Tuesday 19 June 2018

गोष्टीचं गाणं

बुद्धाला गोष्टींचं भारी वावडं.
रडू आलं, हसू आलं, जर्रा जरी रागेजलं-
लगेच म्हणतो, सावध मुली, गोष्टींचं हे कातडं.
गोष्टी रंगवून देतात
गोष्टी गुंगवून टाकतात
गोष्टी विणतात रेशमाचं जाळं
गोष्टीच्या आरशात मृगजळाचं तळं
बघता बघता पाय त्यात फसत जातात
गोष्टी म्हणे तुझी दृष्टी गिळत जातात...
आंधळेपण नको मुली, वेळीच सोडव आतडं.
बुद्धाला गोष्टींचं भारी बाई वावडं.

बुद्ध मोठा शहाणा असेल त्याच्या घरी
झापडबंद माझी नजर गोष्टीत केवढी खरी
गोष्टी फक्त रंगवत नाहीत
नव्या वाटा चितारतात
गोष्टी फक्त गुंगवत नाहीत
कातरवेळी कुशीत घेतात
गोष्टी समजून गातात गाणं
गोष्टी रचतात हसरं जगणं
बघता बघता शून्यापोटी समष्टी पेरतात
गोष्टी मला कोवळी दृष्टी देत जातात.
गोष्टीत हसीन, गोष्टीत रडीन,
दहा दिशांनी जगून घेईन
बुद्धालाही रंगवीन गोष्टीत -
असेना का त्या वेड्याला गोष्टीचंही वावडं!

5 comments:

  1. Concept far chhan.pan rachana nehami sarakhi khoop akadam apali vatali nahi.rachalyasarakhi vatali jast.

    ReplyDelete
    Replies
    1. होय, रचलेलीच आहे खरी.

      Delete
  2. गोष्टी लहानपण देतात, त्या डोंगरात घेऊन जातात..
    गोष्टी स्वप्नात नेतात, त्या रानात घेऊन जातात...

    ReplyDelete
    Replies
    1. लहानपण... I don't know. गोष्टी बर्‍याच कुठे कुठे नेतात, हे खरं मात्र.

      Delete