Thursday 22 September 2016

इतक्यात वाचलेली पुस्तकं ०१

आणि मग एक दिवस...

(जालावरून साभार)
पुस्तक रंजक आहे, यात शंका नाही. त्याचं सगळं श्रेय नसीरच्या दिलखुलास निवेदनाला आणि धारदार विनोदबुद्धीला. पण त्यातून त्याच्या अभिनयपद्धतीबद्दल काही महत्त्वाचं वाचायला मिळेल, असं म्हणता? सॉरी! 

बहुतांश नटांनी नोंदलेली नटाची लक्षणं नसीरनंही नोंदली आहेत - कमालीचा नार्सिसिझम, असुरक्षितता, ध्यास. त्याच्या वडिलांसोबतचं त्याचं गुंतागुंतीचं नातं; जसपाल या जिवलग मित्रासोबतचं दुधारी नातं; अवघ्या एकोणिसाव्या वर्षी एका पस्तिशीच्या स्त्रीशी केलेला विवाह आणि लगोलग मिळालेलं, न पेलवणारं पितृत्व; ग्रॉटोव्हस्कीच्या कार्यशाळेत झालेला अपेक्षाभंग; रत्नासोबतचं प्रेम; नंतरचं सुखी-समाधानी आयुष्य... याबद्दल नसीरनं विस्तारानं लिहिलं आहे. त्याच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्याला यशानं दिलेल्या हुलकावण्या, सततचा एकटेपणा आणि जगानं नाकारलेलं असणं - हे कोणत्याही नटाच्या आत्मवृत्तात भेटावं असं. हे सगळंच अतिशय रसाळ भाषेत आणि मोकळेपणानं, प्रामाणिकपणानं नोंदलेलं आहे. त्याची तेजतर्रार विनोदबुद्धी पानापानांतून भेटते आणि आपण मनमुराद हसतो.

पण माझं इतक्यावर भागेना. मला मराठीतल्या नटांच्या चोख लेखनाची सवय. लागूंचं ’लमाण’ काय, विजयाबाईंचं ’झिम्मा’ काय, प्रभावळकरांचं ’एका खेळियाने’ काय... फक्त आणि फक्त कामाबद्दलच बोलीन, अशी शपथ वाहिल्यासारखी ही सगळी आत्मवृत्तं. अभिनय, दिग्दर्शन आणि आपलं कार्यक्षेत्रं - यावर काहीएक भाष्य गांभीर्यानं करणारी. त्या जातीचं फारसं काही मला या पुस्तकात मिळालं नाही. मुळात एखादी भूमिका सही-सही वठवणं आणि ती वठवण्याच्या प्रक्रियेबद्दल नेमकेपणानं सांगणं, या दोन निराळ्या गोष्टी आहेत, हे मी अखेर मान्य केलं. जवळजवळ तीनेकशे पानं वाचूनही, मला सतत आठवण येत होती, ती ’साप्ताहिक सकाळ’च्या सदा डुम्बरे-कालीन दिवाळी अंकात माधव वझेंनी घेतलेल्या नसीरच्या मुलाखतीची. ती कितीतरी स्पष्ट, ओघवती आणि तरीही नेमकी होती. मामुली संपादन केलेलं असूनही.

संपादनाचा विषय निघालाच आहे, तर होऊन जाऊ द्या. हे ’पॉप्युलर’ प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. ’पॉप्युलर’ हे काहीएक परंपरा असलेलं प्रकाशन आहे, असं म्हणायला हरकत नसावी. पण अनुवाद कसा होतो यावर आपला अंकुश नसेल एक वेळ (नसीरनं सई परांजपेंच्याच नावाचा आग्रह धरला असल्याचा उल्लेख प्रस्तावनेत आहे.), त्यावर संपादनाचा हात फिरवला जायला नको? एखादा शब्द घाईघाईनं खोडावा आणि मग त्यावर काहीही लिहिलं तरी मूळ शब्द अचूक वाचता येऊन रसभंग होत राहावा, तसं अनेक अनुवादित वाक्यं वाचताना होत राहतं. नको तिथे मूळचे परभाषिक शब्द तस्सेच ठेवणं (इन्स्टिट्यूट) आणि नको तिथे संकल्पनांना मराठी अवतार देणं (एकलगीत? ओह, यू मीन सोलो!) सतत दाताखाली येत राहतं. हेही एक वेळ ठीक. पण पुस्तकात चक्क प्रमाणलेखनाच्या चुका सापडाव्यात? ‌‌र्‌हस्व-दीर्घाच्या अगणित चुका, एकजात सगळी शब्दयोगी अव्ययं शब्दांपासून फटकून, बोली भाषेचा हास्यास्पद आग्रह धरताना भलतीकडे पडलेले शिरोबिंदू, ’संयुक्तिक’सारख्या अनेक शब्दांचं चुकीचं लेखन, आणि चक्क काही ठिकाणी राहून गेलेले जादाचे काने? ही हलगर्जीपणाची हद्द आहे.

हरून ऍन्ड द सी ऑफ स्टोरीज्‍



सलमान रश्दींच्या बाकीच्या वादग्रस्ततेशी माझं फार देणंघेणं नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मागणीशी अर्थातच सहमती आहे. पण आतडं असं नाही. हे पुस्तक वाचून सलमान रश्दी माझ्यासाठी एकाएकी त्रिमित झाले. बाकी पुस्तकाच्या चमत्कृतीपूर्ण आणि प्रचंड मजेशीर नि अतिकल्पक गोष्टीबद्दल हवं तितकं लिहिता येईल. पण इथे काही चमकदार गोष्टी तेवढ्या नोंदून ठेवते.

- ’गप’ (हिंदीतलं गप, मराठीतलं नव्हे!) आणि ’चुप’ (हे मात्र दोन्हीपैकी कुठलंही चालेल!) ही दोन राज्यांची नावं. एकीकडे गप्पा, एकीकडे चुप्पी. एकीकडे उजेड, एकीकडे अंधार. एकीकडे ऊब, एकीकडे थंडी. एकीकडे रंग, एकीकडे काळाकुट्ट रंग. एकीकडे... असो!
- गोपी आणि बाघा ही रेंच्या सिनेमातल्या बडबड्या ठगांची नावं बडबड्या माशांना वापरणं.
- बातचीत-बातमतकरो-बोलो-बेजुबान-माली... असल्या हिंदी अर्थपूर्ण नावांची तितकीच अर्थपूर्ण मोडतोड करून वापरणं.
- ’कथासरित्सागर’ - सी ऑफ स्टोरीज! हा संदर्भ लक्ष्यात आला तेव्हा मला एकदम ’युरेका!’ झालं.
- गोष्टी - गोष्टी, ऍज इन, कथा - त्यांच्याबद्दल काय एकेक थोर मुक्ताफळं.... "जुन्या गोष्टींमधूनच तर नव्या गोष्टी जन्माला येतात!",  "गोष्टीमधल्या जगावर कुणाचंही राज्य चालत नाही.", "त्याला काय झालं, गोष्टीत गोष्टी मिसळल्या तर? अशाच तर नव्या गोष्टी तयार होतात!", "चांगली ठणठणीत गोष्ट असली, म्हणजे मग तिच्यात थोडे फेरफार नि इकडम्‌ तिकडम्‌ केलं तरी तिला ढिम्म फरक पडत नाही! अगदी सहज पचवते ती, करून बघा..."  हे वाचून माझा फॅनफिक्शनी मेंदू किती सुखावला-सैलावला-कौतुकावला असेल, याची कल्पनाच केलेली बरी!
- चांगलं सैन्यासारखं सैन्य (पुस्तकातल्या पानांचं!) आणि समोर ठाकलेलं युद्धासारखं युद्ध! पण सैन्य सेनाप्रमुखाचं निमूट ऐकून हल्ला करील म्हणता? छे! ते सैनिक वाद घालतात, चर्चा करतात, एकमेकांचं म्हणणं खोडून काढतात, सेनाप्रमुखाला प्रश्न विचारून भंडावून सोडतात - सऽऽगळ्यांचं समाधान झाल्यावर मगच काय तो हल्लाबिल्ला करतात! नि सेनाप्रमुख? तो चिडेल? तो बेटा, कधी इकडून तर कधी तिकडून पिना मारत सगळ्या वादंगाची मौज लुटत असतो! आणि अशा प्रकारे बोलभांड राज्य आपल्या गप्पिष्ट सवयींसकट मुक्या राज्याला हरवतं!
- "राजपुत्र मूर्ख आहे खरा आमचा थोडा. पण जाऊ द्या ओ! इथे नाहीतरी मुकुटवाल्या मंडळींच्या हातात ठेवलंय काय आम्ही मोठंसं? द्या टाळी!"

असलं बरंच काय काय, बारीक-बारीक आणि महामार्मिक. भाषेच्या ह्याऽऽऽ एवढाल्ल्या गमती. नादमय संवाद. तिरपागडे वेढे दिलेले हरेक तिसर्‍या शब्दाला. समकालीनत्वाची अत्यंत मजेदार सरमिसळ. मस्ट रीड. रिफ्रेशिंग रीड.



स्टॉप व्हॉट यू आर डूइंग ऍन्ड रीड धिस!

(जालावरून साभार)

नाव जरा हिटलरी आहे, कबूल. पण त्यावर जाऊ नका. अनेक मान्यवर लेखकांनी आपापल्या वाचनानुभवावर लिहिलेले निबंध यात आहेत. त्यात संशोधक-चिकित्सक दृष्टीचे लेख आहेत, तसे निखळ स्मरणरंजनात्मक लेखही आहेत. एकूणच वाचणे या गोष्टीची आपण अनुभवलेली जादू हे लोक मन:पूत सांगताहेत.

माझ्या सध्याच्या विचारचक्राला गती देणारं हे पुस्तक होतं. वाचण्याशी असलेले संबंध तपासून पाहणं पार्श्वभूमीला चालू आहे. अशा वेळी अनेक संदर्भपुस्तकांची नावं मिळणं, काही गोष्टी इतरांच्या अनुभवांशी ताडून पाहता येणं, गोष्ट आणि न-गोष्ट या वाचनातला फरक नोंदताना त्याच्याशी संबंधित विदा मिळणं, काही थेटच पुस्तकं वाचायजोगी-शोधायजोगी हाती लागणं… अशा अनेक प्रकारे. पण त्यातला खरा महत्त्वाचा भाग कोणता असेल, तर माझी तळ्यात्मळ्यातावस्था संपवणारा. वाचन महत्त्वाचं आहे, ते हातचं निसटून जाता कामा नये, ही माझी भावना होती. पण तिला कोणता आधार आहे, असं कुणी विचारलं, तर मी निरुत्तर असे. तंत्रज्ञानातले बदल माध्यमबदलात परिणित होणारच, कालचक्राला थांबवणारे तुम्ही कोण, असा आक्रमक प्रश्न आल्यावर मला काही सुचत नसे. आपण निव्वळ स्मरणरंजन म्हणून तर पुस्तकं हातची जाऊ देत नसू, असा प्रश्न डोक्यात वळवळत राही. त्याला एक ठोस उत्तर मिळालं. मागे एकदा एका मित्राशी बोलताना तो एक अतिशय महत्त्वाचं वाक्य बोलून गेला होता. ’आपल्यासारख्या हावरट लोकांना भावनिक भूकही तीव्र असते. ती भागवणारी माणसं कायम सोबत असणं अशक्यच असतं. काही अंशी भूक माणसं भागवतात. पण उत्तम सिनेमे आणि उत्तम पुस्तकं - म्हणजे फिक्शन हो, नाहीतर काढाल कुरुंदकर बाहेर - ही भूक विस्तारतात, सखोल करतात आणि बहुतांशी भागवतात. उगाच का आपल्याला इतकं सगळं हपापून बघा-वाचावं लागतं?’ त्या वाक्याचा एक लहानसा ढग डोक्यात कुठेतरी ब्याकग्राउंडला तरंगत होता. हे पुस्तक वाचताना कधीतरी तो बरोब्बर डोक्याच्या वर येऊन थांबला. आणि एका नियत क्षणी पाऊस पडून मी भिजले. एरवी ज्या शिस्तीला ’सो व्हॉट?’ म्हणून खांदे उडवून दाखवण्यात धन्यता मानली जाते, ती कामापुरती कबूल करून मी अनेक फिक्शनी पुस्तकं नेटानं पुरी केली. मग कुठल्यातरी टप्प्यावर त्यातला ’नेट’ संपला. मी अल्लाद पुस्तकात शिरले.

हे पुस्तक म्हणतं त्यानुसार - अक्षरं म्हणजे अलीबाबाच्या गुहेचं दार असतं. ज्याला ती डीकोड करता येतात; तो दार ओलांडून पल्याड जातो. नवीन जगात दाखल होतो. ते जग जगतो. अशी अनेक जगं, अनेक आयुष्य जगतो. 

मी मधला बराच काळ पासवर्ड विसरले होते. तो मला आठवला. आठवला म्हणण्यापेक्षा - बरेचदा आपली बोटंच पासवर्ड लक्ष्यात ठेवून असतात. तो जाणिवेत न ठेवता नेणिवेत कुठेतरी नेऊन टाकतात. तो परत वर आणायचा, तर गुहेच्या बाहेर चिकाटीनं रेंगाळावं लागतं. - तसं रेंगाळायला या पुस्तकानं ढकललं. आणि बात बन गई.

2 comments:

  1. enjoyed....more probably in conversation....

    ReplyDelete
  2. बरं झालं इथे येऊन हे वाचलं. लोकसत्ता मधे आलेला सईच्या भाषांतराचा तुकडा खटकला होताच. आता ओरिजिनल पुस्तकच वाचेन. तेही लायब्ररीमधून घेऊन.
    बाकी << फक्त आणि फक्त कामाबद्दलच बोलीन, अशी शपथ वाहिल्यासारखी ही सगळी आत्मवृत्तं. >> चालले असते की जरा खाजगी, प्रामाणिक तपशील. विजयाबाईंच्या झिम्मा मधे आहेत म्हणा, पण अगदीच पोलिटिकली करेक्ट भाषेत.

    सलमान रश्दीचं हरुन.. माझं आवडतं पुस्तक आहे.

    ReplyDelete