’ ऐसी अक्षरे ’ साठी या वर्षीही एका विशेषांकाच्या संपादनाच्या मात मी सहभागी झाले होते. विशेषांकाचं नाव होतं   ’पॉर्न ओके प्लीज ’ .   नाव खरं तर तसं स्वयंस्पष्ट आहे ,   त्यामुळे त्याबद्दल अधिक काही बोलत नाही! पूर्ण अंक इथे  वाचता येईल. त्यात मी लिहिलेले लेख इथे एका मालिकेत प्रकाशित करणार आहे.  
*** 
पॉर्न-ओके-प्लीज  
लेखांक तिसरा: लावणीबद्दलचा लेख
लेखनसाहाय्य: अमुक
जन मार्मिक व्हावा... 
परिचय 
सावित्री   मेधातुल  :  अभिनेत्री   आणि   माहितीपट   दिग्दर्शिका ; ' व्हजायना   मोनोलॉग्स '  नाटकाच्या   सुरुवातीच्या   काही   प्रयोगांत   सामील ; ' नटले   तु्मच्यासाठी '  या   लावणीवरील   माहितीपटाचं   दिग्दर्शन ;  मुंबईतलं   पाणीवितरण ,  बेने   इस्रायली   समाज ,  शेतकऱ्यांच्या   आत्महत्या   अशा   निरनिराळ्या   विषयांवर   माहितीपट . 
भूषण   कोरगांवकर  :  लावणी   कलावंतांचं   आयुष्य   आणि   त्यांच्या   कलेचं   एकमेवाद्वितीयत्व   सांगणाऱ्या  ' संगीतबारी '  या  ' राजहंस '  प्रकाशित   पुस्तकाचं   लेखन ; ' नटले   तु्मच्यासाठी '  या   माहितीपटाची   निर्मिती ;  निरनिराळ्या   नियतकालिकांमधून   कथालेखन ,  तसंच   लावणी   आणि   लावणी   कलावंतांबद्दल   ललित   लेखन . 
*** 
' संगीतबारी '  कार्यक्रमातील   कलाकार  : 
पुष्पा   सातारकर ,  सुनिता   धोंडराईकर ,  लताबाई   वाईकर ,  चंद्रकांत   लाखे  ( ऑर्गन / पायपेटी ),  सुनिल   जावळे  ( तबला ),  सुमित   कुडाळकर  ( ढोलकी ),  नासिर   शेख  ( मंच   साहाय्यक )  आणि   शकुंतलाबाई   नगरकर . 
ध्वनी  :  रुचिर   चव्हाण .  
प्रकाश :  विलास   हुमणे .  
छायाचित्रण  :  कुणाल   विजयकर ,  सचिन   यशवंते ,  प्रीती   बकाळकर    
निर्मिती   साहाय्य  :  प्रतिक   म्हात्रे ,  रोशन   कोरीआ .  
विशेष   आभार :  राजहंस   प्रकाशन  ( पुणे ),  आर्यभूषण   थिएटर  ( पुणे ),  मजिद   तांबे  ( संचालक :  आर्यभूषण   थिएटर ) 
*** 
( शकुंतलाबाई   नगरकर  ( छायाचित्र  :  कुणाल   विजयकर )) 
मला  ' संगीतबारी '  या   कार्यक्रमाबद्दल   कळलं   ते   अमुककडून .  हा   कार्यक्रम   बघच ,  अशी   त्याची   शिफारस   उत्सुकता   वाढवणारी   होतीच .  पण   खरं   दिलचस्प   होतं   ते   त्यानं   केलेलं   वर्णन . 
...  शकुंतला   नगरकर   या   साधारण   पन्नाशीच्या   वाटणाऱ्या   बाई   मंचावर   आल्या .  ठळक   मोठी   चंद्रकोर ,  टोकदार   नाक ,  गर्दीत   दिसला   तर  ' डबल   टेक '  करायला   लावणारा   असा   रेखीव ,  ठसठशीत   चेहरा   नि   उठावदार   लालसुर्ख   साडी .  गाण्यात   साथ   द्यायला   मागे   पुष्पाबाई .  शकुंतलाबाईंनी   गाणं   सुरू   केलं  - 
नेसले   पीतांबर   जरी  
जरी   गं  
जरतारी   लाल   साडी 
पहिली   ओळ   ऐकताच   सूर   ओळखीचे   वाटले .  अरे !  ही   तर  ' वद   जाऊ   कुणाला   शरण ' ची   चाल !! 
कुणी   लाल   साडीतली   यौवना   उन्हाळ्यात   रानात   लाडे   लाडे   आंबे   चाखायला   बोलावते   आहे   असं   वर्णन   करता   करता   अचानक  - 
आम्ही   काशीचे   ब्राह्मण ,  द्या   हो   आम्हां   दान   घडंल   पुण्य 
अशा   ओळी   आल्या   आणि   मग   त्यातली  ' आम्ही   काशीचे   ब्राह्मण '  हीच   ओळ   पकडून   पुढली   सातआठ   मिनिटं   शकुंतलाबाईंनी   जे   काही   सादर   केलं   ते   निव्वळ   थोर !  त्याला   कुठल्या   अभिनयाच्या   शाळेत   काय   म्हणतील   ते   माहीत   नाही .  या   पन्नाशीच्या   साडी   नेसलेल्या   बाईनं   परकायाप्रवेश   का   काय   म्हणतात   ते   केल्याप्रमाणे   अक्षरश :  धोतराचा   कासोटा   मारलेला ,  पाण्यात   उतरलेला ,  काशीचा   गंध   लावलेला ,  एक   कर्मठ   शेंडीवाला   उघडाबंब   गरगरीत   ब्राह्मण   कशी   डुबकी   मारेल ,  अर्घ्य   देईल ,  जानवं   फिरवीत   आल्यागेल्या   बाईकडे   कळेल   न   कळेलसा   कटाक्ष   कसा   टाकेल ,  गडबडून   पुन्हा   प्रार्थना   करण्याचं   ढोंग   कसं   करेल   वगैरे   लकबी   अशा   काही   खेळून   दाखवल्या ;  की   त्या   सात - आठ   मिनिटांच्या   मंतरलेल्या   अवकाशात   आख्खा   मंच   काशीचा   घाट   झाला .  आणि   हे   सगळं   फक्त  ' आम्ही   काशीचे   ब्राह्मण '  या   तीन   शब्दांवर   घोळवत   घोळवत ,  लोकांची   हसून   पुरेवाट   होईस्तोवर .  थेट  -  स्पष्ट  -  कडक   सलाम !  मला   एकीकडे   मार्सेल   मार्सोच्या   माइमिंगची   आठवण   येत   होती .  वाटलं ,  या   बाई   कसलंही   संगीत   वा   सूर   नसतानाही   काय   झकास   माइमिंग   करतील !  पण   नकोच   ते ..  हे   तीन   शब्दांवर   हजारो   अदा   करून   दाखवणं   नि   आणखी   कशाची   तुलना   नकोच .  जे   समोर   चाललं   आहे   ते   अनन्य   आहे . 
ही   दिलखुलास   दाद   देणारा   मराठी   प्रेक्षक   खरा ,  की  ' लावणी   म्हणजे   बाईचा   नाद '  या   शेलक्या   शेऱ्यानं   लावणीची   संभावना   करणारा   मराठी   मध्यमवर्गीय   माणूस   खरा ?  खरोखर ,  या   अनन्य   लावणीबद्दल   मराठी   मध्यमवर्ग   नक्की   काय   विचार   करत   असतो ? 
शृंगार   म्हणजे   काहीतरी   पाप - गलिच्छ - वाईट - अंधारात   करण्याजोगं   हा   संस्कार   आपल्यावर   असतोच .  लावणी   तर   शृंगाराची   जणू   सम्राज्ञीच .  अवखळपणा ,  खट्याळपणा ,  धसमुसळेपणा ,  धीटपणा ,  नाजूक   प्रेमभावना   आणि   विरहाचं   तेजाब   या   शृंगाराच्या   यच्चयावत   छटांचा   परिपूर्ण   आणि   निस्संकोच   आविष्कार   तिच्यात   असतो .  स्त्रीला   शतकानुशतकं   नाकारलेली   गेलेली   तिची   लैंगिकता   त्यातून   आत्मविश्वासानं   प्रकट   होत   असते .  तरीही   मध्यमवर्ग   लावणीचं   यथायोग्य   कौतुक   करतो   का ? ' पिंजरा ' सारखा   मराठीत   अभिजात   मानला   गेलेला   चित्रपट   आणि   त्याची   लोकप्रियता   हा   एकच   ढोबळ   निकष   घेतला ,  तरी   लावणीबद्दलचं   आपलं   मानसचित्र   सहज   उघड   व्हावं .  हिंदी   चित्रपटांमधला   गल्लाभरू   शृंगार   आणि   हिंसा   राजरोस   मिरवली - गौरवली   जाते .  पण   लावणी   कलाकार   मात्र   आपलं   व्यावसायिक   आयुष्य   लपवून   आयुष्य   काढतात . 
यांत   कुठेतरी   एक   मूलभूत   अन्याय   आहे .  श्लीलाश्लीलाचे   निर्णय   आणि   कामभावना   या   दोहोंना   निराळं   करून   बघणाऱ्या   या   अंकात   लावणीवर   होणाऱ्या   या   अन्यायाबद्दलची   चर्चा   करणं   यथोचित   होईल . 
तर  -  सर्वसामान्यांना   माहीत   असते   ती   चित्रपटातली   लावणी .  ती   फडावरच्या   तमाशातही   असते ,  पण   लावणी   हा   त्या   तमाशाचा   एकमात्र   घटक   नव्हे .  त्यात   गण - गवळण - वगनाट्य - बतावणी   असं   सगळं   असतं   आणि   खेरीज   लावणी   असते .  लावणी   हाच   मुख्य   आणि   एकमात्र   कार्यक्रम   असतो   तो   बॅनर   शोमध्ये .  ते   हे   काहीसं   शहरी   कामकरी   वर्गाचं   मनोरंजन   करणारं   प्रकरण .  नाटकं   जशी   नाट्यगृहात   लागतात ,  तसेच   हे   लावणीचे   कार्यक्रमही   होतात .  लाइव्ह   म्युझिक   असतं   आणि   त्यावर   एकापाठोपाठ   एक   लावणी   नंबर्स   पेश   होतात . ( या   कार्यक्रमासाठी   वापरलेली   परिभाषा   ऐकली   तरी   लक्ष्यात   येईल ,  की   हे   लावणीचं   किती   शहरी   रूप   आहे !) 
पण   यांखेरीज   पारंपरिक   लावणीला   प्रमुख   स्थान   देणारी   आणखी   एक   प्रकारची   लावणी   असते ,  जिची   मुळं   थेट   पेशवाईतल्या   बावन्नखणीपर्यंत   मागे   जातात .  त्यातल्या   कलावंतांना   अजूनही   समाजमान्यता   मिळालेली   नाही .  कसब ,  कला   आणि   कष्ट   हे   तिन्ही   अंगी   असूनही   जिच्यावर   काहीसा   अन्याय   झाला   आहे ,  ती   ही   लावणी  -  संगीतबारीची   लावणी . 
( शकुंतलाबाई   नगरकर ,  पुष्पा   आणि   सुनीता  ( छायाचित्र  :  कुणाल   विजयकर )) 
ती   काही   ठरावीक   थिएटर्समध्येच   होते .  तिथे   एकेका   वर्षभराच्या   बोलीवर   एकेक   पार्टी   उतरते   आणि   आपले   कार्यक्रम   करते .  या   वर्षभरात   थिएटरमध्ये   जे   कार्यक्रम   होतील ,  त्यांतला   अर्धा   वाटा   थिएटर   मालकाला   जातो ,  तर   अर्धा   वाटा   पार्टीचा   असतो .  मात्र   लावणीच्या   वेळी   जो   दौलतजादा   होतो   त्यावर   हक्क   केवळ   पार्टीचा   असतो .  याखेरीज   खाजगी   बैठका   होतात .  त्या   बैठकांतून   जी   कमाई   होते   तीसुद्धा   थिएटर   मालक   आणि   पार्टी   यांच्यात   निम्मी   निम्मी   वाटून   घेतली   जाते .  या   पार्ट्या   जी   लावणी   सादर   करतात ,  ती   संगीतबारीची   लावणी .  या   लावण्यांमध्ये   कमालीचं   वैविध्य   असतं .  सादरीकरणात   बैठकीची   लावणी ,  खडी   लावणी ,  नाचाची   लावणी ,  छक्कड   असे   प्रकार   असतात .  विषयांमध्ये   विविधता   असते .  थेट   आणि   आत्मविश्वासपूर्ण   लैंगिक   अभिव्यक्ती   आणि   चकित   करून   टाकणारी   अदाकारी   असते . 
या   लावणीवर   आधारित   असलेल्या   कार्यक्रमाच्या   प्रेमात   पडलेल्या   चाहत्यांच्या   शिफारसी ,  पुस्तक   वाचून   खुलं   झालेलं   एक   नवीन   विश्व   आणि   परिणामी   सावित्री - भूषणला   गाठून   मारलेल्या   गप्पा  –  या   सगळ्याचं   फलित   म्हणजे   हा   लेख . 
*** 
बारी   आणि   लावणी 
लावणीला   चांगले   दिवस   कसे   येतील ,  असा   प्रश्न   सावित्रीला   विचारला .  तिचं   उत्तर   मूलभूत   विचार   करायला   लावणारं   होतं . 
" दहाएक   वर्षांपूर्वीपर्यंतही   लावणी   शिकायला   जाणं   या   गोष्टीचा   आपण   विचारही   करू   शकलो   नसतो .  पण   आता   तसं   उरलं   नाहीय .  मुली   सररास   अशा   शिकवण्यांना   जातात .  मुदलात   अशा   शिकवण्या   असतात !  त्यामुळे   थोडंफार   बदलायला   सुरुवात   झालेली   आहे .  पण   अजून   बराच   टप्पा   गाठणं   शिल्लक   आहे ,  हेही   कबूल   आहे .  हे   सगळं   काहीसं   गुंतागुंतीचं   आहे .  एकतर   तो   काही   विशिष्ट   जातींच्या   पोटापाण्याचा   उद्योग   आहे .  हल्ली   हल्ली   इतर   जातीतल्या   मुली   त्यात   यायला   लागल्या   आहेत .  त्यांपैकी   भातु - कोल्हाटी   जमातीतल्या   स्त्रियांनी   एकदा   घुंगरू   बांधले   की   त्यांचं   लग्न   होऊ   शकत   नाही ,  ही   रीत   आहे .  पण   बरं ,  रीत   गुंडाळून   ठेवली ,  बंड   केलं   आणि   राहिली   बाई   लग्नाला   उभी ;  तरी   कोण   लग्न   करणार   तिच्याशी   सहजासहजी ?  एकट्या   राहणाऱ्या   बायकांना   राहायला   भाड्याची   जागा   मिळणं   अजूनही   मुश्किल   असतं   हे   वास्तव   आहे .  पुरुषांसमोर   धीट   लैंगिक   अभिव्यक्ती   करणारी   लावणी   खेळून   त्यांना   रिझवण्याचा   उद्योग   करून   पोट   भरणाऱ्या   स्त्रीशी   लग्न   करायला   कोण   तयार   होणार ?  ते   अवघडच   आहे .  पण   गरजा   तर   सगळ्यांना   असतातच .  मग   त्यात  ' मालक '  ही   संकल्पना   येते ." 
मालक   म्हणजे   काही   काळाकरता   एखाद्या   स्त्रीनं   केलेला   प्रियकर   म्हणा ,  वा   कागदोपत्री   कोणताही   करार   न   करता   केलेला   नवरा   म्हणा .  बरेचदा   हा   माणूस   आधीच   विवाहित ,  मुलंबाळं   असलेला   असतो .  त्यानं   त्याच्या   पैशाच्या   जोरावर   आणि   शौकाच्या   इच्छेनं   बारीमधल्या   स्त्रीसोबत   दुसरा   संसार   मांडलेला   असतो .  ही   स्त्री   आपल्या   मालकासोबत   असेल ,  त्या   काळात   त्याच्याशी   एकनिष्ठ   असते .  त्याच्याकडून   घरदार   मिळतं ,  पैसे   मिळतात ,  मुलं   होतात .  जोवर   दोघांचीही   मर्जी   असते ,  तोवर   हे   नातं   टिकतं .  एखाद्या   वर्षापासून   ते   साधारण   पाच - सात   वर्षांपर्यंत   हे   नातं   टिकतं .  जन्मभरासाठी   कुणी   मिळणं   हे   दुर्मीळच .  पण   तशी   आस   कुणाला   चुकलीय ?  नाच   करा   किंवा   लग्न   करा …  असो !  तर  -  लग्न   करायला   तयार   कोण   होणार ? 
सावित्री   पुढे   सांगत   होती  - 
" हे   संगीतबारीतल्या   स्त्रियांचं   वास्तव   आहे . 
दुसरं   असं ,  की   लावणी   म्हणजे   फक्त   नृत्य   नव्हे .  प्रेक्षकांशी   संवाद   करणं ,  त्यांना  ' खेळवणं ',  त्यांना   शृंगारिक   आव्हान   देणं  -  त्यांना   भुरळ   घालणं   हे   लावणी  ' खेळण्या ' चं   एक   अविभाज्य   अंग   आहे .  तेच   लावणीमधून   काढून   टाकलं   तर   तिचा   आत्माच   हिरावून   घेतल्यासारखं   होईल .  तसेही   प्रयोग   झाले   आपल्याकडे .  ते   लोकप्रियही   झाले .  पण   ती   काही   खरी   लावणी   नव्हे .  ती   लावणीची   नक्कल   आहे . 
प्रेक्षकांचा   जिवंत   सहभाग   हा   दुसरा   महत्त्वाचा   भाग .  आताही   अकलूजला   जी   लावणी   स्पर्धा   होते ,  त्यात   पारंपरिक   लावण्यांना   फार   सुरेख   वाव   दिला   जातो .  त्यातून   अनेक   सुरेख   नवीन   लावण्या   लिहिल्या   जाताहेत ,  जुन्या   लावण्या   प्रकाशात   येताहेत .  त्याचा   या   क्षेत्राला   फायदाच   होणार   आहे ,  यात   दुमत   नाही .  पण   तिथेही   हेच .  तिथे   बाया   आणि   पुरुष   प्रेक्षक   चक्क   निरनिराळे   बसवतात .  कारण   काय ,  तर   पुरुष   शिट्ट्या   मारतात   ते   पाहून   बायकांना   अवघडल्यासारखं   होतं !  शक्यतोवर   शिट्ट्या   मारल्या   जाऊ   नयेत ,  एखाद्या   मध्यमवर्गीय   मराठी   नाटकाला   दाद   दिल्यागत   टाळ्या   वाजवून   दाद   दिली   जावी ,  अशी   अपेक्षा   तिथे   असते .  कारण   आयोजकांना   लावणीतलं   हे   शृंगारिक   आव्हान   काढून   टाकून   लावणी  ' शुद्ध '  करून   घ्यायची   आहे ,  तिला   पांढरपेशी - परीटघडीची   करायची   आहे .  त्यांच्या   दृष्टीनं   तो   लावणीला   प्रतिष्ठा   मिळवून   देण्याचा   प्रामाणिक   प्रयत्न   आहे . 
मला   ते   पटत   नाही .  मला   वाटतं ,  लावणीतला   हा   रांगडा - थेट   शृंगार   ही   तिची   एक   महत्त्वाची   ओळख   आहे .  ती   तर   मिटता   कामा   नये .  पण   लावणीला   प्रतिष्ठाही   मिळाली   पाहिजे .  ही   कोंडी   फुटायची   कशी ? 
त्यावर   माझं   उत्तर   असं   आहे  -  जोवर   बाई   नाचते   आहे ,  आणि   पुरुष   दाद   देत   तिला   नजरेनं   भोगतो   आहे ,  हे   वर्गीकरण   मिटणार   नाही ;  तोवर   त्यातलं   अवघडलेपण   जाणार   नाही .  शेवटी   लावणीतला   नजरेचा   खेळ   स्त्रीसाठी   आणि   पुरुषासाठी   असा   निरनिराळा   थोडाच   असतो ?  तीच   नजरबंदी ,  तेच   आव्हान ,  तीच   खुळावणारी   भुरळ …  आमच्या   कार्यक्रमात   पुढच्या   ओळींमध्ये   स्त्रिया   बसलेल्या   असतील ,  तर   आम्ही   निवेदनात   त्याबद्दल   सहजगत्या   बोलतो .  नर्तकीशी   संवाद   साधताना   असं   खेळकरपणे   सुचवतो ,  की  ' बघा   बा ,  पुरुषच   गटवायला   हवा   असं   काही   नाही …  हल्ली   तसं   काही   राहिलेलं   नाही !  दिवस   बदलताहेत !'  त्याला   हमखास   दाद   मिळते .  अशाच   प्रयत्नांतून   लावणीचा   आश्रयदाता   म्हणजे   पुरुष   हे   समीकरण   मोडलं   गेलं   पाहिजे ,  असं   मला   फार   वाटतं .  मग   त्यातला   लैंगिक   शोषणाचा   भाव   लुप्त   होईल   आणि   लावणीचं   खट्याळ   आव्हानही   टिकेल .  आम्ही   प्रेक्षकांना   असंही   आवाहन   करतो ,  की   तुम्ही   शांत   बसून   हा   कार्यक्रम   पाहणं   अपेक्षित   नाही .  तुम्ही   दाद   द्या ,  शिट्या   मारा  -  तुम्ही   दाद   द्याल ,  तितका   हा   कार्यक्रम   अधिकाधिक   रंगत   जाईल .  कारण   ही   देवघेव   आहे  -  संवाद   आहे ." 
राजमान्यता   आणि   लावणी 
फार   खोलवर   विचार   करायला   लावणारे   मुद्दे   होते   हे   दोन्ही .  याच   मुद्द्याला   धरून   अमुकनं   लावणीला   राजमान्यता   मिळण्याचा   विषय   काढला .  तिला   महाराष्ट्राची   शास्त्रीय   नृत्यकला   म्हणून   राजमान्यता   मिळाली ;  तर   लावणीला   प्रतिष्ठा   मिळेल ?  तिचे   दिवस   बदलतील ?  कलाकारांच्या   रोजच्या   जगण्यात   फरक   पडेल ?  त्यांचं   समाजातलं   स्थान   बदलेल ? 
भूषणला   तसं   वाटत   नाही .  त्याच्या   मते  - 
" आता   सरकारनं   शास्त्रीय   वा   उपशास्त्रीय   नृत्यकला   असं   वर्गीकरण   बंद   केलं   आहे . ' भारतातल्या   महत्त्वाच्या   मंचकला '  इतकंच   आणि   एवढंच   वर्गीकरण   होतं .  नि   हे   छानच   आहे !  पण   मुद्दा   असा   की ,  असं   वर्गीकरण   आता   बाद   असल्यामुळे   मुद्रा ,  नवरस   वा   कायिक   अभिनय   यांच्या   नियमचौकटीत   लावणी   कितीही   अचूक   बसत   असली ;  तरी   त्यानं   काही   फरक   पडत   नाही .  बरं ,  संगीतबारीची   लावणी   ही   मला   लोककलाही   वाटत   नाही .  लोक   लोकांसाठी   जी   सहज   सादर   करू   शकतात   ती   म्हणजे   लोककला .  तशी   लावणी   काही   लोककला   नव्हे .  ती   मुख्यत्वेकरून   विशिष्ट   वर्गातल्या   लोकांना ,  त्यातही   पुरुषांनाच ,  उपलब्ध   असते .  शिवाय   ती   कोल्हाटी ,  डोंबारी   अशा   काही   विशिष्ट   जातीतल्या   स्त्रियाच   सादर   करतात   आणि   मुख्यत्वेकरून   ती   पुरुषांनाच   पाहायला   मिळते .  ही   काही   लोककलेची   लक्षणं   नाहीत .  फडाचा   तमाशा   किंवा   त्यातली   लावणी ,  याला   मात्र   लोककला   म्हणता   येईल . 
पण   वर्गीकरणाचं   एक   वेळ   बाजूला   ठेवा .  लावणीला   जरी   सरकारदरबारी   मान्यता   मिळाली ,  तरी   त्यानं   कलावंतांच्या   जगण्यात   ताबडतोब   फरक   पडेल   असं   मला   वाटत   नाही .  तिथे   खरी   महत्त्वाची   ठरते   ती   जात .  भरतनाट्यम   हेही   पूर्वी   देवदासी   समाजातल्या   स्त्रियांनी   करण्याचं   नृत्य   होतं .  त्याला   कुठे   होती   प्रतिष्ठा ?  त्यातही   शृंगारिकता   होती .  ती   गेली ,  आणि   मग   अगदी   ब्राह्मण   जातीतल्या   स्त्रिया   ते   करू   लागल्या ,  तेव्हाच   त्याला   प्रतिष्ठा   मिळाली .  ठुमरीचं   काय   निराळं   आहे ?  तिच्यातला   शृंगार   कमी   झाला ,  उच्चवर्गीय   स्त्रियाही   ती   सादर   करू   लागल्या ;  तेव्हा   तिला   प्रतिष्ठा   मिळाली .  उच्चवर्णीय   स्त्रिया   लावणी   कधी   करतील ?  इथे   आपण   पुन्हा   लावणीच्या  ' शुद्धीकरणाच्या   प्रक्रियेपाशी '  येऊन   ठेपतो .  ते   तर   करायचं   नाही … 
शिवाय   या   समाजातल्या   स्त्रियांच्या   पोटापाण्याचा   तो   पेशा   आहे .  त्यांच्याकडून   तो   काढून   घेऊन   मग   त्या   कलाप्रकाराला   प्रतिष्ठा   मिळणार   असेल ,  तर   त्याचा   काय   उपयोग ?  ती   याच   समाजातल्या   स्त्रियांना   मिळायला   हवी ,  तर   त्याला   अर्थ   आहे . 
कोंडी   आहे   खरी .  पण   आमचे   प्रयत्न   चालू   आहेत .  आम्ही   करत   असलेल्या   प्रयत्नांमधलं   पुढचं   पाऊल   म्हणजे   लावणी   कार्यशाळा .  त्यात   फक्त   लावणी   नृत्य   असतं   असा   समज   नावावरून   होईल .  पण   तसं   नाहीय .  लावणीची   अगदी   प्राथमिक   माहिती ,  तिची   सामाजिक   पार्श्वभूमी ,  तिच्यातली   खास   सौंदर्यस्थळं   आणि   शिवाय   प्रत्यक्ष   लावणीचं   प्रशिक्षण  -  असं   ते   असतं .  गृहिणींपासून   ते   कॉलेजमधल्या   विद्यार्थी - विद्यार्थिनींपर्यंत  -  होय ,  होय ,  मुलंही !  फक्त   मुलीच   नाहीत ! -  आणि   शास्त्रीय   नर्तकींपासून   ते   मुक्ता   बर्वे ,  सखी   गोखले ,  गीतांजली   कुलकर्णी   यांच्यासारख्या   अभिनेत्रीपर्यंत   अनेक   जण   या   कार्यशाळेत   शिकून   गेले   आहेत .  आनंदाचा   भाग   हा   की ,  त्यांचं   एका   कार्यशाळेनं   समाधान   होत   नाही .  त्यांना   लावणी   खुणावत   राहते .  ते   पुन्हा   पुन्हा   लावणीकडे   परतत   राहतात ." 
( वाडा   इथे   झालेल्या   लावणीच्या   निवासी   कार्यशाळेत   अर्चना   पटेल ,  विशाल   मोकाशी ,  मुक्ता   बर्वे ,  अश्विनी ,  प्रथमेश   भोईर ,  अंकुर   बल्लाळ ,  सावित्री   मेधातुल ,  सोनल   खळे  ( छायाचित्र  :  सचिन   यशवंते )) 
( वाडा   इथे   झालेल्या   लावणीच्या   निवासी   कार्यशाळेत   अर्चना   पटेल ,  गीतांजली   कुलकर्णी ,  सचिन   यशवंते ,  शकुंतलाबाई   नगरकर ,  भूषण   कोरगांवकर ,  मुक्ता   बर्वे ,  सोनल   खळे ,  अंकुर   बल्लाळ ,  श्रीराम   चौधरी  ( छायाचित्र  :  प्रीती   बकाळकर ) 
( लावणी   कार्यशाळेमधल्या   दोन   चित्रफिती   इथे   आणि   इथे   पाहता   येतील .)  
लावणी   कलावंतांचं   जगणं 
प्रतिष्ठा   इतकी   महत्त्वाची   असते ?  माझा   टिपिकल   मध्यमवर्गीय   प्रश्न .  मला   प्रतिष्ठा   म्हणजे   व्यासपीठावर   जाऊन   शाल   आणि   नारळ   घेण्यासारखं   काहीतरी   निरुपद्रवी   नाटक   वाटत   होतं .  काय   फरक   पडतो   त्यामुळे   रोजच्या   जगण्यात ?  सावित्रीनं   मला   थांबवलं .  ती   मोडनिंबच्या   थिएटरवर   कामासाठी   आठवडाभर   मुक्काम   ठोकून   आलेली   होती . 
" या   बायकांचं   जगणं   सोपं   नसतं . 
थिएटरवरच्या   आयुष्याची   आपण   कल्पनाही   करू   शकत   नाही .  तिथे   या   बायकांना   आठवड्यातून   फक्त   एक   दिवस   बाहेर   पडायची   परवानगी   असते .  खरेदी ,  डॉक्टर ,  ब्यूटी   पार्लर …  सगळं   त्या   एका   दिवसात   आटपायचं .  दिवसा   फक्त   साडी   नेसूनच   वावरायचं   असा   दंडक   असतो .  सकाळी   उठून   नाचाचा   रियाज ,  जेवणखाण ,  मग   तयारी ,  संध्याकाळी   थेटरमधला   कार्यक्रम   आणि   मग   खाजगी   बैठका ,  असा   दिनक्रम   लागलेला   असतो .  अतिशय   गुदमरवणारं   असं   ते   वातावरण   असतं . 
( पिंजरा   कलाकेंद्र ,  वेळे ,  सातारा  ( छायाचित्र :  कुणाल   विजयकर )) 
त्यात   एका   प्रकारे   अर्थकारण   गुंतलेलं   असतं .  सगळं   उत्पन्नच   मुळी   त्या   स्त्रीवर   अवलंबून  -  तिनं   बाहेर   जाऊन   कुणाशी   लफडं   केलं ,  ती   कुठे   निघून   गेली ,  तिनं   बाहेर   काही   मनोरंजन   शोधलं   आणि   ती   परतली   नाही ;  तर ?  हे   थेट   धंदा   बुडण्याशीच  -  पोटापाण्याशीच   येऊन   भिडतं !  त्यामुळे   त्यात   ताबा   गाजवणं   येतंच .  पण   त्यात   संरक्षणाचाही   थोडा   भाग   असतो .  या   मुली   त्यांच्या   कुटुंबापासून   दूर   असतात ,  त्यांच्यापाशी   शिक्षण   नसतं ,  बाहेरच्या   जगाबद्दल   काही   ज्ञान   नसतं ;  त्यांना   कुणी   काही   केलं   तर   जबाबदारी   कोण   घेणार ?  शेवटी   थिएटर   मालक   आणि   पार्टी   हेच   त्यांचं   त्या   काळातलं   कुटुंब   असतं .  त्यामुळेही   ही   बंधनं   येतात .  पण   परिणती   अशी   होते ,  की   या   मुलींना   बाहेरच्या   जगाचं   भान   नसतं ,  त्यात   स्वतंत्रपणे   वावरण्याची   सवय   नसते . 
त्यांच्याकडे   आर्थिक   शहाणपण   टक्केटोणपे   खाऊन   आलेलं   असलं ,  तरी   त्याकरता   कोणतीही   संस्थात्मक   मदत   त्यांच्यापर्यंत   पोचत   नाही ,  पोचलेली   नाही ,  हे   वास्तव   आहे .  वास्तविक   त्यांना   आरोग्याबद्दल   भान   आणून   देण्याची   गरज   आहे ,  तत्संबंधी   मदत   मिळवून   देण्याची   गरज   आहे .  फक्त   शरीरसंबंध   आणि   एड्स   या   दृष्टीनंच   नव्हे ,  पण   त्यांचे   गुडघे - कंबर - पाठ - नियमित   झोपेची   गरज  -  अशा   सगळ्याच   बाबतींत .  पण   त्यांचा   विमाही   उतरवलेला   नसतो .  त्यांच्याकडे   पुरेसं   शिक्षण   नसतं .  ते   देण्याचे   कोणतेही   प्रयत्न   होत   नाहीत .  वास्तविक   त्यांना   ते   आता   गरजेचं   वाटू   लागलं   आहे .  आमच्याकडे   तशी   विचारणा   होत   असते .  साधे   बचत   गटासारखे   आर्थिक   कार्यक्रम   त्यांच्यापर्यंत   पोचत   नाहीत .  त्यांची   बॅंकेत   खाती   असली ,  तरी   बहुसंख्य   व्यवहार   रोखीनं   होतात . 
आमच्या   कार्यक्रमात   मात्र   आम्ही   त्यांना   कोणत्याही   कलाकारासारखं   स्वतंत्रपणे   वागवतो ,  प्रत्येकीचं   पैशाचं   पाकीट   प्रत्येकीच्या   हातात   देतो ,  त्यांना   लोकांशी   बोलाचालायला   उद्युक्त   करतो .  आता   कुठे   वर्षभरानंतर   थोडाफार   फरक   पडायला   लागला   आहे .  त्यांच्या   वागण्यात   थोडा   मोकळेपणा ,  थोडी   सफाईदार   झिलई ,  कपड्यालत्त्यात   थोडं   स्वातंत्र्य   यांची   चुणूक   दिसायला   लागली   आहे .  त्यांच्या   नृत्यात   तो   मोकळेपणा   दिसायला   लागला   आहे .  बुजरेपणा   कमी   झाला   आहे .  अर्थात  -  तरी   थिएटर   मालकांची   आणि   या   मुलींच्या   मालकांची   भीती   असते !  त्यांना   कुणी   जीन्स   घालून   बाहेर   वावरताना   दिसलं ,  तरी  ' हे   धंदे   करतेस   तू   बाहेर ?'  असा   ओरडा   होतो !  विसंगती   आहे ,  कबूल   आहे .  पण   इलाज   काय !  मग   आम्ही   त्यांच्याशी   बोलतो ,  त्यांना   थोडं   शांत   करतो ,  थोडी   लाडीगोडी   लावतो !  ते   निवळतात .  आम्हांलाही   हळूहळू   मालकांची   मर्जी   सांभाळायची   सवय   झाली   आहे !" 
लावणीनंतरचं   आयुष्य  :  निवृत्ती 
या   बायकांचं   म्हातारपणीचं   आयुष्य   कसं   असतं ,  असा   प्रश्न   आम्हांला   होता .  जोवर   पायात   धमक   आहे ,  तोवर   ठीक   आहे .  नंतर ?  निवृत्तीच्या   आयुष्याचं   काय ?  या   प्रश्नावर   भूषण   मिश्किल   हसला . 
" किती   खितपत   पडणारं   आयुष्य   असेल   त्यांचं …  असं   वाटतं   ना ?  मलाही   असं   वाटायचं !  त्यांची   अखेर   किती   उपेक्षित ,  निष्कांचन ,  दयनीय   असेल …  मी   उगाच   कीव   करत   असे   त्यांची .  पण   तसं   काही   नसतं !  खरं   म्हणजे   दोन   प्रकारची   निवृत्ती   असते  -  एक   म्हणजे   मालकानं   घरी   बसायला   सांगितलं ,  तर   नाचणं   संपलं .  मग   घरी   बसायचं .  पण   त्या   मालकाशी   पटलं   नाही   वा   मालक   तुटला   वा   मालकानं   सोडलं  -  की   पुन्हा   नाचायला   उतरायचं .  असं   आत - बाहेर   सतत   चालू   असतं .  त्यातली   अनिश्चितता   गृहीतच   धरलेली   असते .  दुसरा   प्रकार   म्हणजे   वयामुळे   घेतली   जाणारी   निवृत्ती .  पण   ही   निवृत्ती   घेण्याचं   वय   येतं ,  तोवर   बाई   आर्थिक   दृष्ट्या   स्थिर   झालेली   असते .  कारकिर्दीत   मुलांची   शिक्षणं ,  लग्नकार्यं ,  गावी   शेतीवाडी ,  घर   बांधणं ,  काहीतरी   उद्योग   असं   सगळं   बयाजवार   झालेलं   असतं .  बहुतेक   जणी   हे   नीट   जमवतात ,  सगळ्यांनाच   जमतं   असं   नाही .  पण   एकतर   प्रतिष्ठा   नसतानाही   मुलंबाळं   मोठी   करणं ,  लोकांच्या   भोचक   चौकश्यांना   लपवाछपवी   करत   वा   न   करता   तोंड   देणं ,  अनिश्चिततेला   तोंड   देणं ;  यांतून   त्यांच्यात   जगण्याचं   एक   निराळंच   शहाणपण - चतुरपण   आलेलं   असतं .  घुंगरू   आणि   पैसे   इतकंच   भांडवल   त्यांच्यापाशी   असतं .  त्यामुळे   त्या   आलेल्या   पैशांचा   उत्तम   विनियोग   करतात .  पैसे   कमवण्यापासून   त्याची   नीट   व्यवस्था   लावण्यापर्यंत   आणि   मुलंबाळं   जन्माला   घालण्यापासून   आपल्या   कुटुंबाचं   उत्तम   पालनपोषण   करण्यापर्यंत   त्या   सगळं   काही   करतात .  स्थैर्याचं ,  स्वाभिमानाचं   म्हातारपण   घालवतात .  अनेक   जणींवर   अनेक   प्रकारचं   शोषित ,  अस्थिर   आयुष्य   जगण्याची   पाळी   येते   हे   खरं .  पण   त्या   रडत   बसत   नाहीत .  जिद्दीनं ,  हसत   उभ्या   राहतात ." 
या   सगळ्या   गप्पांदरम्यान   मला   राहून   राहून   प्राचीन   भारतातलं   गणिकांचं   वर्णन   आठवत   होतं .  त्याही   चतुर ,  अष्टावधानी ,  बहुश्रुत ,  रसिक ,  कलावंत   इत्यादी   असत .  पण   त्याहीपेक्षा   महत्त्वाचं   म्हणजे  -  राजसत्तेच्या   आश्रयाला   असतानाही   त्या   लिंगभेदाच्या   पलीकडचं   स्वातंत्र्य   मिळवणाऱ्या   स्त्रिया   असत .  त्यांना   रूढार्थानं   सामाजिक   प्रतिष्ठा   नसे .  पण   संसारादी   मार्गांनी   मिळणाऱ्या   चाकोरीबद्ध   प्रतिष्ठेची   गरजच   पडू   नये   असं   स्वतंत्र   आयुष्य   त्यांनी   घडवलेलं   असे .  नेमकं   हेच   निरीक्षण   पॅरिसमधल्या   वेश्यांबद्दलही   नोंदलं   गेलं   आहे .  पण   भारतीय   संदर्भात   कधीही   न   विसरता   येण्यासारखी   एक   गोष्ट   इथेही   आहेच .  जातिवास्तव .  या   व्यवसायात   येताना   परिस्थिती   तसंही   निवडीचं   स्वातंत्र्य   कुणालाच   देत   नसते ,  पण   परंपरेनं   तिला   शोषणाचा   आणखी   एक   क्रूर   वळसा   मिळतो .  परिस्थिती   ओढवलीच   दुर्दैवानं ,  तर   कोणत्याही   प्रकारचं   शिक्षण   वा   पाठबळ   नसलेली   ब्राह्मणाची   बाई   काय   करते ?  ती   निरुपायानं   पोळपाट - लाटणं   हाती   घेते .  तिच्या   पायात   घुंगरू   बांधले   जात   नाहीत .  हे   खास   भारतीय   व्यामिश्र   वास्तव . 
पण   तरीही  -  लैंगिक   स्वातंत्र्य   आणि   भौतिकदृष्ट्या   समृद्ध   आयुष्य  -  मग   ते   अपार   कष्टांनी   कमवलेलं   का   असेना  -  असेल ,  तर   स्त्री   परंपरेचं   जोखड   ओलांडून   जाते  -  जाऊ   शकते ,  असं   तर   नाही   ना ?  मला   निष्कर्षाचा   मोह   पडतो .  आणि   पाठोपाठ   आपण   या   शोषक - शोषित   व्यवस्थेचं   उदात्तीकरण   तर   करू   पाहत   नाही   ना ,  असा   आत्मपरीक्षण   करायला   लावणारा   धारदार   प्रश्न . 
उत्तर   मला   अजूनही   सापडलेलं   नाही .  असो . 
लावणी   आणि   लैंगिकता 
लावणीतून   व्यक्त   होणाऱ्या   शृंगाराच्या   विशेष   धीटपणाबद्दल   आम्हांला   कुतूहल   होतं .  नियम   सिद्ध   करणारा   एखाद - दुसरा   अपवाद   वगळता   या   लावण्या   लिहिलेल्या   असतात   त्या   पुरुषांनी .  त्यांत   शरीरसंबंधांचं   अतिशय   थेट   असं   वर्णन   असतं .  क्वचित   बीभत्स   होऊ   शकतील ,   असे   शब्द   असतात .  त्यांच्यावर   अदा   करताना   ती   आकर्षक - दिलखेचक   करायची ,  पण   ओंगळ - अश्लील - बीभत्स   होऊ   द्यायची   नाही ,  ते   जणू   आपलेच   शब्द   असावेत   अशा   आत्मविश्वासानं   आणि   नाजूक   पद्धतीनं   सादरीकरण   करायचं …  ही   एक   निराळीच   कला   आहे .  त्याबद्दल   आम्हांला   बोलायचं   होतं . 
भूषणनं   एक   मार्मिक   निरीक्षण   नोंदवलं . 
" शब्द   जेव्हा   खूप   धीट   असतात ,  तेव्हा   अदा   साधी - मृदू - अस्फुट   असते .  आणि   जेव्हा   शब्द   अगदी   साधेसुधे   असतात ,  तेव्हा   अदा   उत्तान   असते . 
यशोदा   का   नंदलाला  
जू   जू   जू   जू   जू   जू   जू ... 
हे   चित्रपटातलं   एक   अंगाईगीत   आहे .  आता   हे   किती   साधे ,  वात्सल्यपूर्ण   शब्द .  पण   ती   अंगाई   अतिशय   शृंगारिक   पद्धतीनं   सादर   केली   जाते .  असा   तोल   सांभाळणं   हीच   लावणीची   गंमत   आहे .  तो   साधणं   त्यांना   उपजतच   जमतं .  तो   काही   कुणी   कधी   बसवून   शिकवलेला   नसतो   त्यांना .  समतोल   आणि   विषमतोल   हे   आपण   आता   केलेलं   विश्लेषण - विच्छेदन .  त्यांच्या   दृष्टीनं  ' त्यात   आणि   काय   सांगायचं ?  ते   असंच   करायचं   असतं !'  असा   साधासरळसोपा   मामला   असतो !  त्या   बोलता   बोलता   थेट   करूनच   दाखवतात !  तो   पारंपरिक   लावणीतून ,  एका   पिढीनं   दुसऱ्या   पिढीपर्यंत   पोचवलेला   वारसा   आहे ." 
' संगीतबारी '  पुस्तकातला   एक   महत्त्वाचा   भाग   इथे   देणं   अतिशय   उचित   होईल . 
संगीतबारी ,  भूषण   कोरगांवकर ,  राजहंस   प्रकाशन 
*** 
कालच्या   आणि   आजच्या   कलेत   अजून   एक   मोठा   फरक   पडलाय  –  लावण्यांच्या   शब्दांमध्ये .  पूर्वी   अनेक   विषयांवर   लावण्या   लिहिल्या   जात   होत्या .  शृंगारिक ,  आध्यात्मिक ,  शिवाय   देशभक्ती ,  वात्सल्य ,  वर्णनात्मक   अशा   विविध   भावना   दाखवणाऱ्याही   काही   लावण्या   होत्या .  दगलबाज   प्रियकराबद्दल   काही   भाष्य   करणाऱ्या   दोन   लावण्या   माझ्या   पाहण्यात ,  ऐकण्यात   आल्या ... 
हे   झालं   भ्रमनिरास   झालेल्या   एका   स्त्रीच्या   हृदयीचं   रुदन .  दुसऱ्या   बाईच्या   नादी   लागलेल्या   आपल्या   नवऱ्याबद्दल   मांडलेली   ही   आहे   कैफियत .  फुलांनी   सजवलेली   शेज   आता   नुसती   पडून   आहे ,  कारण   तिचा   सार्थ   सन्मान   करणारा   माझा   सखा   आता   माझा   राहिलेला   नाही .  त्याची   बेईमानी   मला   कळून   चुकली   आहे . 
दुसऱ्या   स्त्रीशी   संग   करून   त्याने   माझा   मानभंग   केला   आहे .  असं   वाटतंय   की   जणू   त्याने   माझा   जीवच   घेतलाय . 
शेज   मंचकी ,  व्यर्थ   राहिली   रे  
शेज   मंचकी ... 
 कळूनी   आला   बईमान  
कापिली   मान , 
 ओवुनी   प्रान ,   माझे   आन  
नवीन   पाहिली   सवत   कोनती  
तिनी   मोहून ,  वचन   देऊन  
भुलला   पाहून ,  थाप   देऊन ,  हाक   देऊन  
ममता   दाविली   प्राणमंदिरी  
बसुनी   शांत   पाहते   अंत  
माझे   नाथ   कसे   निवांत ,  कसे   निवांत  
पाहुनी   भ्रमला   प्राणमंदिरी 
हे   शब्द   जेव्हा   एक   लावणी   गायिका   तुमच्यासमोर   पेश   करते ,  तेव्हा   त्यातल्या   उघड   विरोधाभासामुळे   ते   एका   वेगळ्याच   उंचीवर   जातात .  म्हणजे   प्रत्यक्षात   दुसऱ्या   स्त्रीचा   दर्जा   असलेली   स्त्रीच   जेव्हा   हे   पहिल्या   प्रेयसीचं   दु : ख   अनुभवते ,  तेव्हाच   समजून   येतं   की   शेवटी   फसवणूक   झालेल्या   सगळ्यांची   मन : स्थिती   ही   सारखीच   असते .  फसवणूक   झालेली   व्यक्ती ,  मग   ती   स्त्री   असो   वा   पुरुष ,  विवाहित   असो   वा   अविवाहित ,  आपलं   माणूस   दुसऱ्याच्या   बाहूपाशात   रममाण   झालेलं   पाहतानाचं   दु : ख   किती   तीव्र   असतं   याचा   एक   सुंदर   आलेख   त्या   लावणीत   अनुभवास   येतो . 
... 
या   विषयावरची   मी   पाहिलेली   दुसरी   लावणी  ' तुझं   रं   नाही   होणार   कल्याण '  मात्र  ' शेज   मंचकी ' च्या   पहिल्या   चौकाइतकी   संयत   नाही .  त्यातली   स्त्री   आक्रमक   आहे .  मला   दगा   दिलास   ना ,  आता   बघ   तुझ्या   नशिबाचे   फेरे   कसे   उलटे   पडतील   ते ,  तू   देशोधडीला   लागशील ,  असं   सांगणारी   ही   नायिका   सूडाच्या   आगीने   पेटून   उठलेली   आहे .  रेशमा   परितेकरने   सादर   केलेली   ही   लावणी   पाहून   स्वत :  असा   अपराध   कधी   केलेला   नसतानाही   तिचे   शिव्याशाप   ऐकून   मनाचा   थरकाप   उडतो .  बांगड्यांनी   भरलेले   हात   जेव्हा   स्टेजवर   जोरजोरात   आपटून   आरती   जावळे  ' भोवंल   तुला   माझा   तळतळाट '  म्हणते ,  तेव्हा   ते   ऐकताना   अंगावर   काटा   उभा   राहतो .  हे   यश   जितकं   रेशमा - आरतीच्या   सादरीकरणाचं ,  तितकंच   त्यातल्या   कठोर   शब्दांचंही   आहे .  या   लावणीचा   शेवटचा   अंतरा   मात्र   गमतीशीर   आहे . 
खेळ   खेळू   विटी - दांडू   न्   भवऱ्याचा  
शेवट   काय   करशील   नवऱ्याचा 
यातले  ' खेळ   खेळू   विटी '  हे   तीनच   शब्द   भरपूर   वेळ   घोळवले   जातात .  विटी - दांडूचा   खेळ   यथेच्छ   खेळून   झाल्यावर ,  दमल्या - भागल्यावर   तिला   प्रश्न   पडतो ,  एवढं   फसवणाऱ्या   या   क्रूर ,  लबाड   नवऱ्याचा   शेवट   कसा   बरं   करावा ? 
शृंगार   या   एकाच   विषयाला   वाहिलेल्या   तर   असंख्य   लावण्या   पूर्वी   होत्या .  शृंगाराच्या   तर्हा   तरी   केवढ्या .  सलज्ज   स्त्री - आक्रमक   पुरुष ,  आक्रमक   स्त्री - लाजाळू   पुरुष ,  दोघे   आक्रमक ,  दोघे   लाजाळू ,  शांत   अशा   वेगवेगळ्या   जोड्या   त्यांत   असायच्या .  आजच्या   तुलनेत   हा   शृंगार   जास्त   थेट   आणि   जास्त   तपशीलवार   होता .  वानगीदाखल   काही   ओळी   पाहा  : 
' नका   चोळू ,  जोबन   हुळहुळी   गं ...' 
' शिंगेवरती   स्वार   शिपाई ,  कमवुनी   घ्या   शिंगेला  
आसनामध्ये   आसन   दाटले   असे   भासले   मजला ...' 
' आवळून   कवळून   धरिते   सख्याला ,  मुखामध्ये   मुख   घाला  
कंबर   उचलुनी   देते   सख्याला ,  मानेखाली   हात   घाला ...' 
' कवळे   स्कंद ,  चुरी   गेंद ,  होउनी   धुंद ,  सदा   फुंद ...' 
' कळ   साहीना ,  मदन   साचला ...' 
' इश्क   लहर ,  चार   प्रहर ,  जाहला   भार ,  वारंवार ...' 
' दोन्ही   मांड्यांमध्ये   मांस   दडपता   वेणीचा   बुचडा   सुटला , 
 मानेवरती   चोळी   जिरली ,   कमरेस   हासडा   बसला ...' 
' हळूहळू   चालवा ,  पाझर   भरवा ,  सुटंल   वरच्यावरी  
सख्या   आला   ओघळ   मांड्यांवरी ... 
 ओले   लुगडे   झाले   उघडे   खिसणीनं   आंबा   खिसा  
राया   तुमच्या   धोतरानं   डाग   हा   पुसा ...' 
हे   सगळं   ऐकून   आजच्या   द्व्यर्थी   लावण्या   फार   फिक्या ,  मिळमिळीत   वाटू   लागतात .  या   जुन्या   लावण्यांसारखंच   शारीर   गरजांचं ,  इच्छांचं ,  क्रियांचं   थेट   वर्णन   हे   भारतातील   इतर   कलाप्रकारांतही   काही   प्रमाणात   आढळतं .  परंतु   तिथे   ते   देव   आणि   त्याची   भक्त   या   स्वरूपात   येतं ,  नायिकेच्या   देवभक्तीचा   एक   प्रकार   म्हणून   त्याच्याकडे   पाहिलं   जातं .  तीच   कामना ,  तीच   क्रिया ,  पण   ती   राधाकृष्णांची   किंवा   इतर   देवांची   बनून   आली   की   तिला   एक   प्रकारचं   दिव्यत्व   येत   असावं .  किंबहुना   नायिका   म्हणजे   इहलोकीची   माणसं ,  आणि   नायक   म्हणजे   परमेश्वर   असं   रूपकच   योजलेलं   असतं .  लावणीत   मात्र   जे   काही   घडतं ,  ते   हाडामांसाच्या   माणसांत   घडतं .  स्वत : च्या   लैंगिकतेला   लपवण्याचे ,  दाबण्याचे   संस्कार   आपल्यावर   सतत   होत   असल्यामुळे ,  अभिजनवर्गाला   इतर   कलांमधली   रूपकं   श्रेष्ठ   वाटतात   आणि   लावणीतला   थेटपणा   कमी   प्रतीचा   वाटतो . 
शकुंतलाबाई   नगरकरांचा   या   बाबतीतला   किस्सा   इथे   नमूद   करावासा   वाटतो ... 
..." जेमतेम   सोळाची   असंन .  एके   दिवशी   बैठकीत   त्या   लावणीची   फर्माईश   झाली .  मी   गाऊ   लागले . 
निवळ   चिमणी   हो   निवळ   चिमणी   मदनमस्ता  
फोडुनी   गल्ली   पार ,  खोदिला   रस्ता  
नेउनी   एकान्ती  
लिंग   हो   काढिले  
मला   हसू   येते  
हे   काय   मांडिले 
असे   काय - काय   शब्द   होते .  ' निवळ   चिमणी '  म्हणताना   मी   आपली   उडणाऱ्या   चिमणीची   अॅक्शन   सुरू   केली .  फर्माईश   करणारा   माणूस   मोठा   दर्दी   होता .  त्यानं   खऱ्या   अर्थाची   ती   किळसवाणी   अॅक्शन   करून   दाखवली .  मी   लाजेनं   चूर .  तो   हटूनच   बसला .  शेवटी   आईनं   त्याला   हात   जोडले ,  म्हणाली ,  हिला   काही   ते   जमायचं   नाही ,  आपण   दुसरी   लावणी   घेऊ   या ." 
सगळ्या   खूप   हसत   होत्या . 
" हा   एक   वाईट   अनुभव   झाला .  पण   अशे   कित्येक   चांगले   रसिक   त्या   काळी   होते ,  जे   आमचं   काही   चुकलं ,  तर   स्वत :  करून   दाखवायचे .  कलेची   खरी   जाण   तेव्हा   होती .  आमच्या   चुका   होऊ   नयेत   म्हणून   ते   धडपडायचे .  कुठून - कुठून   नवीन   गाणी ,  त्यांची   माहिती   असं   साहित्य   आणून   द्यायचे .  कित्येक   गोष्टी   मी   अशा   रसिकांकडूनच   शिकल्ये .  आम्ही   सगळं   आत्मसात   करून   त्यात   आपली   भर   घालून ,  नवीन   आणि   चांगलं   काही   पेश   केलं   की   ते   इतके   खूश   व्हायचे ,  की   ती   खुशी   पाहूनच   आम्ही   भरून   पावायचो ." 
" आज   या   चावट   लावण्या   बंदच   झाल्यात   ना ?"  मी   म्हटलं . 
" आजच्या   मुलींना   लाज   वाटते .  त्या   सरळ   सांगतात ,  जमणार   नाही   म्हणून .  अन्   त्यांनी   केलं   तरी   ते   बघायला   प्रेक्षक   बी   राहिले   नाहीत   ना   तश्ये .  निवळ   चिमणी   गलिच्छच   होती .  पण   बाकी   किती   चांगल्या   चांगल्या   लावण्या   होत्या ,  त्या   सगळ्या   मागं   पडल्या .  आता   तुम्ही   जे   रोज   आवडीनं   करता ,  त्यावर   लावणी   बनवली   तर   ती   लगेच   अश्लील   कशी   काय   होऊ   शकते ?  आज   हिंदी   पिक्चरमध्ये   जी   गाणी   दाखवतात ,  ती   आख्खं   कुटुंब   एकत्र   बसून   बघतं .  म्हणजे   लोकांना   अश्लील   वाटत   नाही .  तर   मग   आमची   लावणी   बी   अश्लील   नाहीच ."  त्यांचा   मुद्दा   बिनतोड   होता .  मधुकर   नेराळेंच्या   मते   खजुराहोच्या   मंदिरातली   संभोगशिल्पं   अभिजात   आणि   लावणीतलं   संभोगवर्णन   मात्र   कलाहीन   हे   कुणी   ठरवायचं ? 
शकुंतलाबाईंनी   सादर   केलेली  ' सोडा   सोडा   राया '  ही   लावणी   अशीच   भन्नाट   आहे .  इश्काने   पागल   झालेला   आपला   यार   कसा   नको   जीव   करून   सोडतो   याचं   मोठं   खुमासदार   वर्णन   यात   आहे . 
सोडा   सोडा   राया ,  तनू   शिणली  
वेणी   सुटली ,  निरी   फिटली  
तरी   तुमच्या   मनाची   शांती   नाही   झाली  
दमली   न्   झाले   बाई   मी  
तरी   मला   सोडीना  
घामानं   काया   सारी   भिजली  
सोडा   सोडा   राया ,  तनू   शिणली  
आवळुनी   धरिता  
कवळुनी   धरिता  
चुंबन   घेता  
दंत   रुतले   गालीऽऽ  
साऱ्या   अंगाची   बाई   माझ्या   कमान   करिता  
पोटात   माझ्या   कळ   रुतली 
या   चावट   शब्दांवरचा   शकुंतलाबाईंचा   अभिनय   थक्क   करणारा   असतो . 
... 
दूर   देशी   गेलेल्या   पतीमुळे   त्याची   पतिव्रता   कशी   झुरत्ये   याचं   वर्णन   करणाऱ्या   लावण्यांमध्ये   तिच्या   शरीराच्या   भुकेचंही   तपशीलवार   वर्णन   असे .  सगनभाऊंच्या   या   लावणीतली   ही   गरती   स्त्री   आपली   अवस्था   सांगताना   म्हणते , 
कामचेतना   झाली   शरीरी ,  विशेष   आग्न   होती  
कंबरेतुनी   निऱ्या   भिजल्या ,  चोळीत   भिजली   छाती  
मस्तीमध्ये   गजराज   टोचितो   भाले   जखमांवरती  
त्या   जखमांचा   गुमान   नाही ,  झुलत   चालला   हत्ती  
मी   बाहेर   पडल्यावर   लोक   तमाशा   पाहती  
तशीच   कळ   सोशिते ,  परंतु   आम्ही   अबरूच्या   गरती  
माझे   मला   भासते ,  पतीवीण   झोप   लागेना   नयनी ,  महालातुनी … 
मोहनाबाईंनी   जी   लावणी   खेळून   मुंबईतल्या   रसिकांना   घायाळ   केलं   होतं ,  त्या  ' सुकुमार   गुलाबाच्या   फुला '  या   लावणीत   तर  ' वुमन   ऑन   टॉप '  हे   आसनही   सांगितलं   आहे . 
आणखी   एक ,  बाई ,  सांगिते   मी   मजा  
बाई ,  खाली   तुम्ही   निजा  
वरुनी   मी   हो   जुगते ,  वरुनी   मी   हो   जुगते ... 
 खाली   उतरायाच्या   वेळी   आला - बला   घेते  
कमरेसी   घाला   जरा   मिठी  
करा   हो   झटपटी ,  घाईला   मी   येते 
मुळात   इथे   एक   भूमिकांची   मस्त   अदलाबदल  ( रोल   रिव्हर्सल )  आहे .  आपल्या   साहित्यामधून   पुरुषाचं   चित्र   नेहमी   राकट ,  धिप्पाड ,  कणखर   असं   रंगवलेलं   असतं ,  आणि   स्त्रीचं   नाजूक ,  सुगंधी   फुलासारखं !  पण   या   लावणीत   नायिका   आपल्या   प्रियकराला   चक्क  ' सुकुमार   गुलाबाच्या   फुला '  अशी   हाक   मारत्ये .  स्त्रीचं   सामर्थ्य   आणि   तिला   असलेला   समान   दर्जा   लावणीतून   असा   सतत   दिसून   येतो . 
अजून   एका   लावणीतल्या   नायिकेला   स्वत : चा   संभोग   आरशात   पाहायची   इच्छा   झालीय   आणि   हे   करण्यास   पतीस   ती   विनवणी   करतेय , 
आसन   आरशात   मला   पाहू   द्या ... 
या   सगळ्या   लावण्या ,  हे   सगळे   शब्द   बहुसंख्य   वेळा   पुरुषांनी   लिहिलेले   असले ,  तरी   त्यात   स्त्रियांची   लैंगिकता   फार   उघडपणे   मांडलेली   आढळते .  भलेही   ते   पुरुषरंजनाकरताच   लिहिलेले   असू   दे ,  भलेही   त्यात   स्त्रीच्या   भावनांच्या   अभिव्यक्तीचा   हेतू   नसू   देत .  परंतु   पुरुषाने   लिहिलेले   हे   शब्द ,  जेव्हा   एका   स्त्रीच्या   तोंडून   तुमच्यापर्यंत   येतात ,  तेव्हा   ती   त्यात   स्वतःची   अशी   काही   भर   घालते ,  की   ते   तिचे   स्वत : चेच   होऊन   जातात .  त्यामुळे   लावणी   म्हणजे   समर्थ   स्त्रियांची   सशक्त   अभिव्यक्तीच   बनून   जाते .  ज्याने   अशा   एखाद्या   ताकदीच्या   कलाकाराने   खेळलेली   शरीरसंबंधावरची   लावणी   प्रत्यक्ष   पाहिली   आहे ,  त्यांनाच   हे   जाणवू   शकेल . 
... 
[ या   लावणीतली ]...  नायिका   आज   कुठे   गेली ?  नहाण   येण्याच्या   प्रसंगाचं   वर्णन   करणाऱ्या   बऱ्याच   लावण्या   होत्या .  एका   लावणीत   नायिका   स्वत : च्या   मासिक   पाळीचं   कारण   सांगून   सख्याला   चतुराईनं   दूर   ठेवते .  ही   लावणी   सादर   करताना   त्या   काळी   स्त्रिया   पांढरी   शुभ्र   साडी   नेसत   आणि   तोंडात   पानाची   पिंक   ठेवीत . ' झाले   दूरशी '  ही   ओळ   आली   की   निरीवर   पानाची   पिंक   टाकून   तो   लाल   रंगाचा   परिणाम   साधत .  आजच्या   आधुनिक   काळाचे   परिमाण   लावल्यासदेखील   ते   काळाच्या   पुढचंच   वाटतं . 
माहेरी   येऊन   जुन्या   प्रियकराकडे   जाऊन   त्याला  ' वन   लास्ट   टाईम '  संग   करण्याची   विनवणी   करणाऱ्या ,  पतीला   विविध   आसनं   शिकवणाऱ्या ,  त्याला   शृंगारातली   मजा   दाखवणाऱ्या ,  त्याची   थट्टा   करणाऱ्या ,  स्वत :  पुढाकार   घेऊन   त्याला   मार्ग   दाखवणाऱ्या   नायिका   आज   का   गप्प   झाल्या ? 
आज   या   जुन्या   धीट   लावण्या   बंदच   झाल्या   आहेत .  त्या   सादर   करण्यासाठी   एका   निराळ्याच   दर्जाच्या   आत्मविश्वासाची   गरज   असते .  एक   प्रकारचा   बेधडकपणा   आणि   थेटपणा   अपेक्षित   असतो .  तो   आजच्या   मुलींकडे   आहे   का ?  नक्कीच   आहे .  मग   या   लावण्या   आज   मागे   का   पडल्या ? 
लावणी   आणि   प्रेक्षक 
आज   ही   लावणी   कुठे   गेली ,  या   प्रश्नाचं   उत्तर   गुंतागुंतीचं   आहे ,  काहीसं   गैरसोयीचंही   आहे .  त्याचा   थेट   संबंध   शब्दांकडून   प्रतिमाप्रधान   माध्यमांकडे   झुकत   गेलेल्या ,  बटबटीत   होत   गेलेल्या   आपल्या   अभिव्यक्तीशी   लागतो .  ते   मनात   घोळवत   पुढच्या   प्रश्नाचा   विषय   काढला .  प्रेक्षकांच्या   प्रतिसादाबद्दल   मी   चिकार   ऐकलं   होतं .  शहरातले   प्रेक्षक ,  ज्यांना   लावणीची   सवय   नाही ,  ही   शुद्ध   न   केलेली   खट्याळ   लावणी   त्यांना   किती   रुचते ,  किती   पचते ,  किती   रंगते ?  असे   अनेक   प्रश्न   मला   पडले   होते .  प्रत्यक्ष   कार्यक्रम   न   पाहिल्यानं   अजूनच   उत्सुकता . 
सावित्रीच्या   मते  - 
" आमचा   कार्यक्रम   लहान   सभागृहात   उत्तम   रंगतो .  कारण   शेवटी   तो   बैठकीच्या   नृत्याचा   प्रकार   आहे .  मोजके   प्रेक्षक ,  प्रेक्षक   शक्य   तितका   जवळ   असणं   आणि   दाद   देणारा   प्रेक्षक   असणं   या   तिन्ही   गोष्टी   असतील ,  तर   अर्थातच   तो   अधिक   रंगतो .  मोठ्या   सभागृहात   तो   रंगत   नाही   असं   नाही .  दिल्लीतल्या   अमराठी   प्रेक्षकांनी   आम्हांला   छप्परतोड   प्रतिसाद   दिला .  एक   सरदारजी   गृहस्थ   तर   शकूताईंसोबत   नाचायला   जवळजवळ   रंगमंचावरच   आले   होते !" 
( साठ्ये   महाविद्यालयात   झालेल्या   कार्यक्रमाला   प्रेक्षकांचा   दिलखुलास   प्रतिसाद  ( छायाचित्र  :  कुणाल   विजयकर )) 
*** 
भूषणही   अमराठी   प्रेक्षकांच्या   कौतुकात   उतरत   सांगायला   लागला  - 
" हेही   एक   गमतीदार   निरीक्षण  -  आमच्या   कार्यक्रमाची   मजा   लुटायसाठी   मराठी   भाषा   अवगत   असलीच   पाहिजे ,  असं   काही   नाही !  अमराठी   प्रेक्षकही   त्याची   मनःपूत   मजा   लुटतात . ' आपल्याला   मराठी   आलं   असतं ,  तर   अजून   किती   मजा   आली   असती   ना …'  अशी   हळहळ   त्यांना   वाटते .  भाषेची   गंमत   त्यांच्याकडून   हुकतेही .  पण   तरीही   ते   कार्यक्रमावर   खूश   असतात .  एका   ब्राझिलियन   रंगकर्मी   माणसानं   तर   आमच्या   कार्यक्रमाचं   इतकं   सुंदर   विश्लेषणात्मक   कौतुक   केलं   होतं  - " पारंपरिक   घाट ,  समकालीन   टिप्पणी   आणि   साथीला   त्या   स्त्रियांच्या   आयुष्याची   खरीखरी   गोष्ट  -  हे   तुम्ही   इतकं   सुंदर   सादर   करता !  त्यातून   त्या   बाईला   तुम्ही   प्रतिष्ठाच   देत   असता …"  हे   कौतुक   ऐकून   आम्हांला   अगदी   धन्य   धन्य   झालं   होतं !  इतकं   भारी   विश्लेषण   तर   आम्हीही   करू   शकलो   नसतो   आमच्या   कार्यक्रमाचं .  नि   हे   त्याला   मराठी   येत   नसताना  -  मराठी   काय   कोणतीही   भारतीय   भाषा   येत   नसताना .  तसाच   आमच्या   एका   कार्यक्रमाला   एक   ऑस्ट्रियन   रंगकर्मी   होता .  त्याच्याशी   नंतर   बोलताना   आम्ही   त्याला   सांगत   होतो ,  आम्ही   भाषांतर   करण्याच्या   प्रयत्नात   आहोत .  तर   पठ्ठ्या   म्हणे , " छे !  काही   गरज   नाही .  मला   भाषा   कळत   नसली   तरी   तुम्ही   कशाबद्दल   बोलताहात ,  ते   किती   संवेदनशील - नाजूक   विषयावरचं   आहे ,  त्यात   किती   खोलवरचं   विरेचन   आहे ,  हे   अगदी   नीट   कळत   होतं   मला .  प्रेक्षकांचं   हसणं - खिदळणं - मजा - मस्ती   असूनही   हा   गंभीर   धागा   लपत   नाही   त्या   कार्यक्रमातला ."  बास !  अजून   काय   हवं ?  त्यानं   आमच्या   बायांना   येऊन   मिठ्या   मारल्या ,  गालांवर   मुके   घेतले ,  त्यांचं   अभिनंदन   केलं  -  त्यामुळे   आमच्या   बायकाही   खूश ,  तोही   खूश   आणि   आम्हीही   खूश .  नंतर   किती   दिवस   कुणीतरी   गोरं   दिसलं   की   आमच्या   बायका   त्याची   आठवण   काढायच्या !" 
भूषणच्या   पोतडीत   अजूनही   एक   गंमत   होती . 
" पिरामल   गॅलरीत   आम्ही   एक   कार्यक्रम   केला   होता .  लोअर   परेलची   ती   आर्ट   गॅलरी . ' पुरुषी   नजर '  असा   विषय   घेऊन   त्यांनी   काही   कार्यक्रमांचं   आयोजन   केलं   होतं .  त्यात   संगीतबारी   आणि   त्याबद्दलची   चर्चा   असा   एक   दिवस   होता .  त्या   कार्यक्रमात   शृंगाररसाबद्दलही   चर्चा   झाली .  शृंगार   दाखवण्याचे   काही   विशिष्ट   हावभाव   असतात .  बाईने   छाती   आणि   कंबर   उडवणं   यातूनच   शृंगार   दाखवला   जातो   असा   आपला   एक   समज   आहे .  पण   ते   तितकंच   सीमित   नसतं .  शकूताईंनी   काशीच्या   ब्राह्मणाची   व्यक्तिरेखा   करून   दाखवणं  -  त्यात   त्या   पूर्ण   पुरुषी   व्यक्तिरेखा   उभी   करतात .  आणि   त्यातून   शृंगाराचा   एक   निराळा   पैलू   प्रेक्षकांना   अनुभवता   येतो .  पुरुषी   नजरेतून   ठरीव   होत   गेलेल्या   शृंगाराचा   साचा   तर   यातून   मोडला   जातोच .  पण   हे   एका   प्रकारे  ' मेल   गेझ ' ला  -  पुरुषी   नजरेला  -  पार   उलटपालट   करून   टाकणारंही   आहे .  लावणीत   हा   परकायाप्रवेशाचा   धागा   आहेच .  पूर्वी   ढोलकी - फडाच्या   तमाशात   पुरुष   बाई   बनून   नाचायचे .  आता  ' बिनबायकांच्या   तमाशा ' त   ते   सूत्र   आपल्याला   पुन्हा   भेटतं . ( ' न्यू   यॉर्कर ' मधली   बातमी  .) हे   खास   लावणीचं   सामर्थ्य   आहे ."  
आज   या   सामर्थ्याचं   काय   झालं   आहे ? 
' नटले   तु्मच्यासाठी ' मध्ये   शकूताई   याबद्दल   जे   काही   बोलतात ,  ते   कमालीचं   मार्मिक   आहे . 
 
VIDEO 
 
' संगीतबारी '  या   पुस्तकात   भूषणने   एक   गंमतीदार   किस्सा   सांगितला   आहे . ' जवळी   यावं ,  मला   पुसावं ,  गुपित   माझं   खुशाल ...'  हे  ' तुम्हांवर   केली   मी   मर्जी   बहाल '  या   प्रसिद्ध   लावणीतले   शब्द .  त्या   शब्दांवर   कुणी   नवखी   नर्तकी   नाचत   असलेली .  तिनं  ' पुसाल '  या   शब्दावर   काय   अदा   करावी ?  टॉवेलनं   अंग   खसखसून   पुसण्याचा   अभिनय ! 
हे   वाचून   हसू   येतं   खरं .  पण   वास्तविक   ते   अतिशय   विदारक   असं   वास्तव   आहे .  दोन   शब्दांच्या   मधल्या   अतिशय   नाजूक   जागा   टिपण्याचं   आणि   व्यक्त   करण्याचं   अनन्य   सामर्थ्य   असलेला   हा   नृत्यप्रकार .  तो   आज   कुठे   येऊन   पोचला   आहे ?  कुणी   याचा   प्रतिवाद   म्हणून   अकलूजच्या   स्पर्धेचं   वा   खुद्द   सावित्री - भूषणच्या   कार्यक्रमाचं   आशादायी   उदाहरण   देईल .  पण   शेवटी   हे   दोन्ही   प्रवाहाविरुद्ध   चाललेले   प्रयत्न   आहेत .  अपवादात्मक   आहेत .  त्यानं   नियमच   सिद्ध   होतो .  लावणीच्या   क्षेत्रातल्या   अस्तंगत   होत   चाललेल्या   पारंपरिक   कलावंतांवरूनही   हाच   नियम   सिद्ध   होईल ,  की   लावणीचं   हे   सामर्थ्य   जपण्यासाठी   आज   कुणापाशीच   वेळ   नाही .  जातीचं   वर्चस्व   मोडायला   लागलं   आहे ,  हे   चांगलं   आहेच .  पण   परंपरेनं   दिलेल्या   वारशाचा   चांगला   भागही   त्यासोबत   लुप्त   होऊ   लागला   आहे .  हातात   पैसे   खेळवणारं   नवश्रीमंत   गिर्हाईक   आज   संगीतबारीचा   प्रमुख   प्रेक्षक   आहे .  त्याला   लावणीबद्दलची   ही   जाण   आहे ?  त्या   प्रेक्षकाला   रस   आहे   तो   मन   रिझवणारी ,  सुरेख   दिसणारी   आणि   नाचणारी   एखादी   मराठमोळी   मैत्रीण   झटपट ,  तात्पुरती   आणि   हमखास   मिळवण्यात .  तो   साहजिक   त्याच्या   आवडत्या   हिंदी   गाण्यांची   फर्माईश   करतो   आणि   दिसेल   ते   पदरी   पत्करून   पवित्र   होतो .  गिर्हाइकाच्या   दौलतजाद्यावर   कलाकाराचं   पोट   असल्याने   कलाकारही   या   दुष्टचक्राचा   भाग   होतो .  मराठी   सिनेमे   आणि   सिनेमातली  ' आयटम   सॉन्ग ' ही   ह्या   प्रक्रियेला   हातभारच   लावताहेत . ' देऊळ '  चित्रपटातलं  ' वेलकम   हो   राया   वेलकम '  आठवा .  मादक   गीतामधला   सगळा   शृंगारिक   नखरा   आणि   नाजूकपणा   काढून   टाकला ,  नि   त्यात   झटपट   पैशाचा   माज ,  लखलखाटाची   भूक   आणि   न   संपणारी   तहान   खच्चून   भरली   तर   काय   होईल ?  त्याचंच   प्रतिबिंब   त्या   गाण्यात   सही   सही   पडलेलं   दिसतं . 
लावणीसारखी   एकमेवाद्वितीय ,  अभिजात   कलाही   हळूहळू   पण   निश्चितपणे   या   सवंगीकरणाची   वाट   चालू   लागलेली   आहे . 
शाहीर   रामजोशी   एका   लावणीतच   म्हणून   गेले   आहेत , 
... कवितारस   मनांत   झडकरि   यावा  
पुण्याचा   ठेवा  
दाता   परि   नीरस   काय   करावा , 
 जन   मार्मिक   व्हावा ... 
मराठी   रसिकतेची   परंपरा   मोठी   उज्ज्वल ,  रसाळ   आहे   खरी .  पण   आज   लावणीचं   होऊ   घातलेलं   हे   पॉर्नीकरण   टाळायचं   असेल ,  तर   जनांनाच   मार्मिक   व्हावं   लागेल ... 
( छायाचित्र :  कुणाल   विजयकर ) 
***
मूळ प्रकाशित लेखन 
इथे  वाचता येईल.