Thursday, 28 May 2009

मॉर्निंग, वॉक आणि मी

शुक्रवार रात्री नऊसाडेनऊ:

उद्या (तरी) सकाळी उठून फिरायला जायचंच, मी कितव्यांदातरी निग्रहानं स्वत:शी घोकते. नेहमीप्रमाणे साडेपाच वगैरे वाजताचा अघोरी गजर लावते. मग एकदम पापमुक्त झाल्यासारखं वाटून लोळत टीव्ही. मग काही वेळ कादंबरी. झोप येण्यापुरती हातात धरलेलं अभ्यासाचं पुस्तक. व्हिक्स. पाणी. गाणी. झोप.

शनिवार सकाळी नऊसाडेनऊ:

डोळ्यांवर आलेलं ऊन. पंख्याचा घर्र घर्र आवाज. अंगभर आळस. ’माझा गजर कुणी बंद केला?’ माझी जोर नसलेली कुरकुर. उत्तरादाखल काही तुच्छतादर्शक कटाक्ष. मग शनिवार सकाळचा स्वस्तातला मल्टिप्लेक्स सिनेमा गाठायसाठी जोरदार धावाधाव. लायब्ररी. शॉपिंग मॉल. भाजी मार्केट. दुपारची स्वर्गीय झोप. सगळं स्वर्गीय वाटत असतानाच शनिवारची रंगीन रात्र कधी कूस बदलते समजत नाही. शिवाय कितीही अपराधभाव असला, तरी रविवार सकाळसाठी गजर लावायचं महापाप काही कुणी करत नाही.

रविवार संध्याकाळ सात-साडेसात:

काहीही कल्पना नसताना पायाखालची जमीन हिसकावून घ्यावी कुणी आणि आपण एकदम अनाथ एकटे कातरवेळी समुद्रकिनारी - अशा पद्धतीत वीकान्त संपून गेलेला, सोमवार पुढ्यात उभा ठाकलेला. ’उद्यापासून मात्र कुठल्याही परिस्थितीत उठायचंच. काही लाज वाटते का तुला?’ वगैरे सेल्फटॉक. पुन्हा एकदा गजर.

सोमवार सकाळी पावणेसहा:

गजर. स्नूझ. गजर. च्यायला. वाजतोय साला. उठावं का? मरू दे. ऊठ. ऊठ. ऊठ. बाहेर पाखरं किलबिलताहेत, हवा कशी गार आहे. मरू देत ती पाखरं, पांघरुणात छान वाटतेय गार हवा. ऊठ. ऊठ ****. अखेरशेवट मी उठते.
आरोग्यदायी आल्याचा चहा, व्यायामी जामानिमा, लाजेकाजेस्तव वॉर्म-अप करून बाहेर पडेपर्यंत साडेसहा.
बागेत आणि बागेभोवती हीऽऽऽऽ गर्दी. गर्दी बघून मी दचकते. आत्ता काय झालंय काय? इतके सगळे लोक? मग यथावकाश डोळ्यांवरची झोप उडून दोनेक फेर्‍या होईस्तोवर ते सगळे उत्साही आरोग्यवंत लोक असल्याचं मला कळतं.
च्यायला, संध्याकाळी सातसाडेसातनंतर खिडक्यादारं बंद करून खुडूक बसणार्‍या या शहरातले हे मंद लोक, आणि पहाटे आरोग्य सांभाळायची ही अहमहमिका, अं? येडपट साले... माझी उगाच चिडचिड.
सहावी फेरी मारताना शेजारून स्टायलिशपणे पळणारा एक मुलगा हळूच बागेच्या आतल्या बाजूनं पळणार्‍या एकीच्या वेगाचा अंदाज घेत मंदावतो. पण मग माझी नजर जाणवून, गडबडून परत एकदा जोरात पळत सुटतो. मला नकळत हसू फुटतं.

मंगळवार सकाळ सहा:

थोडासा पाऊस शिंतडून गेल्यामुळे नेहमीचे भुरे रस्ते ताजे तुकतुकीत काळेभोर दिसतायत. त्यावर ही जांभळी किनखापी फुलं? च्यायला, एकेका शहराचं नशीब असतं खरंच. माझ्या मुंबईकर मनातला मत्सर पृष्ठभागापाशीच. वर डोकवायला सदैव उत्सुक. त्याला तस्संच दाबून मी बागेकडे वळते.
कालचा तो मुलगा दिसतोच. मला बघून चक्क नजर चोरून पुढे? हा हा हा!
तिसर्‍या फेरीत बागेतल्या कोपर्‍यात एक हसर्‍या आजी-आजोबांचं वर्तुळ. एक टाळी. हा:! दोन टाळ्या. हु:! तीन टाळ्या. हा:हा:हु:हु:! त्यांना तसंच टाकून पुढे जाणं मला चक्क जड जातं. मी ऑलमोस्ट पळत पळत माझी फेरी पुरी करून त्यांच्यापाशी परत येतेय, तोवर त्यांचं शवासन चालू झालेलं. फुस्स.
मग माझं लक्ष बागेसमोरच्या घरांकडे जातं. पांढराशुभ्र रंग आणि बाल्कनीतून लडिवाळपणे खाली येऊ बघणारी गुलबाक्षी रंगाची कागदीची फुलं.
दुसरं घर. व्यक्तिमत्त्वहीन पिस्ता कलर. हे अगदीच काकूबाई घर. नीटनेटकं-स्वच्छ वगैरे आहे, पण स्वभाव एकदम ’सातच्या आत घरात’. हॅ, काय गंमत नाही.
तिसरं घर. वॉव, समोर चक्क दगडी फरसबंदी वगैरे? आणि व्हरांड्यात टांगलेला खानदानी पितळी कंदील? पण या घराच्या समोरचा गुलमोहोर गायब केला, तर हे रुबाबदार घर एकदम बापुडवाणं दिसायला लागेल, माझी खात्रीच पटते. असला परावलंबी रुबाब काय कामाचा? हॅट, नापास.
चौथं घर. रंग पिस्ताच. पण बाळबोध बटबटीत पिस्ता नव्हे. इंग्लिश कलरचा तोरा. शिवाय सगळीकडून घराला पडदानशीन करून टाकणारा अस्ताव्यस्त पसारेदार विलायती गुलमोहोर. मुंबईसारखा पाऊस कोसळला इथे, तर या खिडकीत बसायला काय बहार येईल, माझा फुकाचा कल्पनाविस्तार. तितक्यात मागच्या बाल्कनीत वाळत टाकलेले टॉवेल्स आणि चड्ड्या-बड्ड्या दिसतात आणि मी रागारागानं पुढे जाते.
पाचवं घर. हे नवंच दिसतंय. अजून समोर वाळूचा लहानसा ढीग, थोड्या विटा वगैरे आहेत. पण रंग मात्र सुरेख चकचकीत पांढरा. आणि ’हम दिल दे चुके सनम’च्या सेटची आठवण करून देणार्‍या तीन तीन गच्च्या. त्यावर लालचुटूक कौलं. अरे, पुढचं दार उघडं? हॉलमधून वर जाणारा वळसेदार जिना आणि मागच्या खिडकीतून दिसणारं हिरवंगार परस. काका पेपर वाचतायत की काय? घड्याळपण एकदम जुन्या पद्धतीचं ’टोले’जंगी दिसतंय. बाप रे, साडेसात? पळा...

बुधवार सकाळ सव्वासहा:

हा:हा:हु:हु: गाठायला धावत येऊनही फार काही हाताला लागत नाही. एक सात्विक चेहर्‍याच्या पण तितक्याश्या प्रेमळ न वाटणार्‍या आजी संशयानं तेवढ्या बघतात. मी घाईघाईत पुढे जाते.
’तो’ मुलगा दिसतोच. चक्क एक निसटतं स्माइल. सलग तिसर्‍या दिवशी मला बघून माझ्याबद्दलचा तुच्छत्वाचा भाव त्याला सोडून द्यावा लागला असेल का, असा विचार करून माझ्या नियमितपणाबद्दल मी स्वत:वरच निहायत खूश होते.
एक फेरी. दुसरी. तिसरी. चौथी. पाचवी.
’मग मी म्हटलं वन्संना, इतकं काय मनावर - ’ मी असभ्य वाटेलश्या वेगात खटकन मागे वळून बघते. मराठी? नकळत पाय रेंगाळतात, माझ्या संकुचित प्रादेशिक अस्मितेला माझा नाईलाजच असतो. सलवार-कमीझ, स्पोर्ट्स शूज, घाईघाईत वळलेला अंबाडा, ’अहों’ना गाठायला कशीबशीच मॅनेज केलेली धावरी चाल आणि ’हं हं’ करत आपली आघाडी राखून असलेले अहो. काका-काकू पुढे निघून जातात.
मी मात्र रेंगाळते.
हवेला विलक्षण ताजा वास. पाचव्या घरातल्या काकू न्हाऊन फाटकासमोर रांगोळी काढत असलेल्या. शोएब अख्तर विकेट मिळवल्यावर ज्या विमान-पोझमधे धावतो, त्याच पोझमधे धावणार्‍या एका काकांचं विमान. कशीबशी झोप आवरून, आंघोळ-पावडर-कुंकू-डिओडरण्ट उरकून, हापिसाला निघालेल्या दोन चश्मिष्ट पोरी. त्यांच्या हातातली ताजी टाईम्सची गुंडाळी. नजरेतला ’आरोग्यवंत लोकां’बद्दलचा आदर अधिक मत्सर अधिक चिडचिड माझ्यापर्यंत थेट पोचते.
आपणपण आरोग्यवंत लोकांच्यात जमा? मला एकदम मजाच वाटते.

गुरुवार सकाळ सात:

चहा - वॉर्म-अप - व्यायाम. इमानदारीत ठरलेल्या फेर्‍या मारून मला फारच घाण्याला जुंपलेल्या अळणी बैलासारखं वाटायला लागतं. मग मी सरळ पलीकडच्या इडलीवाल्याकडे मोर्चा वळवते. वाफाळती इडली आणि लाल मिरच्यांचा तवंग मिरवणारं सांबार.
आयुष्य सुंदर आहे...

शुक्रवार सकाळ साडेसहा:

कंटाळा आलाय, पण घरात बसून राहायचाही कंटाळाच आलाय. तीच ती सकाळची टीव्हीवर गळणारी गाणी, शेजार्‍यानं भक्तिभावानं लावलेली ’ओम्‌ श्री नमो नम: - तत्सवितुर्वरेण्यम्‌’ची एकसुरी उंच भुणभुण आणि तासभर नुसतंच लोळत पडल्यावर अंगात साचणारा जड आळस. मी शहारतेच.
बागेपाशी येऊन आरोग्यवंतांच्यात सामील झाल्यावर बरं वाटतं. बरं वाटल्याचा थोडा धक्काही बसतो, पण बरं वाटतंच. विमान काका आज शिक्षा झालेल्या सैनिकासारखे हात वर ठेवून फेर्‍या मारत असतात. मला हसू येतंही आणि नाहीही. मीही मुकाट माझी दौड चालू करते.

शनिवार सकाळी पावणेसहा:

’हे काय? आजपण जाणार फिरायला? बरी आहे ना तब्ब्येत? वीकेण्डलापण?’ असल्या सरबत्तीकडे दुर्लक्ष करून मी बाहेर पडते. हसणारा मुलगा, विमानकाका आणि पाचव्या घराला एक हसरी नजर-सलामी टाकते. पाय वेग घेतात...

Thursday, 21 May 2009

आणखी एक धार्मिक वगैरे वगैरे


संवेदचं हे एकदम विचारप्रवर्तक वगैरे पोस्ट वाचून मी ही कमेण्ट खरडायला घेतली, पण ती इतकी मोठी झाली, की तिच्या आकाराची लाज वाटून शेवटी मी हे पोस्टायचंच ठरवलं.




खूप वायफळ तात्विक चर्चा करायची झाली, तर ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्‍याचदा वापरत असतात.



त्या अर्थानं मी आहे का धार्मिक? बहुतेक नाही.



मला पुराणातल्या बर्‍याचश्या गोष्टी माहीत असतात, देव आणि दैवतांचा इतिहास याबद्दल कुतुहल वाटतं. धर्माचा इतिहास संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबत घेऊन येतो, तो वाचायला मला आवडतं. त्यात लोकांनी आपापल्या फायद्यातोट्यासाठी, कधीकधी नि:स्वार्थीपणे, कधीकधी निव्वळ मूर्खपणानं मारून ठेवलेल्या मेखी (की मेखा?) समजून घ्यायला धमाल येते.




पण देवापुढे - अगदी तिन्हीसांजेलासुद्धा - आपसूक वगैरे माझे हात नाही जोडले जात. खूप उदास असताना, खूप काळजीत असताना, खूप हैराण झालेलं असतानाही, ’आता देवच काय ते बघून घेईल’ असं चुकूनही माझ्या मनाशी येत नाही. देवाची प्रार्थना करावी असं सकाळी - रात्री कधीच वाटत नाही. अंधाराची किती भीती वाटली, तरी रामाबिमाचं नाव माझ्या तोंडात कधीच येत नाही. असली काहीतरी एण्टिटी असेल, इथपासूनच मला टोटल अविश्वास आहे, तर मग ती आपल्याला मदत करेल, असं कसं वाटणार?



म्हणजे मी धार्मिक नसणारच. असं का असेल?



आमचं घर काही तितकं अतिरेकी आधुनिक नव्हे. म्हणजे आमच्या घरी नाही, पण बाबांच्या घरी - गावाला, आणि आजोळीही, गणपती बसतो. आम्ही त्याकरता शक्य असेल तेव्हा गावाला जातो. घरात लहानसा का होईना देव्हारा आहे. नेहमी बाबा, आणि बाबा नसले तर आई देवाची पूजा करते. तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावते. फार गडबडीत नसेल, तर कधीमधी रामरक्षा पुटपुटते. शनिवारी बाबांचा उपास असतो. चतुर्थीला घरात खिचडी होते. पाळी चालू असताना आई बाजूला बसत नाही, पण मुद्दामहून देवाला शिवायलाही जात नाही. घरी कधी हळदीकुंकू वगैरे झाल्याचं आठवत नाही. पण हळदीकुंकू घ्यायला आईची ना नसते. आजी घरात असेल, तेव्हा ती हातात एखादी बांगडी चढवून ठेवते. कुठे फिरायला वगैरे गेलो, तर आम्ही तिथली देवळंही बघतो. हात जोडतो, तीर्थप्रसाद घेतो. माझी आणि माझ्या बहिणीची पत्रिका बनवलेली आहे.




असं सगळं असताना देव किंवा त्याला लागून येणारा धर्म मी इतका बेदखल का केला असेल? याचं कारण शोधताना मला नेहमी एक गंमत आठवते.



आपल्याला मतं फुटायला लागतात त्या काळात कधीतरी, म्हणजे दहावी-अकरावीत असताना असणार, माझा मावसभाऊ घरी आला होता. आडव्या-तिडव्या वाचनामुळे, आणि अंगातल्या उद्धटपणामुळे, माझे ज्वलंत - जहाल - स्त्रीवादी - निधर्मी वगैरे विचार तेव्हा जोरात होते. ते मोठ्यामोठ्यानं मांडायची खुमखुमीही होती. सगळ्यांना त्यांचा मूर्खपणा - अन्यायीपणा दाखवून वगैरे द्यायला पाहिजे, असलं काहीतरी अचाट तेव्हा वाटायचं. असल्याच कसल्यातरी वादात मी मोठ्यामोठ्यानं ’देव नसतोच’च्या बाजूनं आणि माझा भाऊ ’देव असतोच’च्या बाजूनं तारस्वरात भांडत होतो. कुठल्यातरी एका पॉईंटला त्याच्या बाजूनं आर्ग्युमेंट्स संपली. ’तुला इतकं वाटतंय ना, देव नाही असं? मग होऊन जाऊ दे. देव्हार्‍यातला देव घे आणि त्याला पाय लावून दाखव. पाहू तुला जमतं का?’ असं आव्हान त्यानं दिलं. मीही ’हात्तेरेकी, त्यात काय, घे!’ असं म्हणत शिस्तीत जाऊन देव्हार्‍यातली देवीची लहानशी पितळी मूर्ती घेऊन जमिनीवर ठेवली, त्यावर पाय दिला आणि त्याच्याकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. तो अर्थातच निरुत्तर झाला. ’तू आचरट आहेस बाबा खरंच. जरापण भीती नाही...’ असलं कायतरी तो बडबडला आणि तो वाद माझ्यापुरता जिंकून संपला. परत पत्ते सुरू झाले. संपलं.


आई घरातच होती. कशातच मधे न पडता फारसं लक्ष न दिल्यासारखं करत पडल्यापडल्या शांतपणे ऐकत होती. तिनं सगळ्या वादात माझी बाजू घेतली नाही आणि त्याचीही नाही. मला थांबवलंही नाही. नंतर काही प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. कदाचित प्रतिक्रियेच्या या अभावामुळेच, तिला जणू कळलंच नाहीये, मी काय पराक्रम केला ते, अशा थाटात मी तिला मारे सगळी गोष्ट सांगायला गेले. तर ऐकून म्हणाली, पाय ठेवलास म्हणजे काय थोर साहस केलंस? पितळेची वस्तू ती. ती काय खाणारे तुला? तुझा नसेल विश्वास. तुझ्यापुरता. लोकांचा आहे ना. लोक त्या मूर्तीसमोर हात जोडतात. त्यांच्या विश्वासावर पाय ठेवलास. तूच कर विचार, चूक की बरोबर त्याचा.


विषय संपला. तिला काहीच फरक पडला नाही. नेहमीसारखा संध्याकाळचा दिवा लावणं, हात जोडणं यात काही फरक नाही. माझ्यावरही अजिबात राग दर्शवला नाही. तिच्यापुरता खरंच विषय संपला. तिनं मूर्ती साधी धुतलीही नाही लगेच. काय जनरल आठवड्या-पंधरवड्यानं देव्हार्‍याच्या साफसफाईची वेळ आली, तेव्हाच दिव्यासकट सगळ्या मूर्ती स्वच्छ झाल्या, हे मी मुद्दाम लक्ष ठेवून पाहिलं.


परत मी कधी देव आहे की नाही, या गोष्टीवरून तावातावानं वाद घातल्याचं आठवत नाही. पाळी चालू असताना उद्मेखून देवापाशी दिवा लावायला जाणं आणि ’मुद्दामहून अगोचरपणा नकोय’ वगैरे क्षीण विरोध करणार्‍या आईशी वाद घालणं वगैरे आचरट प्रकारही परत करावेसे वाटले नाहीत. मग ’माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं.




म्हणूनच अंनिसच्या कामाबद्दल कधी भारावलेपणा वाटल्याचं आठवत नाही. फारशी खोली नसलेलं, लोकांची पिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न करणारं एक काम, इतपतच महत्त्व त्याला द्यावंसं वाटलं. कायद्यापलीकडे शोषण होत नाही ना, इतकं पाहून लोकांना आपापले विश्वास-श्रद्धा जपायचा हक्क आहे, त्यांना आवश्यक असेल त्या - झेपेल त्या निष्कर्षावर त्यांनी स्वत:च आलं पाहिजे, अशी एक धारणा होऊन बसली. कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली.



हिंदू असल्याचा अभिमान वगैरे तर मला कधी नव्हताच. हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हेच बोंबलायला माहीत नाही, तर अभिमान कसला कपाळाचा? त्यातल्या विशेषत: बायकांकरता खास बनवलेल्या चालींची मात्र शरम वाटायची. पण तसल्या मखलाश्या जगातल्या कुठल्याच धर्मानं करायच्या ठेवलेल्या नाहीत, हे कळलं, त्या कुठल्यातरी टप्प्यावर मी निधर्मी आहे असं स्वत:ला सांगणं मी सोडून दिलं. आकाशातला बाप, प्रेषित किंवा विहीरीत प्रेत टाकून देणं या गोष्टी नाहीतरी मला परक्या वाटतात. तितक्या हिंदू धर्मातल्या संकल्पना मला परक्या वाटत नाहीत म्हणजे हा माझा धर्म. कुठल्याही भोंगळ तत्त्वज्ञानापासून कठोर कर्मकांडापर्यंत आणि चार्वाकापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांनाच आपलं म्हणणारा आणि टिकून राहणारा हा लबाड धर्म आता मला कधी क्रूर, कधी मजेशीर, आणि नेहमीच सर्वायवलचं रहस्य जाणणारा वाटतो. त्यात अभिमान कसला नि लाज कसली? गंमत आहे.



पण म्हणजे मी धार्मिक आहे की काय? काय माहीत.

Tuesday, 19 May 2009

लिहिण्याची सवयच गेलीय

लिहिण्याची सवयच गेलीय.

विश्राम बेडेकरांनी म्हटलं आहे, त्या चालीवर आपण लिहिल्याशिवाय जगू शकतो म्हणजे आपण लेखक नाही. मग हा अट्टाहास कशासाठी?

उगाच खुजली म्हणून.
पांढर्‍यावर आपल्या नावानं काळं झालेलं दिसलं की गारगार, एकदम सत्ताधीश वाटतं म्हणून.
कुणी कुणी 'वा, छान' म्हणतं म्हणून.
कुणी 'कशाला लिहिता ही नष्ट घाण' असं खरोखरीचं चिडून विचारल्यावर अजूनच उचकायला होतं म्हणून.
एरवी काही अंगाला लावून न घेता अल्लाद पार होणार्‍या आपल्या वॉटरप्रूफ कातडीला लिहिता लिहिता कुठेतरी जोडलं गेल्यासारखं वाटतं म्हणून.
कुठल्यातरी आठवणीतल्या किंवा स्वप्नातल्या क्षणाच्या अर्धुकात, लिहिल्यावर एकदम रितं-मोकळं-ओझंहीन वाटल्याचा भास अजून शिल्लक आहे म्हणून.

सगळीच उत्तरं. किंवा कुठलीच नाहीत.

पोटाचा खड्डा भरून बराच रिकामटेकडा वेळ आणि खुमखुमणारी ताकद उरते हेच कदाचित उत्तर.

तरीही लिहिण्याची सवय गेलीय. म्हणजे आपण लिहिण्यावाचण्याला एक निरुपयोगी छंद मानणार्‍या लोकांइतके माजलो की काय? कदाचित तसंच.

हा माज उतरवण्याकरता तरी लिहीत राह्यलं पाहिजे.
लिहिण्याची सवयच गेलीय, तरीही.