भाग ०१
***
माझा त्या गावावर तसा राग नाही. पण लोभही नाहीच. त्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भाषिक महिरपी मला अजिबात बिचवकत नाहीत. बिचकवणारही कशा म्हणा - मी गावात शिरते, तीच मुळी त्यानं वेशीच्या पल्याड नवश्रीमंत उठवळपणानं पसरलेले हातपाय निरखत. माझ्यापाशी माझ्या माहेरच्या महाशहराचा हक्काचा दिमाख असतो. माझी तुच्छतापूर्ण अलिप्तता म्यान करतच मी वेशीत शिरते.
तसा आम्हांला इतिहास नाही असं नव्हे. सार्वजनिक गणपतीसारखा भीषण प्रकार सोसूनही मी सोशीकपणे फारसं काही वाईट मत न बनवता त्याच्याशी समजूतदारपणे वागलेच होते. पण पुढे ते गाव माझ्याशी बरं वागलेलं नाही. अपमानाच्या खुणा अंगावर झेलतच पाऊल पुढे टाकायला लागावं आणि गुदमरायला व्हावं अशा अनेक गोष्टी मला त्याच गावात माझ्या जिवाजवळच्या माणसांनी दिल्या आहेत. त्या काळात गावाच्या नावानंही धस्स होई. तिथली ती सुरेख थंडी, पहाटे शालीत गुरफटून प्रभातफेरीला निघणारे उत्साही लोक, धुकट रस्ते.. यांतल्या कशानंच मनात आनंद उमटत नसे. तिथल्या कित्येक देखण्या गोष्टींवर, सुखद वेळांवर, गिर्रेबाज वळणांवर पडलेली एकेका अपमानाची लाखबंद मोहोर मी खणखण वाजवून मोजत राही.
वास्तविक माझा स्वभाव पाहता हे असंच गोठून राहायचं माझ्या तळाशी.
पण कुठल्यातरी एका तालेवार दिवशी मी ठरवून पाटी पुसायचा धीर केला. उद्मेखून गावात शिरले. आधीचे वळसे सोडवत, शहारा गिळत, तेच रस्ते पुन्हा नव्यानं गिरवले. नव्या सोयरिकी केल्या. मनातलं खास काही आबदारपणे कुणाच्या तळहातावर ठेवावं, तशा दिलेल्या अनेक जुन्या भेटी पुन्हा नव्यानं दिल्या. प्रेमभंग झालेले लोक जुनी दुःखी हिंदी गाणी ऐकतात आणि अजूनच दुःखी होतात, तशी त्याच ठिकाणांवर उधळून उंडारले. पण डोळ्याला बेदरकारपणे डोळा भिडवला आणि ओठ मुडपून हसले.
दिसलं की मग मला माझ्या चश्म्याआडचं गाव.
तीच ती डेरेदार झाडं मिरवणारं विश्वविद्यालय; तरुण विद्यार्थ्यांनी फुललेले रस्ते; खवचट्ट स्वभावाच्या चश्मिष्ट म्हातार्या गल्ल्या; जुनी धुळकटलेली देवळं कुशीला घेऊन पहुडलेले अस्ताव्यस्त लेकुरवाळे बाजार; श्रीमंत पेन्शनर म्हातार्यांसारखे देखणे, पण खत्रूड दगडी बंगले... आणि या सगळ्यावर असलेली एक संथ आत्मसंतुष्ट साय...
अजूनही एखाद्या निवांत झोपाळलेल्या दुपारी तिथल्या रस्त्यांवरून फिरताना एखादी जहरी आठवण सरसरत वर येऊन डसते आणि चेहरा लालबुंद होतो. घाम डवरून येतो. बसकण मारून बसावं तरी, नाहीतर रागारागानं उलटं फिरावं आणि घर येईस्तो थांबूच नये, असं काठोकाठ भरून येतं.
पण मग मी शांतपणे श्वास घेते. गावाच्या नजरेला नजर देते.
गाव तर तेच असतं. माझ्यावर छाप पाडायला उत्सुक असलेल्या, पण तसं अजिबात दिसू नये म्हणून अलिप्तपणाचा आव आणणार्या लोभसवाण्या पोरासारखं. एकाहून एक सरस गाढ मैत्र्या देऊ करणारं. त्याचा मान राखल्यासारखं करत त्यातल्या काही मी उचलते आणि अल्लाद पर्समध्ये टाकते. पण मग मनासारखा प्रियकर गटवल्यामुळे धायलेल्या पुरंध्रीसारखा तृप्त प्रौढपणाचा आव आणत, त्याच्या अंगाखांद्यावर दिलेलं आठवणींचं ओझं मीच उतरवून टाकते, खांदे उडवते आणि दोन ओळींच्या मध्ये काहीच न पेरायची काळजी घेत, शक्य तितक्या कोरडेपणानं पाऊल पुढे टाकते.
मग आमचं जमतं हल्ली...

love u !!!
ReplyDeleteअसं होतंच रहातं नाही?
ReplyDeleteव्हय!
Deleteखूप तरल भाव पकडले आहेत.
ReplyDeleteअंतर्मुख झाले.
:) आभारी आहे.
Delete