’ऐसी अक्षरे’साठी या वर्षीही एका विशेषांकाच्या संपादनाच्या मात मी
सहभागी झाले होते. विशेषांकाचं नाव होतं ’पॉर्न ओके प्लीज’.
नाव खरं तर तसं स्वयंस्पष्ट आहे, त्यामुळे
त्याबद्दल अधिक काही बोलत नाही! पूर्ण अंक इथे वाचता येईल. त्यात मी लिहिलेले लेख
इथे एका मालिकेत प्रकाशित करणार आहे.
***
पॉर्न-ओके-प्लीज
लेखांक पहिला : प्रस्तावना
देखो, मगर प्यार से!
'पॉर्न' विशेषांक ही कल्पना प्रथमदर्शनी आम्हांला एखाद्या अप्राप्य प्रियकराप्रमाणे
आकर्षक वाटली खरी. पण पुढे तिच्याशी विवाह ठरला आणि तिचं नवरेपण चहूअंगी खुपायला
लागलं, हे नमनालाच कबूल केलं पाहिजे!
या संकल्पनेत अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी
दिलचस्प शक्यता दडलेल्या होत्या. पण तिचा आवाकाही विलक्षण होता. संस्कृतीचा
प्रारंभच करणारी कामक्रीडा आणि तिचा काही हजार वर्षांचा इतिहास - त्याबद्दलच्या
समजुती, शास्त्र, साहित्य, विद्रोही साहित्य यांच्याही अनेक पिढ्या… आणि मग जागतिकीकरणोत्तर काळात भोगवादानं तिला दिलेलं भयावह
परिमाण.
कितीही केलं, तरीही या सगळ्यातून काही ना काही निसटून जाण्याची खातरी होतीच. वर अंकाचा
जाडजूड कोशोबा करून, त्यातली सगळी गंमत पिळून काढून, त्याला एक कोरडाठाक संदर्भग्रंथ करून वरच्या फळीवर त्याची रवानगी
करण्याची भीतीही. शिवाय पॉर्नसोबत इतर अनेक संकल्पना दत्त म्हणून समोर उभ्या राहत
होत्या. भारतीय कायदा पॉर्न या शब्दाची व्याख्याही करत नाही, तो अश्लीलतेसंदर्भात बोलतो, हा साक्षात्कार काम करतानाच झाला. त्यामुळे ही संकल्पना टाळणं शक्यच नव्हतं.
पाठोपाठ लैंगिकता आणि कामुकता आल्याच. कोणत्याही प्रकारच्या कोशवाङ्मयात - विशेष
करून urban dictionary हाही जेव्हा एक
महत्त्वाचा कोश ठरतो अशा संक्रमणाच्या दिवसांतल्या कोशवाङ्मयात - पॉर्नची
सर्वसमावेशक अशी व्याख्या उपलब्ध नव्हती. तिची काही ना काही अंगं तरी त्या-त्या
व्याख्येतून निसटून गेलेली असत.
अशा वेळी आपली स्वत:ची अशी विषयचौकट आखून घेणं
अत्यावश्यक झालं.
पॉर्न आणि कामव्यवहार या दोन गोष्टींमध्ये
अन्योन्यसंबंध आहे हे नाकारता येण्याजोगं नव्हतं. पण 'पॉर्न' हे काहीसं ओंगळ
विशेषण विषयासारख्या सुंदर आणि जीवनानं रसरसून भरलेल्या गोष्टीसोबत जोडलं जाणं
खुपतही होतं. अशा आट्यापाट्या खेळताना हा त्रिकोण हाती आला -
० कोणत्याही प्रकारे लालसा उत्पन्न करणारं, तिला खतपाणी घालणारं, त्यासाठी भोगवस्तूचे गुणधर्म प्रसंगी अवास्तव करून मांडणारं आणि वेळी त्यासाठी
जिवंत व्यक्तीचं वस्तूकरण करायला मागेपुढे न बघणारं - पण प्रत्यक्ष भोगाची संधी न
देणारं - ते ते पॉर्न. या अर्थानं चराचराचं पॉर्नीकरण होताना लख्ख दिसतंच आहे.
खाद्यपदार्थापासून शरीरापर्यंत. माध्यमांपासून मनोरंजनापर्यंत - सगळ्याच गोष्टी
कमी-अधिक गतीनं ओरबाडखोर संभोगाच्या दिशेनं वाट चालू लागतात, तो हा प्रकार.
० दुसरा अर्थ कलाकृतीच्या संदर्भातला. जे जे
अनावश्यक, ते ते अश्लील, असं तेंडुलकर कुठेसं म्हणाले आहेत. त्या अर्थानं - कलाकृतीच्या गाभ्याला
अनावश्यक असूनही जे जे निव्वळ 'आणखी-आणखी' अशी हाव वाढवणारं, बांडगुळासारखं जोडलेलं आहे - ते ते पॉर्न. मग ते वरकरणी सुंदर आहे की असुंदर
आहे, ते इथे महत्त्वाचं नाही. कलाकृतीच्या
बांधेसूदपणाला ते किती मारक आहे, ते तेवढं
महत्त्वाचं. टीव्हीवरच्या मालिकांमधले अनेक प्रसंग, कालबाह्य असूनही नव्वदोत्तर म०म०वर्गात अचानक बोकाळलेली गदिमा-बाबुजी-भावगीतं, अजय-अतुलचं हॉलिवुडी रेकॉर्डिंग आणि त्याला मिळालेली
अनाठायी प्रसिद्धी… सगळंच.
० तिसरा अर्थ शृंगाराच्या संदर्भातला. जे जे
शृंगाराशी संबंधित आहे, पण नागडं-उघडं आहे, अनावश्यकरीत्या असुंदर-असंस्कृत-निर्लज्ज आहे - ते ते
पॉर्न. म०चा०क०, बरीचशी स्लॅश-स्मट फॅनफिक्शन, पोर्नोग्राफिक चित्रफितींचा आंतरजालावरचा पूर इत्यादी.
हा त्रिकोणही व्यक्तिसापेक्षच, पण त्यानं आम्हांला एक निश्चित रिंगण आखून दिलं.
या रिंगणाच्या सीमारेषेवर वसणारा आणि पल्याड
पसरलेला भलामोठा प्रदेश होता. बरंचसं शृंगारविषयक अभिजात साहित्य त्यात मोडतं.
वात्स्यायन, गाथासप्तशति, गीतगोविंद, खजुराहोची कामशिल्पं, चौरपञ्चाशिका, भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, मराठमोळी रांगडी
शृंगारिक लावणी… या सगळ्यात खणखणीत चोख शृंगार होता. त्याला
क्वचित आध्यात्मिक अर्थाची डूब होती. बदलत्या अस्मितांच्या दिवसांत या साहित्यानं
अनेक वादही ओढवून घेतले होते. त्याबद्दल बोलणं अत्यावश्यक होतं. त्रिकोणाच्या
आतल्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या होत्या, तितक्याच - पॉर्नचं लांछन घेऊनही - संस्कृतीचा खुला वारसा जपणार्या या
गोष्टीही महत्त्वाच्या होत्या. त्यामुळेच अंकात - तळ्यातल्या आणि मळ्यातल्या -
दोन्ही प्रकारच्या साहित्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
एकीकडे हा असा खुला वारसा असताना, मधल्या काळात पॉर्न ही संदिग्ध संज्ञा शिवीसदृश होऊन बसली.
शृंगाराबद्दल असलेल्या टॅबूचा सोयीस्कर वापर करून ही शिवी अनेक गोष्टींना देण्यात
आली, आजही येते. त्याआडून अनेक घटकांचं शोषण करण्यात
येतं. त्याच वेळी आधुनिकतेतून येणारी स्वातंत्र्यं वापरून अंतहीन भुकेचं समर्थनही
करण्यात येतं. राजकारण, समाजकारण, कलाव्यवहार… ही सगळी अंगं अखेर बाजारात विसर्जित करण्यात
येतात -
आणि आपण सगळा अभिजात शृंगाररस बेडरूमच्या
अंधारात दडपून, बाहेर 'मैं तो आरती उतारू रे…'छाप पॉर्न लावतो आणि कान मिटून घेतो…
या विश्लेषणातल्या हरेक मुद्द्याला स्पर्श करेल
असं साहित्य अंकात समाविष्ट करता आलंच असेल असं नाही, याची प्रामाणिक कबुली देतो आहोत. केवळ तेवढ्यासाठी, या विषयाला वाहिलेल्या उत्तरार्धाची शक्यता खुली ठेवून, हा पूर्वार्ध सादर करतो आहोत. आमचं आणि आमच्या 'विषय'वस्तूचं वैवाहिक
जीवन पुरेसं व्यामिश्र आणि वाह्यात झालं असेल अशी आशा करत त्यात तुम्हांलाही
आमंत्रण देत आहोत. वाचा, मजा लुटा, विचारात पडा आणि मनमुराद प्रतिसादा.
पॉर्न-ओके-प्लीज!
***
(मूळ प्रकाशन इथे वाचता येईल.)
No comments:
Post a Comment