हा ‘दिव्य मराठी’च्या मधुरिमा पुरवणीत लिहिलेला लेख. मृण्मयी रानडे यांच्या पाठपुराव्यामुळे लिहिलेला.
इथे तो पूर्वप्रकाशित आहे. पण मला लेखावरचं चित्र तितकंसं आवडलं
नाहीय. म्हणून इथे स्वतंत्र देते आहे. माझ्या डोक्यात हातात एखादा गुंड्याभाऊ-स्टाइल
सोट्या घेतलेला भ या अक्षराचा मनुष्यावतार होता! पण कल्पनेची धाव... असो. लेखात मागाहून
काही शुद्धिपत्रीय किरकोळ बदलही केले आहेत.
***
मला
शिव्या अतिशय उपयुक्त वाटतात. कळत्या वयापासून, नीट लक्ष्यपूर्वक ऐकून, आत्मसात करून, प्रतिपक्षाला दचकवण्याची शिवीची ताकद
अनुभवत मी शिव्या शस्त्रासारख्या वापरत आले आहे.
अलीकडे मात्र असं जाणवायला लागलं की, शिवी देण्याच्या आपल्या हक्काचं दुहेरी समर्थन द्यायला लागतं आहे. एका बाजूनं - पारंपरिक लोकांच्या समजुतीशी लढताना - वडीलधाऱ्या माणसांसमोर शिवी देऊ नये, बाईनं शिवी देऊ नये, शिकल्यासवरल्या माणसानं शिवी देऊ नये, सुसंस्कृत माणसानं शिवी देऊ नये... एक ना दोन. दुसऱ्या बाजूनं - पुरोगामी विचाराच्या लोकांशी वाद घालताना. त्यांच्या मते शिवी दिल्यामुळे म्हणे स्त्रियांचा अपमान होतो. त्यात मी – एका स्त्रीनं – शिवी दिली, म्हणजे तर ‘बायकाच बायकांना छळतात!’ छापाच्या आचरट समजुतीला घनघोर पाठबळच. त्यामुळे अशा संवेदनाखोर समूहांमध्ये शिवीला ठारच बंदी. परिणामी तिथेही झगडाच. पार वैताग वैताग झाला. मग मी नीट तपासायलाच घेतलं. मला शिव्यांबद्दल नक्की काय वाटतं ते.
होतो
का शिव्यांमधून स्त्रियांचा(च) अपमान? कोणत्या प्रसंगी, कोणत्या
माणसांच्यात देते मी शिव्या? कुणाला दिल्या तर त्या जाम
परिणामकारक ठरतात? शिव्या नक्की अपमान तरी कुणाचा करतात?
त्यांच्या निर्मितीमागे काही तर्कशास्त्र दिसतं का?
शिव्यांमध्ये
एकतर गुह्यांगाचे उल्लेख असतात नाहीतर संभोगक्रियेचे तरी. या दोन्ही गोष्टी उघड
उच्चारणं सामाजिक संकेतांच्या विरुद्ध आहे. साहजिकच त्याबद्दल एक प्रकारची विकृत
कुतूहलाची भावना असते. ही विकृत कुतूहलाची भावना फक्त संभोगाबद्दलच नव्हे, तर शारीरिक
उत्सर्जन क्रियांबद्दलही असते, हिडीस मरणकथांबद्दलही असते.
उत्सर्जनासाठी वापरली जाणारी इंद्रियं, अभद्र मानलं गेलेलं
मरण या विषयांवरून किती शिव्या आहेत, त्याची उजळणी केलीत,
तरी ते सहज ध्यानी येईल. ज्या गोष्टींबद्दल बोलणं संस्कृतीनं
निषिद्ध मानलेलं असतं, अशा सगळ्याच गोष्टींचा उच्चार
करण्याची ऊर्मी ही बंडखोरीची नैसर्गिक प्रेरणा असते. पौगंडवयात ही विशेष उसळून
येते. जे ‘करू नका’ म्हणून बोंब ठोकली
जाते, ते पहिलं करून पाहायचं. सहज येताजाता प्रेमातल्या
दोस्तालाही शिवी देऊन बोलावणं आणि त्याने त्या शिवीला केवळ संबोधन मानणं हा जो
कमाल आकर्षक प्रकार आहे, तो या बंडाचाच भाग असावा.
नाही
पटत?
‘कल्पनेच्या तीरावर’ नावाची वि. वा. शिरवाडकरांची एक कादंबरी आहे. संस्कृतीनं मानलेल्या - जपलेल्या विधिनिषेधाच्या कल्पनांमुळे कायकाय गंमतीजमती होतात; आपण ज्याला ‘निसर्गसुलभ’ मानवी भावभावना मानत असतो त्या भावना अशाच कृत्रिम संस्कृतिजन्य कल्पनांतून कशा जन्माला आलेल्या असतात; यावर ती कादंबरी मजेशीर भाष्य करते. उदाहरणार्थ, त्या कादंबरीतल्या शशशृंग देशात शरीरसंबंध ही अगदी मोकळेपणानं, चारचौघांत करण्याची बाब आहे. पण भोजन? अब्रह्मण्यम! ते करायचं तर खरं, पण चार भिंतींच्या आड. परक्या माणसांच्या दृष्टीपल्याड. यातून जे काही मजेशीर संकेत जन्माला येतात, ते येतात. मला या विषयावर विचार करायला लागल्यावर एकदम शशशृंगवासीयांची आठवण झाली. ते कसल्या शिव्या देत असतील? ‘अरे भुक्या जबड्याच्या!’ किंवा ‘भस्म्या ढेरीच्या’ अशा प्रकारच्या असतील का? काय की. मुद्दा असा आहे की, ज्या गोष्टी निषिद्ध असतात, त्यांच्याभोवती शिव्या घोटाळतात.
संततिदोष
येऊ नये म्हणून संस्कृतीनं इन्सेस्ट (रक्ताच्या नात्याच्या आप्तांशी ठेवलेला
शरीरसंबंध) निषिद्ध मानला. पण शिवीला तर कमाल हिंसा साधायची असते. ती साधणं कधी
शक्य होईल? ज्या
माणसाला उद्देशून शिवी द्यायची आहे, त्या माणसाकडून
संस्कृतीनं सर्वाधिक निषिद्ध मानलेलं हे पाप घडल्याचं सुचवलं जाईल तेव्हा. बहुधा
त्यामुळेच आई किंवा बहीण या परंपरेनं संभोगासाठी निषिद्ध मानलेल्या नात्यांच्या
बाबतीतच शिव्या दिल्या जातात.
पण ही
सगळी तर्कशुद्ध कारणं झाली. खेरीज शिवी वापरण्यामागे काही व्यावहारिक, काही शारीरिक,
तर काही मानसशास्त्रीय कारणंही असतात.
शिवीच्या उच्चारात प्रचंड जोश-जोम असतो. एक प्रयोग करून पाहा. एखादी मस्तपैकी भ-कारी शिवी घ्या. घेतलीत? आता ती ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे...’ या गाण्यात ‘जिवलगा’या शब्दाच्या आर्त आळवणीच्या चालीवर बसवून बघा. काय होतं? अर्थात. नाहीच ती शिवी शिवीसारखी वाटणार! आता एक उलट प्रयोग करून पाहा. सणराज्ञी हा शब्द उदाहरणादाखल घेऊ. भ्यायचं कारण नाही. सणराज्ञी म्हणजे सण + राज्ञी, अर्थात सणांची राणी, दिवाळी. शब्दार्थात काहीसुद्धा प्रक्षोभक नाही. पण तुमच्या मॅनेजर बयेनं तुम्हांला रविवारीही हापिसला यायला भाग पाडलं आहे अशी कल्पना करा आणि करा बघू तिचं वर्णन हा शब्द उच्चारून. ‘सण्राज्ञी कुठ्ली!!’ हांगं आश्शी! पडला ना जोर? याला म्हणतात, उच्चारातला जोम.
अजून
एक लक्ष्यात आलं का तुमच्या? बहुतांश शिव्यांमध्ये भ आणि झ यांसारखी अक्षरं असतात. भ आणि झ
यांची फोड करून बघा बरं. दोन्हीमध्ये ‘ह’कार आहे. हं! तर - ह या अक्षराला महाप्राण म्हणतात. कारण त्याचा उच्चार
करताना आपल्या फुफ्फुसांतून हवा – अर्थात प्राण - जोरात
बाहेर फेकले जातात. आता तुमच्या छातीतून प्राण जोरात बाहेर फेकले जाताहेत, याचं भान ठेवून करा बरं भ आणि झ या अक्षरांचा उच्चार. तुमच्या लक्षात येईल,
तो करताना आपोआपच एक झटकासदृश क्रिया होते आणि एकदम सगळं ताजंतवानं
होतं. काहीतरी मुळापासून उपटून बाहेर काढून टाकल्याची मोकळेपणाची भावना होते.
हे झालं शारीरिक स्पष्टीकरण. पण बरेचदा शिवीमागे व्यावहारिक वा मानसशास्त्रीय कारणही असतं. कसं होतं, अनेकदा काही कारणांनी हिंसा करायची तीव्र गरज दाटून येते. पण ती करणं अनेक कारणांनी शक्य नसतं. कधी प्रतिपक्ष आपल्याहून अधिक बलवान असतो. कधी सामाजिक संकेत आणि नियम पाळणं – निदान शारीरिक हिंसेची पातळी तरी न गाठणं - अनिवार्य असतं. अशा वेळी शिवी नीट वापरली, तर प्रतिपक्ष एकदम दचकतो, बावचळतो, अपमानित होतो. कोणतीही शारीर हिंसा न करता असा परिणाम साधू देणारी शिवी म्हणजे एक भारीपैकी शस्त्रच असतं. कधीकधी असंही होतं की, परिस्थितीसमोर तुम्ही निव्वळ हतबल असता. काहीही करता येणं मुळी शक्यच नसतं. क्वचित काही करूनही फायदा नसतो. दोष कोणत्याही एका व्यक्तीचा नसतो, पण आपलं मात्र प्रचंड नुकसान झालेलं असतं. अशा वेळी शिवी देऊन काहीतरी केल्याचा, हल्ल्याचा, प्रत्युत्तराचा आभास निर्माण करता येतो. निचरा झाल्यासारखं वाटतं. त्याने तात्पुरता दिलासा मिळतो. सर्वनाशाच्या प्रसंगी अबल व्यक्ती ‘तळतळाट’ देते, ‘शिव्याशाप’ देते, हा संदर्भ लक्षात घेतला तर हे स्पष्ट होईल.
अर्थात, मी हे काही नवीन ज्ञान म्हणून मांडत नाही. राजवाड्यांपासून ते मराठ्यांपर्यंत अनेकांनी या गोष्टीचा रीतसर अभ्यास केलेला आहे. मी एक बारकासा शोध माझ्यापुरता निराळ्या वाटेनं लावून पाहते आहे, इतकंच.
असो. तर माझ्या चरफडीच्या मूळ कारणाकडे जाऊ. बाईचा शिव्यांतून अपमान होतो, हे झेंगट आलं कुठून? अनेकदा शिव्या पुरुषप्रधान संस्कृतीचा चेहरामोहरा लेऊन येतात, हे खरं आहे. त्यातून? ही मानसिकता शिवीपासून सुटी करता आली, तर शिवीची एका तरी अनावश्यक जोखडातून मुक्तता होईल? पत्रकार व लेखक प्रतिमा जोशींनी लिहिलेला एक किस्सा एका मित्राकरवी ऐकला आणि तोही प्रश्न सुटला.
किस्सा असा. कुर्ला स्टेशन, लोकलचा बायकांचा डबा, दुपारची वेळ, नेहमीची धक्काबुक्की. कुणीशी मागून ओरडली, ‘ए चढा गं पटापटा. निस्ते कुल्ले हालिवतात. मायचा भो...डा त्यांच्या.’ त्यावर प्रतिमाबाई तत्काळ उत्तरल्या, ‘मायचाच कशाला? बापाला काय भो...डा नसतोय? काढायचा तर त्याचा काढ की.’ यावर डब्यात सभ्य-प्रतिष्ठित-अवघडलेली शांतता. ओरडणाऱ्या बाईनंही आपली कानातल्या-गळ्यातल्याची पिशवी खोलून ‘कानवाले घ्या, कंगन घ्या’ असे हाकारे देत विक्री सुरू केली. पण प्रतिमाबाईंशी त्या बाईची नजरभेट झाली आणि ती एखाद्या मैत्रिणीसारखी खुदकन हसली!
इतकं लिंगनिरपेक्ष होता आलं पाहिजे शिव्यांच्या बाबतीत. मग शिवी खरंखुरं मुक्त करील बहुतेक आपल्याला!
No comments:
Post a Comment