Tuesday, 9 March 2010

हॅपी विमन्स डे, बाय दी वे!

अभिजीतने न दिलेला खो मी घेतला नि हे खरडलं.

बायका फक्त बायका आहेत म्हणून त्या करतील ते ते आपोआपच महान / प्रगतिशील / पुरोगामी ठरतं; या गृहितकाची जिम्मा मी तरी अल्पसंख्याकांचं नेहमीच बरोबर आणि ते कायमच सहानुभूतीस लायक, दलित साहित्य चाकोरीबाहेरचं / गावकुसाबाहेरचं असल्यामुळे थोर, योनी या निषिद्ध शब्दाभोवती आणि अवयवाभोवती फिरणारं नाटक केलं म्हणून ते आपोआपच चांगलं - या आणि असल्या समीकरणांमधेच करते. मग महिलादिनाचं आणि ’त्या होत्या म्हणून आम्ही आहोत’चं प्रयोजन काय?

लेट मी क्लिअर - माझेही या प्रश्नाबाबत मेजर घोळ आहेत. तेच सोडवायचा प्रयत्न चाललाय.

इतिहासात शिरायचं की कसं? मरो, होऊन जाऊ दे. अजूनही बायका स्वेच्छेनं मंगळसूत्रं, मुलंबाळं, घर-संसार, धुणी-भांडी, लिंगभेद आणि बरंच काय काय करतात किंवा करत नाहीत, हे मान्यच. तसंच अजूनही काही ब्राह्मणेतर जातीतल्या पोरानं ब्राह्मण (’ब्राह्मण’च्या जागी कुठलाही उच्चवर्णीय समाज घातला तरी चालेल) पोरगी गटवली, की त्याचा / त्याच्या आप्तांचा इगो कुठेतरी सुखावतोच. मग जातिभेद महान (किंवा गेला बाजार अपरिवर्तनीय वगैरे तरी) आहेत आणि त्यांच्या उच्चाटनाची /  किमान त्यांतून होणार्‍या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शोषणाच्या उच्चाटनाची गरज / शक्यता नाही असं म्हणायचं का?

कुठल्याही समाजात आपलं होणारं शोषण / आपल्यावर होणारा अन्याय या बाबींचा साक्षात्कार सगळ्याच्या सगळ्या शोषितांना एकसमयावच्छेदेकरून झाला, असं कधीच होत नाही. काही लोकांच्या लक्षात आधी येतं, काहींच्या नंतर. काहींच्या शतकानुशतकांनंतरही - किंवा खरं तर, कधीच - लक्षात येत नाही, तर काही जण सुधारकी रेट्याची वाट पाहण्यात वा समकालीन समाजाच्या वेगाशी सामोपचारानं जुळवून घेण्यात अजिबात वेळ दवडत नाहीत. स्वत:च्या आयुष्यातला अन्याय दूर करून मोकळे होतात. हे जे बाकीच्या समाजानं बदलण्याची वाट बघण्याचं नाकारणारे लोक असतात, त्यांचं उदाहरण पाहून बर्‍याच - सगळ्या नाही, बर्‍याच - परप्रकाशित लोकांनाही परिस्थितीचा साक्षात्कार होतो. हे परप्रकाशित लोक संख्येनं पुष्कळ असतात आणि त्यामुळे त्यांच्या बदलण्याचा परिणाम दृश्यस्वरूपात जाणवतो. त्यांच्या बदलातले फायदे-तोटे अधिक स्पष्ट होऊन दिसतात. तेव्हाच त्यांपैकी एखादा फायदेशीर बदल लोकमान्य होतो. ही लोकमान्यताही पहिल्याच टप्प्यात मिळत नाही. निरनिराळी घनता आणि शोषणक्षमता असलेल्या विस्तीर्ण प्रदेशात एखादा द्रवपदार्थ सावकाश झिरपत जावा, त्याची मातीत मुरण्याची तीव्रता, प्रमाण, वेग सगळंच मातीनुसार सापेक्ष असावं, तशी ही प्रक्रिया असते. एकाच वेळी निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या टप्प्यांवर असणारी.

हे साखळीच्या बाहेरचं एकांडा शिलेदार असणं ते साखळीतलाच एक महत्त्वाचा दुवा म्हणून स्वीकारलं जाणं - या प्रवासाला प्रदीर्घ कालावधी लागतो. आणि तरीही प्रक्रियेचा अंतिम बिंदू म्हणून काळाच्या कुठल्याही तुकड्यावर बोट ठेवता येणं अशक्य असतं.

आता अशा प्रकारे बदलाच्या एका टप्प्यावर असताना, बदल आपल्याला फायदेशीर ठरत असताना बदल सुरू करून देणार्‍या काही स्वयंप्रकाशी लोकांबद्दल कृतज्ञता वाटावी आणि ती व्यक्त करावी; यात राग येण्यासारखं काय आहे? हां, आता त्या कृतज्ञतेला किती वेटेज द्यायचं, आपल्या वाटचालींचे टप्पे यशस्वी मानून धन्य व्हायचं की नाही, आपलं आणि समकालीनांचं एकूणच यशापयश त्यांच्या मापानं तोलायचं की त्याला वर्तमानाचे अधिक कठीण निकष लावायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या त्या व्यक्तीच्या तारतम्यानुसार सापेक्ष आहेत.

अंधश्रद्धानिर्मूलनाची चळवळ आवश्यकच. पण एकंदर धर्मसंकल्पनेच्या आवाक्यामध्ये तिचं स्थान किती लहान-किती मोठं हे प्रत्येकाला दिसणार्‍या चित्राच्या समग्रतेवरच अवलंबून नाही का?

हॅपी विमन्स डे, बाय दी वे!