२००५ साली आलेल्या वेगवेगळ्या जातकुळीच्या इतर काही सिनेमांमधल्या आईच्या व्यक्तिरेखाही लक्षणीयरीत्या वेगळ्या होत्या. विजयदान देठांच्या ‘दुविधा’वर आधारित असलेल्या अमोल पालेकर दिग्दर्शित ‘पहेली’मध्ये नीना कुलकर्णींनी नायकाच्या आईची भूमिका केली होती. एका पारंपरिक कर्मठ मारवाडी कुटुंबातली ती सासू. पण सून आपल्या मुलाशी रत न होता कुणा भलत्याशीच रत झाली आहे, हे कळल्यावरचे ‘मी जन्मदात्री असून मला कळलं नाही, तुला कुठून नि कसं कळावं!’ असं सुचवणारे तिचे समजूतगार उद्गार चकित करणारे होते. नागेश कुकनूरच्या ‘इक्बाल’मधली आई प्रतीक्षा लोणकरनं रेखाटलेली. ती एक गरीब मुस्लीम स्त्री. तिचा नवरा अतिशय हेकट आणि हम-करे-सो-कायदा पंथाचा आहे. फिरकी गोलंदाज म्हणून खेळण्याच्या पोराच्या महत्त्वाकांक्षेला त्याचा ठाम विरोध आहे. पण आई त्याच्या सुरात सूर मिसळत नाही. ती पोराच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. तिसरी लक्ष्यात राहिलेली भूमिका विपुल शाह दिग्दर्शित ‘वक्त : द रेस अगेन्स्ट टाईम’ या सिनेमात शेफाली शाहने केलेली. आईची भावविवश ममता आणि पाषाणहृदयी शिस्तप्रिय बाप हा ट्रोप उलटवून लावणारी ती भूमिका आहे. सिनेमातला अमिताभ बच्चनने साकारलेला बाप पोटच्या नालायक पोरावर वेड्यासारखं नि काहीसं आंधळं प्रेम करतो आणि त्याची बायको मात्र पोराला शिस्तीची गरज असल्याचं त्याच्या कानीकपाळी ओरडत काहीशी कठोर भूमिका निभावत राहते.
आमीर खान दिग्दर्शित 'तारे जमीं पर' या सिनेमातली टिस्का चोप्रानं रेखाटलेली आई मात्र हिंदी सिनेमाच्या पारंपरिक साच्याला, कठोर-शिस्तप्रिय बाप आणि भावनाप्रधान-शरणागत आई या ट्रोपला, शरण जाणारी होती. आपल्या डोळ्यांदेखत कोमेजून जाणारं मूल बघूनही हतबलतेनं बघत राहणारी ती आई बघून 'तुम्हारे लाड-प्यार ने ही उसे बिगाड के रख्खा है!' या हिंदी सिनेमात पार 'देवदास'च्या काळापासून चालत आलेल्या, आईवर सगळी जबाबदारी ढकलून मोकळ्या होणार्या, सनातन-सोयीस्कर संवादाची आठवण अनेकदा झाली.
'मधुमती'वर आधारित असलेल्या, फरहा खान दिग्दर्शित 'ओम शांती ओम'मधली बेला मखीजा ही किरण खेरने रंगवलेली आईची भूमिका मात्र अनेकानेक प्रकारे अफलातून होती. तोवर हिंदी सिनेमानं तयार केलेला आईच्या भूमिकेचा साचा त्यात वापरला होता, पण त्यावर अर्कचित्रात्मक संस्कार होते; वर ही भूमिका मेलोड्रामा-पुनर्जन्म-मॉंका प्यार अशी सगळी टिपिकल बॉलिवुडी स्थानकं सफाईदारपणे घेत कथानकात फिट्ट बसत होती. आपल्याच एखाद्या कालबाह्य पणज्याची पतवंडानं हास्यस्फोटक नक्कल करावी, त्यात पणज्याच्या सगळ्या मूर्खपणावर अचूक बोट ठेवलेलं असावं, पण त्या नकलेतूनही मुळातलं पणज्याविषयीचं प्रेम लपू नये, अशा प्रकारची ती लोभस मेटा-भूमिका.
 |
(शाहरुख खान, किरण खेर, ओम शांती ओम, २००७) |
किरण खेरनं 'रंग दे बसंती', 'खूबसूरत', 'हम-तुम' आणि 'दोस्ताना' या चारही सिनेमांमध्ये केलेल्या आई-भूमिकाही आधुनिक, सशक्त आणि वेगळ्या उठून दिसतात, हे मुद्दाम नोंदवलं पाहिजे.
या काळातल्या – म्हणजे गेल्या दोनेक दशकांमधल्या - अनेक सिनेमांमधून आईचं पात्र अधिकाधिक त्रिमित, खरं, काळ्यापांढर्या टोकांच्या मधल्या करड्या छटा प्रामाणिकपणे पेलणारं होत गेलेलं दिसतं. बॉलिवुडमधल्या आईच्या टेफ्लॉन प्रतिमेला चिकटता न चिकटणारे नकारात्मक रंगही त्यांना मिळालेले दिसतात. ‘झुबैदा’मधली, सुरेखा सिक्रींनी साकारलेली, पोरीला एकदाची उजवून टाकायला आतुर झालेली, त्रासिक, कटकटलेली आई जितकी खरी होती; तितकीच ‘जब वी मेट’मधली “मेरेवाले से तेरावाला बेहतर है!” अशी कबुली नायिकेला देणारी तिची आईही. शूजित सरकार दिग्दर्शित ‘विकी डोनर’मधली डॉली अहलुवालियानं रंगवलेली, ब्यूटी पार्लर चालवणारी, नायकाची पंजाबी आणि विधवा आई चांगली खमकी तर आहेच, पण मजा म्हणजे सासूबरोबर बसून रात्री दारूकामाचा कार्यक्रम तब्बेतीत साजरा करणं हा तिच्या दिनक्रमाचा भाग आहे.
 |
(कमलेश गिल, डॉली अहलुवालिया, विकी डोनर, २०१२) |
गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश विंग्लिश’मधली श्रीदेवी अभिनित आईही उच्चमध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि कर्तबगारही, पण सफाईदार इंग्रजी बोलता येत नसल्यानं आत्मविश्वास नसलेली. भाषेवर हुकूमत मिळवणं, कुटुंबाच्या चाकोरीतून बाहेर पाऊल टाकणं, नवीन जग बघणं, नव्या मैत्र्या करणं आणि आत्मविश्वास मिळवत जाणं हा तिचा प्रवास अतिशय हृद्य आहे. ‘मॉम’मधली श्रीदेवीनं साकारलेली आई लेकीवर बलात्कार करणार्या नराधमांचा काटा काढण्यासाठी चक्क कायदा हाती घेणारी स्त्री. तर शकुन बात्राच्या ‘कपूर अॅंड सन्स’मधली आई उच्चवर्गीय, श्रीमंत, सोफेस्टिकेटेड. पण पोराची होमोसेक्शुअॅलिटी उघड झाल्यावर मात्र त्याला नाकारणारी. ‘शुभ मंगल सावधान’मधली आईची भूमिका सीमा पाहावानं केली आहे. आपल्या लेकीला बेडरूममधल्या सगळ्या गोष्टींची नीट कल्पना आहे ना, याची अवघडून पण जबाबदारीनं चाचपणी करणारी ही आई हसवते चिकार, पण थेट ‘शारदा’ या देवलांच्या अभिजात मराठी नाटकामधल्या, लेकीच्या लैंगिक सुखाची काळजी करणार्या आईची आठवणही करून देते.
‘एन एच टेन’मधली दीप्ती नवलने साकारलेली आई उघड उघड प्रतिगामी, क्रूर, उलट्या काळजाची आहे.
 |
(दीप्ती नवल, एन एच टेन, २०१५) |
घरच्यांच्या मर्जीविरुद्ध पळून जाऊन जातिबाह्य लग्न करू इच्छिणार्या लेकीला संपवण्याकरता ती तिच्या पोटच्या पोराला आणि पाठच्या भावाला रवाना तर करतेच, पण त्याचं समर्थन करताना निर्लज्जपणे “जो करना था, सो करना था.” असं ठामपणे म्हणूही शकते. तिला यत्किंचितही पश्चात्ताप नाही. ‘आईचं काळीज’ ही संस्कृतीनंच रुजवलेली, घासून गुळगुळीत झालेली शब्दयोजना जिच्या बाबतीत कमालीची असंगत ठरावी अशी ती स्त्री पुरुषसत्ताक व्यवस्थेची क्लासिक बळी आहे.
एका भ्रष्ट व्यवस्थेच्या आणि भरकटलेल्या समाजाच्या हातून, केवळ निष्क्रियता-बेबनाव-भ्रष्टपणा यांपायी एका लहानगीचा हकनाक बळी कसा जातो, त्याची गोष्ट अनुराग कश्यपचा ‘अग्ली’ हा काळाकुट्ट, निराश करणारा सिनेमा सांगतो. त्यातली भ्रमित, विटलेल्या, निष्क्रिय आईची भूमिका तेजस्विनी कोल्हापुरेनं केली आहे. ती आई म्हणजे जणू आपण सगळे जण आहोत आणि आपण सगळे मिळून त्या पोरीचं आईपण निभावायला नालायक ठरलो आहोत, असं वाटून शरम दाटून येते. हे आईपणाविषयीचं भाष्य कुठल्याही प्रकारे व्यक्तीबद्दल जजमेंटल न होणारं आणि प्रेक्षकांना काही अवघड प्रश्न विचारणारं होतं.
 |
(तेजस्विनी कोल्हापुरे, अग्ली, २०१३) |
आईच्या व्यक्तिरेखा अशा प्रकारे हळूहळू बदलत गेल्यानंतरच का विशाल भारद्वाजला ‘हैदर’ या ‘हॅम्लेट’च्या भारतीय अवतारामधून गजाला साकारण्याची हिंमत करता आली असेल? गजाला हा गर्ट्रूडचा भारतीय अवतार. ती पतीशी एकनिष्ठ आहे की नाही, याबद्दल तिच्या मुलाच्या मनात संभ्रम आहे. त्याच्या मनात तिच्या सौंदर्याविषयीचं अस्फुट आणि निश्चितपणे शृंगारिक आकर्षणही आहे. गजालाचं व्यावहारिक दृष्टीकोनातून दीराशी रत होणं, मधूनच अपराधीपणानं ग्रासलं जाणं, हळूहळू पोटचा मुलगा दुरावताना बघून कासावीस होणं, धीर सोडणं, मुलाच्या मृत्यूचा शोक पेलणं... या व्यामिश्र छटा तब्बूनं अतिशय तरलपणे पकडल्या आहेत.
 |
(तब्बो, शाहीद कपूर, हैदर, २०१४) |
पण अजून वीस वर्षांपूर्वी हे शक्य झालं असतं का? चटकन होकारार्थी उत्तर देववत नाही खरं.
झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’मध्ये शेफाली शाहने आईची भूमिका केली आहे. ही भूमिकाही अनेक अर्थांनी विलक्षण आहे. नवर्याच्या बाहेरख्यालीपणामुळे दुखावली गेलेली, पण लग्न मोडून करणार काय या असुरक्षिततेपोटी जणू काही झालंच नाहीसं दाखवत, स्वतःला फसवत लग्न टिकवत राहिलेली नीलम. नवरा येता-जाता तिच्याशी बेपर्वाईनं तिच्या वजनाबद्दल बोलतो. इतर बायकांसोबत मजा करतो. पण नीलम त्याच्याकडे काणा डोळा करत राहते. अधूनमधून जेव्हा ताण असह्य होतात, तेव्हा ती आडवंतिडवं खाते आणि स्वतःचं डोकं जागेवर आणण्याचा प्रयत्न करत राहते. सत्याला सामोरंच न जाणं, हा तिच्या आयुष्यात सत्याला सामोरं जाण्याचा मार्ग आहे.
 |
(शेफाली शाह, दिल धडकने दो, २०१५) |
मुलाला कंपनीत रस नाही, त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष्य करायचं. मुलगी संसारात सुखी नाही? तिच्याशी काही बोलणंच टाळायचं. वरवरचं काहीतरी निरुपद्रवी बोलत राहायचं. मुलांची आयुष्यं हवी तशी चालवण्यात आणि हातचा पैसा टिकवण्यात नवर्याला यथाशक्ती मदत करायची.. असले खेळ ती खेळत राहते. पण या सगळ्या भानगडीत कुटुंबाची वीण उसवून गेली आहे, हे तिच्या गावीही नाही. अतिश्रीमंत वर्गातलं पोकळ आयुष्य जगत राहणारी, पण मनानं वाईट नसलेली, करड्या छटा असलेली ही व्यक्तिरेखा. 'तुम्हारी बेटी को कुछ समझाओ'छापाचा टिपिकल शेरा नवर्यानं मारल्यावर एका क्षणी तिचा तोल जातो आणि "तुम पूछो, तुम्हारी भी तो लडकी है." असा थंड जबाब देऊन ती मोकळी होते. अशा प्रकारची व्यक्तिरेखा मुख्य धारेतल्या हिंदी सिनेमामध्ये रंगवली जाऊ शकते, हेच अतिशय दिलासादायक वाटलं.
तशीच याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘डार्लिंग्स’मधली शेफाली शाहनेच साकारलेली आई. गरीब मुस्लीम समाजातल्या या शमसू अन्सारी नामक बाईचा नवरा मागेच कधीतरी मरून गेला आहे. पोरीचं लग्न झालंय, पण तिचा नवरा तिला मारहाण करतो. शमसू सतत पोरीला असल्या हैवान नवर्याला सोडून देण्याचे वा चक्क ठार करण्याचे सल्ले देत राहते. व्यावहारिक शहाणपण असलेली आणि थंड डोक्यानं विचार करणारी ही बाई. तिचा स्वाभिमान तेजतर्रार आहे. जावयानं अंगावर हात टाकल्यावर तिच्या नजरेत अंगार पेटतो. त्याहूनही मजेशीर म्हणजे तिच्याहून पुष्कळ लहान वयाच्या बोहार्यावर – झुल्फीवर – तिची नजर आहे. त्याबद्दल तिला यत्किंचितही अपराधीपणा वगैरे नाही.
 |
(शेफाली शाह, रोशन मॅथ्यू, डार्लिंग्ज, २०२२) |
२०१८ साली आलेल्या, रेणुका शहाणे दिग्दर्शित 'त्रिभंग'मध्ये तीन पिढीतल्या तीन स्त्रिया आहेत. त्यांनी कमालीचे चाकोरीबाह्य निर्णय घेतले आहेत आणि त्याचे परिणाम निधडेपणानं स्वीकारले आहेत. मातृत्वाचं कणभरही उदात्तीकरण न करणं, पालकत्वात अनुस्यूत असलेल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांकडे उघड्या डोळ्यांनी बघणं आणि अतिशय वेगळ्या सशक्त आई-व्यक्तिरेखा चितारणं इतकं श्रेय या सिनेमाला निस्संशय दिलं पाहिजे.
अशीच एक अतिशय महत्त्वाची आई 'बधाई हो'मध्ये नीना गुप्तानं साकारली. थोरल्या लेकाचं लग्नाचं वय झालेलं असताना ही कनिष्ठ मध्यमवर्गीय आई गरोदर राहते. या परिस्थितीत शरमेनं कळंजून जाणार्या बाईच्या त्या भूमिकेमध्ये पारंपरिक-अदबशीर-शालीन-ममताळू आईपणाच्या सगळ्या छटा आहेतच, पण त्याखेरीज मुलांच्या नजरेतून कधीही न दिसणारं आईवडलांचं लैंगिक आयुष्य आणि त्याभोवतीची शरम अतिशय मोकळेपणानं चितारली आहे, त्याबद्दल महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. हे नवी वाट पाडणारं आहे.
 |
(नीना गुप्ता, बधाई हो, २०१८) |
अब्बास टायरवाला यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या सिनेमातली आईची व्यक्तिरेखा या बदलांचा सरताज म्हणावा अशी. रत्ना पाठक-शाह यांनी ही सावित्री नामक आई रेखाटली आहे. जमेल त्या सगळ्या प्रकारे ती हिंदी सिनेमातल्या आईचं टेम्प्लेट उलथवून लावते!  |
(रत्ना पाठक-शाह, जाने तू या जाने ना, २००७) |
ती कायम ढगळे टीशर्ट्स, टॉप्स, टाइट्स, कुर्ते, जीन्स किंवा तत्सम पोशाखात वावरताना दिसते. ‘सन ऑफ अ बिच’सारख्या शिव्या बिनदिक्कत देते. नवर्याच्या राजपुती मर्दानगीला “तुम... तुम्हारा पूरा खानदान... तुम सब पागल हो. हिंसक – सिरफिरे – मर्द...” अशा शेलक्या शिव्या घालते. तिच्याकडे सौभाग्यचिन्हांचा निव्वळ अभावच नाही, तर त्याबद्दल संपूर्ण निर्विकार बेफिकिरी आहे. घड्याळ, चश्मा, हातात नाओमी वुल्फच्या ‘द ब्यूटी मिथ’सारखं जहाल स्त्रीवादी पुस्तक हे तिचे दागिने. तिच्या कृतीही बोलक्या आहेत. निवांतपणे चहा पीत वर्तमानपत्र चाळणे, संगणकासमोर बसून काम करणे, सामाजिक कार्यकर्तेपण निभावत पोलिसांना झापणे, सोफ्याच्या पाठीवर एक तंगडं टाकून लोळत वाचणे... या तिच्या कृती. सकाळचा नाश्ताही एक दिवस ती करते, तर एक दिवस तिचा लेक – जय. तिच्या स्वयंपाक-नफरतीची लेकालाही पुरती कल्पना असावी! कारण “आज क्या खाने का मूड है?” या तिच्या कधी नव्हे त्या ममताळू प्रश्नावर तो गरीबपणे “जो भी सुबह का बचा होगा..” असं अश्राप उत्तर देतो! मृत नवर्याच्या चित्राशी भांडणारी आणि “अमर, पेंटिंग में घुस के तुम्हारा गला घोट दूंगी!” अशा धमक्या देणारी ही बाई अस्सल दक्षिण मुंबईकर, उच्चवर्गीय, आणि खर्या अर्थानं आधुनिक स्त्रीवादी आहे. पोलीस इन्स्पेक्टरनं अद्वातद्वा बोलल्यावर मध्ये पडणार्या मुलाला शांत करताना “पुलिसवाला मेरे साथ बदतमिजी कर रहा था, तो वो मेरी प्रॉब्लम है ना?” असं विचारणारी ही बाई मुख्य धारेतल्या हिंदी सिनेमात दिसू शकत असेल, तर कदाचित – we are on right track!
~
अजून एक बदल गेल्या पाव शतकात झालेला दिसतो. मुख्यधारेतल्या, तुलनेनं तरुण, चरित्र-अभिनेत्री असा शिक्का न बसलेल्या अभिनेत्रीनं आईची भूमिका करणं फारच दुर्मीळ होतं. पण 'मिशन काश्मीर', 'क्या केहना', 'हैदर', 'त्रिभंग', 'हेलिकॉप्टर ईला', 'माय नेम इज खान', 'पा' अशा अनेक चित्रपटांमधून हा शिरस्ता मोडला गेला. हेही भूमिका अधिकाधिक सघनपणे लिहिल्या गेल्याचं आणि प्रेक्षक अधिक स्वीकारशील झाल्याचंच लक्षण आहे.
हे बदल स्वागतार्ह, आश्वासक खरेच. पण त्यांमागे कोणकोणती कारणं असतील, असा प्रश्न मनाशी येतो.
काही संभाव्य कारणांचा अंदाज करता येतो.
नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्थेची दारं उघडली. सिंगल-स्क्रीन चित्रपटगृहं तडकाफडकी बंद पडली नाहीत, पण मल्टिप्लेक्स अवतरू लागली.
एरवी सिंगल-स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये बारा ते तीन, तीन ते सहा, सहा ते नऊ, नऊ ते बारा असे खेळ याच वेळांना असण्याचा पायंडा पडला होता. त्यामुळे सिनेमांची लांबी ठरल्यात जमा होती. तिकिटांचे दर सर्वसामान्य माणसाला परवडण्याजोगे राखलेले असत. त्यातून सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची स्वतःची अशी एक संस्कृती आकाराला आली होती. एकट्या-दुकट्या स्त्रीने निर्विघ्नपणे, सुरक्षिततेची काळजी न करता सिनेमे बघण्यासाठी लागणारं वातावरण तिथे नसे. अस्वच्छ स्वच्छतागृहं, खुर्च्यांखाली मारलेल्या पानांच्या पिंका, मोठा आवाज करत चालणारे – भिंतीवर बसवलेले पंखे, एअर कंडिशनिंगचा अभाव, खुर्च्यांच्या सिटा उसवून बाहेर डोकावणार्या स्प्रिंगा आणि ढेकणांचा मुक्त संचार, सोडा-वॉटरच्या बाटल्यांचे खणखणणारे आवाज, उंदीरघुशींचा सुकाळ, या सगळ्या घटकांमध्ये खास चित्रपटगृहात मिळणार्या सामोशांचा गंध मिसळला की परमाळणारा अद्भुत गंध, चित्रपटगृहाबाहेर तिकिटांचा काळा बाजार करणार्या काही पंटर्सचं राज्य, गर्दीचा फायदा घेऊन पोरींना त्रास देणारे मवाली आणि तथाकथित सभ्य चान्समारू लोक... हे सगळं या संस्कृतीचा अविभाज्य भाग होतं. त्यामुळे कुणासह, कुणी, कोणत्या वेळी, किती पैसे मोजून सिनेमा बघायचा, याची गणितं ठरल्यासारखी असायची. सिनेमात लोकांना काय बघायला आवडेल, हेही याच गणिताच्या उत्तरांवर अवलंबून असायचं.
किती नाही म्हटलं, तरी सिनेमा हे पैसे गिळणारं, जोखमी माध्यम. परिणामी हर एक सिनेमात कोणकोणते घटक असले पाहिजेत, याचा लघुत्तम साधारण विभाज्य उर्फ ल.सा.वि. काढून त्याबरहुकूम वाटचाल करणं व्यावसायिक चित्रपटकर्त्यांना बंधनकारक असायचं. मसालापट ही खास संज्ञा तयार होण्यामागे आणि ‘थोडा सर्वधर्मसमभाव, थोडी नाचगाणी, थोडी ममता, थोडी देवादिकांची करणी, थोड्या हाणामार्या, आणि माफक शृंगार’ अशा प्रकारची समीकरणं रुजण्यामागेही हीच कारणं असणार, असा अंदाज करता येतो.
मल्टिप्लेक्सच्या आगमनासरशी सिनेमाचा वेळ नि ठरीव वेळा रद्दबातल ठरल्या. सकाळी साडेनऊ, दुपारी पावणेदोन, रात्री साडेआठ, अकरा... असे कुठलेही खेळ असणं शक्य झालं. नागेश कुकनूर, मणिरत्नम, रामगोपाल वर्मा यांच्यासारख्या ताज्या दमाच्या आणि प्रयोगशील दिग्दर्शकांची पहिली पावलं पडू लागली ती याच काळात. तिकिटांचे दर वाढले. चित्रपटगृहांमधली स्वच्छता नि आरामशीरपणा, ध्वनिव्यवस्था आणि दृश्यांचा दर्जा, प्रेक्षकांचा आर्थिक वर्ग आणि त्यांची जातकुळी... हेही बदललं. या सगळ्यांमुळे व्यावसायिक चित्रपटांवर लादली गेलेली – वा त्यांनी धंद्याच्या गणितांपायी स्वतःवर लादून घेतलेली म्हणा – करकचलेली चौकट काहीशी सैल होऊ शकते, हे हळूहळू जाणवू लागलं असणार. जागतिक चित्रपट सहजासहजी उपलब्ध होऊ लागणं, ‘नेटफ्लिक्स’सारख्या ओटीटी माध्यमांचा सुकाळ होणं, सेन्सॉरशिप काही प्रमाणात सैल होणं, या परिप्रेक्ष्याचा फायदा होऊन समाजाचा सिनेमातल्या स्त्रीबद्दलचा दृष्टीकोन किंचित बदलणं-विस्तारणं हीदेखील कारणं असणारच. स्त्रीशिक्षण, स्त्रियांनी अर्थार्जनाकरता बाहेर पडणं, शहरीकरण, त्यामुळे बदलत चाललेली जीवनशैली, एकंदर समाजात झिरपत गेलेली आधुनिकता... या सगळ्या गोष्टी आधीही होत्या. नव्वदीनंतर त्याचा वेग आणि प्रमाण वाढलं; तसंच सिनेमामध्ये त्यापूर्वी न दिसणारं त्यांचं प्रतिबिंब हळूहळू अधिकाधिक स्पष्टपणे दिसू लागलं.
पण हे सगळे निव्वळ अंदाज. या बाह्य कारणांच्या पलीकडे, प्रेक्षकांची मनोभूमिका बदलून आधुनिकतेकडे झुकणं घडत होतं का? या प्रश्नाचं काहीच ठाम उत्तर देता येत नाही. कारण ‘तारें जमीं पर' आणि 'जाने तू या जाने ना' हे एकाच वर्षी प्रदर्शित झालेले आणि दणकून चाललेले सिनेमे आहेत! मात्र 'तारें जमीं पर'चं यश वादातीतपणे अधिक आहे.
यातून आपल्याला प्रेक्षकांच्या मानसिकतेविषयी काय निष्कर्ष काढता येतो? कदाचित असा एकच एक निष्कर्ष काढणं बाळबोधपणाचं, सुलभीकृत ठरेल.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आई ही काही पोकळीत राहणारी व्यक्ती नाही. आई हे नातं जन्माला येतं, त्यामागे एक कुटुंब असतं. सासू, सासरे, नवरा, मुलं, आई, बाप, भाऊ, बहीण... ही सगळी नाती एका आईमागे असतात. ह्या नात्यांकडून असलेल्या रूढ अपेक्षांमध्ये नि त्यांना दिल्या जाणार्या प्रतिसादांमध्ये काही बदल झाला का?सिनेमामध्ये तो झालेला दिसला का? जोवर या प्रश्नांची उत्तरं आपण खोलात जाऊन शोधत नाही, तोवर सिनेमातल्या आईच्या व्यक्तिमत्त्वातल्या बदलांची कारणं आपल्याला पुरती गवसणं कठीण आहे. अर्थात - हा एका स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
तूर्तास इतकंच म्हणता येतं, की पंचवीसेक वर्षांपूर्वीपर्यंत द्विमित, बेगडी, काहीशी हास्यास्पद असणारी - अधिक धारदार शब्दांत सांगायचं, तर 'पेंढा भरलेली' - हिंदी सिनेमातली आई हळूहळू त्रिमित-जिवंत-खरी होऊ लागली आहे. हेही कमी नाहीच.
- सगळी चित्रं इंटरनेटवरून साभार.
- मुक्त शब्द, दिवाळी, २०२२मध्ये लेख पूर्वप्रकाशित.