Friday, 29 June 2018

मला समारंभ दचकवतात

मला घरगुती समारंभ दचकवतात.

आमंत्रणाच्या पायरीला ते खरेच निरुपद्रवी वाटू शकतात. कधी-कधी तर 'का बरं आपण यांना इतकं बिचकतो?' असा अचंबाही थोडा वेळ वाटावा, इतकी गोडगुलाबी-लालसोनेरी मजाबिजा त्यांत असल्याचं एकूण वातावरण असतं. पण जसजशी नव्हाळीची पंधरावीस मिनिटं उलटत जातात, तसतसा डोक्यातला काटा कंटाळा, वैताग, राग, दमणूक, व्याकुळता असे आकडे दाखवायला लागतो...

शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा तिथे आपल्याला जन्मानं मिळालेली तरी माणसं असतात किंवा त्यांच्या बाबतीत आपलं निवडस्वातंत्र्य शून्य असतं. (ते त्याहूनही कमी असू शकतं, जोडप्यांच्या बाबतीत. पण ते एक वेगळंच प्रकरण आहे. त्या जमातीचे स्वतःचे असे स्वतंत्र फायदे-तोटे असल्यामुळे त्यात मी तूर्त पडणार नाही.) तर - आपलं निवडीचं स्वातंत्र्य शून्य असल्याचं दर्शवणारी बहुतांश माणसं भोवताली असतात. ही माणसं त्रासदायकच असतात असं नव्हे. त्यांचं असं काहीतरी उपयुक्ततामूल्य असतंच. पण त्या घडीला आपल्याला त्या उपयुक्ततेशी घंटा काही देणंघेणं असत नाही, आणि तरीही आपण अडकलेले असतो. त्या हतबलतेचा एक सूक्ष्म सल आपल्याला हळूहळू घेरू लागतो. लोक आनंदानं वा निरुपायानं एकमेकांशी मजेच्या वा उपचारापुरत्या गप्पा ठोकत असतात. आपण मात्र 'आपण इथे नक्की काय करतोय?' या प्रश्नाच्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात केलेली असते. फोनची बॅटरीही वेगानं कमी होत असल्याचं लक्ष्यात येण्याची हीच ती वेळ. बॅटरीचा इंडिकेटर बघून एकदम काळजात धस्स होतं. पॉवर बँक नाही हे लक्ष्यात येऊन नैराश्याची दुसरी लाट येते. ती कशीबशी जिरवून आपण इकडेतिकडे पाहतो. मस्ती करायला एरवीपेक्षा मोकळी जागा, पालकांचं मर्यादित लक्ष्य, इतर काही मीलनोत्सुक समवयस्क सामाजिक सदस्य, गोड आणि तेलकट चरायला मुबलक चारा... असं सगळं लाभलेली पोरं मनोभावे पिसाळून इतस्ततः मोकाट सुटलेली असतात.  वयोवृद्ध आणि वयोपरत्वे थकलेले लोक कृतकृत्य, चिंताग्रस्त आणि करुण या तिन्ही भावांचं मिश्रण चेहर्‍यावर मिरवत असतात. वयोवृद्ध असतील पण थकलेले नसतील, असे लोक आपली भयंकर उपद्रवक्षमता म्यान केल्यागत दाखवत इकडून तिकडे विजेच्या वेगानं सळसळत असतात. क्षणात इथे तर क्षणात तिथे, घटकेत स्टेजपाशी तर पुढच्या क्षणी दारात स्वागताला... अशी, एखाद्या मायावी राक्षसिणीलाही लाजवील, अशी त्यांची हालचाल असते. त्यांची उपद्रवक्षमता आपल्यावर पाजळली जाऊ नये, म्हणून आपण बसल्या खुर्चीतच थोडा आडोसा मिळवण्याचा माफक प्रयत्न करतो. बसली खुर्ची, हे एक निराळंच प्रकरण असतं. अंगावरचे, सूत सोडून इतर कोणत्याही छळवादी धाग्याचे कपडे आपल्या अंगाला टोचत असतानाच त्या खुर्चीवरून मात्र सुळुसुळु सटकत असतात. जरा आरामदायी आसन साधलं की बूड तरी बाहेर सांडतं नाहीतर आख्खे आपणच त्या खुर्चीतून घसरू लागतो. पोरांनी चरलेले ते तेलकट आणि गोड पदार्थ आपल्याला लाभलेले नसतील, तर 'आपण इथे काय करतोय?' या प्रश्नाचं उत्तर पोट देतं आणि कंटाळ्याची जागा वैताग घेतो. ते पदार्थ जर लाभले असतील, तर मात्र अधिकच कठीण अवस्था. तोवरच्या कंटाळ्यानं आलेला अनिवार थकवा आणि पोटात गेलेलं जडान्न मिळून भयावह परिस्थिती होते. त्या क्षणी साक्षात पॉवर बँकही तितकीशी मनोरम वाटत नाही. अंगांगाला हवी असते, ती फक्त साडेतीन हाताची जागा. देहाची जुडी जिथे अंथरावी, असा एक निवारा. तो इतक्यात मिळणार नाही; वाटेत काही न थकलेली वयोवृद्ध मंडळी, काही उत्साही तरुण मंडळी, काही ट्रेनस्टेशनं, नशीब वाईट असेल तर मेगाब्लॉक... इत्यादी लागणार आहे... हे साक्षात्कार झाले, की आपण स्वतःवरच पिसाळतो. कुठल्या दळभद्री क्षणी आपण यायला 'हो' म्हणून बसलो, हे स्वतःला खोदून-खोदून विचारतो. उत्तर मिळत नाही. अखेरचा प्रयत्न म्हणून आपण फोनची बॅटरी गेली खड्ड्यात असं म्हणून फोन उघडतो. वेळ आणि रिमोट आपल्यापाशी असताना जगातल्या कोणत्याही टीव्हीवर कायम सूर्यवंशम, बिग बॉस आणि संसदेच्या कामकाजाचं प्रसारणच लागलेलं असतंं; या न्यायानं तेव्हा फोनवरही काडीमात्र टाईमपास होऊ शकत नाही. एरवी फेसबुकी आणि वत्सापी आणि संस्थळी भांडायला सरसावलेले यच्चयावत लोक घरी पंखे सोडून निवांत घोरत असतात वा शहाण्यासारखे एखाद्या पिक्चरला तरी गेलेले असतात. माणूस अखेर एकटाच असतो या चिरंतन सत्यापाशी आपल्याला व्याकूळ अवस्थेत सोडून फोनही राम म्हणतो. आपण नशिबापुढे हात टेकतो.

पुढचं काही आठवण्यात हशील नाही. कधीतरी घर दिसतं खरं. पण तोवर एका सोन्यासारख्या मोकळ्याढाकळ्या दिवसाची माती झालेली असते. 'सगळे भेटले पण....' असा एक गळी सूर काढून त्या मातीला आकार देण्याची केविलवाणी धडपड करायचं बळ माझ्यात नाही. त्यामुळेही असेल...

मला घरगुती समारंभ दचकवतात.

Tuesday, 19 June 2018

गोष्टीचं गाणं

बुद्धाला गोष्टींचं भारी वावडं.
रडू आलं, हसू आलं, जर्रा जरी रागेजलं-
लगेच म्हणतो, सावध मुली, गोष्टींचं हे कातडं.
गोष्टी रंगवून देतात
गोष्टी गुंगवून टाकतात
गोष्टी विणतात रेशमाचं जाळं
गोष्टीच्या आरशात मृगजळाचं तळं
बघता बघता पाय त्यात फसत जातात
गोष्टी म्हणे तुझी दृष्टी गिळत जातात...
आंधळेपण नको मुली, वेळीच सोडव आतडं.
बुद्धाला गोष्टींचं भारी बाई वावडं.

बुद्ध मोठा शहाणा असेल त्याच्या घरी
झापडबंद माझी नजर गोष्टीत केवढी खरी
गोष्टी फक्त रंगवत नाहीत
नव्या वाटा चितारतात
गोष्टी फक्त गुंगवत नाहीत
कातरवेळी कुशीत घेतात
गोष्टी समजून गातात गाणं
गोष्टी रचतात हसरं जगणं
बघता बघता शून्यापोटी समष्टी पेरतात
गोष्टी मला कोवळी दृष्टी देत जातात.
गोष्टीत हसीन, गोष्टीत रडीन,
दहा दिशांनी जगून घेईन
बुद्धालाही रंगवीन गोष्टीत -
असेना का त्या वेड्याला गोष्टीचंही वावडं!