Wednesday 16 January 2019

पुस्तकी नॉस्टाल्जियाचे कढ



(चित्रश्रेय : नीतीन वैद्य)
** 
जादूची अंगठी, रक्तपिपासूंची दरी, सोनेरी पेला, बारा राजपुत्र आणि इतर कथा, दुष्ट जादूगार आणि बोलणारा पोपट, उडता गालिचा, गाणारे झाड... असल्या नावांची चार-चार आण्यांना मिळणारी पुस्तकं आमच्या लहानपणी असत. 'गोष्टींची पुस्तकं' या एका लेबलाखाली मावतील, अशी ती पुस्तकं. इसाप, हातिमताई, सिंहासन-बत्तिशी, विक्रम-वेताळ, सिंदबादच्या सफरी, महारथी कर्ण इत्यादी पुस्तकांना काहीएक कुळशील असायचं. तसलं काही या पुस्तकांना नसे. आकारही थोडका. अक्षरशः सत्तर-ऐंशी पानं, हलका कागद आणि तळहाताएवढा आकार.

मुखपृष्ठावर नावाला धरून चित्र. नाव उडता गालिचा असेल, तर मुखपृष्ठावर गालिचा उडवलेला. बेइमानी नाही. शिवाय आत चित्रबित्रं काढायचे लाड नसत. सरळसोट गोष्टीला सुरुवात. एक किंवा दोन गोष्टींत पुस्तक खतम. राजे-राण्या, सुंदर आणि दुःखी राजकन्या, सावत्र आया, चेटकिणी, दुष्ट राक्षस आणि जादूगार, वयात येणारे राजपुत्र, गरीब सुताराचा सालस पोर, गाणारे बुलबुल इत्यादी मेंबरं हमखास असत. 'हॅन्स ॲन्डरसनच्या परीकथा' आणि 'सुंदर वासालिसा' इत्यादी हाती लागल्यावर आमच्या गोष्टींचे मूळपुरुष ध्यानी येऊन मग त्या पुस्तकांतलं मन उडलं. पण तोवर ती पुस्तकं खूप आवडायची. स्वस्त आणि मुबलक तर मिळायचीच. पण त्यांत एक अजब रसाळपणा होता. तपशील मोजके पण चोख रंगवलेले असत. मुश्ताक, गुलबकावली, बगदाद, तुर्कस्तान, ठकसेन, रूपमती, सारंग, सुलतान... इत्यादी शब्दांशी पहिलीवहिली ओळख या पुस्तकांतून झाली. गोष्टीची भूक या पुस्तकांनी बऱ्याच अंशी भागवली. कोण लेखकबिखक असत कुणास ठाऊक. डोक्याला कितीही ताण दिला तरी अज्जाबात आठवत नाही एकही नाव. पण एके काळी घरात चांगले दोनतीन गठ्ठे या पुस्तकांचेच होते. कुणाकुणाला वाचायला दिले नि अंतर्धान पावले.

आता मधूनच त्यांतलं एखादं दृश्य आठवतं.

कासावीस होऊन तळघरातल्या सोन्यारुप्याच्या अंगठ्यांच्या ढिगात 'ती' साधीशी अंगठी शोधणारी शापित राजकन्या आणि मागे उभी राहून खदखदा हसणारी म्हातारी...

अमावास्येच्या रात्री किर्र जंगलात सोडून दिलेले कोवळे राजपुत्र आणि त्यांचं रक्षण करणारा मायाळू सिंह...

पाण्यातून वाहत निघालेल्या कमळाच्या पानावरून प्रवास करणारा अंगठ्याएवढा टिंगू आणि त्याच्या हातातला गवताच्या पात्याचा बाणेदार भाला...

सुशि आणि तत्सम पुस्तकांनी पुढे डोक्यात जी जागा मिळवली, ती टोटल लहानपणी या पुस्तकांच्या मालकीची होती. सुशिंचं तर नाव तरी आहे. 'अन्याय झाला' अशी खंत व्यक्त करण्याइतपत का होईना, नाव आहे. या पुस्तकांचे लेखक कोण होते कुणाला ठाऊक. परागंदा झाले डोक्यातून. कुणी प्रकाशित केलेली असत, काय अर्थकारण असायचं, लेखकालाच काय, प्रकाशकाला तरी किती मिळायचे... सगळंच अंतर्धान. 

***


लायब्र्यांनाही स्वभाव असतात असं म्हटलं तर फार सरधोपट होईल. पण असतात खरंच. अनेकांना लायब्र्यांमधल्या पिवळ्या पडून जीर्ण व्हायला लागलेल्याएकसाची बायडिंगचे बुरखे घेऊन दामटून बसवलेल्या, जुन्यापान्या पुस्तकांची नफरत असते. त्याच्या अगदी उलट अनाकलनीय आकर्षण वाटत आलं आहे मला तसली पुस्तकं उशापायथ्याशी घेऊन म्हाताऱ्या होत गेलेल्या सेपिया टोनमधल्या लेकुरवाळ्या लायब्र्यांचंच. 

बहुधा झिजत गेलेल्या गुळगुळीत कठड्यांचे लाकडी जिने असतात त्यांना. तेही कधीकाळी गिर्रेबाज वळण मिरवणारे वा निदान सुबक ठेंगण्या आकाराचे तरी असतीलअशा खुणा ठेवून असलेले नि आता जीर्ण होऊन मोडकळीला आलेले. जुन्या गावात मध्यवर्ती जागा असते त्यांची. त्यामुळे आजूबाजूला सगळीकडून कसलीकसली नवनवीन दुकानं नि ऑफिसं थाटून अस्ताव्यस्त वाढून बसलेलं आता गाव. त्यात निव्वळ सवयीनं उभ्या असतात त्या लायब्र्या. एखाद्या सहकारी बॅंकेनी अव्वाच्या सव्वा भाडं देऊ करून एखादा मजला मागितलेला असतोत्याचं दडपण उरावर वागवत. पण करकरत्या जिन्यावरून वर जाताक्षणी पोटात घेणारं उंचाडं छत असतं बहुतेकींना.

जिन्यावरून जीव मुठीत धरून वर जाताना रोखलेला श्वास नकळत सुटतो सैल आणि नजर खेचली जातेच छताकडे. लांबलचक दांड्यांचे मरगळत घरघरणारे पंखेरंग उडालेल्या लहानमोठ्या कपाटांच्या अंधार्‍या अंतहीन बोळकांडीपुस्तकांच्या कार्डांचे नाहीतर रजिस्टरांचे गठ्ठे एकीकडेत्यात आहेत की नाहीतसं जाणवूच नयेशीपोस्टऑफिसातल्या अनादिअनंत प्राचीन कारकुनांच्या गिजबिजत्या वावराची आठवण करून देणारी शिष्टतम कामकरी मंडळीपेपर आणि मासिकं चाळत नि शब्दकोडी सोडवत चुरगळून बसलेले निवांत पेन्शनर-बेकार-विद्यार्थी. आणि अर्थात. सगळीभर भरून उरलेला पुस्तकांच्या सुरस धुळीचा डेंजरसली आकर्षक वास.

अशा लायब्र्यांत आजीव सभासद असलेल्या मेंब्रांनाही तिथे घरच्यासारखं वाटत नसणारच कधीहीइतका उद्धट तिरसट जितक्यास तितकेपणा वातावरणात कोंदलेला असतो. पण त्यातून सराईतपणे वाट काढत हवी ती पुस्तकं अचूक पदरात पाडून घेण्याची कला अंगी बाणलेली मेंबरंच तिथे टिकलेली असतात. 'या मंडळीसाहित्यप्रेम जागवूपुस्तक वाचवू'छाप आडव्या केळ्याच्या आकाराच्या लंबगोल चिकट हास्याकारी पुस्तकप्रेमाचा लवलेशही आसंमतात नसतोतसाच कसल्याच कोरेपणाचाही नसतो. क्वचित एखादी उत्साही तरुण मुलगी देवघेव विभागात चिकटलीचतर चारच संध्याकाळींमध्ये तिच्यावरही तोच तो उर्मट बेफिकीर कोरडेपणाचा थर चढतो आणि तिच्या नव्हाळी तत्परतेला पोटात घेऊन लायब्रीचं तळं पुन्हा संथनिवांत होत सैलावतं.

अशा लायब्र्यांतल्या पुस्तकांवर अर्थात खुणा असतात. कधी उत्साही आणि आगाऊ अभिप्राय चिताडलेले असतात. पानांचे कोपरे दुमडलेले असतात. मधली वा शेवटची पानं गायब असतात. अनेक रसाळरंगीत पुस्तकंच्या पुस्तकंच लांबवलेली असतात. पुस्तकं आपल्या हातात पडेस्तो त्यांचा कोरा वास विरून गेलेला असतो...


तरी अशा लायब्र्यांच्या गुहांतून शिरताना एकाच दिशेनं जाणारी आपली पावलं उमटावीत आणि आपल्या आयुष्यापासून कायमचं पळून जाऊन त्यांच्या पोटात लपून बसता यावं अशी चमत्कारिकदडपवणारीगूढ ओढ मला अजुनी वाटते याचं कारण काय असेल?

***


'इंग्रजी वाचन वाढवाअसा यच्चयावत अ‍ॅडल्टांचा धोशा लहानपणापासून ऐकला. इंग्रजीवर प्रभुत्व नसल्यामुळे आत्मविश्वासात होणारी घट आणि तोटे अनुभवणार्‍या पालकांपासून ते इंग्रजीवरच्या प्रभुत्वाचे फायदे अनुभवणार्‍या हितचिंतकांपर्यंत सगळे जण तो लावून धरत. पण वाचायचं कायतर शरलॉक होम्स. नाहीतर मग प्राइड अ‍ॅन्ड प्रिज्युडाईस. नाहीतर मग एकदम वुडहाऊसच. मी शिव्या खाण्याच्या तयारीनीच हे बोलायचा धीर करत्येपण मला ती भाषा अजिबात आवडत नसे. या पुस्तकांमधल्या भाषेच्या दर्जाबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण ते कोणत्या टप्प्यावर करायचं वाचन आहेयाचं काही भान आजूबाजूला कुणालाच दुर्दैवानं नव्हतं. जे वाचन भाषेचा लुत्फ लुटण्यासाठी करायचंते वाचनाच्या प्राथमिक यत्तेत करत नाहीत हे आमच्याइथल्या अ‍ॅडल्टांना कळत नसावं. त्यामुळे चालायला शिकायचंतेच मुळी हिमालयाच्या पायथ्यापासून वर कड्याकडे बघत-बघतअडखळत... असा काहीसा प्रकार होई नि माझ्यासारख्या आळशी लोकांना इंग्रजी पुस्तकाबद्दल नफरत पैदा होई. मराठी वाचनात प्रावीण्यपातळी पार करून प्राज्ञकडे सूर मारलेला असल्यामुळे सुपरफास्ट प्रवासाच्या चैनीची सवय. त्या पार्श्वभूमीवर एका हातात कोश आणि एका हातात पुस्तक घेऊन रांगत रांगत करायच्या अडखळत्या वाचनातली अधोगती अजिबात मानवत नसेहे तर झालंच. पण त्याहूनही मोठी कारणं आहेत आणि ती मला अजूनही सतावतात.

कोशातून अर्थ पाहण्याला काही एक मर्यादा असतात. जाळीमंदी पिकली करवंदं’ हा शब्दसमूह वाचल्यावर माझ्या डोळ्यासमोर जे साक्षात उभं राहतंते डॅफोडिल्स वाचल्यावर उभं तर राहत नाहीचपण कोश बघूनही मला त्याचा पूर्ण अर्थबोध होत नाही. क-र-वं-दा-ची-जा-ळी या अक्षरसमूहाला माझ्या लेखी एक रंगआकारस्पर्शगंध आहे आणि त्यासोबत येणारी पिकत्या उन्हाळ्याची रणरणती तगमग आहे. त्यामुळे माझा अनुभव ऑलमोस्ट थ्रीडी आहे. या सगळ्यामुळे माझ्या मराठी वाचनाला येणारी मिती माझ्या इंग्रजी वाचनाला येणं शक्यच नाही. फार तर एक फूल आहे बा कसलंतरी’ इतपत आकलन शक्य.

अलीकडे लंडनमध्ये भटकंती केल्यावर 'रिव्हर्स ऑफ लंडनवाचायला मला आलेली बेहद्द मजा पाहून मीच चकित झाले आणि मला माझ्या इंग्रजी वाचनातला हा अडथळा नीटच अंतर्बाह्य कळला.

अर्थात - पुस्तकांतून भेटणारी अनेक ठिकाणं चित्तचक्षूंनीच अनुभवायची असतातअसा चश्मिष्ट सल्ला घेऊन काही लोक धावत येतीलच. त्यांना नम्र नमस्कार करून इतकंच सांगणंकी मूलभूत शब्दसामर्थ्य विकसित झाल्यानंतर अद्भुतरम्य आणि कल्पनारम्य जगाची डोक्यात निर्मिती करण्याचा माझा अजिबात नकार नाही : लिटिल प्रिन्सहॅरी पॉटर आणि इस्किलार या तिन्हींतली जादू मी जाणून आहे. पण या काल्पनिकही अनुभवविश्वांचा पोत माझ्या सवयीच्या लिपीमुळे आणि मातृभाषेमुळे बदलतोहे तरीही सत्यच आहे.

आजही एखाद्या इंग्रजी पुस्तकानं माझा पूर्ण ताबा घेतल्यावर त्याचं मराठीकरणरूपांतरगेला बाजार अनुवाद तरीकरायला हात शिवशिवतात ते माझ्या भाषांतरकार असण्यामुळे होतंकी माझं भाषांतरकार असणंच मुळी एका भाषेतून उगवून येण्याशी आणि इतरत्र तितक्या जोमानं वाढू न शकण्याशी निगडीत आहेहे मला नीटसं ठरवता येत नाही. 


आता शिक्षणाची माध्यमभाषाच इंग्रजी होत गेलेली असतानाभाषांतराचा व्यापार लोकांना अव्यापारेषु वाटत असतानापुढच्या पिढीला मराठी वाचनाची गोडी लावायला कधी नव्हे इतकं आणि बरोब्बर उलट्या टोकानं झगडायला लागत असतानाभाषिक वैविध्यातली समृद्धी भल्याभल्यांना समजत नसताना - आपण शेवटच्या डायनॉसोरांपैकी एक असल्याची सुरस आणि चमत्कारिक भावना होते. पण मराठी की इंग्रजी असा प्रश्न अगदी एटीएम मशीननी जरी विचारलातरी भयाकारी भाषांतराचे धोके पत्करूनही मराठीच्या बटणाकडे हात जातो. मग पुस्तकाचं काय विचारता!

***


हळूहळू घरात साचत जाणारी पुस्तकं हा एक अत्यंत डेंजरस विषय आहे.
सतीश काळसेकरांची एक अपरिमित सुंदर आणि चपखल कविता याच विषयावर आहे. जिज्ञासूंनी शोधून पाहावी. नच मिळाल्यास नाइलाजानं पुढे वाचावं.
शालेय काळात पुस्तकं बक्षीस म्हणून किंवा वाढदिवसाची भेट म्हणून मिळत. आगमन वार्षिक असे. संख्या मर्यादित. लायब्र्या ही व्यवहार्य आणि व्यवहारातली संकल्पना होती. कमरेवर कमावता खिसा फुटल्यावर हे गणित हा-हा म्हणता विस्कटलं. पूर्वी लायब्रीतून तीनेकदा तरी आणून भयंकर जवळचं वाटायला लागल्याखेरीज अमुक एखादं पुस्तक विकत आणण्याइतके पैसेच नसत. ते असायला लागले, नि मग आधी हळू आणि मग चक्रवाढ वेगानं पुस्तकं वाढत गेली. आता दर वेळी नवं पुस्तक खुणावतं; तेव्हा घरातली कोरीकरकरीत न वाचलेली पुस्तकं, वाचूनही फार नावडलेली आणि तरी घरी ठिय्या देऊन बसलेली संभावित पुस्तकं, लायब्र्यांच्या धूळ खात पडलेल्या मेंबरशिपा, फेसबुकवत्सापावर जाणारे दिवसाचे अठ्ठेचाळीस तास, निरनिराळ्या लायब्र्यांनी नेटवर कायदेशीररीत्या चढवलेली मराठी आणि अनेक चतुर टेक्नोलॉजिस्टांनी बेकायदेशीररीत्या चढवलेली असंख्य इंग्रजी पुस्तकं... असं स-ग-ळं एकवार डोक्यात चमकून जातं. तरी ‘हे पुस्तक मात्र हव्वंच्च’ अशी ग्वाही – कुणाकडून कुणास ठाऊक – दिली जाते. अतीच झालं, तर ‘कपड्याकॉस्मेटिकांवर नाही ना उधळत आपण?’ अशी एक उगाच उच्चभ्रू सबब पुढे होते. कधीकधी रद्दीवाल्याकडून वा किलोवर पुस्तकं विकणार्‍या प्रदर्शनांतून ‘काय? फक्त पन्नास रुपये?’ असा अविश्वासाचा सूर मनातल्या मनात काढून खरेदी होते.
पण अखेर पुस्तकं घरी येत राहतातच.
‘आता ही पुस्तकं मला नको आहेत. भिकार आहेत. कालबाह्य आहेत. निरुपयोगी आहेत. तुम्हांला कुणाला हवी तर न्या. नाहीतर मी रद्दीत विकणारे. देणगीबिणगी म्हणून दिली लायब्रीला, तर शेवटी ती पडूनच राहतात कुठेतरी त्यांच्या कोपर्‍यात. रद्दीवाल्याकडून कुणीतरी हौसेनं नेऊन वाचील तरी...’ अशी लांबलचक (जीएप्रणित) स्पष्टीकरणं लोकांना (आणि स्वतःला) देऊनही अशा टाकायला काढलेल्या पुस्तकांच्या चळती सहा-सहा महिने घरात लोळत पडतात.
अमुक पुस्तक नेमकं कुठे आहे याचा आपल्या डोक्यातला हिशेब अचूक असतो, अशी घमेंड मिरवायची सवय असते. कुठल्यातरी एका टप्प्यावर ती घमेंड आपल्याला तोंडघशी पाडते. कुठलंतरी पुस्तक गहाळ असतं आणि ते कुणी वाचायला नेऊन ठार विसरलंय हे काही केल्या आठवत नाही. लोकांच्या हलगर्जीपणाबद्दल थयथयाट करून होतो. पण खरा राग आपला आपल्यालाच आलेला असतो. ‘आपलं पुस्तक, नि आपल्याला पत्ता नाही, अं?’छापाची चिडचिड. मुक्यानं साहायची. कधीतरी चक्क आपल्याकडे पूर्वी असलेल्या पुस्तकाची एक प्रत अधिक विकत घेतली जाते. कारण पूर्वी पुस्तकं डोक्यात जशी गोंदली जायची, तशी अलीकडे जात नाहीत, हे कटू असलं तरी सत्य असतं. हा फटका वर्मी बसतो.
आपण पुस्तकांचा पसारा आवरायला नि लावायला काढतो. अजून काही लापता पुस्तकांचा तलास लागतो. रद्दीसाठी अजून एक चळत निघते. ‘आता ही इथे लोळत राहू देणार नाही, मीच नेऊन देते कशी...’ असा बाणेदारपणा दाखवून रद्दीवाल्याकडे फेरी होते आणि येताना थोडी जीर्ण पुस्तकं कनवटीला लावून आपण परततो.

चालायचंच. काळसेकरांची पुन्हा आठवण काढायची, तर ‘पुस्तके येत राहतात....’

***


काही पुस्तकं आपल्याला वॉन्डसारखं खुणावतात, निवडतात.

असं श्रीनांचं ‘माणूस आणि लेखक’ हे मला जाम आवडणारं आत्मचरित्रात्मक पुस्तक. वास्तविक त्यातही विश्राम बेडेकरांच्या‘एक झाड दोन पक्षी’तल्या सारखा ओढून-ताणून त्रयस्थपणाचा आव आहे क्वचित कुठेकुठे. पण तो गालबोटाइतपतच. बेडेकरांच्या पुस्तकाइतका कोरडेपणा नाही. शिवाय जामच काय-काय धमाल तपशील. विंदांसोबतचा पत्रव्यवहार. कोकणातला प्रादेशिक लेखक म्हणून प्रसिद्धीस आल्यानंतर पावट्याची शेंग असते की कणीस असतं, याबद्दलचा थोर संभ्रम. मुंबई सोडून जाण्याचे फसलेले प्रयत्न. स्वतःचं धन्य-धन्य कौतुक. थक्क करणारा प्रामाणिकपणा. काही विद्ध करणार्‍या आठवणी. मुलीनं पसंत केल्यावरही तिला दुसर्‍यांना भेटून आपल्या परिस्थितीचं भीषण वर्णन करण्यातला नितळ-निरागस गाढवपणा. असली एकेक रत्नं. हे पुस्तक वाचताना ‘लव्हाळी’तल्या सर्वोत्तमचाच विंगेतला अवतार भेटत असल्याचा भास होत राहतो.

परिणामी पुस्तकात दोष असूनही मला ते कमालीचं प्रिय.

पूर्वी ते सहजासहजी मिळत असे. पण माझ्याच नाकउडवूपणापायी ते ‘घेऊ नंतर’ गटात गेलं ते गेलंच. नंतर कधीतरी लायब्रीतून आणून ते वाचलं आणि प्रचंड आवडलं. मग लायब्रीतूनच तीनचारदा आणून पारायणं केली. आता आणूनच टाकू म्हणून दुकानी गेले, पुस्तक‘औटॉफप्रिंट ए हो. नाही मिळत आता.’ अशी तोंड भरून बोळवण.‘एखादी प्रत तरी बघा. जुनीपानी मळकी-फाटकीही चालेल. पण प्लीज बघा.’ अशा विनवण्या करूनही डाळ शिजेना. मग एकदा लायब्रीतलीच प्रत आणवून चक्क झेरॉक्सून घेऊ असं ठरवलं. आणलं तर काय, मधल्या काळात प्रतीची रीतसर बांधणी झालेली. पुस्तक धड पुरतं उघडून वाचायलाही कष्ट पडत होते. झेरॉक्सबिरॉक्स निघणं शक्यच नव्हतं. तोवर बुकगंगा वाहायला लागली होती. तिथेही गळ टाकून ठेवला. पण तिथे ‘नॉट इन स्टॉक’ची लाल पाटी. परचुर्‍यांच्याच दरबारी हस्तेपरहस्ते विचारणा करून पाहिली. ‘अहं, नाही हो. आमच्याकडेच प्रत शिल्लक नाही...’

शेवटी मी हताश होऊन नाद सोडला. लायब्र्या हाच वाचकजातीचा अंतिम आधार आहेत, यावर श्रद्धा ठेवली आणि अधूनमधून प्रत घरी आणवण्याचा प्रघात ठेवला.

एका कामकरी संध्याकाळी कधी नव्हे तो स्टेशनातून घरी चालत यायचा किडा चावला. वास्तविक त्या दिवशी खिशात पैसेही नव्हते. पुस्तकं विकत घेण्याचा काही विचारही नव्हता. पण ठाण्यातल्या‘मॅजेस्टिक’वरून जाताना मला अक्षरशः कुणा कर्णपिशाच्चानं कान फुंकल्यासारखी तळघरात उतरायची बुद्धी झाली आणि मी आपली आत शिरले. आत शिरल्या-शिरल्या नवी पुस्तकं. मग ‘मॅजेस्टिक’ची घरची पुस्तकं. मग शब्दकोश. मग ‘मौजे’चा कप्पा. त्यातच तळाशी ‘परचुरे’ आणि ‘अक्षर’चा संसार. इकडे-तिकडे न बघता थेट‘मौजे’पाशी गेले. खाली ‘माणूस आणि लेखक’ची एकमात्र प्रत नांदत होती.

चकित होण्याच्या पलीकडचे भाव माझ्या चेहर्‍यावर उमटले असणार.

काडीमात्र विचार न करता, कुणीतरी हे पुस्तक आता नाहीसं करणार आहे, अशा भीतीनं मी ते पुस्तक उचललं आणि काउंटर गाठला. ‘ही प्रत मला हवीय. मी पैसे काढून आणते.’ असं म्हणून पुस्तक ठेवून बाहेर आले. एटीएम हुडकून पैसे काढले आणि धावत जाऊन प्रत ताब्यात घेतली.
योगायोगाच्या पलीकडचं काहीतरी त्या पुस्तकाशी जोडलं गेलं आहे आता माझ्या डोक्यात. 

अशीच जीएंच्या ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ची गोष्ट. तोवर मी जीए अजिबात वाचलेले नव्हते. पत्रं तेवढी फार प्रेमानी वाचली होती. काही कथा. बस. त्या दिवसांत एका मित्रानं ते पुस्तक मला दिलं. अतीव आवडलं. अर्धवट-अपुरं वाटलं, तरीही फार आवडलं. प्रत काही नवीबिवी नव्हती. जुनीपानी. शिळीच खरंतर. कारण मित्राला रद्दीवाल्यांचा शौक. तिथून उचललेली ती प्रत.

पुरं केल्यावर पुन्हा उघडलं आणि पहिल्याच पानावरचं, आधी लक्ष्यात न आलेलं नाव बघून मी दचकले. त्यावर चिपळुणात राहणार्‍या माझ्या एका मामीचं नाव होतं. मित्राला खोदून खोदून रद्दीवाल्याचा ठावठिकाणा विचारला. तो मुलुंडमधला कुठलातरी. मी ठाण्यात.

मग मामीला गाठून ते पुस्तक नक्की कुठल्या जत्रेत तिच्यापासून‘बिछडलं’ होतं ते विचारायचा प्रयत्न केला. तिला काहीही आठवेना. रद्दीत टाकल्याचंही आठवेना, हरवल्याचंही आठवेना. नाव तर तिच्याच हस्ताक्षरातलं.
मित्र आणि मामी अशा दोघांनाही सांगून-सवरून ठेंगा देऊन मी ती प्रत रीतसर ढापली.
पुढे कधीतरी आपल्याकडची जुनी पुस्तकं वाचायला देऊन टाकताना त्यावर आपलं नावगाव लिहायचा नि पुस्तकाला जाणीवपूर्वक अज्ञाताच्या प्रवासाला धाडण्याचा अमेरिकी खेळ ऐकूनही मी पुरेशा आनंदाश्चर्यानं चीत्कारले नाही, याला कारण माझ्या बाबतीतला हा योगायोग असणार. 

अशी काही पुस्तकं माझ्या मित्रांच्या बालपणातली. प्रेमानं माझ्याकडे नांदायला धाडलेली. काही माझ्याकडून मित्रांकडे गेलेली. काही पुस्तकं काही देखण्या चित्रांची कव्हरं घालून आलेली. आता मूळची मुखपृष्ठंही विसरून नवेच चेहरे मिरवणारी. योगायोग नव्हेत त्यात, पण आपल्या जवळच्या माणसासाठी आपल्या वस्तूवरचा स्वामित्वभाव सोडून देण्याचा हृद्य धागा आहे. पुस्तकातल्या साहित्यापलीकडचं काहीतरी त्या पुस्तकाला येऊन मिळालं आहे आणि आता दोन्ही वेगवेगळं करता येणं शक्य नाही. कधीतरी ही पुस्तकंही रद्दीत जातील, कुणी सांगावं. त्यांना लगडून असलेल्या आठवणी तरीही उरतील. कुण्या अनाम वाचकाच्या गोष्टीतली गोष्ट होतील..

***

चातुर्मास*, ‘कालनिर्णय’ची मागची पानं, पाककृतींची पुस्तकं, वर्तमानपत्रांच्या पुरवण्या, डॉक्टरांच्या नि ब्यूटीपार्लरांच्या वाट पाहायच्या खोलीतच सापडणारी गुळगुळीत कागदांवरची इंग्रजी-मराठी मासिकं हा साहित्याचा एक दुर्लक्षित पण सुरम्य असा भाग आहे. वर्तमानपत्रांच्या पुरवण्या तरी त्यातल्या त्यात प्रतिष्ठित. इतर मजकुराची मात्र साहित्यात जिम्मा केली जात नाही हे मला कृतघ्न वाटतं. इतर पुस्तकं वाचणे ही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक वाटचालीतली धोंड आहे अशी समजूत एका विशिष्ट वयात निदान आमच्या आईवडलांच्या पिढीपर्यंत तरी यच्चयावत पालकांना पछाडत असे. अशा वेळी कथाकादंबर्‍यांची रसद तुटून उपासमार होई. विशेषतः त्या काळात – आणि खरं तर कायमच – मला या साहित्यानं अनेकदा हात दिला आहे. 

चातुर्मासामधल्या कहाण्या वाचताना सत्यनारायणाला आलेल्या भटजींसारखा एखादा टकलू इसम मदरशांमधल्या कोर्‍या चेहर्‍याच्या मुलांप्रमाणे निर्बुद्धपणे मागेपुढे झुलत एका विशिष्ट सुरात, योग्य त्या ठिकाणी विराम घेत आणि हेलकावे देत आपल्याला कहाणी ऐकवतो आहे असा भास होई. त्या कहाण्यांमधली ‘निर्मळ मळे, उदकाचे तळे...’, ‘मग तिनं काय करावं? एक पळसाचं पान घ्यावं.’सारखी तालबद्ध वाक्यरचना; ‘झोटिंग’, ‘केनीकुर्डू’, ‘टाकळ्याचं बी’ असे लोकविलक्षण शब्द; आटपाट नगरं आणि आवडत्या-नावडत्या राण्या असलेली अद्भुत विश्वं; आणि ‘पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण’ करणारे ठसठशीत शेवट... चातुर्मासाची पोथी बघून य वर्षं झाली, तरीही मला जसेच्या तसे स्मरतात. 

तशीच ती पाककृतींची पुस्तकं. ताज्या पुस्तकांपेक्षा हळदीचे डाग ल्यालेली, पत्रावळ्या झालेली आणि चांगल्या आजी-वयाच्या बायांनी लिहिलेली पाकृपुस्तकं कादंबर्‍यांसारखी वाचायला बेष्ट. ‘कोंबडीचे अर्धे पिलू’ घ्यायला काय सांगतील, ‘दोन तोळे वेलदोडे’ कुटायला काय सांगतील, ‘चांदीच्या वाटीतून वाढावी आणि सढळ हस्ते तूप सोडावे’ असल्या पेशवाई सूचना काय देतील... नुसती धमाल. उपाशीपोटी मात्र असली पुस्तकं वाचू नयेत, चिडचिड होते.

गुळगुळीत कागदावर छापली जाणारी मराठी मासिकं – त्यातही आपण हे बायकांसाठी छापतो आहोत, अशी क्लॅरिटी असलेल्या संपादकांची – हाही एक उत्तमपैकी करमणूकप्रकार आहे. एकदा तर अशा एका मासिकातली ‘कामात रमलेल्या पतिदेवांसाठी देहाची निगा कशी राखावी’ याचे हातासरशी धडे देणार्‍या एका ललनेची कथा वाचताना माझा नंबर लागला, तरी मी बेशरमपणे त्या गावचीच नसल्याप्रमाणे बसून राहून कथा पूर्ण केली होती. नाहीतर असल्या धमाल कथा घरी कुठून वाचायला मिळणार?! 

‘कालनिर्णय’च्या मागच्या पानांवर हल्ली असली जमाडीजंमत असते की नाही कुणास ठाऊक. मोबाइलांनी मनगटी घड्याळांची तर हकालपट्टी केलीच, तशी आता क्यालेडरांचीही होण्याच्या मार्गावर आहे, याकडे मराठी सारस्वत थोडे लक्ष्य पुरवील काय?!

*योग्य शब्द ‘चतुर्मास’ असा आहे हे मला ठाऊक आहे. पण निदान या पुस्तकाच्या बाबतीत तरी ते विशेषनाम पदाला पावलं असल्यामुळे बदल केलेला नाही.

***
सशाच्या चालीनं आणि विणीनं घरात येऊन हातपाय पसरणारी पुस्तकं जाताना मात्र कासवं होतात. एकेका पुस्तकाच्या दोन प्रती असल्या; तरी एक लहानपणापासून हाताळलेली, नजरेला सवयीचा-नॉस्टाल्जिक करणारा टंक असलेली, कुणाची सही ल्यालेली, खास कुणीतरी भेट दिलेली.. नाना कारणं. इ-प्रतींमुळे जागा वाचते... फुकटच्या फाकट भावुक नि भाविक होऊ नये वाचकानं... आशय खरा महत्त्वाचा... जग कुठे चाललंय... सेंद्रिय प्रेम इज ओव्हर्रेटेड्... असे चटपटीत युक्तिवाद सराईतपणे टाइपणारे हात रेंगाळतात कागदांपाशी. काय असतं असं पुस्तकात? कधी पाय घसरेल ते सांगता येत नाही इतक्या माजलेल्या शेवाळी उपमाउत्प्रेक्षा नि सुविचार टाळून बोलायचं  झालं, तर उसनवारीला पर्याय नाही : पुस्तक पोर्ट-की असतं. चांगलं जगायचं असेल, तर माणसांचे काही भ्रम टिकावेत तशा या पोर्टक्याही टिकाव्यात. टिकतील. टिकोत.

4 comments:

  1. मेघना तुझा पुस्तक पसारा वाचला..आवडला...आता माझा पुस्तक पसारा आवरते...छान लिहितेस.��

    ReplyDelete
    Replies
    1. आवरला का?! आभारी आहे.

      Delete
  2. प्रेमळ, उत्साही लिखाण. शब्द शब्द सालंकृत. लिहित्या राहा!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार. इन्शाल्ला, बचेंगे तो और भी लिखेंगे!

      Delete