Monday, 11 February 2008

खरंच...

खरंच...
पावलांखालचे प्रदेश बदलत जातात.
सवयींचे संगही अलगद निसटून जातात.
पाहता पाहता आपल्याच स्वप्नांचे रंग बदलत जातात.

खरंच...
नात्यांमध्ये बदल होत जातात.
पण बदलांना वाढ म्हणावं, सूज म्हणावं,
की धीम्या गतीनं मृतावस्थेकडे होणारा अटळ प्रवास,
हे ठरवण्याची ताकद तर असतेच आपल्यात.

खरंच...
तू ही ताकद वापरण्याची हिंमत केली आहेस कधीतरी?
अमानुष ताकदीच्या प्रश्नांची ही भीषण लाट पेलली आहेस तू कधीतरी?
जगता जगता काय होतं इतक्या उत्कट नात्यांचं,
हा जीव शोषून घेणारा प्रश्न पडला आहे तुला एखाद्या बेशरमपणे ठणकणार्‍या संध्याकाळी?

खरंच...
अजून जाणवतात तुला माझे श्वास त्यांच्या धुंदावणार्‍या लयीसकट?
अजून जाणवतो माझा गंध तुझ्या स्वप्नांच्या अगदी निकट?
अजून चढतो माझा रसरशीत रंग तुझ्या अंगावर त्यातल्या सगळ्या सगळ्या छटांसकट?

नाही.
कसल्याच प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असावीत असा हट्ट नाही आता.
इच्छा असतील... पण त्यांच्याही मर्त्यपणाचा स्वीकार आहे आता.
सवयींचे प्रदेश आणि स्वप्नांची माती पाहता पाहता बदलत जाते आपल्याच नकळत हे कळतं आहे आता.

पण खरंच,
सगळ्या विध्वंसासकट
बदलणार्‍या रंगांसकट
जगताना स्वप्नं अपरिहार्यच -

हे शिकलो आहोत का आपण?
खरंच...

8 comments:

 1. खतरनाक...
  वाक्यावाक्याला थांबावं आणि घश्याखाली घालावीत सारी सत्यं (कटू? पण तो आपला चष्मा झाला!)
  की
  त्यांना सरळ करुन काळजात सर्र करुन घुसवावीत हेकेखोर काही, काही जाळणारी विरामचिन्ह!

  प्रश्न हाच आहे

  आदी
  आणि
  अनंत

  ReplyDelete
 2. >>>
  जगता जगता काय होतं इतक्या उत्कट नात्यांचं,
  हा जीव शोषून घेणारा प्रश्न पडला आहे तुला एखाद्या बेशरमपणे ठणकणार्‍या संध्याकाळी?


  >>>
  नाही.
  कसल्याच प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असावीत असा हट्ट नाही आता.
  इच्छा असतील... पण त्यांच्याही मर्त्यपणाचा स्वीकार आहे आता.
  सवयींचे प्रदेश आणि स्वप्नांची माती पाहता पाहता बदलत जाते आपल्याच नकळत हे कळतं आहे आता.


  सलाम!!

  ReplyDelete
 3. बहुतेक संपूर्ण कळली नाही. पण जितकी कळली तितकी खूप आवडली.

  ReplyDelete
 4. तुझा भाषेचा डौल, तिला भावनांचा दिलेला तेजस मुलामा आणि त्यातून उमललेली ही उत्कट बोली....

  फार सुरेख.

  ReplyDelete
 5. "सवयींचे संगही अलगद निसटून जातात."

  "इच्छा असतील... पण त्यांच्याही मर्त्यपणाचा स्वीकार आहे आता.
  सवयींचे प्रदेश आणि स्वप्नांची माती पाहता पाहता बदलत जाते आपल्याच नकळत हे कळतं आहे आता."

  kay bolava! surekh!

  ReplyDelete
 6. Patkan JODHA-AKBAR bagh aani kahitari FRESH lihi. Please.

  ReplyDelete