 10 April 2019

लग्न न करणार्‍या माणसांना


लग्न न करणार्‍या माणसांना कळतच नाही

आपल्या आईबापाला सावकाश घेरत राहिलेलं म्हातारपण.

नोकरीधंदा असतो लग्न न करणार्‍या माणसांना.
अधिकाधिक स्थैर्य-सुबत्ता-बेफिकिरी...
चैनीच्या सवयीही खिळत गेलेल्या हाडीमाशी.
म्हणावीत तितकी वळणं नसतात थबकायला लावणारी.
केळवणं, ग्रहमकं, रिसेप्शनं...
...डोहाळजेवणं, बारशी, शाळेच्या अ‍ॅडमिशन्स, मुंजी आणि दहाव्याही
नसतात त्यांच्या आयुष्यात थेट.

आईबाप अधिकाधिक कर्मठपणे बघत राहतात मराठी सिरियली
रांधत राहतात त्याच त्या चवीच्या भाज्या आणि आमट्या निरुपायानं मनापासून
नाना युक्त्या लढवतात कावेबाजपणे
आणि
कधीकधी हताशेनं डोळ्यात पाणी आणून खरोखरचं.
करत राहतात नवनवीन स्थळांची वर्णनं न थकता.

आपल्याच अंगाखांद्यावर खेळवलेल्या झाडांची निवांत पानगळ
मुकाट विसरून जाणार्‍या
आणि कावेबाजपणानं दिव्यांचा लखलखाट धारण करत
वस्तूंचे अंतहीन मोह अधिकाधिक निकरानं विकत राहणार्‍या
शहरातल्या रस्त्यांसारखीच,
आईबापांशीही सवयीनं वाढत राहते अनोळख.

याच रस्त्यावर
काचेला नाक लावून सोनेरी मासे
आणि जाळीत बोटं रोवून पिवळेधम्म लवबर्ड्स पाहिले
मन भरेस्तो.
सायकल शिकताना गुडघे फुटले,
ऐन रहदारीत बकुळीची फुलं वेचली वेडगळासारखी,
नाक्यावर तीनतीन तास गप्पा ठोकत रेंगाळलो
रात्री अडीच वाजेस्तो.

ज्या वळणावर खचकन सामोरं येतं हे सगळं,
तिथेच फ्लायओव्हरखाली दिसतो
हळूहळू मरण पावत गेलेला रस्ता.

लग्न करणार्‍या माणसांना कधी भेटतात असली वळणं?